Search This Blog

Monday, 22 February 2016

॥ विपर्यासक ॥





" आमचीच स्कूटर इको फ्रेण्डली आहे !! "


" सुमे...अगं ए सुमे... ...अगं इकडं इकडं... ...मी हांक मारतेय् तुला "... ... ...ठाक्‌ ठाक्‌ ठाक्
 आमच्या सौ. इंदिराजी टाळ्यांचा आवाज ऐकून बांवरून इकडं तिकडं बघायला लागल्या, अन्‌ चारदोन क्षणांत त्यांची नजर भिरभिरत सौ. विनया  आपटे बाईं वर स्थिरावली.
सौ. इंदिराजी अन्‌ मी डी. मार्ट मध्ये महिन्याच्या वाणीसामानाची खरेदी आटोपून बिलं करायच्या रांगेत सामानानं गच्च भरलेल्या ढंकलगाड्या पुढ्यात धंरून उभे होतो, अन्‌ तेव्हढ्यात तो पुकारा आमच्या कानावर पडला... ... ...
तश्या हांकांना ओ देत सौ. इंदिराजी चीत्कारल्या," अगं बाई... ...काय म्हणत्येय्‌स गं विने?...आटोपली कां खरेदी तुझी? "
सौ. विनयाबाई मग स्वतःची ढकलगाडी घेऊन गर्दीतनं वाट काढीत, पलीकडच्या रांगेत आमच्या बराच पुढं असलेला क्रमांक सोडून आमच्या पाठीमागं येऊन उभ्या राहिल्या...," छे गं... ...खरेदी कुठली आटपतेय्‌ इतक्यात... ..."
सौ. त्यांच्या पुढ्यातल्या ओसंडून वाहणार्‍या ढकलगाडीकडं बघत साश्चर्य वदल्या," कमालच आहे तुझी विने... ...अगं एव्हढं सामान पुरत नाही की काय तुला महिन्याला?... ...ऑं? "
सौ. विनयाबाई त्यांचा शॅम्पू केलेला बॉब् झुलवत म्हणाल्या," पुरतं गं... ...पण पुढच्या आठवड्यात सुजीत आणि साधना येताय्‌त ना...ऑस्ट्रेलियाहून... ... ...' ऑस्ट्रेलियाहून ' वर जरा ज्यास्तच जोर देत सौ. विनयाबाई पुढं म्हणाल्या... 
," म्हणून सगळी धांवपळ चाललीय्‌ बघ... त्यांना आतां इकडचं कांही मानवत नाही ना गं... ...त्यामुळं नातीसाठी केलॉग्ज्‌ चे डबे, साधना ला दूध ' फॅटलेस ' च लागतं बघ... ...झालंच तर सुजीत साठी ' प्रोटीन ड्रिंक ', शिवाय प्रत्येकाचे वेगवेगळे शॅंपूज् , डी.ओ.ज् , आणि बाटलीबंद पाण्यासकट अगदी सग्गळ्या वस्तूंची यादी साधना नं मला पाठवली होती बघ... ...तिकडं ह्या सगळ्या गोष्टी मिळतातही अगदी हांकेसरशी...आतां तिकडच्यासारखं इथं आपल्याकडं कुठं काय मिळतंय् चांगल्या दर्जाचं अन्‌ खात्रीशीर?... हो की नाही?... ...म्हणून आत्तां आले होते डी. मार्टमध्ये... ... " इतकं बोलून सौ. विनयाबाई नी कपाळावर आलेली बट मानेला नाजुकसा झंटका देत पांठीमागं भिरकावली... ..."

आमच्या सौ. इंदिराजी ह्या मुलुखाच्या फंटकळ... ....आणि ढालगजपणा..ज्याला इंग्रजीत ' शोइंग ऑफ् ' असं म्हणतात, त्याचं तर त्यांना मुळातच वावडं... ...!!
सौ. इंदिराजी," अगं न मिळायला काय झालंय् गं ह्या वस्तूं आपल्याकडं विने? आपण भले उप्पीट अन्‌ कांदेपोहे खात खात वाढलेले असूं...पण ही पुढची पिढी तर ' पिज्झा-बर्गर - केलॉग्ज् ' वर च पोंसलेली आहे ना ?... ...आणि त्यांचे हे परदेशी चोंचले पुरवायलाच तर आपल्या इथं  मॉल संस्कृति बोकाळलेली आहे... ...आतां तुला पण तिची लागण बिगण झालीय्‌ की काय?... ...ऑं? "
सौ. विनयाबाईं गडबडून म्हणाल्या," अगं तसं नाही गं सुमे... ...पण आतां आम्हांलाही ह्या सगळ्याची संवय व्हायला हवी ना?... ...म्हणून..."
मला कांही कळलं नाही," म्हणजे?... ...तुम्ही दोघे पण आतां ऑस्ट्रेलिया ला निघालाय्‌त की काय कायमचे?"
सौ. विनयाबाईं जरा अडखळल्याच," छे छे... ...तसं नाही कांही नाना... ...सुजीत - साधना आतां कायमचे च इकडं परत येताय्‌त ना? तेव्हां आतां आम्हांला पण ह्या सगळ्याची संवय करावी लागणार नाही कां? "
सौ. सुमीता चे डोंळे जरा बारीक खाले," पण काय गं विने... ...सुजीत तीन वर्षांपूर्वीच तर  गेला ना ऑस्ट्रेलिया ला?... ...मग इतक्यातच कंटाळला तिथं?... ... छानपैकी आय्‌. टी. तली नोकरी असूनही?... ...कमालच आहे विने... ... तुझ्या बोलण्यावरनं मला वाटलं, की तुम्ही सुद्धां कायमचे तिकडं स्थलांतरित व्हायचा विचार करताय्‌ की काय आतां म्हणून.............." 
" कसलं काय आलंय्‌ गं स्थलांतर... ...", सौ. विनयाबाईं सखेद म्हणाल्या, " एव्हढी छान नोकरी होती सुजीतची ... जगप्रसिद्ध ' लेहमन ब्रदर्स ' मध्ये गं ...अन्‌ पगारही भरपूर होता बघ... ...पण ह्या मुलांचं कांही कळेनाच झालंय्‌ मला... ...आठएक दिवसांपूर्वीच त्यानं नोकरी सोडली, आणि आतां भारतात परत यायचं ठंरवलंय्‌ त्यानं... ...साधना तशी खट्टूं च झालीय्‌ खरं तर... ...पण सुजीत चं म्हणणं त्याला नोकरीत हवा तसा ' इंटेलेक्च्युअल् स्कोप् ' मिळत नाही... ...त्यामुळं त्यानं नोकरी सोडली, अन्‌ आतां इकडं परत येऊन भारताच भविष्य घडवायचा विचार चाललाय्‌ त्याचा... ..."
सौ. सुमीता," अगं मग ऑस्ट्रेलियात च दुसरी नोकरी शोधायची की... ...इतकं छानसं सगळं सोडून इकडं परत कश्याला येताय्‌त हे दोघे? आणि ऑट्रेलियातही न मिळणारा ' इंटेलेक्च्युअल् स्कोप् ' सुजीत ला इथं भारतात कुठं अन्‌ कसा काय मिळणाराय्‌ ? "

सौ. विनयाबाईं चा घारागोरा चेहरा बघतां बघतां गोरामोरा झाला, अन्‌ त्या बांवचळून," बराय्‌ गं सुमे... ...जरा घाईत आहे ना...भेटूं निवांत सावकाश. " असं म्हणून ढंकलगाडीत ठांसलेलं सामान खालीवर करत परत तपासायला लागल्या... ...!!
मी सौ. इंदिराजी नां डोळ्यानंच गप्प रहायची खूण केली... ...आमचा नंबर आलेला असल्यामुळं ढकलगाडी पुढं सरकवून वस्तूं काउंटर वर द्यायला लागायची त्यांना आठवण केली. 
बिल भरून आम्ही हातांतल्या पिशव्या सांभाळत गाडीथांब्याकडं गेलो, अन्‌ डिकी चं झांकण उघडून मी एकेक पिशवी तीत ठेंवायला लागलो... ...तोंच
," नमस्कार सुमाबाई... ...कसं काय चाललंय्‌? " अशी खंणखंणीत आरोळी कानांवर आणि धपाक्‌दिशी थाप माझ्या पाठीवर पडली..........
मी डिकी चं झांकण बंद करून पांठमोरा वळलो, तों आम्हां दोघांचा महाविद्यालयीन सहाध्यायी अतुल गोरे [ हा पक्का मुंबईकर होता ] समोर उभा... ...!!!
," अय्या... ...' आतल्या '... ...तूं s s s s s s ...?... ...आणि इथं कसा काय अचानक... ...ऑं? ", सौ. इंदिराजी चीत्कारल्या... ...
," अगं आत्तांच ' मुंबई - पुणे ' बसमधनं ह्या कोंपर्‍यावर उतरलो... ...आणि ' यजमान बकरा ' शोंधत होतो, तोंच तुम्ही दोघे दिसलात... ...", अतुल हातातली बॅग खाली ठेंवून आळोखेपिळोखे देत म्हणाला."
मी," तुझं व्याकरण अजून कच्चं च आहे अतुल... ...तूं यजमान बकरा शोंधत होतास ना? मग ही यजमानीण बकरी सापडून काय उपयोग तुला ? "
अतुल," नाना... ...तूं पण भोंटच आहेस अगदी ", अतुल त्याच्या नेहमीच्या टांगमारू लकबीत खो खो हंसत म्हणाला, " अरे बकरी दिसली तेव्हांच मला कळलं की बकरा कुठंतरी जंवळपासच असणार म्हणून...!!!... ...
नाहीतरी ह्या सुमी नं माळ घालून तुझा खरोखरीच बकरा केलाय्‌ की... ... ... होः होः होः " अतुलराव सात मजली गडगडाट करीत हंसायला लागले, अन्‌ सौ. इंदिराजी त्याच्याकडं खाऊं की गिळूं नजरेनं बघायल्या लागल्या... ... ...!!
म्हणून मग मी झंटक्यात ' आतल्या ' ला त्याच्या बॅगेसकट गाडीत कोंबून त्याची ' आग्र्‍याहून सुटका ' केली, अन्‌ चांवी फिरवत सौ. इंदिराजीं कडं पाहिलं... ...
तसा सौ. इंदिराजी नी वंचपा काढलाच,"  ' मॉडर्न कॅफे ' ला घ्या आधी... ...ह्या बकरा शोंधत पुण्याला आलेल्या ' खाटका ' च्या पोंटापाण्याची व्यवस्था लावायला नको पहिली ? " 
आतां मी च खदांखदां हंसायला लागलो, अन्‌ ' खाटिकदादा ' नी च स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!

मी मग गीअर टांकत सौ. इंदिराजी ना म्हटलं," तुम्ही जरा फंटकळपणा च केलात बरं का, विनयाबाईंच्या बरोबर... ... ..."
सौ. इंदिराजी आतां उसळल्या," अरे वा रे वा...मी च फटकळ काय?... ...विनीचा ढालगजपणा दिसला नाही वाटतं तुम्हांला...ऑं?"
अतुल," ह्या विनीबाई कोण रे नाना? "
मी," अरे हि ची ऑफीस मधली मैत्रीण... ...तुमच्याच महाविद्यालयात शिकत होती की... ... पूर्वाश्रमी ची अनुजा आगाशे... ..."
अतुल," अच्छा...अच्छा... ...म्हणजे ' आनंदीबाई पेशवे ' म्हणतोय्‌स काय तूं?... ...मग सुमी चं बरोबर असणार तर... ..."
मी हंसायलाच लागलो," म्हणजे रे आतल्या?... ...ही ' आनंदीबाई पेशवे ' काय भानगड आहे? "
अतुल," नाना-सुमे... ...मी चांगलं ओंळखतो ह्या तुमच्या ' विनीबाई ' नां... ...आमच्या मागं दोन वर्षं होती ही ' बी. एम्. सी. सी. ' ला... ...

ह्या ' विनयाबाई ' नारायण पेठेतल्या भटांच्या बोळातल्या अस्सल पुणेरी वाड्यात जन्मलेल्या  - वाढलेल्या आहेत... ...' ध चा मा ' किंवा ' नरो वा कुंजरोवा ' करण्याच्या कलेत जन्मजात वाकबगार...!!! 
तिच्या आगाऊ ढालगज स्वभावामुळं सगळं महाविद्यालय तिला ' आनंदीबाई पेशवे ' म्हणून चिडवायचं... ...आलं लक्ष्यांत? "

सौ. इंदिराजी नी मग ' विनयाबाईं ' चा समग्र परिचय आम्हांला विदित केला... ...पति वामनराव महाराष्ट्र बॅंकेत, आणि ह्या एल्. आय्. सी. त नोकरीला... ...दोन मुली...पैकी  थोरली साधना लग्न झाल्यास ऑस्ट्रेलियात वास्तव्यास गेलेली... ...आणि धांकटी अरुणा  एल्. एल्. बी च्या पहिल्या वर्षांत शिकत होती... ...सोबत कुठल्यातरी बी. पी. ओ. त अर्धवेळ नोकरी पण करत होती...   
ऑफिसातल्या सहकारी म्हणून त्यांच्या च्या घरीं आमचं जाणं येणं पण व्हायचं आमंत्रणानुसार ... ...

तरी मी माझं घोडं दामटलंच," तरी असं तंट्‌कन्‌ कश्याला बोललात तुम्ही?... ...लागतं ना माणसाला ते... ...बिचार्‍या आधीच जावयाच्या चिंतेनं घेरलेल्या असतील...तीवर तुमच्या ह्या ' एक लोहार की ' ची फोडणी मारायला नको होती तुम्ही... ... ...नाही? "
सौ. इंदिराजी नी माझ्या गुगली ला सरळ सिक्सर च मारली," कांही चुकलं नाही माझं... ...दोनएक वर्षांपूर्वीपर्यंत ह्या विनी चा ढालगजपणा आवाक्यात होता... ...तेव्हां लेकीच्या बाळंतपणासाठी चार महिने ऑस्ट्रेलिया ला जाऊन काय आली... ...अन्‌ हिचा रथ जमिनीच्या वर फूटभर उंचीवरनं पळायला लागला... ...जिथं तिथं बादरायणी संबंध लावून ऑस्ट्रेलिया चं गुणगान... ...इतकं तोंड फांटेस्तोंवर, की जणूं काय ही स्वतःच ऑस्ट्रेलिया त उपजलेली आहे की काय... ... ...
बरं  लोक ते ही ऐकून दुर्लक्ष्य करायचे...मग हळूंहळूं ऑस्ट्रेलिया ची मायदेशाशी तुलना करून ह्यां ची मायदेशाला लाथाळी पण सुरूं झाली... ...ऐकलंत ना मघांशी ? "
मी," अहो असते एखाद्याची संवय तशी... ...म्हणून आपण कश्याला चिडायचं ?... ...आणि जावई कर्तबगार असेल त्यांचा... ...म्हणून ऑस्ट्रेलियात  गेला असेल ना? "
सौ. इंदिराजी ची मुल्क-ए-मैदान आतां धंडाडली," कसला कर्तबगार आलाय्? ... ...लग्नात बघितला नाहीत साधना च्या?... ...तोंडावरची  माशी पण हलत नसेल त्याच्या... ...आणि ह्यां ना असला बावळट जावई च हंवा होता... ...लेकी च्या अंगठ्याखाली नांदणारा... ... ...!!  केवळ ऑस्ट्रेलिया तली नोकरी बघून साधना नं पसंत केला असावा... ...लेक पण हिचा च अवतार आहे अगदी... ...मुलुखाची आगाऊ...!!!  ... ...आणि मला एक सांगा... "
मी सावध पवित्रा घेतला," काय सांगू? "
सौ. इंदिराजी निर्णायक वकिली धोबीपछाड मारीत मला म्हणाल्या," अहो इतका कर्तबगार जावई आहे हिचा, तर ऑस्ट्रेलियात दुसरीकडं चांगली नोकरी बघायचं सोडून परत इकडं कां येतोय्‌ तो... ... शेपूट घालून? " 
मी," अहो पण त्या अन्‌ त्यांचा जावई बघून घेतील ना त्याच्या नोकरीचं काय ते... ...तुम्ही कश्याला नस्त्या सूचना करायला गेलात ऑस्ट्रेलिया च्या? "
सौ. इंदिराजी," मग?...सोडते की काय मी?... ...आपली स्निग्धा ' नेव्हिलस् सॉफ्टवेअर ' मध्ये नोकरीला लागल्याचे मी पेढे वाटले ना ऑफिसात, तेव्हां ही एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून मला म्हणाली होती ' अगं सुमे, भारतातल्या कंपन्यात नोकरी पत्करून असं कायसं मिळणाराय्‌ ?... ...आणि आय्‌. टी. तल्यासारखा पैसा सॉफ्ट्वेअर क्षेत्रात कुठं मिळतो आजकाल? ' ... ... ...
तुम्हांला काय वाटलं, हिचा जावई खरंच ' लेहमन् ब्रदर्स्‌ ' मध्ये नोकरीला आहे म्हणून?... ...' लेहमन् ब्रदर्स्‌ ' चं ' मजकूर व्यवस्थापन ' म्हणजे ज्याला ' डाटा मॅनेजमेंट् ' म्हणतात, ते काम कंत्राटी पद्धीवर करून देणार्‍या दुसर्‍याच कुठल्यातरी कंपनीत आहे तो... ...
मघांशी अतुल नं सांगितल्याप्रमाणं, ही विनी च ध चा मा करून जावयाच्या गळ्यात ' लेहमन् ब्रदर्स्‌ ' चा बिल्ला अडकवून मोकळी झालेली आहे !!! ... ...आणि ते ' इंटेलेक्च्युल स्कोप ' वगैरे सगळा मालमसाला हिच्याच मनचा असणार, मी सांगते तुम्हांला... ...बहुधा कंपनीनं च हिच्या जावयाला नारळ दिलेला असावा, म्हणून आतां परत यायच्या गोष्टी चाललेल्या असणार... ...कळलं? 
आतां मी जमालगोटा दिल्यावर बघितलंत ना कसा चेहरा झाला तो?... ... ...काय?
तेव्हां असल्या लोकांना रोखठोक उत्तरंच द्यायची असतात ... बिल्कुल गय न करतां... ... समजलांत? "
पुढ्यातले डोसे उत्तप्पे राहिले थाळ्यांतच... ... आतां माझं च जाहीर पानिपत व्हायची चिन्हं दिसायला लागली... ... ...!!!
अन्‌ श्री. अतुलराव माझ्या संकटमोचनार्थ त्यांचा संस्कृत साहित्याचा व्यासंग सरसावून धांवले... ...
," नाना...सुमी चं म्हणणं असं आहे, की विनीबाई ' वृद्धा नारी पतिव्रता ' पंथातल्या आहेत... ...", अतुलराव.
" म्हणजे काय रे आतल्या?... ... जरा सविस्तर समजावून सांग बरं... ...", सौ. इंदिराजीं ना अतुल च्या गुगली नं बरोबर चंकवलं होतं... ...
," त्याचं काय आहे नाना-सुमे, की संस्कृतात एक अत्यंत बोधप्रद सुभाषित आहे... 

॥ गुणहीनता च दौर्बल्यं तथा कर्तृत्त्वहीनता
   समाश्रयन्ति संवादे शब्दान्विपरितार्थकान्‌
   अशक्तश्च भवेत्साधुर्ब्रह्मचारी तु निर्धनः
   व्याधिष्ठो देवभक्तश्च वृद्धा नारी पतिव्रता !!! ॥ "

सौ. इंदिराजी," अरे हो...हो...हो अतुलाचार्यजी... ... जरा विशद करून सांगाल काय सविस्तर ? "
श्री. अतुलाचार्यानी आतां त्यांचं प्रवचन सुरूं केलं... ... ...

अतुल," असं बघा नाना - सुमे, की ' नरो वा कुंजरो वा ' ही मनोवृत्ति आजची नाही कांही... ...अगदी महाभारतकाळापासून समाजात हे चालत आलेलं आहे...आणि भाषाकारांनी समानार्थी अनेकविध शब्द निर्माण करून  असल्या ढालगज लोकांची चांगली सोय करून ठेंवलेली आहे, आणि त्यावरच हे सुभाषित बेतलेलं आहे."
मी," मला नाही समजलं नीटसं... ...नक्की काय म्हणाय्‌चंय तुला? "
अतुल," म्हणजे असं बघा "... ...अतुलराव फोड करून सांगत म्हणाले," की एखादा मनुष्य माणूसघाण्या असला, तर त्याला एकांतप्रिय म्हणतां येतं...कवडीचुंबका ला काटकसरी ठंरवतां येतो... ...कुणी तोंडाळ बाई असली तर तिला सडेतोड म्हणून वेळ मारून नेतां येते... एखाद्याला हडकुळ्या उपवर मुलीला सडपातळ म्हणतां येतं... फार कश्याला, अगदी ठार काळ्या उपवर मुलींची वर्णनं त्यांचे जन्मदाते गहूंवर्णी म्हणून करतातच की नाही?... ...आणि एखादी चा नवरा मुखदुर्बळ असला, तर तिला चारचौघांत नवरा ' मितभाषी ' आहे ' असं म्हणून अंगावर आलेला प्रसंग शिंगावरही घेता येतो...!!! 
तात्पर्य काय, की भाषाकारांनी विनी सारख्या लोकांसाठी कश्यालाही कांहीही म्हणायची झक्क सोय करून ठेंवलेली आहे !!!... ...कळलं? "
सौ. इंदिराजी," इथपर्यंत समजलं... ...पण ते मघांचचं सुभाषित... ... ... "
अतुल," सांगतो...सांगतो... ...तर ह्या ढालगज लोकांच्या त्यांना स्वतःलाच ठाऊक नसलेल्या दोन गोच्या सदा न्‌ कदा होत असतात... ...पहिली म्हणजे त्यांनी कश्याला कांहीही संबोधलं, तरी वास्तव कांही बदलत नसतं, अन्‌ हे शेख महंमद मात्र स्वतःला लावलेल्या चष्म्यातनंच वास्तवाचा भ्रामक अर्थ लावीत जगत असतात... ... हे त्यांच्या अंगभूत ढालगजपणाचं त्यांना मिळालेलं कर्मप्राप्त बक्षीस असतं... ... ..."
मी," आणि दुसरी गोची?"
अतुल," दुसरी गोची अशी असते की ढालगजपणा कुठं करायचा नसतो, हे ह्या मंडळीना अजिबात ठाऊक नसतं... ...
तर सुभाषितकार असं सांगताय्‌त की जे लोक स्वतः गुणहीन, दुर्बळ, अन्‌ कर्तृत्त्वहीन असतात, ते सदा न्‌ कदा ' नरो वा कुंजरो वा ' करण्याच्याच मागं लागलेले असतात, कारण त्यांच्या बाबतीतलं वास्तव हे त्यांना स्वतःलाच लांच्छनास्पद असतं... ...आणि हे ठाऊक असल्यामुळंच मग समस्त आनंदीबाई वर ' ध चा मा ' अथवा धर्मराजां वर ' नरो वा कुंजरो वा ' करीत बसायची पाळी येत असते... ... ...
अश्या लोकांना संस्कृतात ' विपर्यासक ' असं संबोधतात... 
सौ. इंदिराजी," मग पुढचं ते ' अशक्तस्य....वगैरे... ...त्याचा अर्थ? "
अतुल," ऐका तर... ... तर सुभाषितकार असं सांगताय्‌त, की असे लोक एखाद्या अशक्त दुर्बळ माणसाला - ज्याच्यात ' अरे ' ला ' कां रे? ' म्हणायची धमक नाही, त्याला साधुपुरुष म्हणतील... ...जो बायको - पोरं पोसायची ऐपत नसल्यामुळं बिनलग्नाचा राह्यलाय्‌, त्याच्या कडक ब्रह्मचर्य व्रताचा उदो उदो करीत सुटतील... ...जो नानाविध व्याधीनीं ग्रासल्या-पिडल्यामुळं देव देव करीत सुटलाय्‌, त्याची ' काय विलक्षण देवभक्त आहे ' म्हणून वाखाणणी करतील, आणि जराजर्जर झाल्यामुळं जिला कांठी शिवाय चालतांही येत नाही, अश्या बाई ला ' पट्टीची पतिव्रता ' म्हणून डोक्यावर घेऊन  दुसर्‍यांना तिची मिरवणूक काढायला पण सांगतील...!!! "
मी आतां कपाळाला हात लावला," आणि ही अशीं कडबोळीं करून मिळतं काय अश्या विपर्यासकांना? "
अतुल," मिळतं काय ते त्यांचं त्यांनाच ठाऊक...पण जातं काय तेव्हढं सांगतो...", अतुलजी निरूपण करीत म्हणाले.
सौ. इंदिराजी," काय जात असेल ह्या लोकांचं?... ...नुस्ती संबोधनं बदलल्यानं असं कायसं नुकसान होणाराय्‌ ?"
अतुल ," जातं तर सुमे... ...अगदी कमरेचंसुद्धां जायची वेळ येते कधीकधी... ..."
सौ. इंदिराजी," ते कसं काय? "
आणि अतुलजी नी सौ. इंदिराजी नां बघतां बघतां चितपट धोबीपछाड मारली," होतं असं सुमे, की ह्या ' विपर्यासकां ' ची अवस्था नेहमीच ' आपलेच दात आणि आपलेच ओंठ ' अशी असते...फक्त हे कळत असूनही त्यांना एव्हढंच वळत नसतं की 
' आपुलेची दांत, आपुलेची ओंठ । म्हणोनियां कवठ, चांवों नये '
आणि तुझ्यासारखी जातिवन्त ' कवठं ' जेव्हां हे लोक चांवायला जातात, तेव्हां एक तर ओंठ तरी फाटणार, नाहीतर दात तरी पडणार !!!...काय सुमे?... ... ...हीः हीः हीः हीः "
निरूपण संपवून डॅंबीस अतुलजी सौ. इंदिराजीं कडं मिश्किलपणे बघायला लागले...!!
मघांशी विनयाबाईंचे पडलेले दांत आंठवून मी आमच्या कवठाकडं बघत फिदीफिदी हंसायला लागलो... ...!!!
आणि सौ. इंदिराजीनींच निरुत्तर होऊन लालबुंद होत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ... ...!!!!

*****************************************************************************************
-- रविशंकर.
२२ फेब्रुवारी २०१६.

No comments:

Post a Comment