॥ पासायदान ॥
," तुला सांगतो नाना... ...," गणेश नीलकण्ठ ऊर्फ गण्या पोखलेकर नं लालबुंद चेहरा करून नाकपुड्या फेंदारत व्याघ्रगर्जना केली," हा ' नार्या माटे ' मास्तर कधीतरी नशीबानं जर माझ्या तावडीत सापडला ना, तर त्याचा असा कांही लोळागोळा करून ठेवीन बघ, परत जन्मात कधी हा कुणाला द्रवयांत्रिकी [ फ्लुईड मेकॅनिक्स् ] च्या पेपरात नापास करायचं धाडस करणार नाही...!!! ...काय? "
१९७३ सालातल्या दिवाळीच्या सुटीआधीचे ते गारठलेले दिवस होते...आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल त्या दिवशी जाहीर झालेला होता... ... तारीख होती २३ ऑक्टोबर १९७३.
गेल्या सहा सत्रांच्या रिवाजानुसार या वेळी पण ह्या गणोबांची ' द्रवयांत्रिकी ' च्या पेपरात सफाचट दांडी उडालेली होती.!!
बाकी सगळ्या विषयात कुठंतरी विशेष प्राविण्यासह प्रथम वर्ग, कुठं द्वितीय वर्ग, कुठं जेमतेम काठांवर उत्तीर्ण, अशी आम्हां सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच कर्तबगारी गाजवणार्या ह्या गणोबांचा द्रवयांत्रिकी ह्या विषयाशी, अन् तो आम्हांला पोटतिडिकेनं शिकवणार्या ' नारायणराव माटे ' सरांच्याशी कुठल्या जन्मापासून छत्तिसाचा आकडा होता, ते त्या एका विधात्यालाच ठाऊक असावं. कारण प्रथम वर्ष द्वितीय सत्राला राशीला आलेल्या ह्या विषयात तब्बल सहा सत्रपरीक्षांत ठार नापास व्हायचा भीमपराक्रम ह्या गणोबां नी करून दाखवलेला होता...!!!
गम्मत म्हणजे अभियांत्रिकीचा मूलाधार असणार्या गणित विषयावर मात्र ह्या गणरायांचं कौतुकास्पद प्रभुत्त्व होतं !!
गम्मत म्हणजे अभियांत्रिकीचा मूलाधार असणार्या गणित विषयावर मात्र ह्या गणरायांचं कौतुकास्पद प्रभुत्त्व होतं !!
प्रत्येक सत्रात बाकीच्या सगळ्या विषयात पास होत गेल्यानं दरवेळी त्यांना पुढच्या सत्राला प्रवेश [ ए. टी. के. टी. ] मिळत गेला... ...
चार सत्रानंतर पांचव्या सत्रात कुणी जयकर नांवाच्या शिक्षणतज्ञानी केलेला ' जयकर रूल ' ज्याचं विद्यार्थ्यांनी ' भणंग विद्यार्थी कल्याण नियम ', असं मोठ्या प्रेमानं मराठी नामकरण केलेलं होतं, तो गणोबांच्या साह्यार्थ धांवून आलेला होता, अन् तृतीय वर्षाची दोन्ही सत्रं पण पार पाडायची गणोबांना मुभा मिळालेली होती... ... ...केवळ ' द्रवयांत्रिकी ' त उत्तीर्ण व्हायच्या अटीवर...!!
तथापि परमेश्वरानं दिलेल्या कुशाग्रबुद्धी चा वापर तहहयात ' मॉडर्न कॅफे ' त दोस्तांच्या गराड्यात बसून टिंगल टवाळ्या करण्यात व्यतीत केल्यामुळं गणराया नां ती अट पण पुरी करणं कांही जमलेलं नव्हतं, आणि ह्याचं खापर ते ' नार्या ' वर फोडत तंणतंणत होते... ... ... !!!
वसतिगृहातल्या माझ्या खोलीत चिंतातुर चेहरे झालेल्या आम्हां मित्रांचा [ म्हणजे मी स्वतः, बंड्या कांबळे, बाळ्या गुजराथी, बाप्या साने, अन्या सरदेश्मुख, सत्या लेले, वगैरे ],अड्डा बसलेला होता, अन् दस्तुरखुद्द गणराय तरातरा येरझारे घालीत माटे मास्तरांना लाखोली वाहत होते...!!!
बाळ्या," गण्या...खंरच तुझी ह्या परीक्षेत पण ' द्रवयांत्रिकी ' त दाण्डी उडाली?... ..."
" मग काय कुत्रं चांवलंय् मला, म्हणून शिव्या देतोय् त्या ' नार्या ' ला?... ...ऑं? ", गणोबा वतवतले.
" तसं नव्हे रे गण्या ", ... ...अन्या नं मांजा गुण्डाळला," आम्हांला काळजी लागलीय् ना तुझी... ...म्हणून बाळ्या विचारतोय्... ... ...किती रना झाल्या तुझ्या ' द्रवयांत्रिकी ' त?"
गण्या उसळला," साल्या नार्या नं २९ गुणांवर लटकवलाय् मला... ...आणखी पांचसहा गुणावर पाणी सोडलं असतंन् तर काय बिघडलं असतं रे अन्या ह्या नार्याचं?... ... ...काय खिश्यातली इस्टेट गेली असती काय साल्याच्या?"
मी," हे बघ गण्या... ...प्रत्येक प्रश्नात सिद्धान्ताचा अ भाग आणि गणिताचा ब भाग होता की नाही दहा दहा मार्कांचा? "
सत्या," तुझ्या लक्ष्यांत नाही नाना... ...ह्या पेपरात माटे मास्तरांनी चाळीस गुण सैद्धान्तिक भागाला, तर गणित विभागांला साठ अशी विभागणी केलेली होती...म्हणून ह्या गण्याची गोची झाली असणार..."
मी," म्हणजे?... ...मी नाही समजलो........"
बाप्या," नान्या... ...साल्या सरळ आहे अगदी... ...गण्यानं नेमके साठ गुण विभागलेले गणितं असलेलेच प्रश्न निवडले असणार... ...आणि दोन गणितात आडवा झाला... ...दुसरं काय?"
मी," गण्या, अरे चाळीस मार्कांचे सैद्धांतिक प्रश्न मग कां सोडवले नाहीस रे?... ...सहज सुटला असतास की तूं... ... ..."
गणोबानी फाड्दिशी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला," लेको सैद्धान्तिक विभागातली सहा प्रकरणं अभ्यासलीच नव्हती मी...मग चाळीस गुण कसे काय खिश्यात घालणार बोला?... ...ऑप्शनला टाकायची खाज नडली आम्हांला... ...दुसरं काय?... ...पण चारपैकी दोन गणितं तर बरोबर सोडवलेली होती मी... ... ...म्हणजे सिद्धांतांचे वीस आणि दोन गणितांचे तीस धंरून एकूण पन्नास मार्कांचा भाग तरी सोडवलेला होता की... ...त्यातलं एखादं गणित चुकलं असं जरी गृहीत धरलं, तरी गेला बाजार पस्तीस मार्कांत कांठावर तरी सुटायला हवा होतो रे मी... ..."
बंड्या म्हणाला," गण्या... ...मग सैद्धान्तिक भागातच कुठंतरी बेक्कार सिक्सर मारून ठेंवली असणार तूं... ...नाहीतर असं गंचकायचं कांही कारणच नाही दिसत मला."
"तेंच तर म्हणतोय् मी... ...अरे सैद्धान्तिक भाग तर वर्णनात्मकच असतो ना?... ...त्यात कुठंतरी अजून दोनचारच गुणांवर पाणी सोडायला काय धाड भंरली होती काय ह्या ' नार्या ' ला?... ' द्रवयांत्रिकी ' च्या गळफासातनं तरी सुटलो असतो की नाही मी... ... ...ऑं?", गणोबा येरझारे घालत करवादले.
इतक होतंय् तोंवर आमच्या टोळीतला ' जेम्स् बॉण्ड् ' बाबू मानकर हातात एक कागदाचा चिटोरा फडकावीत खोलीत दाखल झाला... ...
गणोबांना बघतांक्षणीच बाबू चा चेहरा काळवंडला, अन् त्यानं कपाळाला हात लावून सुस्कारा टांकत माझ्या शेजारीच चारपाईवर बसकण मारली...!!!
सगळ्यांचे चेहरे ओंढले... ... गणोबांचे हात पांठीमागं बांधून येरझारे सुरूंच होते... ... ...
बंड्या कांबळेनं मग कोंडी फोडत तोंड उघडलं," काय झालं रे बाबू?... ...ऑं?"
बाबू हातातला चिटोरा माझ्याकडं देत कह्णला," नान्या... ...गण्या झोपणार बहुतेक... ...लक्षणं कांही खरी दिसत नाहीत मला... ..."
मी," अरे पण झालंय तरी काय असं?... ...माटे मास्तरांनी ह्या गण्याला काय हद्दपार बिद्दपार केला की काय महाविद्यालयातनं?"
बाबू," तसंच कांहीतरी दिसतंय्... ..."
"म्हणजे रे बाबू?", आतां सगळेच कान टंवकारून सरसावले... ...बाबू काय सांगतो ते ऐकायला... ... ...
आणि ऍटमबॉंबचा विस्फोट करत बाबू म्हणाला," लेको, आत्ता तासाभरापूर्वीच मी ' टॉस् ' च्या डोळे सरांच्याकडं गेलो होतो...कांही शंका विचारायला... ...तर त्यांच्या खोलीत खुद्द माटे मास्तर डोळे सरांच्याबरोबर बोलत होते... ...गण्याचाच विषय होता... ... ...
सत्या लेले," आरं तिच्यायला... ...मग काय झालं?"
बाबू," साल्यानो ऐका तर खरं... ...तर गण्याचं नांव कानावर पडल्यावर मी आत न जातां दाराबाहेरच थांबलो त्यांचं बोलणं ऐकत... ...तेव्हां समजलं की सध्याचा आपला जो एकत्रित म्हणजे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे, तो पुढच्या वर्षापासून रद्दच होतोय्, आणि त्यानंतर परत नवीन बांधणीचा अभ्यासक्रम सगळ्या विद्यापीठांत लागू होणाराय्... ...बहुतेक उद्याच सूचना लागेल फलकावर त्यासंबंधी... तो कागद मला बघायला मिळायला म्हणून जसाच्या तसा उतरवून आणलाय्...हे बघा." म्हणत बाबूनं तो कागद माझ्या हातात कोंबला...
तो जे सांगत होता तें च सगळं कागदावर लिहिलेलं होतं... ... ...
मी," होईना कां अभ्यासक्रमात बदल...त्याचा गण्याशी काय संबंध ?"
बाबू," ऐका तर... ...तर माटे मास्तर डोळे मास्तरांना खासगीत सांगत होते की ह्या वेळच्या सत्र परीक्षेत आख्ख्या विद्यापीठात ' द्रवयांत्रिकी ' त लटकलेला गण्या हा एकमेव विद्यार्थी आहे म्हणून...!!!"
गणोबांचा हा भीमपराक्रम ऐकून आतां सगळ्यांनीच आ वांसत कपाळांना हात लावले," आतां काय होणार रे बाबू गण्याचं... ...माहेरी रवानगी की काय...कायमची ?"
बाबू," लेको ऐका तर सगळं नीट... ...ह्या गण्याचं लचांड निस्तरायचं कसं, हे कोडं आतां माटे मास्तरांनाच छळायला लागलंय्... ..."
बंड्या आतां सरसावला," बाब्या... ...उगीच फेंकूं नकोस कांहीतरी... ...कसलं लचाण्ड आलंय् त्यात? गण्या ह्या वेळेला पण इतर सगळ्या विषयात पास झालाय् की... म्हणजे गण्याला यावेळीपण ए.टी.के.टी. मिळणार... ...आणि पुढच्या सत्रात - म्हणजे तुझ्या माहितीनुसार आपल्या एकत्रित अभ्यासक्रमाच्या अखेरच्या सत्रात - गण्या तो विषय सोडवूं शकेल की ... ... ...मग?"
बाबू हिचकॉक् च्या थाटात रहस्यभेद करीत म्हणाला," साले हो नेमकं इथंच सगळं लचाण्ड झालंय्... ..."
आतां दस्तुरखुद्द गणोबाही जिवाचे कान करून ऐकायला लागले... ...
अन् बाबू मानकरानं ऍटम बॉंब चा दुसरा स्फोट केला," लचाण्ड असं झालंय् की, आख्ख्या विद्यापीठात गण्या हा ' द्रवयांत्रिकी ' त लटकलेला एकमेव विद्यार्थी आहे...!!!!
त्याला ए.टी.के.टी. मिळेलही... ...
पण एका विद्यार्थ्यासाठी पेपर काढायचा, तो एकच पेपर छापून घ्यायचा... ...निरीक्षक,परीक्षक, नियंत्रक, सरपरीक्षक, परीक्षा कक्ष, इ. सारी सारी व्यवस्था करायची... ...एकाच विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायची, उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या नियमानुसार तिसर्याच परीक्षक-नियंत्रक-सरपरीक्षक अश्या चक्रव्यूहातनं तपासून पार पाडायची...आणि एकाच विद्यार्थ्याचा निकालही जाहीर करून वर्तमानपत्रांत छापवायचा...!!!
हे सगळं राबवणं विद्यापीठाला शक्य आहे काय सांगा मला?... ...कुठलं विद्यापीठ करूं शकेल काय असली सर्कस... ...ऑं?"
माटे मास्तर स्वतःच मघांशी डोळे मास्तरांना म्हणत होते की हे निस्तरण्यापलीकडचं लचाण्ड होऊन बसलंय् म्हणून... ...!!!
त्यांना म्हणे कुलगुरु रॅंग्लर महामुनीं सरांचा तासाभरापूर्वीच निरोप आला की ' प्राचार्यांसोबत ताबडतोब येऊन भेटा ' म्हणून... ... ...!!!!
आतां समजलं काय गण्या नं कसला फर्मास राडा करून ठेंवलाय् ते? "
आम्ही सगळे पाठमोर्या उभ्या असलेल्या गणरायांच्या दिशेनं धास्तावून बघायला लागलो... ... ...
बाबू मानकर तर गणोबा आतां उभ्या उभ्या च कोंसळतात की काय म्हणून त्यांना सांवरायला पुढं सरकलाही... ... ...
पांठमोरे गणराय मात्र अगदी सावकाश आमच्या दिशेत सामोरे वळले... ... ...
आणि दुसर्या क्षणीं हर्षोन्माद झाल्यागत खदां खदां हंसायला लागले...!!!
माझी अन् बाबू मानकराची बखोटी धंरून त्यांनी खोलीतच धंपाधंपा नाचत ' बल्ले बल्ले ' ओंरडत भांगडा करायलाही सुरुवात केली...!!!
आणि जमलेल्या यच्चयावत स्थापत्यविशारदांचे डोळे कपाळांत गेले. !!!!
बंड्या नं मध्ये पडत मग तो भांगडा थांबवून गणोबांना विचारलं," गण्या...साल्या एव्हढं सटकायला काय झालंय् काय तुला?"
गणोबा डोंळ्यात जमलेलं पाणी कोंपरानं पुसत म्हणाले," बण्ड्या, सत्या, नान्या, बाप्या.... ....साल्यानों, मी म्हटलं नव्हतं तुम्हांला? हा नारोबा आतां बरोबर सापडलाय् माझ्या तावडीत... ...आतां बघाच साल्याला कसा पिदडतो ते... ...हीः हीः हीः हीः... ...हा बाब्या सांगतोय् तंसंच जर झालं असेल ना, तर विद्यापीठाची खरोखरच गोची करून ठेंवलीय् ह्या नार्यानं... ...तेव्हां कुलगुरु आतां त्याची बिनपाण्यानं करणार हे नक्की...आणि दुसर्या बाजूनं मी पण पिदडणार साल्याला बेदम... ... ...साला अभियांत्रिकीतनं कायमचा हद्दपार झालो तरी बेहत्तर, पण ह्या नार्या ला जन्माचा धडा शिकवल्याशिवाय आतां सोडत नाही बघ मी...काय?"
मी," गण्या... ...बेतानं घे जरा...हवेत चालूं नकोस... ...साल्या कुलगुरु महामुनी ही फार मोठी हस्ती आहे यार... ...रॅंग्लर महामुनी म्हणतात त्यांना...समजलास?... ... ...ते जर संतापले असतील ना, तर नारोबा राहतील बाजूलाच, लेका तुझीच गच्छंती व्हायची वेळ ओंढवायची एखादेवेळी... ... ...तेव्हां माझं ऐक...हुतात्मा व्हायचा नाद सोडून दे आणि स्वतःचं भलं बघ फक्त... ...काय?"
एव्हढं होतंय् तोंवर महाविद्यालयाच्या निरोप्यानं खोलीत येत गणोबांना निरोप दिला की माटे सरांनी उद्या सकाळी ९ वाजतांच त्यांना भेटायला सांगितलंय् म्हणून."
झालं... ...दुसर्या दिवशीं सकाळी नारोबा-गणोबांची भेंट पार पडली... ...
आमची टोळी तासांना दांड्या मारून बोटक्लबवरच्या अण्णा च्या चहागृहात गणोबांची प्रतीक्षा करीत बसलेली होती... ...
थोड्या वेळानं गणोबा सुहास्य मुद्रेनं डुलत डुलत हजर झाले.
सत्या," काय गण्या... ...झालं काय सगळं निस्तरुन?"
गणोबा," कसलं काय आलंय्?...' नापास झालेल्या पेपर च्या पुनर्तपासणीसाठी अर्ज द्या ' म्हणून हा नार्या माझ्या मागं हात धुवून लागला होता... ..."
मी," मग?... ...दिलास अर्ज?"
गणोबा फिस्कारले," छे छे... ...झुरळासारखा झंटकून टाकला त्याला... ...' जमणार नाही ' म्हणालो... ..."
सगळ्यांची तार आतां चांगलीच तांणली... ...," मग रे गण्या?"
गणोबा," मग मला दम भरायला लागला, की तुम्ही - म्हणजे - मी, एकटेच नापास विद्यार्थी आहांत म्हणून... ...तेव्हां कदाचित अभियांत्रिकीही सोडून द्यायची वेळ येऊं शकते असं म्हणत होता मला... ..."
आतां सगळ्यांची हवा तंग झाली," मग काय म्हणालास तूं?"
गणोबां च्या अंगात आतां लोकमान्य संचारले," मी स्वच्छ सांगितलं, की असं पाठीमागच्या दारानं मला मुळीच पास व्हायचं नाही ! ... ...तुम्हीच नापास केलंय् मला ... ... तेव्हां आतां पास होईन तर पुन्हां पेपर देऊनच !!!... ...काय?"
बंड्या," आणि बाबू ला कळलेली माहिती - म्हणजे विद्यापीठाला तुझा एकट्याचा पेपर काढणं अशक्य आहे - खरी असेल तर?... ...काय शंख करत बसणाराय्स माटे मास्तरांच्या नावानं?"
गणोबा छाती पुढं काढून म्हणाले," लेको, तसं होणार नाही... ...अगदी नक्की."
मी," कश्यावरून तसं होणार नाही म्हणतोय्स तूं गण्या? अरे ताबडतोब देऊन टाकायचा अर्ज... ...माटे मास्तरांनी बरोबर केलं असतं सगळं पुनर्परीक्षणांत... ...साल्या मूर्ख आहेस तूं अगदी... ... ...सत्र सोडवायची चालून आलेली संधी घालवलीस बघ तूं."
गणोबा," तुला सांगितलं ना नाना... ...तसं कांही होणार नाही... ...अरे विद्यापीठात कुलगुरुंच्या कार्यालयातले एक गृहस्थ माझ्या काकांच्या ओंळखीचे आहेत...त्यांच्या बोलण्यात आलं की काल महामुनी सरांनी ह्या नार्या ला बोलावून चांगलाच झापलाय् म्हणून... ... आतां मी पण चेपलाय् त्याला दुसर्या बाजूनं... ...बघूंयाच आतां काय करतोय् ते... ... ..."
विषय तेंव्हढ्यावरच थांबला, अन् सगळे कपाळांना हात लावत गणोबांना शुभचिंतन देऊन सटकले... ... ...
जातां जातां बाबू आमच्या कानांत कुजबुजलाच," लेको ह्या गण्याची दोनचार दिवसांतच अंत्ययात्रा निघणार बहुतेक... ...तयारीत रहा.!!!!
दोनचार दिवस कुठले जाताय्त... ...एकच दिवस उलटला फक्त... ...त्या दिवशीं महाविद्यालयात गणोबाही दिसले नाहीत, अन् नारोबांच्या तासाचाही खाडा झाला... ...दिवसभर दोघेही गायब झालेले होते कुठंतरी...
झा s s s s s लं...तिसर्या दिवशी सकाळी झाडून सगळीच्या सगळी टोळी मॉडर्न् कॅफे त सकाळच्या नाष्ट्याला गोळा झालेली होती... ...गणोबांचं पुढं काय झालं असावं ? ह्या चर्चेला नुस्ता ऊत आला होता... ...गल्ल्यावर बसलेल्या मालक सदामामा शेट्टीच्या कानांवर आमच्या तावातावात चाललेल्या गप्पा जश्या पडल्या, तसा सदामामा पण गल्ल्यावर दुसर्या माणसाला बसवून आमच्या टोंळक्यात एक खुर्ची ओंढून घुसला, अन् चौकशी करायला लागला की ' गणेशरावांची काय भानगड झालीय्? ' म्हणून.
गणोबा मॉडर्न कॅफे चे गेल्या सातआठ वर्षांपासूनचे मातब्बर आश्रयदाते असल्यानं सदामामा शेट्टीला त्यांच्याबद्दल खास जिव्हाळा होताच... ...भानगड काय झालीय् ते कळल्यावर त्यानं आपली गल्ल्याच्या मागं लावलेल्या साईबाबांच्या तसबिरीला उदबत्ती ओंवाळून ' गणोबांची काळजी घ्या ' असं साकडं घातलं, आणि पुन्हां आमच्या घोळक्यात येऊन चिंताग्रस्त चेहरा करून बसला.
गणोबा मॉडर्न कॅफे चे गेल्या सातआठ वर्षांपासूनचे मातब्बर आश्रयदाते असल्यानं सदामामा शेट्टीला त्यांच्याबद्दल खास जिव्हाळा होताच... ...भानगड काय झालीय् ते कळल्यावर त्यानं आपली गल्ल्याच्या मागं लावलेल्या साईबाबांच्या तसबिरीला उदबत्ती ओंवाळून ' गणोबांची काळजी घ्या ' असं साकडं घातलं, आणि पुन्हां आमच्या घोळक्यात येऊन चिंताग्रस्त चेहरा करून बसला.
दहा-पांच मिनिटं उलटली असतील नसतील, तोंच दस्तुरखुद्द गणरायांची स्वारीच दत्त म्हणून मॉडर्न कॅफे त अवतरली... ... ...
सत्या नं चपळाई करून त्यांच्या पार्श्वभागाखाली एक खुर्ची ओंढून सरकवली, अन् विचारलं," काय झालं बाबा शेंवटी?... ...काल तुला आणि माटे सरांना कुलगुरुनी बोलावून घेतलं होतं असं बाबू म्हणत होता... ... ..." सत्यानं वाक्य अर्धवट सोडलं, अन् सदामामासकट सगळे गणोबांच्या तोंडाकडं बघायला लागले... ... ...
गणोबा एक क्षणभरच स्तब्ध झाले... ...," काय होणार दुसरं साल्यानों... ... ..."
टोळी ओंरडली," म्हणजे गच्छंती... ... ..."
गणोबा खो खो हंसत गरजले," गच्छंती? छ्याट् लेको... ... ... ' द्रवयांत्रिकी ' चं ग्रहण सुटलं !!... ...विशेष प्राविण्यासह !!!... ...
ते पण फेरतपासणी करून नव्हे, तर पेपर सोडवून...!!!... ...६८ टक्के गुण त्या ' खत्रुड नार्या ' च्या उरावर बसून वसूल केलेत साल्यानों... ... ... आहांत कुठं?" !!!!
एक क्षणभर मॉडर्न कॅफेच्या दालनांत टांचणी पडली तरी आवाज ऐकूं येईल असली शांतता पसरली... ... ...
ते पण फेरतपासणी करून नव्हे, तर पेपर सोडवून...!!!... ...६८ टक्के गुण त्या ' खत्रुड नार्या ' च्या उरावर बसून वसूल केलेत साल्यानों... ... ... आहांत कुठं?" !!!!
एक क्षणभर मॉडर्न कॅफेच्या दालनांत टांचणी पडली तरी आवाज ऐकूं येईल असली शांतता पसरली... ... ...
अन् दुसर्या क्षणींच गणोबांचा दमदार आवाज घुमला," सदामामा... ... ...डोसा आणि कोल्ड् कॉफी आणा सगळ्यांना... ... ...बिल माझ्या खात्यावर टाकायचं " !!!
सदामामानं विलक्षण खूष होत वेटरला बोलावून ऑर्डर दिली आणि म्हणाला," काय गणेशराव... ...एव्हढी मस्त बातमी दिलीत, आणि बिल पण तुम्हीच देणार? छे छे छे... ...तसलं कांही नाही चालायचं... ...काय रे पोरानो? "
सदामामा शेट्टी नं मग वेटरला सांगितलं," सगळ्यां पोरांना डोसा आणि कोल्ड कॉफी दे आणून...आणि बिल करायचं नाही... काय?" !!!!
गणोबांशी दणकून हस्तांदोलन करून मग सदामामा गल्ला सांभाळायला निघून गेला... ... ...
गणोबांशी दणकून हस्तांदोलन करून मग सदामामा गल्ला सांभाळायला निघून गेला... ... ...
आणि डोश्यांचे तोंबरे भरतां भरतां गणोबांनी स्वतःच सगळी चित्तरकथा सांगितली," लेको, खरं सांगायचं तर महामुनी सरांनी बोलावलंय् असं काल सकाळी कळलं, तेव्हां अक्षरशः आपली चड्डी सुटायचीच बाकी राहिलेली होती... ...म्हटलं आटपलं आतां आपलं सगळं... ..."
" आम्हांलाही तसंच वाटलं होतं बघ गण्या... ...", सत्या नं गण्याची दांडी उडवली," आत्तां आम्ही तुझ्या अंत्ययात्रेचं कसं काय करायचं तेच ठंरवायला जमलो होतो इथं !!!! ... ... ...हीः हीः हीः हीः "
" तूं गप रे सत्या... ...बाबू वतवतला," गण्या काय सांगतोय् ते ऐकूं दे जरा... ... ..."
" तूं गप रे सत्या... ...बाबू वतवतला," गण्या काय सांगतोय् ते ऐकूं दे जरा... ... ..."
गणोबांचं प्रवचन पुढं चालूं झालं," मग काय झालं, की परवां दिवशी खोलीवर ह्या नाना नं मला दम भरला होता की नाही ' हवेत चालूं नकोस ' म्हणून?.... ...तो च रामबाण कामाला आला शेवटी... ... ...थॅंक्स् नान्या..."
मी चक्रावलोच," ते कसं काय रे गण्या?"
गणोबा," मला लक्ष्यात आलं की तिथं ओरडण्यापेक्षां ' रडणं ' च कामाला येणार म्हणून... ...!!
हे महामुनी सर आहेत ना, ते रॅंग्लर आहेत एव्हढंच तुम्हांला माहीत आहे... ...पण हे सर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत एव्हढे मोठे झालेले आहेत... ... विद्यार्थी दशेत असतांना त्यांनी माधुकरी मागून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे... ...ठाऊक आहे तुम्हांला?"
अन्या म्हणाला," खरंच?... ... पण हे तुला कसं काय ठाऊक... ... ...ऑं?"
गणोबा," मला तरी कुठं माहीत होतं?... ...बस्स...काढली माहिती इकडून तिकडून... ...!!"
बाबू," धन्य आहेस गण्या !!... ...मग काय झालं पुढं?"
गणोबा," मग कळून चुकलं की महामुनी सरांना गरीब विद्यार्थी बघितला की पाझर फुटणार...!!... ...तिथं ' लोकमान्य ' पवित्रा कांही कामाचा नाही...!!!
मग आदल्या दिवशी रात्री खोलीवर जरा रडायचा सराव केला !!... ...परिणामकारकरीत्या जमेपर्यंत...!!!
आणि मग दुसर्या दिवशी खास ' ठेवणीतला ' जुनाट पोषाख चंढवून गेलो भेंटायला विद्यापीठात... ...तर हा नार्या आधीच तिथं येऊन बसलेला... ...!!!"
आणि मग दुसर्या दिवशी खास ' ठेवणीतला ' जुनाट पोषाख चंढवून गेलो भेंटायला विद्यापीठात... ...तर हा नार्या आधीच तिथं येऊन बसलेला... ...!!!"
टोळी," मग पुढं काय झालं?"
गण्या कोल्ड् कॉफी ढोंसत म्हणाला," काय होणार दुसरं? मी आत गेल्यागेल्याच नारोबांनी आपलं फेरतपासणीसाठी अर्ज द्यायचं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली... ...
टोळी," मग काय केलंस तू?... ...दिलास अर्ज? "
गणोबा," अर्ज?... ...छे छे छे... ...मग मी ही अशी डोंळ्यांना बखोटी लावत महामुनी सरांच्या पुढं गळा काढला ", गणोबा साभिनय सादरीकरण करून दाखवीत म्हणाले," सर...मी स्वतःशी प्रामाणिक आहे सर... ...हा विषय सोडवायचा सात वेळा मी परीक्षा देऊन प्रयत्न केलेला आहे सर... ...तरी अजून यश मिळालं नाही मला... ...पण म्हणून अश्या तर्हेनं फेरतपासणी करून मला पास नाही व्हायचं... ...तसं झालं तर ते मला जन्मभर खात राहील सर... ... ...मी पुढच्या सत्रांत परत एकदा प्रयत्न करीन...जीव तोडून... ...पण मला पेपर देऊनच पास व्हायचं आहे सर... ..."
"इतकं बोलून मग मी गळाच काढला तिथं... ...मग काय? व्हायचं तें च झालं... ..."
"इतकं बोलून मग मी गळाच काढला तिथं... ...मग काय? व्हायचं तें च झालं... ..."
टोळी," काय ?... ...काय झालं मग? "
गण्या," महामुनी सर मग नार्याला म्हणाले,' माटे सर...जे काय झालं, ते सोडून द्या... ...हा विद्यार्थी प्रामाणिक दिसतोय् मला... ...तेव्हां त्याचं नुकसान होणार नाही हे आपण बघायला हवं."
मग मला विचारलं,' आत्तां लगेच पेपर सोडवायला दिला, तर जमेल तुला?... ...मनापासून प्रयत्न करशील? '
मी काय...लगेच हो म्हणून मोकळा झालो रे... ... ...अन् नार्या साला अडकला बरोबर... ..."
मी," म्हणजे रे गण्या?... आम्ही नाही समजलो... ..."
गण्या," अरे ऐका तर... ...महामुनी सरांनी मग मला त्यांच्या खासगी कक्षांतल्या टेबलावर जाऊन बसायला सांगितलं अन् म्हणाले,' माटे सर हातानं लिहून देतील तुला पेपर... ...तो मन लावून सोडवायचा बरं कां ... ...पास व्हायचं आहे तुला...कळलं?'
मी शुंभासारखी मुण्डी डोलावली आणि त्यांच्या कक्षांत गेलो न् पाठीमागं दार ओंढून घेतलं... ...पण जराशी फट ठेंवलीच दाराला... ...आणि तिथंच उभा राहिलो ऐकत... ...
मी शुंभासारखी मुण्डी डोलावली आणि त्यांच्या कक्षांत गेलो न् पाठीमागं दार ओंढून घेतलं... ...पण जराशी फट ठेंवलीच दाराला... ...आणि तिथंच उभा राहिलो ऐकत... ...
तर महामुनी सर अगदी हळू आवाजांत मी बसलेल्या खोलीकडं बोंट दाखवत नार्याला दम देत होते,' त्यांना झेंपतील असेच प्रश्न घाला पेपरांत !!! ... ...काय?'
हीः हीः हीः हीः हीः ..."
गणोबा प्रवचन आटोपून फिदीफिदी हंसायला लागले, अन् सगळ्या टोळीनं धन्य धन्य होत कपाळांना हात लावले...!!!
" आयला...सर्किटच आहेस गण्या तूं... ...मग कुलगुरूंच्या खासगी दालनात बसून सोडवलास तूं पेपर?... ...ऑं?" सत्या चक्रावत म्हणाला
"नाहीतर काय लेको... ...नार्याला पिदडून परत पेपर काढायला लावला !! ... ... ...तो सोडवून होईस्तंवर त्या खोलीबाहेर तांटकळत बसवूनही ठेंवला त्याला !!! ... ... ...आणि मग लिहून झाल्यावर झक् मारत उत्तरपत्रिका तपासून पास पण करायला लावलं साल्याला !!!!... ... ...आहांत कुठं तुम्ही? "
आतां सदामामा पण गणोबांकडं आ वांसून बघायला लागला... ... ...
गणोबा पुढं म्हणाले," आणि माझा जसा ह्या नारबा नं छळ केला, तसा दुसर्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या नशिबाला आणूं नकोस असा परमेश्वराचा धांवा करणारं ' पासायदान ' पण लिहिलंय् लेको... ...काल रात्रभर जागून...!!! ऐकायचं आहे?"
बाबू," ' पासायदान ' ? म्हणजे काय गण्या? "
अन्या," भोटच आहेस तूं बाबू... ...अरे ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी ' पसायदान ' रचलं नाही काय?... ...गण्यानं अखिल विद्यार्थीजगताच्या कल्याणाचा धांवा केलेला दिसतोय्... ... ' पासायदान '...!!! कळलं?
...हं गणोबा होऊन जाऊं द्या... ..."
सगळ्या टोळीनं गजर केला," बोला पुण्डलीक वरदा s s s हा s s s s s रि विठठ s s s s s ल... ...श्री ज्ञानदे s s s व, तुका s s s s रा s s s s s s म " !!!
आतां आजूबाजूच्या मेजावर बसलेली गिर्हाइकं पण कान टंवकारून ऐकायला लागली... ...
आणि गणोबांनी खड्या आवाजात त्यांचं ' पासायदान ' सुरूं केलं... ... ...
" आतां परीक्षात्मके देवे । येणे ' रिपीट ' यत्ने तोषावे
तोषोनी मज द्यावे । पासायदान हे !!
इथे सरांची व्यंकटी साण्डो । तयां पासकर्मे मति वाढो !!
त्यांचे आम्हांसवें जडो । मैत्र गुणांचे !!
' ओरलां ' चे तिमिर जावो । विश्व ' उत्तीर्ण ' सूर्ये पाहो
जो जे वाचेल तें तें येवो । पेपरांत !!!
कल्याण करोत मंडळी । ' जयकर ' निष्ठांची मान्दियाळी
कडकडुन भूमण्डळीं । भेंटतुं शिष्यां
कल्याण करोत मंडळी । ' जयकर ' निष्ठांची मान्दियाळी
कडकडुन भूमण्डळीं । भेंटतुं शिष्यां
किंबहुना सर्व सुखी । पास होवोत तिहीं लोकीं
भजे जो ' ए. टी. के. टी.' । अखण्डित
आणि मार्कोपजीविये । विशेषीं लोकीं इये
पास खत्रूड विषयें । होआवें जी !!!
येथ म्हणे श्री ' प्रोफेसरावो ' । हे होईल दान ' पासावो '
येणे वरे ' अद्न्यानदेवो ' । सुखिया जाला " !!!!
अन् कुणाला कांही कळायच्या आंतच बाबू-सत्या जोडीनं दोन्ही पटांत घुसून त्यांना खांद्यावर उचलून घेत आरती चा नारा दिला
," बोला गणपतिबाप्पा... ... ...मो s s s s s s s s रया... ...!!!!
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची... ... ..."
दालनातली सगळीच गिह्राईकं मग टाळ्या वाजवत ' गणोबां ' च्या आरतीत सामील झाली... ... ...
आणि गल्ल्यावर नोटा मोजत बसलेल्या सदामामा शेट्टीनं च फाड्कन् स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... !!!!
-- रविशंकर.
१९ जानेवारी २०१६.
No comments:
Post a Comment