," हे बघा नाना..." आमच्या दन्तवैद्या सौ. बनहट्टी बाई न्यायाधीशाच्या थाटात निकालाचा हातोडा मेजावर बडवीत मला म्हणाल्या," वरवर तरी तुमच्या ह्या दाढेला कांहीही झालेलं दिसत नाहीय् मला...
आतां झालंय् काय, की हिची क्ष किरण प्रतिमा जरी काढली, तरी तीत आतलं कांहीही दिसायची सुतराम् शक्यता नाही... ...
कारण ह्या दाढेवर पूर्वी कधीतरी क्रोमियम् धातूची टोपी बसवलेली आहे...!
तेव्हां ती टोपी उचकंटून काढणं हा एकमेव उपाय आतां शिल्लक उरलेला आहे...
आणि तुम्ही काहीही म्हणलात मला, तरी सध्या तरी असला घातक उद्योग करायला मी मुळीच तयार नाही....!!
कारण ही दाढ जर कांही कारणानं खरोखरच दुर्बळ झालेली असेल, तर टोपी काढतांना ती तुटायची शक्यता आहे...!!
दुर्दैवानं जर तसं झालंच, तर मग हिरडीत अडकून बसलेली हिची मुळं हिरडी कापून बाहेर काढावी लागतील मला...!!!
ते निस्तरण्यापलीकडचं लचाण्ड होऊन बसेल मग... ... समजलं?
तेव्हां आपण असं करूं या... ..."
मी कपाळाला हात लावत विचारलं," काय करूं या म्हणताय् मग? "
बाई," सध्या तरी दाढदुखी थांबलीय् ना तुमची?... ...आपण आठदहा दिवस जरा वाट बघूं या पुढं काय होतंय् ते... ...आणि दाढ जर परत ठंणकायला लागली, तर मग माझी खात्री पटेल, की आंत खरंच कांहीतरी गडबड झालीय् म्हणून... ...
तेव्हां मग ही टोपी उचकंटून बघूं या नेमकं काय झालंय्, आणि काय करावं लागेल ते... "
माझ्या डोंळ्यासमोर आतां काजवे चमकायला लागले... ...!!
एका बाजूनं दाढबाई, अन् दुसर्या बाजूनं ह्या बनहट्टी बाई, अश्या दोन बायांच्या कंचाट्यात मी बरोबर सापडलेलो होतो ...!!!
ह्या दाढबाई नी गेला पंधरवडाभर माझा अक्षरशः जीव खाल्लेला होता... ...रात्री च्या रात्री जागवून...
आणि तिच्याच रक्षणार्थ आमच्या बनहट्टीबाई ठाम उभ्या राहिलेल्या दिसत होत्या... ...!!!
ह्या आमच्या बनहट्टी बाई म्हणजे जुन्या पिढीतल्या, दिवसां कंदील घेऊन शोंधाव्या लागतील, इतक्या दुर्मिळ दन्तवैद्या.
अमेरिकन डॉलर चे कडक डोहाळे लागलेल्या आजच्या विधिनिषेधशून्य गल्लाभरू धंदेवाईक तरूण पिढीच्या पंक्तीत बसायला ठाम नकार देणार्या... ...
रुग्णाच्या जे हिताचं असेल, तेंच त्याला ठंणकावून सांगणार्या, तेंव्हढंच निष्ठेनं करणार्या, आणि त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला सदैव तयार असणार्या निष्ठावन्त व्यावसायिक...
त्यांच्या या दुर्मिळ गुणांमुळंच आमच्या तारा कुठंतरी घट्ट जुळलेल्या असाव्यात...त्यामुळं ' वैद्य-रुग्ण ' असं कांही नातं इथं नव्हतंच... मित्र-मैत्रीणी चं नातं म्हटलं तर ज्यास्त संयुक्तिक होईल.
बाईंकडं हताशपणे बघत मी कलवळलो," अहो तुमचं ठीकाय् हो... ...' वाट बघूं या ' म्हणायला जातंय् काय तुमचं?...ऑं?... ...सोसावं मलाच लागतंय् ना?
मला सांगा... ...उद्यां-परवां च हे भूत जर पुन्हां उठून रात्रीं बेरात्रीं मानगुटीवर बसलं माझ्या... ...तर करूं काय मी मग?...
छे...छे...छे...ते कांही नाही... ...उचकंटा ती टोपी एकदाची, अन् बघा काय झालंय् ते...मला नाही सहन होणार तो ठंणका पुन्हां."
बाई आतां तंडकल्या," नाना...एकदां सांगितलं ना मी...हांत लावणार नाही म्हणून?... ...आणि सध्या तरी हे भूत बाटलीत बंद केलंय् ना मी?"
मी पण आतां तंडकलो," अहो, पण ते परत उपटलं, तर काय करूं असं विचारतोय् मी... ...त्याचं उत्तर द्याल की नाही?"
बनहट्टी बाई नी पुढ्यातला कागद समोर ओंढला, त्यावर कांहीतरी लिहिलं...अन् माझ्या हातात तो देत म्हणाल्या," कांही होणार नाही तुम्हांला...मी आहे ना घट्ट बसलेली काय होतंय् ते बघून घ्यायला?
असं करा... ...ह्या दहा गोळ्या आणून ठेंवा हाताशी, आणि नेहमीसारखं या दाढेनं चांवून खायला बेधडक सुरुवात करा...कांही होणार नाही तुम्हांला... ... ...
आणि दाढ दुखतीय् अशी शंका जरी आली नुस्ती, तरी ताबडतोब ह्या गोळ्या घ्यायला सुरुवात करायची...रोज दोन वेळां, आणि अतीच ठंणकायला लागली, तरच तीन वेळां घ्यायच्या... ...
आणि दहा गोळ्या संपल्या की त्याच दिवशीं इथं परत यायचं... ...मग हे भूत कसं कायमचं गाडायचं ते बघून घेते मी... ...कळलं नीट सगळं?"
बाईं बरोबर ज्यास्त वाद घालण्यात कांही अर्थ नव्हता...!
कपाळींचे भोग अजून तरी संपलेले नाहीत एव्हढंच काय ते मला नीटपणे समजलं... ...!!
आणि त्यावरच हात मारून घेत मी घरचा रस्ता सुधारला... ...!!!
झालं होतं असं, की प्रस्तुत दाढबाईं च्या लगतच्या शेजारणीचं चारएक महिन्यापूर्वीच बनहट्टी बाई नां समूळ उच्चाटन करावं लागलेलं होतं...
तिथं जो खड्डा पडलेला होता, त्या जागीं एक लवचिक कवळी [ जिला इंग्रजीत ' फ्लेक्सिबल् डेंचर ' असं म्हणतात ], पांचसात हजारांचा भुर्दण्ड सोंसून [ कळा अलाहिदाच ], बसवलेली होती, जिची मागची बाजू प्रस्तुत दाढबाईंवर टेंकून बसायची. आतां ह्या दाढबाईंच्याही अंगात आलेलं दिसत होतं...!!!
ह्या लचाण्डाचं आतां काय होणार नेमकं, ते कांही कळे ना मला... ...
आणि पुरता वैतागून मी मनातल्या मनांत, त्या दोन्ही दाढांना शिव्यांची लाखोली वाहायला लागलो...!!!
आठदहा दिवस कुठले सरताय्त... ...दुसर्या दिवशी रात्रींच बाटलीतलं ते भूत पुनश्च उठून माझ्या मानगुटीला बसलं...!!!!
पण आतां मी सावध होतो... बनहट्टी बाई नी दिलेल्या गोळ्यांचा खुराक मी तत्क्षणींच उदरात ठांसायला सुरुवात केली.........
सुदैवानं दहा गोळ्या संपेपर्यंत तरी कांही त्रास वगैरे झाला नाही... ...भूत महाशय परत बाटलीबंद झालेले असावेत.
गोळ्या संपल्यादिवशीच इतर सगळी कामं बाजूला सारून मी तडक बनहट्टी बाईं चा दवाखाना गांठला, अन् सगळं रामायण त्यांना कथन केलं.
बाई मला खुर्चीवर आडवा करत म्हणाल्या," ठीकाय्...दाढ नक्कीच खराब झालेली दिसतेय्... ...टोपी काढतांना मी सगळी काळजी घेते, पण कदाचित ही तुटलीच, तर मग हिरडी कापावी लागेल मला... ...काय?"
माझ्या डोंळ्यासमोर आतां काजवे चंमकायला लागले... ...!!
बनहट्टी बाई नी मग घश्यात दोनचार जागीं सपासप् भुलीची इंजेक्शन्स ठोंकली... ...
आणि काय होतंय् कळायच्या आंतच चित्त्याच्या चपळाईनं सफाईदारपणे क्षणार्धात दाढबाईंची टोंपी उचकंटून काढली...!!!
आणि तोंडात वांकडे आरसे कोंबून बघत मला म्हणाल्या," मी म्हटलं नव्हतं नाना तुम्हांला?... ...दाढ अगदी ठंणठंणीत आहे तुमची."
मी उडालोच," मग अंगात कुणाच्या आलं होतं?... ...ऑं?"
बाई हंसल्या," काय झालंय्...की कांही तरी कारणानं... ...ते सांगतां येणार नाही नक्की मला आतां...दाढेची मुळातनं वर आलेली नस कुजलेली आहे...म्हणून हिच्या अंगात आलेलं होतं...कळलं? पण बाकी दाढ अगदी ठंणठंणीत आहे तुमची. ही नस आतां मी काढूनच टाकते... ...मग नवी टोपी करून घातली हिला की झालं... ...अजून दहा वर्षं तरी हिला कां s s s s s s ही सुद्धां होणार नाही."
असं बोलून बाई नस उच्चाटनाच्या मागं लागल्या, अन् मला एक शंका आली.
मी," म्हणजे हिला आतां नवीन टोपी घालायची म्हणताय्?... ...पण मग ही लवचिक दाढ तीवर परत बसेल ना नीट?... ...नाहीतर... ..."
बाई नी मग हातांतली शस्त्रं चालवतच बॉम्ब टाकला," हे बघा नाना...तसं कांही अगदी ठांसून सांगतां येणार नाही मला...कारण ह्या काढलेल्या टोपीच्या अगदी तंतोतंत मापाचीच नवी टोपी होईल अशी खात्री कुणीच देऊं शकणार नाही...मी सुद्धां. पण जवळपासच्या मापाची जरी झाली, तरी चालेल आपल्याला... ...ही लवचिक दाढ किंचित सैल-घट्ट करून बसवायची खटपट आपण करणारच आहोत...काय? पण अगदीच जर डोंक्यावरनं पाणी गेलं अन् ते नाहीच जमूं शकलं, तर मात्र आपल्याला नवीनच लवचिक दाढ करून बसवावी लागेल...!!!
माझं डोंकं आतां मात्र खरोखरीच गंरगंरायला लागलं...!!
मी आतां दाढबाईं च्या सात पिढ्यांचा मनोमन उद्धार करायला सुरुवात केली...!!!
बनहट्टी बाई मग काम संपवून फडक्याला हात पुसत म्हणाल्या," कांही काळजी करूं नकां नाना तुम्ही... ...माझा ' दन्तकर्मी ' कुशल कारागीर आहे अगदी...तो देईल करून सगळं बरोबर...झालं ना मग?"
दोनचार दिवसांनी मी परत बनहट्टी बाईं च्या दवाखान्यातल्या खुर्चीवर आडवा झालो... ...
बाई नीं नवी बनवलेली टोपी दाढबाईं च्या माथ्यावर अगदी चपखल बसली... आम्ही क्षणभर सुखावलो.
मग त्यांनी ' आं करा पुन्हां ', म्हणत वरची लवचिक कवळी मधल्या जागेवर बसवली... ...
अन् दुसर्या क्षणीं खुद्द बनहट्टी बाईनी च फाड्दिशी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ...!!!
मी दंचकून विचारता झालो,"...कां हो?... ...काय झालं आतां आणखी? "
बाई म्हणाल्या," लवचिक कवळी पार ढिली बसतीय् नाना... ...बहुतेक नवीनच करावी लागेल असं दिसतंय्......!!!! "
म्हणजे आतां दाढबाईंचं श्राद्ध घालून होतंय् न होतंय् तोंच ह्या कवळीबाईं च्या अंगात आलेलं होतं... ...
आतां मी पण सुन्न होत कपाळावर हात मारून घेतला...!!!!
बाई नीं तोंडातली कवळी बाहेर काढून त्यांच्या मेजावर ठेंवली, अन् म्हणाल्या," उठा आतां नाना, आणि इकडं येऊन बसा असे समोर मेजावर."
मग मेजावरच्या कवळी कडं बोट दाखवत बनहट्टी बाई नी खुलासा केला," त्याचं काय आहे नाना...की ह्या कवळ्यांचं सगळंच असं चमत्कारिक असतं बघा... ...त्यांच्या मापात किंचितसा...अगदी केंसभराचा जरी फरक पडला ना, तरी एकतर त्या घट्ट होऊन बसतच नाहीत जाग्यावर, नाहीतर ह्या अश्या सफाचट् ढिल्या होऊन लडबडायला तरी लागतात... ...अति विचित्र प्रकार असतो हा... ...आतां ही कवळीच बघा. हिच्या आणि दाढांमधल्या पोकळीच्या मापांत अगदी तंसूभराचाच फरक आहे... ...पण आतां नुस्ती चपाती जरी चांवलीत ना ही तोंडात बसवून, तरी ही कवळी चपतीच्या घासालाच चिकटून जागेवरनं उचकंटून निघेल... ...कळलं?
पण कांही काळजी करूं नकां...अशोक - म्हणजे माझा कवळ्या बनवणारा दन्तकर्मी आहे ना, त्याला मी बोलावलाय् हे बघायला...आत्तां एव्हढ्यातच येईल तो... ...तो करील कांहीतरी उपाय...बसा आतां शांतपणे."
इतकं होतंय् तोंच दरवाज्यावर टकटक झाली, अन् एक तिशी-पस्तिशी चा तरूण आंत आला... ...
बाई," अरे अशोक?... ...ये रे... ये, बस बस...तुझीच वाट बघत होतो आम्ही."
हे अशोकजी म्हणजे अगदी सिनेस्टार ' फारुख खान ' ची नक्कल होती... ...
डोंळ्याला ठार काळा गॉगल...ती केसांतनं घडोघडीं हात फिरवायची संवय...तडतडत बोलायची लकब... ...जागोजागीं घासलेली-फाडलेली जीन... ...
अगदी स्थानिक ' फारुख खान ' चा अवतार...
एकूण चांगलंच चंगीभंगी प्रकरण दिसत होतं... ...
फारुख," कश्याला बोलावलंत मॅडम?...काय काम होतं?"
बाई," अरे, हे नानिवडेकर काका आहेत ना, त्यांची ही कवळी चारच महिन्यापूर्वी केलेली आहे...आणि तूं च बनवलेली आहेस ही... ...
तर झालंय् काय, की ही ज्या दाढांवर बसते, त्यातल्या एका दाढेला त्रास व्हायला लागल्यामुळं तिची मूळची टोपी काढावी लागली, आणि तूं काल करून दिलेली नवीन टोपी बसवलेली आहे आतां तिथं... ...
नवल म्हणजे, आतां ही कवळी मात्र जाग्यावर पार ढिली बसायला लागलीय्...माप केंसभरच बदलल्यामुळं... ...आलं लक्ष्यात तुझ्या?"
फारुख," आलं लक्ष्यात मॅडम...नवीन कवळीसाठी माप घेतलंय् काय ह्यांचं?"
बाई," अरे बाबा... ...नवीन कवळी नाहीय् करायची...ही च कवळी कांहीतरी शक्कल लढवून किंचित घट्ट करून हंवीय् मला... ..."
फारुख खानांनी आतां बाई नां त्यांची बत्तिशी विचकून दाखवली," ते कसं करतां येईल मॅडम?... ...असली कामं आम्ही करत नाही, आणि केलेली पण नाहीत कधी...कवळी दुरुस्त करून घट्ट कशी करणार सांगा मला?"
बाई," अरे न जमायला काय झालंय् रे तुला?... ...एव्हढा हुषार आहेस...कर की कांहीतरी... ...अं?"
फारुख खान बाई नां झुरळासारखं झंटकून टाकत म्हणाले," मॅडम, अहो नवीन कवळ्यांची कामंच आवरतां आवरेना झालीय्त मला... ...ते सोडून ही असली कामं कुठं करत बसूं मी?...छे...छे...छे...आपल्याला नाही जमायचं हे काम... ...आणि हिला दुरुस्त करायला हात घातला, आणि हिचंच कांहीतरी वेडंवाकडं होऊन बसलं म्हणजे?... ...आय ऍम् सॉरी मॅडम."
तरी बाई नी घोडं पुढं दामटलंच," अरे असं काय करतोस अशोक?... ...नाहीतरी ही सध्या बसत नाहीच आहे...म्हणजे वाया गेल्यातच जमा आहे ना हिची? मग एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे रे तुझी...ऑं?
मला सांग... ...चारदोन महिन्यापूर्वीच हिच्यावर सहासात हजार खर्च केलेत ह्या नाना नी... ...मग आतां काय पुन्हां नव्या कवळीचा भुर्दण्ड मारायचा काय त्यांच्या डोंक्यावर?...बरं दिसतंय् काय हे?
तूं बघ तरी दुरुस्त करतां येतीय् काय ते...आणि समज, तूं म्हणतोय्स त्याप्रमाणं जर ते नाहीच जमलं, तर मग बघूं की काय करायचं ते आपण... ...पण थोडीशी खटपट तरी करून बघशील की नाही आधी?... ...गेला बाजार माणुसकी म्हणून तरी ?"
मी फारुख खानांकडं जरा निरखून बघायला लागलो... ...त्यांच्या चॉकलेटी चेंहर्यावर बाईं च्या अजीजी चा सुतराम परिणाम झालेला दिसत नव्हता... ...!!
आतां मला लक्ष्यांत यायला लागलं सगळं... ...त्या चॉकलेटी चेहर्याच्या मागं दडलेला शुद्ध खाटकाचा चेहरा पण स्वच्छ दिसायला लागला मला.
फारुख खानांच्या डोंळ्यासमोर आतां पांचसात हजारांची थप्पी नाचायला लागलेली दिसत होती... ...
बनहट्टी बाईं च्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावत ते म्हणाले," माफ करा मॅडम... ...हे शक्य नाही मला... ...नवीन कवळी करायची असली, तर देतो करून अगदी चपखल मापात... ...पण हे काम नाही जमणार मला."
आतां बनहट्टी बाई पण निराश झाल्या... ...
अगतिक नजरेनं माझ्याकडं बघत त्यानी विचारलं," काय करायचं मग नाना आतां?... ...दुरुस्तीचं हा कांही जमणार नाही म्हणतोय्...तुम्हीच ठरवा आतां काय करायचं ते... ...नवीन कवळी करूं म्हणत असाल, तर लगेच माप घेऊन देऊन टाकते ह्याला...काय करायचं मग?"
फारुख खान आतां लोंचट - हांवरट नजरेनं माझ्याकडं बघायला लागले... ...
आतां त्यांची लाळ गळायला लागायचीच काय ती बाकी राहिलेली दिसत होती... ... ...
आणि अचानक माझ्या अंतरंगांत खोलवर कुठंतरी, मला ज्यानी अक्षरशः कणाकणानं टाकीचे घांव घालून घडवला, त्या माझ्या आद्यगुरूंचा - म्हणजे आमच्या टिकेकर मास्तरांचा - दमदार आवाज घुमायला लागला... ... ...
तरूणपणीं कधीतरी मला तत्त्वज्ञानाचे धडे देतांना ते म्हणाले होते...
," हे बघ ऍरिस्टॉटल्...आयुष्यात तुला अडल्या-नडल्या, असहाय्य अगतिक लोकांना कंचाट्यात धंरून, त्यांच्या गळ्यावर सुरी फिरवत, स्वतःचं पोंट जाळणारे खाटिक जागोंजागीं बघायला मिळतील...
असल्या नराधमांच्या कानांत, बळी जाणार्या जिवाचा करूण आकान्त कधीच शिरत नसतो, ही पहिली गोष्ट लक्ष्यात घे.
कारण त्यांच्या छातीत काळीज नावाचा अवयव मुळात नसतोच.
त्यांच्या विखारी नजरेला जिवाच्या आकांतानं श्वास घ्यायला तंटतंटलेली बळी च्या नरड्यातली नस फक्त दिसत असते... ...
तसं म्हणशील, तर असहाय्य अगतिक व्हायला बहुतांशी हे बकरे स्वतःच कारणीभूत असतात... ...
त्याचं पहिलं कारण म्हणजे कुठल्याही बाबतीतलं त्यांचं अज्ञान...अज्ञानी माणसाचा अर्धशिक्षित सामान्य मनुष्यही बघतां बघतां बकरा करूं शकतो.
दुसरं कारण म्हणजे नसलेलं ज्ञान प्राप्त करून घ्यायच्या बाबतीतली त्यांची जन्मजात अनिच्छा, आणि निष्क्रीयता...आळश्याचा पत्कर प्रत्यक्ष परमेश्वरही घेत नसतो.
आणि तिसरा दुर्गुण म्हणजे रक्ताचा शेंवटचा थेंब सांडेपर्यंत कडवा लढा द्यायच्या दुर्दम्य जिद्दीचा अभाव.
असल्या, स्वतःच्या भल्याचा भारही परमेश्वरावर ढंकलून निवांत झोंपणार्या अभागी जिवांच्या कपाळीं खाटकाच्या सुरीखाली हतबलपणे मुकाट निपचित पडून राहणंच लिहिलेलं असतं... ...हे ही कधी विसरूं नकोस.
असल्या, स्वतःच्या भल्याचा भारही परमेश्वरावर ढंकलून निवांत झोंपणार्या अभागी जिवांच्या कपाळीं खाटकाच्या सुरीखाली हतबलपणे मुकाट निपचित पडून राहणंच लिहिलेलं असतं... ...हे ही कधी विसरूं नकोस.
पण एक गोष्ट कायम लक्ष्यांत ठेंव...ह्या पावशेर खाटकांनाही जन्माचा धडा शिकवणारे सव्वाशेर जगांत भेंटतात...अगदी हमखास भेंटतात.
माझ्या तरूणपणीं असला खाटिक मी पाहिलेला आहे, अन् सव्वाशेरही पाहिलेला आहे... ...
मंगू नावाचा एक खाटिक होता आमच्या टिकेकरवाडीत...रोज बकर्या-शेळ्या कापून पोंट भंरायचा... ...
पण एक दिवस काय दुर्बुद्धि झाली त्याला, कांही कळत नाही... ...
एक टकरीचा एडका मिळाला स्वस्तात म्हणून घेतलान् विकत, अन् बसला कापायला... ...
दगडावर ते जनावर आडवं घातलं, आणि सुरी उचलायला गेला हात लांब करून... ...
जशी नरड्यावरची त्याची पकड तसूंभर ढिली पडली ना क्षणभरच, तशी त्या जातिवन्त लढवय्या जनावरानं जिवाच्या करारानं उसळी घेत ह्या मंगू खाटकाच्या थोबाडावर अशी काय तडाखेबंद धडक मारली ना, की एका रट्ट्यात त्याच दगडावर स्वतः मंगू खाटिकच चितपट उताणा लोळला ... ...हो...हो...हो...हो...
जीवानिशी सुटून एडका तर पळालाच... ...
पण जातां जातां पठ्ठ्यानं ह्या मंगू खाटकाचे पुढचे तीन दात अक्षरशः त्याच्याच नरड्यात घातलेले होते... ... ...!!!
तसाच गांवभर फिरायचा तो मग.
हळूं हळूं गावातली टारगट पोरं त्याला ' बोळक्या मंगू ' म्हणून चिडवायला लागली...!!
यथावकाश मोठी माणसं पण त्याच नावानं हांका मारायला लागली... ...!!
आणि अखेरीस एक दिवस त्या सगळ्याला विटून हा मंगू धंदा वार्यावर सोडून देऊन गांव सोडून कायमचा परागंदा झाला. !!!
तर असं असतं हे सगळं ऍरिस्टॉटल्... ...त्या एडक्यानं शिकवलेलं तत्त्वज्ञान हयातीत कधी विसरूं नकोस.
खाटकांना वठणीवर आणायचा हा एकमेव रामबाण उपाय तुला सांगतोय् मी...
जागच्या जागीं त्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालून मोकळं होणं... ..."
मी पुन्हां एकवार नीटपणे समोर बसलेल्या फारुख नामे खाटिक दादा कडं निरखून बघितलं...
लक्ष्यात यावं इतक्या अधाशीपणानं लेकाचा माझ्याकडं टक लावून बघत होता... ...
आणि त्याचे दांत घश्यात घालायची ही नामी संधी आयतीच चालून आलेली होती... ... ...
तिचा पुरेपूर फायदा उठवीत मी तंडकलो," नाही बाई... ...नवीन कवळी अजिबात करायची नाही मला...!! "
फारुख खाटिक आतां दंचकून चांचरायला लागले...खुद्द बनहट्टी बाई सुद्धां माझ्याकडं साश्चर्य बघायला लागल्या... ...
फारुख," सर...सर...पण कवळीशिवाय करणार काय तुम्हीं?... ...चांवतां कसं येईल तुम्हांला त्या बाजूनं? "
खाटिकदादांच्या पाठीत आतां मी दुसरा सणसणीत रट्टा हाणला," मि. अशोक...तुम्ही तर यातनं कांखा झंटकून मोकळे झालेलेच आहांत...नाही?... ...दिसतंच आहे ते स्वच्छ... ...
आतां आम्ही काय करायचं, हा प्रश्न तुमचा आहे, की आमचा?
आणि मी हा असा कवळीशिवायच राहणार आहे असं तुम्हांला सांगितलं कुणी ?... ...ऑं?"
फारुख खान च्या पायांखालची वाळू आतां सरकायला लागली...," सर... ...तसं कांही नाही सर..."
मी," तसं नाही? मग कसं आहे? "
आतां मी फारूख खान ला चंकवून बनहट्टी बाईं नां नजरेनंच खूण करत म्हटलं," आज बुधवार आहे ना बाई?... ...येत्या मंगळवारी ठीक ह्याच वेळेला ह्या च दाढेचं माप तपासून घ्यायला येतोय् मी इथं...ती कशी काय होतेय् ते तुम्ही स्वतः तपासा... ...
आणि काम तुम्हांला पसंत पडलं, तर ह्यांच्याकडचं सगळंच काम आपण त्यांना देऊन टाकूं... ...ह्यांच्यापेक्षा कमी दरांत चांगलं सुबक काम करून मिळेल तुम्हांला...काय? आणखी आत्तां ह्यांची जशी मनधरणी करत होता ना, तशी त्यां ची कधीच करावी लागणार नाही तुम्हाला...चालेल ना? "
बनहट्टी बाई नां पण ह्या फारुख खानाची अरेरावी झोंबलेली असावी.
त्यांनी हंसून फक्त मान डोंलावली, आणि खाटिकदादांचं धाबं दणाणलं," स्स्...स्स्...स्सॉरी सर...स्सॉरी हं मॅडम... ...येतो मी."
मी," येत्या मंगळवारीं या इथं... ... ह्याच वेळेला...म्हणजे तुम्हांला पण ही कारागिरी बघायला मिळेल... ...काय?"
," होय...हं...हं...हं...येतो मॅडम " असं पुटपुटत फारुख खान उलट्या पावलीं चालते झाले... ...
आणि मी हंताश होऊन घरीं परतलो.
आव्हान तर उसना आव आणून स्वीकारलेलं होतं... ...पण हे शिवधनुष्य पेलायचं कसं? ही चिंता आतां पोंखरायला लागली...!!
पुढचे दोन दिवस असेच भाकड गेले...
मग तिसर्या दिवशीं संध्याकाळीं मी माझ्या खासगी ग्रंथालयाला हात घातला.
रसायन, आणि वैद्यक शास्त्राचे पांच पंचवीस संदर्भग्रंथ काढून रात्रभर धुंडाळले, आणि कांही उपयुक्त ' सजीवानुरूप गोंद '...ज्याला इंग्रजीत ' बायो कॉंपॅटिबल् ऍड्हेझीव्ह्ज् ' असं म्हणतात, अश्या दोनतीन रसायनांची माहिती गोळा केली.
चौथ्या दिवशी सकाळी सकाळीच मुंबईतल्या, त्या क्षेत्रात काम करणार्या माझ्या एका विद्यार्थ्याला दूरध्वनी करून ती माहिती सांगितली, आणि तसला एखादा गोंद तांतडीनं पाठवायला सांगितलं."
बिचार्यानं अर्धा दिवस शोंधाशोंध करून तो मला लगेच कुरियर नं रवाना केला, आणि सायंकाळपर्यंत तो माझ्या हातात पडला देखील.
मग रात्रीं तो गोंद यथायोग्य मिश्रणं त्यात घालून हवा तसा घट्टसर करून घेतला...नंतर कवळीबाईंच्या दोन्ही तोंडांच्या खालच्या बाजूला
चपखल आकारात तो लिंपून घेतला, आणि ते साडगं मग सुकायला ठेंवून सरळ तांणून दिली.
आतां एक तर कवळी दुरुस्त होऊन फारुख खान तरी चारीमुण्ड्या चितपट लोळणार होते, नाहीतर ती वाया जाऊन मी तरी लढाई हरणार होतो...
सकाळी सकाळीच बघितलं तर कवळीबाई व्यवस्थित सुकलेल्या होत्या...
मग आरश्यात बघून मी ती तोंडात हलकेच बसवून बघितली... ...
तर अहो आश्चर्यम् !!!...माझ्या अपेक्षेबाहेर काम फत्ते झालेलं होतं. !!!
कवळी जरा ज्यास्तच घट्ट झालेली होती, आणि बसती करायला कानशीनं थोडीशी घांसावीही लागणार होती ... ...
मी अंघोळ-नाष्टा सगळं भराभर आंवरलं, आणि सरळ त्याच कामाला भिडलो हत्यारं सरसावून.
सलग सात तास ते घासकाम चाललं...घाई करून अजिबात चालणार नव्हतं... ...
कवळी केंसभर जरी ज्यास्त घांसली गेली असती, तरी वाया जाणार हे ठंरलेलं होतं.
पण डोकं शांत ठेंवलं...हात चालूं ठेंवले...आणि अखेर सात तासांनी कां होई ना, संपलं ते एकदाचं.
अखेर परत आरश्यात बघून मी कवळीबाईनां दाढांच्या कोंदणात हातानं ठेंवलं, आणि डोंळे झांकून तोंड मिटत वरच्या दाढांचा दाब कवळीवर दिला...
आणि निहायत खूष हो ऊन टुण्ण्दिशी उडीच मारली...!!
'कटक्' असा बारीकसा आवाज करत कवळीबाई कोंदणांत अगदी चपखल बसल्या...!!! चक्क नवीन कवळीसारख्या.
ठंरल्याप्रमाणं मी मंगळवारीं [ बसवलेल्या कवळीनं ] दुपारचं जेवणखाण आंवरून साडेचार वाजतां बनहट्टी बाईं चा दवाखाना गांठला.
बाई निवांत वर्तमानपत्र वांचत बसलेल्या होत्या...
म्हणाल्या," या या बसा नाना... ...जमलं कां कांही?...झालं काम तुमचं? "
मी तडक खुर्चीत पसरून आं वांसत म्हणालो," जुळणी बघून घ्या एकदां... ...कवळी बरोबर बसलीय् की नाही ते."
बाई नी मग दिवा लावून माझ्या जबड्यात डोंकावून बघितलं... ...
आणि दुसर्या क्षणीं डोंळे विस्फारत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
," कमाल आहे नाना... ...अहो अगदी नव्याकोर्या कवळीसारखी झक्क बसलीय् ही कवळी... ...कुठं करून घेतलंत हे काम? "
मी बाईंच्या कडं हंसून बघत फक्त स्वतःच्या छातीवर हात ठेंवला... ...
आतां मात्र बनहट्टी बाई नीं चक्क आं च वांसला...," का s s s s s s s s य? तुम्ही स्वतःच दुरुस्त केलीत ही नाना?...धन्य आहे तुमची."
आम्ही आतां परत त्यांच्या मेजावर येऊन बसलो," अहो धन्य कसली आलीय् त्यात बनहट्टीबाई?...कांही अशक्य नसतं माणसाला... ...फक्त चिरडीला येण्याइतका ताव अन् आत्मसन्मान जिवन्त असावा लागतो...इतकंच काय ते.
मला सांगा, तुमचा जेमतेम मॅट्रिक झालेला दन्तकर्मी जे काम करतो, ते अभियांत्रिकी शिकलेल्या माणसाला असाध्य कसं काय असूं शकेल? आणि अभियांत्रिकी पंचवलेल्या माणसाला तर तो डाव्या हातचा मळ असणार... ...काय? "
बाई," खराय् नाना तुमचं अगदी... ...हा जेमतेम दहावी झालेला अशोक, त्याच्या क्षेत्रातलं असलेलं माझं अज्ञान बघून कसा अरेरावी करत होता त्या दिवशी ते बघितलंय् मी...लेकाच्याला आजही बोलावलाय् तुमच्या कवळीचं काय झालं ते बघायला... ...
आतां बघांच कसा नक्षा उतरवते त्याचा... ...हा बघा आलाच तो."
डोंळ्यावरचा काळा गॉगल टाळूवर सरकवत फारुख खान ," गुड् नून मॅडम... ...गुड् नून सर..." म्हणत माझ्या शेंजारी येऊन बसले.
बाई अन् मी नुस्तेच त्या खाटकाच्या चेहर्यावरच्या मिजाशीचा तोरा बघत होतो...
घसा खांकरून मग खाटिकदादा माझ्याकडं निर्देश करीत बोलले," मग काय मॅडम... ...माप घेतलंय् काय ह्यांच्या कवळीचं? "
मी थण्डपणे उत्तर दिलं," अजिबात नाही..."
फारुख खान जरा अस्वस्थ झाले," कां हो सर?... ...अजूनही कवळी नाही करायची म्हणताय्? "
आतां बाई मैदानात उतरल्या," होय अशोक... ...नवी कवळी नाही करायची त्यांना...मग कश्याला माप घ्यायचं उगीच?...होय की नाही?"
आतां फारुख खान जरासे चंपापले...त्यांना लक्ष्यात यायला लागलं की कांहीतरी गडबड झालीय् म्हणून...
बाई ना म्हणाले," मग आत्तां मला कश्यासाठी बोलावलंय् मॅडम?...दुसरं कांही काम होतं काय? "
बाई मेजावर पडलेल्या माझ्या कवळीकडं बोंट दाखवत म्हणाल्या," ही कवळी करायला तुझ्याकडं दिलेला साचा आणलाय्स ना बरोबर? त्यात बसवून फक्त सांग मला की आतां बरोबर झालीय् कां ते."
फारुख खान आतां चांचरायला लागले," पण मॅडम... ...म्हणजे मी काय म्हणतो..."
बाई," आधी साच्यात कवळी बसवून बघ आणि मग म्हण काय म्हणायचं तुला ते."
फारुख खानांना आतां कुठलीच पळवाट शिल्लक राहिली नाही...!
त्यांनी जवळच्या पोतडीतनं मूळ साचा बाहेर काढला... ...!!
त्यात मेजावरची कवळी बसवून अंगठ्यानं किंचित खाली दाबली... ... ...
'कटक्' कन् आवाज करत कवळी साच्यात फिट्ट बसली...!!!
आणि डोळे छताकडं फिरवून आं वांसत खाटिकदादांनी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!!
आतां ते चक्क चांचरायला लागले," मॅडम...अं...अं...कुणाकडून करून घेतलंत हे काम? "
बनहट्टी बाई नीं मख्खपणे माझ्याकडं बोंट दाखवलं... ...
आणि खाटिकदादांना फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं...
ते शुद्धीवर यायच्या आंतच बाई नी पुढचा रट्टा त्यांच्या पाठीत घातला," हे बघ अशोक... ...आतां..."
फारुख," आतां काय मॅडम? "
बाई," आतां झालंय् असं की...तुला ठाऊक आहेच की माझे बहुतांशी रुग्ण हे साठीच्या जवळपासचे आहेत...
या रुग्णांच्या बाबतीत बर्याच वेळा कवळ्या नवीन बनवायची वेंळ येते, कारण त्या ढिल्या होतात, आणि त्या दुरुस्त करून पुन्हां घट्ट करतां येत नाहीत म्हणून... ...
फारुख खान आतां पांठीत पोंक काढून ऐकायला लागले... ...
बाई," आतां तर तूं बघतोच आहेस, की नानांच्या कारागीरानं ते शक्य आहे, असं निर्विवादपणे सिद्धच करून दाखवलंय्... ...
पुरावा तुझ्या पुढ्यातच टाकलाय् त्यांनी... ... ...तो नाकारतांही येणार नाही तुला...होय की नाही? "
फारुख खानानीं कोंरडा आवंढा गिळला," अं...अं...अं... ...खरंय् मॅडम."
बाई," तेव्हां आतां ढिल्या झालेल्या कवळ्या घट्ट करून घ्यायचं काम नानांच्या कारागीराकडं सोंपवावं लागेल मला... ...कळलं? "
फारुख खानांचा नक्षा आतां वितळायला लागला...!!!
कळवळून ते कह्णायला लागले," असं करूं नकां मॅडम... ...इतकी वर्षं तुमची कामं करतोय् आम्ही...जरा विचार करा..."
बाई कडाडल्या," विचार करूनच बोंलतेय् मी... ...
कवळ्या घट्ट करून देणं तुझ्या आवाक्याबाहेरचं काम आहे... ... ते तुला जमणार नाही, असं तूं च म्हणालास ना मला त्या दिवशीं? "
फारुख खान थण्ड पडले...
बाई," आणि कवळ्या इतक्या सुबकपणे घट्ट करतां येऊं शकतील असं मलासुद्धां वाटत नव्हतं... ...
आतां जर ते शक्य आहे, तर माझ्या रुग्णांना विनाकारण नवीन कवळ्यांच्या भुर्दण्डांत कशी काय ढंकलूं मी?...
तुला माहीत आहे... ...असले बाजारूं सल्ले मी रुग्णांना कधीच देत नसते...काय?... ...
तेव्हां तात्पर्य काय, की तुझ्याकडं येणारी नवीन कवळ्यांची कामं आतां बरीच घटणार असं दिसतंय् मला... ..."
फारुख खानांच्या चेंहर्यावरच्या रुबाबाचं आतां सफाचट् लक्तर झालं, अन् तो केविलवाणा पण व्हायला लागला...!!!
अखेरचा प्रयत्न करत मग ते माझ्याकडं वळले...
आणि बरोबर माझ्या तांवडीत सांपडले. !!
बाई नीं त्यांच्या रुबाबाच्या चिंध्या केलेल्या होत्याच... ...
आतां त्यांचे दांत घश्यात घालायचं काम फक्त मला पार पाडायचं होतं...मी सावध झालो.
फारुख खान,"अं.... ....सर...एक विचारूं काय आपल्याला? "
मी," बोला..."
फारुख खान," आपण काय आहांत सर?... ...म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की... ..."
मी," समजलं मला... ...मी स्थापत्य अभियन्ता आहे."
फारुख खान," का s s s s य?... ...म्हणजे कन्स्ट्रक्शन च्या धंद्यात आहांत काय तुम्ही? "
," चुकीचं समजताय् तुम्ही...पहिलं म्हणजे मी व्यवसाय करतो... ...धंदा नव्हे ", माझा आवाज किंचित् कठोर झाला," आणि दुसरं असं की मी कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय करत नाही..."
फारुख खान आतां पुरते बावचंळले," म्हणजे? मला नाही आलं ध्यानांत सर... ...स्थापत्य अभियंता आहांत आपण... ...आणि कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय तर करत नाही... ...आय् ऍम् टोटली कन्फ्यूज्ड् सर ... ...नेमकं काय काम करतां आपण? "
मी थण्डपणे उत्तरलो, " आमच्या क्षेत्रांतल्या खाटकांचे दांत त्यांच्याच घश्यांत घालून द्यायची कामं करतो मी... ...!!! "
फारुख खान आतां चक्क खुळ्यागत माझ्याकडं बघायला लागले...
पुरते बेसावध झाले... ...
अन् त्यांनी दुसर्या क्षणीं तोंड उघडत, मी लावलेला गळ गप्प्कन् गिळला," आतां कमाल झाली सर... ...कांहीच कळेनासं झालंय् मला...
जरा समजावून सांगाल काय की कश्या प्रकारची कामं असतात ही? "
आणि काय होतंय् ते कळायच्या आंत समोर मेजावर पडलेल्या माझ्या कवळीकडं बोंट दाखवून फारूख खाटकाच्या रयाहीन थोंबाडावर टकरीच्या एडक्याची सणसणीत धंडक मारत मी त्यांची बत्तिशी त्यांच्याच नरड्यात घालून मोकळा झालो," ह्या अश्याच प्रकारची कामं असतात ती सगळी. !!!!... ...समजलं सगळं स्वच्छ आतां ? "
फारुक खानाचा आतां दगडी पुतळा झाला...!!
दांडक्यानं सडकून काढलेल्या श्वानागत आतां ते केविलवाण्या नजरेनं आमच्याकडं बघायला लागले... ...!!!
आणि दुसर्या क्षणीं बसल्या जागीच एकेकाळच्या त्या कुर्रेबाज फारूख खानाचा अक्षरशः ' केष्टो मुखर्जी ' झाला. !!!!
अन् एकाच धंडकेत चारीमुण्ड्या चितपट मारलेल्या बोळक्या फारुख खाटकाचा तो लोळागोळा ओलांडून मी बनहट्टी बाईं ना धन्यवाद देत, मंगू खाटकाच्या त्या एडक्याच्या थाटात दवाखान्यातनं पसार झालो. !!!!
********************************************************************************
-- रविशंकर.
२० एप्रिल २०१६.
No comments:
Post a Comment