॥ जन्माचा धडा ॥
" तर माझ्या मित्रानो, चारित्र्यसंपन्नता ही मानवाला शाप नसून वरदानच आहे...
शेक्सपीअर नं म्हटलेलंच आहे की ' कॅरॅक्टर इस डेस्टिनी ', सुप्रसिद्ध आंग्ल नटककार सर जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचंही म्हणणं असंच आहे... ...
ते म्हणतात की,' व्हेन कॅरॅक्टर इज् लॉस्ट्, एव्हरिथिंग् इज् लॉस्ट् '... ... ...!!
इतकंच काय, आपले भारतीय संत, महात्मे, आणि द्रष्टे विद्वान हे च प्रतिपादन करतात, की विशुद्ध चारित्र्याइतकी मौल्यवान गोष्ट मनुष्याजवळ दुसरी कुठलीही असूंच शकत नाही... ... ...
आर्य चाणक्यानं बाराव्या शतकातच चाणक्यनीतीत स्वच्छपणे लिहून ठेवलेलं आहे की, ज्या समाजाचं चारित्र्य शंकास्पद असतं त्या समाजाचं पुनरुत्थान हे केवळ अशक्य असतं... ... ... ...!!!
' नीतिशतक 'कार भर्तृहरिचं वचन तर प्रसिद्धच आहे की... ... ..."
मी भान हरपून व्यासपीठावर ध्वनिक्षेपकासमोर तांठ उभा राहून मोठ्या आवेशानं धडाधडा भाषण ठोंकत होतो... ...तारीख होती १९ मे १९६७, अन् त्या वेळी मी दहावीच्या वर्गात शिकत होतो.
प्रायव्हेट हायस्कूल ह्या आमच्या कोल्हापूरच्या शाळेत दरसाल भरणारी, अटीतटीनं लढली जाणारी, अन् कोल्हापूरभर गाजणारी आंतरशालेय वादविवादस्पर्धा अगदी निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली होती... ... ...
समोर दोनतीनशे विद्यार्थी - पालक - वार्ताकार इ. मंडळींचा भरगच्च श्रोतृसमुदाय बसलेला होता... ...
वादविवादाचा विषय असा होता की ' जगात यशस्वी होण्यासाठी चारित्र्यसंपन्नता अनिवार्य असते की नसते ? '
आयोजकांनी अन् आमच्या शिक्षकवर्गानं ' चारित्र्यसंपन्नता असायला हवी ' म्हणणार्यांच्या गोटात माझी रवानगी करून मला विवादाला उभं केलेलं होतं... ... ...
माझ्या आधीच विद्यापीठ हायस्कूलच्या सदा नामजोशी नं विरुद्ध बाजूनं दमदार भाषण ठोंकून कडाकडा टाळ्याही वसूल केलेल्या होत्या...
अन् त्याचा वचपा कांढण्यासाठी मोठ्या हिरिरीनं मी आदल्या रात्रीच लिहून काढून तोंडपाठ केलेलं भाषण अगदी पोंटतिडिकेनं धडाधड मांडत होतो...समेच्या मुद्द्यावर कडाकडा टाळ्याही पडत होत्या... ...
मला हा असा चेंव चंढायला आणखी एक कारणही तसंच होतं... ... ...
व्यासपीठावर अंतिम निकाल देणार्या परीक्षक मंडळाचे प्रमुख म्हणून माझे आद्यगुरु आमचे टिकेकर मास्तरच विराजमान झालेले होते... ... ...!!! खुद्द ते च असे पांठीशी असतांना आणखी दुसरं काय हवं होतं चेंव चंढायला?
मला सर्वांगानं, सर्वर्थानं, अक्षरशः टांकीचे घांव घालून घडवणार्या ह्या गुरुंच्या देखत ही लढाई हरणं अजिबात परवडणारं नव्हतं मला... !!
म्हणून मोठ्या भगीरथ कष्टांती एकसे एक नानाविध संदर्भ- दाखले गोळा करून मी माझं भाषण आधी कागदावर संपूर्ण उतरवलेलं होतं, अन् आदली रात्रभर जागून ते तोंडपाठही केलेलं होतं... ... ...उगीच आयत्या वेळी बल्ल्या व्हायला नको म्हणून.!!!
भाषणाची सुरुवात जरा चांचरतच झाली... कारण आधी सदा नामजोशी नं मैदान चांगलंच गाजवलेलं होतं... ...
पण जसा तोंडपाठ केलेल्या भाषणाचा अखंड ओघ सुरूं झाला, तसे समोरचे श्रोते अन् मैदानही मला दिसेनासं झालं... ...
मग एका विलक्षण चेंवात मी धडाधडा बोलायला लागलो... ... ...
अन् भान हरपून असा कांही अखंड बोलत सुटलो, की टिकेकर मास्तरांचा खणखणीत आवाज जेव्हां कानांत शिरला, तेव्हांच भानावर येऊन थांबलो... ... ...
" मिस्टर रवि नानिवडेकर !!! "... ...मास्तर कडाडले... ... ...," जरा इकडं या असे माझ्यासमोर !!! "
भाषण तसंच अर्धवट सोडून मी आवाक् होत मास्तरांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो... ...
सगळ्या मैदानभर टांचणी पडली तरी आवाज होईल असली शांतता पसरली... ... ...
अन् काय होतंय् ते कळायच्या आतच मास्तरांची घनगर्ज तोंफ धंडाडली," श्रीयुत रवीन्द्रजी... ...ही जी दोन-तीनशे माणसं तुमच्यापुढ्यात जिवाचे कान करून बसलेली आहेत ना, ती आर्य चाणक्य काय सांगतोय्, संतमहात्मे काय म्हणताय्त, गटे किंवा सर बर्नार्ड शॉ नी काय लिहून ठेंवलंय् ते ऐकायला बसलेली नाहीत !!! ... ... ...ते सगळ्यांना ठाऊक आहे... ... ह्या माणसांना प्रस्तुत विषयावर रवीन्द्र नानिवडेकर काय म्हणताय्त ते ऐकायचं आहे... ... ...समजलं? !!!! "
मी अतीव लज्जेनं खाली मुंडी घालून मास्तरांचे रट्टे खात निमूट उभा राहिलो... ...ते पण शेकडो श्रोत्यांच्या पुढ्यात... ...!!!!
असला अपमान करण्यापेक्षा मास्तरांनी मला जोड्यानं जरी हाणला असता, तरी मला इतकी शरम वाटली नसती वा दुःखही झालं नसतं... ... ...!!!!
मास्तर पुढं कडाडले," तुझं स्वतःचं कांही म्हणणं आहे ह्या विषयावर? "
मी आ वांसून निरुत्तर होत मास्तरांच्याकडं बघतच बसलो... ...
अन् दुसर्या क्षणीं डोंक्यात लख्ख प्रकाश पडला, की स्वतःची मक्तेदारी शाबीत करील, असं माझ्या संपूर्ण भाषणात अवाक्षरही नव्हतं...!!!
मी लुळी झालेली मान नकारार्थी हलवली... ...
अन् दुसर्या क्षणी व्यासपीठ सोंडून कपाळाला हात लावत तडक घरचा रस्ता धंरला...!!!
जातां जातां मास्तरांचा करारी आवाजातला पुकारा कानांवर आदळला," नेक्स्ट् स्पीकर प्लीज्... ..."
आणि पानिपतावरनं सैरावैरा माघारी पळत सुटलेल्या मराठ्यांना काय वाटलं असेल, ते त्या क्षणीं मला स्वच्छपणे समजलं...!!!!
झालं... ...अपमान इतका जिव्हारी झोंबलेला होता, की रात्रभर नुस्ती तळमळच होत राहिली... ...
आणि ' उद्यां सकाळीच ह्याचा काय तो सोक्षमोक्ष एकदाचा लावयचाच ' असा पक्का निर्धार केला, तेव्हां कुठं पहांटे कधीतरी डोळा लागला कसाबसा.
दुसर्या दिवशी सकाळचा चहा कसातरी ढोंसून मी कपडे-बिपडे चंढवले व्यस्थवित, अन् पायांत चपला संरकवून तडक मास्तरांचं घर गाठलं... ...
मास्तर निवांतपणे झोंपाळ्यावर बसून झोंके घेत घेत सकाळचं वर्तमानपत्र वांचत बसलेले होते... ... ...
माझी चांहूल लागतांच निर्व्याजपणाचं हंसूं त्यांच्या चेंहर्यावर पसरलं, अन् म्हणाले," या या छळवादी... ...बसा बसा इथं... ...छान वाटेल झोंके घ्यायला..."
मग स्वयंपाकघराकडं वळून," अहो चहा आणा बघूं लवकर ... ...आपला ' ऍरिस्टॉटल् ' आलाय् सकाळी सकाळीच...भांडायला. !!! "
मी ही जरा घुश्श्यातच म्हणालो," बरोबर ओंळखलंत मास्तर... ... ...भांडायलाच आलोय्."
मास्तर तसे मुद्देसूदच... ...," आणि भांडणाचं प्रयोजन ऍरिस्टॉटल् ? "
मी," काल तुम्ही भरसभेत असं करायला नको होतं... ..."
मास्तर," काय करायल नको होतं मी? "
मी," माझा असा पाणउतारा "... ...रागानं माझ्या तोंडातनं पुढं शब्दच उमटेनात... ...
मास्तर शांतपणे म्हणाले," चुकतोय्स तूं ऍरिस्टॉटल्... ...पाणउतारा मी तुझ्या ' उसनवारीच्या पोपटपंची ' चा केला... ...तुझा नव्हे. !!! ... ... ...जी करायची शिकवण मी माझ्या विद्यार्थ्यांना कधीच देत नसतो... ...नाही? "
मी सफाचट निरुत्तरच झालो... ... ...मास्तरांनी पहिल्या झंटक्यात माझ्या संतापाच्या फुग्याला टांचणी लावलेली होती. !!!
फुग्यातली हवा गेली तरी मी एक प्रयत्न केलाच," मग?... ... ...काय करायला हवं होतं मी मास्तर? "
मास्तर हंसले," तुझं स्वतःचं एकतरी मत मांडायला हवं होतंस तूं... ... ...प्रतिस्पर्ध्याला चितपट मारणारं... ...तिथंच डोंक्यावर घेतला असता तुला मी... ...सगळ्यांच्या देखत....!!!... ...समजलं? "
आतां डोंक्यात खरा प्रकाश पडायला लागला... ... ...!!! तरीपण रागाचा फणा अजून वळवळत होताच," पण मास्तर... ...असं सगळ्यांच्या देखत?... ...कां म्हणून? "
मास्तर शांतपणे म्हणाले," आंसूड जिव्हारी लागल्याशिवाय चुकार संवयी सुटतां सुटत नाहीत म्हणून...!!!! ह्या प्रक्रियेला ' जन्माचा धडा शिकवणं ' असं म्हणतात... ... ...!!!
' वक्ता दशसहस्रेषु ' व्हायचंय् ना तुला? जगात आजवर कुणीही अशी ' उचलेगिरीची पोंपटपंची ' करून साधा निवेदकही बनलेला नाही... ... ...' वक्ता दशसहस्रेषु ' होणं लांबच राहिलं... ... काय? "
आतां मात्र पदरांत कांहीतरी उत्कृष्ठ पडायची वेंळ आलेली आहे हे मला अनुभवानं आपोआप समजलं, अन् मी गप्पच राहिलो... ... ...
मास्तर," उत्कृष्ठ वक्ता व्हायचं असेल तर तीन मूलभूत गुण अंगीं बाणवायला लागतील तुला..."
मी गप्पच... ... ...
मास्तर," पहिला म्हणजे चौफेर वाचनाची आवड.............वाचनाशिवाय मनुष्य कधीच समृद्ध होत नाही हे विसरूं नकोस."
मी," आणि बाकीच्या दोन गोष्टी?"
मास्तरांनी माझ्या पदरांत दान टाकलं," दुसरं म्हणजे जे कांही वांचशील, त्यावर उलटसुलट चिंतन करायची संवय लावून घ्यायला हवी तुला... ... ...ते केल्याशिवाय स्वतःचे विचार अन् मतं तयार होत नसतात... ... ...
नेहमी लक्ष्यात ठेव...' चिंतनात्पाचितं ज्ञानं शेषस्य मलविसर्जनम् '................ समजलं नीट ?
आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिंतनातून उपजलेले विचार एका अखंड मालिकेत सुसंगतपणे गुंफायचं कसबही आत्मसात करावं लागेल तुला...
एकदा ही स्वतःच्या ठाम विचारांची सुसंगत मालिका पक्की डोंक्यात बसली ना, की मग ध्वनिक्षेपकासमोर उभं राहिल्यावर ती आपोआपच वक्त्याच्या तोंडातनं मनस्वीपणे बाहेर पडायला लागते... ...तिथं कसल्या घोकंपट्टीची गरज पडत नाही, किंवा मुद्दे लिहून काढलेल्या चिटोर्याशिवाय कांही अडत पण नाही, आणि उसन्या पोपटपंची विना कांही बिघडत पण नाही ... ... ...!!
आणि असं कसदार - दमदार वक्तृत्त्व च प्रतिवाद्यांनी केलेल्या ' पोपटपंची ' ला खुल्या मैदानात चारी मुण्ड्या लोळवूं शकतं... ...अगदी बघतां बघतां... ... ...
केवळ असं आणि असं भाषणच अथ पासून इति पर्यंत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून जागच्या जागी खिळवून ठेंवूं शकतं... ...
त्यालाच अस्सल वक्तृत्त्व म्हणतात... ... ...आणि हे ज्याला जमतं, तों च ' वक्ता दशसहस्रेषु ' व्हायला लायक ठंरतो... ... ...!! सोपं नाही हे साध्य करणं...आलं लक्ष्यात सगळं नीट?
मी मुंडी हलवली," होय मास्तर..."
एव्हढं जर कटाक्षानं केलंस ना, तर एक दिवस तूं स्वतःच अनुभवशील श्रोते कसे मंत्रमुग्ध होतात ते... ...माझे आशीर्वाद आहेत तुला."
हयातभर आंठवणीत राहील अशी यथास्थित तुळतुळीत चंपी करून मास्तरांनी मला निरोप देतांना मग तोंडभर आशीर्वादही दिला," समृद्धो भंव...!!! "
पुढं ही चौफेर वाचनाची अन् त्यावर उलटसुलट चिंतन करायची आवड मी स्वतःला कटाक्षानं लावून घेतली...अगदी पाकशास्त्रापासून ते कोकशास्त्रापर्यंत कसलंही वाचन मी वर्ज्य मानलं नाही... ...
हळूंहळूं ही आवड संवयीत परिवर्तित झाली... ...
संवयीचं छंदात रूपांतर झालं, अन् कालांतरानं दररोज शे-दीडशे पानं वाचणं हा माझा नित्याचा परिपाठच होऊन बसला... ...
स्वतःचे विचार सुचायला लागल्यावर मग पांचपंचवीस श्रोत्यांपुढं उभं राहतांना घाम फुटायचा बंद झाला, अन् चांचरणंही इतिहासजमा झालं... ... ...
यथावकाश चारपांचशे लोंकांच्या श्रोतृवृंदापुढंही उभं राहणं जमायला लागलं... ... ...
' भाषण- व्याख्यान ' छान झालं तुमचं...आवडलं ' अश्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पण अधनं मधनं कानांवर पडायला लागल्या... ... ...
पण खरं सांगायचं तर ' वक्ता दशसहस्रेषु ' सोडाच....गेला बाजार ' उत्तम वक्ता ' तरी व्हायला जमलं काय? ते सांगणं मात्र अशक्य आहे... ...करण ते जोंखायला खुद्द मास्तरच आज हयात नाहीत... ... ...
तथापि ' एक दिवस तूं स्वतःच अनुभवशील श्रोते कसे मंत्रमुग्ध होतात ते........ ' ह्या मास्तरांच्या विधानाची मजेशीर प्रचीती मात्र तब्बल चाळीस वर्षांच्या कालांतरानं त्याच सभास्थानावर मला येणार होती, हे मात्र त्यावेळी मला ठाऊक नव्हतं... ... ...
तारीख होती १० जानेवारी २००८... ... ...सकाळीच माझा दूरध्वनी खंणखंणला... ...
मी," नमस्कार...नानिवडेकर बोलतोय्... ..."
" नमस्कार सर..." पलीकडून एका बाईं चा आवाज आला...," मी सौ. गायकवाड बोलतेय् कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून... ..."
मी," नमस्कार मॅडम...बोला कसा काय फोन केलात मला? "
" सर मी राजाराम महाविद्यालयात ' सूक्ष्म जीवशास्त्र ' [ मायक्रो बायॉलॉजी ] विभागाची प्रमुख म्हणून काम करते... ..."
मी," अरे वा...अलभ्य लाभ दिसतोय् आज... ...हं बोला..."
मग बाई नी थोडक्यात सांगितलं की १५ जानेवारी ला आमच्या महाविद्यालयाच्या वर्धानपनदिनाचा सोहळा ठंरलेला होता...त्या कार्यक्रमात कांही माजी विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी पाचारण केलेलं होतं... ...आणि मी त्यापैकी एक निमंत्रित होतो... ...
मला आश्चर्यच वाटलं..." माझा सत्कार कश्यासाठी मॅडम? "
मॅडम," सर स्थापत्य अभियांत्रिकीव्यतिरिक्त आपण लेखन - संगीत क्षेत्रांत पण व्यस्त आहांत, आणि कला क्षेत्रात आपल्याला कांही सन्मानही मिळालेले आहेत असं आपल्या कोल्हापुरातल्या मित्रांकडून आम्हांला समजलं... ...आणि आपल्या कांही कथा पण मी वांचलेल्या आहेत... ...म्हणून आपल्याला निमंत्रण द्यायला मी फोन केलाय् सर... ...जमेल ना तुम्हांला नक्की?... ... ... "
मी," एक तासाभरानं मी तुम्हांला कळवलं तर चालेल काय? माझं पुढच्या पंधरवड्याचं वेळापत्रक जरा बघून मग सांगतो नक्की."
सौ. गायकवाड," चालेल सर... ...पण नक्की जमवा अशी विनंति आहे सर... ...खरं तर एखादा महिनाभर तरी आधी बोलायला हवं होतं तुमच्याबरोबर, पण झालं असं की आपल्या महाविद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम अजून पुरं झालेलं नाही... ...त्यामुळं हा समारंभ नक्की कुठं आणि कधी करायचा तें च ठंरत नव्हतं बघा... ... ...चार दिवसापूर्वीच इथल्या ' प्रायव्हेट हायस्कूल ' नं त्यांचं मैदान अन् व्यासपीठ आम्हांला उपलब्ध करून दिलं, म्हणून लगोलग तारीख ठंरवून तुम्हाला फोन करत्येय् मी... ...
तर महाविद्यालयही तुमचं आहे अन् शाळाही तुमचीच आहे सर... ... ...माझी माहिती बरोबर आहे ना? "
मी चाटच पडलो... ...," अगदी बरोबर... ...मी प्रायव्हेट हायस्कूल लाच शिकत होतो........."
सौ. गायकवाड," तेव्हां वेळ काढाच सर आमच्यासाठी कसंही करून... ...शिवाय तुमचे वर्गमित्र डॉ. यादव सरांचा पण सत्कार आम्ही योजलाय् ह्या वर्षी...त्यांनी होकार कळवलाय् कालच... ...तेव्हां.........."
मला गंमत वाटली... ... ...बाई नी माझी गठडी वळायची तयारी करूनच मला दूरध्वनी केलेला होता तर... ... ...!!!
मी," ठीक आहे मॅडम...सकृद्दर्शनी जमेल असं वाटतंय् मला... ...एक तासाभरात मी परत दूरध्वनी करीन तुम्हाला नक्की काय ते सांगायला."
मॅडम नी " धन्यवाद सर... ...नक्की या च...फोनची वाट बघते मी " इतकं बोलून फोन ठेंवला.
मी वेळापत्रक बघितलं...१४ - १५ तारखा तश्या मोकळ्याच दिसत होत्या... ...कुठल्या समारंभाचं देखील आमंत्रण आलेलं दिसत नव्हतं.
मी बाई नां कळवण्यासाठी दूरध्वनी उचलायला गेलो, तोंच दूरध्वनी खंणाणला...
मी," नमस्कार....." गायकवाड बाई च पलीकडून बोलत होत्या... ...," सर मग नक्की समजूं ना मी?... ...म्हणजे तुम्हांला अन् यादव सरांना आणायची - पोंचवायची व्यवस्था करायची आहे ना अजून ?...म्हणून मी च वाट न बघतां परत फोन केला."
मे," ठीकाय् मॅडम...पंधरा तारीख मोकळीच आहे, तेव्हां नक्की धंरून चाला तुम्ही."
बाई नी मग मला थोंडक्यात दिवसभरच्या भरगच्च कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, अन् ' सकाळी अकरा वाजतां कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पुढं संवादस्वरूप असं एक व्याख्यान द्याल कां ? ' म्हणून विचारलं....
विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यातल्या वाटचालीच्या दृष्टीनं कांही मार्गदर्शन व्हावं असा त्यांचा उद्देश होता... ...माझे मित्र डॉ. यादव, हे ' पदव्युत्तर शिक्षण आणि पी. एच्. डी.' ह्या संदर्भात बोलणार होते, म्हणून त्यांनी मला ' व्यक्तिमत्त्व विकासांचं गमक ' असा विषय सुचवला, आणि ' शीर्षक काय ठेंवूं ? ' अशी विचारणा केली.
हा विषय अप्रत्यक्षपणे कां होईना पण माझ्या आवडत्या तत्त्वज्ञान विषयाशी संबंधित होता...त्यामुळं मी होकार दिला, आणि ' शाश्वत जीवनमूल्यांचं महत्त्व ' असं शीर्षक ठेंवायला सांगितलं... ... ...
तत्त्वज्ञानावर जवळपास दररोजच कांही ना कांही वाचन-चिंतन चालत असल्यामुळं व्याख्यानाची कांही विशेष तयारी, अथवा टिपणं काढायचीही जरूर पडणार नव्हती... ...तेव्हां आयत्या वेळचा रागरंग बघून जे सुचेल, तें संवाद स्वरूपात मांडावं असं मनाशी ठंरवून मी मोकळा झालो... ... ...
ठंरल्याप्रमाणं कार्यक्रम चांगलाच साग्रसंगीत झाला... ... ...
सौ. गायकवाड बाई सकाळी साडेआठ वाजतां स्वतःच गाडी घेऊन आम्हांला न्यायला आल्या... ... ...
सकाळचा नाष्टा कॉलेज च्या उपाहारगृहांतच आयोजित केलेला होता. त्या वेळी कॉलेजच्या आजी-माजी प्राध्यापकांच्याही निवांत गांठीभेंटी झाल्या... ... ...तब्बल चाळीस वर्षांनंतर आपल्याच महाविद्यात आमंत्रित पाहुणा म्हणून येणं हा एक अनोखा सुखद अनुभव होता.
नाष्टा झाल्यानंतर प्राचार्यांसमवेत आमची महाविद्यालाच्या आवारात प्रभात फेरी झाली... ...त्यावेळी महाविद्यालयाच्या कायापालटाचं सुरूं असलेलं कामही आम्हांला त्यांनी दाखवलं... ... ...आवारात आतां सुसज्ज प्रेक्षागृह पण बांधण्यात येत होतं, अन् वाचनालय देखील.
डॉ. यादव अन् मी दोघेही सगळ्या शिक्षकवर्गाचे परिश्रम साकार होत असलेले बघून विलक्षण सुखावलो... ... ...
ठीक साडेदहावाजतां आम्ही महाविद्यलयातनं ' प्रायव्हेट हायस्कूल ' च्या सभास्थानाकडं प्रस्थान ठेंवलं... ...
आयोजकांनी सारी व्यवस्था अगदी दृष्ट लागावी अशी चोंख ठेंवलेली होती. शाळेच्या इमारतीसमोरच्या पटांगणात नेमक्या चाळीस वर्षापूर्वीच्या त्याच जागीं एक छोटासा शामियाना आणि व्यासपीठ उभारलेलं होतं...!!!
शाळाकॉलेजातली आजी-माजी मुलं अन् प्राध्यापक-शिक्षक अशी सगळी मिळून चारएकशे माणसं श्रोतृवृंदात खुर्च्यावर बसलेली होती...
कोल्हापुरातले एक प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. महाडकर [ हे पण कॉलेज चे माजी विद्यार्थी ] आपला कॅमेरा सरसावत फटाफट् छायाचित्रं टिपत चोंहीकडं फिरत होते...........
बघतां बघतां चाळीस वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी झालेल्या माझ्या जाहीर ' पानिपता ' चा प्रसंग माझ्या डोंक्यात आतां जिवंत झाला...!!!
यथावकाश तो छोटासा पण सुबक सत्कार समारंभ सुरूं झाला... ...
उपस्थित मान्यवरांच्या हातून पुष्पगुच्छ घेतांना खूप बरं वाटलं अन् अभिमानानं ऊरही भंरून आला... ... ...
डॉ. यादव चं पहिलं व्याख्यान श्रोत्यांनी मनापासून ऐकलं अन् भंरभंरून त्याला पसंतीची दादही दिली... ... ...
माझ्या नावाचा पुकारा होतांच मी उठून ध्वनिक्षेपकाजवळ गेलो, अन् टिकेकर मास्तरांचा करडा आवाज डोंक्यात घुमला," ह्या समोर बसलेल्या श्रोत्यांना प्रस्तुत विषयावर रविंद्र नानिवडेकर काय म्हणताय्त ते ऐकायचं आहे... ... ...समजलं? !!!! "
कसलंही पाठांतर न करतां, मुद्द्यांचं टांचणही तयार न केलेल्या मी मग बोलायला तोंड उघडलं... ...
आणि मास्तरांनी सांगितल्याप्रमाणं ' डोंक्यातली स्वतःच्या मता-विचारांची सुसंगत मालिका आपोआपच ओंठांतनं कशी दुथडी वहायला लागते, त्याचा जिवंत अनुभवही घेतला...!!!
अगदी महाभारत-चाणक्यनीति-भर्तृहरि च्या शतकत्रयी सकट अनेकोत्तम ग्रंथराजांचे संदर्भ देत, त्याचे आजच्या जमान्यातले दाखले देत, त्यातनं मला स्वतःपुरतं समजलेलं तत्त्वज्ञान मी मांडायला लागलो... ... ...अन् एका विलक्षण धुंदीत पुढं तासभर अखंड बोलतच राहिलो...!!
श्रोत्यांनी इतका वेळ ते शांतपणानं ऐकून कसं घेतलं, याचंच आतां आश्चर्य वाटतं.
समारोप सुरूं झाला," तर माझ्या छोट्या मित्रानों, ही जीवनमूल्यं नुस्ती माहिती असून पुरे पडत नाही, तर ती अंगिकारावी लागतात...त्यांवर अभंग श्रद्धा ठेंवावी लागते, अन् आचरणात ती पाळावीही लागतात... ...ती पूर्णांशानं ज्ञात असणं, याला भर्तृहरि ' विद्या ' असं म्हणतो... ...
आणि ही विद्या जर बुडूं दिली नाही, तर आयुष्याच्या अमृतवेलीवर उमलण्याशिवाय मग त्या यश-समृद्धी च्या कस्तुरीपुष्पाला दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही, एव्हढं सांगून मी थांबतो...
धन्यवाद............"
शामियान्यातनं कडाकडा टाळ्या वाजायला लागल्या...
समारंभ संपला... ... ...
हस्तांदोलनं आभार वगैरे आटोपले, अन् निघायची गडबड सुरूं झाली... ... ...
तेंव्हढ्यात छायाचित्रकार महाडकर जरासे धंडपडतच घाईघाईनं माझ्याजवळ आले, अन् हस्तांदोलन करीत मला म्हणाले," धन्यवाद सर... ...मी छायाचित्रकर महाडकर... ...ह्या कॉलेज चा माजी विद्यार्थी."
मी," धन्यवाद कश्यासाठी महाडकरजी?"
श्री. महाडकर," खूप दिवसांनी असं सुंदर व्याख्यान ऐकायला मिळालं म्हणून...श्रोत्यांना अगदी खिळवून ठेंवलं होतं बघा तुम्ही... ... ..."
मी ओंशाळलो....," अहो कांहीतरीच काय महाडकरजी... ..."
श्री. महाडकर," सर...फक्त एकच मिनिट वेळ द्याल काय मला?... ...एक छोटंसं काम होतं... ..."
मी," फर्माइये... ..."
श्री. महाडकर," सर, जरा पुनश्च ध्वनिक्षेपकासमोर उभे रहाल काय ... ... ...प्लीज?"
मी," कां हो?... ...कश्यासाठी?"
श्री. महाडकर," अहो एक घोटाळा झालाय् बघा... ...
त्याचं काय झालं, की तुम्ही व्याख्यान सुरूं केलंत ना, त्यावेळी मी प्रेक्षागृहाची छायाचित्रं टिपण्यात गर्क होतो... ... ..."
मला कांही कळेना...," बरं मग? "
श्री. महाडकर," व्याख्यान सुरूं झाल्यानंतर थोंड्या वेळानं मग मी पण प्रेक्षागृहात बसून ते ऐकायला लागलो... ... ...
आणि झालं असं, की व्याख्यान जेव्हां संपलं, तेव्हां माझ्या ध्यानात आलं की तुमचं छायाचित्र टिपायचंच विसरून गेलोय् ... ... !!!!
म्हणून म्हणतो...एक क्षणभरच ध्वनिक्षेपकासमोर जरा उभे राहतां कां परत प्लीज ?... ...
तुमचं एव्हढं एकच छायाचित्र टिपलं ना, की झालंच बघा माझं काम पूर्ण... ... ..."
इतकं बोलून ते आर्जवी नजरेनं माझ्याकडं बघायला लागले... ... ...
अन् टिकेकर मास्तरांच्या चाळीस वर्षापूर्वीच्या भविष्यवाणी चा तो अजब पुरावा बघून आ वांसत मी च भर मंडपात स्वतःच्या कपाळाला हात लावला !!!!
*******************************************************************************************
-- रविशंकर.
४ नोव्हेंबर २०१५.
No comments:
Post a Comment