Search This Blog

Saturday, 24 October 2015

॥ प्रारब्धयोग ॥



जीवनात अश्या अनेक घटना आपण प्रत्यक्ष घडतांना पाहतो, की ज्यांची कार्यकारणमीमांसा कुठल्याही भौतिक शास्त्राच्या अथवा तर्कवादाच्या आधारावर करणं अशक्य असतं, अन्‌ घडलेल्या घटनाही नाकारतां येत नाहीत...अश्या घटनांना पराशास्त्रांत ' अगम्य ' अशी संज्ञा वापरतात... ...असे भोग वाट्याला आले, की माणसं व्यवहारात कधीकधी वैतागून कपाळाला हात लावत म्हणतात ना, " की नशीबच फुटकं, तर देव तरी काय करील? "
ह्या म्हणीचा प्रत्यय मला आणून देणारी ही एक विलक्षण सत्यकथा... ... ...
-- रविशंकर.

*****************************************************************************************




," तर वसंतराव, हे सगळं असं असतं बरं... ...बाकी सगळं जरी नीट असलं ना, तरी माणसाचं प्रारब्ध च जर धड नसेल, तर खुद्द परमेश्वरही त्याचे दैवभोग टाळूं शकत नाही... ...नियति ही ईश्वरालाही अजेय असते, आणि शिरसावंद्यही...आलं लक्ष्यात? ", माधवराव तावातावानं आपला मुद्दा माण्डूं लागले... ...
," संस्कृतात एक असं मजेशीर सुभाषित आहे की,

॥ वृथा दानं पूजनं च वृथा तीर्थाटनं तथा
हतप्रारब्धभोगस्य किं करोति दयाघनः ? ॥

अहो प्रारब्धभोग प्रत्यक्ष ईश्वरालाही जिथं चुकत नाहीत, तिथं माणसाची काय पत्रास लागून गेलीय्‌... ...ऑं?" 

आमच्या तत्त्वज्ञानप्रिय वर्तुळांतले वसन्तराव आणि माधवराव यांची जुगलबंदी अगदी टिपेला पोंचलेली होती... ... ...
माधवराव - वसंतराव ही जोडगोळी विज्ञाननिष्ठ असूनही सश्रद्ध आस्तिक होती... ...फरक केवळ इतकाच होता, की वसंतराव हे संख्याशास्त्राचे प्राध्यापक, तर्कवादाचे खंदे समर्थक, तर माधवराव हे पेशानं वैद्यकशास्त्राचे पदवीधर, अन्‌ कसलेले अनुभवी ज्योतिषाचार्य पण...जवळपास पंचवीसएक वर्षांचा ज्योतिषाचा व्यासंग गांठीशी असलेले... ...अनाकलनीय अन्‌ तर्कवादावर खुलासा करतां न येणार्‍या शेकडो घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार... ...

झालं होतं असं, की माधवराव हे अचानक कांही तांतडीचं काम उपटलं म्हणून मुंबईहून पुण्याला चार दिवसांची सुट्टी काढून वसंतरावांच्या घरीं रहायला आलेले होते. स्वतःची गाडी काढूनच आलेले असल्यामुळं त्यांचं नियोजीत काम एकदोन दिवसांतच उरकलेलं होतं, अन्‌ वसंतरावांनी आग्रह केल्यामुळं उरलेले दोन दिवस त्यांच्या सहवासात घालवण्यासाठी ते पुण्यातच थांबलेले होते.
मलाही ज्योतिष अन्‌ तत्त्वज्ञानाची आवड असल्यामुळं साहजिकच वसंतरावांनी मला व सौ. इंदिराजी नां त्या दिवशी सहभोजनाचं आमंत्रण दिलेलं होतं, अन्‌ जेवणंखाणं उरकल्यावर दुपारी वसंतराव, त्यांच्या सौ. वासंतीवहिनी, आम्ही दोघे, अन्‌ माधवराव असा गप्पांचा पंचरंगी फड रंगलेला होता... ... ...

सौ. वासंतीवहिनी ह्या मुळातच श्रद्धाळू... ... अगदी चातुर्मासापासून ते शाकंबरी च्या नवरात्रापर्यंत सगळी व्रतंवैकल्यं आवर्जून करणार्‍या... ...त्यांचा अध्यात्माचा व्यासंगही दांडगा होता, तर सौ. इंदिराजीं चा पदवीच्या वर्षात मराठी ला पूरक विषय तर्कशास्त्र हा होता. त्यामुळं गंमत अशी झालेली होती, की वसंतराव व सौ. इंदिराजी एका गोटात, तर माधवराव अन्‌ सौ. वासंतीवहिनी दुसर्‍या गोटात, अशी जुंपलेली होती... ...आणि मी कांठावर बसून समेच्या जागी हस्तक्षेप करणारा तटस्थ मध्यस्थ झालेलो होतो.
," तुमचं हे विधान न पटणारं आहे माधवराव...अहो भगवद्गीतेतल्या कर्मवादाच्या सिद्धांताला सरळ सरळ छेद देणारं विधान आहे हे... ...असं बघा, माणसाच्या वाट्याला जे कांही बरे वाईट भोग येतात, ते दैवजात नसून त्याच्या स्वतःच्या कृतकर्मामुळंच ते नशिबाला आलेले असतात बरं... ...तेव्हां तर्कवादाला अनुसरून वेगळ्या शब्दांत असं म्हणतां येईल, की तुम्ही लोक ज्याला प्रारब्ध प्रारब्ध म्हणतां ना, ते मनुष्य स्वतःच्या कर्मानंच स्वतःच्या हातांनीच घडवीत असतो... ...काय?"
काव... ... ... काव... ... ... खाली अंगणात कुठंतरी एक कावळा ओंरडत होता...

," तुमचं अगदी बरोबर आहे भावजी...", माधवरावांची कड घेत सौ. वासंती वहिनी आतां रिंगणात उतरल्या ," ह्यांची आपली सदा न्‌ कदा तर्कवादाचीच टकळी सुरूं असते... ... कांही अर्थ नाही त्यात... ... ...अहो अश्या कित्येक घटना लोकांच्या आयुष्यात घडत असतात की ज्यांची कारणमीमांसा करतांच येत नाही बिल्कुल... ...माणसाची बुद्धीच जर कुंठित होते अश्या प्रसंगांना तोंड देतांना, तर कसला डोंबलाचा तर्कवाद चालणाराय्‌ तिथं?"

आतां सौ. इंदिराजी पण शस्त्रास्त्रं परजत मैदानात उतरल्या," असं कसं म्हणतेस गं तूं वासंती?... ... माणसानं डोकं शांत ठेवून जर नीटपणे विचार केला ना, तर भल्या भल्या अनाकलनीय वाटणार्‍या घटनांची सुद्धां तर्कशुद्ध संगती अगदी हमखास लावतां येतेच बरं... ...अगाथा ख्रिस्ती, शेरलॉक होम्स्‌ वाचलेस ना, तर तर्कशास्त्राचे थक्क करणारे अनुभव घेतां येतील बघ तुला... ...अन्‌ मग खात्रीच पटेल तुझी, की तर्कशास्त्राला अनाकलनीय असं खरं तर कांहीच नसतं...कमी पडत असते ती फक्त ते वापरणार्‍या माणसाची बुद्धी अन्‌ कुवत...कळलं? "


काव... ... काव... ... काव... ... कावळ्यांचा अवाज आतां वाढायला लागला... ...

" पण इंदिराजी...इथं एक गोष्ट विसरताय्‌ तुम्ही... ..." मी कोलीत लावायची संधी साधत म्हणालो," मुळात माणसाच्या मेंदू च्या आकलनशक्तीलाच मर्यादा असल्यामुळं, त्याच्या तर्कशुद्ध विचार करण्याच्या कुवतीला पण एक मर्यादा पडते...ती अमर्याद असूंच शकत नाही... ... म्हणून निव्वळ तर्कशुद्ध निष्कर्षही आपोआपच असा निघतो, की माणसाच्या तर्कशक्तीपलीकडच्या अश्या अनेक गोष्टी असूं शकतात, की ज्यांची संगती लावणं अशक्य असतं... ...मग अश्या गोष्टींचं काय अन्‌ कसं विवेचन करणार तुम्ही लोक?"
आतां सौ. वासंतीवहिनी माझं विधान उचलून धरत म्हणाल्या," आपण नेहमी पाहतोच की नाही गं सुमे, की जे लोक पुढं होऊन स्वतः होऊन जबाबदार्‍या घेणारे नी कामं पार पाडणारे असतात, त्यांच्याच मागं सदा कसली ना कसली लचांडं लागतात, अन्‌ जे लोक जबाबदार्‍या टाळून केवळ तोंडच्या गप्पा मारत असतात, ते नेहमीच बिनघोर अन्‌ निवान्त राहतात... ...कसलीही जबाबदारी अंगाला लावून न घेतां... ... हे असं कसं काय होतं मग?... ...तर्कशास्त्र काय खुलासा करूं शकतं याचा?"

काव... ... काव... ... काव... ...फड् फड् फड्
काव... ... काव... ... !!!

बहुधा खाली अंगणात कावळ्यांची संख्या आतां वाढायला लागली होती, अन्‌ त्यांच्यात भांडणं पण लागलेली असावीत... ... ...

सौ. इंदिराजी," असं होणारच वासंती... ...अगं जे लोक नेहमी जबाबदार्‍या टाळायलाच बघत असतात, ते इतरांच्या दृष्टीनं बिनकामाचेच असतात... ...त्यामुळं साहजीकच सगळी कामं आपोआपच जबाबदार्‍या उचलणार्‍या लोकांच्याच डोक्यावर बसतात...अगदी तर्कसंगतच आहे हे... ...विरोधाभास कुठं आहे त्यात?"  
सौ. वासंतीवहिनी," म्हणजेच जे करतात त्यांच्या मागं लचांडं, अन्‌ जे करून ठेवतात ते कायम नामानिराळे फक्या मारायला... ...नाही का? मग ह्यांच्या - ' यद्वत्कर्मम्‌ तद्वत्फलम्‌ ' ह्या कर्मवादाच्या सिद्धांतात हे कुठं बसतं?... ...विरोधाभासच नव्हे काय हा?"

आतां माधवरावांनी पुष्ट्यर्थ तोंड उघडलं," खरी गोष्ट अशी आहे मंडळी, की आपण जी शास्त्रं शिकलो...म्हणजे वसंतराव तुम्ही संख्याशास्त्राचे पदवीधर... ...वासंतीवहिनी ह्या पदार्थविज्ञानात कुशल, हे नाना स्थापत्य अभियांत्रिकी वगैरे शिकले... ...सुमावहिनी तर्कशास्त्रप्रवीण... ... ...आणि मी स्वतः वैद्यकशास्त्र शिकलो... ...तर ही सगळी शास्त्रं जी आपण शिकलो ना, ती भौतिक शास्त्रांत मोडतात, जिथं शुद्ध तर्कवादावर सगळ्या गोष्टींचं निरूपण करतां येतं.
पण ह्या भौतिक शास्त्रांच्या सीमारेषांवर तर्कवादाची सीमाही संपते... ... ...आतां जिथं ही सगळी भौतिक शास्त्रं संपतात ना, नेमकी तिथनंच पुढं अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, रमलशास्त्र, योगशास्त्र, मुद्राज्योतिष, संमोहनशास्त्र, मानसशास्त्र इ. इ. अगम्य शास्त्रांचा प्रदेश सुरूं होतो, जिथं कुठल्याही घटनेचं मूल्यमापन, अथवा तिचा खरेखोटेपणा हा फक्त रोकड्या अनुभवावरच आधारित असतो. आणि गंमत अशी होते की, घडलेल्या घटनांचं तर्कशुद्ध स्पष्टीकरणही देतां येत नाही आणि रोकडे अनुभव तर नाकारता किंवा खोटे ठरवता पण येत नाहीत... ... ...अशी ही शृंगापत्ति होऊन बसते."


आतां सगळेच माधवरावांचं बोलणं कान टंवकारून ऐकायला लागले... ... ...सौ. इंदिराजी नी आतां सुरुवात केली," असे अनुभव तुम्ही स्वतः पाहिले - घेतले आहेत काय भावजी?"
" हो तर... ...अगदी शेकड्यानी अनुभव घेतलेत अन्‌ पाहिलेतही... ... ...वसंतराव, मला असं सांगा, की एखाद्या बुद्धिमान, कार्यतत्त्पर, आणि वरिष्ठांशी चांगलं जुळणार्‍या खासगी क्षेत्रातल्या कंपनी कर्मचार्‍याची पदोन्नती साधारण किती वर्षांनी होते...किंवा तर्कानुसार व्हायला हवी?"
वसंतराव," सर्वसाधारणपणे सगळं नीट चाललं असेल, तर तीन ते चार वर्षांत व्हायला हवी."

काव् काव्... ...
फड् फड् फड् फड्... ...फडाड् फड् फड्
काव् काव्... ...काव् काव् काव् काव् !!!!

"जरा मोठ्यानं बोला हो भावजी... ...", सौ. वासंतीवहिनी वैतागत म्हणाल्या," ह्या मेल्या कावळ्यांच्या काय अंगात आलंय्‌ मघांचपास्नं.......कुणाचंच बोलणं कांही ऐकूं येईना झालंय्‌ बघा..." 

माधवराव आवाज किंचित वाढवत म्हणाले," तुम्ही म्हणतां तसं सगळं नीट असूनही तब्बल एकोणीस वर्षं एकाच श्रेणीत कुणी महाभाग खितपत पडलेला तुम्ही कधी पाहिला आहे काय?, आणि असेल, तर असं व्हायला तर्कशुद्ध खुलासा काय देतां येईल?"
वसंतराव," माधवराव... ... हे केवळ काल्पनिक उदाहरण देताय्‌? की... ... ..."
वसंतरावांना मध्येच तोंडत माधवराव म्हणाले," काल्पनिक नव्हे मण्डळी... ...अशी एक केस मी एकोणीस वर्षापूर्वीच हाताळली होती... तब्बल एकोणीस वर्षं बिचारा एकाच श्रेणीत खितपत पडून गेल्या महिन्यातच सेवानिवृत्त झालाय्...!!! आतां बोला."
आतां आम्ही सगळेच माधवरावांच्या कडं कपाळांना हात लावत आं वांसून बघायला लागलो... ... ...!!!!
माधवराव पुढं सांगूं लागले," अहो असली अनेक जगावेगळी उदाहरणं मी प्रत्यक्ष्यात पाहिलेली आहेत...मला सांगा, कांही माणसं अशी असतात की नाही, की जी जेव्हां जेव्हां बस थांब्यावर जातात, तेव्हां तेव्हां त्यांना हवी असलेली गाडी अगदी दोन तीन मिनिटांतच हांक मारल्यासारखी धांवत सेवेला हजर होते... ... ...आणि कांही माणसं अशी असतात, की..."

माधवरांच्या विधानाला पुष्टी देत मध्येच सौ. इंदिराजी माझ्याकडं निर्देश करीत बोलत्या झाल्या," उरलेली अगदी ह्यां च्या पठडीतली असतात बघा भावजी... ...हे बस थांब्यावर गेले रे गेले, की एरव्ही अगदी वेळेबरहुकूम धांवणार्‍या गाड्यासुद्धां मेल्या दोन दोन तास फिरकतच नाहीत बघा... ... ...नादुरुस्त तरी होतील, पंक्चर तरी होतील, उशीरा तरी सुटतील... ... अगदी एखाद्या वेळी चुकून वेळेवर आल्याच तरी भर वाटेत कुठंतरी संप किंवा दंग्याधोप्यात अडकून तरी पडतील... ... ...हे बरोबर असले ना, की गाडी कधीही धडपणे आपल्या वाट्याला येणार नाही असं अगदी खुश्श्याल समजावं. !!!" 

सौ. इंदिराजीं च्या विधानाचा धागा पकडून मग मी त्यानांच पेंचात धंरलं," होय ना?... ...हे प्रत्यक्ष अनुभवलंय्‌ ना स्वतःच? मग सांगा ह्याचा तर्कशास्त्रीय खुलासा करूं शकताय्‌ काय तुम्ही स्वतः तरी?"
आतां श्री. वसन्तराव सौ. इंदिराजीं च्या मदतीला धांवले," असं बघा नाना, संख्याशास्त्रातल्या संभाव्यते [ प्रोबॅबिलिटी ] च्या सिद्धान्तावर याचा खुलासा सहज करतां येईल की."
मी," तो कसा काय वसंतराव?"
वसंतराव," असं बघा नाना, आपण असं गृहीत धरूं की दररोज शहरी वाहतुकीकरणाच्या पांचशे बस धांवतात... ...तर त्यातल्या शेंकडा दहा टक्के गाड्या खराब झालेल्या असल्यामुळं नेहमीच बिघडतात... ... तर असं सिद्ध करतां येईल, की त्यातल्याच गाड्या तुम्ही पकडायला जातां नेमके... ...आणि म्हणून तुम्हांला असा अनुभव येतो इतकंच."
आतां मी खोडा घातला," ते ठीकाय्‌ वसंतराव... ...दहा टक्के गाड्या नेहमीच बिघडतात, आणि त्या एखाद्या वेळी माझ्याही वाट्याला येतात, इथपर्यंत संभाव्यतेचा सिद्धान्त काम करेलही... ...पण त्या नेमक्या माझ्याच वाट्याला कां येतात, आणि एखाद्या वेळेला नव्हे तर सदा न्‌ कदा माझ्याच वाट्याला कश्या काय येतात? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, माधवरावांनी आत्तांच सांगितल्याप्रमाणं कांही कांही भाग्यवंतांच्या वाट्याला कधीच कश्या काय येत नाहीत? ह्याचा खुलासा संभाव्यतेचा सिद्धांत करूं शकतोय्‌ काय?"
वसंतराव," नाना... ...हे फारच व्यापक विधान करताय्‌ तुम्ही... ...अहो असं कसं होईल? आणि पराशास्त्रांत तरी ह्याचा खुलासा तुम्ही कसा काय करणार?... ...बोला"
आतां सौ. वासंतीवहिनी माझ्या मदतीला आल्या," अहो, कां नाही करतां येणार?... ...अध्यात्मवादांत अश्या अनुभवांचे ढीगभर खुलासे मिळतील सहज... ...आतां मला एक सांगा... ..."
वसंतराव," काय सांगूं?"
सौ. वासंतीवहिनी," गेल्या आठवड्यात मी सुमीकडं हळदीकुंकवाला गेले होते... ...बरोबर?"
वसंतराव," बरं... ...मग?"
सौ. वासंतीवहिनी," तर झालं असं, की समारंभ उरकल्यावर, ह्या सुमी नं नाना ना सांगितलं मला ' कोथरुड - डेक्कन जिमखाना ' बसमध्ये बसवून द्यायला... ..."
वसंतराव," बरं हळदीकुंकवाचा इथं काय संबंध?"
सौ. वासंतीवहिनी," अहो ऐका तर खरं... तर झालं असं की आम्ही बसथांब्यावर जवळजवळ पाउणतास रखडलो, तरी बस यायचं चिन्ह दिसेना. तेव्हां मी च नाना ना म्हटलं, की इथं असं तांटकळत उभं राहण्यापेक्षा, आपण बस च्या मार्गावर गप्पा मारत चालायला सुरुवात करूं या, आणि जिथं बस येईल, त्या थांब्यावर मी बस पकडते... ...असं ठरवून आम्ही चालायला लागलो बरं का बस च्या मार्गावर... ... गप्पात ओघा ओघानं नीलाताईं च्या वैदेही च्या पत्रिकेचा विषय निघाला... ...तीनएक वर्षं झाली तिच्यासाठी स्थळं बघताय्‌त नीलाताई, पण तिचं लग्न जुळत नाहीय्‌ ना अजून... ... ... म्हणून त्यांनी नाना ना तिची पत्रिका मांडून बघायला सांगितली होती... ... ...तर काय गंमत झाली... ..."
सौ. इंदिराजी," काय झालं गं वासंती ?"
सौ. वासंतीवहिनी," सुमे अगं विश्वास बसणार नाही कुणाचा, पण गप्पा मारत मारत नाना आणि मी चक्क डेक्कन जिमखान्यावर चालत पोंचलो, तरी बस चा पत्ता नव्हता... ...!!! बोल आतां...आहे काय कांही खुलासा ह्याचा तुझ्याकडं?, नाहीतर ह्यां च्याकडं?"

आतां मात्र सौ. इंदिराजी-वसंतराव जोडी नं आं वासत आपापल्या कपाळांना हात लावले...!!!
वसंतराव," म्हणजे तूं अन्‌ हा नाना चक्क सहा-सात किलोमीटर चालत गेलात त्या दिवशी... ...ऑं?"
सौ. इंदिराजी," धन्य आहे गं बाई ह्यां च्या खत्रुड नशिबाची... ...बस च्या बाबतीत !!!... ... हे मला माहीतच नव्हतं बघ..." मग त्यांचा मोहरा माझ्याकडं वळला," अहो ह्याला तुमच्या ज्योतिषशास्त्रांत तरी कांही खुलासा मिळतो काय हो?"
आतां माधवरावांनी निरूपण सुरूं केलं," मिळतो की... ... नानांच्या स्वतःच्या पत्रिकेत, आम्ही ज्याला 'वाहनसुख योग' असं संबोधतो, तो बिल्कुल नसणार, उलटपक्षी 'वाहनपीडा योग' जबरदस्त प्रबळ दिसेल... ...अगदी ठंसठंशीतपणे... ...काय नाना आहे ना तसंच?"
मी कबुली दिली," अगदी अचूक होरा सांगितलात माधवराव... ...तसंच आहे अगदी."
आतां माधवरांनी पराशास्त्राचं निरूपण सुरूं केलं," तर मंडळी... ... गोष्ट अशी आहे, की प्रत्येक माणसाची जन्मपत्रिका ही त्या व्यक्तीच्या चेहर्‍यासारखी त्याची किंवा तिची एकमेवाद्वितीय ओंळख...म्हणजे आपण ज्याला इंग्रजीत ' युनिक्‌ आयडेंटिटी ' म्हणतो ना तशी असते, आणि तिच्यातले जन्मजात ग्रहयोग हे न बदलणारे असतात... ...त्यामुळं त्या व्यक्तीला तसे अनुभव पुनःपुन्हां येत राहतात. 
आतां कळलं काय वसंतराव - सुमावहिनी, की नाना नां बसगाड्या कधीच वेळेवर कां मिळत नाहीत ते? असे योग हे माणसाच्या प्रारब्धानुसार ज्याच्या त्याच्या वाट्याला कायमचे आलेले असतात, म्हणून अध्यात्म - ज्योतिषांत त्यांना ' प्राब्धयोग ' असं म्हटलं जातं. आतां ज्यास्त खोलात न शिरतां थोडासा खुलासा करायचा म्हटलं, तर ' वाहन पीडा योग ' हे फार विस्तृत म्हणजे अगदी ढोबळ वर्णन झालं...म्हणजे ' वाहनापासून कसली ना कसली पीडा ' असा त्याचा व्यापक अर्थ घेतां येईल, पण प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतल्या एकाच प्रकारच्या योगांत सुद्धां बारीक सारीक फरक असतात. त्यामुळं एखादा योग दहा माणसांच्या पत्रिकेत असला, तरी त्याची अभिव्यक्ति प्रत्येकाच्या आयुष्यात भिन्न भिन्नपणे होत असते... ... ..."

आतां विवाद बाजूला राहिला, अन्‌ सगळेच माधवरावांचं बोलणं कान टंवकारून ऐकायला लागले... ... ...
सौ. इंदिराजी माझ्याकडं वळून विचारत्या झाल्या," म्हणजे नेमका अर्थ काय हो भावजीं च्या म्हणण्याचा?"
मी," म्हणजे असं समजा, की आपल्या सगळ्यांच्याच पत्रिकांत सर्वसाधारणपणे वाहनपीडा योग आहे... ...तर इतर बारकाव्यानुसार, मला गाड्या न मिळणं, किंवा उशीरा मिळणं अश्या प्रकारचा त्रास अनुभवाला ये ईल, तर तुला कदाचित तुझी स्कूटर नेहमी रस्त्यात बंद पडणं, ढंकलत न्यावी लागणं, सर्व्हिसिंग करूनही धड न चालणं, असे अनुभव येतील, वासंतीवहिनीनां वाहन चोरीला जाणं, गाडीची कागदपत्रं गहाळ होणं, असले अनुभव येतील, तर माधरावांना कदाचित गाडीची मोडतोड होणं, बारीकसारीक अपघात होणं, पोलिसांच्या लचांडात सापडणं, अश्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल... ... सगळ्यांच्या पत्रिकांत 'वाहन पीडा' योग समानच आहे, तरी त्याचे प्रत्यक्ष येणारे अनुभव हे मात्र वेगवेगळे आहेत... ... ...आतां आलं लक्ष्यात?"

फड् फड् फड् फड्... ...फडाड् फड् फड्...फड् फड् फड् फड् फड् फड् फड्... ...!!! कावळ्यांची लढाई आतां चांगलीच जुंपलेली असावी... ...

माधवराव," आणि गंमत अशी आहे मंडळी, की नानां च्या सारखाच माझ्या स्वतःच्या पत्रिकेतही प्रबळ 'वाहनपीडा योग' आहे बरं का... ...फक्त त्रास वेगळ्या प्रकारचा होतो इतकंच काय ते."
आतां मात्र सगळ्यांनीच कान टंवकारले," म्हणजे हो माधवराव?... ...तुमच्याही गाड्याबिड्या चुकतात अन्‌ पायपीट होते की काय ह्या नाना सारखी... ...ऑं?"
माधवराव," तसं नाही होत... ...पण माझ्या 'वाहनपीडा योगा' शी कावळ्यांचा घनिष्ठ संबंध असल्यामुळं माझी चारचाकी कावळे विष्ठा करून घाण करतात... ...अगदी हमखास."
सौ. वासंतीवहिनी," कमालच आहे... ...आणि नेहमीच होतं असं?"
माधवराव," नेहमी चं काय घेऊन बसलाय्‌त वहिनी?... ... ...अगदी दररोज... ...न चुकतां !!!... ... ...आतां बोला"
वसंतराव," मग त्यात विशेष कायसं आहे माधवराव? अहो कावळे विष्ठा टाकून नेहमीच गाड्या घाण करतात सगळ्यांच्या... ...नेहमीचीच डोकेदुखी असते ती... ... ...त्यात काय एव्हढं विशेष?"
माधवराव," तसं नाही वसंतराव," माझ्या गाडीच्या आजूबाजूला इतर ढीगभर गाड्या जरी लागलेल्या असल्या ना, तरी कावळे माझी गाडीच नेमकी घाण करतात...अगदी बिनचूकपणे !!... ...आतां इतर गाड्यावरही थोडीफार घाण पडत असेलही, पण माझी गाडी अगदी वेंचून घाण केल्यासारखी पुरती राडीराड झालेली असते... ... ...ती ही अगदी दररोज...न चुकतां..!!!! .... काय? "
सौ. इंदिराजी," अहो कांहीतरीच काय भावजी... ... झाडांखाली गाडी लावत असाल म्हणून असं होत असेल... ... ...कावळे झाडावर बसलेले असतात ना, म्हणून तुम्हांला आपलं वाटत असेल की तुमचीच गाडी कावळे घाण करून ठेंवतात म्हणून... ... ...अहो झाडांखालच्या जागा टाळून गाडी उघड्यावर लावायची कुठंतरी, म्हणजे झालं... ... ...आहे काय न्‌ नाही काय"
माधवराव," ते ही  करून झालंय्‌ सुमावहिनी... ... ... पण गाडी घाण होण्यात आजतागायत कांहीही फरक पडलेला नाही... ... ...म्हणजे अगदी परवांपर्यंत... ...मी मुंबईहून इथं येईतोंपर्यंत तरी.
आणि म्हणूनच आज सकाळीसुद्धां मी  गाडी खाली झाडं टाळून बाहेर रस्त्याकडेला उघड्यावरच लावलेली आहे... ...आत्तां तासाभरात परत निघायचं आहे ना मुंबई गांठायला...म्हणून."

काव् काव्... ...
फड् फड् फड् फड्... ...फडाड् फड् फड्
काव् काव्... ...काव् काव् काव् काव् !!!!

" काय ह्या मेल्या कावळ्यांनी तरी आज उच्छाद मांडलाय्‌ अगदी... ... ... उलथत पण नाहीत कुठं दुसरीकडं जाऊन मेले...", असं करवादत आतां वासंतीवहिनी उठून तरातरां खिडकीकडं गेल्या, अन्‌ खिडकीतनं बाहेरच्या आवारात खाली वांकून बघायला लागल्या... ... ...
अन्‌ कुणाला कांही कळायच्या आतच छताकडं डोंळे फिरवत कपाळाला हात लावून त्यांनी शेंजारच्या कोंचावर ," बाई गं.............!!!! " म्हणून किंचाळत धाड्‌दिशी बसकण मारली...!!!!
झा s s s s s लं...," वहिनी... ...अहो काय झालं काय तुम्हांला?" असं ओंरडत माधवराव अन्‌ मी वासंतीवहिनींकडं धांवलो... ...पाठोपाठ सौ. इंदिराजी अन्‌ वसंतरावही धांवले... ...!!!
," वासंती...ए वासंती... ...अगं काय झालंय्‌ तुला?... ...चक्कर बिक्कर येतीय्‌ कां?", वसंतराव त्यांची बखोटी धंरून वहिनीना कोंचावर बसत्या करत घाबरून म्हणाले.
सौ. इंदिराजी," कुठं छातीत बितीत कळ आली की काय गं वासंती?... ...ऑ?... ... ... भावजी...सबनीस डॉक्टरनां आणूं कां बोलावून?"
सौ. वासंतीवहिनी अद्यापपावेतों सांवरून उठून कोंचावर नीट बसल्या," मला कांही झालेलं नाहीय्‌... ...ठीकाय्‌ मी...सोडा मला... ...सुमे जरा पाणी दे गं प्यायला."

सौ. इंदिराजी नी मेजावरच्या भांड्यातनं ग्लासभर पाणी भरून वासंतीवहिनीना दिलं," नक्की ठीकाय्‌ ना गं सगळं तुझं? की सबनीसांना घेऊन येऊं?"
सौ. वासंतीवहिनी घोटभर पाणी पिऊन आतां माधवरावांना म्हणाल्या," भावजी... ... ...रहा आज इथंच... ...अन्‌ उद्या सकाळी सयाजी आला, की मग नाष्टा उरकूनच निवांत निघा मुंबईला... ... ..."
आतां माधवराव चाट पडले...आणि आम्हां दिघांकडं निर्देश करीत वासंतीवहिनीना म्हणाले," अहो आत्तां प्रस्थान ठेंवायचं ठरलं होतं म्हणून तर ह्या दोघांना तुम्ही बोलावलंत ना भेंटीगांठीला? आणि तिकडं घरी माधवी पण वाट बघत बसेल उगीच... ...तेव्हां निघावं म्हणतो आतां मी."
सौ. वासंतीवहिनी वसंतरावांना म्हणाल्या," अहो...माधवी ला सांगा लगेच फोन करून की भावजी आज परत येऊं शकत नाहीत... ...इथंच राहतील म्हणून...आणि उद्या सकाळी निघतील असा निरोप द्या... ... ...अजिबात कांळजी करूं नकोस म्हणावं तिला... ....काय?"
आतां वसंतरावही चमकले," अगं आयत्यावेळी असं सगळं उलटं पालटं करून कसं चालेल वासंती? आणि ' काय झालंय्‌ म्हणून 'हे' निघूं शकत नाहीत ? ' असं वहिनीनी विचारलं, तर काय सांगूं त्यानां मी... ...ऑं?"
सौ. वासंतीवहिनी," प्रारब्धयोग !!!"
सौ. इंदिराजी," म्हणजे काय गं वासंती? ही कसली चेष्टा चालवलीय्‌स तूं आतां?"

वासंतीवहिनीनी मग अचानक वसंतरावांना विचारलं," अहो, आज सकाळी तुम्ही सयाजी [ वसंतरावांची गाडी धुणारा नोकर ] ला सांगितलं नाहीत काय फाटकाजवळ मरून पडलेली ती घूस उचलून कोंपर्‍यावरच्या उकिरड्यावर नेऊन टाकायला?"

वसंतराव," म्हणजे काय?... ...अहो सयाजीनं माझ्यादेखतच ते धूड कागदात उचलून थेट पलीकडच्या गल्लीतल्या मैलभर अंतरावरच्या उकिरड्यावर सकाळीच नेऊन टाकलं की.... ... ... कां काय झालं?"
सौ. वासंतीवहिनी मखखपणे म्हणाल्या," खिडकीतनं खाली पहा, म्हणजे कळेल..."

आतां माधवरावांसकट आम्ही सगळेच थेट खाली आवाराकडं धांवलो, नेमका काय घोटाळा झालाय्‌ ते बघायला... ...
तिथं फाटकाच्या पलीकडं भिंतीला लागूनच रस्त्याकडेला झाडं टाळून माधवरावांनी उभी केलेली त्यांची ' होण्डा ऍकॉर्ड् ' दिसत होती... ... ...सकाळीच सयाजीनं चंकचंकीत स्वच्छ धुतलेली... ... ...
आतां मात्र गाडीच्या टपावर डझनभर कावळे बसून कर्कश्श्य कांव कांव करीत भांडत होते... ... ...
त्यांच्या मधोमध गाडीच्या टपावर सकाळीच सयाजी नं उकिरड्यावर नेऊन टाकलेलं मेलेल्या घुशीचं कलेवर पडलेलं दिसत होतं... ... ...!!!
कलकलाट करत कावळ्यांची झुंबड त्या कलेवरावर आपापसात भांडत-झोंबत तुटून पडलेली होती... ... ...!!!!
आणि त्यांनी चोंची मारून इतस्ततः पसरलेल्या घुशीच्या रक्तामांसाच्या किळसवाण्या लंचक्यांनी - लगद्यानी लडबडून माधवरावांची गाडी अक्षरशः आनखशिख राडीराड झालेली होती... ... ...!!!!
आणि गंमत म्हणजे आजूबाजूला हाताच्या अंतरावरच उभ्या केलेल्या इतर रहिवाश्यांच्या गाड्या मात्र स्वच्छ धुतल्यासारख्या दुपारच्या उन्हात लखलखत होत्या... !!!!!

प्रारब्धयोगाचा तो जबरदस्त पुरावा बघून सौ. इंदिराजी नी ," ईईईईई... गं बाई !!!" असं किंचाळत आकाशाकडं डोंळे फिरवत कपाळाला हात लावून आवारातच खाली धप्पदिशी बसकण मारली...!!!

वसंतराव आं वांसून कपाळाला हात लावून कावळ्यांच्या त्या घूसमेजवानीकडं बघायला लागले... ... अन्‌ हतबुद्ध होत बघतच बसले...!!!!
वीसएक वर्षांचा पत्रिका बघायचा व्यासंग केलेल्या मी पण बोलती बंद होऊन स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ... ...!!!!
अन्‌ इतका वेळ 'प्रारब्धयोगां' चं सांगोपांग विवेचन करणारे, शांत स्वभावाचे माधवराव, स्वतःच्या कपाळावर थडाथडा हात मारून घेत त्या कावळ्यांच्या मूळ पुरुषाला शिव्यांची लाखोली वाहत स्वतःच्याच गाडीवर रस्त्यातले दगड उचलून भिरकवायला लागले... !!!!! 

*****************************************************************************************

-- रविशंकर.
२३ ऑक्टोबर २०१५.    

No comments:

Post a Comment