Search This Blog

Saturday, 25 October 2014

॥ जुनं तें सोनं ॥

॥ जुनं तें सोनं ॥




" अहो... ... ऐकलंत काय? जरा इकडं या बघूं लगेच...", माझ्या सासर्‍यानीं सासूबाईनां हांक मारली.


१९७५ सालातल्या नवरात्राचे दिवस सुरूं होते... ... ...

आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला दीपावलीची सुटी केव्हांच लागलेली होती.
माझे सासरे श्री. तोटे हे आमच्याच महाविद्यालयात विद्युत्‌ अभियांत्रिकी शाखेत प्राध्यापक असल्यानं त्यांनाही भरगच्च सुटी मिळालेली होती.
आणि येणारी दिवाळी ही आमचा विवाह आदल्याच वर्षीं झालेला असल्यामुळं आमच्या पहिल्या दिवाळसणाचा तो समारंभ होता.
म्हणून सासूबाईनी आम्हां दोघांना नवरात्रापासूनच दिवाळसणासाठी सासरीं मुक्कामाला यायचं तंबीवजा आमंत्रण दिलेलं होतं. 
सौ. इंदिराजीनी त्यांच्या आई च्या पुढं एक पाऊल टाकत मग फतवा काढला, की 'आईला दिवाळीच्या तयारीसाठी माझी अनायासे मदत पण होईल, तेव्हां घटस्थापनेपासूनच आपण आईकडं जाऊं या.'
पण झालं असं की आम्ही दोघेही नोकरीवाले असल्यामुळं रजांचं समीकरण कांही केल्या जमेना, आणि होय नाही करतां करतां अखेर सासरीं दाखल व्हायला आम्हांला वसुबारसं उजाडलं... ... !!
आमचे सासरे तसे शांत चिंतनशील सोशीक... ... आणि सासूबाई म्हणजे एकदम उलटं टोक... ... पक्का कामाठी कारभार.
तोंडाचा दांडपट्टा एकदा कां सुटला, की समोरच्याचं क्षणार्धांत सफाचट पानिपत ठरलेलं. !!! 
सासूबाई बोलायला फंटकळ असल्या, तरी मुलीं-जावयांवर [ विशेषतः जावयांवर ] त्यांचा विलक्षण जीव... ...अगदी पोटच्या मुलांसारखा. त्यामुळं जावयांचीसुद्धां झाडाझडती घ्यायला कमी करायच्या नाहीत.
त्यांना तिन्ही मुलीच... ... आमच्या सौ. इंदिराजी ह्या मधल्या... ...ह्या आमच्या सौ. नाकींडोळीं थेट सासर्‍यांच्या आईसारख्या झालेल्या असल्यामुळं सासूसासर्‍यांच्या जरा विशेष लाडक्या. आमच्या सासूबाईनां ब्राह्मणांच्या विद्वत्तेबद्दल विलक्षण आदर होता, आणि मी ब्राह्मण असल्यानं की काय कोण जाणे, माझ्या बाबतीत त्यांचं जरा 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' असं होत असावं कदाचित.
त्यामुळं आम्ही सासुरवाडीला घरीं पाय ठेंवतांक्षणींच माझी उलटतपासणी सुरूं झाली," काय हो... ...सासर्‍याच्या घरीं रहायला काय परकं-कमीपणाचं वाटायला लागलं की काय तुम्हाला?... ... ...ऑं? की तुमच्या बायकोला तिचं सासर सोडवेना झालंय?"
त्या तोफखान्याबरोबर दोन हात करण्यात कांही अर्थ नव्हता. !! तेंव्हां मी आपलं नरमाईनं सूतोवाच करीत म्हटलं," तसं कांही नाही हो... ..."
सासूबाई," 'तसं' कांही नाही?... ...तर मग 'कसं' काय आहे?"
सौ. इंदिराजींनी आतां तोंड उघडलं," अगं आई... ... ...त्याचं काय झालं... ... ..."
सासूबाई,"तुझ्या 'त्या चं काय झालं' ते मला माहीत आहे !!... ... ... ह्यां च्या 'कश्याचं काय झालं' ते त्यां ना विचारतेय्‌...!!!... ... समजलं?"
मी गप्पच... ... ...
अखेर सासूबाईच म्हणाल्या,"आतां आठवडाभर इथनं हलतां येणार नाही तुम्हाला !!!... ... ...काय?"
मी सासर्‍यांच्याकडं बघितलं... ... ...
सासरे आढ्याकडं बघत होते.!!!
शेंवटी मी "ठीकाय्‌ आई... ...राहूं की आठवडाभर." म्हणत 'व्हर्साय' चा तह करून मोकळा झालो.!!!    

सासुरवाडीला येताना सौ. इंदिराजी नी आधीच सांगितलेलं होतं की 'आई-बाबा नां आतां साठी गांठल्यामुळं घरातल्या उचापती झेंपत नाहीत. ते, विशेषतः आई, आपल्याला काहीही करूं देणार नाहीत, तेव्हां आपणच न बोलतां ज्यास्तीत ज्यास्त कामं उरकायला हवीत.' 

म्हणून तशी तयारी ठेंवूनच आम्ही आलो होतो... ...पण झालं भलतंच.
सगळ्यांच्या अंघोळी आणि नाष्टा उरकल्यावर आम्ही दोघे दिवाळीच्या फराळासाठीचा किराणा आणायला बाहेर गेलो.
सगळा बाजारहाट उरकण्यात जवळ जवळ दोन तास गेले. मग कामत हॉटेल मध्ये निवांत चहा घेऊन आम्ही घरीं परतलो... ... ...

बघतो तर काय, कामवाल्या बाईच्या बरोबरीनं सासूबाई पदर खोंचून कामाला लागलेल्या... ... ... आणि सासरे सगळे माळे रिकामे करून साफसूफ करीत बसलेले होते. 

सगळ्या घरभर इतस्ततः सामान विखुरलेलं... ... ...
पंचवीस तीस वर्षांच्या जुन्या घासलेटच्या वातीच्या स्टोव्ह पासून तमाम सगळ्या आश्चर्यकारक जुन्या वस्तूंचं संग्रहालय आख्ख्या घरभर पसरलेलं होतं. !!!
"पतूं... ...अगं ए पतूं... ...(आमच्या सौं. चं माहेरचं नाव प्रतिमा...त्याचा हा लघुभाव ) इकडं ये जरा पदर खोंचून... ...", सासूबाई नी सौ. ना हांक मारली.
"येते गं आई... ...... ..., आत्तांच आलेय्‌ ना? दोन मिनिटात येते... ... थांब जरा.", सौ. उत्तरल्या.
"थांब जरा म्हणायला काय म्हातारपण आलंय की काय तुला?", सासूबाई ची 'मुल्क ई मैदान' धंडाडली... ...,"पदर खोंच, आणि ओटा सगळा आंवरून घांसून पुसून लखलखीत करायला घे लगेच... ...!!... ...कामं काय थांबणार आहेत की काय तुझी वाट बघत?... ...ऑं?"
तसा सौ. इंदिराजी नी त्यांचा वरवंटा बाहेर काढलाच," अहो... ...हे ओंट्यावरचं सामान सगळं खाली काढून ओटा मला मोकळा करून द्या बघूं."
आतनं सासूबाई गरजल्या," पतू... ...रवि नां कसलंही काम सांगायचं नाही.!!"
सौ. इंदिराजी,"काय बिघडलं गं आई नवर्‍याला एव्हढंसं काम सांगितल तर?"
सासूबाई कडाडल्या," जावई आहेत ते...म्हणून !!... ...समजलं?... ...जातीतल्या बायकांना जर हे कळलं, तर सगळ्या शेण घालतील तुझ्या-माझ्या तोंडात. !!" 
सौ. इंदिराजी नी मुकाट पदर खोंचून घासण्या पुसण्या हातांत घेतल्या, आणि मला उदरांत कधी नव्हेत असल्या विलक्षण गुदगुल्या झाल्या.!!!

सगळे असे झडझडून कामाला लागलेले बघून मलाच कसनुसं वाटायला लागलं, आणि मग मीही सासूबाईं चा डोळा चुकवत जमेल तशी आवराआवर करायला लागलो... ...

आणि त्या गदाड्यात एक पुठ्ठ्याचं बंद खोकं माझ्या हाताला लागलं.
झांकण उघडून बघितलं तर चित्रविचित्र कापडांच्या रंगीबेरंगी पट्ट्यांनी ते गच्च भरलेलं होतं... ...त्यातल्या बहुतेक पट्ट्या तर जरीकाठी होत्या.
ते सासर्‍यांना दाखवत मी विचारलं,"हे कश्याचं सामान आहे हो बाबा?... ...हे ठेंवायचं की टाकून द्यायचं?"
एव्हढा प्रश्न विचारल्यावर निरुत्तर होत मग सासर्‍यानीं सासूबाई नां उपरोक्त पाचारण केलेलं होतं... ... ...

"अहो काय झालं काय इतका शंखनाद करायला?... ... काय हंवंय तुम्हाला?", म्हणत सासूबाई सौ. रमाबाई कमरेला खोंचलेल्या फडक्याला हात पुसत स्वयंपाकघरातनं बाहेरच्या खोलीत आल्या.

सासर्‍यानीं त्या खोक्याकडं बोट दाखवत विचारलं,"अहो ह्या खोक्यात ह्या चिंध्या कश्यासाठी भरून ठेंवलेल्या आहेत?... ... ...उगीच अडगळ  घरांत नुस्ती... ... ...हे अतीच झालंय सगळं."
आतां सासूबाईंचा दांडपट्टा चौफेर सुटला,"ते तुमच्या कपाटांत ठेंवलेलं भंगाराचं खोकं आधी द्या फेकून.!!! ... ...कळलं?... ...गंजके खिळे, स्क्रू, वेड्यावाकड्या लोखंडी पत्र्याच्या पट्ट्या, रांद्याचे तुकडे... ... ...कायकाय अडगळ भरून ठेंवलीय्‌त त्यांत... ... ...आधी ती सगळी जुनी अडगळ फेंकून द्या घराबाहेर... ... ...मग ह्या खोक्याचं बघूं ."
सासरे," म्हणजे सगळ्या जुन्या वस्तूंची घराबाहेर गच्छंती करायची... ... ...असं म्हणताय्‌ काय तुम्ही?"
सासूबाई गरजल्या," नाहीतर काय?... ... ...अडगळ नुस्ती... ... ...ना उपयोग ना वापर... ... ...ती पहिली काढा घराबाहेर... ... ...समजलांत?"
सासरे,"अहो ह्या न्यायानं मला सर्वप्रथम तुम्हांलाच घराबाहेर काढावं लागेल. !!!"
सासूबाई,"म्हणजे काय?"
सासरे शांतपणे म्हणाले,"अहो आपल्या घरांत तुम्हीच तर सगळ्यात जुन्या आहांत ना?!!!!"
आमच्या धंडाकेबाज सासूबाईनीच आतां स्वतःच्या कपाळाला हात लावला,"ह्या चिंध्या नव्हेत... ... पैठण्या आहेत त्या.!!"
आतां सासरे हतबुद्ध होत म्हणाले,"अहो पण कुठल्या विणकराकडून घेऊन आलाय ह्या तुम्ही? आणि कश्यासाठी आणल्याय्‌त ह्या? तुम्ही कधी जरीकांठी पैठणी नेसलेल्या मी तरी बघितलेल्या नाही.!!... ... म्हणून विचारतो."
सासूबाई कडाडल्या," बायकोकडं जन्मांत कधी डोळे उघडून धड बघितलं असेल, तर दिसेल ना. !!!... ... ...
आमच्या 'अव्वा' ला ( 'अव्वा' म्हणजे सासूबाईं च्या मातोश्री ) तिच्या सासूबाई नी लग्नांत जरीकांठी पैठण्या नेसवल्या होत्या. .... ... त्या सगळ्या अव्वा च्या माघारी मी च वापरल्या... ... ...त्यांच्या काठांपदरांच्या पट्ट्या आहेत ह्या...!!! तुम्हांला ते कांही कळायचं नाही... ... आतां बघायलाही मिळणार नाही असली जर... ...म्हणून ठेंवल्याय्‌त त्या... ... ...'जुनं ते सोनं' ही म्हण परिचित आहे ना तुम्हाला?"
सासरे,"तुमचं काय ?"
सासूबाई नीं मग क्षणार्धांत सामना निकाली संपवला," मला माहीत आहे, म्हणून तर ह्या घरांत अजून नांदतेय्‌ !!! ... ... ...कळलं?"
सासर्‍यानीच आतां कपाळाला हात लावला," अहो पण ह्या अश्या पट्ट्या कांपून कश्यासाठी ठेंवलेल्या आहेत तुम्ही ह्या खोंक्यात भरून?"
सासूबाई सौ. इंदिराजी कडं बोंट दाखवत सासर्‍याना म्हणाल्या,"नाती ची हौस आहे ना तुम्हांला?... ...हिला जर पहिली मुलगी झाली, तर ह्या अस्सल जरीच्या काठांची परकर पोलकी तिला शिवायची आहेत मला... ...समजलं?"
सासर्‍यांनी आतां मूलभूत शंका उपस्थित केली,"आणि मुलगाच झाला तर काय?"
सासूबाई नी मग सगळ्याच कुशंकांचा एका फटक्यात सफाया केला," तसं झालं तर ह्या पट्ट्या जर मोडल्या ना, तर नातवाचे डोक्यापासून पावलांपर्यंत अंगभर दागिने सहज होतील इतकं सोनं आहे ह्या जरीकांठांत. !!... ...'जुनं ते सोनं'... ...काय? !!!"
सासर्‍यानी बोलती बंद होऊन तें खोकं जसं च्या तसं बंद करून सासूबाईं च्या हातांत देत म्हटलं,"आपल्या लोखंडी कपाटात तरी ठेवा हे आतां."

एव्हढं होतंय्‌ तोंवर सौ. इंदिराजी डाव्या हातात एक सुंदर देखणा फुलांच्या नक्षीचं झांकण असलेला चपटा वाटोळा प्लॅस्टिक चा डबा आणि उजव्या हातात एक लालभडक रंगाचं प्लॅस्टिक चं दणकट घंगाळं घेऊन चीत्कारतच बाहेर आल्या," ए आई... ... ...कित्ती छान आहेत गं ह्या वस्तूं ... ...मी जाऊं घेऊन?... ... ...हे घंगाळं अंघोळीचं गरम पाणी काढायला छान उपयोगी पडेल बघ... ... ... आणि हा डबा... ... ...शिवणाचं सामान ठेंवायला मस्तच होईल हा... ..."

सासूबाई," अगं जा की खुशाल घेऊन... ...विचारायचं काय त्यांत मला?... ... ...आवडल्याय्‌त ना तुला ह्या वस्तूं?... ... ...हे घंगाळं तर तुझ्या ओंळखीचं आहेच."
सौ. इंदिराजी," म्हणजे? मला कांही हे घंगाळं आठवत नाही की गं... ...कधी बघितलेलं पण नाही मी."
सौ. सासूबाई,"इतकं सगळं कसं आठवेल तुला? तूं दोन वर्षांची होतीस तेव्हां ह्यातच बसून अंघोळ करायचीस. !!! ... ... ...कळलं?" 
सौ. इंदिराजी चकित होत चीत्कारल्या,"आणि हा डबा?... ... ...हा कुठून आणलास गं आई?... ... ...मस्त च आहे बघ अगदी..."
सासूबाई नी कांही कळायच्या आंत दिवाळीचा पहिला आप्पटबार फोडला,"आणला नाही गं कुठून... ...अगं मराठी चंवथीत असतांना मी परीक्षेत पहिली आले होते ना, तेव्हां तो मला बक्षिस मिळाला होता. !!"
सासूबाईं चं ते 'जुनं ते सोनं' बघून सौ. इंदिराजीनीच आतां आपल्या कपाळाला हात लावला.!!!

यथावकाश धनत्रयोदशीच्या दिवशी सासूबाईंच्या फतव्यानुसार बाकीचे दोन्ही जावई आणि लेकी पण घरीं दाखल झाल्या.

सासूबाई नीं सगळ्यांचा दिवाळसण धडाक्यात कौतुकानं साजरा केला.
सगळ्या लेकी-जावयांना यथोचित मानपान-आहेर देऊन सर्वावर सारखीच माया दाखवली.
त्यांना मुलगा नसल्यामुळं भावाबहिणीनां त्यांच्या मुलांसकट भाऊबीजेला बोलावून लेकींची भाऊबीजही यथासांग पार पाडली.
निघायच्या दिवशी त्यांनी मला बोलावून माझ्या हातात एक जुनं बायकी मनगटी घड्याळ ठेंवलं, अन्‌ म्हणाल्या,"हे आमच्या तातां ची आठवण म्हणून पतूं ला द्या. 
१९३२ सालीं माझ्या लग्नात तातांनी ते मला भेंट दिलं होतं... ...मी हे बर्‍याच वर्षांत वापरलेलंच नाही... ...एखाद्या खात्रीच्या घड्याळजी कडून त्याचं तेलपाणी आणि झिलई तेंव्हढी करून घ्या म्हणजे तिला ते वापरतां तरी येईल... ...खरं तर मी च करायला टाकणार होते, पण ह्या दिवाळसणाच्या धामधुमीत मला कन्हैयालाल सराफाकडं जायला सवडच झाली नाही... ... ...तुमची बायको आमच्या तातां ची लाडकी नात होती ना... ...म्हणून हे तिलाच द्यायचं होतं मला."
मी घड्याळ निरखून बघितलं... ...'पिअरी कार्डिन' कंपनीचा छाप असलेलं ते घड्याळ 'पुराणकालीन' म्हणावं असं मजेशीर दिसत होतं... ... ...
चौकोनी आकाराच्या पेटीत घड्याळाचं यंत्र बंद केलेलं होतं, आणि वरचा कांच असलेला भाग एखाद्या पेटीच्या झांकणासारखा उघडतां येत होता. 
भुरकट पांढर्‍या रंगाच्या डायलवर रेंखीव रोमन आकडे कोंरलेले असून प्रत्येक आकड्याच्या समोर पांढरे खडे बसवलेले होते, आणि बाणासारख्या आकाराचे मजेशीर कांटे होते त्याला. पट्टा एखाद्या बिलवर-तोड्या सारखा नक्षीनं मढवलेला होता.
घड्याळ वेगळंच दिसत होतं, पण त्याची डबी आणि पट्टा मात्र काळपट पडलेले होते... ...बहुतेक घड्याळजीचं काम झाल्यावर एखाद्या सराफाकडून त्याला सोनेरी झिलई चंढवून घ्यावी लागेल असं दिसत होतं.
सासू-सासर्‍यां ना धन्यवाद देऊन, आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या घरीं परतलो.

सौ. इंदिराजी नां मी ते घड्याळ जेव्हां दाखवलं तेव्हां त्या म्हणाल्या,"आधी हे घड्याळजी ला दाखवून चालूं करून आणा, मग सराफाकडं नेऊन ते सोनेरी झिलई चंढवायला टाकलं पाहिजे... ...तरच ते वापरतां येईल मला."

सौ. इंदिराजीं जवळ वापरातलं दुसरं घड्याळ असल्यामुळं मग ते काम तसंच पडून राहिलं... ... ...आणि लांबणीवर पडत पडत अखेर विसरूनही गेलं. 
आमच्या दोन्ही मुलांनी ते घड्याळ लहानपणी खेळणं म्हणूनही वापरलं, आणि मुलं मोठी झाली तेव्हां ते मी आमच्या घरातल्या कांचपेटीत शेंवटी ठेंवून दिलं.
कालांतरानं मुलं मोठी झाली... ... ...सासूबाई आणि सासरेही कालवश झाले.
यथावकाश आमच्या कन्येचं लग्न २००३ सालीं ठंरलं, आणि अचानक सौ. इंदिराजी नां आई नं दिलेल्या त्या घड्याळाची आंठवण झाली," अहो ऐकलंत काय?"
मी," हं बोला."
सौ. इंदिराजी,"अहो माझं घड्याळ खराब झालेलं आहे... ...आमच्या ऑफिसजवळच्या घड्याळवाल्याला मी ते दाखवलं तेव्हां त्यानं सांगितलं की 'हे आतां दुरुस्त होणार नाही, नवीनच घ्या' म्हणून. तेव्हां ते आई नं मला दिलेलं घड्याळ आहे ना? ते अप्पा नागपूरकरांच्याकडं टाकून या दुरुस्तीला... ...दोन दिवसांत द्या म्हणावं त्यांना, म्हणजे कन्हैयालालकडून त्याला झिलई पण चंढवून घेतां येईल, आणि स्निग्धाच्या लग्नांत ते वापरतांही येईल मला."
सौ. इंदिराजींचाच फतवा तो... ... ...मी दुपारचा चहा झाल्यावर ते काळं पडलेलं घड्याळ खिश्यात टाकून तडक अप्पा नागपूरकरांचं दुकान गांठलं.
अप्पा नागपूरकर म्हणजे घड्याळातला पट्टीचा किडा माणूस... ... ...आणि अनेक वर्षांची दोस्ती असल्यानं अगदी खात्रीचा. 
थेट 'फावर ल्युबा' च्या जर्मन बनावटीच्या गजराच्या घड्याळापासून ते अगदी रोलेक्स ओमेगा ची स्विस बनावटीची घड्याळं सुद्धां लीलया हाताळणारा दर्दी घड्याळजी.
घड्याळ दुरुस्तीत अप्पां चा हात धंरील असा घड्याळजी त्या काळीं तरी पुण्यात दुसरा कुणी नव्हता.   

अप्पां ना सगळं रामायण-महाभारत कथन करून मी त्यांच्या पुढ्यात ते घड्याळ ठेंवलं... ...

पुढची वीसएक मिनिटं अप्पा एका डोळ्याला भिंग लावून घड्याळ आंतनं बाहेरनं अगदी तन्मयतेनं निरखून बघत होते... ... ...
आणि इकडं माझी इतर कामं आवरायची घाई असल्यामुळं चुळबुळही सुरूं झालेली होती... ... ...
पण अप्पां ना माझ्या चुळबुळीशी कांही देणं-घेणं नसावं.
त्यांनी सावकाश डोळ्यावरचं भिंग उतरवून खाली ठेंवलं... ...
आणि माझ्याकडं बघत म्हणाले,"धन्यवाद नाना."
मी उडालोच,"धन्यवाद?... ... ...आणि ते कश्याबद्दल हो?"
अप्पा,"हे घड्याळ दाखवायला आणल्याबद्दल... ... ..."
मी," म्हणजे?... ... ...मी नाही समजलो... ...हे दुरुस्त करून चालूं करून द्या दोन दिवसांत अप्पा... ...सौ. इंदिराजीं चा वटहुकूम आहे.!!"
अप्पा,"हे घड्याळ दुरुस्त करून चालूं करतां येणार नाही नाना... ... ... पोरांच्या हातांत दिलं होतं काय हे खेळायला?"
मी," दिलं होतं काय म्हणजे काय नाना?... ...दोन्ही पोरांनी ते खेळायला यथेच्छ वापरलेलं आहे... ... ...खूप जुनं आहे हे घड्याळ."
अप्पा,"माहीत आहे मला... ...१९३२ सालची 'पिअरी कार्डिन'ची जलमुद्रा आहे त्यावर आंतल्या बाजूला.
आणि आंतल्या यंत्रासकट ते संपूर्णपणे हातबनावटीचं आहे.!! असलं घड्याळ आतां वस्तुसंग्रहालयातच बघायला मिळेल... ... ...!!
मी बावचंळलो," म्हणजे काय अप्पा? हे टांकून द्यावं लागणार की काय आतां? अहो आमच्या सासूबाई नी सौ. इंदिराजी ना दिलेलं आहे ते... ..."
अप्पा थंडपणे म्हटले,"मला वाटलंच तसं कांहीतरी असणार म्हणून... ... ...
नाना, हे घड्याळ दुरुस्त करून घ्यायचा विचार आतां डोंक्यातनं काढून टाका कायमचा, आणि तुमच्या तिजोरीत ठेंवून द्या हे... ...
हे घड्याळ आतां दुरुस्त होणं शक्य नाही... ... ...आणि हे दाखवायला पण कुठं दुसरीकडं घेऊन जाऊं नकां... ...इथंच आलात हे नशीब समजा तुमचं. !!"
मी चंपापलोच," म्हणजे हो अप्पा?"
अप्पा," म्हणजे असं की ह्या घड्याळाची डायल खर्‍या हस्तिदंताची असून हातानं कोंरलेली आहे...!!!
डायलवर आकड्यांच्या समोर अस्सल ऑस्ट्रियन हिरे बसवलेले आहेत... ...!!!!
आणि केवळ यंत्र वगळतां डबी पट्ट्यासकट हे आख्खं घड्याळ बावन्नकशी सोन्याचं आहे. !!!!!
तुमच्या सासूबाई चुलीवर स्वयंपाक करतांनाही बहुधा हे हातावर घालत असाव्यात... ... ...
त्यामुळं धूर-काजळीची पुटं बसून हे काळपट झालेलं दिसतंय्‌ इतकंच काय ते... ...
पण हे बफिंग यंत्रावर लावून साफ केलं तर परत नव्यासारखं दिसायला लागेल... ... ...
आणि जर कां प्राचीन वस्तूंच्या एखाद्या दर्दी संग्राहकाकडं हे घेऊन गेलात ना, तर ह्या घड्याळाची तो उड्या मारत कांही लाखांत किंमत मोजेल नाना !!!... ... ...आहांत कुठं?"
इतकं बोलून अप्पा नागपूरकर त्या काळपट पडलेल्या जुनाट दिसणार्‍या कलावस्तूंकडं अनिमिष नजरेनं एकटक बघायला लागले... ... ...
आणि जुन्या वस्तूंवर अपरंपार प्रेम करणार्‍या आमच्या दिवंगत तडाखेबंद सासूबाईं चा 'जुनं ते सोनं' म्हणीचा तो दणदणीत पुरावा डोळे फांडफांडून बघत मीच स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!!

***********************************************************************************


-- रविशंकर.

२४ ऑक्टोबर २०१४.

No comments:

Post a Comment