॥ केकायन ॥
मराठी वाङ्मयात दोन अयनं प्रसिद्ध आहेत.
पहिलं बादरायण ऋषींचं बादरायण, दुसरं गो. नी. दांडेकरांचं कर्णायन... ... ...
तिसरं अयन लिहायचा प्रसंग माझ्यावरच गुदरेल असं मला जन्मांत कधी वाटलं नव्हतं. !!
तशी वेळ माझ्यावर यायला आमचा पुतण्या अनंग हा कारणीभूत झाला... ... ...
त्यामुळं ह्या ’केकायना’ चं सारं श्रेय त्याचंच... ...आम्ही केवळ नाममात्र.
हे अनंगराव म्हणजे माझा ठाण्यात वास्तव्य असलेला बालमित्र अतुल गोरे ह्याचे चिरंजीव.
अतुल बरोबर माझे संबंध सख्ख्या भावासारखे असल्यामुळं चि. अनंग ला मी पुतण्या म्हणतो.
झालं असं... ... ...
कांही कामासाठी मी आणि आमच्या सूनबाई सौ. क्षिति मुंबईला दोन दिवस गेलो होतो, आणि अतुलकडंच मुक्काम टाकलेला होता... ... ...
तारीख होती २८ डिसेंबर २०१२.
आमचं काम तसं एक दिवसातच आटोपलं, पण चि. अनंग चा वाढदिवस नेमका एक जानेवारीला येत होता.
मग अतुल आणि सौ. अस्मितावहिनी नी चि. अनंगचा वाढदिवस होईपर्यंत थांबायचा आग्रह केला, आणि मग मी आणि सौ. क्षिति, आमचं पुण्याला परतणं दोन दिवस पुढं ढंकलून ठाण्यातच थांबलो.
चि. अनंग - वय बावीस- हे ताज्या दमाच्या तरूण पिढीचे प्रतिनिधी. शिवाय बी. एस्सी. [ जर्नॅलिझम आणि मास मीडिया ] करून मुंबईतल्याच एका कंपनीत फिल्म एडिटर म्हणून कार्यरत होते. सिनेक्षेत्राशी घनिष्ठ संबंध दररोजचाच... ...त्यामुळं अगदी दश्या काढलेल्या विटक्या जीन्स् आणि एका कानात डूल घालण्यापासून ते डोंक्यावरचे केंस कसलातरी चिकटा फासून साळिंदराच्या कांट्यासारखे उभे करण्यापर्यंत यच्चयावत आधुनिक फॅशमधले दर्दी. ब्रॅण्डेड वस्तूंचे पराकोटीचे चाहते आणि आश्रयदाते पण.
एक सकाळचा घरचा नाष्टा तेव्हढा वगळला, तर बाकीचं खाणंपिणंही बहुधा बाहेरच व्हायचं.
त्यांच्या कामाच्या वेंळाही अपरात्रीच्याच असल्यामुळं भारतीय समाजाबरोबरचा त्यांचा संपर्कही बर्यापैकी इतिहासजमा झालेला होता.
थोंडक्यात चि. अनंगरावांचा निशाचर ’काउंट ड्रॅक्युला’ झालेला होता. !!
दोनचारवेळा ऑफिसच्या कामासाठी ’हॉलिवुड वार्या’ पण करून आलेले असल्यानं ते केंवळ देहानंच हिंदुस्तानांत वावरायचे... ... ...
बाकी सगळं खुद्द अमेरिकन माणसांनीच ह्याच्याकडून शिकावं.!!!
सौ. अस्मितावहिनी म्हणजे थेंट दुसरं टोंक... ... ...सोळा सोमवारसकट सगळी व्रतंवैकल्य करणार्या.
त्यांना अनंग चं हे असलं राहणीमान अजिबात आवडायचं नाही.
एकदां माझ्या उपस्थित हा विषय उपटला, तेंव्हां अनंग त्यांना म्हणाला," काय वाईट आहे गं आई ह्या कॉस्ट्यूम मध्ये?"
सौ. अस्मितावहिनी तंडकल्या," काय वाईट आहे?... ... ...बायकांसारखे केंस वाढवून पाठीमागं बुचडा-अंबाडा बांधत नाहीस... ...एव्हढंच नशीब म्हणायचं.!!!"
गंमत म्हणजे ह्या अनंगरावांचं माझ्याशी फारच चांगलं जमायचं... ... ...अगदी टोंकाची मतभिन्नता असूनही... ... ...आणि ह्याचंच सौ. अस्मितावहिनीनां नवल वाटायचं.
तेव्हां त्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीं मला खासगीत म्हणाल्या," नाना... ...अनायासे आलांच आहांत तर माझं एक काम कराल?"
मी," अहो एक काय वहिनी, दहा सांगा की."
सौ. अस्मितावहिनी,"त्याचं काय आहे नाना, की अनंग ला नेहमीच तुमचं सांगणं पटतं... ... ...तेव्हां... ..."
मी," तेव्हां काय वहिनी?"
सौ. अस्मितावहिनी," तेव्हां तुम्ही इथं आहांत तोंवर ह्या अमेरिकन ’शेवरोलेट’ गाडी चं एक झक्कपैकी ’सर्व्हिसिंग’ तेव्हढं करून टाका.!!!... ... ...काय?"
मी," म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हांला वहिनी?"
सौ. अस्मितावहिनी," म्हणजे असं की, तुम्ही ’सर्व्हिसिंग’ केलंत ना, की गाडी तहहयात भारतीय रस्त्यांवर चालली पाहिजे... ... ...सध्या ती अमेरिकन रस्त्यावर उडतेय् !!!... ...आलं लक्ष्यात?"
मी," असं बघा वहिनी, त्याचा कितपत उपयोग होईल?... ... ...पटायला हवं ना ह्या हल्लीच्या पोरांना?"
सौ. अस्मितावहिनी," भावजी... ... ...वेळवखत साधून एकच चांगला जमालगोटा द्या... ...आमचं सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावरचं पाणी झालंय... ..."
मी," जमेल तेव्हढं प्रबोधन करायला माझी कांही हरकत नाही वहिनी... ... ...पण नुस्तंच ’नळी फुंकिली सोनारे’ झालं तर?... ... ...ह्या पोरांचं कांही सांगवत नाही, म्हणून म्हणतो."
सौ. अस्मितावहिनी," भावजी, आम्ही गाल दुखेतोंवर नळ्या फुंकून झाल्याय्त... ... तेव्हां तुम्ही कंचकून कान तेंव्हढे टोंचा, म्हणजे झालं.!!!"
सौ. अस्मितावहिनींचा हजरजबाबीपणा बघून मी स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!!
मी," पटण्याचं कांही सांगवत नाही वहिनी... ...पण एक आशा आहे... ... ..."
सौ. अस्मितावहिनी," कुठली आशा म्हणताय?"
मी," आमच्या सूनबाई... ... ... ह्या नव्या पिढीला तुमच्या-माझ्यापेक्षा त्या च ज्यास्त जवळच्या... ... ....
शिवाय अनंगला सौ. क्षितिचं बोलणं बर्यापैकी पटतं पण... ... तेव्हां कान टोंचायला हा ’सोनार’ च मला ज्यास्त योग्य वाटतोय्."
सौ. अस्मितावहिनी," भावजी... ...त्याचा काय उपयोग होणाराय्? क्षिति अनंगपेक्षा केवळ चारपांच वर्षांनीच मोठी आहे, आणि इंग्लंड सारख्या पाश्चात्य परदेशांत पण राहिलेली आहे... ... ... तेव्हां तिला कसं काय जमेल हे?"
मी," ती चिंताच सोडा तुम्ही वहिनी... ... ... क्षिति माझ्या तालमीत तयार झालेली आहे... ... ...परदेशात रहात असली तरीही तिला आजतागायत तरी ’परदेशी डोहाळे’ मुळीच लागलेले नाहीत. इंग्लंड मध्ये सुद्धां ती कपाळीं ठंसठंशीत कुंकू लावून वावरते... ...जे लावायची इथल्या नव्या पिढीतल्या पोरीनां लाज वाटते आजकाल."
सौ. अस्मितावहिनी," अगदी खरं आहे भावजी तुम्ही म्हणताय् ते... ... ..."
मी," अहो तरूण पोरीचं काय घेऊन बसला आहांत तुम्ही? त्यांचं बघून आतां तिशी-चाळिशीतल्या बायकाही कपाळीं कुंकू लावेनाश्या झाल्याय्त... ...परवांच साहित्य परिषदेत एका व्याख्याना साठी गेलो होतो... ...व्याख्यान होतं भारतीय जीवनपध्दती आणि संस्कृतीवर... ... ...आधुनिक गृहिणींची बरीच उपस्थिती होती व्याख्यानाला... ... ...व्याख्यान बहुतेक आवडलं असावं सगळ्यांना, पण गंमत म्हणजे श्रोत्यापैकी एकाही बाईच्या कपाळीं कुंकवाचा पत्ता नव्हता.!!!... ... ...त्या फॅशन म्हणूनही व्याख्यानाला आलेल्या असाव्यात कदाचित... ...बोला आतां"
सौ. अस्मितावहिनी," हे असंच सुरूं झालंय आतां भावजी सगळं... ... ... पोरं एकदां कां परदेशांत दाखल झाली, की त्यांचे इथले आईबाप स्वतःच परदेशांत असल्यासारखे वागायला-मिरवायला लागतात... ... ...आपल्या भारतीयत्वाची त्यांना लाज वाटायला लागत असावी बहुतेक."
मी," तसंच कांहीतरी झालं त्या व्याख्यांनात वहिनी."
सौ. अस्मितावहिनी,"म्हणजे?"
मी," अहो, व्याख्यानानंतर चहापानाचा छोटासा कार्यक्रम होता... ...श्रोते-व्याख्याते संपर्कासाठी... ...
तर त्या वेळीं, हा जो उपास्य दैवताचा टिळा मी लावतो ना कपाळावर, तो ’कश्यासाठी लावता?’ असं एका अतिचौकस आधुनिक बाईनीं सगळ्यांच्या देंखत मला विचारलं.!!"
सौ. अस्मितावहिनी," मग?... ... ...काय सांगितलंत तुम्ही?"मी," काय सांगणार?... ... ...’तुम्ही सगळ्यानी तें सोडून दिलंय् म्हणून मी लावायला सुरुवात केली’ असं सांगितलं... ...!!!"
सौ. अस्मिता वहिनी आतां खो खो हंसायला लागल्या," मग?"
मी,"बाईनां त्यातनं काय बोध झाला ते त्यांचं त्यानांच ठाऊक... ... ...पण उपस्थित पुरुषवर्गांत मात्र चांगलीच खंसखंस पिकली."
सौ. अस्मितावहिनी," बरोबर उत्तर दिलंत भावजी... ... हे असंच चाललंय आतां सगळं... ... ...मग क्षिती ची मात्रा लागूं पडेल म्हणतां?""अशी आशा तर करायला कांही हरकत नाही वहिनी", मी म्हटलं," क्षिति ला मी सांगून ठेंवतो सगळं."
सौ. अस्मितावहिनी," पण तिला हे सांगा भावजी, की एका मात्रेतच ही ’शेवरोलेट’ भारतीय रस्त्यावर सुतासारखी सरळ चालायला लागली पाहिजे. !!!... ... कळलं ना?"
मी," ठीकाय् वहिनी... ... ... नशिबानं तशी संधी उपटली, तर क्षिति करील सगळं व्यस्वस्थित... ... ...काळजी करूं नकां."
विषय तेंव्हढ्यावरच थांबला... ... ....
वाढदिवसाच्या सायंकाळी पांच वाजतां चि. अनंग उड्या मारीतच घरीं परतला... ...हातांत दोन खोकीं घेऊन.
मी आणि अतुल संध्याकाळचा चहा घेत बसलो होतो.
आल्या आल्याच अनंग खोकीं माझ्या हातांत देत म्हणाला," काका बघा तरी... ... ...माझी वाढदिवसाची खरेदी."
अन् सौ. अस्मितावहिनी ना त्यानं हाक मारली," आई...ए आई... ...अगं खायला दे कांहीतरी लवकर... आणि चहा पण दे लगेच... ... ..."
सौ. अस्मितावहिनी," हात पाय तोंड धुवून घे तोंवर आणतेच."
अनंग," आई... ...अगं घरीं येतांना वाढदिवसासाठीच्या केक ची ऑर्डर द्यायला गेलो होतो... ... ...नाताळ मुळं तिथं एव्हढी गर्दी होती ना, की जवळजवळ पाऊण तास खोळंबलो. बघ... ... जाम भूक लागलीय् आतां.
तेव्हां आधी खायला दे लौकर... ...आतां चहा वगैरे घेंऊनच बाकीचं आवरतो सगळं."
अनंग नं माझ्या पुढ्यात ठेंवलेल्या खोक्यातलं पहिलं खोकं मी उघडलं... ...त्यात ’रीबॉक्’ कंपनीचे नवेकोरे रंगीबेरंगी नाडीचे बूट होते.
दुसरं खोकं अतुल नं उघडलं... ...त्यातनं ’रॅंग्लर’ कंपनीची पांढरे डाग पाडलेली जीन ची पाटलोण बाहेर पडली.
अतुल," बाबा-काका... ... ...आवडली कां माझी खरेदी?... ... ... बरेच दिवस माझ्या मनांत ह्या वस्तूं घ्यायच्या होत्या, तेव्हां म्हटलं वाढदिवसालाच खरेदी करावी... ...म्हणून घेतल्या."मी," छानच आहे तुझी खरेदी... ...", मी बुटाच्या खोक्यावरचं किंमतीचं लेबल पहात म्हणालो... ... ... लेबलवर आकडा होता ६४९९ रुपये.!!!
अतुल," तुझी खरेदी छान आहे अनंग... ... ...पण चोखंदळ नाही.!!"
अतुल हा मुंबई विश्वविद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक... ... ...त्यामुळं त्याच्या टिप्पणीला विशेष वजन होतं.
अनंग," म्हणजे काय बाबा? अगदी लेटेस्ट फॅशनच्या वस्तूं आहेत ह्या... ...गेल्या आठवड्यातच बाजारात आल्याय्त."
अतुल," अरे पण ह्या... ...ह्या... ...जागोजागीं घांसून पांढरे डाग पाडलेल्या ह्या धडोत्याची किंमत पांच हजार तीनशे रुपये?... ...डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?"
अनंग," धडोतं काय म्हणताय् बाबा?... ...हॅ.. ...कांहीतरीच असतं तुमचं नेहमी... ..."
आतां अस्मितवहिनीनीं पण ती पाटलोण हातात घेऊन निरखून बघितली... ... ...," अनंग, ह्या पोतेर्याची किंमत तूं ५३०० रुपये मोजलीस?... ...ऑं? आणि ह्या बुटांचे किती हजार मोजलेस तूं?"
अतुल," फक्त ६४९९ रुपये ममा... ...अगं वीस टक्के डिस्काउंट होता ह्या वस्तूंवर... ... ... म्हणून लगेच घेऊन टाकल्या... ...आज शेवटचा दिवस होता ना डिस्काउंट बझार चा."
अतुल," हे बघ अनंग... ... ...तुमच्या पिढीतल्या मुलांना बर्याच गोष्टी अनाकलनीय असतात... ...आणि ज्या डोंक्यात शिरूं शकतात, त्याकडं तुम्ही पोरं साफ दुर्लक्ष करून हा... ...हा असा पैसा उधळत असतां... ...’फॅशन’ ह्या शब्दाची अर्थशास्त्रीय व्याख्या ऐकायची आहे तुला?... ...करमणूक होईल बघ तुझी."अनंग," काय आहे ’फॅशन’ ची व्याख्या? सांगा तर खरं."
अतुल," मूर्ख लोकांनी पढतमूर्ख गिर्हाइकांना महामूर्ख बनवायच्या काढलेल्या धंद्याला ’फॅशन’ म्हणतात... ...!!! "
अनंग," कांहीतरी बोलूं नकां बाबा... ... ...ब्रॅण्डेड वस्तूंच्या किंमती अश्याच असतात... ...त्यातल्या त्यात मध्यम बजेटचे बूट आणि जीन आहेत ह्या.!!"
अतुल," अनंग पहिली एक गोष्ट लक्ष्यांत घे... ...की माणसाला व्यवहारज्ञानी व्हायचं असेल, तर प्रथम अर्थशास्त्र समजावं लागतं... ... ...ह्या तुमच्या पिढीत कुणीतरी एकानं कांही नवीन केलं की बाकीचे सगळे तेच करायला लागतात... ... ... डोकीं गहाण ठेंवून... ... ...मग त्याची ’फॅशन’ होते... ...आणि ह्या ’फॅशन’ पायीं तुमच्यासारखी पोरं-पोरी एकदां कां वेडी झालीं, की ह्या ब्रॅण्डवाल्यांचा धों धों फायदा अगदी ठरलेला असतो."
अनंग ला अतुल चं म्हणणं कांही पटलेलं दिसत नव्हतं," तुमचं आपलं कांहीतरीच बाबा... ... हे च कपडे वापरतात सगळे हल्ली."
अतुल नं अस्मितावहिनींची ’शेवरोलेट’ अनायासे धुवायला घेतलेलीच होती, मग मी त्या संधीचा फायदा घ्यायचं ठंरवलं... ... ...निर्णायक काम तर सौ. क्षितिवरच सोपवलेलं होतं."
मी," अनंग, हे बघ... ... तुझ्या आई-बाबांचं बोलणं जरी तिखट असलं ना, तरी त्यात तथ्य आहे हे एक, आणि ते तुझ्या भल्याचं आहे हे दुसरं... ...कारण मला असं वाटतं की तुम्हां नौजवांनाना ’फॅशन’ करतांना प्रमाणबद्धता जिला तुम्ही ’प्रपोर्शनॅलिझम’ म्हणतां ना, तिचा सफाचट विसर पडलेला असतो."
अनंग नं आतां माझ्याकडं मोहरा वळवला," ते कसं काय नानाकाका?"
मी," असं बघ... ... ...तुमच्या सिने इण्डस्ट्रीत एखादी नटी जर प्रमाणबद्ध आकाराची नसेल, तर तिचा निभाव लागेल काय?"अनंग," निभाव कुठला आलाय काका... ... ...तिला कुणी दारांत पण उभं करत नाही."
मी," तेव्हां ’प्रमाणबद्धता’ च भल्याची असते एव्हढं तरी तुला पटतंय् ना?... ... ...मग ’फॅशन’च्या बाबतीत पण तसं च असतं... ... ...काय?"
अनंग," म्हणजे काय काका?"
मी," आतां असं बघ... ... ...हे जवळपास साडेसहाहजाराचे बूट वापरायला तुझ्या अंगावर साधारण पंचवीस तीस हजारांचा तरी सूट असायला हवा...मनगटावर लाखभर रुपयांचं ओमेगा-रोलेक्स् चं ब्रॅण्डेड घड्याळ पण हवं... ... आणि हे अंगावर घालून फिरायला तीस चाळीस लाखांची मर्सिडीझ गाडीही हवी... ... ...हे सगळं असेल, तरच हे ’रीबॉक’ चे साडेसहाहजारांचे बूट ’प्रमाणबद्ध’ दिसतील आणि शोंभतीलही तुला... ... ...खरं की नाही? अरे ’पादत्राणाची किंमत आपल्या जीवनशैली-संस्कृतीनुसार किती असावी याला कांही प्रमाण आहे की नाही?’, असं तुझे बाबा तुला विचारताय्त... ... ...कळलं?
तुझा हिरमोड करायचा नाही मला... ... ...बूट छानच आहेत तुझे, पण सारासार विवेकबुद्धी गहाण पडली की काय होतं ते तुला दाखवून देतोय् इतकंच."
चि. अनंग च्या कपाळाला विचारात पडल्यामुळं आंठ्या पडल्या खर्या, पण माझ्या विधानाचा तो प्रतिवाद पण करूं शकत नव्हता... ... ...
सौ. अस्मितावहिनींच्या चेंहर्यावर नकळत स्मिताची लकेर मात्र उमटली. !!
खाणंपिणं आटोपलं... ... ...मी संध्याकाळची रपेट उरकून घरीं आलो, अन् सायंकाळच्या अंघोळीला गेलो.
अंघोळ उरकून कपडे चंढवून बाहेर आलो, तर चि. अनंग आणि सौ. क्षिति च्या चहासोबत गप्पा रंगलेल्या होत्या.
सौ. क्षिति इंग्लंड मध्ये वास्तव्यास असल्यामुळं चि. अनंग तिला नाना प्रश्न विचारीत होता.
अनंग," क्षितिताई, तूं इंग्लण्ड मध्ये हा असाच पोषाख वापरतेस नेहमी?... ...म्हणजे सलवार खमीस अथवा साडीत वावरतेस?"
सौ. क्षिति," हो... ... ...त्यात काय विशेष?"
अनंग," आयला... ... म्हणजे... ... पुलओव्हर-जीन्स, किंवा टाइट स्कर्ट-टॉप असलं कांही वापरत नाहीस?... ...कमालच आहे तुझी."
सौ. क्षिति,"नाही बुवा... ...मला भारतीय पोषाखच आवडतात... ...इतकी तर्हेतर्हेची मनमोहक कापडं आणि डिझाईन्स जीन्स् आणि पुलओव्हरमध्ये कशी काय मिळणार?
अरे इंग्लण्ड मध्ये कितीतरी बायका अगदी उत्साहानं ह्या अस्सल भारतीय कपड्यांची चंवकशी करतात माझ्याजवळ !!... ...माहीताय् तुला?"
अनंग आतां अधिकच विचारात पडला," आणि हे कुंकू?... ... ...हे पण लावतेस तूं इंग्लण्डमध्ये?"
सौ. क्षिति," लावते?... ... म्हणजे काय?... ...अगदी अभिमानानं लावते म्हण... ... ...बायकांचा आद्य सौभाग्यालंकार आहे तो आपल्यासाठी... ...काय?"
चि. अनंग ची उत्सुकता आतां चांगलीच चाळवली,"धन्य आहेस तूं तायडे... ... आणि तुला तिथं हे असं वावरतांना ’ऑड’ नाही वाटत?"
सौ. क्षिति," तुला आश्चर्य वाटेल अनंग, पण माझा अनुभव असा आहे की आपल्या भारतीय पेहेरावात तिकडं वावरायची, इथून तिकडं गेलेल्या आपल्या भारतीय लोकांनांच ज्यास्त लाज वाटते. !! तिकडच्या परदेशी लोकांना ह्या आपल्या विविधतेनं नटलेल्या रूढी-संस्कृती-पेहेरावांचं विलक्षण आकर्षण असतं... ...अरे आमच्याच शेजारीपाजारी राहणार्या डझनभर तरी परदेशी बायकां माझ्याकडं साडी नेसायला शिकून गेलेल्या आहेत.!!! आणि ह्या कुंकवाबद्दलही - ज्याला ते ’इंडियन रेड स्पॉट’ म्हणून संबोधतात - मला नाना प्रश्न विचारत असतात त्या... .... ...त्यातल्या एक विदुषी तर ’ सिग्निफिकन्स ऑफ द रेड स्पॉट इन हिन्दु कल्चर ऍण्ड ओरिएण्टल मायथॉलॉजी’ ह्या विषयावर चक्क पी एच्. डी. करताय्त सध्या... ... ...ह्या कुंकवाबद्दल मला ज्ञात असलेली यच्चयावत माहिती माझ्या खनपटीला बसून मला विचारून गेल्याय्त त्या.!!! ....... ...आहेस कुठं तूं?
एका वाक्यात सांगायचं तर ’ दुनिया गोल है... ...और अपने लोग गोलमाल है.’ !!!"
चि. अनंगरावांनी आतां स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
इतक्यात दरवाज्याची घंटी खंणखंणली... ... ...
सौ. क्षिति नं चटकन् उठून दरवाजा उघडला, तर ऑर्डर पोंचवायला आलेला केकवाला दारात उभा होता.
क्षिति नं त्याच्याकडून केकचं खोकं घेंतलं, आणि आंत आली, तसा अनंग केकवाल्याचं बिल द्यायला गेला... ... ...
आणि केकवाल्याच्या हातावर त्यानं मोजून ४८६० रुपये ठेंवले. !!!
ते बघून सौ. क्षितिनं च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ... ...!!!!
तिनं ते केक चं खोकं सावकाशपणे दिवाणखान्यातल्या चहाच्या मेजावर ठेंवलं, आणि अनंगनं पाठोपाठ येऊन ते हंळूंच उघडलं.
आतला निरनिराळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी मिश्रणांनी मढवलेला देखणा चॉकोलेट केक बघायला माझ्यासकट सगळेच मेजाभोंवती गोळा झाले... ... ...
आणि त्या क्षणींच सौ. अस्मितावहिनीनां गेली कांही वर्षं छळणारी चिंता कायमची मिटली.!!
अनंग सौ. क्षितिकडं वळत म्हणाला," छान आहे ना केक ताई?"
सौ. क्षिति," केक तर मस्तच आहे अनू... ... ...पण केक ह्या पदार्थाबद्दल मला एक गम्मत तुला सांगायची आहे... ... ..."
अनंग," कसली गम्मत गं ताई?... ... ...सांग की आत्तांच."
सौ. क्षिति," आत्तां नको अनू... ...हा केक कापून खाल्ला ना, की मग सांगते तुला... ... ... काय? नाहीतर म्हणशील ’उगीच डोस पाजतेय्’ म्हणून... ...
पण आयुष्यभर तुझ्या लक्ष्यात राहील इतकी विनोदी गम्मत आहे बघ ती."
झालं... ... ...सायंकाळीं अनंग चे पंचवीसतीस मित्रमैत्रिणी घरीं गोळा झाले... ...
गम्मत म्हणजे चि. अनंगराव आपला जामानिमा आंवरून चक्क सलवार कुडता घालून अस्सल भारतीय वेषांत सगळ्या अभीष्टचिंतकांना सामोरे गेले... ... ...!!
अनंग नं टेंचात नवश्रीमंती प्रथेनुसार मेणबत्त्या फुंकून केक कापला... ...
सगळ्यांचं कोरसमध्ये ’हॅपी बर्थ डे टू यू’ गाऊन झालं... ...
एकजात सगळ्यानीं केक ची तोंडभर वाखाणणी करीत त्याचा फडशा पाडला... ...
सौ. अस्मितावहिनीनी बनवलेल्या चहाफराळावर यथेच्छ ताव मारला... ... ...
चि. अनंग ला ’मेनी हॅपी रिटर्न्स् ऑफ द डे’ म्हणत शुभेच्छा देऊन पाहुणे आपापल्या घरीं पांगले... ...
आणि चि. अनंग चा बावीसावा ’बड्डे’ एकदाचा यथासांग साजरा झाला.
फक्त सौ. क्षिति च्या थाळीत तिनं केकचा शेवटचा एकच तुकडा मात्र न खातां तसाच शिल्लक ठेंवला होता.
अनंग नं तिला विचारलंच,"क्षितिताई... ...अगं केक नाही खाल्लास तू?... ...कमालच आहे तुझी."सौ. क्षिति," खाल्ला नाही असं कसं होईल रे?... ...खाल्ला की... ... फक्त पुरता संपवला नाही इतकंच."
अनंग," मग संपवून टाक की गं... ...हा एकच तुकडा कश्याला शिल्लक ठेंवलाय्स असा?... ... ...आवडला नाही की काय तुला?"
सौ. क्षिति," अनू... ...अरे केक तर एकदम खास होता."
अनंग," अगं असणारच... ... ...’फ्लेव्हर ऑफ इटली’ मधनं मागवला होता तो... ... ...केकसाठी आख्ख्या मुंबईभर प्रसिद्ध आहे ते दुकान."
सौ. क्षिति," अरे तुला ती मघाचची केक ची गम्मत सांगायची होती ना? म्हणून ठेंवलाय् तो शिल्लक... ... ...गम्मत सांगून झाली ना, की आपण दोघं मिळून तो खायचा... ... कसं?"
अनंग," एकदम छान आयडिया... ... ...मग आतां सांग बघूं तुझी ती केकची गम्मत."
सौ. अस्मितावहिनींच्या ’शेवरोलेट’ च्या ’सर्व्हिसिंग’ ची घटिका भरल्याचं आम्हांला उमगलं, अन् आम्ही तिघेही कान टंवकारून ऐकायला लागलो... ... ...
सौ. क्षितिबाईनां माझी तालीम कितपत पंचलेली आहे, ह्याची एक प्रकारची सोदाहरण परीक्षाच होती ती.
सौ. क्षिति," गम्मत अशी आहे अनू, की मघांशी तुझे बाबा जे कांही तुला सांगत होते ना, त्या बूट आणि जीन बद्दल... ... ...ते अक्षरशः सत्य आहे... ...
मी परदेशात अनेक ब्रॅण्डेड वस्तूंच्या दुकानांत ब्रॅण्डच्या नावाखाली चालणारी बेसुमार लूटमार प्रत्यक्ष पाहिलेली आहे... ... ...
होतं एव्हढंच, की खरेदी करणार्याच्या ती लक्ष्यांतही येत नाही... ... ...म्हणूनच तर त्याची जमा शेंवटी पढतमूर्खात होत असते... ... ...
म्हणजे बेदम पैसा मोजून शेंवटी पदरांत निव्वळ मूर्खपणा... ... ...हेंच ब्रॅण्डेड वस्तूंच्या वेडाचं फलित असतं... ... ...काय?"अनंग चा चेंहरा आतां मात्र गोंधळांत पडल्यासारखा चिंताक्रांत झाला... ... ...
कारण जवळपास त्याच्याच वयोगटांत बसणारी एक मुलगीच हे बोलत होती... ... ती देखील परदेशात राहणारी. !!!
" म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला ताई?... ...ब्रॅण्डेड वस्तूं चांगल्या नसतात?", अनंग उवाच.
सौ. क्षिति," तसं कुठं म्हटलं मी? सामान्यपणे बाजारात उपलब्ध असलेल्या तश्याच वस्तूंच्या तुलनेत त्यांचा दर्जा थोडाफार सरस असेलही... ... ...
पण त्यासाठी हे उत्पादक ज्या बेदम किंमती वसूल करतात ना, त्या मात्र निश्चितपणे समर्थनीय नसतात... ...निव्वळ ग्राहकांच्या ब्रॅण्ड वेडाच्या किंमती असतात त्या.
आतां ह्या केकचीच गोष्ट बघ... ... ...ह्याचे तूं ४८६० रुपये मोजलेस... ... बरोबर?... ... ...ही किंमत अवास्तव किंवा भरमसाठ वाटत नाही तुला?"
अनंग," नाही बुवा... ... ...ह्या प्रकारच्या केक च्या किंमती साधारण चार सहा हजारांच्या घरांतच आहेत सगळीकडं."
सौ. क्षिति," हे जे तुझं ’न वाटणं’ आहे ना? हे च ह्या ब्रॅण्डवाल्यांचं भांडवल असतं... ...मला एक सांग, खाद्यपदार्थांत सर्वात पौष्टिक समजला जातो तो सुकामेवा... ....बरोबर?"
अनंग," अगदी बरोबर... बदाम पिस्ते काजू वगैरे सगळ्यात महाग पण असतात."
सौ. क्षिति," काय भाव असतात ह्या सुक्या मेव्याचे?"
अनंग," काजू सगळ्यात स्वस्त... ... ते साधारण सहाशे रुपये किलो असतील बघ... ...आणि बदाम पिस्ते वगैरे अंदाजे आठशे साडेआठशे रुपये किलो."
सौ. क्षिति," आतां हा जो केकचा तुकडा आहे ना, ह्याचं वजन करून बघ बरं जरा किती आहे ते?"
अनंग ला आतां त्या गम्मतीत रस वाटायला लागला.
त्यानं स्वयंपाकघरांतल्या छोट्या वजनकांट्यावर त्या केकच्या तुकड्याचं वजन करून आणलं," साडे आठ ग्राम आहे ताई."
सौ. क्षिति," आतां असं बघ तुझे तीसएक मित्रमैत्रिणी आले होते वाढदिवसाला... ... बरोबर?"
अनंग," बरोबर ताई... ...एकतीसजण होते... ... सोसायटीतली मुलं धंरून."
सौ. क्षिति," आणि आपण पांचजण म्णजे एकूण छत्तीस झाले. आणि प्रत्येकाला एकेक तुकडा म्हणजे ह्या केकचे एकूण छत्तीस तुकडे झाले... ...होय ही नाही?"
अनंग," बरोबर आहे तुझं गं.. ... ... पण हा सगळा हिशेब करून करायचं काय ?"
सौ. क्षिति," तेंच सांगते... ... आतां छत्तीस तुकड्यांचे ४८६० रुपये म्हणजे प्रत्येक तुकडा केंव्हढ्याला पडला ते बघ बरं तुझ्या मोबाईलवर गणित करून?"
चि. अनंग नं मोबाईलवर गणित केलं आणि म्हणाला," एकशे पस्तीस रुपयांना एक तुकडा."
सौ. क्षिति," आतां मोबाईलवरच गणित करून बघ... ...१३५ भागिले ०.००८५... ... काय उत्तर येतंय् तुझं?"
चि. अनंग," १५८८२.३५"
सौ. क्षिति नं मग निर्णायक धोबीपछाड मारली," याचा सरळ अर्थ असा होतो अनू, की हा केक तूं जवळपास सोळा हजार रुपये किलो भावानं खरेदी केलास...!!!! काय?"
चि. अनंग चे डोळे आतां विस्फारायला लागले... ... अन् डोकंही गंरगंरायला लागलं," आयला.!!!... ...तायडे... ...सोळा हज्जार रुपये किलो?... ... ही तर चक्क लूटमार आहे. !!!!"
सौ. क्षिति,"हे सगळं असंच असतं अनू... ...तुझे बाबा आणि नानाकाका तरी दुसरं काय सांगत होते तुला?आतां मला असं सांग अनू... ... ...बदाम-पिस्त्याच्या वीसपट भावानं विकत घेऊन खावा, इतकं पौष्टिक असं ह्या केकमध्ये काय घातलंय् ते सांगूं शकशील मला?"
चि. अनंग आतां डोळे फांडफाडून सौ. क्षिति कडं बघत स्वतःच्या कपाळावर थडाथडा हात मारायला लागला," आयला...सोळा हज्जार रुपये किलो?... ...ईडियट!! ... ...आउटराईट् ईडियट !!!"
सौ. क्षिति नं हंसून अनंगकडं बघितलं," आतां ह्या च पद्धतीनं ह्या ’रीबॉक’ बुटांचं आणि ह्या ’रॅंग्लर’ जीन्स चं गणितही तुझं तूंच मांडून बघ काय उत्तरं येतात ते !!!... ... काय?"
अन् मी नजरेनंच क्षिति ची पांठ कडकडून थोंपटली... ... ...
आणि ह्या तिशीतल्या पोरीनं माझ्याकडून मिळालेल्या तुटपुंज्या शिदोरीवर काय कमावलंय् ते बघून थक्क होत मी पण स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
सुटी संपल्यानंतर आठवडाभरानं सौ. क्षिति पण इंग्लण्ड ला परत गेली... ... ...
आणि नवव्या दिवशी सौ. अस्मितावहिनींचा मला आणि क्षिति ला एकाचवेंळीं मोबाईलवर एस. एम. एस. आला... ... ...
’ आमची ’शेवरोलेट’ आतां भारतीय रस्त्यांवर सुतासारखी सरळ धांवते आहे... ...मनःपूर्वक धन्यवाद. !!!!!’
***************************************************************************************
-- रविशंकर.
३१ ऑक्टोबर २०१४.
No comments:
Post a Comment