Search This Blog

Saturday, 20 September 2014

॥ स्वावलंबन ॥

॥ स्वावलंबन ॥




"शुभ प्रभात अप्प्या... ...काय वाहनाची सेवा चालली आहे की काय?" मी हातातल्या रुमालानं घामेजलेला चेहरा-मान टिपत अप्पा दांडेकराला हाळी दिली.

२०१० सालातला हिवाळा नुकताच सुरूं झालेला होता, आणि गुलाबी थंडीची चाहूल लागलेली होती. सकाळी सातआठ किलोमीटर द्रुतगतीत चालणं हा माझा आवडता व्यायाम. 
तसा मी कांही व्यायामपटूंप्रमाणं भल्या पहांटे पांच साडेपांचला वगैरे उठून फंटफंटायच्या आंतच नित्यनियमानं बाहेर पडणार्‍या वीरांपैकी नाही. 
आतां सेवानिवृत्ति झालेली असल्यानं पहिल्यासारखी सकाळी साडेसातची बस गांठायची धांवण्याची स्पर्धा रोज रोज करण्याचं कांही कारण पण उरलेलं नाही. त्यामुळं मी आपला निवांतपणे सात साडेसात वाजतां उठून चहापाणी आंवरून आंठ वाजतां आरामात बाहेर पडतो. सातआठ किलोमीटरचं अंतर द्रुतगतीत कांपायला मला साधारण पाउण तास बस्स होतो.  
माझ्या फिरण्याचा रस्ता नेमका ह्या अप्पा दांडेकराच्या बंगल्यासमोरूनच जातो. त्यामुळं अंगणांत कांही ना कांही उद्योगांत मग्न असलेल्या अप्पाची हटकून गांठ पडतेच.
हा अप्पा दांडेकर म्हणजे माझा एस. पी. महाविद्यालयातला वसतिगृहशेंजारी. मी शास्त्र शाखेत प्रथम वर्ष बी.एस्सी. ला शिकत असतांना हा अप्पा तृतीय वर्ष कलाशाखेत शिकत होता. त्याचं खरं नांव हर्षवर्धन नीलकण्ठ दांडेकर, पण आख्खं महाविद्यालय त्याला अप्पा दांडॆकर म्हणूनच ओंळखायचं. कलाशाखेत शिकत असला, तरी खरं तर हा अप्पा अभियांत्रिकीलाच जायला हवा होता... ... हाडाचा कल्पक असल्यानं तो नाना उचापती करायचा. 
एकोणीसशे सत्तर च्या दशकांत रेडिओ चा ही परवाना पैसे भरून काढावा लागे. आणि अप्पाला तर विविधभारती ऐकायचं विलक्षण वेड. त्यानं मग कुठूनतरी डायोड्‌स्‌, स्पीकर्स्‌ इत्यादी साहित्य जमा करून एक उघडावागडा ट्रान्झिस्टर रेडिओ बनवून स्वतःच्या खोलीत बसवलेला होता, आणि सार्‍या वसतिगृहवाल्यांची रेडिओ ऐकायची फुकट सोय करून ठेंवलेली होती. !!
स्पीकरचा आवाज मोठा यावा म्हणून त्यानं मेजावर ते साडगं मांडून स्पीकर उताणा ठेंवलेला होता, नी त्यावर पिण्याच्या पाण्याचा एक पेला मेसमधनं आणून उपडा घातलेला होता. !!!
गंमत म्हणजे अप्पाच्या त्या रेडिओवर विविधभारती, सिलोन इ. स्टेशनं अगदी खणखणीत वाजायची. बहुतेक दर बुधवारी बिनाका गीतमाला ऐकायला आख्खं होस्टेल संध्याकाळी ह्या अप्पाच्या खोलीत गोळा व्हायचंच.
अफाट कल्पकता, चिवटपणा, आणि उचापती स्वभाव असणारा हा अप्पा तोंडानं मात्र एकदम फंटकळ आणि सडेतोड होता. ’मा ब्रूयात्‌ सत्यमप्रियम्‌’ हे अप्पाच्या खिजगणतीतही नसावं.
बी. ए.झाल्यावर हा अप्पा मिलिटरीमध्ये इन्फंट्रीत भरती झाला, चीन, पाकिस्तान, आणि बांगलादेशच्या युद्धांत आघाड्यांवर लढला, आणि आतां ब्रिगेडिअरच्या हुद्यावर सैनिकी हडेलहप्पीतनं सेवानिवृत्त होऊन निवांत रहात होता. 
ह्या अप्पानं आमच्याच महाविद्यालयांत शिकणार्‍या हेमलता ऊर्फ हेमा लिमये ह्या त्यावेळच्या ब्युटीक्वीन ला पटवलेलं होतं, अन्‌ यथावकाश तिच्याबरोबर संसारही थाटलेला होता. ह्या आमच्या आजच्या हेमावहिनी. गंमत म्हणजे अप्पाशी सूत जुळल्यानंतर सगळं महाविद्यालय या हेमाला ’अप्पी’ म्हणून संबोधायला लागलं, आणि अप्पा दांडेकरानं कपाळाला हात लावला. !!! 
"बोल नाना",... ... अप्पा नं नळ बंद करून हातातला पाण्याचा पाईप बाजूल ठेंवत म्हटलं," काय सकाळी सकाळी दुसरं कुणी गिर्‍हाईक सापडलं नाही काय रे तुला?"
"तसं नव्हे रे अप्पा... ...", मी टांग मारत म्हटलं," आपलं सहजच विचारलं... ... ’बापूं’ नंतर तुझाच नंबर लागतो ना स्वावलंबनांत?... ...म्हणून."
"असं होय?", अप्पा नं तोंफ डागली, "त्याचं काय आहे नाना... ...बायकोची सेवा करकरून थंकलो, म्हणून आतां गाड्यांची सेवा सुरूं केली. !!... ... अरे बापूं ना तरी माझ्याशिवाय दुसरं कुणी भेंटलं काय दीक्षा द्यायला?... ...ऑं?... ...आणि तुझं विचारणं तरी इतकं ’सहज’ कधीपासून झालं रे साल्या? नानी ला काय काय डॅंबीसपणा करून पटवलीस ते माहीताय्‌ मला !!... ...काय?"
"अरे हळूं बोल अप्प्या... ...अप्पी चा उगीच  कांहीतरी गैरसमज व्हायचा... ...", मी चड्डी सांवरत म्हणालो.
" कांही फरक पडत नाही... ...तिला माझ्या दसपट तुमची अंडीपिल्ली माहीत आहेत... ...!!!... ...चल चल... ... आंत चल आधी चहा घ्यायला. ", अप्पा नं मला चितपट मारत माझी बखोटी धंरून मला ओंढतच घरांत नेलं.

हॉलमध्ये भल्या सकाळचा थोडासा अस्ताव्यस्त पसारा अजून आंवरायचा बाकी पडलेला दिसत होता. चहाच्या मेजावर ताजं वर्तमानपत्र पडलेलं होतं. आंत स्वयंपाकघरांत अप्पी ची कांहीबाही लगबग सुरूं असावी......कारण भांड्यांचे किणकिणाट कानांवर येत होते, पण मधल्या भिंतीतल्या चौकोनी बळजावर पडदा असल्यामुळं आंतलं कांही दिसत नव्हतं.

"हं बोल नाना... ...चहा घेणार की कॉफी?... ...म्हणजे आत्तां ’ह्या’ वेळी ’गरमागरम’ कांही विचारतां येत नाही ना... ... म्हणून म्हटलं... ...हीः...हीः...हीः", अप्पा नं त्याच्या खास मिलिटरी खाक्यांत मला विचारलं.
मी उत्तरलो," आत्तां ह्या वेळीं कॉफी?... ...नको अप्प्या... ...चहाच चालेल." 
अप्पा तरातरा मधल्या स्वयंपाकघराच्या भिंतीतल्या पडदा ओंढलेल्या बळजाकडं गेला... ... ...
आणि पडदा किंचित किलकिला करीत त्यानं तडाखेबंद आरोळी ठोंकली... ... ...,
" दोन पेश्श s s s s s s ल...!!!"
अप्पाची समयसूचकता बघून मी च फिसफिसत कपाळाला हात लावला...!!!!
झा s s s s s s  लं... ...अप्पाचा ’पेश्शल’ राहिला बाजूलाच, दस्तुरखुद्द हेमावहिनी च एका हातांत लाटणं आणि दुसर्‍या हातात उलथनं अश्या महिषासुरमर्दिनी च्या अवतारांत फणफणत बाहेर आल्या, आणि अप्पा-अप्पी ची जुगलबंदी रंगली... ...!!!
अप्पी," का s s s s s य?... ... ...काय म्हणालांत?"
अप्पा," कांही नाही गं ... ... चहा टाक म्हणालो...!!... ... नाना आलाय्‌ ना?... ...म्हणून."
अप्पी," ही पद्धत होय तुमची ’चहा टांक’ म्हणायची? ... ... ... ’ दोन पेश्श s s s s s s ल...!!! ’... आणखी काय भजी-मिसळपाव वगैरे नको काय... ... ...चहा आधी... ...काय?"
मी मध्ये पडत म्हटलं," जाऊं दे गं अप्पे... ... तूं लक्ष्य देऊं नकोस... ... अप्पाचा कळांकाढूं स्वभाव माहीत आहे ना तुला?"
सौ. हेमावहिनी तंणतंणल्या," कळां तर मस्तच काढतां येतात तुझ्या मित्राला नाना... ... पण निस्तरतां येतात काय?... ...ऑं?"
मग अप्प्याकडं त्यांची 'मुल्क-ई-मैदान' फिरली," ’पेश्शल’ हवेत ना तुम्हांला?... ...ते ’अण्णा’ च्या टपरीवर मिळतात... ... कोपर्‍यावरच्या... ... ...!! ... माझ्या स्वयंपाकघरांत नाही...!!!... ...आतां नाना ला सोंबत घेंऊन जा ’अण्णा’ कडं, आणि मिस्सळपाव-भजीपाव-गरम वडे... ...काय हवं ते हादडून या... ... ... वर ’दोन पेश्श s s s s s ल’ पण ढोंसा...!!!!... ... ... समजलं?"
इतकं कडाडून दणादण पाय आपटत अप्पीवहिनी स्वयंपाकघरांत चालत्या झाल्या, आणि खुद्द अप्पा नं च कपाळाला हांत लावला.!!!
,"चल रे बाबा नाना... ... आतां ’अण्णा’ च आपला वाली.!!!!"

अप्पा पटकन्‌ लेंगा-सदरा चंढवून तयार झाला, आणि आमची दुक्कल कोंपर्‍यावरच्या अण्णा च्या टपरीकडं निघाली... ...माझ्या दांडीयात्रेचे तीन तेरा कधीच वाजलेले होते.

अण्णा च्या टपरीच्या आसमंतात मिसळ-भज्यां चा घमघमाट दरवळत होता... ... आमच्या तोंडांना तर पाणी च सुटलं.
टपरीतल्या एका बाकड्यावर बसत मी म्हटलं," अरे काय हे अप्पा... ...साठी उलटली तरी कळां काढायची तुझी खोड कांही गेली नाही अजून... ..."
अप्पा नं आधी दोन मिसळ पाव आणि दोन चहा ची ऑर्डर अण्णा ला दिली... ...
आणि अण्णा त्याच्या ठेवणीतल्या खर्ज्यातल्या आवाजात गरजला,
" दोन मिस्सळपा s s s s s व तर्री मारून... ... आनि दोन पेश्श s s s s s s ल. !!!!"
मी अप्पा ला दाद देत खो खो हंसायला लागलो, आणि अप्पा नं तोंड उघडलं," त्याचं काय आहे नाना... ... ... "
मी," त्याचं कांहीही नाही अप्पा... ...समजलं?... ... ... तुला अप्पी च्या कळा काढायची खोड आहे इतकंच... ... इतक्या भल्या सकाळी तिला उचकवून काय मिळालं रे तुला?" 
अप्पा डोंळे मिचकावत म्हणाला," तुला माहीत आहे नाना, की हेमा ला मी टपर्‍यावरचं कांहीही खाल्लेलं आवडत नाही... ...आणि आज अण्णाच्या मिसळीच्या तर्री चा घमघमाट तर अगदी घरापर्यंत दंरवळला होता बघ... ...म्हणून... ...दुसरं काय? !! "
मी," धन्य आहे अप्प्या तुझी... ...बरं ते राहूं दे. तुझं स्वावलंबन कसं काय चाललंय?"
अप्पा चटकदार मिसळीचा पहिला तोंबरा भरत म्हणाला," अगदी जोरात चाललंय नाना. तुला ठाऊक आहे काय की हल्ली चप्पल शिवण्यापासून ते फर्निचर दुरुस्त्यापर्यंत सगळी कामं मी स्वतःच करतो.!!"
मी," म्हणजे काय अप्पा? आणि हे असं कश्यासाठी?"
अप्पा," काय झालंय नाना, की आय. टी. क्षेत्रातल्या बिनडोक गोट्यांनी त्यांना मिळणारा बिनलायकीचा पैसा गेल्या पांचसात वर्षांपासून बेदम उडवायला सुरुवात केली... ... ...बरोबर?
आतां झालंय काय, की बाकी सगळ्यानां ह्या पैश्याचा बरोबर वास लागलाय्‌... ... आणि भाजीवाल्यापासून ते परीट, धोबी, सुतार, चर्मकार, शिंपी, केशकर्तनकार, अश्या तमाम सगळ्या बारा बलुतेदारांनी आपापल्या सेवा-मालाचे भाव भरमसाठ वाढवून ठेंवलेत... ... ... बरं ह्या बलुतेदारांची अवस्था पण आय. टी.  वाल्यांसारखीच... ... ...येत कांहीच नाही... ... अंगांत कलाकौशल्य पण सुतराम नाही... ... पैसा मात्र वीस पंचवीसपट ओंढायला बघताय्‌त... ...आतां मला सांग, आपल्या बाबतीत कसं काय जमणार हे त्यांचं गणित? तेव्हां हल्ली सगळी कामं माझी मी च करतो."
मी," आणि ही सगळी कामं जमतात तुला अप्पा?"
अप्पा," च्यायला उपजतांच कुणा लेकाच्याला जमलीत सांग नाना?... ...अरे धंडाकून घ्यायचं हातात करायला... ... एखाददुसर्‍यावेळी चुकतं पण... ... म्हणून काय झालं?  चिकाटी सोडली नाही तर संवयीनं आपल्यालासुद्धां ही सगळी कामं जमतातच ... ...अगदी नक्की... ... अरे हे बलुतेदार तरी काय करतात दुसरं... ...ऑं?
आणि आपण स्वतःच कामं केली ना, तर वेंळ पण सत्कारणी लागतो, त्या कामातलं ज्ञान-कसब ही प्राप्त होतं... ...कामं तर उत्कृष्ठ होतातच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढिगानं पैसा मोजून वर आणखी ह्या बलुतेदारांची बाजीरावकी पण मुळीच सांभाळावी लागत नाही !!... ... ...काय?... ...
तुला खरं सांगतो नाना... ...तूं चेष्टा करतोस नेहमी, पण आपल्यासारख्या गरीब देशातल्या माणसांच्या भल्याचं काय आहे, ते फक्त एकट्या बापूंना च नेमकं समजलेलं होतं बघ... ... स्वावलंबन !!!... ... ...काय?
आतां गेल्या आठवड्यातलीच गोष्ट घे... ... रंगारी बोलावला होता घराचं रंगकाम करायला.... ... ... तर पांच खोल्या रंगवून द्यायचे लेकाच्यानं पंचाहत्तर हजार रुपये सांगितले...!!! म्हटलं गेलास उडत... ... ...कालच रंगकामाचं सगळं सामान आणून ठेंवलं घरांत... ... ...फक्त बारा हजारांत... ... ... समजलास?"
मी चाट पडत म्हटलं," आणि आतां घर पण तूं स्वतःच रंगवणार अप्पा?"
अप्पा," नाहीतर काय?... ... ...अरे एक फाटका शर्ट आणि पाटलोण पण बाजूला कांढून ठेंवलीय रंगकाम करतांना घालायला !!!... ... ...आहेस कुठं?"
अप्पा ची जिगर बघून मी कपाळाला हात लावत म्हटलं," मग त्या रंगार्‍याचं काय झालं पुढं?"
अप्पा," दुसरं काय होणार? दिला हांकलून... ... ... दोनतीन वेळा चकरा मारून हेमा जवळ चौकशी करून गेला... ... आणि डाळ कांही शिजत नाही असं दिसल्यावर शेंवटी तीस हजारांत करायलाही तयार झाला होता. !!! "
मी," अरे मग हो म्हणून टाकायचं अन्‌ मोकळं व्हायचं अप्पा... ... कश्याला इतक्या उचापती करत बसतोस आतां?"
अप्पा," मग काय करूं? आतां हा तीस हजारांत काम करायला तयार झालेला बाजीराव काय दिवे लावणाराय्‌? घर रंगवण्याऐवजी तो ते सारवून ठेंवणार !!... ...ते पण उपकार केल्यासारखं... ... काय ? तेव्हां दिला घालवून त्याला... ... आतां जमतील तश्या एकेक खोल्या हातांत घेत रंगवून टाकणार घर... ... ... लागेल महिनाभर... ... पण मला कुठं घाई आहे?
तेव्हां कायमचं लक्ष्यांत ठेंव नाना... ... ... स्वावलंबन झिंदाबाद.!!!!... ... ... काय?"
मी चहा घेत म्हटलं," खरंय्‌ तुझं अप्पा... ... ...पांच खोल्या रंगवायचे पंच्याहत्तर हजार म्हणजे तोंड फांटेस्तंवर मागणं झालं."
अप्पा," झालंय्‌ असं नाना, की दोन हजार सालानंतर ह्या आय. टी. वाल्यांना लायकीपेक्षा दामदुप्पट पगार मिळायला लागले. साहजिकच त्यांच्या खिश्यात अतिरिक्त पैसा खुळखुळायला लागला, आणि अमेरिकेची उठतांबसतां री ओंढणार्‍या ह्या लोकांनी तो बेदम उडवायला सुरुवात केली... ... सुरुवातीची एकदोन वर्षं हे चाललं... ...यथावकाश हळूंहळूं हा बेदमपणा बाकी सगळ्यांच्या लक्ष्यात यायला लागला... ... ...मग सगळेच शहाणे झाले, आणि आतां तर अगदी शिंप्यापासून ते चहाच्या टपरीवाल्या अण्णापर्यंत सगळ्यानीच आपापल्या सेवा-मालाचे भाव बेदम वीस पंचवीसपट वाढवलेत... ... ...मला सांग नाना...", समोरच्या कटिंग चहाच्या नैवेद्याच्या पेल्याकडं बोंट दाखवत अप्पा म्हणाला," ह्या चार चमचे चहाची रास्त किंमत किती असायला हवी?... ... ...दहा रुपये?... ... मग रंगार्‍यानं पांच खोल्या रंगवायचे पंचाहत्तर हजार सांगितले, तर आश्चर्य काय त्यात?... ... तर असं सगळं गोलमाल झालेलं आहे बघ... ... माल दमडीका... ...और दाम चमडीका...!!! ... ...कळलं?" 
मी," खरंय्‌ तुझं अप्पा, ... ह्या आयं टी. वाल्यानीं बेदमपणा करून सगळ्यांचीच पंचाईत करून ठेंवलेली आहे... ... हे मात्र खरंय्‌."
अप्पा," सगळ्यांची काय नाना? अरे आतां हे सगळं त्यांच्याही अंगलट यायला लागलेलं आहे बघ... ...दर आठवड्याला बाजारभाव वाढताय्‌त... ... ...पण ह्यांचे पगार कुठं वाढताय्‌त? आणि पंचाईत अशी झालीय्‌ की संवयी तर सगळ्या बेदम लागलेल्या... ... ...त्यांचं काय करायचं हा यक्षप्रश्न आतां ह्या आय. टी. वाल्यांच्या समोर उभा आहे... ... ह्यांचा नाष्टा मॅक्‌ डी. शिवाय होत नाही...जेवण पिझ्झा-बर्गर खेंरीज गोड लागत नाही... ...कपडे रॅंग्लर नाहीतर पेपे जीन्स्‌ अथवा पीटर इंग्लंड च्या दुकानांखेरीज ह्यांना चालत नाहीत... ... ...जाऊं दे हे सगळं पुराण आतां ... ... न संपणारं आहे ते... ... ... चल निघायचं?"
अण्णाचं बिल देऊन मी आणि अप्पा परत निघालो. अप्पाच्या घराच्या अलिकडच्या कोंपर्‍यावर आम्ही पोंचलो, आणि अप्पा ला कसलीतरी आंठवण झाली. 
अप्पा म्हणाला," नाना, तूं हो पुढं ... मी जरा एक काम उरकून मग घरीं जातो... ... अच्छा."
मी," काय झालं रे अप्पा?... ... काय उपटलं आतां?"
अप्पा," अरे कांही नाही... ... केंस कापायचे राहून गेलेत बरेच दिवस... ... समोरच लक्ष्मण पैलवानाचं केशकर्तनालय आहे... ... तिथं भेंट देऊन मगच घरी जातो आतां."
"बराय्‌ मग अप्पा... ... चलतो मी... ... ...", म्हणून निरोप घेतां घेतां मी अप्पाला टांग मारली," अप्पा... ... अरे ’ह्या’ बाबतीत तुझ्या स्वावलंबनाचं काय रे?" 
आं वांसून कपाळाला हात लावत अप्पानं ’रीजंट हेअर कटिंग सलून’ कडं नेणारा रस्ता पकडला... ... ...!!!

पुढं दोनतीन दिवस कांही अप्पा दांडेकराचं सकाळच्या रपेटीत दर्शन झालं नाही.... ...मलाच शेंवटी चैन पडेना. 

तेव्हां चौथ्या दिवशी सकाळी मी अप्पा च्या बंगल्यापर्यंत चालत गेलो, आणि पुढची रपेट रद्द करून अप्पाच्या घराच्या घंटीचं बटण दाबलं... ...
दोनचार मिनिटांनी अप्पानं च दरवाजा उघडला... ... ...
बघतो तर काय, अप्पानं चक्क डोंक्याभोंवती रुमाल गुंडाळलेला होता... ... सरदारजी च्या फेट्यासारखा.!!
मी चंमकलोच... ... ...कुठं धंडपडला बिडपडला की काय हा अप्पा?
म्हटलं," काय झालं रे अप्प्या... ...ऑं?... ... ...   आजारी  बिजारी पडलाय्‌स की काय तूं?... ... तीनचार दिवस कुठं दिसला नाहीस तो?"
तेंव्हढ्यात खीः खीः खीः करत अप्पी स्वयंपाकघरातनं बाहेर आली... ...म्हणाली," त्या दिवशीच्या ’दोन पेश्श s s s s s ल’ चं बक्षिस दिलंय्‌ देवानं नाना !!... ... ... कळलं?"
मी बांवचळलो," म्हणजे गं हेमा?"
सौ. हेमावहिनी," अरे त्या दिवशी माझी कळ कांढून अण्णा कडं पळालात नां तुम्ही दोघे... मिसळीवर तांव मारायला?... ...त्याचा हा प्रसाद. !!!"
मी म्हटलं," मी नाही समजलो हेमा... ... अखेर झालं काय अप्पा? हेमानं काय लाटणं बिटणं घातलं की काय तुझ्या टाळक्यांत?"
अप्पा नं कांही न बोलता डोक्याला बांधलेलं फडकं सोडलं... ... ...
अन्‌ मी आं वांसून बघतच बसलो... ... ...आणि खदांखदां हंसायला पण लागलो... ... ...
कुणीतरी नवशिक्या श्मश्रूकारानं अक्षरशः उंदरानं केंस कुरतडल्यागत अप्पा ची हजामत करून ठेंवलेली होती.... !!!
आणि अप्पा आतां त्या नव कलाकारावर यथेच्छ तोंडसुख घेंत गरजला," बघितलंस नाना, त्या भोसडीच्या नं माझ्या टाळक्याचं काय करून ठेंवलंय्‌ ते? 
तरी मला लक्ष्मण दुकानांत दिसला नाही तेव्हां जरा शंका आलीच होती... ... ... तो आपला जुना कलाकार ना? पण दुकानातलं पोरगं म्हणालं ’दादा गावाला गेलेत... ... पंधरवड्यानंतर येतील. !!!... ...मग काय करणार? बसलो केशकर्तनाला... ... तर त्या कुठल्यातरी स्पा मध्ये शिकलेल्या धेडगुजरी बेण्यानं हे असं करून ठेवलंय्‌ बघ... ... आतां केंस वाढेपर्यंत कुठं बाहेरही पडतां येत नाही मला... ... " इतकं बोलून अप्पा नं मग त्या नवशिक्याच्या छप्पन्न पिढ्यांचा यथेच्छ उद्धार करायला सुरुवात केली... ... ...
आणि अप्पी खीः खीः खीः खीः करत फिसफिसत म्हणाली," कळां काढतां येतात ना नुस्त्या? आतां बघूं दे मला ही कळ कशी निस्तरताय्‌ ते... ...हीः हीः हीः हीः हीः ... ...!!!" 
विषय तिथंच थांबला, आणि अप्पा चं यथाशक्ति सांत्वन करून मी उर्वरित रपेटीला बाहेर पडलो... ... ...

तीनचार दिवस असेच उलटले... ... आणि रविवारी आमच्या सौ. इंदिराजी नां बरीच वाणीसामानाची खरेदी करायची होती म्हणून सकाळीच ’डी मार्ट’ मध्ये घेऊन गेलो.

खरेदी आटोपून बिलाच्या काउंटरवरच्या रांगेत नंबर लावून उभे राहिलो, आणि सौ. इंदिराजी अचानक चीत्कारल्या," अहो ते बघा... ... त्या... त्या पलीकडच्या रांगेत अप्पा आणि हेमा पण उभे आहेत... ... चला चला...तिकडंच जाऊं या... ...आपसुक गप्पा पण होतील... ... नाहीतरी हेमी मला भेंटलेलीच नाही बर्‍याच दिवसांत... ...चला."
आम्ही तीनचार रांगा ओलांडून पलीकडं गेलो... ... ...
बघतो तर काय, सौ. हेमावहिनी सामानानं भरलेली ट्रॉली धंरून पुढं उभ्या, आणि पाठीमागं अप्पा... ... ...
अप्पाच्या डोंक्याचा रुमाल तर गायब होताच, पण श्मश्रूक्रिया पण अगदी बघत रहावी अशी रेंखीव केलेली... ... ...!! केंस फक्त जरासे ज्यास्त बारीक झालेले दिसत होते इतकंच... ...
वर आणखी अप्पा नं कलप-बिलप लावून झोंकात वळणदार देखणा भांगही पाडलेला होता. !!!
मी उडालोच," काय अप्पा... ... ...आज अगदी ’ढाके की मलमल’ केलीय्‌... ...काय ’लक्ष्मणभेंट’ झाली की काय... ... ...ऑं?"
अप्पा," कसली लक्ष्मणभेंट आलीय्‌ नाना?... ... तो कालपर्यंत गायबच होता. !! "
मला कांहीच कळेना... ...," मग रे?... ... ही...ही कलाकारी कुठं जाऊन केलीस मग? "
अप्पा ऍटमबॉंब फोडत म्हणाला," कुठं जाणार?... ... तूं च मार्ग दाखवलास... ...!! "
मी उडालोच,"मी मार्ग दाखवला?... ...म्हणजे? "
अप्पा," नाना... ... त्या दिवशी टा टा करतांना तूं म्हणाला नव्हतास,  ’ह्या’ बाबतीत तुझ्या स्वावलंबनाचं काय?’  म्हणून? "
मी," ॑॑॑ *** !!!! ???? ...!!! "
अप्पा," त्या गझनीकट्‌ वाल्या बेण्यानं टाळक्याचं असं भदं केलेलं होतं की बाहेरच पडतां येत नव्हतं बघ घराच्या... ...
मग विचार केला की काय व्हायचं ते भदं तर झालेलंच आहे, मग स्वतःच प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?... ...काय? !!!"
सौ, इंदिराजी नी आतां कपाळाला हात लावला," म्हणजे रे अप्पा?... ...स्वतःच स्वतःची चंपी केलीस?... ... धन्य आहे तुझी... ... !!"
अप्पा," मग काय करणार?... ... ... केली. !!!"
मी," ते कसं शक्य आहे रे अप्पा... ...ऑं? अरे आरश्यांत बघून हे... ...हे... ... असलं काम स्वतःचं स्वतःच कसं काय केलंस बाबा?"
अप्पा," नाना... ..., अरे त्यांत काय एव्हढं मोठं? सलून मध्ये समोरासमोर आरसे लावलेले असतात ना? तसे घरांत लावले, आणि मस्तपैकी स्वतःच स्वतःची हजामत करून मोकळा झालो.!!!!... ... ... फक्त कान-मानेवरची कड हवीतशी रेंखीव कापायला मात्र जमेना आरश्यांत बघून... ... उजवी-डावी बाजू उलटसुलट दिसते ना आरश्यांत?"
मी बोलती बंद होत अप्पाला विचारलं," मग काय केलंस तूं? "
" ’काय केलंस?’... ... म्हणजे काय?", अप्पा नं निर्णायक धोबीपछाड मारली," ह्या हेमी च्या हातात दिली कात्री...! आणि म्हटलं काप आतां... ... ...!!
माझा लोच्या झाल्यावर खीः खीः खीः खीः करतांना त्या दिवशी मजा वाटत होती ना? !!!... ... ... मी नेहमी सांगतो ना तुला नाना?... ... ...तमाम भारतीयांच्या भल्याचं काय आहे तें एकट्या बापूं नां च नीट समजलेलं होतं बघ !!... स्वावलंबन झिंदाबाद. !!! ... ... समजलं?
आणि आज सकाळी लक्ष्मण पण भेंटला दुकानांत... ...त्यालाही सांगून आलो... ... ... "
मी कपाळाला हात लावत विचारलं," काय सांगून आलास तूं लक्ष्मणला आतां ? "
," लक्ष्मण ला सांगून आलो की ’तुझ्या त्या ’गझनी’ ला बिनपाण्यानं भादरायचा असेल तेव्हां माझ्याकडंच पांठव’!!!! ... ......काय? "
असं म्हणून अप्पा विजयी मुद्रेनं आमच्याकडं बघायला लागला... ... ...
आणि अप्पा च्या अप्पी नं भर ’डी मार्ट’ मध्ये स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!!

********************************************************************************


-- रविशंकर.

२१ सप्टेंबर २०१४. 

No comments:

Post a Comment