Search This Blog

Sunday, 7 September 2014

॥ धेडगुजरी ॥

॥ धेडगुजरी ॥




"घ्या भावजी...तोंड गोड करा... ... ... सुमे तूं आधी घे गं पेढे", असं म्हणत सौ. रश्मिवहिनीनी पेढ्यांचं खोकं आम्हां दोघांसमोर धंरलं.
१९८३ सालातल्या जून महिन्यातली एक निवांत संध्याकाळ... ...
मी आणि सौ. इंदिराजी (सौ. इंदिराजी म्हणजे कोण ते तुम्हांला आतां विशद करून सांगायला नकोच म्हणा...) माझा शाळामित्र रमेश कानेटकर च्या घरीं आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या समारंभाचं आमंत्रण द्यायला गेलो होतो. सायंकाळच्या उपाहारासाठी सौ. रश्मिवहिनीनीं त्यांचा हातखंडा पदार्थ म्हणजे कांदेपोहे करून पोटांना तंडस लागेतोंवर सगळ्यांना खायला घातलेले होते... ... त्यानंतर कडक चहापण झालेला होता... ... आणि आम्ही आमंत्रण आंवरून निघायचा विचार करीत असतांना त्यांनी हे पेढ्यांचं खोकं समोर आणलेलं होतं... ... ...
अगदी गडद केशरी रंगाचे ते गरगरीत खमंग धारवाडी पेढे बघून परत एकदां रसना चांळवली, आणि मी एकदम दोन पेढ्यांचा तोंबरा भरत सौ. रश्मिवहिनीनां आपोआपच बंगाली थाटात विचारता झालो," कॉय वॉहिनी... ... कोश्यॉचे पेढे हे?... ... कॉय बॉतमी नवीन...ऑं?"
"कांही नाही रे नाना... ... ह्या रशूचा एक हट्ट पुरा झाला म्हणून... ... ... ", रम्या पण पेढा तोंडात टांकत म्हणाला."
सौ. इंदिराजी,"काय म्हणताय्‌त गं भावजी रश्मि?... ... काय चारचाकी बिकी घेंतलीत की काय नवीन?"
"छे छे छे वहिनी... अहो चारचाकीची काय पत्रास लागून गेलीय्‌ असला हट्ट होता तो... ...गेली दोनएक वर्षं माझा अगदी जीव खाल्लान्‌ ह्या तुमच्या मैत्रिणीनं त्यासाठी.!!", रम्या जरा करवादतच बोलला.
सौ. रश्मिवहिनी रम्या वर डोळे वटारत सौ. ना म्हणाल्या,"तूं ह्यां च्या कुजकट टोमण्याकडं मुळीच लक्ष देऊं नको बरं सुमे... ...अगं ऋषि ला 'सेंट व्हिन्सेंट इंग्लिश मीडियम स्कूल' मध्ये ऍडमिशन मिळाली ना ह्या वर्षीं... ...त्याचे हे पेढे."
रम्या मध्येच पंचकला,"थोडक्यात म्हणजे असं नाना, की 'बाळ ऋषि' चा बाप्तिस्मा करून 'बाळ फिरंगी' करून ठेंवायचा हा सगळा उद्योग आहे...!!!... ... कळलं आतां?"
झा.......लं... ...सौ. रश्मिवहिनी आतां उसळल्या,"काय म्हणायचं काय आहे तुम्हांला? इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये घातला ऋषिला, तर काय त्याचा फिरंगी होणार आहे काय हो लगेच... ...ऑं?... ... इतके ढिगानी पालक आपली पोरं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये घालतात, ती सगळी काय फिरंगी होतात की काय म्हणते मी?" 
रम्या शांतपणे म्हणाला," हे बघ रश्मि, त्याला शास्त्रशाखेलाच घालायचाय्‌ ना तुला? अगं मग त्यासाठी आपल्याकडच्या आपटे, गरवारे इ. सारख्या प्रशालांतही इंग्रजी माध्यमाची उत्तम सोय आहे की... ... ... मग हे तुझं सेंट व्हिन्सेंट चं खूळ कश्याला हंवंय?"
सौ. रश्मिवहिनी," चांगलं इंग्रजी शिकायचं तर कॉन्व्हेंट स्कूलच योग्य... ...हो  की नाही गं सुमे?"
सौ. कांही बोलायच्या आंतच रम्या तांवातांवानं म्हणाला,"छान... ...म्हणजे त्याच्या इंग्रजीचं काय व्हायचं ते तर होईलच, शिवाय त्याच्या मराठीची पण ह्या सेंट व्हिन्सेंट मध्ये जाऊन पुरती वाट लागेल... ... ...त्याचं काय?"
सौ. इंदिराजीनीं आतां हस्तक्षेप केला," म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हांला रमेशभावजी?"
रम्या," हे बघा नाना-वहिनी, रश्मिला कांहीही कळत नाही भाषाशास्त्रातलं... ...ती रसायनशास्त्राची पदवीधर आहे. तुम्हांला माहीत आहे काय, की ह्या कॉन्व्हेंट शाळांतल्या फिरंगी शिक्षकांचं मौखिक इंग्रजी छाप पाडणारं असेलही कदाचित, पण त्यांची इंग्रजीची जाण किती व्याकरणशुद्ध असते ही मोठी शंकाच आहे... ...आणि मराठी ही तर त्यांची मातृभाषा मुळात नव्हेच. तेव्हां मराठीच्या बाबतीत सगळाच आनंद असणार तिथं... ...तात्पर्य असल्या कॉन्व्हेंट शाळेत शिकून ह्या ऋषि चं इंग्रजीही उत्तम होणं दुरापास्त, आणि मराठीचंही सफाचट भदं होणार हे मला स्वच्छ दिसतंय... ...थोडक्यात आमचा ऋषि भाषेच्या बाबतीत धेडगुजरी होणार आहे बघ... ...निव्वळ धोबी का कुत्ता... ...ना घरका ना घाटका...!!!... ...समजलं?"
सौ. रश्मिवहिनी रम्याच्या तोंडापुढं हांत ओंवाळत म्हणाल्या ऍ...हॅ हॅ हॅ हॅ... ...म्हणे ना घरका ना घाटका... ...कसं काय बिघडेल हो त्याचं मराठी... ...ऑं? घरांत शुद्ध मराठीच बोलतो ना आपण?...शिवाय त्याचं मराठी वाण शाबूत ठेंवायला तुम्ही जातिवंत मराठी चे प्रोफेसर आहांतच की घरांत...!! ... ...त्याचे बाप !!!... ...काय?"
सौ. रश्मिवहिनींचं म्हणणं एका अर्थीं खरंच होतं... ... ...
हा माझा हा मित्र रमेश कानेटकर म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयांतला मराठीचा विख्यात प्राध्यापक. एम. ए. ला सुवर्णपदक पटकावलेला हा गडी मराठीचा नुस्ता प्रचंड व्यासंगी नव्हे, तर जाज्वल्य अभिमानी पण होता. अखिल संत आणि पंडितकवींच्या समृद्ध अलंकारिक वाड्‌.मयावर श्रोत्यांनी ऐकत रहावं इतक्या अधिकारवाणीनं रसाळ बोलणारा... ...तेव्हां त्याचा त्रागा पण स्वाभाविकच होता.
रम्या,"... ... ... ... ...!!"
सौ. रश्मिवहिनी," हे बघा, आपल्याला त्याला पुढं इंजिनीयर, एम्‌. बी. ए. वगैरे करायचाय... ...आणि तें शिक्षण फक्त इंग्रजीतनंच दिलं जातं... ... कळलं?!!... म्हणून तर मी काय काय उपद्व्याप करून त्याला ह्या शाळेत कसाबसा प्रवेश मिळवलाय्‌... ...त्याचं कौतुक करणं राहिलं बाजूलाच... ... ...उलट वर ही मुक्ताफळं. !!!... ...मला सांगा... ... ..."
रम्या," काय सांगूं तुला आतां... ...तुला कांहीच पटत नाही तर?"
सौ. रश्मिवहिनी,"तुम्हांला काय वाटतं... ...मराठीतनं त्याला सगळं विज्ञान शिकवतां येईल?... ... ...मला सांगा, 'सोडियम हायड्रॉक्साईड' ला मराठीत काय म्हणतात?"
रम्या थोडा विचारात पडला... ...मग म्हणाला,"तिक्तांशु उदराजेय...!"
सौ. रश्मिवहिनी व इंदिराजी एकदम किंचाळल्या," का.......य?... ... ...काय म्हणालात?"
रम्या थंडपणे म्हणाला,"'सोडियम हायड्रॉक्साईड' ला मराठीत 'तिक्तांशु उदराजेय' म्हणता येईल. !!"
दोघी मैत्रिणीनीं आं वांसत आपापल्या कपाळांना हात लावले. !!!
सौ. रश्मिवहिनीनी मग रम्याला निर्णायक भाषेत गुंडाळला,"ह्या... ...ह्या...असल्या भाषेत शास्त्रं शिकण्यापेक्षां त्याचं मराठी बिघडलं तरी मला चालेल...!!!... ...समजलांत?"
बिचार्‍या रम्याची आतां दोन्ही बाजूंनी पंचाईत झाली... ...कांही क्षण तो गप्पच होता...मग त्यानं निर्वाणीचा इशारा दिला,"ठीकाय्‌...ठीकाय्‌... ... ...आतां घातलाय्‌स ना त्याला फिरंग्यांच्या शाळेत... ...येत्या पांचएक वर्षांत तुम्ही सगळेच बघाल त्याचा कसा अस्खलित धेडगुजरी फिरंगी होतोय्‌ ते."
सौ. रश्मिवहिनीनी मग वादाला अखेरचा टोला लगावला,"होऊं दे अगदी खुश्शाल... ...आणि जर कां तसं खरोखर झालंच, तर तो तुमचाच नाकर्तेपणा ठरेल.!!! ... ...काय म्हणतेय्‌ मी?"
रम्याची बत्तिशी भविष्यकाळांत अक्षरशः खरी ठंरणार होती, हे विधिलिखित मात्र आमच्यापैकी कुणालाच त्या वेळीं तरी माहीत नव्हतं.!!!
अखेर सौ. रश्मिवहिनींच्या हट्टाखातर 'बाळ ऋषि' सेंट व्हिन्सेंट मध्ये दाखल झाले... ...
हळूं हळूं 'ट्विंकल्‌ ट्विंकल्‌', 'जॉनी जॉनी येस्‌ पप्पा' असली बालगीतं तोंडपाठ म्हणायला लागले... ...
रम्या ला 'डॅड्‌' आणि सौ. रश्मिवहिनी नां 'मम्‌' म्हणायला शिकले... ...     
'ईसॉप्स्‌ टेल्स्‌' मन लावून वाचायला लागले... ... ...त्यांना 'पंचतंत्र', 'अकबर-बिरबल', 'तेनालीरामन' असल्या गोष्टीत रस वाटेना.
आणि यथावकाश 'नाच रे मोरा', 'असावा सुंदर चॉकलेट चा बंगला' असली फालतू गाणी ते विसरून गेले... ...!!
सौ. रश्मिवहिनी 'बाळ ऋषि' च्या प्रगतीवर खूष होत्या... ...आणि रम्या ची चिंता 'पुनः पुनः प्रवर्धन्ते' ह्या नियमानुसार चक्रवाढ व्याजाच्या गतीत वाढायला लागली... ...!!
त्याचा पहिला मासला मी च एकदां ऋषि ला शाळेतनं परत आणायला गेलो होतो, तेव्हां याचि देहीं याचि डोळां मला बघायला मिळाला.
कोणीतरी एक 'ग्रोव्हर' नामे बाई वर्गांतल्या समस्त 'ऋषि-मुनि' नां पंचतंत्रातली धोब्याच्या गाढव आणि कुत्र्याची गोष्ट सांगत होत्या... ... ...
," आनि मंग ते गाडो ते कूतडेला मनाले, की तुमी बुंक...!!!"
माझे कान धन्य धन्य झाले, आणि मी रम्याची कणव करत कपाळाला हात लावला... !!!!
पुढं सहावी नंतर माध्यमिक शिक्षण सुरूं झालं, आणि 'बाळ ऋषि' मायभूमीचा इतिहास, भूगोल,संस्कृती,समाजप्रथा,धार्मिक सणवार, वगैरे आंग्ल भाषेतनं शिकून तयार व्हायला लागले. एक दिवस आम्ही दोघे सहजच सौं. चं सौ. रश्मिवहिनी कडे कांहीतरी काम निघालं म्हणून रम्याच्या घरीं गेलो होतो.
आम्ही चौघे दिवाणखान्यांत बोलत बसलेलो होतो, आणि 'बाळ ऋषि' चं 'स्टडी रूम' मध्ये 'होमवर्क' चाललेलं होतं... ... ...
अचानक बाळ ऋषि हातांत समाजशास्त्राचं पुस्तक घेऊन बाहेर आले... ... ...
ऋषि," मम्‌... ... व्हॉट डज्‌ 'वारणा सिस्टिम ऑफ आर्यन्स' मीन गं? !!"
सौ. रश्मिवहिनी," अहो... ह्याला काय अडलंय ते बघा जरा... ... ...मी चहा करून आणते."
रम्या," काय हवंय तुला ऋषि?"
ऋषि,"डॅड्‌... ...व्हॉट इस मेन्ट्‌ बाय 'द वारणा सिस्टिम ऑफ आर्यन्स्‌'?"
रम्या,"वारणा सिस्टिम?... ...गाढवा, असली कांही सिस्टिम मी ऐकलेली नाही... ...वारणा नांवाची नदी आहे पश्चिम महाराष्ट्रात... ...आणि वारणानगर नांवाचं शहर पण आहे. शिवाय वारणा नांवाचं दूध आणि श्रीखंड पण बाजारात मिळतं... ...समजलं?"
ऋषि,"इम्पॉसिबल्‌ डॅड्‌... ...आमच्या मॅडम नी 'वारणा सिस्टिम ऑफ आर्यन्स्' वर आम्हांला होमवर्क म्हणून एक 'फुल पेज एसे' लिहायला सांगितलेला आहे... ...अहो ती... ... ...ती आर्यन सिव्हिलायझेशन्‌ मधली सोशल स्ट्रॅटिफिकेशन सिस्टिम होती ना हो... ... ...ती म्हणतोय मी. !!"
रम्या कपाळाला हात लावत उचकला,"महामूर्ख लेकाचे... ...बाळा, त्या समाजव्यवस्थेला 'वारणा सिस्टिम' नव्हे, 'आर्यांची चातुर्वर्ण्य समाजरचना' असं तुझ्या मातृभाषेत म्हणतात !!... ...जिचा गंधही तुला उरलेला नाही !!!... ... ... समजलं?"
सौ. रश्मिवहिनी," अहो इतकं चिडायला काय झालं तुम्हांला? त्याला जसं शाळेत शिकवलंय्‌ तश्या भाषेत सांगा की समजावून... ... ..."
रम्या,"छा.........न... ...बहोत खूब... ...म्हणजे शाळेतल्या फिरंग्या नीं त्याचं भदं केलेलंच आहे, आतां त्याचं पुरतं वाटोळं करायला तरी सांगूं नकां मला... ... ...
सांगत होतो तुम्हांला परोपरीनं समजावून ह्या शाळेत प्रवेश घेऊं नकां म्हणून... ... ...पण पटायला हवं ना तुम्हांला?... ... ...
आतां ह्या... ...ह्या असल्या धेडगुजरी भाषेत तुम्हीच शंका निरसन करत बसा त्याचं... ... ...मला मुळीच नाही जमणार... ...!!!... ...समजलात?"
सौ. रश्मिवहिनीनी,"ऋषि... ...अंघोळ उरकून घे आधी, मग बघूं तुझी शंका काय आहे ती... ... ..."असं म्हणत ओंशाळवाण्या चेंहर्‍यानं वेळ मारून नेली, आणि रम्या आमच्याकडं वळत म्हणाला," बघितलंत नाना-वहिनी... ...ह्या च्या मातृभाषेचं काय भदं झालंय्‌ ते... ... ...हीच चिंता जाळत होती मला. आतां झालंय काय, की ऋषि ला इंग्रजी फक्त चकापक बोलतां येतं इतकंच, पण त्याला व्याकरणशुद्ध निर्दोष इंग्रजीत चार ओळीसुद्धां धड लिहितां येत नाहीत. !! आणि ते फाड्‌फाड्‌ फाडूं इंग्रजी त्याच्या डोक्यात इतकं पक्कं रुजलेलं आहे की ते सरळ करणं हे खुद्द तर्खडकर जरी पुन्हां पृथ्वीवर अवतरले तरी त्यांच्याही कुवतीबाहेरचं आहे.!!... ... ...थोडक्यात ह्या कॉन्व्हेंट स्कूल च्या हव्यासापायीं ऋषि चा अस्खलित 'धोबी का कुत्ता' झालेला आहे बघ...ना घरका ना घाटका.!!!... ...मी हेंच म्हणत होतो ना पांचएक वर्षांपूर्वी?"
विषय तिथंच थांबला... ... ...
यथावकाश ऋषि बारावीनंतर शास्त्र शाखेला गेला... ...उत्तम गुण मिळवून पुढं स्वार्हतेवर अभियांत्रिकीला ही त्याला प्रवेश मिळाला... ...इतकंच नव्हे तर बी. ई. [ संगणक अभियांत्रिकी ]  च्या शेंवटच्या परीक्षेत विद्यापीठांत तो दुसरा आला... ...पुढं पदव्युत्तर पदवीसाठी अमेरिकेत फिलाडेल्फिया ला गेला... ...तिथं पण उज्ज्वल यश मिळवून तो बिल गेट्‌स च्या जगप्रसिद्ध 'मायक्रोसॉफ्ट्‌ कॉर्पोरेशन' मध्ये सेवेत रुजूं झाला... ... ...
आणि सौ. रश्मिवहिनीनां आभाळ ठेंगणं झालं... ... ...त्यांनी उराशी जपलेलं स्वप्न पुरं झालं होतं.!!
गेले चारएक महिने रम्या-रश्मि आणि आम्ही दोघे चि. ऋषिसाठी मुली बघत होतो... ...त्याला पसंत पडण्यासारख्या दोनचार मुलीही निवडून ठेंवलेल्या होत्या... ... ...
आणि आज चि. ऋषि अमेरिकेहून महिनाभराची सुट्टी काढून वधूपसंतीसाठी पुण्याला घरीं परत यायचा होता, म्हणून सौ. रश्मीवहिनीनी आम्हांला दुपारी जेवायलाच घरीं बोलावलेलं होतं. अकरावाजतां चहा वगैरे घेऊन आम्ही दिवाणखान्यात गप्पा मारीत बसलेलो होतो... ... ...
सौ. रश्मिवहिनींचा चेहरा आनंदानं नुस्ता फुलून आलेला होता... ... ...लेक येणार म्हणून...
पण रम्या जरासा चिंताग्रस्त आणि गंभीरच दिसत होता..................
उगीच नस्त्या चौकश्या करून कुठलीतरी खपली निघायला नको, म्हणून आम्ही अवांतर गप्पा च चालूं ठेंवलेल्या होत्या.
दुपारचा दीड वाजला.
खाली फाटकासमोर एक टॅक्सी भोंगा वाजवत थांबली, आणि खास अमेरिकन थाटाच्या बर्म्युडाजीन्स्‌-पुलओव्हर चंढवलेला, डोंळ्याला गडद काळा चष्मा लावलेला, केस विस्कटलेला असा ओंळखूं न येणारा ऋषि भल्यामोठ्या पेट्या टॅक्सीतनं कांढून सांवरत खाली उतरला... ... ...
सौ. रश्मिवहिनी अन्‌ रम्या सामानसुमान घ्यायला लगबगीनं खाली धांवले... ... ...
आणि पांचएक मिनिटांत ऋषि ची स्वारी स्वगृहीं त्यांच्या पांठोपांठ दाखल झाली... ... ...
"हाय नानाकाका... ...हॅलो सुमाकाकी... ...हाऊ आर यू बोथ? असं अस्सल परदेशी बनावटीचं आगतस्वागत करीत चि. ऋषिराज स्थानापन्न झाले.
"ऋष्या... ...हातपाय धुवून घे पटकन्‌... ...पावणेदोन वाजताय्‌त, तेव्हां जेंवायलाच बसून घेऊं या... ...मी वाढते लगेच हं... ... ...",असं म्हणत सौ. रश्मिवहिनी स्वयंपाकघराकडं पळाल्या, आणि क्षेमकुशल वगैरे चौकशी झाल्यावर मग रम्यानं च चिंताविषयाला तोंड फोडलं,"ऋष्या... ...अरे गेल्या रविवारीच येणार होतास ना तूं?... ...मग?"
ऋषि," होय बाबा... ...सगळी तयारी झालेली होती...अगदी विमानाची तिकिटं पण काढलेली होती... ... ...पण एक अडचण उपटली ऐनवेळी, म्हणून मग एक आठवडाभर जर्नी पोस्टपोन करावा लागला... ..."
रम्या," अरे मग एखादं पत्र तरी पांठवायचंस... ... ...तुझी आई किती हिरमुसली... ... ...माहीताय्‌ तुला?"
ऋषि," आय नो...आय नो बाबा... ... ...पत्रही लिहायला घेंतलं होतं... ...पण...काय झालं की... ..."
रम्या," काय झालं काय असं पत्रही न पांठवायला?"
ऋषि,"बाबा...पत्र तुम्हांला लिहायचं म्हणून मी मराठीत लिहायला घेतलं... ..."
रम्या सुखावला... ... ...,"अरे वा वा वा... ...मग माशी कुठं शिंकली?"
ऋषि,"त्याचं काय झालं बाबा... की पत्र लिहून पण झालं... ... ...पण शेंवटी 'कळावे लोभ असावा ही विनंति' असं लिहितात ना?... ... ...तेंच जमेना...म्हणून शेंवटी लिहिलेलं पत्र टेअर करून टाकलं बघा."
रम्या," अरे काय झालं तुला न जमायला?... ... ...ऑं?"
चि. ऋषिनं उत्तरादाखल ऍटमबॉंब चा स्फोट घडवला," बाबा... ... ...'ळ' कसं काढायचं तें च विसरलो...!!!... ... ...दोनचारवेळां कांहीतरी गुंतडा झाला बघा, पण कांही केल्या पॉसिबल च होईना... ... मग शेंवटी पत्रच कॅन्सल केलं आणि... ... देन आय जस्ट कॉल्ड यू. !!!!"
रम्यानं जेवायला बसायला हांक मारायला बाहेर आलेल्या सौ. रश्मिवहिनींकडं अर्थपूर्ण नजरेनं बघितलं... ... ...
आम्ही दोघे बोलती बंद होऊन चि. ऋषिकडं बघतच बसलो... ... ...!!
आणि सौ. रश्मिवहिनीनींच डोळे पांढरे करत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
जेवणंखाणं उरकलीं. सगळे आंचवून बाहेरच्या खोलीत गप्पा मारायला विसावले, आणि दूरध्वनिची घण्टा खंणाणली... ... ...
रम्यानं फोन उचलला," नमस्कार... ...रमेश कानेटकर बोलतोय्‌... ...हो हो... ... आलाय्‌ की... ...आत्तां तासाभरापूर्वीच पोंचला बघ घरीं... ... ...एक मिनिट हं देतो..."
इतकं बोलून रम्या चि. ऋषि ला फोन देत म्हणाला,"अरे अजय चा फोन आहे... ... ...घे."
चि. ऋषि नं फोन उचलला, आणि आम्ही चौघे शांत बसलो," हॅलो... ...हाय अज्या... ...हौ डी यार...
अरे सॉरी सॉरी यार... ... ...एक्सट्रीमली सॉरी... ...गेल्या रविवारीच येणार होतो... ... ...पण फ्लाइट्‌ च्या प्रीव्हीयस्‌ नाइट ला काय मजा झाली बघ... ... ...
अरे ते चितळे काका तुला माहीत आहेत ना, आपल्या पक्या चितळे चे काका रे... ...हां हां... ते च... ...ते आमच्या शेंजारच्याच अपार्टमेंटमध्ये राहतात... ... ...
ते ना... ... फ्लाइट च्या आदल्याच नाइटला वारले... ... ...!!!!!"
रम्या-रश्मि दांपत्याचे चेहरे आतां खरोखरीच फोटो काढण्यालायक झाले... ... ...!!!!
आणि बिल्‌ गेट्स च्या जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट्‌ मध्ये संगणक तज्ञ म्हणून खोंर्‍यानं पैसा ओंढणार्‍या ऋषि चं ते भयानक मातृभाषादारिद्र्य बघून आम्ही दोघांनीच मग श्वास अडकून आपापल्या कपाळांना हात लावले. !!!!!

********************************************************************************

-- रविशंकर.
७ सप्टेंबर २०१४.

No comments:

Post a Comment