Search This Blog

Saturday, 23 August 2014

॥ वल्ली तिलवल्ली ॥

॥ वल्ली तिलवल्ली ॥





"गुड मॉर्निंग तोटेसाहे sss ब...!! आहांत काय वो घरीं?" अशी सकाळी दाराबाहेरून खणखणीत आवाजात हांक ऐकू आली, आणि दुसर्‍या क्षणीं दोन्ही हातांतला प्रवासी सामानाचा बाडबिस्तरा सांवरीत तिलवल्ली काका सपत्निक घरांत प्रवेश करते झाले.
नुस्ते काका-काकी च नव्हेत, तर काकींच्या कडेवर त्यांचा दीड वर्षाचा गोंडस गुटगुटीत नातू अनुराग पण होता.
" या या गुण्डाप्पा... ... .. अलभ्य लाभच म्हणायचा आज... ... या...या...या... बसा... बसा वहिनी... ... ", सासर्‍यांचा चेहरा लंगोटियार भेंटल्यानं नुस्ता फुलून आला," आज इकडं कशी काय फिरकली जोडी?"
"अरे बाळ... ते..ते.. तपासायचं काम निघालं ना... ... पेपर म्हणतो मी... ... ...म्हणून आलो... ...चार दिवसासाठी बगा", तिलवल्ली काका त्यांच्या खास कानडी हेल असलेल्या मराठीत म्हणाले.
आम्ही उठून काकां - काकी नां नमस्कार केला... ... तोंपावेतो सासूबाई स्वयंपाकघरातनं बाहेर आल्या. 

१९८२ सालातल्या हिवाळ्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती. 
मी आणि सौ. इंदिराजी (आमच्या सौ. चं नांव सौ. सुमीता...सौ. इंदिराजी हे मी अनुभवांती त्यांना बहाल केलेलं चपखल टोपणनांव !!) आमच्या कामानिमित्त कॅंपमधल्या माझ्या 'व्होग टेलर्स' या शिंप्याकडं दिवाळीसाठीच्या नवीन कपड्यांची मापं देऊन, सौ. इंदिराजींच्या साड्याबिड्या, फटाके , इ. खरेदी आटोपून घरीं परततांना, वाटेत सौ. इंदिराजीं च्या माहेरी भेंट द्यायला गेलो होतो.
सासूबाई सौ. रमाबाई नीं समोर चौपाईवर माण्डलेल्या भरगच्च नाष्ट्यावर आडवा हात मारत माझ्या सासर्‍यांच्या बरोबर गप्पा रंगलेल्या होत्या... ... ...
स्वयंपाकघरांत सौ. इंदिराजीं चा सासूबाईच्या बरोबर गप्पा छाटत आईला नवीन खरेदी दाखवण्याचा कार्यक्रम रंगलेला होता.
माझे सासरे श्री. तोटे आणि आलेले पाहुणे श्री. तिलवल्ली काका हे दोघे लंगोटियार वर्गमित्र तर होतेच आणि विद्युत्‌ अभियांत्रिकी शाखेतले निष्णात ज्येष्ठ  प्राध्यापक पण होते.
सासरे आमच्याच पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवायचे, तर हे तिलवल्ली सर मुंबईच्या हिराचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवायचे.
दोघेही मुंबईला 'व्ही. जे. टी. आय.' ला एकत्र शिकायला होते आणि वसतिगृहांत तर एकाच खोलीत रहात  होते. पुढं पदव्युत्तर पदवीसाठी पण दोघे बरोबर इंग्लंड ला गेले आणि बरोबरच परत आले. अशी एकत्र नांदून घट्ट जुळलेली लंगोटियारी... ...जणूं सख्खे भाऊच म्हणावेत इतकी.
पण गम्मत म्हणजे एकमेकांशी इतकं विलक्षण जुळणार्‍या ह्या दुक्कलीच्या स्वभावात तिळमात्र साम्य नव्हतं. !!
साम्य कसलं म्हणायचं... ... ... अगदी उत्तर दक्षिण ध्रुव म्हणावेत इतके स्वभाव वेगळे. !!!
आमचे सासरे म्हणजे शांत...विचारी...बरेचसे अबोल...चिंतनांत रमणारे, तर हे तिलवल्ली सर म्हणजे साक्षात भडभुंज्याची धगधगलेली भट्टीच.
त्यामुळं त्यांच्या फिरक्या ताणणं हा आमच्या सासर्‍यांचा आवडता उद्योग असे. 
हे तिलवल्ली सर म्हणजे अस्सल कानडी अप्पा... ... त्यांचं नांवही गुण्डाप्पा असं होतं...आणि माझ्या सासर्‍यांचं नांव बालमुकुंद. त्यामुळं हे दोघे एकमेकांना 'गुंडा -बाळ' अश्या नावांनीच संबोधायचे.
वयानं हे तिलवल्ली काका माझ्या सासर्‍यांच्यापेक्षा दोनएक वर्षांनी लहान होते, पण शालेय वयांत अफाट तैलबुद्धीचं वरदान लाभलेल्या गुण्डाप्पांनी एका वर्षात दोन दोन यत्ता करत केवळ्या चौदाव्या वर्षीच मॅट्रिक्‌ ची परीक्षा दिलेली होती, आणि म्हणून हे दोघे एकत्र आलेले बरोबरीचे वर्गमित्र.
'फंडामेंटल्स्‌ ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग' आणि 'इलेक्ट्रिकल मशिन्स्‌' हे विषय नर्मदेतल्या गोट्यालाही व्यवस्थित पंचतील, इतके जीव तोडून शिकवणारा तिलवल्ली काकांच्या तोडीचा प्राध्यापक मी तरी उभ्या हयातीत पाहिलेला नाही. ते परिपूर्णतावादी होते. विद्यार्थ्याला आपण जे शिकवतो ते 'कसं समजत नाही तेच बघतो', इतक्या इरेला पडून पोंटतिडिकेनं ज्ञानदान करणारे ते प्राध्यापक. इतक्या इरेला पडून शिकवायचे, की एकदां सत्र परीक्षेच्या आधी महिनाभर आजारी पडून अंथरुणावर आडवे असतांना विद्यार्थ्यांना घरीं बोलावून घेऊन खाटेभोंवती बसवून, ह्या गुण्डाप्पानीं त्यांचा अभ्यासक्रम पुरा करून घेतलेला होता.!!
इतकं तळमळीनं शिकवूनही जर विद्यार्थ्यांनी त्यात नीटपणे रस घेतला नाही तर मात्र तिलवल्ली सरांची तळपायाची आग मस्तकांत जायची.
आणि खास कानडी हेल काढत त्यांच्या मराठी 'मुल्क-ई-मैदान' चा धंडाका सुरूं व्हायचा... ... ...,"स्टॅण्ड अप्‌... यू... यू... यू... रास्कल्ल !!,...यू इलेक्ट्रिकल हमाल... इलेक्ट्रिकल कूली... !!!
"तुमाला आईबाप्प कश्याला धाडतात रे हितं... म्हणतो मी?... नुस्त्याच मारायला येतां काय हितं... ... ते काय म्हणाता sss त त्याला... माश्या रे... ...ते मारायला येतां काय रे... ... कॉलेजा sss त?... ... गेट आउट्ट यू ... ...यू ... डंबहे sss ड...!!! समजला काय तुला? सगळ्यांचा खातो तूं... ... वेळ म्हणतो मी... ...संध्याकाळी ये घरी ... ...माझ्या... ...मग बघतो रे तुझ्याकडं... ..."
आणि खरंच हे तिलवल्ली काका त्या फक्याबहाद्दराला घरीं बोलावून इतका बेदम पिदडायचे, की स्वप्नांत जरी त्याला परीक्षा द्यायला लावली, तरी तो पहिला यावा.!!!
कमालीचे छांदिष्ट...हाडाचे अभियंते...निष्णात वादपटु, प्रचण्ड संतापी, आणि पराकोटीचे विसरभोळे...
त्यांची गम्मत अशी होती की ते उत्तेजित होऊन लालेलाल झाले, की त्यांची जातिवंत तैलबुद्धी जिभेच्या पुढं मैलभर धांवायची, आणि वाक्यच्या वाक्य उलटीसुलटी होत मग त्यांचं," तूं तूं तूं तूं... ...ते काय म्हणतो मी रे... ..." सुरूं व्हायचं, आणि ऐकणार्‍यांची अफाट करमणूक व्हायची. 
म्हणून कॉल्रेजातली पोरं त्यांना 'वल्ली-तिलवल्ली' म्हणून संबोधायची. !!!

आमच्या सासूबाई बाळ अनुराग ला खांद्यावर घेत काकी नां स्वयंपाकघरांत घेऊन गेल्या, काकांचं सामान-सुमान आम्ही आतल्या खोलीत नेऊन ठेवलं... ... आणि तोंड धुवून ताजेतवाने झालेले काका बाहेर बैठकीत येऊन बसले," तुला मी काय सांगतो बाळ... ... ह्या पोरांना अजिबात काय पण शिकायला नको बगा...स्काउण्ड्रल्स ! ... ... सगळे ते...ते... ... हे च्च रे... आयतोबा म्हणतो मी.!!"
सासरे," काय झालं काय गुण्डाप्पा इतकं चिडायला... ... अं?"
तिलवल्ली सर,"तूं...तूं...तूं...तूं...विचारतो मलाच्च काय रे... ...काय झालं म्हणू ssss न? सत्तर पेपर तपासले... ... नाशिकचे बगा... ... फक्त बावीस पास व्हायच्या लायकीचे!!...बाकी ते...ते हे च्च झाले वो... .. नापास म्हणतो मी. !!!"
सासरे," गुण्डाप्पा... ... अरे पोरंच ती"...सासर्‍यानी फिरकी ताणली... ...तुझंच चुकतंय्‌ कुठंतरी. !!"
तिलवल्ली,"माजाच चुकला काय रे बाळ?...ऑ?... ...पोरं त्या ह्या करता ssss त... ... उनाडक्या म्हणतो मी,!!! " तिलवल्ली काका नेहमीप्रमाणंच उसळले.
सासरे,"गुण्डाप्पा, अरे शिकवायचं पोरांना असतं... ... पण पेपर त्यांचे आईबाप डोळ्यापुढं ठेंवून तपासायचे असतात... ...समजलं?!!"
तिलवल्ली काकानी सासर्‍यांच्याकडं तिळपापड होऊन बघत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
आणि ते परत ’तूं...तूं...तूं...तूं...’ करायला लागायच्या आंत सासूबाईनीं समोर नाष्ट्याच्या बश्या आणून ठेंवल्या.

’वल्लीकाकां’ चं तिकडं लक्षच नव्हतं... ...," अरे ए बाळ... ...ही गम्मत बग रे जरा...", असं म्हणत त्यांनी कोटाच्या खिश्यातनं एक डाळिंब काढून समोरच्या नाष्ट्याच्या मेजावर ठेवलं.
काकी नीं चटकन्‌ जवळच्या पिशवीतनं चाकू काढून फटाफट चिरा मारत ते उकलून एका थाळीत ठेवलं. 
डाळिंब कसलं ते... ...छोटासा नारळच म्हणावा असं गरगरीत... आणि रसानं टंच भरलेलं. !!
मी आणि सौ. नी तरी तेव्हढं भरगच्च डाळिंब कधी बघितलेलं नव्हतं... ... मी विचारलं," काका कुठून आणलंत हो हे डाळिंब? असलं रसरशीत डाळिंब कधी बघितलंच नाही आम्ही."
वल्लीकाका," अवो, हे... हे... हे...डाळिंब ना ssss , त्या हितलं वो... ... ’मस्कत’ म्हणतो मी."
सौ. इंदिराजी," म्हणजे मस्कत ला गेला होता की काय काकी तुम्ही दोघं?... ...ऑं?"
काकी," अगं नाही गं... ...कसलं मस्कत न्‌ काय... ... ...इथं येतांना रेल्वे स्थानाकाबाहेरच एक फेरीवाला विकत बसलेला होता. आतां तुझ्या काकांच्या नजरेतनं हे असलं कांही सुटलं तरच नवल म्हणायचं... ... तेव्हां मी नको म्हणायच्या आंतच तरातरा गेले आणि तीन नग घेऊन पण आले."
सासूबाई नी काकींकडं मोर्चा वळवत वल्लीकाकांची फिरकी ताणली," गिरिजा... ... भावजींची नजरच लक्ष्यवेधी आहे ना... ... अगं तूं तरी सुटलीस काय तिच्यातनं?" 
पूर्ण बेसावध असलेल्या काकी नां, सासूबाईं ची ती धोबीपछाड अगदी चपखल बसली... ...!!
आम्ही सगळेच खुदखुदायला लागलो... ...!!
आणि पन्नाशी ला टेंकलेल्या काकी चेंहरा लालबुंद होत अश्या कांही फक्कड लाजल्या, की वल्लीकाकांचा सफाचट त्रिफळा उडाला.!!!
,"वयनी... ... अवो तुमी तुमी तुमी तुमी... ... काय हे भलतंच्च... ...!!!
अवो ह्यां चे ते...ते... हे च्च च आले होते ना ह्यां ना  दाखवायला घेऊ ssss न... ... ... तीर्थरूप्प म्हणतो मी. !!! "
सासरे," गुण्डा, अरे झाकायचं काय त्यात... ...ऑं? आपल्या पोराटारांना माहिती आहे... ...तुमचा प्रेमविवाह आहे म्हणून."
वल्लीकाका," अरे वा व्वा रे बाळ... ... ह्यां ना सोबत घेऊ ssss न ते हे...हे... खायला गेलो चौपाटीवर... ... भेळपुरी म्हणतो मी रे... ... तर प्रेमविवाह झाला काय रे माजा?"
सासरे," असूं दे...असूं दे गुण्डाप्पा... ...आतली गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. !!! ...बरं ते जाऊं दे... ... मला एक सांग."
वल्लीसर," काय... ... काय हवे रे तुला?"
सासरे त्या डाळिंबाकदं बोट दाखवत म्हणाले," गुण्डा... ...ह्या डाळिंबात दाणे किती असतील सांग बघू... ...!!!"
झा s s s s s s s s s s लं... ...नाष्टा राहिला बाजूलाच. आणि दोन कसलेल्या अभियंत्यांची त्या डाळिंबात दाणे किती असतील ह्या कूटप्रश्नावर जी लठ्ठालठ्ठी जुंपली, ती तासभर झाला तरी संपेचना.!!! भूमिती झाली... त्रिकोणमिती झाली... ... कॅलक्युलस्‌ चा ही कीस पाडून झाला... ... ... तरी वादावादी सुरूंच. 
शेवटी वल्लीकाकाच वैतागून मला म्हणाले," ह्या... ह्या...तुमच्या ह्या ला कांही sss च पटणार नाही बगा... ... सासर्‍याला म्हणतो मी. !!!
जाऊं द्या ते आतां... ...सिनेमाला येतां काय वो?"
मी," कुठल्या सिनेमाला काका?"
वल्लीसर," तो काय तो... ... ब्रूस ली चा सिनेमा वो... ... काय नाव बगा त्याचं... ..."
सौ. इंदिराजी," ’एंटर द ड्रॅगन’ काय काका?"
वल्लीसर," हां हां... ... ...तो च्च.!!"
सासरे," गुण्डापा... ... अरे काय हे... ...पैलवानकी करायचा विचार आहे काय तुझा आतां साठीत... ...ऑं?"
वल्लीसर," तुला काय पण कळत नाही बा sss ळ... ... समजला?... ...अरे ते ते...ब्रूस्स ली रे बाळ... ...असं काय हालिवतंय्‌ म्हणता sss त... ...हातपाय म्हणतो मी रे... ...दिसत नाही बघ डोळ्याला... ... काय? तूं चलच्च बगायला... ...मला कांही ऐकायचा नाही कुणाचा... ...सगळेच्च जायचं... ..."
इतका फतवा काढून वल्लीकाका अंघोळीला मोरीकडं निघून गेले, आणि मी अन्‌ सौ. इंदिराजी तयारी करून ’एंटर द ड्रॅगन’ च्या दुपारी दीडच्या खेळाची तिकिटं काढून आणायला चपला पायात सरकवून बाहेर पडलो.

यथावकाश दुपारची जेवणंखाणं आटोपली. 
गिरिजा काकी नी सढळ हातानं पक्का गूळ खोबरं आणि तूप घालून बनवलेल्या खमंग गव्हाच्या खिरीवर ( हिला कर्नाटकांत हुग्गी म्हणतात ), उभे आडवे हात मारून पोंटांवर हात फिरवत आम्ही ’एंटर द ड्रॅगन’ बघायला ’वेस्ट एण्ड’ मधल्या खुर्च्यावर स्थानापन्न झालो... ...
सुरुवातीच्या जाहिराती संपल्या... ... ’इण्डियन न्यूज’ चं रीळ ही संपलं... ...आणि टायटल्स सुरूं झाली...
वल्लीकाकांची ’अरे बा sss ळ... ...मी काय म्हणतो ते बगच तूं आतां’, अशी अखण्ड टकळी पण सुरूं झाली.
टायटल्स्‌ संपून ब्रूस ली ची कुंग फू च्या स्पर्धेतली पहिलीच लढत सुरूं झाली... ...
आणि वल्लीकाका अचानक उठून उभे राहिले," बाळ... अरे ए बा sss ळ... ...ते हे...हे झालं रे मोठ्ठं... ...घरीं जाऊं या लगेच्च. !!"
सासर्‍यानी वल्लीकाकांना बखोटी धंरून खाली बसवलं," अरे काय झांलंय्‌ काय गुण्डाप्पा तुला?"
वल्लीकाका परत उठून उभे राहिले," घोटाळा म्हणतो मी रे बाळ... ...ते आपलं हे...हे...हे... उघडंच राहिलं  बगा... !!"
सासरे," अरे काय उघडं राहिलं इतकं धास्तावायला?"
वल्लीकाका सासर्‍यांना धंरून उठवत म्हणाले," नळ म्हणतो मी रे बा ssss ळ... ... मोरीतला... ... ते उघडंच राहिलं बहुतेक्क...!!!"
झा s s s s s लं... ...आतां वल्लीकाकांचाच ऍक्शन्‌पॅक्ड्‌ ब्रुस ली झाला...!!! आणि आम्ही सगळे चित्रपट अर्ध्यावरच सोडून घराकडं सुसाट निघालो.
घरीं जाऊन वल्लीकाका स्वतःच कुलूप उघडून मोरीकडं धावले... ...आणि दुसर्‍या क्षणीं पडलेल्या चेंहर्‍यानं बाहेर आले... ...
नलबीळ कांही मुळात उघडा राहिलेला नव्हताच... ... ... !!
आणि मग ," ते मी काय म्हणतो रे बा sss ळ... ...सगळंच झालं रे... ... ...घोटाळा म्हणतो मी. !!! " असं म्हणत वल्लीकाकांची अशी कांही तिरपीट उडाली, की ’एण्टर द ड्रॅगन’ मधला ब्रूस ली पण झक्‌ मारील. !!!!

काका-काकी बर्‍याच महिन्यानीं मुक्कामाला आलेले होते, आणि बरोबर अनुराग पण... ...म्हणून मग सौ. इंदिराजींनी पुढचे दोन दिवस माहेरीच रहायचा मला हुकूम सोडला, आणि मी संध्याकाळीं घरीं जाऊन आवश्यक ते सामानसुमान घेऊन परत सासुरवाडीला दाखल झालो.
पुढचे माझे दोन दिवस काकांच्या बरोबर मनमुराद गप्पा मारण्यात, आणि सौ. इंदिराजींचे अनुरागला खेंळवण्यात कसे गेले ते समजलं देखील नाही.
काका-काकीं च्या परतीच्या डेक्कन क्वीन ची आरक्षणं मी च करून आणली.
माझी सासुरवाडी रेल्वे स्टेशन पासून तशी हांकेच्या अंतरावर म्हणायला हवी, पण निघायच्या दिवशी वलीकाका त्यांच्या ब्रिटिश शिस्तीप्रमाणं पहाटे साडेपांच वाजल्यापासूनच सुटाबुटात तय्यार होऊन दारांत खडे... ...!!!
आणि काकींच्या मागं लकडा सुरूं झाला," अवो ते काय काय ते लवकर आटपा तुमचं म्हणतो मी... ...निघायची झाली... ... वेळ बगा.!!"
काकी नीं अनुराग ला तयार करून काकांच्या कडं सोपवला," ह्याला जरा बघा, मी माझी आंवराआवर करून सामान सुमान बांधते... ...
नीट लक्ष ठेवा मात्र... फाटकाला लागूनच हमरस्ता आहे... ...समजलं?"
वल्लीकाका," काळजी नकां करूं काय पण... ...तुमचं आवरा ते काय ते... ... लवकर वो... ...गाडीची वेळ होत आली बगा."
काकी," कांही वेळ भरत आलेली नाही गाडीची... ... अजून चांगला तासभर अवकाश आहे गाडी सुटायला... ... अनुरागचं सामान तेव्हढं भरून घ्या व्यवस्थित... ...बाकीचं मी बघते. "
" हे... हे... हे... हे... काय लागलं रे मागं बा sss ळ... ... ... लचाण्ड म्हणतो मी रे", म्हणत वल्लीकाकांनी कोट उतवरून ठेंवला, आणि अनुरागचं सामान गोळा करून भरायला सुरुवात केली.
," अवो...अवो...अवो...," ते काय ते माझं विसरूं नकां म्हणतो मी... ...अवो ऐकलं का sss य तुमी?... ...चष्मा विसराल बगा माझा...!!!" काकांची टकळी सुरूंच होती, आणि छोटा अनुराग
त्याच्या दशदिशांत विखुरलेल्या खेळणी अन्‌ सामानात रांगत खेळत होता... शेंवटी काकी नी त्याला दुधाची बाटली तोंडात देऊन आतल्या खोलीत चौपाईवर झोंपवला.
सामानसुमान बांधून झालं... ... मी कोपर्‍यावरून तीन रिक्षा धंरून घेऊन आलो, आणि आमची वरात पावणे सात वाजतां एकदाची स्टेशनवर पोंचली.

फलाटावर नेहमीप्रमाणं डेक्कन क्वीन ची पाण्ढरपेशांची गर्दी उसळलेली होती... ... ...
कडक इस्त्रीतले ऑफिसवाले, हमाल, बूट पॉलिशवाले, चहाबिस्किटंवाले... ...नुस्ता कल्ला उडाला होता.
यथावकाश दूरवर गाडी चं इंजिन दिसायला लागलं, आणि काकी काकांना म्हणाल्या," अनुराग ला द्या माझ्याकडं आणि तुम्ही सामान गाडीत चंढवा."
वल्लीकाका काकींच्याकडं डोंळे विस्फारून बघायला लागले," ते माझ्याजवळ नाही... ...!!"
काकी काकांच्याकडं बघायला लागल्या," काय नाही तुमच्याकडं?"
काकी एव्हढं म्हणाल्या मात्र, वल्लीकाकांचा फलाटावरच क्षणार्धात साक्षात ब्रूस ली झाला... ...!!
आणि डोळ्यांना दिसणार नाही अश्या विद्युद्वेंगांत हातवारे करीत ते किंचाळले," ते ते ते ते...हे झाला रे बा ssss ळ.... ....सगळा... ... रामा रामा रे.!!!"
सासरे," अरे काय झालं इतकं घाबरायला गुण्डाप्पा?"
वल्लीकाका पिंगा घालत काकीं ना म्हणाले," अवो...अवो...अवो...अवो...तें...तें... हे हे हे... ...पाजत होतां ना तुमीच बाळाला?... ...दूध... ... तें च विसरलं की वो... ... रामा रामा !!!"
काकी," अहो अनुरागचं दूध विसरलां की काय तुम्ही घरीच... ...ऑं?"
वल्लीकाका हातवारे करत म्हणाले," दूध नव्हे वो... ... ते ते ते... हें च विसरलं बगा... ... घरींच्च."
काकी," अहो काय विसरलां तुम्हीं घरीं आतां?"
वल्लीकाका," अवो ते... तें...तेंच्च वो !!!... ... ...अनुराग म्हणतो मी... ...!!!!"
सासरे आणि सासूबाई आं वांसून वल्लीकाकांच्या कडं बघायला लागले... ...आणि आवाक्‌ होत थिजून बघतच बसले... ...!!
काकीनीं " रामा रे", म्हणून किंचाळत कपाळाला हात लावून होल्डॉलवर खाली फलाटावरच बसकण मारली...!!!
आणि मी व सौ. इंदिराजी आपापल्या कपाळांना हात लावत, रिक्शा पकडायला पळत सुटलेल्या वल्लीकाकांच्या मागं धांवत सुटलो. !!!!!


**************************************************************************************

-- रविशंकर.
२३ ऑगस्ट २०१४.



No comments:

Post a Comment