Search This Blog

Saturday, 26 July 2014

॥ नो पार्किंग ॥

॥ नो पार्किंग ॥




" नाना... ... अरे ए नाना... ...जरा खाली ये बरं असशील तसा...!! ‌", माझे शेजारी, आणि आमच्या ’रविराज अपार्टमेंट्स्’ चे चेअरमन श्री. शरद दातार ऊर्फ शर्‍या नं सोसायटीच्या अंगणात उभा राहून मला जोरदार हांक मारली.
वेळ साधारण दुपारी अडीच तीन ची असावी... ...
शेजारी पाजारी जेवणं खाणं आटोपून लवंडलेले असणार... ...
अश्या नीरव वेळीं शर्‍या ची ती जोरदार हाळी ऐकून मी चटकन्‌ चपला पायांत सरकवल्या, अन्‌ खाली जायला दार उघडलं, तोंच शरद च्या घरात गप्पाटप्पा करीत बसलेल्या आमच्या सौ. इंदिराजी आणि शरद च्या पत्नि सौ. वृंदावहिनी ह्या दोघीपण दरवाजा उघडून माझ्या पाठोपाठच खाली उतरल्या.
"काय झालंय्‌ काय रे शर्‍या?... ... कश्याला ठणाणा चालवलाय्‌स इतका ?" असं करवादच मी तळमजल्यावर उतरलो... ... 
मागोमाग ह्या दोघीही हजर.
बघतो तर काय इमारतीच्या प्रवेशद्वारातच सफाचट रस्ता अडवून कुणीतरी त्याची ’स्कूटी पेप’ बेधडक तिरकी लावून ठेवलेली दिसत होती.!!
आणि तिच्याकडं कपाळाची शीर तंटतंटलेले आमचे फटकळबहाद्दर श्री. शरदराव, दोन्ही हात कमरेवर ठेंवून एकटक रोंखून बघत उभे. !!
कसलातरी युद्धप्रसंग उभा ठाकलाय एव्हढं आम्हां तिघांच्या ध्यानांत आलं.
त्या ’स्कूटी पेप्‌’ ला कांही सामानसुमान पण लटकवलेलं दिसत नव्हतं... ... म्हणजे ती कुणा सामान पोंचवायला आलेल्या अडाणी माणसाची तर दिसत नव्हती.
स्कूटी पेप्‌ च्या मडगार्ड वर पुढच्या बाजूला ’बॅंक ऑफ महाराष्ट्र - पार्किंग’ असा बिल्ला पण चिकटवलेला दिसत होता.
म्हणजे ते वाहन कुणातरी सुशिक्षित व्यक्तीचंच असणार... ...
पण मालक सुशिक्षित असेल म्हणावं, तर त्याच्या समजूतदारपणाचं दिवाळं निघालंय्‌ असंच म्हणायची वेळ आलेली होती. !!
त्याची ती ’स्कूटीव पेप्‌’ लावायची कृति म्हणजे चक्क बेमुर्वतखोर उर्मटपणा दाखवणारी जाहिरातच होती जणूं.
नीटनीटकेपणा अंगात असेल म्हणावं, तर त्या वाहनाचाचा अवतार तर अगदी फोटो काढण्याच्याच लायकीचा दिसत होता... ... ...
चेंपटलेली नंबर प्लेट, लडबडलेला स्टॅण्ड, तेल-धुळीची पुटं बसलेलं इंजिन, आणि वर्षभरात फडकं तरी मारलेलं असेल कां अशी शंका वाटावी, इतकी धूळीनं माखलेली. 
चुकूनमाकून लावलेली असेल म्हणावं, तर कुणी दारू ढोंसून तर्र झालेला तळीरामही जशी गाडी लावणार नाही, अश्या थाटात, मुद्दाम रस्ता अडवण्यासाठीच लावल्यासारखी ती ’स्कूटी पेप्‌’ येणार्‍या जाणार्‍यां ना वांकुल्या दाखवत उभी होती.!!
बरं आमच्या इमारतीच्या चारही बाजूंना वाहने ठेंवण्यासाठी मोकळी जागा पण भरपूर आहे.
आणि तरीही ही स्कूटी अशी प्रवेश्द्वाराच्या तोंडावरच बेधडकपणे आडवीतिडवी लावून हे महाराज इमारतीत कुणाकडंतरी गडप झालेले होते एव्हढं नक्की होतं... ... ...
तात्पर्य, ही कुणीतरी सुमार वकुबाची, एखाद्या पुणेरी वृत्तीच्या वाड्यात तहहयात वाढलेली, आणि लायकीपेक्षा ज्यास्त पैसा मिळालेली पढतमूर्ख व्यक्ती आहे, एव्हढी सगळ्यांचीच खात्री पटली.
तो सुशिक्षित मुजोर आडगेपणा बघूनच मला शर्‍या चा पारा कां चंढला होता ते मात्र बरोबर समजलं... ...
"नाना... ... ...बघितलंस कशी गाडी लावली आहे ही... ... ... कुणाची गाडी आहे रे ही ?... ... ...कांही कल्पना?", शर्‍या
"नाही बुवा", मी," पण हे...हे...असलं वागणं पारा चंढण्यासारखंच आहे हे मात्र खरं."
"हा अडाणीपणा काय नुस्ता पारा चंढायच्या लायकीचा आहे काय रे नाना?... ...ऑं? ", शर्‍या उसळला," अरे... कानफटांत हाणून जिरवायच्या लायकीचा मस्तवालपणा आहे हा... ...!!
" काय समजतात काय स्वतःला हे लोक?... ... डॅंबीस साले. !!", शर्‍या ची ’ए. के. ४७’ फंटफंटायला लागली. !!!
तेव्हढ्यात सौ. वृन्दावहिनी शरद ला म्हणाल्या, "जाऊं द्या हो... ... कश्याला ओंरडताय‌ ?... ... भांडणं नकोत उगीच आपल्याला ... ... चला बघूं वर घरात... चला म्हणते ना?... ... चला s s s s s s s !!"  
" चला काय चला?", आतां शर्‍या नं वृन्दावहिनींचाही समाचार घ्यायला सुरुवात केली," ह्या गावंढळाला अक्कल आहे काय काडीची?... दारांत गाडी आडवी लावायची एव्हढी खाज असली तर स्वतःच्या घराच्या दारात अशी आडवी गाडी लावून भागवूं दे त्याला... ... समजलं !!!? 
होऊं देत खुशाल भाण्डणं झालीच तर... ... ... पण हा ' तळीराम ' ज्यांच्याकडं आलेला आहे ना, त्यांनापण समजलं पाहिजे, की त्यांचे अभ्यागत म्हणजे सोसायटीचे जावई नव्हेत हा असला वाह्यातपणा खपवून घ्यायला."
शरदचं बोलणं जरी फटकळ असलं तरी निखळ सत्यच होतं.
आजकाल सगळ्या समाजालाच हा मुजोर उन्मत्तपणाचा रोग कां जडलेला आहे, ह्याची शर्‍यानं सांगितलेली कारणंही तितकीच सत्य होती.!!
स्वतःच्या सुशिक्षितपणाचा डांगोरा पिटणार्‍या आजकालच्या समाजाची नीतिमूल्यं आणि सहिष्णुता किती रसातळाला गेलेली आहे, याचा ती ’स्कूटी पेप्‌’ म्हणजे धडधडीत बिनतोड पुरावाच होता.!!! 
सोसायटीच्या चेअरमनचाच चंढलेला आवाज ऐकून चौथ्या मजल्यावर राहणार्‍या सौ. भावेबाई खिडकीतनं खाली डोकावल्या... ...
दारात लावलेली ती ’स्कूटी पेप्‌’ आणि तिचा पंचनामा करायला जमलेला गोतावळा बघूनच त्या जरा चंपापल्याच ... ... 
आणि म्हणाल्या," काय झालं हो शरदराव?... ...गाडी हलवायची आहे काय?"
भावेबाईंच्या घरींच ही व्यक्ती आलेली आहे हे शर्‍याला तत्क्षणीं समजलं, अन्‌ शर्‍याची ’मुल्क-ई-मैदान’ धंडाडली," भावेबाई ... ... तुमच्याकडं जे कुणी पेशावाईतले जहागिरदार आलेले आहेत ना, त्यांना खाली पाठवा लगेच ... ... !! गाडी हलवायची नाहीय्‌... थेट फाटकाबाहेर हटवायची आहे.!!! "
दोनचार मिनिटात जिन्यावरून लगबग खाली उतरणार्‍या पावलांचा आवाज आला... ...
भावेबाई कांही खाली उतरलेल्या दिसल्या नाहीत, पण त्यांच्याकडं आलेले एक घारेगोरे चाळिशीचे बुटके गृहस्थ जिन्यावरून खाली अवतीर्ण झाले.
भावेबाईनीं निर्वाणीची परिस्थिती हेरून खास पेशावाईछाप बेरकीपणानं ’जामाता’चा च बळी देणं पसंत केलेलं दिसत होतं... ... !!!!
ते भावेबाईंचे जामात शर्‍याला सामोरे येत म्हणाले," काय ?... ... काय झालं?"
शर्‍याचा हिसका बहुधा त्यांना दूरान्वयेही ऐकून माहीत नसावा.
शर्‍या," आम्हालाच विचारताय ’काय झालं’ म्हणून?... ... ऑं? तुम्हाला कांही कळत नाही हे दिसतंच आहे, पण दिसतही नाही वाटतं !!... ... ठार आंधळे आहांत की काय तुम्ही?"
" मला दोन मिनिटांचंच काम होतं म्हणून गाडी इथं लावून आत गेलो.", भावेजामातांनी सारवासारव कारायला सुरुवात केली.
शर्‍या नं मग त्यांना पहिली टांग मारली," स्वतःच्या घरातल्या दिवाणखान्यात दोन मिनिटांचं काम असलं, तर स्वयंपाकघरातल्या ओंट्यासमोर हा तुमचा ऐरावत असा आडवा घालून जाता की काय तुम्ही? !! "
आतां भावेजामातांचा उर्मटपणा वर आला," काय झालं दोन मिनिटांसाठी गाडी लावली तर?"
तो मुजोरपणा बघून मग शर्‍या पण उसळला," ही खासगी सोसायटी आहे जनाब , महापालिकेचं बेवारशी पार्किंग नव्हे वाट्टेल तिथं गाड्या लावून जायला !!!... ... समजलांत?"
भावेजामात," दोन मिनिटांनी गाडी काढणारच होतो की मी."
शर्‍या," असं होय? आणि तुमची ही ’दोन मिनिटं’ होईपर्यंत इथल्या रहिवासी मालकांना त्यांच्या गाड्या आंतबाहेर करतां येईना झाल्या, तर तुम्हाला हाकारायला तुमचे हुजरे पण सोडून गेला होतात की काय ह्या ’स्कूटी पेप्‌’ सोबत?... ... ...ऑं? काय सोसायटीचे जावई समजतां काय स्वतःला?... ... की खुद्द 'श्रीमन्त पेशवे' च समजतां?... ... ताबडतोब हटवा गाडी इथनं... ... ...  ह्या क्षणीं !! ... ...समजलं?" 
भावेजामातांना तो रट्टा जिव्हारी लागला," इथं ’नो पार्किंग’ ची पाटी लावलेली नाही... ... ... म्हणून लावली मी गाडी.!!! "
शर्‍या," असं होय?... ... म्हणजे पाट्या वाचायची संवय आहे तुम्हांला तर?... ... मग फाटकातनं आंत येताना काय डोळे झांकून गाडी चालवत होता काय?...ऑं?"
भावेजामात," फाटकाचा काय संबंध आहे इथं?"
शर्‍या," फाटकावरच शुद्ध मराठीत पाटी लावलेली आहे ’ सोसायटीतल्या रहिवाश्याखेंरीज इतर कुणालाही वाहन आंत आणायला बंदी आहे’ म्हणून... ... ...मराठी वाचतां येतं ना तुम्हाला? "
भावेजामात," माझं लक्ष गेलं नाही त्या पाटीकडं...!!!"
शर्‍या," आणि गाडी आडवी लावून रस्ता अडवायला हे प्रवेश्द्वार बरं अचूक दिसलं तुम्हाला?.. ... नाही?"
भावेजामात," इथं ’नो पार्किंग’ ची पाटी लावलेली नाही त्याला मी काय करणार? !!!!"
त्या अभ्यागताचा तो शहाजोगपणा आतां मात्र सगळ्यांच्याच सहनशक्तीच्या पलीकडं गेला... ... ...
शर्‍यानं एका हातानं भावेजामातांच्या ’ऐरावता’ ची एक तंगडी धरून बकरं फंरपटल्यागत पंधरावीस फूट फरपटत गाडी फाटकाबाहेर काढली.!!
चौथ्या मजल्यावरून घराच्या खिडकीतनं भावेबाई  ’जामातां’ च्या ’द्रौपदी’ ची फरपट मख्खपणे बघत होत्या.!!!
आणि मग भावेजामातांचा सोक्षमोक्ष लावायला शर्‍यानं त्यांच्याकडं मोहरा वळवला," काय म्हणालात आपण?"
भावेजामात," मी म्हणालो की इथं ’नो पार्किंग’ ची पाटी लावलेली नाही त्याला मी काय करणार? "
शर्‍या," रहदारीच्या वाटेवर, फाटकावर, प्रवेशद्वारावर ’नो पार्किंग’ च्या पाट्या तुमच्या सोसायटीत लावल्याय्‌त काय?... ... ...ऑं?... ... आणखी दुसरं असं... ..."
भावेजामात," काय?... ... ...काय दुसरं?"
शर्‍या नं आतां धोबीपछाड मारली," आणि जरी कुणी अश्या ठिकाणी ’नो पार्किंग’ च्या पाट्या लावल्याच, तरी तुमच्यासारख्या जातिवंत 'पेशव्यां' साठी त्या निरूपयोगीच असतात.!!!... ... काय?"
भावेजामात," मी भावेबाईंकडं आलोय्... ... त्यांचा पाहुणा आहे मी.!!‌"
शर्‍या," अहो म्हणून तर एव्हढ्यावरच भागलंय्‌... ...नाहीतर तुमची पण रवानगी तुमच्या ’स्कूटी पेप्‌’ च्या पाठोपाठ झाली असती !!!... ...समजलात?... ...
बरं ते जाऊं द्या आतां... ... मला एक सांगा... ... ..."
भावेजामातांनी बेसावधपणे शर्‍यानं लावलेला गळ गप्‌कन्‌ गिळला," काय हवंय तुम्हाला?"
आणि डोळ्याची पापणी लवायच्या आंत शर्‍यानं पेशव्यांना चारीमुण्ड्या चितपट लोळवलं, " मला सांगा, तुमच्या स्वतःच्या सदनिकेच्या दरवाज्यावर तुमच्या नांवाची पाटी लावलीय्‌, की ’नो पार्किंग’ ची? !!!!!" 
आख्खी रविराज सोसायटी बॉंबस्फोट झाल्यागत पोटं धंरधंरून खदांखदां हंसायला लागली... ...!!!
श्रीमंत पेशव्यानीं आवाक्‌ होऊन दांतखीळ बसल्यासारखं शर्‍याकडं बघत स्वतःच्या कपाळाला हात लावला... !!!!
आणि पार्श्वभागाला पाय लावून दुसर्‍या क्षणीं आपल्या ’ऐरावता’ वर मांड घालत पोबारा केला. !!!!!

******************************************************************************

-- रविशंकर.
२५ जुलै २०१४. 

No comments:

Post a Comment