Search This Blog

Saturday, 12 April 2014

॥ अंधश्रद्धा निर्मूलन ॥

॥ अंधश्रद्धा निर्मूलन ॥



"तेव्हां लोकहो... ... ... जादूटोणा, जारणमारण, शुकज्योतिष, हस्तसामुद्रिक, हवेतनं मुठीतनं अंगारा-हळदकुंकू काढायचे चमत्कार, अंगारे-धुपारे, लोखंडाचं सोनं करणं... ... या सगळ्या चमत्कारांपाठी शुद्ध हातचलाखी असते... ... असल्या चमत्कारांना विज्ञानाच्या  कसोट्यावर कुठलाही आधार नसतो. 
म्हणून असल्या हातचंलाखीला भुलून बुवाबाजी चे बळी होऊं नकां... ...आणि आपला अमूल्य वेंळ व पैसा ह्या भोंदूगिरी वर उधळून वाया घालवूं नकां हो ssssss... ..."
पथनाट्यातल्या नायकानं जोरदार दवण्डी दिली, अन्‌ सोंबत असलेल्यां पात्रांनी तडातडा ताशा वाजवायला सुरुवात केली... ... ...लगोलग त्या दवण्डीवाल्या पोरापोरींच्या चमू भोंवती निरुद्योगी बघ्यांची गर्दी गोळा झाली... ...अन्‌ त्यांच्या ’अंधश्रद्धा निर्मूलन’ नामे पथनाट्याला बघतां बघतां रंग चढला. !!
पथनाट्या चं  व्यासपीठ होतं रेल्वे स्टेशन शेंजारच्या ससून रुग्णालयासमोरचा फूटपाथ.

इसवी सन २०१० मधल्या नोव्हेंबर महिन्यातली ती एक शीतल दुपार होती... ... ... वेळ साधाराण दुपारी चार सव्वाचारची असावी... ... ...
हिवाळी सुटीच्या प्रवासासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस ची आरक्षणं करून मी रेल्वे स्टेशनवरून घरीं परतत होतो... ...तेव्हां मध्येच रस्त्यात ही गंमत दिसली. आरक्षणांचं काम आश्चर्यकाररीत्या एका झंटक्यात पार पडलेलं असल्यानं घरीं पोंचायची घाई अशी नव्हती... ... 
’अंधश्रद्धा निर्मूलन’ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं कॉलेजच्या वयात माझ्यापरीनं त्या कार्याला थोडाफार हातभारही लावलेला होता. म्हणून त्याचंच पथनाट्य... आणि कॉलेजच्या वयाची पोरंपोरी तें करताय्‌त हे दिसतांच मी स्कूटर ब्रेक लावून थांबवली... ... ...स्टॅण्डवर चंढवली, अन्‌ समोरच्या फूटपाथवर जरा थांबलो.

ससून रुग्णालयासमोरच्या रस्त्याचे दोन्ही फूटपाथ हे रेल्वे स्टेशन शेंजारीच असल्यानं बारा महिने अष्टौप्रहर गर्दीनं गजबजलेले असतात.त्यांत बिस्किटं कंगव्या पासून अगदी स्वस्तात व्हीडीओ कॅमेरे-मोबाईल इ. पर्यंत सगळ्या वस्तूंचा बाजार भंरवणार्‍या फेरीवाल्यांबरोबर अंगारे - धुपारे वाले बुवा, कसरती करणारे  मदारी-डोंबारी, पोपटाचं भविष्य सांगणारे, माळा-मणी-रुद्राक्ष-भाग्यरत्ने-अंगठ्या विकणारे... एक ना दोन... ... एकजात सगळ्या बारा बलुतेदारांनी तिथं उपजीविकेसाठी हजेरी लावलेली असते.
आपल्या भारतातलं खरंखुरं जनजीवन बघायचं असेल, तर एकवेळ तरी ह्या फूटपाथ ला अवश्य भेंट द्यावी.!!
कुठ्ल्याही ’आय. आय. टी.’ अथवा ’आय. आय. एम.’ सारख्या नामवंत संस्थांत मिळणार नाही, असलं अस्सल व्यवहारी शहाणपण ह्या ससून इस्पितळाच्या समोरच्या फूटपाथवर हटकून शिकायला मिळेल. !!!

पोरापोरींच्या त्या चमू नं व्यासपीठ आणि स्थळ तर अगदी चोंखंदळपणानं निवडलेलं दिसत होतं... ...
’अंधश्रद्धा निर्मूलना’ च्या पथनाट्यासाठी ह्या फूटपाथपेक्षा अधिक चपखल नी सुयोग्य असं स्थळ शोधून तरी कुठं मिळणार? पण गंमत अशी होती की त्या पोरासोरांच्या चमूबरोबर ज्येष्ठ-विचारवंतासारखं कुणीच दिसत नव्हतं... ... ...सगळा कॉलेजच्या पोरांचाच तमाशा. !!
त्या पथनाट्यवाल्या पोरांपोरींच्या अवतारांकडं बघून मला कसलीतरी शंका आली, आणि मग मी त्या पोरांना नीट निरखून बघायला लागलो... ... ...जवळपास सगळीच गळ्यात गिटार अडकवून ’रोम्बा-सोम्बा’ किंवा ’सान्सा डान्सिंग्‌’ करणार्‍यांच्या जातकुळीतली दिसत होती.!!!
पोरींचे कान बोडकेच... ...  तथापि पोरांच्या कानांत मात्र डूल लटकत होते. !! पोरींचे बहुतेक बॉबकट् ... ... , तर कांही पोरांनीच केंस वाढवून पाठीमागं बुचडे बांधलेले... ...!! एकाही पोरीच्या गळ्यात कण्ठभूषण नाही ... ... ... , परंतु पोरांच्याच गळ्यात चित्रविचित्र माळा लटकत होत्या... ...!!! पोरींची मनगटं एकजात रिती, पण पोरांनी हौसेनं हातांत बांगड्यासारखी कडी-बिडी घातलेली... ... !!! आणि कुठल्याच पोरीच्या कपाळी औषधालाही कुंकवाचा थांगपत्ता नव्हता... ... ... त्यातले कांही महाभाग अंघोळीला फाटा देऊन डी. ओ.- बिओ फंवारून वेळ भागवणारेही असावेत कदाचित... ... ...!!!!

मला चांगलंच नवल वाटलं... ... 
’मायकेल जॅक्सन’ च्या सात पिढ्या ह्या पोरांना कदाचित तोंडपाठ असतील... ... पण स्वतःच्या देशात घडलेल्या शे-सव्वाशे वर्षाच्या धंगधंगत्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासाची त्यांना गंधवार्ता देखील नसावी... ... ...
ह्या असल्या पोरांना भारतीय समाजाची, आणि त्यातल्या बारा बलुतेदारांची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली आहेत, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धां ची वीण काय चीज आहे, याचा थांगपत्ता तरी असेल?
फार कश्याला, मुळात ’श्रद्धा’ नी ’अंधश्रद्धा’ यांतला सूक्ष्म फरक, - ज्यावर विद्वानांतही मतभेद आहेत - त्याची पुसटशी तरी समज असेल?
तसलं कांहीही त्या चमूतल्या पोरांपोरींच्या तोंडांकडं बघून सुतराम शक्य वाटत नव्हतं.!!!!
आणि ही असली पोरं भर रस्त्यात ’अंधश्रद्धा निर्मूलना’ च्या सोज्ज्वळ उपद्व्यापात पडलेली दिसत होती... ... ... एकूण सगळाच मामला मला जरा संशयास्पद वाटायला लागला... ... आणि मी वेळ वखत विसरून ती गंमत बघत तिथंच थांबलो.
त्या चमूतल्या कांहीनी मांत्रिक-भगतांची, जोगतिणींची, तांत्रिक बुवांची, पोपटवाल्या होरातज्ञांची सोंगं चंढवली,  अन्‌ मुठीतनं-हवेतनं अंगारे-हळद-कुंकू वगैरे कांढून दाखवलं... ... स्पर्शानं लुळे पाय सरळ करून दाखवले... ... अन्‌ बघ्यांच्या खिश्यातल्या किल्ल्यांच्या जुडग्यातल्या लोखण्डाच्या किल्ल्या पण बघतां बघतां सोनेरी करून दाखवल्या... ... ...!!!
जमलेली गर्दी आ वांसून बघायला लागली... ... ...आणि बर्‍याच बघ्यांनी कपाळांना हात लावले. !!!

तेंव्हढ्यात हॉर्न वाजवत एक मिनि बस गर्दीच्या घोळक्याजवळ येऊन थांबली...अन्‌ बसमधनं माईक-व्हीडिओ कॅमेरे वगैरे आयुधं परजत कुठल्यातरी वृत्तवाहिनीची माणसं उतरली, आणि गर्दीतनं वाट काढत व्यासपीठावर दाखल झाली... ... ...
झालं... ... पोरांच्या चमू चा सगळा नूरच एका क्षणांत पालटला...!!
आतां जो तो आणि जी ती आपापला जामानिमा सांवरायला लागले. !!!
पोरांनी वेण्या सांवरल्या, पोरींनी बॉब्‌ नीट केले... ... ... आपापल्या जीन्स आणि पुलओव्हर झंटकून सरळ केले... ... ... कांही पोरीनीं तर टॅब्लेट च्या पडद्यातच छबी निरखत चक्क लिप्‌स्टिक्‌ सुद्धां ठाकठीक केली... ... ...  कपाळावर दोन्ही बाजूंनी केसांच्या झिपर्‍या थेट ’ऐश्वर्या’ च्या लकबीत नीट ओंढून घेंतल्या. !!! आणि वाहिनी च्या कॅमेर्‍याचा रोंख हेंरून एकदां केलेले जादूचे प्रयोग परत करायला सुरुवातही केली... ... ... कांहीनी जमलेल्या लोकांच्याशी संवाद पण सुरूं केले... ...
वाहिनी च्या कॅमेर्‍यात आपण नीट येतोय्‌ ना, याची पुनःपुन्हां खातरजमा करीत हे सगळे चाळे सुरूं झाले.!!!
आणि मी ती ध्यानं बघून कपाळाला हात लावला.!!

मला मघाशी आलेली ती शंका तत्क्षणीं च फिटली... ... हा ’अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यां’ चा चमू नव्हताच.!!
आतां त्यातल्या कुणालाच ना ’अंधश्रद्धांशी’ देणंघेणं उरलं, ना त्यांच्या ’निर्मूलना’शी... ...!! ना जमलेल्या अडाणी बघ्यांच्या उद्धाराशी... ... ना गोरगरीब बलुतेदारांच्या भल्याशी... ... ...!!!
हा तर चक्क ’प्रसिद्धीतत्परतावाद्यां’ चा गोतावळा. !!!!
आत्तां सगळा प्रकार माझ्या लक्ष्यांत आला. त्या पोरांतल्या कुणीतरी दोघातिघां चलाख  अथवा स्मार्ट  टग्यांनी ही भन्नाट शक्कल लढवलेली असावी... ...
तासाभरांत झटपट प्रसिद्धी...!!!!

ह्या स्मार्ट टग्यां ची जन्मतःच एक गोची असते... ... ... आपण चलाख असलो तरी ठार निर्बुद्ध आहोत, याचा त्यांना पत्ता च नसतो. !!!
आणि एखाद्या बुद्धिवंतानं आपल्याल कचाट्यात धंरलं तर काय करायचं हे पण त्यांना ठाऊक नसतं... ... ...
ते नुस्तेच इतर सगळ्यांना मूर्ख समजत असतात.  
आतां कंपूतल्या प्रत्येकाचा वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यांत उमटायचा जिवाच्या करारानं आटापिटा सुरूं झाला... ... ... नुस्ता सावळा गोंधळ उडाला. !!
त्या गोतावळ्यातली च एक ’ऐश्वर्या’ पटकन्‌ रस्ता ओलांडून आली, अन्‌ नकळत माझ्या जवळपासच उभी रहात तिनं मोबाईल वर कुठल्यातरी मैत्रिणीला फोन लावला, अन्‌ सांगूं लागली,  " हाय्‌ श्रद्धा... ... ... परवा दिवशी मराठी वाहिनी चा कार्यक्रम अवश्य बघ बरं कां... ... ... ... अगं कां म्हणजे काय? अगं आज इथं ससून रुग्णालयासमोर ’अंधश्रद्धा निर्मूलन’ हेतू नं एक पथनाट्य झालं...त्यांत मी आहे बघ... ... लाल पुलओव्हर घातलेली. !!! अगदी नक्की बघ बरं कां... ... अगं आत्तां च वाहिनीवाल्यांनी छायाचित्रण केलं बघ... ... ... थॅंक्यू...बाय्‌. "
मी ते संभाषण ऐकून परत कपाळाला हात लावला. !!!!

मला तेराव्या शतकांत होऊन गेलेल्या भर्तृहरि च्या त्रिकालाबाधित तत्त्वज्ञानाची आंठवण झाली... ...
मराठीत आपण ’येन केन प्रकारेण’ असा वाक्प्रचार वापरतो ना, त्याचा जनक हा भर्तृहरि. 
भर्तृहरि चं तें प्रसिद्ध वचन असं आहे... ... ...
’घटंभिंद्यात्पटंछिंद्यादथवारासभरोहणम्‌
येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत्’
अर्थ: मनुष्यप्राणी ’प्रसिद्धी’ साठी कुठल्याही थराला जाईल... ... ... तो भाण्डी फोडेल, कपडे फांडून टाकून फिरेल... ... ... अगदी गाढवावर बसून स्वतःची धिण्डही कांढून घेईल... ... पण ’प्रसिद्धी’ ची हांव मुळीच सोडणार नाही.
प्रत्यक्षात माझ्या समोर तरी दुसरं काय चाललेलं होतं?
मनुष्यप्राणी इतक्या सर्वांगानं ओंळखलेला भर्तृहरिच्या तोडीचा तत्त्वज्ञ क्वचितच दुसरा कुणी जन्मला असेल... ... ... भर्तृहरि च्या त्या च उक्ती चा, बटबटीत आविष्कार च जणूं एकविसाव्या शतकात चक्क माझ्या डोंळ्यादेखत साकारत होता. !!
आणि स्वातंत्र्योत्तर काळांत आपल्या देंशांतलं कुठलंही आंदोलन धडपणे तडीला कां जात नाही... त्याचं ’आठवडी आंदोलन’ कां होतं... ..., आणि एकजात सगळ्याच आंदोलनांची शेंवटी ’नवटंकी’ कां होते, त्याचं कारणही मला ढळढळीतपणे स्वच्छ समोर दिसत होतं.
जुग जुग जियो भर्तृहरि. !!!

तेंव्हढ्यात आतांपावेतों झालेल्या गोपाळकाल्यावर चंरचंरीत फोडणी मारणारी दुसरी घटना घडली.
पथारीवाल्या बलुतेदारापैकी जो पोपटवाला ज्योतिषी होता, त्याच्यासमोरच फूटपाथला लगटत एक चंकचंकीत ’स्कोडा ऑक्टाव्हिया’ थांबली... ... ...
धोंतर कोट चंढवलेले, डोक्याला कडक फेटा बांधलेले, आणि भरगच्च कल्ले-मिश्या रांखलेले पहिलवानी थाटाचे एक गांवरान ’मामा’ गाडीतनं उतरले... ... 
आणि समोर चाललेल्या ’नवटंकी’ कडं ढुंकूनही न बघतां थेंट पोंपटवाल्या ’होरामार्तण्डां’ च्या समोर तिपाईवर जाऊन बसले.!!
’मामा’ आसपासच्या कुठल्यातरी खेंड्यातले चांगले सधन बागायतदार शेंतकरी असावेत... ... पण चेंहरा तर विद्यावंता चं तेंज दाखवत होता. !!!
मामां चं काम तांतडी चं असावं... ... ...
पोपटवाल्या ’होरामार्तण्डांनी’ ’मामा’ ना रामराम केला, समस्या समजावून घेतली अन्‌ पत्ते पिसून पोंपटाच्या पिंजर्‍याचं दार उघडलं... ... ... ’शुकाजीराव’ बाहेर येऊन मान वेळावत पत्ता निवडूं लागले... ... ...
तेंव्हढ्यात ’स्कोडा ऑक्टाव्हिया’ चं मागचं दार उघडून एक विशी-बाविशी च्या वयाची चुणचुणीत, बुद्धिमान, पण सांवळी कन्या गाडीतनं उतरली, लगबगीनं चालत ’मामां’ च्या जवळ येत तिनं चक्क हातातला ’सामसुंग गॅलॅक्सी’ मामांच्या हातात दिला.... ... ...आणि ’मामा’ मोबाईलवर अस्खलित इंग्रजीत बोलायला लागले. !!

माझा अंदाज चुकीचा नव्हता तर... ... ... ’मामा चांगले शिकले संवरलेले असावेत. ती कन्या बहुतेक त्यांचीच मुलगी असावी... ...पोरगी सांवळी असली, तरी नाकीं-डोळीं चांगलीच रेखीव दिसत होती अन्‌ बुद्धिमानही वाटत होती. ’मामा’ नां मोबाईल देऊन ती थोडीशी बाजूला सरकून अदबीनं ससून हॉस्पिटलच्या कुंपणाच्या भिंतीला पांठ टेंकवून उभी राहिली, आणि त्या स्वघोषित ’अंधश्रद्धा निर्मूलन’ वाद्यांचा तो तमाशा बघूं लागली.
त्या कंपूतल्या एका पोराकडं तिचं लक्ष जातांच ती चपापली... ... ’मामां’ च्या जवळ जात त्यांच्या कानांत कांहीतरी कुजबुजली... ... ... आणि पुन्हां माघारी गाडीत जाऊन बसली.

त्या पोरांच्या घोळक्याचं लक्ष आतां त्या पोपटवाल्याकडं अन्‌ त्याच्या समोर बसलेल्या ’मामां’ कडं गेलं. झालं... ... ...पोरापोरींना आतां चेंव चंढला... ... ... अन्‌ त्यांचा घोळका घोषणा द्यायला लागला... ... ... ,"अंधश्रद्धा मुर्दाबाद... ...विज्ञानवाद झिंदाबाद... ... 
अंधश्रद्धांचं उच्चाटन झालंच पाहिजे... ... अडाणी जनतेची लुबाडणूक थांबलीच पाहिजे... ... ..." आपल्या विज्ञानवादाचा ढोल पिटायला जणूं त्यांच्या हातात कोलीत च सापडलं... ... ...!!! आणि तेही एव्हढ्या गर्दीपुढं आणि वृत्तवाहिनीवाल्यांच्या कॅमेर्‍यांसमोर. !!!! ... ... ...आणखी काय हवं होतं?
त्यातली तीनचार पोरं आतां पोपटवाल्याजवळ गेली, अन्‌ ’गाशा गुण्डाळा’ म्हणायला लागली. बिचार्‍या पोपटवाल्याचं धाबं दणाणलं... ... ... तो आंवराआंवर करायला सरसावला, तसं ’मामां’ नी त्याला हातानंच खाली बसायची अन्‌ शांत रहायची खूण केली.
आणि पुरे सहा फूट उंच धिप्पाड ’मामा’ तिपाईवरून उठून उभे राहिले, आणि त्यांनी त्या टारगट कंपूकडं मोर्चा वळवला... ... ...
मामा," काय रे पोरांनो, कां छळताय्‌ ह्या बिचार्‍याला?... ... ... ह्या नं काय घोडं मारलंय की काय तुमचं ? ... ... ऑं?... ... ... बिचारा नेकीनं आपलं पोंट भरतोय्‌ ते बघवेना झालंय्‌ काय तुम्हाला?"
एक पोरगं," हा पोपटवाला अंधश्रद्धांना खतपाणी घालतोय्‌... ... ..."
दुसरं," आणखी अडाणी जनतेची फंसवणूक पण करतोय्‌... ... तुमच्यासारख्या लोकांना गंडा घालतोय्‌ हा."
तिसरी पोरगी," मामा ... ... ... अहो पोपटाला कधी भविष्य सांगतां येतं कां?... ... काय पण तुम्ही लोक तरी. !!"
कंपू," अंधश्रद्धा मुर्दाबाद.!!... ... ... लूटमार थांबलीच पाहिजे... ...पोपटवाला हटाव. !!!"
मामा," असं आहे होय तुमचं म्हणणं?... ... ... मला सांगा ’अंधश्रद्धा’ कश्याशी खातात ते तरी माहीत आहे काय तुम्हांला?"
खेडवळ ’मामां’ चं अस्खलित स्वच्छ मराठी बघून पोरं आतां चपापली... ... ...न्‌ एकमेकांकडं बघायला लागली. !!!
मामा," लेकाच्यानों... ... मुळात ’श्रद्धा’ आणि ’अंधश्रद्धा’ या दोन्हीतला फरक तरी सांगतां येतोय्‌ काय तुमच्यापैकी कुणाला?"
पोरंपोरी गप्पगार... ... ... ...
आतां मामा शड्डू ठोंकून मैदानात उतरले," बोला... ... …  तुमच्या घरांत सणवार, वैदिक कार्यं, लग्नं, मुंजी, सगळं पंचांगात मुहूर्त बघूनच करतां ना तुम्ही?... ... काय?"
पोरं," मग? त्यात काय झालं?... ... तसं सगळेच करतात."
मामा," होय ना?... ... आतां मला असं सांगा, तुम्ही सगळे ’निखळ विज्ञानवादी’ म्हणवून घेता नां स्वतःला?"
पोरंपोरी,"आम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहोत."
मामा," नुस्ते विज्ञानाचे विद्यार्थी असून काय चाटायचंय्‌?... ... ...’विज्ञाननिष्ठ’ आहांत काय? आतां बोला... ... तुमच्यापैकी कुणाच्या घरांत लग्न-मुंज-बारसं-वास्तुप्रवेश-सत्यनारायण असलं एकतरी शुभकार्य अमावास्येचा मुहूर्त पकडून केलंय?"
पोरं," अमावास्या अशुभ असते मामा... ... ... शुभकार्याना ती तिथी चालत नाही... ... … "
मामा," कां चालत नाही? कुणीतरी कुडबुड्या पंचांगकर्ता म्हणतोय्‌ म्हणून?... ... ... ’अमावास्या अशुभ तिथी असते’ असं निरपवादपणे कुठल्या वैज्ञानिकानं सप्रमाण-सप्रयोग सिद्ध केलंय काय आजतागायत?  आणि कुणीच हा प्रयोग आजवर केलेला नसेल, तर विज्ञान प्रमाण मानून तुम्ही स्वतःच कां नाही करून बघितलात... ... ...ऑं?"
पोरांची आतां बोलती बंद झाली.!!... ... ... बघ्यांच्या गर्दीतले कांही टगे फिसफिसायला लागले... ... ...!!!
आतां मामा पूर्ण चंवताळले," वाचा बसली की काय लेको तुमची आता? की मघाच्या घोषणा विसरल्या?"
पोरं गप्पच..............
मामा," आणि अमावास्या अशुभ असते असं कुठल्या वेदात किंवा उपनिषदांत सांगितलंय्‌ ?... ... ... ज्ञानेश्वरीत तरी म्हटलंय काय असं?"
पोरं आतां ' त त प प ' करायला लागली.!!!!
मामा,"बोला... ... ... सगळी ऐहिक सुखं प्रदान करणारं दैवत म्हणजे महालक्ष्मी... ... ... बरोबर?"
पोरं," होय मामा"
मामा," हे दैवत कुठल्या तिथी ला आपल्या घरांत प्रवेश करून विराजमान होतं ?"
पोरं," म्हणजे काय?"
मामा," म्हणजे दरवर्षी तुम्ही लक्ष्मीपूजन करतां, त्या दिवशी कुठली तिथी असते ?"
सगळी  पोरं आतां सटपटली... ... लक्ष्मीपूजनाला बेदम फटाके उडवतात, याशिवाय कुणाला कसलीच माहिती नव्हती... ... !!
मामा," ठाऊक नाही तुम्हाला?... ... मी सांगतो... ... …  लक्ष्मीपूजन हे कृष्ण पक्षातल्या अमावास्येलाच केलं जातं... ... ... समजलं? आतां ज्या तिथीला ही महालक्ष्मी च आपल्या घरीं येते, ती तिथी तुम्ही बिनडोकपणे अशुभ मानता... ... … ते पण कुठलेतरी पोटभरू पंचांगकर्ते म्हणताय्‌त म्हणून !!! ... ... नाही? लेको, हा पोपटवाला फार बरा तुमच्यापेक्षा... ... ... तो स्वतःशी प्रामाणिक तरी आहे... ... ... हा तुमच्यासारखा बिनडोक नाही, दुटप्पीही नाही, शहाजोग ढोंगी पण नाही, आणि अंधश्रद्धाळू तर मुळीच नाही !!... समजलात? !!!!
हा बिचारा आपलं बलुतं पोटासाठी चालवतोय्‌, तर शहाजोगपणा करून त्याच्या पोटावर लाथ मारायला निघालात होय तुम्ही?"
कंपू आतां ’मामां’ चं पाणी चांखून भेंदरला... ... ... त्यातली कांही पोरंपोरी आपापल्या वाहनांकडं सरकायला लागली... ... ...
तसे मामा गरजले,"जातय्‌ कुठं असे पळून?" मग गर्दीला उद्देशून म्हणाले,"जाऊं देऊं नकां ह्यातल्या कुणालाच... ... ... ह्यांची पुरती बिनपाण्यानं करायची आहे मला.!!! "
झालं... ... गर्दीतल्या बघ्यांनी अन्‌ टग्यानीं सगळ्या सुटकेच्या वाटा अडवल्या... ... ...त्यांना फुकटातला तमाशाच बघायचा होता... ... आतां मामां नी पोरापोरींच्या कंपूवर तोंफ डागली,"तुमचा ’विज्ञानवाद’ मस्त बघितला सगळ्यांनी... ... … समोरच्या चौकातच माझा ट्रक उभा आहे ... आत्तांच मार्केट यार्डात माल उतरवून आलेला आहे... ... त्यांत आतां तुम्ही सगळ्यांनी मुकाट बसायचं... ... ..."
पोरंपोरी," कश्यासाठी?"
मामा," आणि तुमची ही ’अंधश्रद्धा निर्मूलना’ ची ’नवटंकी’ आतां तुमच्या प्रत्येकाच्या घरीं जाऊन घरच्यांसमोरच करायची.!!!... ... … ’मुहूर्त हटाव ... ... पंचांग हटाव’... ... अंधश्रद्धा हटाव.' !!!... ... ... काय?... ... ... अरे कोंकला की आतां !!!... ... ... की नरडी गळाठली तुमची?... ... ...ऑ?"
आतां पोरं चांगलीच घायकुतीला आली, नी कपाळांनां हात लावत एकमेकांकडं कावरीबावरी होऊन बघायला लागली... ...!!!

तसा मामानी ठेंवणीतला पहिलवानी आवाज काढला," आत्तांच ह्या पोपटवाल्याच्या पुढ्यात कां बसलो होतो ठाऊक आहे तुम्हांला?"
कंपू," ???????????????????????? "
मामा," सौरभ गोखले कोण आहे तुमच्यापैकी?"
एक घारं-गोरं पोरगं लटपटत पुढं आलं... ... ...," मी च."
मामा," ’फर्ग्युसन कॉलेज’ मध्ये शिकत होतास ना तूं?"
सौरभ," होय... ... ... पण ... पण तुम्हाला कसं माहीत?"
मामांनी शांतपणे खिश्यातला मोबाईल काढून कुठंतरी फोन लावला, अन्‌ बोलले," हं ये आतां लगेच... ... …  गर्दीच्या मधोमध.!!"
’स्कोडा ऑक्टाव्हिया’ चं दार उघडून ती मघांचीच चुणचुणीत पोरगी खाली उतरली, अन्‌ गर्दीच्या मधोमध शिरत ’मामां’ च्या जवळ जाऊन उभी राहिली.
कंपूतल्या पोरांवर आतां चड्डी सुटायची वेंळ आली !!!... ... ’सौरभ गोखले’ ला नेहमीच ह्या ’श्यामा’ बरोबर हिंडता-फिरतांना सगळ्यांनीच बघितलेलं होतं... ...!!!
’सौरभ गोखले’ नं लटपटत भर गर्दीसमोर आपल्या कपाळाला हात लावला. !!!
मामा," मी भीमाप्पा गायकवाड... ... ... हिचा बाप... हिला ओळखतोस ना?"
सौरभ गोखले," @@ @@@..... &&& ......."
मामा कडाडले ," दांतखीळ बसली काय तुझी?... ... …  ही माझी मुलगी ’गौरी’... ... तुझ्याच कॉलेज ला होती... ... ओंळखतोस की नाही हिला?"
सौरभ गोखले," **** ...... .... ?????? "
मामां ची तोंफ आतां पोरांच्या कंपूवर डोंळे वटारत कडाडली," आतां कान उघडे ठेंवून नीट ऐका मी काय बोलतोय्‌ ते... ... ..." 
मामा सौरभ अन्‌ गौरी कडं बोंट रोंखत कंपू ला म्हणाले,"... ... ही दोन्ही पोरं एकमेकांबरोबर हिंडतात फिरतात... ... माहीत आहे ना?... ... काय?"
कंपू चांचरायला लागला," होय... ... म्हणजे... ... ... बघितलंय्‌ आम्ही... ... बर्‍याचवेळां... ... "
मामा," मी स्वतः शेतकी विषयात एम्‌. एस्सी. केलेली आहे... ... ही माझी मुलगी उच्च श्रेणीत मायक्रोबायोलॉजी घेऊन एम्‌. एस्सी. झालेली आहे... ...सध्या पी. एच्‌. डी. करतीय्‌ ... ... ... "
कंपू," ?????? ... #### ... ..."
मामा," आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करायच्या आणाभाका पण घेतल्याय्‌त... ... … हे पोरगं तसं चांगलं आहे... ... माहीत आहे मला... ... ... आणि माझ्या पोरीलाही चांगली मातब्बर तालेवार स्थळं उड्या मारत पत्करायला तयार आहेत !!!... ... ... दिसतंय्‌ ना?"
कंपू," #### ... ... &&&&& ... ..."
मामा," आतां ’ह्या’ च्या आईबापां ना ’गायकवाड’ घराण्यातली पोरगी कां चालत नाही, आणि कुठल्यातरी ’आपटे-गोगटे-दामले’ असल्या आडनावांच्या घराण्यातली च कां लागते... ... ... ते तुमच्या कुडबुड्या पंचांगकर्त्यांना पण ठाऊक नाही, ... ... ... आणि ’ह्या’ च्या आईबापां ना पण उमगलेलं नाही... ... !!
आतां ह्या ’गोखले’ च्या आईबापां ना पण जे धड समजलेलं नाही,  ते ह्या पोपटाला समजलंय्‌ काय ते बघायला इथं आलो होतो... ... ...!!!! काय? "
पोरांच्या कंपू ची वाचा च बसली... !!!!
मामा," थोडक्यात तुम्हांला आतां ’ह्या’ च्या आईबापां चं च ’अंधश्रद्धा निर्मूलन’ करायचं आहे !!!! "
पोरापोरींना आतां हुडहुडी भरली... ...!!!
मामा," तेव्हां तुच्या सगळ्यांच्या घरात तुमची ही ’नवटंकी’ करून झाली, की शेंवटचा प्रयोग ह्या ’गोखले’ च्या आईबापां समोर करायचा आहे... याद राखा. !!!
तुमची ’नवटंकी’ बघून जर त्यांचं ’अंधश्रद्धा निर्मूलन’ झालंच, तर ह्या दोघांच्या लग्नात मी तुमचा फेटे बांधून सत्कार करणाराय्‌... ... ... आणि गावात मिरवणूकही काढणाराय्‌ तुमची... ...!!!!
आणि इतकं करूनही जर त्यांच्या ’अंधश्रद्धा’ नाहीच वितळल्या, तर तुमची सगळ्यांची गाढवांवर बसवून गावातनं धिण्ड पण काढणाराय् ‌... ... समजलात? !!!!!
’अंधश्रद्धा निर्मूलन’ करायला निघालाय्‌ ना तुम्ही... ... ऑं?... ... ... तुमची धमक तरी काय आहे ती बघतो की जरा... ... ...काय?!!!!
चला बसा मुकाट ट्रकमध्ये सगळ्यांनी. !!!! "
कंपूतल्या त्या अतिउत्साही प्रसिद्धीतत्पर पोरांपोरींना आतां ब्रह्माण्ड आंठवलं... ... ...!!!
एकजात सगळी शेंपट्या पायात घालून समोर उभ्या ठांकलेल्या ’पहिलवान मामां’ कडं केंविलवाण्या नजरेनं बघायला लागली. !!!
आतां पोपटवाला ’होरामार्तण्ड’ ही खदांखदां हंसत कपाळाला हात लावून त्या पोरांपोरींच्या कंपूकडं डोंळे फाडफाडून बघायला लागला... ... 
जातिवंत ’पोपटां’ चा एव्हढा मोठ्ठा थवा त्यानं उभ्या हयातीत प्रथमच बघितला असावा. !!!! 
आणि ’पहिलवान मामां’ चं ते खणखणीत ’अंधश्रद्धा निर्मूलन पथनाट्य’बघून आवाक्‌ होऊन कपाळाला हात लावत मग मी पण घरचा रस्ता धंरला. !!!!!

************************************************************
रविशंकर.
३१ मार्च २०१४.

No comments:

Post a Comment