Search This Blog

Sunday, 4 May 2014

॥ फिफ्टी-फिफ्टी ॥

॥ फिफ्टी-फिफ्टी ॥




" मेहताजी, मला असं सांगा," जनरल मॅनेजर वाघमारे म्हणाले," सरकारची बांधकामाच्या चटई क्षेत्रफळासंबंधी जी काय नियमावली सध्या अस्तित्त्वात आहे, तिच्यात बदल होण्याची शक्यता कितपत आहे नजीकच्या काळात? "
"म्हणजे?", थोडा खुलासा करा... ... ... मला नीटसं कळलं नाही तुमचा मुद्दा काय आहे तो.", मेहता नी उत्तर दिलं.
’अलाईड रीअल इस्टेट्स्‌ लि.’ आणि ’मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌ प्रा. लि.’ ह्या दोन बलाढ्य कंपन्याच्या उच्चाधिकार्‍यांत ’ग्रॅण्ड रीजन्सी आर्केड’ नावाच्या प्रस्तावित महाकाय गृहप्रकल्पाच्या बांधकाम कंत्राटासंबंधी निकराच्या वाटाघाटी चाललेल्या होत्या... ... ...वातावरण चांगलंच तांपलेलं होतं.
दोन्ही बाजूं चे निरनिराळ्या खात्यांतले पन्नासएक कुशल मुरब्बी अतिरथी-महारथीं शस्त्रास्त्रं परजून वाटाघाटींच्या त्या रणमैदानात प्राण पणाला लावून परस्परांशी लढत होते.
बाराशे कोटी मूल्याच्या त्या रणांगणावर क्षणाक्षणाला लक्षावधी रुपयांच्या रकमा त्या सौद्यात पणाला लागत होत्या, अन्‌ क्षणार्धांत जिंकल्या-हरल्याही जात होत्या.!!
मला घालून दिलेल्या रकमेच्या लक्ष्मणरेषेवरच ही सुंदोपसुंदी चाललेली होती... ... ...  
अलाईड रीअल इस्टेट्स्‌ लि. च्या त्या भव्य बैठक दालनांत जणूं कुरुक्षेत्रावरचं निकराचं महायुद्ध रंगलेलं होतं.
आणि हे सगळं महानाट्य चेंहर्‍यावरची सुरकुतीही बिल्कुल ढंळूं न देतां मी मख्खपणे बघत बसलो होतो. !!!!
गंमत म्हणजे ’अलाईड रीअल इस्टेट्स्‌ लि.’ चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. जगजीत सिंह अरोरा यांनी तंसलंच काम मोठ्या विश्वासानं माझ्यावर सोंपवलेलं होतं. !!!

हा जगजीत सिंग अरोरा म्हणजे माझा अभियंत्रिकी महाविद्यालयातला लंगोटियार.
अभियांत्रिकी च्या चारही वर्षांतल्या प्रत्येक परीक्षेत पहिल्या-दुसर्‍या मानांकनासाठी त्याची-माझी अश्याच प्रकारची निकराची लढाई व्हायची.
अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचं लेणं जन्मतःच लाभलेला हा माझा लंगोटियार... ...माझ्यासोंबत एकाच खोंलीत नांदलेला.
खेळाच्या मैदानावर माझ्याबरोबर राज्य पातळीपर्यंत हॉकी-फुटबॉल ची मैदानंही गाजवलेला हा हाडाचा दिलदार पंजाबी गडी, बघतां बघतां केंवळ वीस वर्षांतच मॅनेजिंग डायरेक्टर च्या मानाच्या खुर्चीत विराजमान झालेला होता.
पदवी मिळाल्यावर कांही वर्षं नोकरीत घालवून मी ’प्रोजेक्ट्स्‌ कन्सल्टन्सी’ सुरूं केली... ... ...अधनं मधनं पुण्यातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत ’बाह्य अधिव्याख्याता’ म्हणून मी शिकवायला पण जात असे.
दोघांचं कार्यक्षेत्रही औधोगिक विश्वाशी संलग्न असल्यामुळं तिथं गांठभेंट पण व्हायची कधीकधी.
पण कौटुंबिक स्तरावर मात्र नेहमीच एकमेकांच्या घरीं येणंजाणं व्हायचं... ... ...क्वचित्‌ मुक्कामही पडायचे, ह्या चं कारण मात्र वेगळं होतं.
जगजीत चे आईवडील त्याच्या लहानपणींच एका अपघातात दगावलेले होते, आणि त्याला मावशीनं वाढवलेला होता.
त्याच्या मावशी लुधियाना ला असायच्या, त्यामुळंच असेल कदाचित, पण ह्या सरदारजीं चा माझ्यावर सख्ख्या भावासारखा जीव होता.
माझ्यापेक्षा तो आठ महिन्यांनी लहान, त्यामुळं त्याचं सौ. इंदिराजींच्या कॉलेजातल्या कुणा मुलीबरोबर जेव्हां गूळपीठ जमलं, तेंव्हां ह्या पठ्ठे सरदाराच्या लग्नाची बोलणी करायला त्याच्या वतीनं मी अन्‌ सौ. इंदिराजी च गेलो होतो... ... आमच्या वयाच्या सव्विसाव्या वर्षीं. !!
गंमत म्हणजे ह्या दिलदार सरदारजी चा सफाचट त्रिफळा उडवणारी ती बया चक्क एक घारी-गोरी पण देंखणी अस्सल पुणेकर ’बामणी’ होती. !!!!
जगजीत एकुलता एक च असल्यानं त्याच्या लग्नाचं देवकही आम्ही दोघांनीच पार पाडलं. 
आणि ह्या सरदारजी-भटणी च्या वरातीपुढं ’बल्ले बल्ले’ करत घाम फुटेंस्तोंवर भांगडाही घातला. ह्या च ’बामणी’ चं त्यानं यथासांग-यथाविधी ’राजिंदरकौर’ असं नांव बदलून एका झंटक्यात पंजाबीकरण करून टाकलं.
ह्या आमच्या सध्याच्या ’रज्जूभाभी.’
हळूंहळूं रज्जूभाभीं पांचवारी नेसण्याचं विसरून पंजाबी सलवार कुर्ता वापरायला लागल्या... ... ...
मटण-कोंबड्यांचे चंमचंमीत कबाब भाजायला शिकल्या... ... ...
पाव पाव किलो वजनाचे मख्खन फांसलेले पंजाबी पराठे पण थांपायला लागल्या... ... ...
पुढच्या चार-सहा महिन्यातच ह्या ’सदाशिवपेंठी बामणी’ चं सणसणीत पंजाबी बाई त बघतां बघतां परिवर्तन झालं. !!!
आणि जगजीतची अन्‌ माझी खाण्यापिण्याची जन्मभराची चंगळ झाली.
रज्जूभाभीं चे कबाब रिचवून जगजीत ऊर्फ जग्या कंटाळला, की माझ्या घरीं हे जोडपं सौ. इंदिराजीं च्या झंणझंणीत कामाठी बिर्याणी वर आडवा हात मारायला यायचं. आणि सौ. इंदिराजींच्या बिर्याणी नं माझी जीभ जळजळायला लागली, की आम्ही दोघे रज्जूभाभीं च्या पराठ्यावरचं लोणी जिभेवर फांसायला जग्याकडं जायचो.   
एकूण सगळं मस्त तब्येतीत चाललेलं होतं. 

जग्या चा मला पंधराएक दिवसापूर्वी फोन आला," हाय ’ऍरिस्टॉटल’... ... ...काय म्हणतोय्‌स साल्या?... ... ...कसं काय चाललंय्‌?"
मला मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानाची पण आवड असल्यामुळं जग्या मला ’ऍरिस्टॉटल’ म्हणून हांक मारायचा.
"मस्त चाललंय्‌ की... ... ...",  मी ," काय काम?... ... ...जीभ ’लोणकढी’ झालीय्‌ की काय तुझी?" 
जगजीत," माझ्या ऑफिसात भेंटूं या दहा वाजतां... ... ...जरा निकडीचं काम आहे तुझ्याकडं."
मी," सरदारजी झालाय तुझा पुरता... ... ...अकरा वाजतां मला लेक्चर आहे यार... ... ...संध्याकाळीं बोटक्लबवर भेंटूं या... ... ...तिथंच बोलूं."
जगजीत,"तुझं प्रवचन गेलं उडत साल्या... ... ...इथं गळ्याशी आलंय सगळं माझ्या... ... ...मुकाट येणाराय्‌स?... ... ...की रज्जू ला सांगूं फोन करायला ’इंदिराजी’ नां?"
मी,"जग्या... ... ...लेका पोंटापाण्याचा उद्योग तरी करूं की नको मी? हे... हे काय चालवलंय्‌स तूं... ... ...ऑं? "
जगजीत,"तुझी सहकुटुंब पोंटापाण्याची व्यवस्था रज्जू लावतीय... गाडी काढून केंव्हांच निघालीय इंदिराजी ना आणायला... ... ...समजलं?"
मी," म्हणजे?"
जगजीत,"म्हणजे रज्जू तुझ्या घरीं थंडकायच्या आंत इंदिराजी नां ’स्वयंपाक रहित’ म्हणून सांगून टाक लगेच... ... ...आणि माझ्या गाडी त बस झंटक्यात... ... ...नाहीतर दोघींकडून मार खाशील फुकट !!!!... ... ...काय?"
मी," जग्या साल्या माझ्यापेक्षा तब्बल आंठ महिन्यानी लहान आहेस... ... ...लक्ष्यांत ठेंव."
जगजीत," धोबीपछाड मारलीय की नाही बरोबर तुला?"
मी कपाळाला हात लावत ’जग्गूदादा’ च्या धमकीपुढं तत्क्षणीं नांगी टाकली," येतो बाबा... येतो... ...पण झालंय काय एव्हढं, ते तर सांगशील?"
जगजीत,"गाडी पांठवलीय मी घरी... ... ...इथं आलास की सांगतो सगळं... ... ...ठीक?"
सौ. इंदिराजी नां मी ’स्वयंपाक रहित... ... रज्जूभाभी येताय्‌त’ असा जग्या चा निरोप दिला, आणि कपडे बदलायला बेडरूम कडं धूम ठोंकली.!!!

जिना उतरेंस्तोंवर, जगजीत चा चालक त्याची गाडी घेंऊन हजर झालाच.
जग्याच्या मर्सिडीझ च्या आसनावर जरा ए.सी. चा गारवा खाल्ल्यावर माझं चित्त ठिकाणावर आलं... ... ...काय झालं असावं नेमकं?
कांहीतरी कळीचा मुद्दा असल्याशिवाय जग्या मला असा कंचाट्यात धंरून पकडवॉरण्ट बजावणार नाही, एव्हढं नक्की होतं.
आतां जग्यानं च सांगितलेलं होतं की ’रज्जूभाभी’ सौ. इंदिराजी ना न्यायला निघाल्याय्‌त’ तेव्हां त्या बाबतीत तरी कसली काळजी नव्हती... ... ...
तेव्हां हे आमच्या उद्योगांशीच संबंधित कांहीतरी लचाण्ड असावं एव्हढा अंदाज मला आला, अन्‌ मी बैठकीवर जरा रेंलून बसलो.
" सर... ... सर, उठा, ... ... कंपनीत पोंचलोय आपण.", ... ... ...जगजीत चा चालक गाडीचं दार उघडून मला हांका मारीत होता.
मी पटकन्‌ उतरून बॅग उचलली, अन्‌ जग्या चं ऑफिस गांठलं.
जग्याच्या सचिवे नं मला त्याच्या खोंलीत बसवत सांगितलं की," सर चेअरमन साहेबांच्या बरोबर बसलेत, दहा मिनिटांत येतील."

जग्याच्या टेबलावर वीसएक फायलींचा ढिगारा पडलेला... ... ...फिरत्या खुर्चीशेंजारी जमिनीवर पण दोन फायली लोंळत होत्या... ... ...
मामला चांगलाच गंभीर असणार एव्हढं मला समजलं... ... ... ... आणि कुठल्यातरी रणमैदानात खांद्याला खांदा लावून उतरण्यासाठी त्यानं माझी घरातनं उचलबांगडी केलेली आहे एव्हढं माझ्या लक्ष्यात आलं.

तेंव्हढ्यात जग्गूदादा स्वतःच हजर झाले," हे बघ ’ऍरिस्टॉटल’... ... ..."
मी," जग्या... ... ...मला घरातनं ’उचललाय्‌स’ एव्हढं लक्ष्यात ठेंव... ... ...आणि मी ह्याचं बरोबर उट्टं पण काढणाराय... ... ...याद राख."
जगजीत," उट्टं गेलं तेल लावत", जगजीत मेजावरच्या ढिगाकडं बोंट दाखवत म्हणाला,"एकदा ’ह्या’ चं श्राद्ध घातलंस ना, की मग हवंतर लाथा खातो तुझ्या... ... ... 
वाटलं तर रज्जू ला पण येतो घेऊन जोडीनं लाथा खायला... ... ...कळलं? पण इथं माझं च राज्य चालतं... ... ...काय?"
मला लक्ष्यांत आलं... ... ...मामला खरंच गळ्याशी आलेला दिसत होता. !!!
मी," काय झालंय काय जग्या?", मी नोकरानं समोर ठेंवलेला चहाचा कप तोंडाला लावत विचारलं.
जगजीत,"सांगतो... ... ...मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌  प्रा. लि. माहीत आहे ना?"
मी," हो... माहीत आहे की... ... ...चांगली नामांकित भक्कम कंपनी आहे."
जगजीत,"हा आमचा ’ग्रॅण्ड रीजन्सी आर्केड’ प्रकल्प आहे ना कामशेट ला सुरूं होणाराय तो."
मी," हूं... ... ...त्याचं काय?"
जगजीत," त्या प्रकल्पाच्या बांधकाम कंत्राटाची निविदा ह्या मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌ प्रा. लि. नं भरलेली आहे, आणि त्याच्या वाटाघाटी दुपारी दोन वाजतां सुरूं होणाराय्‌त... ... ...म्हणून इंदिराजीं ची सोय लावून तुला तातडीनं घरातनं उचलला... ... ...कळलं?"
मी," अरे पण वाटाघाटी करण्यासाठी सगळ्या प्रकारचे तज्ञ तुझ्याकडं आहेतच की... ... मला उचलायची गरजच काय तुला?... ... ...आणि ही कंपनी पण तशी भक्कम आणि नावाजलेलीही आहे."
जगजीत," आणि नेमकी इथं च सगळी गोची झालेली आहे.!!"
मी," म्हणजे?"
जगजीत," सांगतो... ... ...तोच काथ्याकूट करत आत्तां चेअरमन बरोबर बसलो होतो... ... ...कळलं काय, मामला किती गंभीर आहे ते?"
मी,"होय... ... ...कळलं."
जगजीत," आतां फक्त नीट ऐक मी काय सांगतोय ते."
मी कान टंवकारत संरसावून बसलो... ... ...
मामला असा होता.
हा प्रकल्प एकूण बाराशे कोटी रुपये मूल्याचा होता. यापैकी दोनएकशे कोटीं च्या जबाबदार्‍या कंत्राटाच्या ’सर्वसामान्य अटी’ त सामावलेल्या होत्या.
सुमारे दीडशे कोटीं चा बोजा हा ’विशेष अटी नी दण्डात्मक तरतुदी, अनामत आणि सुरक्षा ठेंव’ इ. चा होता.
प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च सुमारे सहाशे ते सातशे कोटीं च्या घरातला होता.
आणि दीडशे ते अडीचशे कोटीं चा नफ्याचा आकडा होता.
ह्या प्रकल्पासाठी ह्या कंपनी नं सुरुवातीला साडेबाराशे कोटीं ची निविदा भरलेली होती. 
त्यांच्या स्पर्धक कंपन्यांच्या निविदा अकराशे तीस ते अकराशे ऐंशी कोटीं च्या दरम्यान होत्या.
पहिल्या फेरीत च ह्या मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌ प्रा. लि. नं घसारा वाढवत आपली निविदा अकराशे कोटीं वर आणून बाकी सगळ्यांचा पत्ता कापलेला होता.!!!
आणि आज ह्या कंपनीबरोबरच चर्चेच्या दुसर्‍या फेरीचं रणकन्दन आयोजित केलेलं होतं. 
इतकं सांगून जगजीत म्हणाला," आतां कळीचा मुद्दा नीट ऐक ’ऍरिस्टॉटल’.
पहिल्या फेरीत ह्या कंपनीनं काय केलंय, की बांधकाम खर्चाचं बजेट साधारण सातशे कोटीवरून साडेपांचशे पर्यंत उतरवलेलं दिसतंय मला, 
पण सामान्य अटी आणि विशेष अटी वगैरेच्या बजेट मध्ये आम्हाला टांगा मारून दुसर्‍या बाजूनं सुमारे दोनशे कोटीवर डल्ला मारलाय... ...
त्यामुळं नक्त नफाही दीडशे कोटीवरून शंभर कोटीपर्यंत उतरव‍लेला दिसतोय...आणि एकूण निविदा अकराशे कोटीवरच तंटवून धंरलीय... ... ...समजलं नीट?"
मी," हो... ... ...समजलं."
जगजीत," आतां झालंय काय की ह्या अटीं-बिटी पायीं जो बोजा धंरलेला असतो, तो कांही खरोखरीचा प्रत्यक्ष खर्च नसतोच. त्यामुळं झालंय असं की ह्या कंपनी नं आम्हाला कंचाट्यात धंरलंय... ... ...बांधकामाच्या खर्चाची निविदा सर्वात कमी खर्चाची दिसतेय, 
पण ती कंपनीला तशी ह्याच्या स्पर्धकांच्या खर्चापेक्षाही महागात पडणार आहे... ... ... 
साधारण दीडएकशे कोटीं चा हा फटका आहे, फक्त सकृद्दर्शनी तो दिसत नाहीय इतकंच. 
आणि ही निविदा जर सगळ्यात स्वस्त ठरली, तर संचालक मंडळ हिला च मान्यता देणार.
हे असलं उलटं लचाण्ड होऊन बसलेलं आहे !!!... ... ... समजलं?"
मी," होय, आलं लक्ष्यात सगळं."
जगजीत," दुसरी गोची अशी आहे की आमच्या चेअरमन ना कुठून तरी वास लागलाय की ही मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌ लि. कंपनी, त्यांच्या इतर तीनचार कंत्राटांत कोर्टकचेर्‍यांच्या जंजाळात फंसलेली आहे‌... ... ...त्यांना खेळत्या भांडवलाचा जाम तुटवडा पडलाय... ... ... त्यामुळं आमच्या कंत्राटातनं ते तो उभा करायला बघतायत, आणि त्यापायीं च बेदम स्पर्धा करून बाकीच्यांचे पत्ते त्यांनी कांपून टाकलेले आहेत‌... ... ... ठीक?"
मी," समजलं‌... ... ...पण ह्या मेहता-बोरा ची तूं पण सफाचट हजामत करूं शकतोस की मैदानात उतरून‌... ... ... माझं काय काम?"
जगजीत,"हजामत करायला आमचे वाघमारे पण पुरेसे आहेत यार‌... ... ... पण ह्यातही दोन गोच्या आहेत. पहिली म्हणजे मला यांची हजामत करायचीच नाही... ... ... मला ह्या मेहता-बोरा ची शिकार करून पुरता फडशा पाडायचाय‌... ... ...कळलं? चेअरमन तर म्हणतायत की हे डॅंबीस लोक परत कधीही इथं निविदा भरायला यायचं धाडसच करतां कामा नयेत."
मी," ठीकाय्‌‌... ... ...  कळलं. दुसरी?" 
जगजीत," दुसरी गोची अशी की आजच्या बैठकीला ह्या कंपनीचा कार्यकारी संचालक स्वतःच बाह्या सरसावून येणाराय... ...चेतन मेहता‌... ... ... टर्फ क्लब ला दिसतो बर्‍याचवेळा मला‌... ... ... तशी ओंळखपाळख नाही कांही, पण हा चेतन मेहता जातीचा लांडगा आहे‌... ... ... वाघ नव्हे !!! ...समजलं?"
मी," हो.‌... ... ... मग?"
जगजीत," आतां असं बघ ’ऍरिस्टॉटल’, हा लांडगा नुस्त्या चेंहर्‍यानं कां होईना पण मला ओंळखत असेल‌... ... ...आणि मला बघितलं की तो सावधही होईल‌... ... ...
पण तुला मात्र तो अजिबात ओंळखत नाही‌... ... ...आणि माझा हुकुमी पत्ता असा आहे की‌... ... ..."
मी," काय आहे बाबा तुझा हुकुमी पत्ता?"
जगजीत," साल्या आख्खी हयात निविदांच्या हाणामार्‍यांत घालवलीस तूं... लांडग्यांच्या शिकारीत तुझा हात धंरणारा आहे काय कुणी पुण्या-मुंबईत?‌... ... ...ऑं?
म्हणून तुला होतास तसा उचलून आणलाय इथं‌... ... ...ह्या मेहता-बोरा चा पार लोळागोळा करून ठेंवायचाय तुला.!!! 
’तूं करशील ती पूर्व’ असं चेअरमन चं वचन मिळवून आलोय मी‌... ... ...काय? 
आणि मी इथंच बसून व्हीडिओ पडद्यावर ही तुझी लांडगेतोड बघणाराय पठ्ठ्या‌... ... ...बेस्ट लक्‌. !!!"
मी," बघतो बाबा प्रयत्न करून‌... ... ...मला एक सांग किती कोटीच्या खाली बांधकाम मूल्य घंसरायला लागलं की मी रिंगणात घुसायचं?"
जगजीत," हे बघ...माझा आंकडा आहे साडेपांचशे‌... ... ...चेअरमन म्हणताय्‌त लगेच घुसा‌... ... ...तूंच काय तो निर्णय घे."

आणि म्हणूनच मी तो सगळा तमाशा मख्ख चेंहर्‍यानं बघत बसलो होतो. 
बांधकाम मूल्य सहाशे कोटी च्या लक्षमणरेषेवर घोंटाळत होतं, आणि वाघमार्‍यांनी तो चटई क्षेत्रफळाचा मुद्दा उपस्थित केला होता. 
वाघमारे," काय आहे मेहताजी, समजा आज ह्या भागातल्या जमिनींना १.० निर्देशांक लागूं आहे‌... ... ...बरोबर?"
मेहता," होय बरोबर."
वाघमारे," समजा, हा कंत्राटाचा करार झाल्यावर तो दहा टक्के वाढला तर वाढीव चटई क्षेत्रफळाचं काय होणार?"
मेहता," सरळ आहे वाघमारे साहेब‌... ... ...अर्धं तुमचं अर्धं आमचं‌... ... ...’फिफ्टी-फिफ्टी’."
वाघमारेंच्या घोंडचूक लक्ष्यात आली, पण फार उशीर झाला होता‌... ... ...
ह्या हावरट निर्ल्लज्ज लांडग्यानं कंपनीच्या मालकीच्या जमिनिवर मिळणारं पन्नास कोटींचं ज्यास्तीचं चटई क्षेत्रफळ दमडी चा मोबदला न मोजतां बघतां बघतां खिश्यात घातलं होतं.!!!‌... ... ...भर बैठकीत.
तरी वाघमार्‍यांनी सांवरायचा प्रयत्न केलाच," असं कसं म्हणताय तुम्ही मेहताजी?‌... ... ...असं कसं होईल?"
चेतन मेहता नं वाघमार्‍यांच्या तोंडाला पानं पुसली," त्याचं काय आहे वाघमारे साहेब‌... ... ...ह्या प्रकल्पात आपण बरोबरीनं भाग घेणार ना? मग हे च व्यवहाराला धंरून रास्त होणार नाही काय? फिफ्टी-फिफ्टी... ... ... अगदी सरळ आहे."

आतां मात्र हद्द झाली‌... ... ...मी खुर्ची सोंडून उठलो, नी चेतन मेहताच्या समोरच्याच खुर्चीत ठाण मांडलं. 
मी,"मण्डळी नमस्कार‌... ... ...’बैठक संपली’ असं मी जाहीर करतो." 
मग चेतन मेहताकडं हस्तांदोलासाठी हात पुढं करीत म्हटलं," शुभरात्री मि. मेहता... ... ... निविदा मी रद्द केलेली आहे." !!!
चेतन मेहता उडालाच," काय झालं साहेब‌?... ... ...म्हणजे... आपला परिचय नाही म्हणून विचारतो."
जगजीत नं सकाळीच तात्काळ छापवून आणलेलं व्हिजिटिंग कार्ड मी शांतपणे मेहताच्या हातात दिलं.
आणि चेतन मेहताला जागच्या जागीं फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं. !!
कार्डावर सुबक देंखण्या छपाईत लिहिलेलं होतं. 

श्री. रविशंकर
अध्यक्षांचे प्रकल्प सल्लागार
अलाईड रीअल इस्टेट्स्‌ लि.

मी चेतन मेहताच्या कार्डावरची अक्षरं वाचणार्‍या बेरकी डोंळ्याकडं रोंखून बघत होतो... ... ... 
त्याची नजर वर होत माझ्या नजरेला भिडली न्‌ मी हिटलर च्या थण्डगार नजरेनं त्याच्याकडं बघितलं... ... ...एक क्षणभरच त्या वांसलेल्या बाहुल्यात मरणप्राय भीति तंरळली, नी परत लांडग्याचा खुनशी हिंस्रपणा दिसायला लागला.
मी तत्क्षणीं सांवध झालो... ... ... बेंसावध राहून जिवावर बेतणार होतं... ... ... कसलेला लाण्डगा होता हा.!!
माझं व्हिजिटिंग कार्ड त्याच्यापेक्षा वजनदार असलं, तरी त्याचे सुळे त्याहीपेक्षा धारदार दिसत होते.!!!
आपली एक चाल चुकली, तर क्षणार्धात आपल्या नरडीत ते कच्‌कन्‌ रुतणार, ह्यात मला तिळमात्र शंका राहिली नाही.!!!!
जग्या चा अंदाज अचूक होता... ... ... ह्या लांडग्याचा चेंदामेंदा करायला खरंच मजा येणार होती. 

पण माझं अन्‌ जग्याचं काम झालेलं होत... ... ...लांडगा बरोबर माझ्या तांवडीत सापडलेला होता. !!!!

चेतन मेहता," अशी तंडकाफडकी निविदा कां रद्द करताय सर? बांधकाम निविदा ५५० कोटीपर्यंत खाली आणलीय आम्ही तुमच्यासाठी."
मी," म्हणूनच निविदा रद्द करतोय मी .. ... ..."
चेतन मेहता," हा आमच्या कंपनीसाठी प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे सर."
मी चेतन मेहताला पहिली बेदम टांग मारली," सात टक्के तोटा खाऊन प्रतिष्ठा जपतेय काय तुमची कंपनी?"
चेतन मेहता साफ उताणा पडला. !!!
मग उठून उभं रहायची त्याची धडपड सुरूं झाली," असं कसं म्हणताय सर? ५५० कोटीमध्ये थोडाफार नफा निघणाराय आम्हांला... ... खूप कष्ट घेतलेत सर आम्ही ह्या निविदेसाठी."
मी," असं? थोडाफार नफा म्हणजे किती टक्के साधारण?"
चेतन मेहता," ते कसं सांगतां येईल सर आम्हाला? पण निघेल."
मी मेहताला परत सांवरायच्या आंत आतां दुसरी बेदम टांग मारली," थोडाफार नफा कांढून ५५० कोटीत हे काम करणारी दुसरी कंपनी हजर करा माझ्यासमोर... ... ... तुमचं कमिशन चार टक्के वर देतो तुम्हाला‌... ... ... करार आम्ही दुसर्‍या कंपनीबरोबर करूं‌... ... ...काय?"
चेतन मेहता च्या तोंडाला आतां फेंस यायला लागला‌... ... ...
घाम पुसत त्यानं बसकण मारायच्या आधीच मी तिसरी टांग मारली," बघा मि. मेहता‌... ... ...कांहीही न करतां साडे बावीस कोटी खिश्यात घालतोय तुमच्या‌... ... ...नाही? काय म्हणताय?‌... ... ...बोला."
चेतन मेहता खिश्यातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसत विचार करायला लागला‌... ... ...!!!
तशी त्यानं तोंड उघडायच्या आंतच मी चौथी टांग मारली,"तरीपण मि. मेहता, हा प्रकल्प प्रतिष्ठेचा आहे असं तुम्ही च म्हणताय्‌‌... ... ...आणि तुमच्या कंपनीची कीर्ति पण आम्ही ऐकून आहोत. तेव्हां अजून एक संधी मी तुम्हाला देऊं शकतो‌... ... ...चालेल?"
मेहता नं तत्क्षणीं गळ मटकावला," आम्ही तयार आहोत सर‌... ... ...काय करायचं?"
मी,"फक्त हा बांधकामाचा भाग तेंव्हढा बाजूल ठेंवूं आपण...ते गुर्‍हाळ ह्या लोकांना घालूं देऊं. आपण दोघे उरलेल्या भागावर पुन्हां चर्चा करून शिक्कामोर्तब करूं‌... ... ...हवं असेल तर तुमचे वित्तमंत्री घ्या बरोबर, माझ्याबरोबर वाघमारे बसतील. पण बोलायचं फक्त तुम्ही नी मी च.‌... ... ...चालेल तुम्हाला? 
खरं तर असल्या प्रस्तावाला मला साहेबांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, पण मी बघून घेईन काय ते‌... ... ...चेअरमन माझा शब्द खाली पडूं देणार नाहीत एव्हढी खात्री आहे मला‌... ... ...पण माझी एक अट आहे."
चेतन मेहताच्या नजरेत परत लांडगा डोंकावला," चालेल सर‌... ... ...अट काय आहे तुमची?"
मी,"आपल्याला शंभरटक्के पारदर्शकता पाळावी लागेल‌... ... ...आहे तयारी? ‌... ... ...नसेल तर ही निविदा रद्द करण्याखेंरीज दुसरा उपाय दिसत नाही मला."
मेहतानं मी टाकलेला गळ गप्पकन्‌ गिळला‌... ... ... लांडग्याच्या शिकारीचं तंत्र असंच असतं.
मेहता," चालेल सर...कुठं बसायचं?"
मी," ह्या शेंजारच्या मेजावर...ह्या गोतावळ्याचं चालूं राहील पुढं‌... ... ...चला."

आम्ही चौघे शेंजारील टेबलावर खुर्च्या ओंढून स्थानापन्न झालो‌... ... ...एका बाजूला चेतन मेहता नी त्यांचे वित्तमंत्री...दुसर्‍या बाजूला मी नी वाघमारे.
चेतन मेहता स्थिरस्थावर व्हायच्या आंत मी च पहिला धक्का दिला, " हे बघा, मि. मेहता तुम्ही म्हणताय खरे थोडाफार नफा सुटेल म्हणून, पण हे जरा चिंतेचं च काम दिसतंय मला... ... ...काय? आतां हे कंत्राट एकतर तुम्हाला द्यायचं अथवा रद्द करायचं एव्हढे दोनच पर्याय माझ्यापुढं आहेत‌... ... ...आलं लक्ष्यात?
सुरक्षा ठेंव आणि बाकीचे साडेतीनशे कोटी सध्या राहूंद्यात बाजूला‌... ... ... ते तुम्हाला वर्क ऑर्डर घेंतांना भरायचे आहेत.
पण तुम्ही जर अनामत रकमेचे दोनशे कोटी भरत असलात लगेच,  तर बघूं या‌...फक्त एकच अट आहे आमची‌... ... ...ही संधी जर तुम्हीच माघार घेंऊन सोंडून दिलीत, तर मात्र अनामत रक्कम तुम्हाला परत मिळणार नाही...ठीक?"
लांडग्याचे वित्तमंत्री चंमकून त्याच्याकडं बघायला लागले‌... ... ...पण त्याची लाळ गळायला केंव्हाच सुरुवात झाली होती.!!!
वित्तमंत्री," मेहता साहेब, मी काय म्हणतो‌... ... ..."
वित्तमंत्र्याला हातानंच गप्प बसवत चेतन मेहता म्हणाला," ठीकाय सर‌... ... ... चालेल."
वित्तमंत्र्यानं दोनशे कोटींचा चेक मेहता ची सही घेंऊन माझ्याकडं सरकवला. मी तो वाघमारें ना देंत म्हटलं," अकाउंट्स मॅनेजर कडं पाठवून द्या लगेच."
मग चेतन मेहताची कत्तल करायला त्याच्याकडं मोर्चा वळवला," मि. मेहता, आतां राहिला नक्त नफ्याचा भाग...बोला, किती कोटीं चा आकडा आहे तुमचा?"
चेतन मेहता," सर ज्यास्तीत ज्यास्त दहा टक्के कसेबसे सुटतील."
मी," मि. मेहता, ह्या धंद्यात पंधरा ते अठरा टक्क्याखाली कुणी काम करत नाही...होय ना?"
मेहता," सर मी खराच आकडा सांगतोय....दहा टक्क्यावर गाडं जाईल असं वाटत नाही मला."
मी मग कंचाट्यात धंरलेल्या लांडग्याच्या मानेभोंवती त्याला पत्ता लागूं न देतां फांस टाकत समोरचा मोबाईल उचलून जग्याला फोन लावला‌... ... ...
" सर मी रविशंकर. आपला जामनगरचा अठराशे कोटींचा नवीन प्रकल्प आहे ना, त्याची निविदा काढायची गरज वाटत नाही मला. मेहता-बोरा कन्स्ट्रक्शन्स्‌ दहा टक्के नफ्यावर ते काम करायला तयार होतील‌... ... ...मि. मेहता समोरच बसलेत माझ्या.
’रीजन्सी आर्केड’ चं काम दहा टक्क्यावरच करताय्‌त... तेंव्हां ते काम पण ह्यानांच देऊन टाकूं."
जग्या," चांगला धंरलाय्‌स साल्या... ... ...बेदम आंवळ फक्त करकंचून. !!!! "
मी फोन ठेंवत मेहता कडं थण्ड नजरेनं बघितलं," साहेब तयार आहेत मि. मेहता ... ... ... काय करताय?"
चेतन मेहता नं सुन्न होत स्वतःच्या कपाळाला हात लावला, !! त्याला मी मानगुटीभोंवती फांस सरकवल्याचं कळलं. !!!
आतां त्याची जीव वाचवायची अखेरची केविलवाणी धडपड सुरूं झाली... ... पण फार फार उशीर झालेला होता... ... ...
त्यानं पुढचा श्वास घ्यायच्या आंत मी जीवघेणी फिरकी दुटांग हाणली," अठरा टक्क्यांच्या गणितानं नक्त नफा २१६ कोटी होतोय ... वरचे सोळा सोडून देऊं या...दोनशे कोटी धरूं...ठीकाय ना?"
लाण्डग्यानं मुकाट लुळी मान लडबडत हंलवली ... ... ... 
मानेत त्राण उरलेलं नाही हे कळतांच मी दांतओंठ खात करकंचून फास आंवळला, " वाघमारे...मि. मेहतांच्या कडून शंभर कोटींचा चेक घेऊन कामाची ऑर्डर देऊन टाका.!!! " 
लांडग्यानं अखेरची धडपड केली," शंभर कोटींचा चेक कसला सर?"
चेतन मेहताचा नजरेनंच लोळागोळा करीत मी कडाडलो," कसला चेक? अर्धे-अर्धे व्यवसाय भागीदार आहोत ना आपण  मि. मेहता ? तुम्हीच तर म्हणालात मघांशी मि. वाघमारे नां ’अर्धं तुमचं अर्धं आमचं‌... ... ...फिफ्टी-फिफ्टी’... ... ... नाही? आख्ख्या बैठकीचं चित्रीकरण झालंय सुरुवातीपासून... ... ... काय?
वाढीव चटई क्षेत्राचा तुमचा अर्धा हिस्सा रोंखीनं मोजलाय आम्ही तुम्हांला त्याक्षणींच... ... तसाच नक्त नफ्याचा आमचा हिस्सा रोखीनं वसूल करतोय आम्ही वाजवून... ... भागीदारांत उधारी चालत नाही !!!!... समजलात?" 

चेतन मेहता धडपडत खुर्चीतनं उठायला लागला... ... पण पायातलं त्राण गायब झालं होतं. !! 
चेंहरा पांढरा फक्क पडला होता, अन्‌ डोंळे खोंबणीतनं बाहेर यायचेच काय ते बाकी राहिलेले होते. !!!! 
त्याला धड उभंही राहता येईना. !! त्याचे उभ्या उभ्या च झोंके जायला लागले. !!!!
बैठकीच्या दालनातले सगळे लोक आमच्या टेबलाकडं धांवले. !!!
त्या क्रूर हांवरट लांडग्याच्या अखेरच्या केविलवाण्या धडपडीकडं शांतपणे बघत मी वाघमारे ना म्हटलं, "मि. वाघमारे... ... मि. मेहता व्यवसाय बंधू आहेत आपले ...समजलं? त्यांचा ताबा घ्या... ... ...त्यांना घरीं सुरक्षित पोंचवायची जबाबदारी तुमची आहे... ... ... लक्ष्यात असूं द्या... ... मी निघतो."

बैठकीचं दालन सोंडून मी जगजीत च्या ऑफिसमध्ये गेलो... ... ...
जग्या हात पसरून वाटच बघत होता माझी... ... त्यानं कडकडून मिठीच मारली मला.
म्हणाला," ’ऍरिस्टॉटल्‌’... ...साल्या, जन्मांत असला चित्तथरारक शो बघितला नव्हता... ... ’स्पार्टाकस’ ची आंठवण झाली बघ थेट. ’डब्ल्यू डब्ल्यू एफ्’ ची लढत पण झक मारील बघ...पण मेहता घरीं जाईल ना धड?
मी म्हणालो," जग्या, हे बघ... मी फक्त बेदम हादरवल्यानं तसं झालंय...वाघमारे स्वतःच त्याला घरी पोंचवणाराय्‌त... ... ...
पण एक लक्ष्यात ठेंव जग्या नेहमीच... ... तो आपला धंद्यातला फक्त प्रतिपक्षी होता... ... ...व्यक्तिगत शत्रू नव्हे. तो जेव्हां भविष्यात इथं येईल, तेव्हां तो आपला सन्माननीय पाहुणा म्हणून त्याला आदरानंच वागवायचा असतो हे कधी विसरूं नकोस.
आतां मला घरीं सोडायची व्यवस्था कर म्हणजे झालं... ... ... मला पण दमल्यासारखं झालंय जरा."
जग्या,"दमायला-बिमायला वेळ कुठाय आपल्याला? आतां घरीं नाही... ... ... थेट टर्फ क्लब गांठायचाय...
चेअरमन नां तुझ्या मानधना चं काय सांगूं तेंव्हढं बोल फक्त... ... ... तासाभरापूर्वीच त्यांच्या सहाय्यिके चा फोन आला होता... तिला म्हटलं ’नंतर सांगतो अजून बोलणं झालेलं नाही’ म्हणून."
मी," शून्य रुपये शून्य पैसे."
नगजीत," ऑं?"
मी," फी विचारलीस ना मला?... ... ती सांगितली. !!! "
जग्या नं स्वतःच्या कपाळाला हात लावला... ... ... ," चेअरमन नां काय असलं उत्तर देऊं मी?"
मी," नाही जमणार? ... ... ...मग त्यांना सांग जाऊन... म्हणावं ’ऍरिस्टॉटल’ ही जीवघेणी लढाई त्याच्या जगजीत साठी लढलाय... ... तुमच्यासाठीही नाही आणि ’अलाईड रीअल इस्टेट्स्’ साठीही नाही... ... ठीक?"
जगजीत," चल रे बाबा...ते टर्फ क्लब चं सगळं त्यांनी च जमवलंय... ...रज्जू-इंदिराजी नां कंपनीच्या गाड्या तिथं न्यायला अर्ध्या तासापूर्वीच घरीं गेल्याय्‌त."

एव्हांना संध्याकाळचे सात वाजत आलेले होते... ... ...
आम्ही जसेच्या तसेच जग्याच्या गाडीतनं टर्फ क्लब वर पोंचलो. रज्जूभाभी आणि इंदिराजीं ची जोडगोळी क्लब च्या हिरवळीवर एका सुंदर सजवलेल्या चार जणांच्या टेबलावर आमची वाट बघत बसलेली होती.
आमचे तसले अवतार बघून त्या दोघी चक्क फिदीफिदी हंसायला लागल्या.!!!
थण्ड पेयांचा आस्वाद घेंत रज्जूभाभी नी विचारलं," कश्यासाठी रे ही पार्टी जगजीत? तुझ्या कंपनीची गाडी घेंऊन चालक आला होता सहा वाजतां... ... चेअरमन साहेबांचं भोजनाचं आमंत्रण होतं ते... ... ... ते कधी येणाराय्‌त?"
जगजीत,"मला काय माहीत?... ... ... आमची गांठ नाही पडली कंपनीत...दुपारी दोन वाजल्यापासून आम्ही बैठकीतच अडकलेलो होतो बघ...ती आत्तां संपली सात वाजतां."
आम्ही चौघेही एकमेकांच्याकडं डोंळे विस्फारून बघायला लागलो. !!!
तेंव्हढ्यात टर्फ क्लब चा मॅनेजर फर्नांडिस, एक झांकलेलं तबक घेऊन आला. त्यानं तबक टेबलावर ठेंवून म्हटलं," सर... ...तुमच्या कंपनीकडून हे आलेलं आहे... ... सक्सेना साहेबानी पाठवलंय."
सौ. इंदिराजी," जगूभावजी... ...हे सक्सेना साहेब कोण?"
जग्या नं," आमचे चेअरमन" असं म्हणत तबकावरचं आवरण कांढलं....तबकांत गुलाबाच्या फुलांच्या वर्तुळात दोन नक्षीदार सुबक पेट्या ठेंवलेल्या होत्या... ... आणि एक बंद पाकिट पण ठेंवलेलं होतं... ...जग्या नं ते पाकीत फोंडून उघडलं.
आंतून सक्सेना साहेबांच्या वळणदार हस्ताक्षरातलं एक पत्र काढून आमच्या हातांत दिलं. उत्कृष्ठ प्रतीच्या त्या कागदावर ’धन्यवाद’ एव्हढा एकच शब्द लिहिलेला होता... ... ... अन्‌ तळाशी सक्सेना साहेबांची ठंसठंशीत पल्लेदार सुबक स्वाक्षरी होती. !!!!
जगजीत-रज्जूभाभी जोडी नं त्या सुबक पेट्या उघडल्या.... 
आणि सारख्याच डिझाईन ची नवरा-बायको नी वापरायची ’रोलेक्स’ ची लखलखती मनगटी घड्याळं काढून आमच्या मनगटांवर बांधली. !!!
मी उडालोच," जग्या... साल्या, हे मागून घेतलंस काय तुझ्या चेअरमनकडून?"
जग्या मख्खपणे माझ्या मनगटावर घड्याळ बांधत म्हणाला, " ऍरिस्टॉटल-इंदिराजी ... ... ह्या हातकड्या चेअरमन नी पांठवलेल्या असल्या तरी त्या तुम्हांला आम्ही घालतोय लेको... ...याद राखा. 
आम्ही मेलो तरी तुमचे हात सोडणार नाहीत ह्या. !!!!.... .... समजलात?"
आम्ही दोघांनी बोलती बंद होत आपापल्या कपाळांना हात लावले. !!!!

**************************************************** 
रविशंकर.
३ मे २०१४.

No comments:

Post a Comment