Search This Blog

Saturday, 22 March 2014

॥ फेअर ऍण्ड्‌ लव्हली ॥

॥ फेअर ऍण्ड्‌ लव्हली ॥

"अहो, ऐकलंत का?... ... ... काय म्हणतेय्‌ मी ?", सौ. इंदिराजी नी माझं लक्ष वेंधीत मला हांक मारली.
"काय आहे?", माझ्या सुरात जरा त्रासिकपणा डोंकावलाच.
१९७९ सालातल्या एप्रिल महिन्यातल्या एका गुरुवारची ती सकाळ होती. ... ... ... 
फॅक्टरीतला नेमेची येणारा ’वार्षिक शटडाउन’ चा गदाडा गेल्या आठवड्यातच आटोपलेला असल्यानं, येता आठवडा जरा निवांत होता.
आणि गुरुवारला जोडून रविवारपर्यंत रजादेंखील मंजूर झालेली होती... ... ... त्यामुळं मी चांगलाच खुषीत होतो.
गेला महिनाभर खोळंबलेल्या कामांचा येत्या दोनएक दिवसांत फडशा पाडून शनिवार - रविवारी कुठंतरी जवळच्या ठिकाणी सफर करायचा सौं इंदिराजी नी कालच अध्यादेश काढलेला होता, अन्‌ सकाळी सकाळी लवकर उठून मी दुरुस्तीसाठी टी. व्ही. खोलून बसलो होतो... ... ... 
सकाळचे साडेआठ वाजलेले होते.... ... ... 
सौ. इंदिराजीं च्या हांका मारण्यानं कामात व्यत्यय आल्यामुळं जरा त्रासिक सुरातच मी पुन्हां विचारलं,"काय म्हणतीय्‌स ?"

सौ. इंदिराजी,"अहो, मी ऑफिस ला लवकर जातेय्‌ जरा... ... ... वर्ष अखेरीची ज्यास्तीची कामं आहेत ना... म्हणून."

मी,"बरं मग?"
सौ. इंदिराजी,"ऐकताय्‌ ना?... ... ... आपल्या कामवाल्या अनुसयाबाई आठ दिवस परगावी गेल्या आहेत, म्हणून विद्या तिच्या कामवाली ला, - रत्ना नाव आहे तिचं - ,पाठवणाराय्‌ आजपासून आठ दिवस... ... ती नऊ नंतर येऊन कामं करून जाईल... ... ... "
मी,"मग येऊं दे की तिला... ... ... मी काय करू?"
सौ. इंदिराजी,"तेंच सांगतेय्‌... ... ... नीट ऐका... ... ... धुणी-भाण्डी-केर-फरश्या सगळंच ती करणाराय्‌... ... ...तेव्हां आतल्या खोल्यातली कपाटं बिपाटं उघडी ठेंवूं नकां... ...ह्या कामवाल्यां चं कांही सांगतां येत नाही ... ... ... कळलं?"
मी टी. व्ही. मधल्या सर्किट बोर्ड वर डाग मारत म्हणालो,"हो कळलं... ... ...नीघ तूं आतां."
सौ. इंदिराजी,"’नीघ तूं’ काय?... ... जरा इकडं बघा, नी ऐका नीट... ... ... काय सांगतेय्‌ ते."
मी हातातली सोल्डर गन्‌ स्टॅण्डवर ठेंवत म्हटलं," हं... ... ... बोला."
सौ. इंदिराजी," बोला काय बोला?... ... ...जरा लक्ष ठेंवा."
मी," कश्यावर?"
सौ. इंदिराजी," घरावर नीट लक्ष ठेवा... ... ...’रत्नाबाई’ वर नव्हे.!!!... ... ...समजलं?"
मी कपाळाला हात लावत म्हटलं," अहो, उत्तरार्ध सांगायलाच पाहिजे काय?... ... ... ऑं?"
सौ. इंदिराजी,"हो... ... ... म्हणूनच बजावतेय्‌ तुम्हाला... ... ... बाई कामाला एकदम नीटनेटकी आहे, पण जरा छानछोकीच काम दिसतंय्‌... ...,आणि डोंक्यानं पण जरा ढिली च वाटतीय्‌ मला... ... ...म्हणून..."
मी,"म्हणून... ... ... काय?"
सौ. इंदिराजी,"कांही नाही... ... ...रत्नाबाई ला तिचं काम करूं द्या, आणि तुम्ही ’तुमचं’ च काम करा.!!!... ... ... काय?... निघते मी."
मी परत कपाळाला हात लावत सौ. इंदिराजी ना बाय्‌ बाय्‌ केलं, अन्‌ पुन्हां टी. व्ही. त लक्ष घातलं." 
मध्येच भिंतीवरच्या घड्याळाकडं लक्ष गेलं, अन्‌ मी चमकलोच... ... ...चक्क अकरा वाजत आलेले होते...!! आणि अजून त्या ’रत्ना’ चा पत्ता नव्हता. !!
अंघोळ आवरायची माझी घाई उडाली... ... ...पण अगदी बिनीचं काम तर झालेलं होतं... ... ...फक्त टी. व्ही. ची साफसफाई, अन्‌ बटणांचं तेलपाणी उरकलं की काम फत्ते. तेंव्हां आधी अंघोळ उरकावी, नी यंत्रात धुणं पण लावून टाकावं म्हणून मी टॉवेल नेसून सगळं धुणं भिजवलं, नी यंत्र सुरूं करून टाकलं.
गिझर चालूं करून गरम पाणी सोडलं... अन्‌ ठणाण्‌ दिशी दरवाज्याची घंटी खणखणली. !!
तसाच जाऊन दिवाणखान्याचं दार उघडलं... ... ... अन्‌ थिजूनच गेलो.
दरवाज्यात एक पंचविशीतली, थेट हिंदी सिनेमात शोभेल अशी नखरेल ’गॉंव की छोरी’ उभी होती. !!
चापूनचोंपून नेसलेली पांचवारी... ... वेणी चा शेपटा पुढं छातीवर घेतलेला‌... ...केंसात जास्वंदी चं लालभडक फूल... ...कपाळावर दोन्हीबाजूनी बटा काढलेल्या... ... अगदी थेट ’पल्लवी’ च्या थाटात... ...कानांत मोठाल्या रिंगा...   ...मनगटावर ’टायटन्‌’ चं सोनेरी घड्याळ... ... पायात फॅशनेबल चपला... ...नाक-डोळे जागच्या जागी असावेत, पण रंग ठार काळा कुळकुळीत... ...अगदी गॅरण्टीवाला.!!
भरीला चांगली बचकभर पावडर थापून तोंडाचा पार ’खारा शेंगदाणा’ केलेला... ... ...!!!
आणि मी दरवाज्यांत टॉवेलवरच उभा ... ...!!!!

"जरा एक मिनिट थांबा.....", म्हणत मी दरवाजा आडवा करून आत पळालो, आणि लेंगा-बुशकोट वगैरे चढवून परत बाहेर आलो.

मी,"कोण तुम्ही?... ... ...काय हवंय्‌?"
’पल्लवी’ बाई मानेला एक नाजुक झटका देत, डोंळ्यावरच्या बटा थेट ’पल्लवी’ थाटात पाठीमागं भिरकावत म्हणाल्या,"मी ’रत्ना’ सायेब... ... ...बाई नीं बलिवलं व्हतं घरकामाला... ... ...येऊं आत?"
आत्तां मला सौ. इंदिराजीं चा निरोप आठवला... ... ...," तुम्ही घरकामासाठी आलाय्‌ होय?... ... ...एक मिनिट... ... ...जरा थांबा."
मी परत आंत जाऊन सगळी कपाटं वगैरे नीट बंद आहेत की नाही तें तपासलं, आणि बाहेर येत आवाज दिला," हं या, आंत या आतां रत्नाबाई."
रत्नाबाई पुन्हा एकदा ’पल्लवी’ थाटात मान वेंळावत डोंळ्यावरच्या झिपर्‍या मागं फेंकत म्हणाल्या,"अवो ’रत्नाबाई’ काय म्हंताय्‌ सायेब?... ...’रत्ना’ च म्हना...मी ’बाई’ दिसतीय्‌ काय वो?" !!!
हे नावाप्रमाणंच एक गाळीव ’रत्न’ दिसत होतं एकूण.!!!
मी कपाळाला हात लावत त्या ’रत्ना’ ला कामं दाखवली, आणि अंघोळीला मोरीकडं पळत सुटलो.!!!
अंघोळ करतांना माझा रोजच ’महंमद रफी’ किंवा ’मुकेश’ वगैरे कुणीतरी झालेला असतो... ... ...आणि त्याबद्दल सौ. इंदिराजी चं दैनिक ’प्रवचन’ पण ऐकावं लागतं. पण आज मला तशी संधीच मिळाली नाही... ... ...
बाहेर केर-फरश्या करतां करतां त्या ’रत्ना’ ची, ’हूं हूं’ करत ’विविध भारती’ लागलेली होती... ... ...’नैन से नैन नाही मिलाओ’ !!
मी अंघोळ करता करतां च परत कपाळाला हात लावला. !!!
तथापि पुढचा आठवडाभर ’हे’ च वारंवार करत बसायची पाळी माझ्यावर येणार आहे, हे मात्र त्याक्षणीं मला माहीत नव्हतं... ...

अंघोळ उरकून कपडे चढवून मी बाहेर आलो अन्‌ ... बघतच बसलो... ...

स्वच्छ केर काढून लाद्या पुसून अगदी आरश्यासारख्या चकाचक्‌ केलेल्या !... ...सगळी भांडीकुंडी लखलखीत घासून, व्यवस्थितपणे अगदी सैनिकी शिस्तीत मोठ्यापासून लहानापर्यंत एका उतरंडीत, ओंट्यावर निथळत मांडून ठेंवलेली... ... !!
आणि धुतलेले कपडे पुन्हां घट्ट पिळून घेत एकाशेजारी एक, पण एकावर दुसरा पडणार नाही अश्या बेतानं, रत्नाबाई अगदी मन लावून दोर्‍यावर वाळत घालत होत्या... ... !!
एखाद्या ’बामणी’ च्या ही तोंडात मारील, असलं ते ’गृहकृत्यकौशल्य’ मी आ वांसून बघतच बसलो ... ...!!!
भरीला रत्नाबाई च्या तोंडाची हूं हूं करत ’विविध भारती’ फुल्‌ व्हॉल्यूम मध्ये सुरूं होती... ... ’आ जा सनम मधुर चॉंदनीमे हम’. !!!!
मी दंचकूनच हाका मारायला लागलो,"रत्नाबाई... ... अहो रत्नाबाई... ..."
’विविध भारती’ त खंड पडला... ... अन्‌ रत्नाबाई सौ. इंदिराजींच्या साडीचा पिरगळा घेऊन हजर झाल्या... ...,"काय वो सायेब?"
मी,"अहो ही तुमची ’विविध भारती’ बंद करा बघूं आधी... ... शेंजारी पाजारी माणसं आहेत... ... काय?"
रत्नाबाई,"सायेब, म्या सांगिटलं न्हवं ’रत्ना’ च म्हना म्हनून?... ... ’बाई’ नकां म्हनूं... ... 
कायतरीच वाटतंया बगा... ...हावं तर मी बी तुमास्नी ’काका’ म्हनते !!"
कपाळाला हात लावत मी त्या ’रत्ना’ कडं जरा निरखून बघितलं... ... 
रत्नाबाई च्या नजरेतनं शुद्ध बिनडोकपणा खेरीज दुसरं तिसरं ’तसलं’ कांहीच डोंकावत नव्हतं... ...!!!
सुटकेचा निःश्वास टांकत मी म्हणालो," तुम्ही मला ’काका’ म्हणणार?... ... डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं बाई?"
रत्नाबाई,"काय झालं वो सायेब ’काका’ म्हनलं तर?... ...ऑं?"
मी," वय काय तुमचं?"
रत्नाबाई मान वेळावत म्हणाल्या,"इस्स्‌.!!!... त्येईस सायेब"
मी,"म्हणजे तुम्ही बाईसाहेबांच्यापेक्ष फक्त दोन वर्षांनी लहान आहांत... ...आणि तुम्ही मला ’काका’ म्हणणार?... ...नको नको‌... ... त्यापेक्षा मी च तुम्हाला ’रत्ना’ म्हणतो हवं तर... ... झालं ना आतां? पण मला ’काका’ अजिबात म्हणायचं नाही सांगून ठेवतो... ... ’सायेब’ च ठीकाय्‌... ... समजलं?"
"बगा सायेब... ...", रत्ना, माझा त्रिफळा उडवत म्हणाली," तुमास्नी बी ’काका’ म्हनलं तर कायतरीच वाटतंय्‌ न्हवं?... ...मला बी ’रत्नाबाई’ म्हनलं की ’तसं’ च वाटतंया बगा.!!!!"
मी कपाळाला हात लावत म्हटलं," ठीकाय्‌...ठीकाय्‌... ... समजलं !!... ...पण ही तुझी ’विविध भारती’ तेव्हढी बंद कर आधी."

रत्ना,"काय बिगाडतंय्‌ वो सायेब गानी म्हटली तर? आपल्याला त्याबिगर काम च जमत नाय बगा. !!... ... तुमास्नी न्हाई आवडत?"

मी,"तसं नाही रत्ना... ... गाणी मलाही आवडतात ऐकायला... ... पण जरा ’बेताची’ म्हण हवीतर... ... काय? ही...ही ’असली’ नकोत !!! सगळ्या सोसायटीला ऐकूं जातेय्‌ ही तुझी ’संगीतसाधना’... ... गैरसमज होतील लोकांचे निष्कारण... ... "
रत्ना,"काय ऐकू जातंय्‌ म्हनालात सायेब?... ... गानी तर चांगली चुंगली च हायेत की वो... ...’लावनी’ म्हन्तीय्‌ का काय मी... ... ऑं?"
रत्ना समोर डोकं बडवण्यात कांही अर्थ नव्हता... ... तिला ’संगीतसाधना’ चा अर्थ समजावणं, म्हणजे ’तळीरामा’ ला ’ज्ञानेश्वरी’ समजावण्यासारखं होतं. !!!
शेंवटी मी हात टेकले,"हे बघ रत्ना... ... म्हण तूं गाणी हवीतर... ... पण अगदी बारीक आवाजातच ... ... घराबाहेर अजिबात ऐकूं जाता कामा नये... ... समजलं?"
"ठीकाय्‌ सायेब", म्हणत रत्नाबाई वाळवण घालायच्या कामाला लागल्या... ...’विविध भारती’ वर आतां नवीनच गाणं लागलं," दिल को लाख सम्हाला जी... फिर भी दिल मतवाला जी !!!!"
मी कपाळाला हात लावत टी. व्ही. त परत डोकं खुपसलं... ... !!

जरावेळानं पाठीमागं चाहूल लागली म्हणून मी वळून बघितलं तर टी. व्ही. दुरुस्ती एकटक बघत रत्ना उभी... ...,"सायेब...... ह्ये सगळं येतंया तुमास्नी?"

मी,"हो... ... इंजिनियर ला सगळं करतां यावं लागतं रत्ना."
रत्ना," सायेब... ... ’सुलोचना’ हाय तुमच्याकडं?"
मी उडालोच,"कोण सुलोचना? इथं कुणी सुलोचना-बिलोचना नाही... ... आमच्या कामवाल्या बाईं चं नांव ’अनुसूयाबाई’ आहे."
रत्ना,"तसं न्हवं वो सायेब... ... माजं पायतान उचकाटलंय्‌... ... त्ये डंकवायला पायजे व्हतं येवडंसं ’सुलोचना’. !!!!"
आत्तां कुठं माझी ट्यूब पेटली,"रत्ना, अगं त्याला ’सोल्युशन्‌’ म्हणतात... ... ’सुलोचना’  नव्हे.!!!!"
रत्ना,"त्येच त्ये वो सायेब... ...आमास्नी कुटं तुमच्यावानी ’यस्‌-फस्‌’ कराया येतंय्‌?"
मी कपाळाला हात लावत हत्यारांच्या खणातली ’क्विक्‌ फिक्स्‌’ ची ट्यूब काढून रत्ना ला दिली.
टी. व्ही. ची दुरुस्ती संपवून सगळा पसारा आंवरला, अन्‌ चहा करायला स्वयंपाकघराकडं गेलो... ... ...
स्वयंपाकघरांत पाऊल टाकलं न्‌ जागच्या जागीं च थंबकलो... ... 
ओट्यासमोर रत्नाबाई उभ्या होत्या, अन्‌ हातातल्या आं वासलेल्या चपलेला ’सुलोचना’ फांसत होत्या... ...’विविध भारती’ वरचं गाणं आतां बदललेलं होतं... ...,"आओ हुजूर तुमको...सितारोमें ले चलूं !!!! " 
एखाद्या कसलेल्या चर्मकाराच्या थाटात रत्नाबाई नी चपलेला ’सुलोचना’ फासलं... ...मग थोडा वेळ, ते अर्धवट सुकेतोंवर मान वेळावत गुणगुणत बसल्या... ...मग चपलेचा जबडा नीट जुळवून ती ओंट्यावरच वरवंट्यानं दणादण्‌ बडवली... ...परत चप्पल पेंचून बघत ’उचकाटनार न्हाई’ याची खात्री केली... ...
मग साबणानं ओंट्याची लादी अन्‌ वरवंटा नीट घांसून पुसून लखलखीत स्वच्छ केला... ...
आणि चप्पल पायात सरकवत म्हणाल्या,"झालं सायेब... ... जाऊं मी?"
मला जरा आश्चर्य च वाटलं... ... हिला चप्पल दुरुस्ती कशी काय अवगत?
विचारलं, तसं म्हणाली,"अवो सायेब... ...तुमी लोक कसली कसली आवंढाळ कामं करताय्‌सा... ... बघटलं म्या... ...म्हन्लं बघावं करून आपुन बी... ... काय झालंय्‌ वो न जमाया...ऑं?"
निरक्षर रत्नाबाई चं ’वर्क इन्स्पायरेशन्‌’ बघून मी तोंडात बोंट घातलं.!!... ...म्हणालो," उद्यां लवकर ये बरं का... ... मला साडेनवालाच बाहेर पडायचंय्‌."
नुस्ती मान डोलावत रत्ना पांठ वळवून निघाली, अन्‌ माझ्या कानांवर पुढचं गाणं आदळलं,"दिल देके देखो, दिल देके देखो, दिल देके देखो जी. !!!!"
मी कपाळाला हात लावत चहा टाकायला लागलो. !!... रत्नाबाई ’काळी दोन’ पट्टीत च गात होत्या... ... माझं नशीब. !!!!

सायंकाळीं सहा वाजतां सौ. इंदिराजी घरीं परतल्या.

घरांत आल्या आल्या त्यांची चोखंदळ नजर घरभर फिरली... ... अन्‌ जिवणीवर स्मित पण उमटलं. !!... ... क्या बात है रत्नाबाई. !!!
पण पसंत पडलेल्या चिजेबद्दलही ब्र सुद्धां काढायचा नाही हा सौ. इंदिराजीं चा खाक्या. !!
सायंकाळचा चहा घेतां घेतां मला म्हणाल्या," कशी काय वाटली रत्ना... ... ?"
सौ. इंदिराजीं चे प्रश्न नेहमीच खोंचक नी बहुतांशी भोंचक च असतात.!!!... ... तेव्हां मी जरा सावध पवित्रा घेतला,"ठीक वाटली मला... ..."
सौ. इंदिराजी,"हूं... ... ...अजून कांही सांगण्यासारखं?"
मी,"अजून काय सांगणार?... ... रंगानं ’फेअर’ नाही, पण कामाला ’लव्हली’ आहे... ... बघून घ्या."
सौ. इंदिराजीं चे डोंळे लगेच बारीक झाले... ... ... ,"तर तर... ... कामाला ’लव्हली’ वाटणाराच.... ... पंचविशी तली आहे ना?!!!" 
मी हतबुद्ध होत कपाळाला हात लावला.!!!!
ह्या ’हिटलर’ चं काय करावं ते समजेना... ... म्हणालो,"काय म्हणायचं काय आहे तुम्हाला... ... ऑं?"
सौ. इंदिराजी,"मी कांही तिशी तला ’विश्वामित्र’ वरलेला नाही.!!!!... ... समजलं? शेंजारची अनुराधा खाली फाटकातच भेंटली आत्तां एव्हढ्यात... ...म्हणत होती की घरात ’विविध भारती’ अगदी जोरात लागलेली होती म्हणून.!!!!... ... काय?"
मी परत कपाळाला हात लावला. !!!
ह्या 'अनुराधाबाई' म्हणजे समोरच्याच सदनिकेत राहणारी सौ. इंदिराजीं ची मैत्रीण... ... त्या घटस्फोटिता होत्या. आमच्या शेंजारी रहायला यायच्या आधी नक्कीच सदाशिव-नारायण-शनिवार पेठेतल्या कुठल्यातरी वाड्यात आजीवन नांदलेल्या असाव्यात.!!! सदासर्वकाळ शेजार्‍यांच्या घरात काय चाललंय्‌ इकडंच काकदृष्टी. !!!
आतां मला सगळा घोळ समजला... ...अन्‌ मी पण तंडकलो,"त्याचं काय आहे इंदिराजी... ..."
सौ. इंदिराजी,"काय... ... काय आहे त्याचं?"
मी,"खरं तर ह्या तुमच्या ’अनुराधाबाई’ वरच लक्ष ठेंवायची खरी गरज आहे... ..."
सौ. इंदिराजी,"म्हणजे?"
मी," मला असं सांगा... ... ’घटस्फोटिता’ अनुराधाबाई आहेत, की रत्ना?!!!!"
सौ. इंदिराजी नी उभ्या हयातीत प्रथमच सफाचट निरुत्तर होत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!
अन्‌ ’अनुराधाबाई’ पण घरांत पुनश्च डोंकावल्या नाहीत. !!!! 

दुसर्‍या दिवशी ’पुनश्च हरि ओम्‌’ !!!... ... रत्नाबाई तब्बल साडेदहा वाजतां उगवल्या.!!... ... मी घरांत चांगला तासभर वाट बघत अडकून पडलो होतो. रत्नाबाई आल्या आल्या च मी तोंफ डागली,"रत्ना... ... अगं आज साडेनवाला येणार होतीस ना तूं?... ... मग?"

रत्नामबाई मानेला झंटका देत म्हणाली,"काय झालं सायेब... ... मी ’आब्रू’ कराया गेले व्हते... ... म्हनून येळ झाला बगा."
मी,"’आब्रू’ कराया गेले व्हते... ... म्हणजे?"
रत्नाबाई,"अवो सायेब... ... त्ये ’पारलर’ मंदी नाय काय करत?... ... काट्‌कुट्‌ वो... ... त्ये च.!!"
मी थक्क होत रत्नाबाई कडं बघितलं... ... 
रत्नाबाई चक्क ब्यूटी पार्लर मध्ये भिवया कोंरून, आणि केसांना शांपू-बिंपू करून आलेल्या होत्या. !!!!
रत्नाबाई नं माझी कींव करत घरात ’विविध भारती’ लावून झाडू मारायला सुरुवात पण केली... ... ,"मिल गये, मिल गये, आज मेरे सनम.!!!!" 
मी आतां कपाळाला हात लावत रत्नाबाई ला फैलावर घेंत म्हटलं,"रत्ना...अगं मला इथं तासभर लोंबकळत ठेंवून तूं चक्क ब्यूटी पार्लर मध्ये बसलेली होतीस? वर आणखी हे सांगायला कांही वाटत पण नाही तुला... ...ऑं?"
माझा संताप रत्नाबाई च्या गांवी देखील नव्हता... ... !!
म्हणाली,"सायेब... ... फकस्त पंधरा मिण्टं च दमा... ...झंटक्यात कशी कामं उरकून टाकत्ये बगा आत्तां लगीच."
ह्या बाबतीत मात्र माझी खात्री पटलेली होती... ... 
पुढच्या वीसएक मिनिटांतच रत्नाबाई नं खास ’रत्ना स्टाईल’ मध्ये सगळ्या कामांचा सफाया केला...अगदी चकाचक्‌. !!!
माझा संताप निवळायला तेंव्हढं पुरेसं होतं... ... वर आणखी मनोरंजनार्थ ’विविध भारती’ पण सेवेशी हजर होती...,"तुम्ही मेरे मीत हो...तुम्ही मेरे गीत हो.!!!"
कामं आंवरून पदराला हात पुसत रत्नाबाई म्हणाल्या,"झालं बगा सायेब सगळं... ... जाऊं मी?
मी,"हो नीघ तूं... ...आणि हे बघ... उद्यां... ... "
मला मध्येच थांबवत रत्नाबाई म्हणाली,"उद्या मला ’लेट’ व्हईल सायेब... बारा तरी वाजतील बगा... ... तुमी वरडाल, म्हनून सांगत्ये आत्तांच." 
मी,"अगं रोजच इतका उशीर झालेला कसा चालेल रत्ना?... ... आणि मी कामाला कधी जायचं मग?"
रत्ना,"त्याचं काय हाय सायेब... ...उद्या हाय ना...आमच्या झोंपडपट्टी त ’बुटी कान्स्टिपेशन्‌’ लावलंया !!!... ... तितं मला जायाचं हाय....म्हनून म्हन्लं."
मी,"काय म्हणालीस?... ... काय लावलंय?"
रत्ना,"अवो सायेब त्ये... ... काय म्हंत्यात बगा त्ये तुमचं... ... हां...’सौंदर्यस्पर्दा’ वो... ...!!"
माझी ट्यूब भक्क्‌दिशी पेंटली... ... अन्‌ मी थाड्‌कन्‌ कपाळावर हात मारून घेंतला.!!!!
"रत्ना, तूं काय बोलतेय्‌स ते तुझं तुला तरी कळतंय्‌ काय?... ...अगं त्याला ’ब्यूटी कॉंपिटिशन्‌’ म्हणतात... ... ’कॉन्स्टिपेशन’ नव्हे !! ’ते’ भलतं च असतं.!!!!......समजलं?" 
रत्ना मख्खपणे मला म्हणाली,"जाऊं द्या सायेब... ... तुमास्नी समाजलं न्हवं?... ... मग झालं तर... ... बरं जाऊं म्या आतां?"
मी,"हो....आणि परवापासून साडेनवाच्या आत च यायचं ... ... कळलं.?"
रत्ना,"कळलं सायेब... काय बी काळजी करूं नगासा...येवडी उद्याचा दीस त्येवडी कळ काडा फक्त...तिकडचं आवारलं, की आल्ये बगा लगीच.!!!!"
मी ’रत्ना’ ला आतां कोंपरापासून हात जोडले," माझे आई... ...त्याला ’कळ काढा’ म्हणायचं नसतं. !!!! ... ... ’सांभाळून घ्या’ म्हणायचं... आतां तरी समजलं काय तुला?"
रत्नाबाईनं पायात चपला कधीच सरकवलेल्या होत्या ... ... ,"तूने ओ रंगीले कैसा जादू किया...!!!!"
मी बंद होणार्‍या दरवाज्याकडं कपाळाला हात लावून सुन्नपणे बघत राहिलो... ...

सकाळ दुपारची इंजिनियरिंग कॉलेजांतली व्याख्यानं आंवरून घरी परत निघायला मला दुपारचे साडेचार वाजले. सौ. इंदिराजी नी सकाळी निघतानांच वाणीसामानाची यादी माझ्या गळ्यात घातलेली होती... ...म्हणून मी आमच्या ’चन्दन स्टोअर्स’ समोर गाडी थांबवली, अन्‌ दुकानात शिरलो. मालक ’पारिसा अण्णा’ च गल्ल्यावर होते... ...’या साहेब’ वगैरे झालं... ...अन्‌ ते यादी तपासून घेऊं लागले... ...

तेंव्हढ्यात लगाबगा चालत...जवळ जवळ पळतच ’रत्नाबाई’ दुकानात शिरल्या, अन्‌ शेंजारीच उभ्या राहिल्या... ...
ऍझॅरो सेंट चा वास माझ्या नाकात शिरला... ...!!!
रत्नाबाई,"काय सायेब, म्हैन्याची यादी हाय व्हंय्‌?"
मी,"होय रत्ना... ... बाई ना जरा उशीर होणाराय्‌ ना आज, म्हणून मी च आलोय."
रत्ना,"वो अन्ना, जरा वायल्या पोरग्याला सांगा की माजं सामान काडायला... ..."
पारिसा अण्णा नी दुकानातल्या एका पोर्‍या ला रत्नाबाई ची यादी भरायला सांगितलं... ...
रत्नाबाई नं धडाधड सांगायला सुरुवात केली... ...,
"येक किलू गूळ...पाव किलू घऊपीट...अदपाव साबूदाना...हां...काडलंस काय? आतां ह्ये बग...अदपाव गोडंत्येल...काडलंस?...हां...दोन काडेपेट्या...."
पोर्‍या,"हां काढलं ताई सगळं... ... आणखी काय?"
रत्नाबाई,"आनि येक ’फेर आनि लवली’ ची टूब... ... मोट्टी आसंल ती काड.!!!!"
रत्नाबाई कडं आ वांसून बघत आतां मी च फिदीफिदी हंसायला लागलो... ...अन्‌ ’पारिसा अण्णा’ नी आ वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!!!
दुसर्‍या दिवशी सकाळी रत्नाबाई ’बुटी कान्स्टिपेशन्‌’ ला उतरणार होती, हे पारिसा अण्णा नां माहीत नव्हतं... ...हे त्यांचं नशीब.!!
ते मी सांगितलं असतं, तर बहुतेक त्यांना शाश्वत हॉस्पिटल च्या ’आय्‌. सी. यू.’ तच भरती करायची वेंळ आली असती. !!!
  
बाकी कांही असो, पण ह्या रत्नाबाई नं, सौ. इंदिराजीं ची मर्जी मात्र निर्विवादपणे पुढच्या दोनतीन दिवसांतच जिंकली.
आमचं पहिलं अपत्य, म्हणजे चि. स्निग्धा आतां दीडएक वर्षाची झालेली होती...तब्येतीनं चांगलीच सुदृढ अन्‌ वांड पण झालेली... 
’अनुसूयाबाई’ ना आतां वयोमानानं थंकल्यामुळं चि. स्निग्धा चा सांभाळ अन्‌ घरकाम झेंपेनासं व्हायला लागलं... ...म्हणून सौ. इंदिराजी नी त्यांना सन्मानानं सेवानिवृत्ति देऊं करून रत्नाबाई वर सगळा कारभार सोंपवला.
एक नखरेल भपका वगळला, तर रत्नाबाई नी सौ. इंदिराजी नां ही, कामाच्या बाबतीत कुठंही ठपका ठेंवायची संधीच दिली नाही. तश्या कालांतरानं सौ. इंदिराजी पण तिच्या भपक्याकडं दुर्लक्ष करायला लागल्या... ...

होतां होतां वर्षभर उलटलं असेल नसेल, अन्‌ एके दिवशी रत्नाबाई च्या आई ’सौ. लक्ष्मीबाई’ च तिला पुढं घालून सकाळी सकाळी घरीं आल्या.

रत्ना भपकेबाज असली तरी लक्ष्मीबाई मात्र अगदी साध्या मराठमोळ्या...नऊवारी त वावरणार्‍या...कपाळीं रुपयाएव्हढं ठंसठंशीत कुंकू लावणर्‍या होत्या.
ते उत्तर-दक्षिण ध्रुव बघून मला चांगलीच गंमत वाटली.
सौ. इंदिराजी नी च दरवाजा उघडला... ...
सौ. लक्ष्मीबाई,"रामराम बाईसायेब...म्या हि ची आय... ... लक्षिमबाई.", रत्ना कडं बोट दाखवत बाई म्हणाल्या.
सौ. इंदिराजी,"या... ...आंत या... ...तुम्ही कश्या काय हिच्याबरोबर आज?... ... कांही काम होतं काय माझ्याकडं?"
सौ. लक्ष्मीबाई," तसं म्हनलं तर काम तुमच्याकडंच हाय, पर पयलं सायबांना भ्येटायचंय्‌... ... म्हून आलो हिच्यासंगट."
सौ. इंदिराजी,"मग भेटा की साहेबांना... ... घरीच आहेत... ...पण काम तरी काय काढलंय्‌?...कुणाला नोकरी बिकरी ला लावायचं आहे की काय?"
सौ. लक्ष्मीबाई,"न्हाई बाईसायेब... ...दुसरं च काम हाये... ... सायेब हाईत न्हवं?... ...जाऊं आतमंदी?"
सौ. इंदिराजी," अहो जा की... ... विचारायचं काय त्यात?... ... रत्ना घरातलीच आहे."
मग मला हांक मारत म्हणाल्या,"अहो... ...ऐकलंत काय?... ...रत्ना च्या आई आल्या आहेत तुम्हाला भेंटायला."
मी लगबगीनं हातातलं पुस्तक मिटून टेबलावर ठेंवलं... ...चष्मा कांढीतोंवर रत्ना नी लक्ष्मीबाई दिवाणखान्यात आल्या... ... बाई नी अदबीनं नमस्कार वगैरे केला, अन्‌ जमिनीवरच बसल्या.
सौ. इंदिराजी नी सगळ्यांच्यापुढं चहाचे कप ठेंवले... ... बाई जरा चिंतेतच दिसत होत्या... ...
मी आपलं,"बरं चाललंय्‌ ना सगळं ?" असं विचारलं, तश्या रत्ना कडं निर्देश करीत म्हणाल्या,"हि च्या लगीना चं बगतोय्‌ आतां सायेब... ..."
मग सौ. इंदिराजी कडं वळून म्हणाल्या," तुमच्या वळकीपाळकी त कुनी पोरगं आसलं चांगलं, तर ध्यान ठिवा... ... सायबास्नी पन सांगा बाई."
मी म्हटलं,"अहो जरूर बघूं की बाई... ... रत्ना आम्हाला घरातल्यासारखीच आहे... ... ठीकाय्‌ ठेंवतो लक्ष मी... ... आणखी कांही?"
सौ. लक्ष्मीबाई,"आनि काय बी न्हाई बगा सायेब... ...तुमच्या किरपेनं चांगल्या घरांत पोरगी नांदावी यवडंच वाटतंय्‌ बगा."
सौ. इंदिराजी,"अवश्य बघूं बाई...कांही काळजी करूं नकां... पण काय हो. तुम्ही बघितल्या असतील ना कांही सोयरिकी?... ... मग?"
सौ. लक्ष्मीबाई,"आवं ढेर बघटल्या बाईसायेब... ... पन हि च्या च अंगात आलंया... ... 
आमी दावली ती समदी प्वारं न्हाई म्हनत सुटलीया ही.!!!...काय करायचं आमी आतां?"
एव्हढं म्हणतांना लक्ष्मीबाईं च्या डोंळ्यात पाणी तंरळलं... ... अन्‌ सौ. इंदिराजी पण हळव्या झाल्या... ...
तसा आमचा ’हिटलर’ खरं तर हंळवा च आहे... ... त्याचा हळवेपणा फक्त माझ्याच वाट्याला काय तो येत नाही, एव्हढंच. !!!
सौ. इंदिराजी,"मग? काय कारण तरी काय आहे नवरे नाकारत सुटायचं?... ... काय गं रत्ना, काय म्हणताय्‌त आई तुझ्या... ... अं?"
रत्नाबाई ढिम्म च ... ... ...
सौ. लक्ष्मीबाई,"चांगली धाबारा खात्यापित्या वळकी-गांवकी तली प्वारं दावली बाईसायेब आतांपत्तूर हि ला... ...समदी नापास.!!
बाईसायेब, ही चंवथी बी न्हाई शिकली...थोबाड ह्ये आसं... ...घरकामाला वाघ हाय म्हना, पर त्ये कोन बगतंय्‌ वो? आतां मला सांगा, कुटला ’डागदर’ ’विंजनेर’ ’कलिग्डर’ माळ घालनार हाय हिला?... ...ऑं? म्हनूनशान हिला ’सायबां’ कडंच घिऊन आलोय बगा बाई... ... सायेब...आतां तुमीतरी कायतरी आक्काल शिकवा ह्या घोडीला...कायतरी म्होरला-मागला इचार कराय पायजेल का न्हाई हिनं...? बरं धा दा इचारलं, तवा काय म्हनाली बगा... ... ..."
सौ. इंदिराजी,"काय म्हणालीस गं रत्ना?... ... कसला नवरा हंवाय तुला?"
सौ. लक्ष्मीबाई," आवो बाईसायेब, ही गाडवी म्हन्तीया ’मला ’सायबा वानी च नवरा पायजेलाय्‌.’!!!!! ... ... आतां काय करायचं बाईसायेब सांगा आमी?"
इतकं बोलून सौ. लक्ष्मीबाई नी डोंळ्यांना पदर लावला... ... ...
आतां खुद्द सौ. इंदिराजीनीच हतवाक्‌ होऊन स्वतःच्या कपाळावर थाड्‌दिशी हात मारून घेतला. !!!!
आणि ’फेअर ऍण्ड लव्हली’ च्या ट्यूब ची ती भन्नाट करामत बघून सुन्न होत मग मी पण कपाळाला हात लावला. !!!!!!

यथावकाश सौ. इंदिराजीं च्या मध्यस्थीनं पुढं दोनएक महिन्यातच रत्नाबाई चं शुभमंगल पार पडलं.

आणि आश्चर्य म्हणजे ह्या रत्नाबाई ला नवरा चक्क गोरापान राजबिण्डा अन्‌ सालस पण मिळाला... ...!!!
त्या महाभागानं हिला कशी काय पत्करली ते तोच जाणे... ...बहुधा ही सौ. इंदिराजींची करामत असावी.
लग्न झाल्यावर सौ. लक्ष्मीबाई नी दोघांना घरीं आणून आम्हाला नमस्कार करवून आशीर्वाद देववले.
पुढं दीडएक वर्षानंच रत्नाबाई परत नवर्‍यासह, एक टमटमीत गोटू कडेवर घेऊन आल्या, अन्‌ पोरगं त्यानी सौ. इंदिराजीं च्या पायावर घातलं.!!!
बहुधा ही पण रत्त्नाबाई च्या ’फेअर ऍण्ड लव्हली’ ची च करामत असावी. !!!
मला नमस्कार करायला दोघं वांकली, तसं ’ सुखी भव’ म्हणत मी रत्ना ची फिरकी ताणली," काय रत्ना... ...आतां तरी ’रत्नाबाई’ म्हटलं तर चालतंय्‌ ना तुला?... ... की अजूनही ’कायतरी’ च वाटतंय्‌?"
सौ. व श्री. ’रत्ना’ आपापल्या कपाळांना हात लावत, आ वांसून आमच्याकडं बघतच बसले... ...!!!
अन्‌ दुसर्‍या क्षणीं रत्ना नं तिचा ’गोट्या’ कडेवर आदळत श्रीयुतांची बखोटी धंरून धूम ठोंकली. !!!!


**********************************************************

-- रविशंकर.

२० मार्च २०१४.

No comments:

Post a Comment