॥ वधूपरीक्षा ॥
," हॅलो.....काय गं वृंदे....कशी काय आठवण आली आमची सकाळीच?....हो आहेत ना घरी....जरा थांब हं एक मिनिट....देते."
माझ्या बायको चं नांव सौ. सुमीता.....पण तिच्या ’हिटलर’ छाप व्यक्तिमत्त्वामुळं मी तिला ’इंदिराजी’ म्हणतो.!!"कुणाचा आहे फोन?", मी विचारलं.
"अहो वृन्दी आहे फोनवर", सौ. इंदिराजी,".....तुमच्याशीच बोलायचं आहे तिला.....घ्या." म्हणत ’सौ. इंदिराजी’ नी फोन माझ्या हातात ठेंवला.
" बोला वृन्दावहिनी.... काय म्हणताय्?", मी फोन घेंत म्हटलं," इतक्या सकाळी सकाळीच फोन?...ठीक आहे ना सगळं?"
"सगळं ठांकठीक असतं तर मी कश्याला फोन केला असता सकाळीच?",
वृन्दावहिनी जरा घुश्श्यातच दिसत होत्या," इकडं घरीं या लगेच....आणि ’सुमी’ ला पण सोंबत घेंऊन या."
मी जरा चंपापलोच.....वृन्दावहिनी तश्या शांत नी धीराच्या.....कांहीतरी बिघडलेलं आहे एव्हढं मला समजलं.
मनांत नाहीनाही त्या दुष्ट शंका पण यायला लागल्या.....
मी प्रश्नांची सरबत्ती लावली," अहो पण काय झालंय् तरी काय?.....सगळ्यांच्या तब्येती तर बर्या आहेत ना?
की कांही समस्या उपटलीय्? ’शरद’ बरा आहे ना? आणि ’गोरा’ ?"
"बाकी सगळं ठाकठीक आहे....", पलीकडून आवाज आला," तुमच्या ’सुहृदा’ चं डोकं सोडून !! तेंव्हढं ताळ्यावर आणायचं आहे !!.....तेंव्हां असाल तसे या ताबडतोब.!! "
सौ. इंदिराजीनी चिंतातुर चेंहर्यानं विचारलं," काय म्हणतीय् वृन्दा?......काय झालंय्?"
मी म्हटलं," कांही नाही....बहुधा शर्या नं वहिनींचं डोंकं पिकवलेलं दिसतंय् सकाळी सकाळीच.
मी परत फोन उचलला," ठीकाय् वहिनी....चिंता करूं नका....येतो आम्ही....पण झालंय् काय ते तरी सांगाल? "
वृन्दावहिनी म्हणाल्या," इथं आल्यावर सांगते....पण लगेच निघा.....
सकाळचा चहा पण मी टाकलाय् इथंच, नी ’ह्यां’ ना वाण्याच्या दुकानांत पिटाळून फोन केलाय तुम्हाला....
तेंव्हां लगेच निघा, आणि ’हे’ परतायच्या आंत घरीं या.", वृन्दावहिनीनीं एव्हढा फतवा काढून फोन ठेंवला.
सौ. सुमीता धास्तावलेली," काय झालंय् हो? काय म्हणत होती वृन्दा?"
मी," घाबरूं नकोस....धीर सोडण्यासारखं कांही झालेलं नाही.......
बहुधा शरदरावांच्या मुसक्या आंवळण्यासाठी हा ’डी डे कॉल’ असावा........
वृन्दावहिनीनी त्याला वाण्याकडं पिटाळलाय् आणि इथं फोन केला.....सकाळचा चहा पण तिथंच करायला टाकलाय् त्यानी.
शर्या परतायच्या आत घरी या म्हणाल्या."
सौभाग्यवतीनी तत्क्षणीं चपला चंढवल्या....आरश्यातही न बघतां....!!
म्हणाल्या," चला निघूंया लगेच....घरातलं आल्यावर आवरूं सगळं....कुठं पळत नाही ते."
मग मीही तांतडीनं कपडे चंढवले, पायांत चपला संरकवल्या, अन् स्कूटर कांढून आम्ही शर्याच्या घराकडं सुटलो.
ह्या दातार कुटुंबाचे आमच्याशी ऋणानुबंध जुळले, त्याल कारण आमच्या सौ. इंदिराजी आणि शर्याच्या सौ. वृन्दावहिनी.
ह्या दोघी कॉलेजातल्या वर्गमैत्रिणी.....अगदी जीवश्चकण्ठश्च.
त्यांच्यामुळंच खरं तर माझी आणि शरद ची ओंळख झालेली.....’मैत्रिणींचे नवरे’ म्हणून.
पण यथावकाश झालं असं की चारचौघांत ह्या दोघींचा परिचय ’आम्हां मित्रांच्या बायका’ असा व्हायला लागला.!!
नवल म्हणजे हे नातं इतकं घट्ट जुळावं असं शरद नी माझ्यात कुठलंही साम्य नव्हतं....
ना वयात, ना दिसण्यात, ना असण्यांत.
मी पन्नाशी चा तर हा शरद माझ्यापेंक्षां चांगला पांच वर्षानी लहान.
मी दुसर्यांच्यात दखल न देणारा, तर ह्या शर्या ला आख्ख्या गांवच्या उचापती लागायच्या.
मी शक्यतों जपून बोलणारा, तर शरद मुलुखाचा कळाकाढूं नी फंटकळ.
साम्य असलंच तर फक्त एकच होतं....दोघांनाही आपापल्या बायकोच्या कळा काढायला मात्र विलक्षण आंवडायचं.
परिणामी अधनंमधनं शर्या च्या घरांत ’मौनव्रत’ सुरूं असायचं,
तर माझ्या घरांत भडभुंज्याची भट्टी धंडाडून पेंटलेली असायची.....इतकाच काय तो फरक.
पण तसं बघायला गेलं तर ह्या दोघी मैत्रिणीत तरी कसलं साम्य होतं? कांहीही नाही......अगदी औषधापुरतंसुद्धां. !!
गम्मत अशी होती की ह्या मैत्रिणींचे स्वभाव मात्र नेमके आमच्या उलट होते.
हे असं कां असतं, हे मला आजवर न सुटलेलं पहिलं कोडं.!!
तसं म्हणायला जनरीतीप्रमाणं सौ. ना जेव्हढं काय वंचकून रहायचं असतं, तितपत आम्ही दोघेही होतो.
तरीपण कधीकधी दोन्ही घरांत ’युद्धाचे प्रसंग’ उभे ठांकायचेच.
मग व्हायचं असं, की माझ्या घरी लाह्या तंडतंडायला लागल्या, की ’इंदिराजी’ चा ’वृन्दावहिनी’ नां फोन,
आणि शर्या च्या घरीं मौनव्रत सुरूं झालं की ’वृन्दावहिनीं’ चा ’इंदिराजी’ ना फोन.
गम्मत अशी व्हायची, की आपापल्या नवर्यांना / बायकांना बिल्कुल दाद न देणारे आम्ही, परस्परांच्या बायकांचं / नवर्यांचं मात्र मुकाट ऐकायचो. !!
हे असं कां व्हायचं, हे मला आजवर न सुटलेलं दुसरं कोडं.!!!
ह्यामुळंच की काय कोण जाणे, आमचा हा जगावेंगळा ’चौकोनी संसार’ मात्र सुखासमाधानानं चाललेला होता.
माझ्या मुली चं म्हणजे ’स्निग्धा’ चं लग्न होऊन ती कधीच सासरीं गेलेली होती,
अन् सध्या शर्या-वृन्दा च्या ’गौरांग’ ऊर्फ ’गोरा’ साठी मुली बघणं सुरूं होतं.
वृन्दावहिनींच्या आजच्या ’डी डे कॉल’ चा ह्याच्याशी कुठंतरी संबंध असावा, अशी माझी अटकळ होती.
" काय झालं असेल हो वृन्देकडं?", ’सौं. इंदिराजी’ ना कांही चैन पडेना.
"बघूं या आतां.....पोंचतोंय् ना पांचदहा मिनिटांत? कळेलच की काय ते.", मी म्हणालो.
"जरा वाढवा की वेंग....एरव्ही हांणत असतां गाडी गर्दीतनं...", ’सौं. इंदिराजी’ चा ताशा सुरूं झाला. !!
मी कांही उत्तर न देतां जमेल तेंव्हढा वेंग वाढवला, अन् आम्ही शर्याच्या घरीं पोंचलो एकदाचे.
आम्ही घंटी चं बटण दाबायच्या आंतच सौ. वृन्दावहिनीनीं दार उघडलं....बहुधा वाटच बघत उभ्या असाव्यात.
"काय झालं गं वृन्दे एकदम......ऑं?",
’सौं. इंदिराजी’ ची सरबत्ती सुरूं झाली," भावजी, गोरा, बरे आहेत नां?
कुणी धंडपडलं की काय कुठं?
की भावजी गेलेत कुठं डोंक्यात राख घालून?
काय झालंय तरी काय?
अगं तुला बघेपर्यंत जिवात जीव नव्हता बघ अगदी....
भंरीला ह्यांचं फिरायला निघाल्यागत गाडी चालवणं....
एरव्ही हाणत असतात बेफाम......अन् असल्या वेंळीच श्यामभटाची तट्टाणी !!"
वृन्दावहिनी," अगं शांत हो बघूं आघी सुमे...इतकं घाबरण्यासारखं कांहीही झालेलं नाही....जरा बिनसलंय् इतकंच.....
आणि ’हे’ आतां तुझ्याखेंरीज कुणालाच वळायचे नाहीत अशी खात्री पटली, म्हणून फोन केला भावजीनां.
बसा निवांत...चहा तयार आहे तो घेंऊं या.....’हे’ येतीलच पांचदहा मिनिटांत."
" बोला आतां वृन्दावहिनी", मी चहा पीत विचारलं," काय झालंय् काय असं चिन्ताकारक? "
वृन्दावहिनी," थोंडक्यात सांगते ’हे’ यायच्या आंत.....हातांत वेंळ फारासा नाही म्हणून.
भावजी, तुम्हाला माहीतच आहे, की सध्या ’गोरा’ साठी मुली बघतोय् आम्ही.....
तर झालंय असं, की माझं माहेर इंदूरचं....’हयां’ चा जन्म च फक्त पुण्यातला, पण हयातभर पुण्याबाहेरच राहिले....
हा ’गोरा’ ही शिकला आधी इंदूरला, मग ग्वाल्हेरमध्ये, आणि शेंवटी आय. आय. टी. खरगपूरला.
थोंडक्यात आमच्या घरी कुणी ’पेंशवे’ नाहीत, की ’पेंशवाईकर’ पण नाहीत.......
तुम्हां दोघांनाही घरांतला खाक्या कसा आहे ते माहीत आहेच.....
दुसरं असं की ’पेंशवाई’ बरोबर आमचं कितीसं ’जमतं’ हे पण जगजाहीर आहे.....
भंरीला ’ह्यां’ चा हा असला धोंबीपछाड स्वभाव......तुम्हांला तोही परिचित आहे.
तेंव्हां सुमे, इथलं मुळामुठेचं पाणी आम्हाला मानवण्यासारखं नाही ही तर अगदी दगडावरची रेंघ.
म्हणून आत्तापर्यंत आम्ही सगळ्या मुली ग्वाल्हेर-झांशी-इंदूर-भोपाळ कडच्याच बघितल्या.....
’गोरा’ ला पसंत पडण्यासारख्या चारदोन निवडूनही ठेंवल्याय्त."
सौ. इंदिराजी," मग आतां अडचण कसली आलीय् गं वृन्दे.....एव्हढं चिंताग्रस्त होण्यासारखी?"
"तेंच सांगते", सौ. वृन्दावहिनी," झालंय् काय, की गेल्या आंठवड्यात इथलं पुण्यातलं एक स्थळ आलं होतं....आडनांव देशपांडे.
आतां पुण्या-मुंबईतल्या ह्या पोरींना कशी शिंगं फुटलेली आहेत हे तर आपण हरघडी बघतोंच आहोत....अजून भंरीला जर ’आय. टी.’ वाली पोरगी असली, तर मग कांही बघायलाच नको.....जमिनीवरच विमानप्रवास. !!
तर मुलीच्या आई चा च फोन आला.....तो नेमका ’ह्या’ नी उचलला.
फोनवर ’गोरा’ सध्या अमेरिकेत असतो, एव्हढं कळल्यावर, तो इथं कधी येणाराय् म्हणून त्या बाईनीं विचारलं......
’ह्या’ नी आपलं तारीख, फ्लाइट् ची माहिती, वेळ इ. सागितलं......चारदोन मुली निवडलेल्या आहेत असं पण बोलले....तर त्या बाईनीं काय विचारावं ’ह्या’ नां?"
मी," काय विचारलं त्यानी?"
सौ. वृन्दावहिनी," त्या बाईनी विचारलं की ’मुलगी आम्ही विमानतळावरच दांखवून घेतली तर चालेल काय?’ म्हणून. !!"
आम्ही आवाक् होत कपाळांना हात लावले.!!
सौ. वृन्दावहिनी," आतां ’ह्या’ नी तरी गप्प बसावं की नाही सुमे? ’हे’ म्हणाले की ’विमानतळावर मुलगी दांखवायला आमची कांही हंरकत नाही...... पण लग्न रेल्वे स्थानकावर लावून दिलेलं चालणार नाही आम्हांला’. !!!"
सौ. इंदिराजी," धन्य आहे ह्या पोरींची......... अन् त्यांच्या आईबापांची.......
अगं असल्या आगाऊ मंडळीनां तंसल्याच भाषेत उत्तरं द्यावी लागतात वृन्दे....शरूभावजींचं कांहीच चुकलं नाही....आतां समस्या काय आहे?"
सौ. वृन्दावहिनी," काल अजून एक स्थळ आलेलं आहे.....गोडबोले म्हणून आहेत कोणीतरी.....
शनवारात राहतात.....मुलगी ’अनघा’.....’आय. टी.’ वाली आहे."
सौ. इंदिराजी," म्हणजे सगळंच चिंताजनक.!!"
सौ. वृन्दावहिनी," तर झालंय् असं....... की माझं म्हणणं हे स्थळ बघूंच नये.......आपल्याला जर कांही कर्तव्यच नसेल........तर कश्याला जायचं उगीच त्या वाटेला?....होय की नाही?"
"बरोबर आहे तुमचं.", मी म्हणालो.
सौ. वृन्दावहिनी," तर तुमच्या ह्या मित्रवर्यांनां ’जन्मगांवा’ चा पुळका आलाय्....म्हणताय्त ’उत्तम मुलगी कुठंही असूं शकते......
तूं नसलीस येत, तर मी एकटा जाणार मुलगी बघायला’.!!
नव्हे.....आत्तां नाष्टा झाला की लगेच निघालेत....घोंड्यावर बसून !!....म्हणून भावजीना फोन केला तांतडीनं.....
आतां समजलं काय सगळं रामायण-महाभारत तुम्हांला ?."
मी," समजलं मला सगळं वृन्दावहिनी.......आतां तुमचं काय म्हणणं आहे याउप्पर.?"
सौ. वृन्दावहिनी," माझी मुळीच तयारी नाही ’ह्या’ नां एकटे सोंडायची....."
मी," मग मी जाऊं काय शरद बरोबर?......चालेल तुम्हांला?"
सौ. वृन्दावहिनी," तसं नको भावजी.....’हे’ तुम्हांला एकट्याला दाद देतील असं वाटत नाही मला......"
सौ. इंदिराजी," मग काय करायचं? हवं तर मी पण जाते बरोबर."
सौ. वृन्दावहिनी," तूं सोंबत जात असलीस तर मग माझी कांही हरकत नाही सुमे....तसं झालं ना, तर मग ’हे’ तिथं जाऊन कांही तमाशा करायला तरी धंजावणार नाहीत."
"ठीकाय् वहिनी.....आम्ही दोघेही जातो शरद बरोबर....मग तर झालं ना?", मी म्हटलं.
सौ. वृन्दावहिनी ," सुटले बाई एकदाची सुमे.....पोंटात गोळाच आला होता बघ सकाळी.....एकच लक्ष्यांत ठेंवा पण....बोलायचं काय ते भावजीनां च बोलूं दे......’ह्यां’ ना तिथं तोंड उघडायची संधीच देऊं नकां म्हणजे झालं.!!
......कळलं ना?"
"ठीकाय् गं वृन्दे", सौ. इंदिराजी म्हणाल्या," माझ्यावर भंरवसा आहे ना तुझा?....काम झालं म्हणून समज....आणि निश्चिंत हो अगदी."
एव्हढ्यांत ," अगं ए वृन्दे.....हे तुझं सामान घे ताब्यांत ", असं ओंरडतच शरदराव घरांत आले......
आणि आम्हांला बघून जरा चंपापलेच," वा वा वा !! काय रे नाना......अरे सुमावहिनी तुम्हीपण?
म्हणजे ’तुका म्हणे सकाळ पारीं । विठ्ठल-रखमा उभें दारीं’ !!.........
बोला, काय भानगड? "
मी," तुका म्हणे नव्हे.....शर्या म्हणे.!!......अणि भानगड बिनगड कांही नाही....सहजच."
शर्या," कसे काय बुवा सहजच उठून असे पारोसेच पळत आलाय्त इथं?......’डी डे कॉल’ केला ना तुला वृन्दीनं ?"
शर्याच्या चंलाखपणाची दाद देत सौ. इंदिराजी म्हणाल्या," कॉल केला वृन्दा नं.....पण तो ’डी डे कॉल’ नव्हता."
शर्या," मग काय माझ्या बारश्याचं आमंत्रण द्यायला कॉल केला होता?.....ऑं?......टांग मारूं नकां मला सुमावहिनी."
सौ. इंदिराजी," भावजी, अहो तुमच्या बारश्याचं आमंत्रण मला कश्याला देईल ती?....ते मी कधीच जेंवलेय्....काय?"
शर्याची अशी गंठडी वळल्याबरोबर सौ. वृन्दावहिनींचा चेंहरा क्षणांत उजळला.......!
अन् त्या आतां कपाळाला हांत लावून फिदीफिदी हंसायला पण लागल्या. !!
सौ. इंदिराजी," त्याचं काय आहे भावजी......वृन्दा नं फोन केला एव्हढ्यासाठीच, की वधू बघायला एकट्यानं जायचं नसतं कधी....
आणि तें तुम्हाला माहीत नव्हतं एव्हढंच..... तेव्हां आम्ही दोघे तुमच्या बरोबर येणार आहोत."
शर्या," नाना....हे दिसतंय् तितकं सरळ नाही बरं.!!...ह्या वृन्दी नं कुठंतरी पाचर मारून ठेंवलीय्....अगदी नक्की.!! "
सौ. इंदिराजी," कसली पाचर बिचर घेऊन बसलाय् तुम्ही भावजी?
अहो पोरीचे आईबाप वयानं तुम्हाला ज्येष्ठ असले तर तुम्ही एकटे काय करणार? शिवाय कुणीतरी बाईमाणूस लागतंच बरोबर अश्या वेळेला.......कळलं?"
पण इतक्या सरळपणांनं बधला, तर तो ’शर्या’ कसला?
म्हणाला," छान....म्हणजे तुम्ही पण आतां ह्या वृन्दी ची री ओंढायाला लागलात की काय सुमावहिनी?"
मी म्हणालो," हे बघ शर्या....खरं सांगायचं तर वृन्दावहिनी म्हणताय्त तेंच मलाही पटतंय्....हे स्थळ बघायला जायच्या भरीला आपण पडूं नये हेंच बरं."
शर्या च्या अंगांत आतां अचानक ’जन्मग्रामा’ चं वारं संचारलं.....
," कां म्हणून रे नाना?....तुम्हांला काय वाटतंय्.... मी एकटाच ही लढाई ’फत्ते’ करून येऊं शकत नाही की काय?.....ऑ?
लेको ’मुळामुठे’ चं पाणी आहे हे.!!...समजलांत?
लढूं ’पेशवे’ आम्ही फांकडे...न् एका घांवात शंभर तुकडे.’!!!....काय?"
सौ. वृन्दावहिनी शर्या च्या तोंडासमोर हांत ओंवाळत म्हणाल्या," अगदी बरोबर!!!....पण घांव कुणाचा, आणि तुकडे कुणाचे? "
शर्या," म्हणजे?.........काय म्हणायचं काय आहे तुला?"
सौ. वृन्दावहिनी," ’शंभर तुकडे’ करायची धंमक ’छत्रपतीं’ च्याच घांवात असते......’पेशव्यां’ नी त्या फंदांत पडायला जायचं नसतं.!!!...कळलं? "
शर्या," म्हणजे?"
सौ. इंदिराजी," म्हणजे असं, की ’छत्रपतीं’ चा ’उद्योग’ करायला ’पेशवे’ गेले.... की ’पानिपत’ अटळ असतं.!!!!.....काय?"
सौ. वृन्दावहिनी अन् मी फिदीफिदी हंसत सुटलो....
अन् शर्यानं च स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!!
सौ. वृन्दावहिनी नी तत्क्षणीं ती सुवर्णसंधी सांधून निर्णायक घण मारत पांचर पक्की ठोंकली,"आणि ’पानिपत’ झालं, की मग मारुती च्या बेंबी त अडकलेलं ’पेंशव्यां’ चं बोंट बाहेर काढायला ’सख्खे काका’ पण कुचकामी ठंरतात.!!.....ते निस्तरायला मग ’नाना’ नां च पाचारण करावं लागतं.!!!!........समजलं?"
सौ. वृन्दावहिनीं नां शर्या नं कोंपरापासून हांत जोडले. !!!!......," समजलं बरं ’वृन्दाबाई’....अगदी नीट समजलं.......!!"
सौ. इंदिराजी," तेव्हां भावजी, ’राजनैतिक वाटाघाटी’ काय त्या ’नाना’ च करतील.!!...आपण फक्त बघायचं.!!!...काय?" पण हार मानेल तर तो शर्या कसला?
आमच्याकडं वळून सौ. वृन्दावहिंनींकडं बोंट दाखवत शर्या नं मग त्याची हुकमी धोबीपछाड मारली, " नाना.....’वृन्दा’ हे हिचं सासरचं नांव आहे......माहेरचं काय होतं माहीताय् तुला?"
मी," नाही बुवा.....काय होतं?"
शर्या," ’आनंदीबाई’ !!!.....हीः हीः हीः हीः हीः.....!!!!!"
आतां मी नी सौ. इंदिराजी खो खो हंसत सुटलो....
अन् सौ. वृन्दावहिनी शर्याकडं ’खाऊं की गिळूं’ नजरेनं बघायल्या लागल्या......मग आमच्याकडं सावकाश मोहरा वळवत म्हणाल्या," आतां खात्री पटली ना सुमे, की भावजीनां मी ’डी डे कॉल’ कां केला?"
सौ. वृन्दावहिनींची समयसूचकता बघून आतां आम्ही दोघांनी कपाळांनां हात लावले.!!!!
शर्या,"ठीक आहे सुमावहिनी......तुम्ही म्हणाल तसं......स्वतःच येताय् बरोबर....बहोत खूब !! मजा येईल अगदी......आतां अंघोळी उरकून उलटपावलीं परत या नाष्टयाला इकडंच.....तासाभरात निघायचं आहे आपल्याला."
सौ. वृन्दावहिनीनीं टांकलेला श्वास शर्याच्या नकळत निरखून आम्ही घरीं परत फिरलो......
तासाभरांत सकाळची सगळी कामं उरकून आम्ही पुन्हां शरद च्या घरीं नऊ वाजतां पोंचलो.
सौ. वृन्दावहिनी नी नाष्टा मांडलेलाच होता. खातांखातां शर्या नं अचानक विचारलं...." नाना....हे ’सॉफ्टवेअर टेस्टिंग्’ म्हणजे नेमकं काय काम असतं रे? "
" कश्यासाठी विचारतोय्स?", मी म्हणालो.
शर्या," अरे ही मुलगी....अनघा गोडबोले......जिला बघायला आपण चाललोय् नां, ती ’सॉफ्टवेअर टेस्टिंग्’ चं काम करते, म्हणून विचारलं.
गोरा पण ’सॉफ्टवेअर इंजिनियर’ म्हणून काम करतो ना.....तें च असतं काय हे? "
मी म्हणालो," नाही.....’सॉफ्टवेअर इंजिनियरिंग’ साठी इंजिनियर च लागतो, पण ’सॉफ्टवेअर टेस्टिंग्’ चं काम कोणीही प्रशिक्षित माणूस करूं शकतो....आर्टस्-कॉमर्स् वाला असला तरी."
शर्या," म्हणजे? मला नाही समजलं.....दोन्ही ’सॉफ्टवेअर’ च ना? "
मी," जरा सोपं करून सांगतो.....’सॉफ्टवेअर टेस्टर’ हा सॉफ्टवेअर तयार करूं शकत नाही.....त्यासाठी इंजिनियर च लागतो.
आतां असं बघ....तूं ऑटोमोबाइल्स् वाला आहेस ना?
तुमच्याकडं ’इंजिन डेव्हलपमेण्ट्’, ’इंजिन मॅन्युफॅक्चरिंग्’, आणि ’इंजिन टेस्टिंग्’ या तिन्हीमध्ये जो फरक असतो ना, तसंच हे पण आहे."
शर्या," आलं लक्ष्यांत....थोंडक्यात हे ’सॉफ्टवेअर टेस्टिंग्’ म्हणजे चक्क धोंबीघाटावरचं काम आहे म्हण की.........
आलं धुणं की फक्त बडवायचं, अन् जसं च्या तसं परत पाठवून द्यायचं.....वरचा मजला बिनकामाचा.!!!....असंच ना?"
मी," अगदी एकशे दहा टक्के नाही.....पण जंवळजंवळ तसंच.....आणि ’ह्या’ला च आपलं माननीय सरकार ’आय्. टी. सेवा क्षेत्राची घोडदौड’ म्हणत स्वतःची पांठ थोंपटून घेतं."
शर्या," डॅंबीस लेकाचे.....मुलगी काय करते म्हणून विचारलं, तर ’सॉफ्टवेअर’ वाली आहे म्हणून सांगितलं त्यांनी.!!"
सौ. इंदिराजी," भावजी, अहो आई-बापांना तरी कुठं काय कळत असतं त्यातलं? ते बिचारे पोरगी जे सांगेल, तेंच सांगणार आपल्याला.....चला निघूं या."
आम्ही साधारण साडेदहा वाजतां शनिवार पेंठेत श्री. गोडबोल्यांच्या घरी पोंचलो.
पूर्वीचा जुना वाडा पाडून नवी चार मजली इमारत बांधलेली दिसत होती...श्री. गोडबोल्यां चं घर तिसर्या मजल्यावर होतं.....
वाड्यातलं असलं, तरी घर चांगलंच फॅशनेबल दिसत होतं......गोडबोलेबाईंचा बॉबकट् पण कुर्यात डोंलत होता....
’सौं इंदिराजी’ नीं जरा चंपापूनच शर्याकडं बघितलं. !!
श्रीयुत गोडबोले मात्र साधेसुधे वाटले....ते स्टेट बॅंकेत मॅनेजर होते....सौ. गोडबोले गृहिणी.
श्री. गोडबोले यांनी माहिती दिली....दोन मुलं....मोठा मुलगा एम्. बी. ए. झालेला.....अमेरिकेत....
ही मुलगी पाठची....शिक्षण बी. कॉम्.....’सॉफ्टवेअर टेस्टिंग्’ चा कोर्स झालाय्....’एल्. ऍण्ड टी. इन्फोटेक्’ मध्ये नोकरी.... वगैरे.
चहाबिहा आला.....सौ. गोडबोले म्हणाल्या," अनघा जिमखान्यावर गेली आहे......येईलच इतक्यात."
चहा झाला, अन् पांचएक मिनिटांतच चि. सौ. कां. अनघाबाई अवतरल्या.......
आम्ही तिघे बघतच बसलो........
स्टोनवॉश् बर्म्युडा....वर ढगळ पुलओव्हर....केंसांचा स्टेप्कट्......गळा-कान-हांत बोडकेच.....कपाळीं कुंकवाचा पत्ता नाही.....पायात बीनमोज्याचे रीबॉक् बूट....दोन्ही डोंळ्यांवर लोंबणार्य़ा वीतवीत लांब बटा.....त्या क्षणाक्षणाला मानेला झंटके देंत मागे भिरकावणं.......अन् हातात पर्सऐवजी टॅब्लेट. !!
’सौं इंदिराजी’ च्या कपाळावर सूक्ष्मशी आंठी उमटलीच.......
श्री. गोडबोले जरा अस्वस्थ झाले.....
म्हणाले," अहो नव्या पिढीच्या आंवडीनिवडी वहिनी.....त्यांना हे असंच आवडतं ना......काय करायचं?"
चि. सौ. कां. अनघाबाईनीं सगळ्यांना ’हॅलो-हाय्’ केलं......अन् स्थानापन्न झाल्या.
सौ. गोडबोले म्हणाल्या," तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा.....
अनघा तशी बोलायला धीट अन् मोकळी आहे बरं का......मी आलेच ’कुक्’ ला स्वयंपाकघरातलं आंवरायला सांगून."
’सौं इंदिराजी’ नी माझ्याकडं पाहिलं....अन् शर्या नं तोंड उघडायच्या आत मी च संभाषणाला सुरुवात केली. !!
प्राथमिक माहिती....कंपनीतलं वातावरण.....कामाच्या वेंळा वगैरे सगळं झालं.
आवडीनिवडी विचारल्यावर मात्र गाडी भलत्याच दिशेला वळायला लागली.....!!
मी," बेटा.....कामाव्यतिरिक्त इतर छन्द-आवडीनिवडी काय आहेत तुझ्या?"
अनघा," हॉर्स रायडिंग करते... ड्रायव्हिंग येतं...शॉपिंग ची आवड आहे.... गिर्यारोहणाचा कॅम्प झालाय...सान्सा डान्सिंग् शिकतेय्....पार्ट्याना जायला आवडतं.....!!"
क्षणाक्षणाला ’सौं इंदिराजी’ च्या कपाळावरच्या सूक्ष्म आंठ्या वाढायला लागल्या.!!!
मी," छान छान....बरं, करियर च्या बाबतीत पुढं काय करायला आवडेल तुला?"
अनघा," ’आय. टी.’ क्षेत्रात ’यू. एस्.’ मध्ये काम करायचा विचार आहे. !!"
मी," जोडीदाराकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत संसाराबद्दल?"
अनघा," मी पण कमावती आहे. तेव्हां त्यानंही घरातलं माझ्याइतकंच करायला पाहिजे....त्यासाठी वेंळ नाही मला.!!"
सौ. गोडबोले जरा चंपापल्याच....म्हणाल्या," अहो एकदां अंगावर पडलं ना, की करतात सगळं आपोआप....अल्लड वय आहे ना?"
अनघाबाईनीं मानेला झंटका देंत डोंळ्यावर आलेली बट पाठीमागं भिरकावली. !!!
आतां ’सौं इंदिराजी’ नी मला खूण करत सूत्रं आपल्या हातांतघेंतली......अन् मामला ज्यास्तच कठीण व्हायला लागला.
सौ. इंदिराजी," हे बघ अनघा, तुम्ही मुली नवीन आधुनिक पिढीतल्या.....पुढारलेल्या.....घराबाहेर पडलेल्या.....अन् कमावत्याही आहांत. पण कितीही झालं तरी आपल्याकडं इंग्लंड-अमेरिकेसारखी पद्धत नाही. घराची सगळी धुरा अखेर बाईलाच सांभाळावी लागते......
नातीगोती-व्यवहार सांभाळायचे असतात....आलंगेलं बघावं लागतं.....देणीघेणी-सणवार-लग्नं-मुंजी....थोडं असतं काय?
आतां नवरा सांगितलेली कामं करीलही, पण सूत्रं सगळी घरातल्या बाईलाच हलवावी लागतात.....खरं की नाही?"
अनघाबाई ढिम्म च......
आतां मला सांग.......ह्यातलं तुला काय काय माहीत आहे....तुझ्या वयाच्या मानानं तरी?"
अनघाबाई तंटकन् म्हणाल्या," ’गौरांग’ ला ह्यातलं काय काय येतं?"
श्री. गोडबोल्यांचा चेंहरा गोरामोरा झाला.....
अन् सौ. गोडबोले लगबगीनं हस्तक्षेप करीत ’सौं इंदिराजी’ ना म्हणाल्या," तुम्ही मनावर घेऊं नकां बरं....अहो ह्या नव्या पिढीतल्या मुली.............ह्यांना पांचपोंच तितकाच असायचा."
’सौं इंदिराजी’ च्या जिवणीला आतां त्यांची खास ’हिटलरी’ मुरड पडली......!
अन् शर्या च्या सांवध नजरेनं ती अचूक टिपली.......!!
शर्या च्या कपाळावरची शीर आतां मला दिसायला लागली.....!!!
त्याच्या डोंळ्यात ती घातक चंमक लंकाकली.....!!!!....अगदी क्षणभरच.....
पण माझ्या नजरेतनं मात्र ती सुटली नाही.
कांही कळायच्या आंतच आतां शर्या नं च तोंड उघडलं....!!
आणि ’सौं इंदिराजी’ नी बोलायला उघडलेलं तोंड मुत्सद्दी पवित्रा घेंत मिटलं....!!
इतका वेंळ मोठ्या कसोशीनं सांभाळून धंरलेली सूत्रं माझ्या हातांतनं ताड्कन् निसटली....
आणि बघतां बघतां त्या वधूपरीक्षा सोहळ्याचा आतां ’कपाळमोक्ष सोहळा’ होणार, हे मला स्वच्छ दिसायला लागलं.....!!!
अन् डोंळ्यापुढं सौ. वृन्दावहिनींचा संतापलेला लालबुंद चेंहराही तंरळायला लागला.
शर्या," हे बघ अनघा.... तुझं म्हणणं मुळीच चूक नाही....कमावायची जबाबदारी जर दोघानीही उचलायची असेल, तर बाकीच्या जबाबदार्या पण दोघानी समसमानच उचलायला हव्यात....असं च तुला अपेक्षित आहे....बरोबर ना?"
अनघाबाई ," होय....तसंच."
शर्या," रास्तच आहे ते......कांही गैर नाही त्यात."
श्री. व सौ. गोडबोल्यांचे चेंहरे जरा सैलावले.....
अनघाबाईनी डोंळ्यावर आलेली बट मानेला झंटका देत पुन्हां एकदां पाठीमागं भिरकावली....!!!
शर्या," आतां असं बघ.....गौरांग नं अनेक वर्ष एकट्यानंच घराबाहेर काढलेली आहेत....त्यामुळं तुला कसलीच चिंता करायचं कारण नाही.......काय? अखेर घर-संसार हा दोघानी मिळूनच उभा करायचा असतो.....होय की नाही?"
अनघाबाई खूष झाल्या," होय....माझी हीच अपेक्षा आहे जोडिदाराकडून."
शर्या," अजिबात चिंता करूं नकोस तूं .......... त्याला स्वयंपाक करतां येतो.....पैश्याचे व्य्वहार जमतात....धुणी-भाण्डी-केंर-फरश्या सगळं .....अगदी वाट्टेल ते करील तो तुझ्या बरोबरीनं.....फक्त त्याची एकच अडचण आहे बघ.....त्याबाबतीत मात्र त्याला कांहीही करतां येत नाही."
सौ. गोडबोलेबाईनी अस्वस्थ होत हस्तक्षेप केला," काय आहे बरं अशी अडचण?"
अन् कुणाला कांही कळायच्या आंत अनघाबाईनां नुस्त्या नजरेनं जागींच खिळवून ठेंवत शर्या नं चितपट कुस्ती मारली," गौरांग ला बाळंत होतां येत नाही.!!!!........... त्याचं काय करणार आहेस तूं?"
आम्ही दोघे आं वांसून शर्याकडं बघायला लागलो.....न् बघतच बसलो.!!
’अनघाबाईं’ चा घारा-गोरा चेंहरा फाड्दिशी कानफटांत बसल्यागत क्षणार्धात काळाठिक्कर पडला......!!!
अन् गोडबोले दांपत्यानं सुन्नबधिर होंत आपापल्या कपाळानां हांत लावले. !!!!
*******************************
----- रविशंकर.
१० फेब्रुवारी २०१४.
No comments:
Post a Comment