Search This Blog

Saturday, 1 March 2014

॥ आचार्य देवो भव ॥

॥ आचार्य देवो भव ॥




" उगीच माझं डोकं पिकवूं नकां आतां कुणीही....समजलं ?
’काका’, ह्या ’रवि’ स उद्या टिकेकर मास्तरांच्या ताब्यांत देऊन टाका.!!!"
आज्जी नं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाच्या अधिकारवाणीनं एका झंटक्यात मामला निकाली काढला.....
अन्‌  मी सुटकेचा श्वास सोडला......
त्या बारा वर्षाच्या वयात, आज्जी नं मला जीवनमरणाच्या लढाईतनं सहीसलामत बाहेर काढलं होतं.!!
तारीख होती १९ जून १९६४....


झालं होतं असं, की त्यावेळीं मी मराठी सातवीत शिकत होतो...कोल्हापुरातल्या ’प्रायव्हेट हायस्कूल’ मध्ये.
आमचं पंधराएक जणांचं कुटुंब....वडील शेती करायचे. आम्ही सहा भावण्डं.....पांच भाऊ अन्‌ एक बहीण...दोन आत्या...न्‌ शिकणारा मामा पण होता घरांत.
मी सगळ्यात लहान असल्यामुळं बाकी सगळ्यांना मला पिदडायचा अधिकार जन्मतःच प्राप्त झालेला.!
तथापि त्याची भरपाई म्हणून की काय, परमेश्वरानं शेण्डेफळ म्हणून मला आज्जी चं अभेद्य कवच बहाल केलेलं असावं.!!

ही माझी आज्जी म्हणजे माझ्या वडिलांची आई.... त्यावेंळी साधारण पासष्टीला टेंकलेली असावी......

वडील लहान असतांना, कूळकायद्याच्या वरवंट्याखाली कुळांच्या घंश्यांत जायला निघालेली पिढीजात शेतीवाडी सहीसलामत सोंडवून स्वतः कसणारी, अन्‌ पंधरावीस जणांच्या कुटुंबाचा रामरगाडा एखाद्या कर्त्या पुरुषाच्या थांटात, तब्बल वीसएक वर्षं एकटी नं रेंटायचा भीम पराक्रम करून दाखवणारी विलक्षण कर्तृत्त्ववान्‌ अन्‌ तंडाखेबंद बाई.
आख्खा शेतीवाडी चा व्याप, अन्‌ घरादाराचा गदाडा आज्जी नं जणूं कनवटीला लावलेला होता.
घरासकट समस्त कोल्हापूर माझ्या वडिलानां ’काका’ अन्‌ आज्जी ला ’आज्जी’ म्हणूनच ओंळखायचं.
अन्‌ गम्मत म्हणजे माझी आज्जी सुद्धां वडिलांना ’अहो काका’ म्हणूनच हांक मारायची.!!
घरचे अन्‌ दारचे - अगदी शेतीवाडीसकट - सगळेच व्यवहार आज्जी नं एकहातीं सांभाळलेले असल्यानं तिचा अनुभव दांडगा,
अन्‌ तंड्फही विलक्षण होती. बाई असूनही " मी आलो...मी करतो....", असं पुरुषी थांटातच बोलायची.!!
त्यामुळं आज्जी चा शब्द घरांत अखेरचा होता....अन्‌ त्यावर ब्र काढायचीही कुणाचीच शामत नव्हती....अगदी ’काकां’ ची सुद्धां.!!
असल्या अभेद्य ढाली चं संरक्षण असल्यामुळंच मी सहीसलामत बंचावलो होतो. !!

झालं होतं असं....

माझी एकजात सगळी भावंडं बुद्धिमान म्हणून कोल्हापूरभर प्रसिद्ध होती.....सगळेच ’रॅंकहोल्डर’.
सगळ्यात वडील बंधू तर मॅट्रिक्‌ ते एम्‌. एस्सी. एम्‌ डी. पर्यंत तहहयात ’सर्वप्रथम’ मानांकनाचे मानकरी. 
आणि असल्या पार्श्वभूमीवर मी सातवीला इंग्रजी विषयांत चक्क नापास झालेलो होतो. !
पण गोची अशी झाली होती, की गणितात मात्र ’सर्वप्रथम’ मानांकना चा वारसा चालवलेला होता.....शंभर पैकी शंभर. !!
त्यामुळं घरांत सगळ्यांची मी नकळत ’अस्खलित गोची’ करून ठेंवलेली होती.....!!!
कुणालाच मला बिनडोक पण ठंरवतां येईना, अथवा पांठही थोंपटतां येईना..........
वडिलांनाही कळेनासं झालं की माझं काय करावं ते.....बदडून काढावं तरी पंचाईत. !!!
तश्यात मग आईनं च ही ’घरपंचायत’ बोलावली..... काय तो फैसला करायला.......
कुणी म्हणत होतं ’रिमांड होम’ मध्ये ठेंवा...कुणी तांपट म्हणत होते की ’हांकलून द्या’....कुणी म्हणालं ’शेंतीला जुंपा’....एक ना दोन.
आई चं मात्र ठाम म्हणणं होतं ’ह्याच्या अभ्यासाकडं मोठ्यानी कुणीच लक्ष दिलेलं नाही...मग असं होणारच.’
आणि मी मात्र एखाद्या पिंजर्‍यात उभ्या केलेल्या आरोपीसारखा भेंदरून घरातल्या सगळ्यांच्या मधोमध उभा होतो.....
अखेर आज्जी नं च अशी खटल्याची वासलात लावल्यावर, सगळ्यांना मूग गिळून गप्प बसावं लागलं.
एक चिनी म्हण आहे.....जी मला तेव्हां माहीत नव्हती....की ’ जे होतं ते भल्यासाठीच. ’
उपरोक्त अपघातात सापडल्यामुळं माझे ’आद्य गुरू’ च मला भेंटणार होते, हे भलं च मला ज्ञात नव्हतं.!!!

झालं.........दुसर्‍या दिवशीं सकाळी दहा वांजतां ’काकां’ च्या मागनं माझी नळ्यासारखी यात्रा मिरवत ’टिकेकर’ मास्तरांच्या घरीं......... म्हणजे शिकवणी च्या ठिकाणीं दाखल झाली.

टिकेकर मास्तर हे काकां चे एकेकाळचे वर्गमित्र, अन्‌ लंगोटियार पण.
मॅट्रिक्‌ नंतर बी. ए. ला ह्या गृहस्थांनीं ’इंग्रजी’ विषय घेंऊन सुवर्णपदक पटकावलेलं होतं.......
नंतर उच्च शिक्षणासाठी मिळालेली शिष्यवृत्ति अन्‌ कोल्हापुरातल्या मान्यवरांच्या पांठबळावर, ते स्वातंत्र्यपूर्व काळांत ऒक्स्‌फोर्ड्‌ विश्वविद्यालयाची इंग्रजी विषय घेंऊन पदव्युत्तर पदवी द्वितीय क्रमांकाच्या मानांकनासह प्राप्त करून आलेले.....
इंग्रजी त ठार नापास व्हायचा पराक्रम केलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ह्या पेक्षा उत्तम गुरू दुसरा कोण मिळणार?
आज्जी चा होरा अगदी अचूक होता....!!

मास्तरांचा नवाचा वर्ग आटोपलेला होता, अन्‌ चहा घ्यायला ते तळमजल्यावर यायची वेंळ होंत आलेली होती.

आम्ही घरांत पाऊल टांकलं, अन्‌ मला बाहेरच्या खोंलीत बसवून ’काका’ मास्तरांना भेंटायला वर गेले.
आणि दोनचार मिनिटांतच मास्तरांच्या बरोबर खाली आले.....
भीतीनं गंळाठल्यामुळं मी आपला खालीच मान घालून बसलेलो होतो. 
’या बसा’ झालं.....माई नीं [ मास्तरांच्या सौ. ], एका वाटीत माझ्यापुढं हळिवाचा लाडू पण ठेंवला.
मला नवल वाटलं.....हा लाडू मला जाम आवडतो, हे माई नां कसं माहीत?.....कोण जाणे.
काका," हे टिकेकर मास्तर.......नमस्कार करा वांकून.............."
मी मास्तरांचे वांकून पाय धंरले, अन्‌ मास्तरांनी तोंडभर आशीर्वाद दिला," समृद्धो भव.!!"
मी मास्तरांच्या कडं हंळूच बघितलं.......
परीटघडीचं करवतीकांठी दुटांगी शुभ्र धोंतर.....वर चॉकलेटी रंगा चा ’गॅबर्डिन्‌’ चा कडक इस्त्री चा कोंट.....पायांत दोन-दोन किलो वजनाच्या अस्सल कोल्हापुरी वहाणा......डोंक्याला गोल काळीभोंर टोपी......हातांत चंकाचंक्‌ पॉलिश्‌ केलेली चालायची नक्षीदार अस्सल सागवानी कांठी......भव्य कपाळ..... त्यावर लालभडक कुंकवाचा उभा टिळा......डोंळ्यावर न्यायाधीशाच्या थाटाचा काळाभोर चष्मा....राजेशाही तांबूस गौरवर्ण......धारदार नाक......मायाळू पण करारी भेंदक डोंळे......चेंहर्‍यावर प्रचण्ड विद्वत्तेची साक्ष देणारं सात्त्विकतेचं तेज........
अन्‌ गंमत म्हणजे सुपाएव्हढे बाहेर आलेले भलेमोठ्ठे कान....!!!!
हे ’मास्तर’ आहेत, की ’गणपतिबाप्पा’?.........कांही कळेनाच.   
बघतांक्षणीं मला मास्तर बेहद्द आवडले....
आणि हे आपलं इंग्रजी नक्की सुधारतील अशी खात्रीच पटली.


 मास्तर," चहा घ्या काका.....थंड होईल.....कसे काय आलांत इथं?.....हे शेंडेफळ च ना?"
काका," शेंडेफळानं च पराक्रम केलाय्‌......म्हणून यावं लागलं.!!....’ह्या’ ला ताब्यात घ्या."
मास्तर," घेंतो की.......पण काय रे बाळ, तुला शिकवणी कश्याला हंवीय्‌?"
मी आपला खाली मान घालून लाडू च गिळत होतो.... मास्तरांच्याकडं न बघतांच.
मास्तर," काय झालं रे बाळ?.........अं?"
काका," काय झालंय्‌, की............
मास्तरानी काका ना गप्प रहायला खूण केली,
" हं.....इकडं ये बाळ असा माझ्याजंवळ....आतां सांग बघूं मला काय झालं ते."
मी कांही न बोलतांच खाली बघत प्रगतिपुस्तक मास्तरांच्या पुढं धंरलं..........
मास्तरांनी प्रगतिपुस्तकाकडं बोंट दांखवत मग मलाच प्रश्न विचारला,"मी तुला विचारतोय की ’ह्या’ ला?" 
मी पापाचा पाढा वांचायला सुरुवात केली," गुरुजी...
मास्तर मला मध्येच तोंडत म्हणाले," गुरुजी नको.... ’मास्तर’ च म्हण.....तें च बरोबर आहे......
बिकॉज्‌ आय ऍम मास्टर ऑफ़ समथिंग्‌......यू ऍप्ट्ली से ’मास्तर’.......इज्‌ दॅट्‌ नॉट्‌ सो‌?"
मी," हो."
मास्तर," सो....हेन्स्‌फोर्थ, ऍड्रेस मी बाय्‌ दॅट्‌ प्रोनाउन्‌ अलोन......!!"
’कॉल मी’ नाही.....’ऍड्रेस मी’!!........’गॉट्‌ इट्‌?’ किंवा ’ओके?’ नाही....’इज्‌ दॅट्‌ नॉट्‌ सो‌?’...... !!!
बावन्नकशी ’केंब्रिज-ऑक्स्‌फोर्ड’ इंग्लिश ची चंव मी हयातीत प्रथमच चांखत होतो. !!!
मी," मास्तर....... इंग्रजी त अठ्ठावीस च गुण मिळालेत ......" 
मास्तर," म्हणजे ’पैकी च्या पैकी’ साठी बहात्तर गुण च कमी पडलेत ना?!!.......काय?"
मी हंबकलोच.
मास्तर,"आतां मला सांग..... असं कां झालं?....तुला इंग्रजी समजत नाहीय्‌ म्हणून, की आंवडत नाहीय्‌ म्हणून?"
मी," मला गुरुजी शाळेत काय शिकवतात ते नीट समजत नाही........."
मास्तर," ठीक....त्या बहात्तर गुणां चं काय करायचं ते बघूं आपण.......काय?
आतां असं बघ......हे विद्यामन्दिर आहे....होय ना?"
मी," होय....मास्तर."
मास्तर," आणि मन्दिरात दाखल झालं, की ’प्रसाद’ मिळतोच....खरं की नाही?"
मी गप्पच उभा.....
मास्तर मग आधी वाटीतल्या लाडवाकडं न्‌ मग हातातल्या नक्षीदार सागवानी कांठी कडं बोंट दाखवत म्हणाले," तुला कुठला खायचाय्‌?.......हा? की  हा? !!"
मी गप्पगार.......!!!!
मास्तर," इंग्रजी समजायला लागलं, तर नीट अभ्यास करशील मन लावून?"
मी," हो मास्तर.....करीन."
मास्तर मग ’काकां’ च्या कडं वळून म्हणाले," पाठवा ह्या ला उद्यापासून.......घेतो ताबा."
मामा," फी चं काय बाळासाहेब?......किती पांठवून देऊं?"
मास्तर," मी विचारलंय्‌ काय फी चं?....बघूं नंतर.... ह्याला ’रेन-मार्टिन’ चं व्याकरणाचं चं पुस्तक प्रथम घेंऊन द्या लगेच."
आणि मला म्हणाले," उद्यापासून ये बरं कां.....एकही खाडा करायचा नाही...........कळलं?"
निघतांना मी परत वांकून मास्तरांना नमस्कार केला....त्यांनी तों च आशीर्वाद पुन्हां दिला,"समृद्धो भव.!!"
हे कांहीतरी वेंगळंच होतं.....’आयुष्मान्‌ भव’,’शतायुषी भव’,’दीर्घायुष्यमस्तु’....असलं बर्‍याचवेंळा ऐकलेलं होतं.... पण हे कांहीतरी भलतंच.....मला नीटसं कळलं नाही.......
मी," मास्तर.......’समृद्धो भव’ म्हणजे ’काय’ भव?"
मास्तर हंसले," हयातभर अखंड शिकत राहिलास, तर समजेल की नाही?"
मी मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला.!!

जसजशी शिकवणी जोरांत सुरूं झाली, तसतसं हें च वाढायला लागलं.... 
कुठल्याही प्रश्नाचं धड सरळ उत्तर नाही.....फक्त प्रतिप्रश्न च. !!
मास्तर केंवळ प्रतिप्रश्न उपस्थित करायचे, अन्‌ माझ्या डोंक्याला मुंग्या लागायच्या....मग धंडपड करकरून प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोंधायची.....मग त्यावर स्वतःशीच काथ्याकूट करायचा.....
अन्‌ त्यावर पुन्हां चर्चा करायला मास्तरांच्याकडं गेलो, की परत सरळ उत्तरांऐवजी नवें च प्रतिप्रश्न. !!!
एकदां तर मी चंवताळून ह्या चा सोक्षमोक्ष लावायच्या तंयारीनंच मास्तरांच्याकडं गेलो.......
मास्तर महाभारत वाचत होते.....म्हणाले," काय रे..... का आलाय्‌स?.....काय अडलंय्‌?"
मी," मास्तर, तुम्ही कुठ्ल्याच प्रश्ना चं उत्तर मला सरळ कां देत नाही?" 
मास्तर फक्त हंसले....न्‌ परत तेंच," मला असं सांग....तूं इथं शिकायला येतोस, की माझं प्रवचन ऐकायला?"
मी कपाळाला हात लावत घरचा रस्ता धंरला.!!!

’समृद्धो भव’ असा आशीर्वाद मला मास्तरांनी दिलेला होता....त्याचा अर्थ ही धडपणे सांगितलेला नव्हता......
पण तो खरा करून दांखवायची धमक मात्र त्यांच्यात पुरेपूर होती, हे मला तब्बल चार वर्षांनी मॅट्रिक्‌ चा निकाल जाहीर झाला तेंव्हां समजलं...........
केंवळ चार वर्षांत मास्तरांनी मला इतका बेदम पिदडला, की सातवी त इंग्रजी त नापास झालेला माझ्यासारखा सामान्य विद्यार्थी त्यांनी मॅट्रिक्‌ च्या परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांकावर झंळकवला.!!!
आणि हे माझे ’आद्य गुरू’ स्वतःच त्या दिवशीं पेढ्यांचा भलामोठ्ठा पुडा घेंऊन आमच्या घरीं आले.....!!!
मास्तरां चा आनंद चेंहर्‍यावर मावत नव्हता," काका..... पेढे घ्या......वहिनी पेढे घ्या......!!!"
काका-आई," अहो आंत तरी या बाळासाहेब.....बसा बसा ....काय बातमी आहे?"
मास्तर," तुमच्या पाल्या नं माझी फी दामदसपटीनं चुकती केलीय्‌ काका.!!!.......पोरगं पहिलं झंळकलंय्‌ केंद्रात."
माझ्यावर इतकी माया करणारे मास्तर बघून मला गंहिवरून आलं.....
मी म्हणालो," मास्तर.....एक विचारूं?"
मास्तर," हूं.....विचार."
मी,"मी सातवीत असतांना प्रथम तुमच्याकडं आलो होतो, तेंव्हां तुम्ही मला,’ऍड्रेस्‌ मी ऍज्‌ मास्तर’ असं कांहीतरी म्हणाला होतात."
मास्तर," बरं.....मग?"
मी," ’कॉल्‌ मी मास्तर’ असं सरळ सोपं कां नाही म्हणालात?"
मास्तर," मला सांग....शिवणकला शिकून झाली, की कुठलं काम करायचं असतं?....कपडे शिवायचं? की कपडे धुवायचं? !!! "  
आई-काकानी च आतां धन्य होत आं वांसून आपापल्या कपाळांना हांत लावले. !!!

हळूंहळूं मास्तरांच्या बरोबर माझे सूर व्यवस्थित जुळायला लागले.....

त्याला कारण असं घडलं, की एकदां माझ्या डोंक्यात किडा वंळवंळला....’गुरू’ चा नेमका अर्थ काय?
’अध्यापक’, ’प्राध्यापक’, ’व्याखाते’, ’शिक्षक’, ’गुरू’, ’मास्तर’, ’प्राचार्य’ हे सगळेच शिकवतात...मग नेमकं यातल्या कुणाला ’गुरू’ म्हणायचं?....अशी ती शंका होती. 
ती विचारायला मी मास्तरांच्याकडं गेलो......मास्तर कुठलं तरी संस्कृत पुस्तक चांळत होते.
मी प्रश्न विचारला, अन्‌ मास्तरांनी हातातला संस्कृतकोष माझ्या पुढ्यात ठेंवला...पुढं कांही बोलायची सोय नव्हतीच... ... ...
मी कोष उघडून ’गुरू’ शब्दाची व्याख्या बघितली..........
कोषात लिहिलेलं होतं 
’अंगुलीम्‌ गृहीत्त्वा यो चलयति  स गुरूः’
...... ’यो पठयति’ असं कोष कुठंही म्हणत नव्हता.!!
अन्‌ त्या व्याख्येचं जिवंत मूर्तस्वरूप तर माझ्यासमोरच बसलेलं होतं.!!!
अक्षरशः आवाक्‌ होत मी कपाळाला हात लावला. !!!..........माझे डोळे खाडकन्‌ कायमचे उघडले.!!!
आणि ’देवो भव’ म्हणतांना, ’मातृ-पितृ’ पाठोपाठ ’आचार्यां’ ची वर्णी कां लागते, ते पण मला बरोबर समजलं. !!!! 

त्यापुढं मग मी च मास्तरांना छळायला सुरुवात केली.!!!

नुस्तं इंग्रजी च नव्हे, तर गणित,व्याकरणशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी,संस्कृत, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, पदार्थविज्ञान,रसायन, वनस्पतिशास्त्र, नाट्यशास्त्र..... अगदी काय वाट्टेल ते.
मास्तरांच्यावर सूड उगवायची मी एकही संधी सोंडली नाही, अन्‌ त्यांनी प्रतिप्रश्न विचारून माझ्या डोंक्याला मुंग्या लावायची.
बघतां बघतां माझी विशेष प्राविण्यासह एफ्‌. वाय्‌. बी. एस्सी. झाली....अन्‌ घरांत एक वेंगळीच समस्या उभी राहिली.
वडिलांचं स्वप्न होतं, की मी शल्यविशारद व्हावं, अन्‌ मला तर अभियांत्रिकी आवडायची.
ह्या दोन्ही शाखांमध्ये अर्हतेवर प्रवेश नक्की मिळेल इतके उत्तम गुण पण एफ्‌. वाय्‌. बी. एस्सी. ला माझ्या गांठीला जमा होते.
झालं......निर्णय कांही लागे ना, अन्‌ मी अखेर मास्तरांचं घर गांठलं.....
मास्तर कुठंतरी बाहेर जायच्या तंयारीतच दिसले..... मला म्हणाले," जरा बाहेर निघालोय्‌.....पण बोल तूं...... काय चिंता?"
मी," प्रवेश कुठल्या शाखेला घ्यावा तें कळत नाहीय्‌.....वैद्यकी की अभियांत्रिकी?....गुण दोन्हीकडं प्रवेश सहज मिळेल इतके आहेत.....तर मी आतां काय करूं?"
मास्तर," तूं काय करावंस ते मी कसं सांगणार तुला?..... बरं मला एक सांग......"
मी," काय सांगूं मास्तर?"
माझ्याकडं रोंखून बघत मास्तरांनी प्रतिप्रश्न केला," काय करतांना तुला तहान भुकेची शुद्ध रहात नाही?"
मी चाट च पडलो....एकच प्रतिप्रश्न विचारून शेंकडों प्रश्नांची अशी बघतां बघतां वासलात लावणारा महाभाग मी उभ्या जन्मांत पाहिलेला नव्हता.!!!
दुसर्‍याच दिवशीं वैद्यकी चा प्रवेश अर्ज फांडून टांकत मी अभियांत्रिकी ला प्रवेश घेंऊन मोकळा झालो. !!

मास्तर हयात असेपर्यंत मग हे असं च अखण्डपणे चालत राहिलं.......

होतां होतां चार वर्षं उलटली......१९७४ सालीं माझी अभियांत्रिकी ची पहिली पदवी पण प्रथम वर्गांत पूर्ण झाली.....
मास्तरांनी घरीं येऊन प्रत्यक्ष माझी पांठ थोंपटली, अन्‌ ते स्वतः वापरत असलेला इंग्रजी चा ’ऑक्स्‌फोर्ड’ चा शब्दकोश स्वाक्षरी करून माझ्या हातांत ठेंवला....मला जणूं आभाळ ठेंगणं झालं.!!!
नोकरी लागली.....अन्‌ घरीं मुलीवाल्यांच्या चंकरा सुरूं झाल्या.
आई-काका आतां थांबायला तयार नव्हते......चारदोन मुलीही बघितल्या.....पण माझी पसंती कांही होईना.!!
शेंवटी मी भात्यातला रामबाण उपसायचं ठंरवलं, अन्‌ सरळ मास्तरांचं घर गांठलं. !!
मास्तर नुकतेच दुपारचं वाचन आंटोपून चहा घेंत बसलेले होते......म्हणाले," या या छळवादी.....बसा असे माझ्याजंवळ.!!! "
मग माई नां हांक मारत म्हणाले," अहो चहा आणा लंवकर...आणि आपल्या ’ऍरिस्टॉटल’ चं कौतुक पण करा.....पहिल्या श्रेणीत अभियांत्रिकी पास झालेत." 
माई नी चहा दिला, न्‌ मास्तरांना म्हणाल्या," आतां लग्नाचं बघताय्‌त म्हणे काका.....काय बातमी आहे? "
मी," बातमी कांहीच नाही माई.....त्यासंबंधीच एक समस्या आहे...... म्हणून आलोय्‌ मास्तरांना भेंटायला."
माई," तुम्हां मुलांचं कांही कळतच नाही बघ.....कसली समस्या आलीय्‌ रे त्यात? आणि ’हे’ ती कशी काय सोंडवणार?"
मास्तर," माईं च्या विचारण्यातला मथितार्थ असा, की ’मी इंग्रजी चे वर्ग चालवतोय्‌ की वधूवरसूचकमंडळ? " 
सगळेच हंसायला लागले....
आतां माई च म्हणाल्या," अरे त्यात काय एव्हढं कठीण ?....फक्कड मुलगी बघायची, नी माळ घालून मोकळं व्हायचं....आहे काय न्‌ नाही काय."
मी,"तीच तर समस्या आहे माई...सगळ्याच मुलीनां नटवून थंटवून दाखवायला आणतात....अन्‌ सगळ्याच फक्कड वाटताय्‌त.!!"
मास्तर," ते तसं च असतं.....भर्तृहरि चं वचन आहे ना....’प्राप्ते तु षोडषे वर्षे गर्दभी अप्सरायते’.!!
आतां मला असं सांग, की तुला वधू च्या ’दिसण्या’शी कर्तव्य आहे की ’असण्या’शी?" 
मी," अर्थात्‌ ’असण्या’शी........पण ते कसं काय जोंखणार मास्तर?"
मास्तर," समोर बसलेल्या मुली चं पुढं पंचवीस वर्षांनी काय होणाराय्‌....ते कुणाकडं बघून ओंळखतां येईल?"
मी उडालोच....मास्तरांनी डझनावारी समस्यांची एकाच प्रतिप्रश्नांत सफाचट वाट लावलेली होती. !!
काय बघायचं तें नेमकं समजल्यावर मग आधी फक्कड वाटलेल्या मुलीही नापसंत झाल्या.....!!

यथावकश जेव्हां आमच्या ’इंदिराजी’ नां बघायला जायचा योग आला, तेव्हां मी बोलत होतो ’इंदिराजीं’ शी.....पण निरीक्षण मात्र त्यांच्या ’मातोश्री’ चं चाललेलं होतं.!!

त्यांचं वागणं-बोलणं.... करणं-संवरणं....हाताचा सढळपणा-आंखडलेपणा.....घरातला नेटकेपणा-अजागळपणा.....बोलण्यातला चंपखलपणा-बेंगरूळपणा ......अन्‌ स्वभावातला बुजरेपणा-धंडाकेबाजपणा.....
’इंदिराजीं’ चं ’दिसणं’, अन्‌ त्यांच्या मातोश्रीं चं ’असणं’, एखाद्या दर्दी माणसाच्या थाटांत चोंखंदळ नजरेनं मी न्याहाळलं......
अन्‌ ’इंदिराजीं’ च्या ’घार्‍या-गोर्‍या’ नसण्याची बिल्कुल पर्वा न करतां, तिथल्या तिथं ’पसंती’ सांगून मोकळा झालो.!!
तश्या सासूबाई खुर्चीतनं ताडकन्‌ उठल्या, अन्‌ मला सामोर्‍या येत भर बैठकीत बेधडकपणे त्यांनी माझ्या दोन्ही गालांवर कडांकडां बोटं मोडली. !!
मलाच लाजल्यासारखं झालं.....तश्या म्हणाल्या," अहो लाजताय्‌ काय एव्हढे?
मग माझ्या आईकडं निर्देश करीत पुढं म्हणाल्या," ’ह्यां’ नी कधी बोटं मोडली नाहीत की काय तुमच्या गालांवर? 
आत्तां मी बोटं मोडलीय्‌त तर एव्हढं अंग चोंरताय्‌... तुमच्या बायकोनं च मोडली असती, तर काय झालं असतं हो तुमचं?....ऑं?"
सगळे खो खो हंसायला लागले.........न्‌ मी च भंर बैठकीत कपाळाला हात लावला. !!!!
सासूबाई,"आमच्या कामाठी लोकांचं सगळं असंच असतं......कळलं? होईल हळूंहळूं संवय....... रुळलात की.!!"
पुढं नोकरीधंद्यानिमित्त मी हयातभर पुण्यातच राहिलो .....आई-काका कोल्हापूरला असायचे.
पण घरांतली ’आई’ ची उणीव, ह्या सासूबाईं मुळं मला जन्मांत कधीच जाणवली नाही.!!

१९७४ च्या हिंवाळ्यात आमचं शुभमंगल ह्या सासूबाईनीं, तोंडात बोट घालून बघत रहावं, अश्या धंडाक्यात एकहातीं पार पाडलं.!!!

’सौ. इंदिराजीं’ नी घरांत पाऊल ठेंवतांक्षणीच घराच्या उंबर्‍याचं ’एल्‌. ओ.सी.’ असं आपोआपच नामकरण झालं. !
हद्दीच्या आतला, म्हणजे हिंदुस्तानातला भूभाग ’सौ. इंदिराजीं’ च्या ताब्यात गेला.....अन्‌ माझी हद्दीबाहेरच्या ’सख्ख्या शेंजारी’ देशांत कायमची रवानगी झाली. !!
तिथं गेल्यावर, तिथल्या घटनेनुसार मला ’भारता’ च्या कुरापती अखंड कांढत रहायचा जन्मसिद्ध हक्कही प्राप्त झाला.!!!
आणि ’इंदिराजी’ खंवळल्यावर कुरापती अंगलट यायला लागल्या, की द्विस्तरीय-त्रिस्तरीय द्विपक्षीं वाटाघाटींची ’एरंडाची गुर्‍हाळं’ पिढ्या न्‌ पिढ्या कशी चालूं ठेंवायची तें पण बरोबर समजलं. !
हद्दी च्या आंतल्या प्रदेशांत यथावकाश ’सौ. इंदिराजी’ चा तडाखेबंद वरवंटा फिरायला लागला.....!!
अन्‌ विद्यमानपिढीसकट भावी पिढ्याही बघतां बघतां अक्षरशः सुतासारख्या सरळ झाल्या. !!!
मास्तरांच्या कृपेनं मी कायमचा सुखी झालो. 
दोरीवर एकचाकी सायकल चांलवणार्‍या कलावती च्या थाटांत, नोकरी नी घर अशी कसरत करीत ’सौ. इंदिराजी’ नीं आमच्या संसाराचा ’एकचाकी गाडा’ धंडाक्यात चालवला.....
उभ्या हयातीत मला घरातलं कांहीही बघावं लागलं नाही.!!! ....आजही लागत नाही.
थोंडक्यात, लग्नाच्या बाबतीत पण मास्तरांनीच मला ’तारलं’, असं म्हणायला कांहीही हरकत नाही.
माझ्यासारखंच मास्तरांना पण लहानपणीं त्यांच्या आईवडिलांनी नक्कीच आमच्या आज्जी च्या हवाली केलेलं असावं.!!!
मास्तर १९९१ सालीं स्वर्गवासी झाले....
अन्‌ ’लोखंडा’ चं कितपत ’सोनं’ झालंय्‌, तें वेंळोवेंळीं घांसून बघायचा माझा ’परीस’ च कायमचा हरवला.!!!!  

यथावकाश कॉंप्युटर चं युग अवतरलं.....टिपणवह्यांची जागा ’नोटपॅड‌’ नं बळकावली.....

माणसं ’पत्रलेखन’ विसरली....अन्‌ ’ई-मेल’ पांठवायला लागलीं........
शतक उलटलं....मोबाईल चा जमाना आला......अन्‌ मास्तरांच्या इंग्रजी चे धिंडवडे निघायला सुरुवात झाली....!
't 4 u' च्या जातकुळीतल्या ’एस. एम्‌. एस.’ नी मास्तरांच्या ’केंब्रिज-ऑक्स्‌फोर्ड्‌’ इंग्रजी चं अक्षरशः वाटोळं आरंभलं.!!
मास्तर हे बघायला आज हयात नाहीत.....हे आजच्या मोबाईलवेड्या पिढी चं नशीब च म्हणायला हवं.!!!
तसं म्हटलं, तर कुणालाच काळाच्या मागं राहून चालत नाही....तेव्हां मोबाईल मीही वापरतो....पण फक्त संभाषणापुरताच.
एकदां काय झालं......की मला एका महाभागाचा मोबाईलवर ’एस. एम्‌. एस्‌.’ आला.
मोबाईलमध्ये कांहीतेरी ’टांग्‌टुंग्‌’ वाजल्यामुळं मी तो बघितला.
मजकूर असा होता......’can i c u plz @ 14 hrs @ ujwl grb jt?'
मी मोबाईल च्या बटणांशी खटपट करायला लागलो.......
’Kindly decipher the contents of your message.' असा उलट संदेश लिहायचा होता....
पण ते मला 't 4 u' छापाच्या धेडगुजरी भाषेत लिहायला कांही केल्या जमेनाच......
दुपारचा एक वाजायला आलेला होता.....
बघतां बघतां नकळतच मी एखाद्या जातिवंत मोबाईलवेड्यासारखी दांतओंठ खात मोबाईल ची बटणं चिवडायला लागलो....
अन्‌ काय झालं कांही कळलंच नाही......मोबाईल च्या छोट्या पडद्यावर चक्क ’मास्तर’ अवतीर्ण झाले.!!
मास्तरांचं एक जुनं छायाचित्र माझ्या मोबाईलवर सांठवलेलं आहे......तेंच कांहीतरी होऊन उघडलं असावं ........
मास्तर माझ्याकडं संतापानं लालेलाल होत रोंखून बघत होते. !!
"नालायक !!!",.......... मास्तर कडाडले,"एका ओळीचा साधा संदेश इंग्रजीत धड लिहायला जमेना तुला?"
मी," कसा जमेल मास्तर?.....अहो हे ’इंग्रजी’ आहे की ’स्वेंगाली’ ? "
मास्तर," मुळाक्षरं ’स्वेंगाली’ तली आहेत, की ’इंग्रजी’ तली? "
मी," काय झालंय्‌ मास्तर......की उत्तर मला ’प्रेषका’ ला समजेल, अश्या भाषेत लिहायचंय्‌....आणि नेमकी ही च समस्या आहे........
हे...हे असलं मला कसं काय जमणार?.......कपाळ?"
मास्तर आतां उलट ज्यास्तच भडकले..........," काय झालंय्‌ काय न जमायला?......माझ्या गुरुकुलांत तहहयात इंग्रजीच्या मेजवान्या झोंडल्याय्‌स ना तूं? !!! .........मग? "
माझ्याही अंगात आतां ’मास्तर’ संचारले.........
मी," असं बघा मास्तर......माणूस जे खातोपितो ना..... त्यानुरूपच त्याचा पिण्ड पोंसला जातो की नाही?"
मास्तर," अर्थातच."
मी," आणि आत्तां तुम्ही च तर म्हणालांत.....की मी तुमच्याकडं ’मेजवान्या’ झोंडल्याय्‌त म्हणून...."
मास्तर," मग?........शंका आहे की काय तुला त्याबद्दल? "
मी," अजिबात नाही......पण एक प्रश्न विचारूं? "
मास्तर," बेशक."
मी,"मला हे सांगा......की ’मेजवान्या’ मी ’पक्वान्नां’ च्या झोंडल्याय्‌त.....की ’खंरकट्या’ च्या? !!! " 
पट्टशिष्यानं च घातलेली ती निर्णायक धोंबीपछाड बघून आतां खुद्द मास्तरांनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
मी बेहद्द खूष होत मोबाईल वर आलेलं ते ’स्वेंगाली’ भाषेतलं ’खंरकटं’ कायमचं हद्दपार करून टाकलं. !!
दुसर्‍याक्षणीं ते ’खंरकटं’ माझ्या मोबाईल वर ओंतणार्‍या त्या ’गाळीव रत्ना’ चा फोन नंबर लावला.....
आणि मास्तरांच्या देंखतच अस्खलित ’टिकेकरी इंग्रजी’ च्या ’घनगर्ज तोंफे’ च्या बत्ती ला काडी लावून मोकळा झालो.!!!
बिचार्‍या चं ’हौतात्म्य’ मला प्रत्यक्ष दिसत नव्हतं.... पण मास्तरांना तें नक्कीच दिसलं असणार........
कारण माझी पांठ कडकडून थोंपटत बघतां बघतां मोबाईल च्या पडद्यावरून मास्तर अदृष्य झाले.!!!!!!

*******************************************************************************************

----- रविशंकर.
१९ फेब्रुवारी २०१४.    

No comments:

Post a Comment