॥ फ्री सर्व्हिसिंग ॥
॥ फ्री सर्व्हिसिंग ॥
मंगळवारची ती एक प्रसन्न सकाळ होती.
’बालाजी ऑटोमोबाइल्स्’ च्या शो रूम चे मालक, माझे स्नेही, श्री. जाधव यांच्या केबिन मध्ये आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो.
वास्तविक मंगळवार हा त्यांच्या शो रूम चा साप्ताहिक सुट्टीचा दिवस.
पण खंडेनवमी चा दिवस असल्यामुळं जाधवांनी शो रूम उघडी ठेंवलेली होती.
ती संधी पकडून माझ्या बुलेट चं थोडं किरकोळ काम करून घ्यायला मी तिथं गेलो होतो.
बाहेरच्या हॉलमध्ये वाहन खरेदी करणार्यांची अन् दसर्याच्या मुहूर्तावर वाहन घरी नेऊं इच्छिणार्या गिर्हाइकांची नुस्ती झुंबड उडालेली होती.
जाधव वाहन देखाभालीची अन् दुरुस्त्यांचीही सेवा पुरवीत असत. त्यामुळं तळमजल्यावरील गॅरेजमध्ये दुरुस्त्या अन् सर्व्हिसिंगला आलेल्या
गिर्हाइकांचा कल्ला चाललेला होता. चौकश्या, कागदपत्र, फॉर्म्स् भरणं, टेस्ट राइड,............
थोडक्यात जाधवांच्या ’बालाजी ऑटोमोबाइल्स्’ ला चक्क भाजीमंडईचं स्वरूप आलेलं होतं.
हे गुण्डोपंत ऊर्फ गुण्डाप्पा जाधव म्हणजे एक वल्ली होती.
वयानं माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठे. म्हणून मी आपला त्यांनां ’अप्पा’ च म्हणायचो.
ते मात्र मला वयानं इतका लहान असूनही ’अहो नाना’ कां म्हणायचे, हे मात्र एक कोडंच होतं.
कर्नाटकातलं हत्तरगी हे जाधवांचं मूळ गांव. अंगापिण्डानं गोटीबंद पहिलवानी थाट, पात्रता मेकॅनिकल इंजीनियर...तेही ब्रिटिश जमान्यातले.
अनेक सहकारी साखर कारखान्यांचं चीफ इंजीनियर चं पद भूषवलेले.
वागण्या बोलण्यात अस्सल कर्नाटकी-मिलिटरी-पहिलवानी खाक्याचं मजेशीर मिश्रण......
मरगठ्ठे असूनही गोराधप्प वर्ण, सोंवळं ओंवळं सांभाळणारे, अगदी तुपाशी म्हणावेत असे शुद्ध उच्चार.....
घारे-हिरवट डोळे चिकटवले, तर अगदी कोंकणस्थ ब्राह्मणातही सहज खपले असते.
त्यांचे समवयस्क मित्र तर त्यांची फिरकीही घेत कधी कधी,’ गुण्डाप्पा, तुझ्या आज्ज्या-पणज्याची कांहीतरी भानगड असणार बघ नक्की.....एव्हढा गोरागोमटा झालाय्स ते’ !!
स्वातंत्र्यपूर्व ब्रह्मदेशच्या लढाईत जपान्यांशी चार हात केलेला हा इन्फंट्रीतला गडी, खो खो करत त्या टंवाळीलाही मनमोकळी दाद द्यायचा.
तुकयानं ’भलेतरी देऊं कांसेची लंगोटी.....’ हे बहुधा जाधवांना बघूनच लिहिलेलं असावं.
पण नाठाळाच्या टाळक्यात कांठी हाणण्यातही अप्पांचा हात धरणारा कुणी पुण्यात नसावा.
गेला बाजार असल्या पांचपन्नास तरी शिष्ठ पुणेरी नगांनां अप्पांनी चुटकीसरशी अस्मान दाखवलेलं तर मी स्वतःच पाहिलेलं होतं.
तर अप्पा मला म्हणत होते,"एव्ह्ढी घाई कश्याला केलीत नाना....असल्या गदारोळांत तुमच्या पसंतीचं काम होणाराय् काय?
जरा थांबलात, तर उद्या माणूस पांठवतो....तो गाडी घेऊन येईल घरनं.... आणि दुरुस्ती झाली की देतो की परत पांठवून....काय"?
मी म्हटलं," अप्पा, असली घाई असते काय मला कधी? वाटेत अडकलो म्हणून तर आलोय्....गाडी गंचके मारायला लागली रस्त्यांत.
बहुतेक कार्बुरेटर मध्ये कचरा अडकलाय्....तेव्हढं साफसूफ करून घ्या....पुढचं सर्व्हिसिंग च्या वेळी बघूं"
जाधवांनी बेल वाजवून पाटील सुपरवायझरला बोलावणं पाठवलं..............
हा पाटील म्हणजे जाधवांचा उजवा हात....बुलेट् दुरुस्तीत पाटलाचा हात धंरणारा मेकॅनिक त्या काळी तरी आख्ख्या पुण्यात कुणी नव्हता.
त्यामुळं जाधवांच्या सकट आख्खं गॅरेज त्याला ’बुलेट पाटील’ म्हणूनच हांक मारायचं.
बुलेट पाटलाला बोलावणं पाठवून अप्पा माझ्याकडं वळले," तर मग असं करूं या......
तेंव्हढ्यांत तळ मजल्यावरच्या गॅरेजमधनं तावातावात चाललेया भांडणाचे आवाज वर ऐकूं यायला लागले.
त्यांतला खालच्या पट्टितला आवाज तर बुलेट पाटलाचाच होता.
काळी पांच पट्टीतला आवाज मात्र अनोळखी....कुण्यातरी गिर्हाइकाचा असावा.
जाधवांचा निरोप गेल्यावर पाटील ज्ररा तंणतंणतच वर आला.
"बोला बुलेट पाटील.....कसला गोंधळ चाललाय् खाली? काय झालंय् एव्हढं फणफणायला?", जाधव.
पाटलाची ’बुलेट’ भंरवेगात सुसांटली," काय झालंय्? अहो साहेब....एक खुळं आलंय् ’क्लासिक्’ घेऊन..... ’आय् टी’ ला उर्मट नग दिसतोय्.......
पांच महिन्याआल्याड गाडी घेतलीय्....जरा खाली उतरून बघा तुम्हीच.....काय राडा करून ठेवलाय् गाडीचा तो....
आन् सगळं फुकट करून मागतंय् वॉरंटीत.....धा हजार रुपये मोजले तरी कोण हात पण लावणार न्हाई गाडीला....." !!
जाधव," जरा दमानं घ्या पाटील, आपलं गिर्हाईक आहे ते..... असं डोकं तडकावून नाही चालत.... काय झालंय् काय गाडीला?"
पाटील," साहेब मी सरळ सांगितलं बघा पहिल्या फटक्यात.....दुसरीकडं जा घेऊन म्हणून, तर ऐकायलाच तयार न्हाई....वरडत सुटलंय् डोस्कं फिरल्यागत...
गजनपिन् गेलीय्, गिअरबॉक्स चा चोथा झालाय्, क्रॅंक् बेअरिंग तुटलंय् बुडख्याकडचं, चेन स्प्रॉकेट् चे चार दाते पण झिजलेत्....",
पाटलाची ’बुलेट’ टॉप गिअरमध्ये गेली होती," गाडी ला आपण तर हात लावणार न्हाई साहेब....तुम्हीच काय ते बघा"
जाधव जरा सावध झाले.....बुलेट पाटील इतका खंवळलाय् म्हणजे कांहीतरी गडबड नक्कीच होती.
जाधव," इंजिन ऑइल चेक केलंत काय पाटील?"
"इंजिन ऑइल साहेब?" आतां मात्र पाटील खंरच चंवताळला," अहो ही गधडी सोताच्या टाळक्यांचं तेलपाणी बघंनात....इंजिन ऑइल बघणाराय्त व्हंय्?
डेंजर मार्कच्या खाली गेलीय् लेव्हल....आनि काय जे उरलंय्, ते डांबार परवाडलं.... आसलं झालंय्....तुमीच या खाली", इतकं बोलून बुलेट पाटील तरातरा चालता झाला.
अप्पानीं कपाळाला हात लावला !
"नाना बसा जरा....चहा संपवा... तोंवर आलोच", म्हणत अप्पा पण बुलेट पाटीलच्या मागोमाग बाहेर गेले.
अप्पांची आणखी एखादी धोबीपछाड बघायला मिळणार हे मला समजलं,
चहा संपवून कप खाली ठेंवतोय् न ठेंवतोय् तोंवर " ये ये बाळ....बस", म्हणत अप्पा आंत येऊन बसले.
आणि अप्पांच्या समोर माझ्या शेंजारच्या खुर्चीत बुलेट पाटलाचं ते ’गधडं’ येऊन बसलं. पाटलाचं निदान अगदी अचूक होतं......
दश्या काढलेली अन् गुढघे-बुडावर पांढरी केलेली जीनची बुसरट पॅण्ट....
हाताच्या कोंपरावर खांद्याची शिवण लागलेला कळकट बनियन सारखा डगला....
दोन्ही धडोती बहुधा सहाएक महिन्यांत धुतलेली नसावीत.....अन् डोंक्याला वर्षभरात तेंलपाणी पण दाखवलेलं नसावं.
डोंळ्याला गुंजांएव्हढ्या कांचांचा चष्मा....एका कानांत डूल....
तोंडांत च्युइंगम चा तोंबरा....अखंड जबडा हंलवत बैलागत रवंथ चाललेली.....अन् खोंलीत सुटलेला डी.ओ. चा भंपकारा....
बुलेट पाटील च्या पारखे ची मी दाद दिली.! नक्कीच कुठल्यातरी बी.पी.ओ.-आय्.पी.ओ.च्या ’कॉल सेंटर’ मधला वेंचक माल होता.!!
शंकेला जागाच नव्हती.....तोंडावरचे उर्मट-बेफिकिर भांव च ओंळख पटवायला पुरेसे होते.
अप्पां ची प्रसिद्ध ’धोबीपछाड’ आतां नक्की बघायला मिळणार, अशी माझी खात्रीच पटली, अन् मी सरसावून बसलो.
अप्पा," हं बोल....काय करतोस तूं बाळ?"
कॉल सेंटर," सर आय वर्क .....म्हणजे मी.....डाटामॅटिक्स च्या कॉल सेंटर मध्ये कामाला आहे" !
शाब्बास रे बुलेट पाटील.!!
अप्पा," हूं.....कॉल सेंटर मध्ये कामाला आहेस काय?.........बरं बरं....काय तक्रार आहे तुझी?....एव्हढं ओंरडायला काय झालं होतं....अं?"
कॉल सेंटर," माय व्हेइकल इज इन वॉरण्टी सर.....आय वॉण्ट अ टोटली फ़्री सर्व्हिस....नथ्थिंग डुइंग.....दॅट्स ऑल".!!
जाधवांच्या भिवया उंचावल्या....कपाळावर सूक्ष्म आंठीही उमटली.... मला ’कॉल सेंटर’ ची विलक्षण कींव यायला लागली.....
अप्पा," हे गाडीचं दुसरं सर्व्हिसिंग ना? किती मायलेज ला इंजिन ऑइल बदललंय् ह्याच्याआधी?"
कॉल सेंटर," माहीत नाही....ऑफिस जवळच्या गॅरेजवाल्यानं वर्क केलंय्....यू नो...."
अप्पा," ’रॉयल एनफिल्ड्’ चं अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे काय ते?"
कॉल सेंटर,"यू नो.... म्हणजे....आय रिअली डोण्ट हॅव एनी आयडिया."
अप्पा," मराठीत बोल....मला समजतं ते....तुला समजतं ना"?
कॉल सेंटर," ओके ओके...............सॉरी"
अप्पा," गाडीचं युजर मॅन्युअल वाचलंय्स काय पुरतं.....अं?"
कॉल सेंटर," नो सर....यू सी....आय् रिअली डोण्ट गेट एनी टाइम फॉर सच थिंग्ज....व्हॉट आय मीन इज...."
अप्पा,"त्यांत गाडी कशी वापरावी ह्याच्या सगळ्या सूचना दिलेल्या असतात....हे माहीत आहे काय तुला?
त्याप्रमाणंच गाडी वापरायची असते..... "
कॉल सेंटर," सो व्हॉट? द व्हेइकल इज इन वॉरण्टी.....आय डोण्ट केअर....आय मस्ट गेट अ फ्री सर्व्हिस.....आय डोण्ट नो एनिथिंग" !!
आतां मात्र अप्पांच्या भिंवया आंक्रसल्या...चेंहरा किंचित तांबूस झाला....आंवाज जरासा चंढला.....
अन् एखाद्या ब्रिटिश माणसाच्याही तोंडात मारील, असल्या अस्खलित इग्रजीत गुण्डाप्पा कडाडले
" यू नो नथिंग अबाउट एनिथिंग एक्सेप्ट शाउटिंग ऍट एव्हरिथिंग, इन अ रॉंग मॅनर, ऍट द रॉंग पीपल, इन अ रॉंग प्लेस, ऍण्ड ऍट अ रॉंग टाइम, माय डिअर यंग मॅन....दॅट इज व्हॉट इज रॉंग विथ यू...." !!!
कॉल सेंटरची बोबडी वळली," स्स्स्स्स्स्स्स्स्सॉरी सर......का...का...काय म्हणालांत ते कळलं नाही " !!
अप्पा," इंग्लिश घेऊन एम. ए. पास झालास की समजेल........काय? "
कॉल सेंटर," !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! "
अप्पा," बुलेट म्हणजे हत्ती असतो.....माहीत आहे?"
कॉल सेंटर," ??????????????? "
अप्पा," तेव्हां, हत्ती हा हत्तीसारखाच वापरायचा असतो......घोडा हा घोड्यासारखाच वापरायचा असतो..........बरोबर?"
कॉल सेंटर," ~~~~~~~~~~~~~~~~ "
अप्पा," तूं हत्ती घेऊन तो घोड्यासारखा वापरलाय्स, आणि त्याचं गाढव करून ठेंवलंय्स आतां !!....... कळलं?"
कॉल सेंटर," %%%%%%%%%%%% "
अप्पा," इथं आम्ही हत्ती दुरुस्त करतो, घोडे दुरुस्त करतो......गाढवं पण दुरुस्त करून देतो..........."
कॉल सेंटर," ??????????????? "
अप्पा," पण गाढव दुरुस्त करून त्याचा हत्ती करून देतां येत नाही !!!..........................समजलं?"
’कॉल सेंटर’ नं अक्षरशः फेंफरं येऊन कपाळाला हात लावला. !!
" बुलेट पाटील..... वर या जरा " अप्पानी खणखणीत आवाजांत हांक मारली.
पाटील धांवत हजर झाला," काय साहेब?"
अन् ’कॉल सेंटर’ कडं बोंट दाखवत अप्पानी चितपट धोबीपछाड मारली," ह्यांना जादुगार रघुवीर चा पत्ता आणि फोन नंबर द्या लिहून " !!
मी कपाळाला हात लावून धों धों हंसायला लागलो....!!!
अन् ’कॉल सेंटर’ नं पिसाळलेलं कुत्रं मागं लागल्यागत, बुडाला पाय लावून पोबारा केला....!!!!
************************************************
रविशंकर.
४ नोव्हेंबर २०१३.
No comments:
Post a Comment