॥ युरेका युरेका ॥
" या..... जावईबापू....!!
बसा बसा....कसे काय फिरकलात आज इकडं? बरी आठवण झाली आमची अचानक .... अं?"
बेलवलकर काका कॉटवरची गादी धपाधप् थोंपटत म्हणाले.
मी कांही बोलायच्या आंतच स्वैपाकघराकडं वळत त्यांनी आगाही सुद्धां दिली
," अहो जरा बाहेर या.... बघा तरी कोण आलंय् ते.... जावईबापू अन् लेक आलेत.... नाष्टयाची सोय लावा पटकन् कांहीतरी....
सकाळी सकाळीच आलेत... नाष्ट्याची पण वेळ झालीय्."
स्वयंपाकघरातनं उंच्यापुर्या काकी फडक्याला हात पुसतच बाहेर आल्या.
लेकीला बघताच काकींचा गौरवर्णी चेहरा नुस्ता फुलून आला.
," अरे वा वा..... पतूं..... अशी अचानक? बरं चाललंय् ना सगळं?
मग माझ्याकडं वळून मला फैलावर घेत," काय हो...गावांत भटकत असतां इतके....काका-काकीला विसरलात की काय?
अधनंमधनं डोंकवत जावं जरा....तेंव्हढंच बरं वाटतं भेंतलात की... काय?"
मीच जरा ओंशाळवाणेपणानं म्हटलं," येऊं की काकी....तुम्ही काय परके आहांत आम्हांला?
पण नोकर्या, घर, अन् बाहेरचे व्याप निपटतां निपटतां दिवस कसा सरतो ते कळतच नाही बघा. पण खरच भेंटावसं वाटतं."
’वाटतं ना भेंटावसं? मग येत जा... सबबी न सांगतां" !!
काकीनीं माझ्या मुसक्या आंवळल्या, अन् हिच्याकडं मोर्चा वळवला
," तूं चल गं आत.... तिथंच समाचार घेते तुझा....उप्पीट घातलंय करायला ते करपेल...चल चल"
बायकोला पुढं घालून काकी स्वैपाकघरांत नाहिश्या झाल्या.... अन् मी काकांच्या शेंजारी गादीवर बैठक मारली.
काका आज इतके खुशीत दिसताहेत....म्हणजे ’आर्किमिडीज’ च्या नवीन कथा ऐकायला मिळणार ही माझी खात्री होती.!!
बेलवलकर काका-काकी ही एक विलक्षण जोडगोळी होती.
हे काका म्हनजे माझ्या सासर्यांचे लंगोटियार वर्गमित्र, म्हणून आमचे काका.
जुन्या पिढीच्या, पन्नाशीच्या काळांत काका मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेले....
त्यांत इलेक्ट्रिकल ची पदवी तर इंग्लंडला जाऊन उच्च श्रेणीत प्राप्त केलेले....अफाट विद्वत्ता... आणि प्रचण्ड चतुरस्र ज्ञान.
अगदी पाकशास्त्रापासून ते अग्निबाणाच्या तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या शास्त्रांत विलक्षण गति अन् प्रयोगशीलता नी कल्पकता तर पराकोटीची....
अगदी खर्या अर्थानं इंजिनियर म्हणावेत असे हे काका....
काकी मात्र जेमतेम मॅट्रिकपर्यंतच शिकलेल्या, पण पक्क्या सूज्ञ अन् व्यवहारी.
ह्या दांपत्याला, तीन मुलं....मुलगी नव्हती, अन् काकांना तर मुलीची विलक्षण हौस.
त्यामुळंच माझ्या बायकोवर ह्या दांपत्याचा आतोनात जीव...अगदी पोंटच्या मुलीसारखा.
माझी बायको ही दिसायला थेंट माझ्या सासर्यांच्या आईसारखी झाली
म्हणून तिचं ’प्रतिमा’ असं चपखल नांव सुचविण्याइतका काकांचा साहित्यिक व्यासंगही दांडगा होता.
पण ह्या दांपत्याची एक जगावेगळी गंमत होती.
काका सांवळे, तर काकी सतेज गोर्यापान तांबूसवर्णी.
काका तब्येतीनं किडमिडे, तर काकी अंगानं सणसणीत.
काका दिसायला डावे म्हणावेत असे, तर काकी उत्तम देखण्या...अगदी राजबिंड्या.
काका सामान्य छापाचे, तर काकी एकदम ठंसठंशीत व्यक्तिमत्त्वाच्या.
कका मृदुभाषी, तर काकी बोलण्यात कसलेल्या वकिलालाही चारी मुण्ड्या चितपट मारतील अश्या...!!
सगळ्यावर कडी म्हणजे काकी काकांच्यापेक्षां उंचीनंही पांच इंच अधिक होत्या. !!
परमेश्वरानं ही जोडी काय बघून जमवली असेल असं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं.
काकी तश्या बोलायला अघळपघळ असल्यानं एकदां त्यांनांच ह्या उंचीबद्दल हिनं छेडलं असतां त्या म्हणाल्या," अगं ती एक गंमतच झाली....
त्याचं काय झालं....आमचं लग्न हे पाळण्यात असतांना ठरलेलं....
आमचे दादा आणि ह्यां चे वडील अगदी जानी दोस्त.... अगदी एका ताटांत जेवणारे म्हण ना.....
त्या दोघांनी पाळण्यात असतानांच आमचं लग्न ठंरवलं.....अन् ही दोस्तीच माझ्या बोकाण्डी बसली बघ.!!
पाळण्यात असतांना सगळं ठाकठीक होतं गं.....हे नीटस उंच होते म्हणे....
पण काय झालं.... वयाबरोबर माझी उंची वाढली व्यवस्थित....पण हे बुटकेच राहिले !!
आतां ठरवलेलं लग्न काय मोडतां येतंय् कां? झाले मोकळी माळ घालून....अन् काय....
आतां तीस वर्ष संसार झाला की....कुठं काय अडलं आमचं?"
काकींची नवलकथा ऐकून आम्ही कपाळाला हात लावले.!!
"फक्त काय होतं हल्ली...... ह्यां चे विक्षित उपद्व्याप जे चालतात ना..... त्यामुळं त्रास होतो बघ.", काकी पदराला हात पुसत म्हणल्या
" आतां परवाचीच गोष्ट बघ.... हे गेले होते मंडईत भाजी आणायला, तर तिथं एका माणसाला एका सुसाट फटफटीवाल्यानं धंडक दिली.
फटफटीवाला गेला पळून..... मग ह्यां नी त्या माणसाला दवाख्यानांत दाखल केला....
तो ना ओंळखीचा ना पाळखीचा....पण तो शुद्धीवर येईतोंवर तिथंच थांबले.!!
मी गॅसवर कढई चंढवून भाजीची वाट बघतेय् घरी....तर कसलं काय?
आले साडेबारा वाजतां, अन् मलाच स्वयंपाक करून पटकन् डबा भरायला लावला.
"डबा कश्याला"? म्हटल्यावर सगळी कथा कळली....
हे तुझे काका, त्या अपघातग्रस्तासाठी दवाखान्यांत जेवणाचा डबा पोंचवायला निघालेले...त्याचं इथं कुणीच दिसत नाही म्हणून. !!
वर आणखी मलाही बरोबर घेऊन गेले.
तो बिचारा जिवावरच्या संकटातनं वांचलेला.... अक्षरशः ह्यां च्या पाया पडला बघ....
म्हणाला,' साहेब... कसे देवासारखे धांवलात हो अगदी... जीव वांचला माझा.... कसे फेंडूं उपकार तुमचे?
अहो कोण कुणाच्या मदतीला येतंय् ऐनवेळेला हल्ली?
मला ओंळखणारे पंचवीसएक तरी लोक असतील इथं पुण्यात....पण कुणी काळं कुत्रं तरी फिरकलं काय इकडं?....तुम्ही च पहिले ' !!!
बायको नं आपल्या कपाळाला हात लावला. !!
"तर हे असं चाललेलं असतं बघ तुझ्या काकांचं.....
चल बश्या घेऊन बाहेर..नाष्टा करून घेऊं या....गार होईल", असं म्हणत काकी आणि ही, भरलेल्या बश्या घेंऊन बाहेर आल्या.
"नाष्टा सुरूं करा....मी आलेच चहाचं आधण टांकून...", म्हणत काकी पुन्हां आंत गेल्या.
मी चविष्ट उप्पिटाचा तोंबरा भरत म्हटलं," नवीन संशोधन कुठलं चाललंय् काका सध्या"?
काका खुलले," वा वा....चाललंय् तर....., अगदी परवाच एक नवीन शोध लागला बघा"!!
मी सरसावून बसलो, तेंव्हढ्यांत काकीही चहाचं तबक घेंऊन बाहेर आल्या, आणि माझ्याशेंजारीच बसल्या.
काका सरसावून सांगूं लागले," त्याचं काय झालं..... आपण अंघोळ करतो ना रोज...त्यातलीच गंमत."
मी म्हटलं ,"कसली गंमत"?
काका," म्हणजे असं बघा.... आपण अंघोळ कशी करतो? तर प्रथम अंग ओंलं करण्यासाठी चारपांच तांबे पाणी ओंतून घेतो....बरोबर"?
"बरोबर", मी.
"नंतर आपण अंगभर...म्हणजे अगदी टाळूपासून ते पावलांपर्यंत साबण फेंसून लावतो...अगदी गरगरीत फेंस काढून....हो की नाही"?
"हो", मी.
" मग नंतर भरपूर पाणी ओंतून घेंत स्नान करतो...साबणाचा कण न् कण धुवून निघेपर्यंत....करेक्ट?"
"अगदी बरोबर",बायकोनं चान्स घेंतला," हे बादल्या न् बादल्या घेंत असतात ओंतून....मी ओंरडेपर्यंत" !
"तर यांत गोची काय होते...", बेलवलकर काका सरसावून सांगूं लागले," की इतका साबण जिरवण्याइतका मळ आपल्या अंगावर मुळात नसतोच,
कारण रोंजच्या रोंज स्वच्छ अंघोळ कराणारे लोक आपण ....
तेंव्हां एका दिवसांत इतका घाम किंवा मळ आपल्या अंगावर सांठूंच शकत नाही, की जो धुवायला इतका बेंदम साबण लागावा.... काय खरं की नाही"?
" असेलही खरं कदाचित....मग?", मी म्हटलं," पण काका, गरगरीत साबण लावल्याशिवाय अंघोळ झाल्यासारखं वाटतच नाही, त्याचं काय?"
"तर परवा काय झालं", काका सांगूं लागले," अंघोळ करतांना माझ्या असं लक्ष्यांत आलं की भरपूर साबण आणि गरगरीत फेंस... हे सगळं मानसिक आहे...
खरंतर इतका साबण अंघोळीला लागतच नाही.!
आणि जेव्हां आपण तो धुवून टाकतो, तेव्हां हे उपयोगी द्रव्य चक्क मोरीत वाहून वाया जातं"!!
"बरं....मग?", आतां बायको नं ही कान टंवकारले.
" तर मी काय केलं...." काका म्हणाले," मी बाजारातनं काल एक मोठ्ठं प्लॅस्टिकचं पसरट घंगाळं विकत आणलं... अन् त्यांतच उभा राहून अंघोळ केली."
"घंगाळात उभे राहून अंघोळ? ती कश्यासाठी?", मी चकितच झालो.
" ऐका तर...", काका," मग काय झालं...की अंघोळीत वाहिलेलं साबणाचं सगळं पाणी त्या घंगाळ्यात गोळा झालं....
मग त्याच पाण्यात मी धुण्याचे सगळे कपडे भिजवले आणि पंधरा मिनिटांनी धुवून टाकले.!!
अगदी भट्टी केल्यासारखे लखलखीत स्वच्छ निघतात !!.... बोला... आहे की नाही धमाल शोध"?
इतकं बोंलून काका ’आर्किमिडीज’ च्या थांटात माझ्याकडं बघूं लागले.....
अन् काकीनी आपल्या कपाळाला हात लावला. !!
काकी गरजल्या," हे...हे...असले घाणेरडे विक्षिप्त उद्योग तुझे काका च करूं शकतात बरं का पतू,
मला नाही असलं कांही चालणार ह्या घरांत... लक्ष्यांत ठेंवा" !!
काकी तडकून चहा गाळायला लागल्या हे काकांच्या गांवीही नव्हतं,
स्वतःच्या शोधावर जाम खूष झालेले काका पुढं सांगूं लागले....
"आणि बरं कां जावईबापूं...असं भारतातल्या प्रत्येकानं केलं तर एकूण किती साबण वांचूं शकेल माहीत आहे ?
भारताची लोकसंख्या आहे ११० कोटी....बरोबर"?
"बरोबर", मी.
"आतां एका माणसाला एका वेळेच्या अंघोळीला फक्त ५ ग्रॅम साबण लगतो असं गृहीत धरलं, तरी दररोज ५५०० टन साबण वांचेल....!! आहांत कुठं?"
काका विजयी मुद्रेनं ’युरेका युरेका’ च्या आवेशांत आमच्याकडं बघूं लागले, आणि आम्ही कपाळाला हांत लावले.!!
काकांच्याकडची चक्कर वाया गेलेली नव्हती.!!
आम्ही काकांना [मनोमन] दण्डवत घालीत म्हटलं,"बरंय् काका, निघतो आम्ही आतां... अजून मंडईही आटपायची आहे."
"ठीकाय् या परत... पण सांभाळून जा बरं" काकी मायेनं म्हणाल्या.
"आणि भेंटत जा गं पतू आवर्जून..... वेळ मजेत गेला" काका म्हणाले.
"बरंय् मग येतों आम्ही काका" म्हणत आम्ही वांकून काका-काकी नां नमस्कार केले, अन् नकळत समेची गंमत घडली.
सौ. काकी नां म्हणाल्या," काकी, मुलांचे फोन नंबर देतां कां जरा? सत्यनारायण करायचं ठंरवलंय्...आमंत्रणं देईन म्हणते..."
मी म्हटलं," तिघांचेही नंबर द्या बरं काकी....कुणी सुटायला नको चुकून..."
"तिघं कुठले? चौघेजण...", काकी.
आम्ही चपापलो... खुद्द काका ही आवाक् होऊन बघायला लागले....
काकांनां तीन मुलगे हे आम्हाला माहीत होतं.....
"चौघेजण...... म्हणजे काकी"?, मी गडबडलो....," विजय, अरूण, नी गौरांग....तिघेच ना?"
काकांच्याकडं बोंट दाखवत काकी गरजल्या," आणि चौथे हे !..... सगळ्यात लहान !!.....कधी मोठे होणाराय्त ते परमेश्वरच जाणे " !!!
आम्ही गंदगंदून हंसायला लागलो....
अन् साक्षात् ’ज्ञानियाचा सागरू’ अश्या खुद्द काकांनीच स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!
**************************
रविशंकर.
२७ ऑक्टोबर २०१३.
No comments:
Post a Comment