’ओरिएन्टल कोम्प्युटर्स’ च्या दुकानांत तोबा गर्दी उसळलेली होती........
दुपारची साधारणपणे चार साडेचारची वेंळ असावी.
मी माझा कॉम्पुटर खराब झालेला असल्यानं सर्व्हिसमनला पाठवायचा निरोप देण्यासाठी ओरिएन्टल कोम्प्युटर्स मध्ये गेलो होतो, पण काउंटरवर तर कुणीच मोकळं दिसत नव्हतं.
तोंकड्या जीन्स् आणि टॉप्स् चंढवलेल्या, डोंळ्यावर ठार काळे गॉगल्स लावलेल्या, केंसांचा अवतार केलेल्या, मोबाईलच्या बटणांशी अखण्डपणे चाळे करणार्या,
कानांत इअरफोन्स्ची बुचं ठांसलेल्या, अन् च्युइंगम् चंघळणार्या फॅशनेबल विशी पंचविशीतल्या पोरांपोरींनी दुकान नुस्तं ओंसण्डून वाहत होतं.
कुणी नव्या वाय्-फाय् ची चौकशी करीत होते, कुणी मोबाईलच्या आलेल्या बिलाबाबत काउण्टरवर बसलेल्या माणसांशी वादावादी करत होते,
कुणी नव्या ब्लॅकबेरी हॅण्दसेट्स् च्या चौकश्या करत होते,
कुणी कचांकचां नोटा मोजत बिलं भरत होते, अथवा मोबाईल खरेदी करत होते......आपण काय खरेदी करतोय् हे तपासून देखील न बघतां.....!!
एकूण सगळा कल्ला उडाला होता....वेड्यांच्या बाजारासारखा. !!
मी ह्या सगळ्या उरूसाला वळसा घालत श्री. उकिडवे यांची केबिन गांठली अन् टक्टक् करून सरळ आंत घुसलो.
आंत बरंच शांत वाटत होतं....बंद केबिन असल्यामुळं बाहेरच्या मासळीबाजाराचा कलकलाट तरी आंत येत नव्हता.!
श्री. उकिवडे हे माझे चांगले स्नेही. जवळपास आठ वर्षांपूर्वी त्यांनी आमच्या कॉलनीत कॉम्पुटर दुरुस्तीच्या सेवा पुरविण्याचा व्यवसाय सुरूं केला ’ओरिएन्टल कोम्प्युटर्स’ ह्या नावानं.
त्या वेळी हे उकिवडे कॉलनीतल्या अनेक घरी स्वतः फिरलेले होते, अन् तेव्हां जी कांही गिर्हाइकं त्यांनी गटवली, ती उत्तम वक्तशीर सेवा अन् प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी आजतागायत घट्ट बांधून ठेंवलेली होती. एकदम नेक अन् शिस्तीचा माणूस.
कदाचित त्यामुळंच असेल, पण आमच्या तारा कुठंतरी जुळल्या असाव्यात.
उकिवडे स्वतः कॉम्पुटर इंजिनियर असूनही सगळा व्याप स्वतःच बघत असत.... अगदी सुरवातीपासून.
पहिल्यांदा त्यांनी फक्त दुरुस्तीसेवांचं दुकान उघडलं, मग जरा जम बसल्यावर कॉम्पुटर्स, प्रिंटर्स, अश्या विविध वस्तूंही दुकानांत ठेंवूं लागले....
आणि मोबाईल चा जमाना अवतरल्यावर मात्र त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही..... व्यवसाय अगदी भरभराटीला नेला.
तरीही त्यांचे कॉलनीतल्या सगळ्या जुन्या ग्राहकांशी संबन्ध अजूनही घट्ट जिव्हाळ्याचे होते.... आमच्याकडं त्यांनी गिर्हाईक म्हणून कधीही पाहिलं नाही,
अन् कॉलनीवाल्यांनीही त्यांच्याकडं कधी दुकानदार म्हणून पाहिलं नाही.
बाहेर काउण्टरवर बसलेले असले, तर जातांयेतां हटकायचेच अगदी न चुकतां, आणि मग पांच-दहा मिनिटं कां असेनात, व्यवसाय विसरून अघळपघळ गप्पा व्हायच्या चहासोंबत.
गप्पाटप्पा कसल्या त्या... खो खो हास्य कार्यक्रमच असायचा तो. कारण उकिवडे अतिशय बहुश्रुत अन् बोलण्यात तर एक नंबरची कोटिभास्कर वल्ली होती. !!
मला बघतांच श्री. उकिडव्यानीं तोण्डभर हंसत स्वागत करत म्हटलं," या या नाना.... आज कशी काय आंठवण काढलीत? बसा बसा", अन् एक खुर्ची पुढं सरकवली.
मीः "अहो.... कॉंपुटर जरा बिघडलाय्.... दुपारी घरीच आहे मी.... कुणालातरी दुरुस्तीला पांठवून द्या लगेच"
उकिडवेः " आज अवघड दिसतंय् नाना....बघताय् ना बाहेर काय चाललंय् ते? आजचा दिवस जरा थांबा....उद्या सकाळी पहिलाच कॉल तुमच्याकडं पाठवतो... चालेल?"
मीः"कसला उरूस चाललाय बाहेर उकिडवे?"
उकिडवेः"उरूसच म्हणावा लागेल नाना..... हे ’३ जी’ चं खूळ येऊं घातलंय् ना नवीन.....त्यासाठी ही गर्दी."
मीः" काया आहे ही ’३ जी’ भानगड बुवा?"
उकिडवेः" नाना, मोबाईल वापरतां नां? अन् माहीत नाही तुम्हाला ’३ जी’.... ऑं?"
मीः" नाही बुवा ठाऊक..... मी आपला संभाषणांसाठी मोबाईल वापरतो झालं"
उकिडवेः" त्याचं काय आहे नाना, सविस्तर सांगतो...."उकिडव्यांनी एका पोराला हांक मारून चहाची ऑर्डर पण सोडली. !
मीः" हं बोला"
उकिडवेः" तर काय आहे....की ह्या मोबाईलनं तरूण पिढीला अक्षरशः खूळ लावलेलं आहे आजकाल.......
बघाल तिथं ह्या पोरांच्या हातांत मोबाईल.... त्यांना आजूबाजूची शुध्दही नसते बिल्कूल.......
एक तर गाणी ऐकायला कानांत ती बुचं ठांसलेली, अन् अखण्डपणे मोबाईलच्या बटणांशी खेंळ सुरूं.
अहो असला एक बहाद्दर तर मोबाईलवर बडबडत चालतांना म्हशीवर धंडकलेलाही मी पाह्यलाय्.... बोला आतां" !!
मीः" खरंच तसं झालंय खरं. अहो ही अशी कानांत बुचं घातलेली माणसं रस्त्यातनं चालतां चालतां मोबाईल वाजला ना, की कुठंतरी शून्यात बघत अचानक बडबडायला लागतात बघा.....
एखादा वेड लागलेला माणूस जसा अचानक बडबडायला लागतो ना, तितकं विचित्र दिसतं ते" !!
उकिडवेः" अहो कुणाला इथं पर्वा आहे त्याची? तुम्हाला ठाऊक आहे काय नाना, ही न कमावती पोरं दरमहा पांचपांच सातसात हजाराची मोबाईलची बिलं रोखीनं भरत असतात.....
तिकडं आईबाप कुठंतरी पैसा ओंरपण्यांत मग्न, अन् हीं पोरं तो मोबाईलवर उडवण्यांत मश्गूल.!!
खरं सांगूं काय....ह्यांच्या हातातले मोबाईल जर कां एक तासभर काढून घेंतले नां, तर खरंच हयांना वेड लागेल, अन् येरवड्याला रवानगी करावी लागेल ह्यांची"!!
मीः" तसं परदेशात दररोज घडतंय् उकिडवे, त्या आजाराला ’मोबाईल मॅनिया’ म्हणतात"
उकिडवेः"काय सांगायचं नाना....ही नवीनवी खुळं, जी परदेशांत बहिष्कृत व्हायला लागलीत हळूंहळूं, ती डोंक्यावर घेंण्यात इथली ही पोरं भूषण मानताय्त......
अहो ही खुळं फोंफावताय्त म्हणून आम्ही खूष....धंदा जोंरात म्हणून, अन् तुम्हीही सुखी......ही वापरत नाही म्हणून....काय?"
"खरं सांगूं काय नानां? वाईट वाटतं हे सगळं बघून...अन् कीव पण येते ह्या पोरांची......
अहो एक वेळ बाईलवेडे परवडले....पण हे मोबाईलवेडे नकोत"!!! उकिडव्यांनी मला टाळी देंत म्हटलं.
मी उकिडव्यांच्या विनोदबुध्दीला दाद देत कपाळाला हात लावला !!..... अन् चहा प्यायला सुरुवात केली.......
तेंव्हढ्यात एक मोबाईलवेडी दारावर टक्टक् करून विचारती झाली," मे आय् कमिन् सर?"
उकिडवे मला म्हणाले," नाना, आतां प्रत्यक्षच बघा हे खूळ किती पसरलंय् ते.... अन् तिच्याकडं बघत म्हणाले,’ कमिन् प्लीज... बोला काय हंवय्?’"
एखाद्या सिनेनटीसारखी नटलेली ती कॉलेजकुमारी ठुमकत आंत आली.... गुडघ्यापर्यंतच असलेली दशा लोंबणारी जीन्स्...वर कसलंसं टिचगं पोलकं....
मधलं वीतभर पांठ-पोंट उघडंच....
हाय् हील्सचे सॅण्डल्स..... केसांचं विचित्र टोंपलं केलेलं... महिन्याभरात केसांनां तेलपाणीही दाखवलेलं नसावं बहुतेक.....
दोन्ही बाजूंनी डोंळ्यावर काढलेल्या झिपर्या दर क्षणाला मानेला विचित्र हिसडे देंत मागे झटकणं.....
कपाळाला कुंकवाचा पत्ता नाही.... गळ्यांत लोखंडाची वाटावी अशी कसलीशी सांखळी....हातांत बांगड्यांचा मागमूसही नाही.....कानही बोडकेच.....
लिप्स्टिक् मात्र जांभळ्या रंगाची फांसलेली.... हातांपायांची नखंही जांभळीच.....
मी विचारात पडलो,’ एव्हढं सगळं सांभाळून ही शिक्षण घ्यायला कसा काय वेंळ काढत असेल?’
त्या बाबतीत आनंदच असावा बहुधा....चेहराच सांगत होता.!!!
ऐश्वर्या (ऊर्फ ऍश् ): " सर, तो बाहेरचा मुलगा म्हणत होता की ’३ जी पॅक्’ वर फक्त ’फेसबबुक्’ च उपलब्ध झालंय् म्हणून.... ’यू ट्यूब’ आणि ’वाय् फाय्’ चं काय?"
उकिडवेः" ते अजूनतरी आलेलं नाही.... पण कश्याला हवंय् आत्तांच? आणि ते बरंच महागही असेल"
ऍश् : " सो व्हॉट्?.....कॉस्ट् इज नो इश्यू सर.... पण वाय्-फाय् अन् यू ट्यूबशिवाय काय उपयोग? केव्हां येईल ते पॅक्? "
उकिडवेः" नक्की ठाऊक नाही मला पण.... महिनाभर तरी लागेल असं वाटतंय्."
ऍश् :"बाय् द वे, ह्या पॅक्साठी माझ्या मोबीवर ऍण्ड्रॉइड् लागेल ना?"
उकिडवेः" हो ते तर लागेलच...."
ऍश् : "लेम्मी चेकप् समव्हेअर एल्स्.....सॉरी सर....हॅव् अ गी डे......"!!
एव्हढं चीत्कारून त्या ऍश् नं मानेला एक विचित्र हिसडा मारत डोंळ्यावर लटकणारी वीतभर लांब केसांची बट पाठी भिरकावली......
अन् हाय हील्स् टॉक् टॉक् वाजवत ती केबिनमधनं बाहेर चालती झाली. !!
उकिडवे म्हणाले," बघितलंत नाना, हे सगळं असं चाललंय्"!!
मीः" खरं आहे तुमचं उकिडवे.... शॉ म्हणतो तेंच बरोबर आहे की ’जगांत मूर्खांची कमी कधीच नसते, तर मूर्ख बनवणार्यांची असते’!!
अहो, हे आत्तां आलेलं ध्यान जे काय बडबडत होतं ना, त्यातला ओ की ठो सुद्धां मला समजला नाही बघा....
ते ’मोबी’ काय, ’यू ट्यूब’ काय, अन् ’ऍण्ड्रॉईड’ काय... छे छे... मंगळावरनं आलेल्यांची भाषा असावी ही बहुतेक.... अवाक्षरही समजलं नाही मला."
उकिडवेः"द्या टाळी मग नाना ! लकी आहांत "!!
मी उडालोच," कसा काय लकी बुवा मी"?
उकिडवेः" अहो आजकाल कश्यातलंही ओ की ठो न समजणार्यालाच ’स्मार्ट’ म्हणतात !! द्या टाळी" !!!
मीः" ते राहूं द्या उकिडवे..........ही ’३ जी’ काय भानगड आहे नवीन"?
उकिडवेः" अहो ती नवीनतम भानगड आहे नाना.... तुम्हाला तांत्रिक शब्दकोशातला अर्थ सांगू, की व्यावहारीक शब्दकोशातला"?
मीः "दोन्हीतला सांगा....मी अद्न्य आहे" !
उकिडवेः"त्याचं काय आहे नाना, तांत्रिक शब्दकोशात ’३ जी’ ला म्हणतात ’थर्ड जनरेशन नेटवर्क’"
मीः" आणि व्यावहारिक अर्थ"?
उकिडवेः" आणि बरं कां नाना, व्यावहारिक भाषेत ’ ३ जी’ ला ’ तिप्पट गाढव’ म्हणतात. " !!!!
पीत असलेल्या चहाचा जबर ठंसका लागून माझं नाक-तोंड चोंदलं,......
तरी उकिडव्यांच्या भन्नाट विनोदबुध्दीला दाद देत, कपाळाला हात लावून मी खदांखदां हंसायला लागलो. !!!
**************************************************
----- रविशंकर.
३ मार्च २०१२.
No comments:
Post a Comment