Search This Blog

Monday, 30 January 2012

॥ इम्प्रेस्ट्‌ अकाउंट ॥




रघुनाथ गोविन्द ऊर्फ रघ्या आजगांवकर हा माझा पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातला लंगोटियार. चार वर्षं होस्टेलला एकाच खोलीत नांदलेले आम्ही. बी. ई. झाल्यावर मी एका वास्तुविशारदाकडं उमेदवारी करूं लागलो, अन्‌ रघ्या कुठ्ल्याश्या सरकारी खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून चिकटला.


पुढं दहा एक वर्षांनी हा रघ्या सरकारी कारभाराला विटला, अन्‌ दरबारची नोकरी सोंडून पुण्याला बजाज कंपनीत रुजूं झाला, अन्‌ पुण्यातच स्थायिक पण झाला.
पुण्यातच असल्यानं अधून मधून एकमेकांच्या घरी जाणंयेणंही व्हायचं. अभियांत्रिकीला आमच्या मागं दोनएक वर्षं असलेल्या वृन्दा प्रभुणेशी ह्या रघ्याचं बरंच सख्य होतं. त्याची परिणती पुढं लग्नांत होणार हे उघड गुपित होतं अन्‌ झालंही तसंच. थोंडक्यांत सांगायचं तर रघ्या अन्‌ वृन्दा दोघंही ओंळखीचे असल्यानं, रघ्याचं घर आमच्यासाठी चोवीस तास उघडं असायचं. ते दोघे पण आमच्या घरी केव्हांही न सांगतां टंपकायचे, अन्‌ मस्त गप्पा रंगायच्या.

असेच एकदां दोघे रात्री अचानक उगवलेले होते अन्‌ जेवणाच्या टेबलावर आमच्या गप्पा रंगल्या होत्या. विषय होता ’सरकारी नोकरीत माणूस स्वच्छ राहूं शकतो कां?’
रघ्या म्हणाला," त्याचं काय आहे नाना बघ, की सरकारी नोकरीही स्वच्छ राहून करतां येते..... मीही केलीय्‌.... पण.....
"पण काय रघ्या?", मी.
रघ्या म्हणाला,"त्याचं काय आहे, एखाद्या वेंळेला परिस्थितीच अशी येते की, आपली तत्त्वं बासनांत गुण्डाळून ठेंवल्याशिवाय निभाव लागत नाही......"
मीः " सरळ सांग की रघ्या पैसा ओंरपलास म्हणून..."!!
रघ्याः"छे छे नाना, एक दमडापण नाही ओंरपला.... तरी खोट्याचा आश्रय घ्यायची वेंळ यऊं शकते.... "
मी व सौ. एकदमच म्हणालो," हे शक्यच नाही रघू.... पैज मारतो आम्ही"
रघ्याः"लागली पैज पन्नासाची? आतां प्रामाणिक राहूनही खोट्याचा आश्रय घ्यायची वेंळ कशी येते ते सांगतो ऐक"
वाचकहो, आपण सगळे आतां रघ्याच्याच तोंडून ऐकूं या ही चित्तरकथा.....

रघ्या उवाच....

"१९७६ सालातल्या मार्च महिन्याच्या वणव्यातली ती एक गरम सायंकाळ होती. एस्‌. टी. बसच्या सर्वात मागच्या अठ्ठावन्न क्रमांकाच्या जागेवर निवान्तपणे पाय पसरून मी पेंगत होतो. ’फलटण-कोल्हपूर सातारा मार्गे ’ ही एस्‌. टी. बस रस्त्यावरच्या खांचखळग्यांतनं हिंदकळत गंचके मारत भंरधांव चाललेली होती.
१९७६ सालीं मी एका सरकारी खात्यांत नोकरीस होतो. सातारा हे मुख्यालय अन्‌ कराडला माझं विभागीय कार्यालय होतं.

नुकतंच लग्नही झालेलं.... बायको बॅंकेत नोकरीला असल्यानं सातार्‍याला एका भाड्याच्या जागेत बिर्‍हाड थाटलेलं होतं. त्यामुळं बायकोला घरदार सांभाळून ऑफिस करणं सोयीचं व्हायचं. माझ्या अखत्यारीत कराड ते शिरवळ अन्‌ फलटण ते कोयनानगर एव्हढं क्षेत्र असल्यामुळं, महिन्यातले वीस-पंचवीस दिवस तरी फिरती चाललेली असायची. स्थापत्य विभागांत अभियन्ता असल्यामुळं वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात येणार्‍या लहानसहान खेड्यापासून ते मोठ्या गांवांपर्यंत सगळ्या ठिकाणी असलेली खात्याची कार्यलयं, डेपो, थांबे, विश्रामगृहं इत्यादींच्या देंखभालीचीं सगळी कामं, तसंच नवीन सुरूं असलेले प्रकल्प यावर देंखरेख ठेंवणं ही माझी मुख्य जबाबदारी. ही कामं वेंळेत करून घेणं, तसंच ठेंकेदार नेमणं, त्यांची देयकं तपासून मंजूर करणं ही पण कामं असायचीच. खात्यानं हा सगळा कारभार सांभाळायला फिरण्यासाठी एस्‌. टी. च्या पासची सोय केलेली असल्यामुळं ती चिंता नव्हती.
हाताखाली स्टाफही चांगला दिलेला होता. पैकी श्री. परांजपे व श्री. शिंगटे हे दोघे बिल्डिंग इन्स्पेक्टर्स, त्यांच्या हाताखाली चारपांच सुपरवायझर्स, मुकादम, असा ताफा असायचा.

सगळ्या कामांची आंखणी व पैश्याचे हिशेब हे बिल्डिंग इन्स्पेक्टर्स सांभाळायचे. प्रत्यक्ष जागेवर कामं रेंटायची जबाबदारी सुपरवायझर्स नी मुकादमांवर असायची.
श्री. परांजपे हे गृहस्थ अनेक वर्षं खात्यात पक्के मुरलेले . त्यांचा अनुभव बराच दीर्घ काळाचा. शिंगटे त्यांच्या मानानं जरा तरूण म्हणजे  तिशीचा. तरी कामं ओंढायला दोघंही धडाडीचे.
शिवाय हिशेबांतही चोंख अन्‌ कमालीचे विश्वासू. त्यामुळं माझ्या डोंक्याला कांही कल्हई लागायची नाही. दर महिना अखेरीला त्यांचे हिशेब तपासून, सह्या करून, ते अखात्याकडं सुपूर्द करणं एव्हढंच बघावं लागायचं.
मी स्वतः, श्रीं. परांजपे अथवा ष्री. शिंगटे यांच्यापैकी कुणाबरोबरतरी या सगळ्या कामांची पाहणी करत फिरायचो. एकूण एखाद्या छोट्या संस्थानिकासारखं सगळं झकास चाललेलं होतं. पण ह्या सुखी आयुष्यांत मलाही धक्का बसायचा योग उगवलेला तो दिवस असावा.....

त्याचं काय होतं की दहा हजारांपेक्षा मोठ्या खर्चाच्या कामांची देयकं ही प्रामाणित करून दिली की मुख्य कार्यालयातर्फेंच ती ठेंकेदारांनां परस्पर अदा व्हायची. पण त्यापेक्षां कमी खर्चाची कामं ही किरकोळ म्हणून गणली जायची. त्यामुळं दरमहा पांचदहा हजारांची उचल खात्याकडून घेंऊन असली सगळी फुटकळ कामं आम्हांला रोंखीनं करून घ्यावी लागत. पहिली उचल संपली की त्याचा सगळा हिशेब खात्याला सादर करायचा. त्याची छाननी होऊन तो पास झाला की पुढच्या महिन्यासाठी परत दहापांच हजारांची उचल घ्यायची.... असं तें चक्र चालायचं बघ. ह्या हिशेबाला ’इंप्रेस्ट्‌ अकाउण्ट’ म्हणायचे त्या काळीं, अन्‌ तो दर महिन्याला सादर करावा लागायचा.

तर फिरतीवर असतांनां आमच्याजवळच्या बॅगांत ह्या हिशेबाच्या कागदांचंही बाड बरोबर असायचं. म्हणजे मजुरांच्या सह्या-अंगठ्यांच्या पावत्या, सामानाची बिलं, कोरे फ़ॉर्म वगैरे वगैरे.
तसं म्हणशील तर दहा-पांच हजार ही त्या काळीं मोठी रक्कम होती, कारण अभियंत्यांचे पगारच दरमहा चारपांचशे रुपयेच असायचे.
तात्पर्य, ’इंप्रेस्ट्‌ अकाउण्ट’ हा नाही म्हणलं तरी जोखमीचा मामला होता.
आणि त्यानंच माला त्या दिवशी धोबीपछाड मारली.....

दिवसभरच्या रगाड्यानं थंकलेला असल्यानं सायंकाळच्या गार वार्‍यानं मला एस्‌. टी. त मस्त डुलकी लागली होती...
अन्‌ अचानक मला गदगदां हलवत परांजपे ओंरडले," साहेब उठा.... सातारा आला... उतरायचंय्‌." !!
मी दंचकून जागा होत डोंळे चोंळले.... सातार्‍याचे उतारूं सगळे उतरलेले होते, अन्‌ एस्‌. टी. त चंढून जागा धंरायला कोल्हापूरकडं जाणार्‍यांची रेंटारेटीही सुरूं झालेली होती.
कसाबसा मी पटकन्‌ बॅग उचलून धक्काबुक्की करत एकदाचा परांजप्यांच्या पांठोपांठ बसमधनं उतरलो....
उतरतांना कण्डक्टरही खेंकसला," वो सायेब चला झट्‌दिशी.... आयला ष्टेशन आलं तरी झोंपत्यात.... बोंबलून घसा सुकतोय्‌ हितं आमचा.... चला उतरा."!!

परांजपे म्हणाले," दमलात काय साहेब? चांगलीच गाढ झोंप लागली होती.... चला जरा गुंडाप्पाच्या टपरीवर भजी-चहा घेऊं या, अन्‌ मग घरी जाऊं."
मीः"थंकवा तसा गेलाय्‌ परांजपे... चला चहा घेऊं या..."
गुण्डापा तसा रोंजचाच. त्यानं गरमागरम भज्यांचा घाणा काढून ताजी भजी पुढ्यांत ठेंवली. आम्ही निवांत त्यावर तांव मारला....
अन्‌ चहाचा पहिला घोंट घेंत असतांनाच मला ठंसका लागला अन्‌ ब्रह्माण्ड आंठवलं......
"परांजपे.... अहो परांजपे!! मी किंचाळलो... घोटाळा झाला सगळा....."!!
"काय झालं साहेब? चहा प्या जरा... ठंसका केंव्हढा लागलाय्‌ बघा...", परांजपे.
मीः"चहा मरूं द्या परांजपे.... ठार मेलोय्‌ आपण.....चला स्टॅण्डवर परत आतां.... "
" अहो साहेब..... झालंय्‌ तरी काय एव्हढं घाबरायला ऑं"?, परांजपे म्हणाले.
मी जवळजवळ धांवत ओंरडलोच," इंप्रेस्ट्‌ अकाउण्टची पिशवी एस्‌. टी. तच विसरली परांजपे... घात झाला"!!!
परांजपेही मग भराभर चालत म्हणाले," साहेब.... म्हणजे रोंकड पण गेली की काय"?
" तेंव्हढंच नशीब आहे परांजपे", मी म्हटलं," रोंकड माझ्या खिश्यातच असते... पण कागदपत्रं, बिलं, पावत्या.... सगळं पिशवीबरोबरच गहाळ झालं... आतां काय करायचं हो?"

परांजप्यानीं मला बखोटी धंरून थांबवलं.... म्हणाले," साहेब.. जरा शांत व्हा बघू... घाबरूं नकां असे....चला स्टॅण्डवर जाऊन बघूं या."
आम्ही दोघे स्टॅण्डवर पळतच गेलो, पण एस्‌. टी. बस तोंवर निघून गेलेली होती.... !!
मला घाम फुटायला लागला. !!  सहासात हजारांची पगारातनं होऊं घातलेली वसुली डोंकं सुन्न करायला लागली....!!!
शेंवटी परांजपेच म्हणाले," साहेब चला आतां... पिशवी कांही हाताला लागायची आतां शक्यता नाही."!!
"मग आतां काय करायचं हो परांजपे? उभ्या हयातीत कधी दुसर्‍याच्या पैश्याला हात लावला नाही... कसं व्हायचं आतां"?
परांजपेः "तुम्ही फक्त धीर सोंडूं नकां साहेब... चला.... जरा गुण्डाप्पाच्या टपरीवर परत चहा घेऊं या...विचार करूं थोडा....
कांहीतरी मार्ग नक्की सापडेल बघा.... पण हे असं गळफटून नाही चालायचं....चला साहेब... ह्या खात्यात काळ्याचे पांढरे झालेत माझे.... कांहीतरी मार्ग काढूं आपण..."

परत आम्ही गुण्डाप्पाच्या टपरीवर थंडकलो..... परांजप्यांनीच चहाची ऑर्डर दिली..... अन्‌ म्हणाले," बसा जरा, आलोच पांच मिनिटांत"
मला चहा गोड लागेचना.... तेंव्हढ्यांत परांजपे आले. म्हणाले,"तुमच्या घरी बाईसाहेबांनां फोन करून सांगितलंय्‌ जेवायला साहेबांची वाट बघूं नका म्हणून....
चला साहेब आतां माझ्या घरी.... तिथंच जेंवणखाण करताकरतां बोलूं.... आमच्या सौ. स्वयंपाकाला लागल्याय्‌त सुद्धां.... चला."
परांजप्यांच्या सौं नी साधंच भाजीभाकरीचं सुंदर जेंवण वाढलं.... जेंवतां जेंवतां डोंक्यातलं भिरभिरं पण जरा शांत झालं....
अन्‌ परांजप्यांनी अचानक चुटकी वाजवली. !! अन्‌ विचारलं," अकाउण्ट्‌ केव्हां द्यायचा आहे साहेब?"
मीः," आज अठ्ठावीस तारीख....म्हणजे परवा दिवशी दुपारपर्यंत सादर करावाच लागेल बघा...."
परांजपेः "चिन्ता सोडा साहेब... अकाउण्ट्‌ सादर होईल व्यवस्थित.... आतां असं करूं या, मी तुम्हाला घरी पोंचवतो.... झोंपा निवान्त तुम्ही....
वरकड खर्चासाठी मला शंभर रुपये देऊन ठेंवा फक्त.....काय करायचं तें मी बघतो.....निघूं या मग? बाईसाहेब वाट बघत असतील तुमची.... चला"
मी परांजप्यांच्या हातांत शंभर रुपये ठेंवले. त्यांनी मला घरीं सोंडलं, हिला सगळी कल्पना दिली, तेव्हां सौ. ही घाबरली.
परांजपे म्हणाले," काळजी करूं नका वहिनी... नुस्ती काळजी करून कांही होत नसतं....चलतो साहेब..... आतां झोंपा निवांत...
उद्या रात्रीपर्यन्त सगळा इंप्रेस्ट्‌ अकाउण्ट्‌ तयार करून तुमच्या हतांत ठेंवतो."!!
मीः"तें कसं काय होणार परांजपे?"
परांजपेः"आत्तां कांही विचारूं नकां साहेब, मला घाई आहे....आपल्याकडं पावत्यांचे कोरे फॉर्म्स नाहीत.... तें आधी पैदा करायला हवेत....
आणि दुसरं एक साहेब...."
मीः"दुसरं काय परांजपे आतां?"
परांजपे," साहेब... ह्या शंभर रुपयांचा हिशेब मात्र मला विचारायचा नाही.!! फक्त एक लक्ष्यांत राहूं द्या.... ह्यातला एक पैसाही माझ्या खिश्यांत जाणार नाही.... "
मला परांजप्यांच्या प्रामाणिकपणाची धन्य वाटली.......
म्हटलं," तुमच्यावर मी कधी अविश्वास दाखवलाय काय परांजपे? हा खर्च मी केव्हांच अक्कलखातीं टाकलेला आहे."
परांजपे म्हणाले,"स्पष्ट बोललो म्हणून राग मानूं नकां साहेब....ह्या खात्यात बत्तीस वर्ष नोकरी केली....पण माझंही तुमच्यासारखंच....
उभ्या हयातीत कधी दुसर्‍याच्या पै ला ही हात लावला नाही बघा.....हे शंभर रुपये कागद जमवायलाच खर्च होणाराय्‌त....
मग चलूं साहेब? उद्या मी ऑफिसात नसेन....रात्रीपर्यंत सह्यासाठी घरी अकाउण्ट्‌ तयार करून आणतो."
मी म्हटल," परांजपे उद्या रात्र होणार असली तर इथंच जेंवायच्या तयारीनं या....संकोच करूं नका, कारण ताबडतोब आपण अकाउण्ट्‌ तपासून पुरा करूनच टाकूं या....
म्हणजे परवां सकाळीच तो सादर करून टाकला की झालं.....दुपारची वाट तरी कश्याला बघायची?"
"ठीक आहे साहेब... निघतो मी", एव्हढं बोंलून परांजपे गेले.
आम्हाला चैन पडेना.... बायकोनं महालक्ष्मीपुढं निरंजन लावलं... अन्‌ कसेतरी आम्ही झोंपी गेलो.......

दुसरा सबंध दिवस ऑफिसातच कामं ओंढत एकदाचा कसातरी ढकलला......
दिवसभर परांजप्यांचा कुठंच पत्ता नव्हता..... ते कुठं गडप झाले होते तें कुणालाच माहीत नव्हतं.......
अखेर दुपारचे चार वाजत आले, तेव्हां माझं लक्ष कश्यातच लागेना. दिवसभराची कामं तर केव्हांच उरकलेली होती.
जाधव नामक आमच्या शिपायानं येऊन आठवण करून दिली की डी. ओ. मधनं निरोप आलेला होता... उद्या दुपारपर्यन्त ’इम्प्रेस्ट्‌ अकाउण्ट’ दाखल करायचा आहे.!
माझ्या छातीत धंस्स्‌ झालं. !! ऑफिस जाधववर सोंपवून मी तडक घरचा रस्ता धरला......

संध्याकाळचं चहापाणी होऊन घरची चारदोन कामं आवरेपर्यन्त सात वाजले.... तरी परांजप्यांचा पत्ता नव्हता.!!
बायकोही चिन्तेत पडली.
नुस्तं बसून काय करणार? मी सायंकाळची अंघोळ आवरायला गेलो.
साबण फेंसून अंगाला लावतोय्‌ न लावतोय्‌ तों बायकोचा आवाज आला...."अहो, परांजपे आलेत...बाड घेंऊन."!!
तसेंच चारदोन तांबे भसाभसा अंगावर ओंतले अन्‌ कपडे चंढवून मी बाहेर आलो.
बघतो तों काय.... केंस पिंजारलेले, डोंळे तारवटलेले, अन्‌ थंकलेले परांजपे समोर खुर्चीत बसलेले.!
हातात एक जाडजूड फाईल.... कागदांनी भरलेली....!!
मी चकित होत म्हटलं," परंजपे, अहो काय आजारी-बिजारी पडलात काय...ऑं?"
परांजपेः,"आजारी पडायला तरी कुठं फुरसत होती साहेब?.... हा घ्या ’इम्प्रेस्ट्‌ अकाउण्ट’... तयार आहे.... बघून घ्या अन्‌ सह्या करा लगेच.!!
आजारी-बिजारी कांही नाही....कालापास्नं झोंपलेलोच नाही, म्हणून असा अवतार झालाय...मी ठीक आहे."

माझा आनन्द गगनांत मावेना....परांजप्यांपुढं लोटांगणच फक्त घालायचं काय तें बाकी राहिलं....!!!
सौ. नं ही श्वास टांकला...म्हणाली,"परांजपे, अहो काय ही अवस्था झालीय्‌ तुमची.....आधी हांतपाय तोंड धुवून घ्या....
खाणं न्‌ चहा तयार आहे तो दोघं खाऊन पिऊन घ्या, अन्‌ मग बसा काय तो काथ्याकूट करत, तोंवर मी स्वैपाकाचं बघते"
अकाउण्ट्‌ तयार झालाय्‌ म्हटल्यावर सगळं दडपण उतरलं होतं....आम्ही खाणं अन्‌ चहावर आडवा हात मारला.
आणि ताजेतवाने झाल्यावर परांजपे बरोबर आणलेलं बाड माझ्या समोर ठेंवत म्हणाले," बघून घ्या साहेब.... साडेसहा हजारांचा हिशेब पुरा जमवलाय्‌."

हिशेब बघून मी चाटच झालो.....
आख्या साडे सहा हजारांचा हिशेब ताळेबन्दासह व्यवस्थित लिहिलेला....एक पैश्याचाही फरक नाही.....!!
चार हजार आठशेच्या आसपास फुटकळ सामानाची बिलं....अन्‌ बाकी रकमेच्या शे सव्वाशे मजुरीच्या पावत्या....कांही सह्या असलेल्या, बाकी सगळ्यावर अंगठे.
मी कागद चाळत म्हटलं,"परांजपे धन्य आहे तुमची...!! एका दिवसात सगळं जमवलंत, खरंच सोंडवलत मला... थॅंक्‌ यू."
परांजपेः,"अहो थॅंक्‌ यू कसलं आलंय्‌ साहेब? आपलं कामच आहे ते....
चला, आतां कागद बघून पटापट्‌ सह्या करून टाका बघू....म्हणजे मी घेऊनच जातो हे बरोबर."

मी एकेक कागद उलटत सह्या करूं लागलो....
सामानाची बिलं झाली, अन्‌ मजुरीच्या चिठ्ठ्या बघतांनां मी उडालोच. कांही चिठ्ठ्यावरचे अंगठे जरा वेगळेच दिसत होते.!!
मीः ,"परांजपे, अहो हे अंगठे कुणाचे आहेत? चालतील ना हे?"
परांजपेः,"अंगठे खरेच आहेत साहेब.... फक्त कांहीकांही पावत्यावर पायाचे घेंतलेत ...."!!!
मी कपाळाला हात लावत म्हणालो,"परांजपे काय हे ?"
परांजपेः"मग काय करणार साहेब? मजुरीच्या शे सव्वाशे पावत्या एका दिवसात कुठून आणणार? मग काय केलं...."
मीः," काय केलंत?"
परांजपेः"काय केलं साहेब...ऑफिसचा रखवालदार गांठला... त्याला वीस रुपये देऊन रात्री ऑफिस उघडलं.... अन्‌ प्रथम कोर्‍या पावत्या हस्तगत केल्या."
मीः"बरं पुढं"?
परांजपेः"मग तिथनं गुण्डाप्पाच्या दारू अड्ड्यावर गेलो.... तिथं जमलेल्या वीस एक मजुरांना दोन दोन रुपये दारूला दिले,
अन्‌ प्रत्येकाच्या दोन्ही अंगठ्यांच्या मिळून चाळीस एक पावत्या केल्या, तरी भागेना....
अजून अंदाजे ऐंशी पावत्या लागणार....आतां काय करायचं? मग एक आयडिया सुचली साहेब"!
मीः" कसली आयडिया केलीत"?
परांजपेः"मग तडक घरी गेलो साहेब....
आणि प्रथम माझ्याच हातांपायांच्या च्या वीस बोटांचे ठसे लावून वीस पावत्या केल्या!
मग बायकोचं अन्‌ पोराचं ही तसंच....एकूण साठ पावत्या झाल्या!! तरी पंचवीस एक उरल्याच."
मीः"बरं पुढं"?
परांजपेः"मग कय करणार साहेब, मोलकरणीच्या पण वीस बोटांच्या वीस पावत्या केल्या....तरी पण चार कमी पडत होत्या"!!!
मीः"परांजपे, हद्द झाली आतां....मग काय केलंत?"
परांजपेः"काय करणार मग? आमच्या शेंजारी राहणार्‍या जोश्यांचा मुलगा पांच वर्षांचा आहे...
त्याला घेंऊन बाजारात गेलो, त्याला चोवीस रुपये खर्चून खाऊ न्‌ खेंळणी घेऊन दिली, अन्‌ त्याच्याही हातांपायांचे अंगठे लावून उरलेल्या चार पावत्या केल्या... काम फत्ते"!!!
मी कपाळाला हात लावत बोललो,"परांजपे... हा असला अकाउण्ट्‌ उत्तीर्ण होईल डी. ओ. त? कांही घोंटाळा तर नाही ना होणार"?
परांजपे,"अहो सतरा ठिकाणचे ’इम्प्रेस्ट्‌ अकाउण्ट’ बघायला डी. ओ. त एकच अकाउंटण्ट आहे..... हे कागद बघायला वेंळ कुठाय्‌ त्याला..... ऑं?!!!
तुम्ही सह्या ठोंका साहेब बेलाशक.... सगळं चालतंय्‌ .....आतां ज्यास्त घोळ घालत बसूं नकां.... पुढचं श्राद्ध घालायची जबाबदारी माझी.... !!
अहो परिस्थिती गळ्याशी आल्यावर तत्त्वं कवटाळत बसून नाही चालत साहेब.... जमेल त्या मार्गानं ’आग्र्याहून सुटका’ महत्त्वाची.... काय?
आणि दुसरं एक साहेब... आपण कुठं अप्रामाणिकपणा करतोय्‌? सहा हजार पांचशे ची उचल घेंतलेली होती... तेंव्हढ्याच रकमेचा हिशेब जमवलाय्‌ ना?
आतां ही खाऊ-खेळण्यांची चोवीस रुपयांची बिलं, अन्‌ हे तुम्ही दिलेल्या शंभरातले उरलेले सव्वीस रुपये....मोजून घ्या साहेब, म्हणजे मी मोकळा झालो."!!!
परांजप्यांच्या जगावेगळ्या प्रामाणिकपणानं थक्क होत मी दुसर्‍यांदा कपाळाला हात लावला, अन्‌ सगळ्या कागदांवर धडाधडा सह्या ठोंकायला सुरुवात केली. !!!
दुसर्‍या दिवशी सकाळीच आमचा इम्प्रेस्ट्‌ अकाउंट सादर झाला, अन्‌ थेट उत्तीर्णही झाला त्याच दिवशी.....कसलंही विघ्न न उपटतां !!!

एव्हढं सांगून रघ्या माझ्याकडं अन्‌ सौ. कडं विजयी मुद्रेनं बघत म्हणाला,"  पटलं ना आतां, नाना-नानी....?
नुस्तं तत्त्वांनां चिकटून बसून कांही वेळा निभाव लागत नाही म्हणून......काय?"
रघ्याची ’ष्ष्टोरी’ ऐकून मी कपाळाला हात लावत, त्याच्या हातावर पन्नास रुपयांची नोट टिकवली. !!!

********************************

-------- रविशंकर.
३० जानेवरी २०१२.

No comments:

Post a Comment