" ओ काका, गाडी जरा पुढं घ्या की... जाऊं द्या आम्हाला."
माझ्या पुढं सिग्नलच्या चौकांत थांबलेल्या रिक्शावाल्यानं रिक्शातनं मुण्डी बाहेर काढत त्याच्या पुढं उभ्या असलेल्या स्कूटरस्वाराला हाळी दिली.
"अहो कुठं जाताय्? लाल दिवा दिसत नाही काय?" पुढचा स्कूटरवाला वतवतला.
"तुम्ही थांबा की हवं तर... नको कोण म्हणतंय्?" असं खेंकसत रिक्शावाल्यानं त्याला बगल देंत रिक्शा पुढं काढली...
चौकात ’सखाराम’ हजर नाही याची खात्री केली, अन् लाल सिग्नल बेधडक तोंडून तो सुसांट निघून गेला.
विद्यावंतांच्या पुण्यनगरीत घडणार्या नेहमीच्या आगाऊपणातला हा एक किस्सा.
शास्त्री रोडवरच्या पूना हॉस्पितलच्या चौकांत मी व माझी बायको सिग्नलसाठी थांबलो होतो. सायंकाळची सात-साडेसातच्या वेंळेच्या ऊत आलेल्या बेशिस्त वाहतुकीनं जाम कंटाळून गेलो होतो.
बर्याच महिन्यांनी माझा बालमित्र मकरन्द दातवडकर ह्याच्या घरी निवांत गप्पा टांकण्यासाठी आम्ही दोघे निघालो होतो.
’मागं कसलंही झेंगट ठेंवून येऊं नकोस.... बर्याच काळानं भेंटतो आहोत....तेव्हां निवान्तपणानं गप्पाटप्पा करत जेवणखाण करूनच मग निघायचं’, असं मक्या अन् त्याची बायको सौ. मधुरा दोघानीही बजावलेलं होतं.
सात वाजतां सदाशिव पेंठेतल्या ’सोमदत्त अपार्ट्मेंट्स्’ मधल्या त्याच्या घरी भेंटायचं ठरलं होतं, अन् इथं तर अर्ध्या रस्त्यातच साडेसात वाजलेले......
"ह्या असल्या गलथान वाहतुकीतनं आपण कधी मकरन्दाच्या घरीं पोंचणार...देंव जाणे. उद्या सात वाजतां पोंचलो तरी नशीब....!!", मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेली सौ. सुमीता करवादली.
बायको पुण्याची असल्यानं मी शालजोडीतला हाणायची चालून आलेली संधी न दंवडतां म्हणालो," अगं काय करणार? इथं सगळेच पेशवे झालेले आहेत!!..... कोण कुणाला जाऊं देणार?"
"समजला तुमचा समजूतदारपणा....चला लौकर....सिग्नल लागलाय्..... नाहीतर बावळटासारखे बसाल पेशव्यांकडं बघत"!!, बायकोनंही उट्टं काढायची संधी सोंडली नाही.!!
चारही बाजूंनी वेंड्यावाकड्या घुसणार्या वाहानांच्या गर्दीतनं वाट काढत मी गाडी दामटली.... अन् आठ वाजायच्या सुमाराला आम्ही ’सोमदत्त अपार्ट्मेण्ट्स्’ कसंबसं एकदाचं गाठलं.
सदाशिव पेंठेतल्या त्या नमुनेदार बोळकाण्डीतनं वाट काढणं म्हणजे एक दिव्यच होतं.
’येथे राजापुरी पंचे आणि मेतकूट मिळेल’, ’ संक्रांतीत लुटायच्या स्वस्त वस्तू’, ’देण्याघेण्याचे खण फक्त पांच रुपयांत’ असल्या पाट्या लावलेल्या दुकानांच्या गर्दीतला एक जुना वाडा पाडून, त्या जागी हे सहा मजली ’सोमदत्त अपर्ट्मेण्ट्स्’ बांधलेलं होतं. तळमजल्यावर दर्शनी बाजूला असलीच कांही दुकानं होती.
त्यांच्या भाऊगर्दीतच इमारतीचं प्रवेशद्वार होतं. त्याच्या समोरच दोनचार दुचाक्या आडव्यातिडव्या लावलेल्या होत्या. त्यापुढं रस्ता अर्धवट अडेल अश्या तर्हेनं आपापल्या ’स्कूटी’ वा सायकली तिरक्या स्टॅंडला लावून सातआठ पोरांचं टोंळकं गप्पा मारत निवान्त बसलेलं होतं.
प्रवेशद्वाराजवळ ’येथे वाहने लावूं नयेत...... लावल्यास चाकातली हवा सोंडली जाईल’ अशी अस्सल सदाशिवपेठी तंबी भरणारी पाटी लटकत होती.
त्या गदाड्यातच एका बाजूला थोडी ढंकलाढंकली करून मी मोटरसायकल स्टॅण्डवर चंढवली, अन् हुश्श्य करत आम्ही प्रवेशद्वारातनं आंत शिरलो.
आंत व्हरंड्यात मिट्ट काळोख होता. मक्याचा फ्लॅट थेंट सहाव्या मजल्यावर असल्यानं आम्ही लिफ्ट् शोंधत पुढे निघालो.... अन् अंधाराला नजर सरावल्यावर एकदाचं तें उद्वाहन आम्हाला दिसलं.
त्याच्या दरवाज्यासमोर छतावर झीरो पॉवरचा एक मिणमिणता दिवा जळत होता..... अंधारात कुणी भिंतीला धंडकूं नये एव्हढाच त्याचा उपयोग असावा.
उद्वाहनाच्या सरकत्या दरवाज्याशेंजारी भिंतीवर एक पुठ्ठ्याचा बोर्ड एका खिळ्याला लटकत होता.
पण त्या पणतीवजा दिव्याच्या प्रकाशांत त्यावर काय लिहिलेलं आहे ते दिसत देखील नव्हतं.... मग वाचतां येणं दूरच.
उद्वाहन तर वरच्या कुठल्यातरी मजल्यावर असावं.
आम्ही घाईत असल्यानं मी लिफ्ट्च्या दरवाज्याजवळ चांचपडत अंधुकश्या दिसणार्या बटणावर बोंट ठेंवून जोंरांत दाबलं....
अन् विजेचा ४४० व्होल्ट्स् चा धक्का बसल्यागत अंगातनं झिणझिण्या उठल्या.!!
माझं बोंट मुळापर्यंत भिंतीत गेलं होतं.... !!
जिथं लिफ्ट्चं बटण असायला हवं, त्या जागी बटणाऐवजी फक्त भोंकच होतं, आणि त्यातच माझं बोंट मुळापर्यंत आंत गेलेलं होतं.!!!
संतापनं चरफडत एका झटक्यात मी बोंट बाहेर काढलं.... आणि परत बाहेर जाऊन त्या गप्पा छाटत बसलेल्या पोरांपैकी एकाला विचारलं," कायरे बाळ, इथल्या लिफ्ट् चं बटण कुठंसं आहे?"
त्या पोरानं मख्खपणानं माझ्याकडं बघत सांगितलं," लिफ्ट्च्या दरवाज्याशेंजारच्या पाटीवर लिहिलंय्"!!
मी चरफडत परत लिफ्ट्कडं माघारी आलो....
आधीच उशीर झालेला.... त्यांत ही आणखी भर.... वर त्या आगाऊ पोरानं मारलेली फोडणी....!!
शेंवटी खिशातल्या चावीच्या जुडग्याला असलेली छोटीशी विजेरी पेंटवली अन् त्या भोंकाजवळच लटकणारी ती पाटी एकदाची बघितली......
पाटीवर खास ’पेशव्यांचा हुकूमनामा’ लिहिलेला होता......
’ मी, पहिल्या मजल्यावरील रहिवासी श्री. बर्वे विरुध्द उर्वरित सोमदत्त अपार्ट्मेण्ट्स् यांच्यातील अनादि-अनन्त असा वाद आहे.....
आजपावेतों कित्येकांनीं माझ्यात बोंटें घालून मानसिक धंक्के खाल्लेले आहेत.....
आपण या भरीला न पडतां जिना चंढून पहिल्या मजल्यापर्यन्त वर जाल ही अपेक्षा. !!
पहिल्या मजल्यापर्यन्त जिना चढायचे कष्ट घेतलेत तर तिथून वर उद्वाहन चालूं स्थितीत आहे. !!!
जिन्याकडं जाण्याची दिशा ====>>>> !!!
उलटपावलीं माघारी जाण्याची दिशा <<<<<<======= ’ !!!!
आम्ही दोघानीं कपाळाला हात लावत जिन्याकडं जाणारा रस्ता पकडला. !!!!!
************************************
----- रविशंकर.
७ जानेवरी २०१२.
No comments:
Post a Comment