Search This Blog

Sunday, 27 November 2011

॥ कार्यनिष्ठा ॥


" छे छे !! नाना, ह्या तुझ्या म्हणण्यांत कांहीही अर्थ नाहीये. तुला सांगतो, ते वर्क इज्‌ वर्शिप वगैरे सगळं पुस्तकांत छापायला आणि उपदेशाचे डोस पाजायला ठीक आहे.
प्रत्यक्ष व्यवहारांत ते तसं कधीच असत नाही. कदाचित पुराण काळांत वगैरे असेलही तसं‌, पण सध्याच्या? शक्यच नाही. अरे बघशील तिथं प्रत्येकजण बॉस्‌ ला पॉलिश मारण्यात गर्क.
लाळघोटे साले ! दमडीची कामं करत नाहीत, पण प्रमोशन-इन्क्रिमेंट च्या हंगामांत सगळे पुढं पुढं."
                                                                    
१९८१ सालांतली रविवारची एक प्रसन्न सकाळ. सकाळी सकाळीच मधू संतापानं फणफणत घरी दाखल झाला होता, आणि तांवातांवानं माझ्याशी भांडत होता.
मधू गोरे माझा बालपणीचा मित्र. अगदी इयत्ता पहिली पासून एकाच बाकड्यावर बसणारे आम्ही दोघं. मधू तसा सरळ, पण विलक्षण संतापी. डॅंबीसपणा-टंवाळपणा, खिलाडूपणा त्याच्या स्वभावातच नाही. मधूच्या आई वडिलांचंही कायमचं घरी येणं-जाणं असल्यानं, तसे संबंधही अगदी घरच्यासारखे. त्यामुळं कुठला तरी राग, मळमळ ओंकून टाकायला आमचं घर म्हणजे त्याची हक्काची जागा असें. मग मधू असा फुसतफुसत घरी आला, की त्याच्या विरुद्ध बाजू घेऊन वादविवाद रंगविण्याची मजा कांही औरच असायची.

मधू वयानं माझ्यापेक्षा सहा महिन्यानी मोठा असला, तरी मला नाना च म्हणत असे. आमच्या नानिवडेकर या लांबलचक आडनावाचा कधीकाळीं कोणा महात्म्यानं नाना असा शॉर्ट फॉर्म केला, ते आमचा मूळपुरुषच जाणे. पण अगदी प्राथमिक शाळेपासून संपर्कांत आलेल्या सगळ्या माणसांनी मला नाना म्हणायला जी सुरुवात केली ती अगदी सेवानिवृत्ती पर्यंत!
अठरापगड जातीधर्माच्या या देशांत, निरनिराळ्या कालखंडांतल्या लोकांचंही एकमत, इत्क्या प्रखरपणे क्वचितच कुठं झालं असेल.

मधू तर या पलीकडं जाऊन, माझ्या बायकोला नानी च म्हणायचा. !! स्त्रियांचं वय बाहेर काढूं नये असं जाणते म्हणतात. सदाच्या ते गांवीही नसायचं. शिवाय, ’नानी जर त्याची बाजू घेऊन वादांत उतरली, तर मधूला असा कांही जोर चढायचा, की विचारायची सोंय नाही. अन्‌ हीच वेंळ, त्याची विरुद्ध बाजू घ्यायला सोंयीची असायची.

मी म्हटलं," मधू, अरे असा अपेक्षाभंग व्हायचाच कधीतरी. यालाच जगणं म्हणतात. चालायचंच."
मधू तडतडला," काय, काय चालायचंचहे काय जगणं आहे ऑं ? हा काय न्याय झाला? इथं मी मान मोडेस्तंवर कामं ओढतोय्‌ रोज. वर ओ.टी.ही कधी मागितला नाही बॉसकडं! हे सगळं फुकटच काय?"

मी म्हटलं," मधू, डोंक्यांत राख घालून काय उपयोग आहे? हे बघ, तुझं काम तर तूं प्रमाणिकपणानं, करतोय्‌स ना? प्रमोशन या वेळी नाही झालं, तर पुढच्या वेळी तरी होईलच की ! बॉस ला आज ना उद्या तुझा विचार करयला लागेलच ना? सगळीच माणसं काय फक्त त्यांना मिळणार्‍या पगारासाठीच कामं करतात असं थोडंच आहे?"

तेंव्हढ्यांत मधूची बाजू घ्यायला नानी चहा-नाष्ट्यासोंबत हजर झाली. हिनं ही मधूच्याच सुरांत सूर मिसळला," बरोबर आहे मधू चं. हल्ली कुठ्ल्याच ऑफिसात कामं करणार्‍यांची कदर राहिलेली नाही. आमच्या बॅंकेतही हीच बोंब आहे.!! तुम्हाला टंवाळीशिवाय दुसरं काय सुचणार? नाष्टा घ्या, गार होतोय्‌."

झालं! मधूला टेंकू मिळतांच स्फुरण चढलं! तोंडांत घास कोंबत तो गरजला," काय उपयोग नुस्ती ढोर मेहनत करून? शिवाय तुझी ही पुढची वेळ, ’आज ना उद्या करत केव्हां उगवणार, हे कोण सांगूं शकतंय्‌? काय गं नानी, बरोबर आहे ना माझं?"

मी म्हटलं," मधू, हे बघ, माणूस हा असा प्राणी आहे की, तो नुसत्या पगारावर पूर्ण समाधानी, सहसा होत नाही. त्याव्यतिरिक्त त्याला तो करत असलेल्या कामातनं मिळणारा आनन्दही आवश्यक असतो. माणसा माणसातल्या फरकानुसार, हे प्रमाण कमीज्यास्त असूं शकेल, पण ते शून्य नसतं. हा कार्यानन्द तरी तुला भरपूर मिळालय ना? मग चिन्ता कसली? कुठ्ल्याही बॉस्‌ च्या दृष्टीनंही, सहकार्‍याची कार्यनिष्ठाही महत्वाची असतेच. आणि अशी भक्कम कार्यनिष्ठा असणारी माणसंच असामान्य होतात. पॉलिश बहाद्दर हे समाधान कधीच मिळवूं शकत नाहीत."

मधू वतवतला," कसल कार्य आणि कसल्या निष्ठेच्या गप्पा मारतोय्‌स तू? रामायणातल्या? कलियुगांत सगळे पैश्यासाठीच हपापलेले असतात. अशी कर्यानिष्ठा वगैरे कुठं असते काय?
तूं तरी बघितलीय्‌स काय कुठ? नुसत्या वायफळ गप्पा ! एक तरी उदाहरण दाखवूं शकशील काय तुझ्या या कार्यनिष्ठे चं, ऑं?"

इतक्यांत आंतनं नानीनं मला आवाज दिला," अहो, काका तुम्हाला कश्यासाठी हाक मारताय्‌त बघा जरा".

काका म्हणजे माझे वडील. घरांत नानी सकट सगळे त्यांना काका च म्हणायचे.
व्यवसायानं शेतकरी, पण चौदा विद्या अन्‌ चौसष्ट कलांत पारंगत. कलाकारीपासून चांभारकीपर्यंत काय करणार नाहीत, हेच सांगणं अवघड.

माझ्या डोंक्यांत एक कल्पना चमकली. मधूला म्हटलं," तुला कार्यनिष्ठा च बघायचीय्‌ ना? चल, दाखवतो." बायकोला बाहेर बोलावलं. ती हातात उलथनं घेऊनच बाहेर आली.

पुढचा संवाद असा झाला...

मी: "अगं, कां हाक मारताय्‌त? काय हवंय त्यांना?"

बायको: " अहो सकाळी संडासला जायला निघाले, तर दाराची कडी नीट सरकेना, म्हणून दुरुस्त करत बसलेत."

मी: " किती वेळ झाला, दुरुस्ती चाललीय्‌?"

बायको: "दोन तास तरी झाले असतील".

मी मधूला बखोट धरून आंत नेलं.

काकांचं दुरुस्तीचं काम संपतच आलेलं होतं. शेवअचे दोन स्क्रू आंवळायचं काम तन्मयतेनं चाललेलं होतं.

मी: " काय हवंय्‌? कश्याला हांक मारलीत?"

काका: "अरे ही कडी अशी केव्हांपास्नं बिघडलीय्‌? दुरुस्त करायला नको?"

मी: : " राहूनच गेलं ते, गडबडीत."

काका:" आणि तशीच सुम्ही ती वापरताय्‌? धन्य आहांत! तरी बरं, सकाळी संडासला जातांनाच माझ्या लक्षांत आलं ते."

मी: " बरं, तुमचं काम झालंय्‌ काय? मला जायचं आहे."

काका: " थांब जरा, आधी मी जाऊन येतो. सकाळपास्नं ह्यातच सगळा वेळ गेलाय्‌." !!!

मी मधू कडं नुस्तं बघितलं.

तहान भुकेचीच काय, प्रत्यक्ष नैसर्गिक विधीचीही शुद्ध हरपविणारी ती जाज्वल्य कार्यनिष्ठा बघून मधूनं कपाळाला हात लावत तत्क्षणीं काढता पाय घेतला. !!!


                                                                                                            ----- रविशंकर.


***************************

No comments:

Post a Comment