॥ जमालगोटा ॥
" आपल्या कंपनीनं आजतागायत कंपनीतल्या मनुष्यबळावर कधीही अन्याय केलेला नाही."
चन्द्रात्रे साहेबांचं नेहमीचं पुराण सुरूं झालं. सालाबाद प्रमाणे पदोन्नत्या अन् पगारवाढींच्या नावांची यादी जाहीर करण्याची सभा आमच्या ऑफिसच्या हॉलमध्ये सुरूं झाली होती.
साहेबाच्या ’लेक्चर’ मध्ये कुणालाच रस नव्हता ! ’होय् बा’ ना तर बिल्कूलच नसे, कारण ते मुळातच डॅंबीस. !!
असा हा सभा सोहोळा दरवर्षी एप्रिल महिन्यांतल्या दुसर्या आंठवड्यांत केव्हांतरी साजरा व्हायचा.
त्यांत खरोखरीच न्याय किती अन् अन्याय किती, हे खुद्द चन्द्रात्रे साहेबानांच ठाऊक. !! कुणालाच ते कळत नसे. भल्याभल्यांच्या अन्दाजांना धत्तुरा लावीत, तोंडपुज्या ’हां जी’ वाल्यांचीच बहुधा चांदी व्हायची. नेकीनं कामं ओढणारे पुढच्या सभेपर्यंत नशिबाला दोष देत कामं ओंढतच रहायचे.-- पुढील वर्षाच्या सभेत तरी आपला नंबर लागेल या आशेवर. !!
सगळाच वेड्या महंमदाचा कारभार. !!
अश्या वर्षानुवर्षं ’साइडिंग्’ ला पडलेल्या महाभागांत आमचा निकटचा सहकारी ’रामभाऊ’ -- म्हणजे ’रामभाऊ पाटील’, अव्वल क्रमांकावर होता.
अत्यंत कर्तव्यदक्ष, सरळ, खूप कामं उपसाणारा, पण भिडस्त अन् मुखदुर्बळ. अश्या माणसाची चन्द्रात्रे साहेबाच्या लेखी काय पात्रता असणार ?
गेली आठ नऊ वर्ष बिचर्याची गाडी ’साइडिंग’ ला पडलेली होती. साहेबाशी बोलायची पण पंचाईत. रामभाऊ हा असा, तर चन्द्रात्रे साहेबाचं एकदम उलटं टोंक.
तोंडानं अति फटकळ, अन् अति हलक्या कानाचा इसम. कुणाला कधी काय फटकन् बोलतील, कांही नेम नसायचा.
एकदा तर मध्यवर्ती प्रकल्प आंखणीच्या एका बैठकीत, चन्द्रात्रे साहेबाला, त्यांच्या साहेबानं जेव्हां सांगितलं होतं की ’नवीन पेन्ट्शॉप, तुम्हाला येत्या सात महिन्यांत उभं करायचं आहे. तेव्हां बांधकामाचं साहित्य जागेवर केव्हां पोहोचावं लागेल?’
त्यावर ’मागच्या वर्षीच’! असलं तोंडफोडं उत्तर या विक्षिप्त माणसानं दिलं होतं.
असल्या माणसाच्या नादाला कोण लागणार?
तेव्हां उगीच चिखलात दगड मारायला कश्याला जा, म्हणत बरेच लोक साहेबाला शक्यतो टाळायचेच.
" गेल्या वर्षीच्या मानानं ह्या वर्षी, बाजारपेठ आंक्रसल्यानं, गाड्यांच्या विक्रीवर अनिष्ट परिणाम झालाय." चन्द्रात्रे साहेबाचं प्रवचन पुढं सुरूं झालं," कंपनीच्या नफ्यांतही लक्षणीय घट झालीय्.
तरीही ह्या वर्षी आपल्या विभागाला (माझ्या भगीरथ प्रयत्नांमुळं) चार पदोन्नत्या, अन् सहा पगारवाढी मंजूर झाल्याय्त".
त्या किती माणसांमध्ये, ते सांगायचं साहेबानं शिताफीनं टाळलं. पण शे-सव्वाशे जणांच्या विभागाला, सहा अधिक चार तुकडे, हे प्रमाण चन्द्रात्रे साहेबाचा कंपनीतला वट कळण्यासाठी पुरेसं बोलकं होतं.
"विलास, आपल्यासारख्यांचं कांही खरं दिसत नाही. पाटलाचं तर अवघडच दिसतंय्" शेंजारी बसलेल्या विलास च्या कानात मी पुटपुटलो.
"पाटलाचा नंबर लागला तर खरंच बरं होईल नाना. बिचारा फारच लटकलाय्" विलास म्हणाला, आणि बोला-फुलाला एकच गांठ पडली.
" आणि, गेल्या वर्षात समाधानकारक काम केल्याबद्दल, शेवटची पगारवाढ श्री. रामचन्द्र पाटील यांना मिळालेली आहे." चन्द्रात्रे साहेबानं जाहीर केलं.
आम्हां, पाटलाच्या निकटवर्तीयानां खरंच बरं वाटलं, आमच्या पदरात कांहीही पडलेलं नसूनही. !!
"नाना, रामभाऊ सुटला बघ, चोराची लंगोटी तरी हांताला लागली!" विलास कुनबुजला.
"तसंच म्हणावं लागेल विलास. कांही कां असेना, पाटलाचं ग्रहण सुटलेलं दिसतंय्", मी म्हणालो.
" कंपनीत इथून पुढं सगळ्यांच्या जबाबदार्या वाढणार आहेत." साहेबानं वसुलीचं सूतोवाचं करायला सुरुवात केली," आगामी काळातली आव्हानं पेंलण्यासाठी, मी आपल्या विभागातल्या कामांच्या वाटणीत कांही बदल करीत आहे." चन्द्रात्रे साहेबानं औरंगजेबाचा खलिता वाचायला सुरुवात केली. सार्या श्रोत्यांचे चेहरे कोमेजले.! ज्यांना उपाशीपोंटीच हे व्याख्यान होतं, त्यांचे तर काळवंडले.!!
साहेबानं बदल्यांची जंत्री बाहेर काढली.
"श्री. आर्. डी. कुलकर्णी, हे बजेट विभागातनं साइट वर बदलून जात आहेत....
साहेबाचं यादीवाचन चालूंच होतं. बहुतेक सगळ्याच विभागांची धुलाई सुरूं झाली.
"नाना, पदरांत मोजकंच अन् वर हा प्रसाद.!" पाटील माझ्या कानांत फुसफुसला.
"जे आहे ते असं आहे रामभाऊ, आमच्याकडं बघ. नुसताच प्रसाद आहे.!!" इति विलास.
" आणि श्री. रामचन्द्र पाटील यांची बदली फाउण्ड्री च्या प्रकल्पावरून, मटेरिअल्स् विभागांत करण्यांत आली आहे." साहेबानं जाहीर केलं,"सर्व संबधितांनी अपापल्या जबाबदार्यांची अदलाबदल येत्या आठवड्यात पुरी करून नवीन विभागात काम सुरूं करायचं आहे. मला खात्री आहे, की सगळे एकमेकांना पूर्ण सहकार्य देतील."
साहेबानं बैठकीचा समारोप करत अखेरचा बॉंम्ब टाकला," आणखी एक. ज्या कुणाची याबद्दल तक्रार असेल, त्यांच्यासाठी बाहेरचे दरवाजे उघडे आहेत.!!"
बैठक संपली. नंबर लागलेल्यांची तोंडदेखली अभिनन्दनं, आणि न लागलेल्यांची सान्त्वनं सुरूं झाली. पाटलाचा चेहरा मात्र उजळण्याऐवजी जरा पडलेलाच दिसला.
भोजनाच्या सुट्टीत कॅन्टीनमध्ये पाटलाला मी छेडलं,"रामभाऊ, अभिनन्दन. सुटलात!"
पाटील: "काय सुटलो? साल्या ’भिकार जमदग्नि’ नं गोची करून ठेवली." पाटील साहेबाला ’भिकार जमदग्नी’ म्हणायचा.
मी:"का रे, काय बिघडलं? खिसा तर गरम झालाय् ना?"
पाटील:"कसलं काय बाबा? एक तुकडा फेकलान्, अन् मला ऑफिसात डांबला.! साइट काढून घेतली माझ्याकडनं !"
पाटील हा मुळात ’साइट’ प्रेमी माणूस. एका जागी बसून टेबलवर्क करण्यांत त्याला अजिबात रस नसायचा.
सुभाष म्हणाला," तुझं काय जातंय् त्यामुळं? शेवटी नोकरीच करायची नां? कुठं कां बसवेना!"
पाटील म्हणाला,"काय उपयोग? एक देऊन दुसरं काढून घेतलं. मी बोलणाराय् दुपारी जमदग्नीशी."
विलास म्हणाला," रामभाऊ, शहाणा असशील तर गप्प बस. कांही उपयोग होणार नाही. चिखलात दगड मारशील, तर अंगावर घाण उडेल फक्त !"
पण पाटलाला कांही ते पटलं नाही. विषय तिथंच थांबला.
पुढच्या चार-दोन दिवसांत पुढील वर्षाच्या खर्चांचं अंदाजपत्रक हेड ऑफिसला पाठवायचं होतं, त्यावर चर्चा करण्यासाठी ’जमदग्नि’ चं मला बोलावणं आलं.
साहेबाच्या केबिन मध्ये त्यावर आमचा खल चालूं होता.
तेंव्हढ्यांत बेल वाजली. आणि पाठोपाठ " सर आंत येऊं कां? म्हणत पाटील दाखल झाला. ! मी कान टंवकारले.
जमदग्नि: "काय आहे पाटील ?"
पाटील: " सर, पगारवाढ मिळाल्याबद्दल थॅंक्स्."
जमदग्नि: " हूं......"
पाटील : " सर, पण ..."
जमदग्नि:"काय पण ?"
पाटील:" सर माझी ऑफिसात बदली झाली..."
जमदग्नि:" बरं, म.............ग ?"
पाटील: " सर, माझ्याकडची साइट काढून घेतली....... मी सुखी नाही. !!"
पाटील हिय्या करून एव्हढं बोलून थांबला....
जमदग्नि नं पाटील कडं मोर्चा वळवला... दुसर्या क्षणीं त्याची खुनशी हिरवट घारी नजर पाटलावर रोंखली गेली...
मला पाटलाची विलक्षण दया आली.
जमदग्नि:"पाटील, इथं किती वर्षं कामं करताय्?"
पाटील: "सोळा वर्षं झाली, सर"
जमदग्नि:" हूं...., आतां एका प्रश्नाचं उत्तर द्या."
पाटील:" क् क् काय सर?"
जमदग्नि:" तुम्ही गेली सोळा वर्षं, इथं सुखी व्हायला येताय्, की नोकरी करायला ?"
पाटलानं कपाळाला हात लावत मागच्यामागं काढता पाय घेतला. !!
त्यानंतर सेवानिवृत्त होईतोंवर पाटलानं ’भिकार जमदग्नि’ च्या केबिन मध्ये परत पाय टाकला नाही. !!!
----- रविशंकर.
*************************
No comments:
Post a Comment