Search This Blog

Sunday, 27 November 2011

॥ अमृततुल्य ॥




धुळीचा खकाणा अन्‌ गरम हवेचे फंवारे उडवत औरंगाबाद-कोल्हापूर एस्‌. टी. सातार्‍याच्या स्थानकात शिरली, अन्‌ मी डोंळ्यावरची पेंग झटकत फलाटावर उतरलो.

१९८४-८५ सालातला मे महिना सुरू होता. ऊन्ह मी म्हणत होतं. दुपारी चार ची चहाबाजांची वेळ होती.

उकाड्यानं अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. सातआठ तास खुर्चीत बसून अंगही आंबलं होतं.
कण्डक्टरनं बस फक्त वीस मिनिटं थांबेल असा पुकारा केल्यामुळं, कांही पोंटांत ढकलायलाही पुरेसा वेळ नव्हता.

तेव्हां पटकन्‌ मुतारीला धांवती भेंट देऊन, फक्त चहाच प्यावा असं ठंरवलं.
स्टॅन्डवरच्या कॅन्टीनमधला फुळकवणी चहा पिण्यापेक्षा, जरा समोरच्या बाजूला कुठं अमृततुल्य दिसतोय का, या शोधांत मी बाहेर पडलो.

नेहमीप्रमाणं स्टॅण्डच्या प्रवेशद्वाराभोंवती पेपरवाले, खेळणीवाले, टॅक्सीवाले, रिक्शावाले, हमाल, यांचा गराडा पडलेला होता.
शेजारच्याच पानाच्या टपरीवर एका टोंळक्यांत राजकारणावर जोरजोरांत चर्चा चालली होती. उसाच्या रसाच्या गुर्‍हाळांतल्या चरकाची घुंगरं एका तालावर खुळ्‌-खुळ्‌ वाजत होती. एखाद्‌दुसारा भिकारी हांत पसरून याचना करीत होता.

या सगळ्या गदाड्यांतनं वाट काढत मी समोरच्या रस्त्यावर आलो, पण अमृततुल्य ची पाटी कुठं दिसेना.
म्हटलं, पानवाल्याला विचारावं.

दहा एक वर्षांपूर्वी मी एस्‌. टी. मध्ये सिव्हिल खांत्यांत नोकरीला असतांना, सातार्‍यालाच होतो.
सातारा स्थानकाच्या विस्तारीकरणाचा कांही भाग माझ्या कारकीर्दीत झालेला होता. त्यावेळी केलेली कामं अजूनही भक्कम अवस्थेत असलेली बघून खूप समाधान वाटलं होतं. पानवाल्यानंही अंधुकसं ओंळखलं. 
चौकशी करतांच त्यानं रस्त्यापलीकडच्या बाजूला बोंट दाखवत म्हटलं," तें ना सायेब, ती समोर जनता बॅंक हाय्‌ न्हवं, तेच्या, शेंजारच्या त्या बोळकांडीतच दादू पैलवानाचं आद्य अमृततुल्य हाय्‌. लय्‌ भारी च्या बनिवतंय्‌ बगा. अगदी तुमच्या ष्टाईलचा च्या मिळंल

विलक्षण खुषीत मी रस्ता ओलांडूं लागलो.

दादू पैलवान हे नांव ऐकतांच ओंळखीचं वाटलं. पण कोण कुठला ते आठवेचना. विचरांच्या तंद्रीतच मी समोरचा बोळ गांठला, आणि एका विलक्षण खुषीत आद्य अमृततुल्य मधलं बाकडं पटकावलं.

सगळ्या गल्लीभर चहाचा घमघमाट सुटला होता. समोरच बसक्या ओंट्यावर रॉकेलचा स्टोव्ह भगभगत होता. त्यावर ठेंवलेल्या पातेल्यांत तें अमृततुल्य रसायन रटरटत होतं. त्या बसक्या ओंट्यावर घामानं थंबथंबलेला विशीतला एक पोरगा कळकट लुंगी नेसून हातातल्या ओंघराळ्यानं अम्रुततुल्य ढंवळत बसला होता. मधूनच तो ओंघराळं चहांत बुचकळून चहाची उंचच उंच धार काढत होता. शेजारच्या घडवंचीवरच्या कांचेच्या बरण्यांत बिस्कीटं, क्रीमरोल, बटर, असलं कांही बांही ठेंवलेलं दिसत होतं. दोनचार निरुद्योगी पोरं चौघांत दोन चहा वांटून पीत बसली होती. 

मला वाटतं, चवदार चहा बनवायच्या या पद्धतीचं या अम्रुततुल्य वाल्यानां खरं तर पेटंट च मिळायला हवं. इतके सगळे सोपस्कार केल्याशिवाय त्या रसायनाला अमृताची चंव कशी काय येणार? अमृततुल्य वाला काय आणि भजी-मिसळ पाव वाला काय, आचारी जेव्हढा कळकट आणि घामट, तेव्हढी भजी,मिसळ,आणि चहा चविष्ट असतो, असा माझा सार्थ अनुभव आहे.

अखेर आचार्‍यानं पितळेच्या खलबत्त्यात सुंठ-वेलची वगैरे बदडून रटरटणार्‍या चहांत टाकलं, मग ओंघराळ्यानं तो ढंवळून त्याची अखेरची उंच धार काढली, मग पितळेच्या किटलीवर मोठ्ठं गाळणं ठेंवून तीत तो गाळला, आणि स्टोव्ह बारीक करत आवाज दिला "दादुअण्णा, च्या वतां".

आंतल्याबाजूनं एक सत्तरीची व्यक्ती चटकन्‌ बाहेर आली. अमृततुल्य ला न शोंभणारा स्वच्छ पांढरा कुडता-धोंतर, कपाळाला टिळा, एके काळी कमावलेलं असावं-पण आतां सुटलेलं शरीर, पायांत करकरणार्‍या कोल्हापुरी  चपला, भज्यांसारखे दिसणारे फोंडलेले कान, एकूण पहिलवानी थाट होता. पण देहाला लाजवेल अश्या चापल्यानं स्वारीनं फटाफट्‌ कपबश्या मांडून शहाचे कप भरले, आणि गिर्‍हाइकांसमोर ठेंवायला सुरवात केली. माझ्यासमोर कप ठेंवतांना एक क्षणभरच नजरानजर झाली असावी, स्वारीनं चट्‌कन्‌ दोन्ही हात जोडून अदबीनं नमस्कार करत विचारलं," सायेब, वळकलं न्हाईत? मी दादू पैलवान!"
मी थक्कच झालो. चेहरा, अदब ओंळख सांगत होती, पण स्मृति दगा द्यायला लागली होती. शेंवटी दादू च म्हणाला,"अवं सायेब, मी दादू पैलवान-मराठा कूटर मदी होतां न्हवं तुमी ?"
एका क्षणांत माझी ट्यूब पेंटली. दादू पहिलवान! हा तर सातार्‍याच्या महाराष्ट्र स्कूटर्स च्या कारखान्यातला कॅंण्टीनवाला दादू !!

१९७५ साली सातार्‍यांत असतांनां तिथं महाराष्ट्र स्कूटर्स चा प्रकल्प आला, तेव्हां मी एस्‌-टी. तली नोकरी सोडून तिथं धरली होती.
माझ्या कारकीर्दीतच तो प्रकल्प आकाराला आला होता. सुरुवातीला तिथं सिव्हिल कंत्राटदाराच्या माणसांची वसाहत आणि आमचं छोटंस ऑफिस एव्हढंच होतं, तेव्हां हा दादू पैलवान एका झोंपडीवजा खोंपटांत त्यांचं कॅण्टीन चालवीत असे. त्या वेळी तरी तो तिथं कामं करणार्‍या सगळ्यांचाच अन्नदाता होता. वडे, भजी, मिसळ पाव तर अप्रतिम करायचा. कूपन पद्धतीवर जेंवणही द्यायचा. फांवल्या वेळेत पैलवानकीही करायचा, तमाशे बघायचा, क्वचित दारूही प्यायचा, पण एकंदर श्रद्धाळू गडी. माणुसकी रांखून वागायचा. एखाद्याला कधी जाम कडकी आली असेल, तर उधारी ठेंवायचा, क्वचित्‌ फुकटही खायला घालायचा.
दादू गप्पिष्ट असल्यानं त्याच्या टपरीमध्येच सगळ्यांचा अड्डा बसायचा. गप्पा-विनोद-खोइया-चेष्टा चालायच्या. दादूही कधीमधी त्यांत सामील व्हायचा, पण साहेब लोकांचा आब राखून. लक्ष्मणरेषा त्यांनं कधीच ओलांडली नाही.

यथावकाश महाराष्ट्र स्कूटर्स चा प्रकल्प पूर्ण झाला. सगळे उदरभरणाच्या शोंधात पांगले. मीही उत्तरकाशी येथे हिन्दुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नवीन प्रकल्पावर रुजूं झालो. महाराष्ट्र स्कूटर्स च्या आंठवणीही कालांतरानं पुसट झाल्या.

हे सगळं एका क्षणांत मेंदूत जिवन्त झालं. दादू एकटक माझ्याकडं पहातच उभा होता. माझ्या डोंळ्यांत स्मृति जिवन्त झाल्याची चमक उमटली असावी. दादूनं माझ्यासमोरचा कप उचलत म्हटलं,"सायेब, उटा जरा, बाकडं धुळपटलंय्‌. साफ करतो." दुसर्‍या क्षणीं डोक्याचं मुण्डासं काढून त्यानं बाकडं साफ केलं, त्यावर मला बसवून समोर उभा रहात आचार्‍याला म्हणाला,"सद्या, कोन आलंय बगटलंस काय? आरं ह्ये आमचं जुनं सायेब. तूं चड्डित मुतत व्हतास, तंवा हेंच्याच आशिर्वादावर जगलो बाबा. सायबांचा च्या गार झालाय्‌. उचल ह्यो."

मग दादूनं माझी आस्थेनं साद्यंत चंवकशी केली. मला गरम गरम मिसळ पाव खायचा आग्रह केला. मी नको म्हटल्यावर विलक्षण खट्टूं होत मला म्हणाला,"सायेब, आतां तुमी मोटी मानसं झालासा. कश्याला दादूच्या हाटिलांत खाल?"

मला त्याचा जिव्हाळा बघून भंरून आलं. मग त्याला मी औरांगाबादहून कोल्हपूरला निघालोय्‌, आणि एस्‌.टी. सुटायला थोंडाच वेळ आहे वगैरे सगळं पुराण सांगितलं. परत येईन तेव्हां त्याची मिसळ खायचं तोंडभर आश्वासन दिलं, तेव्हां कुठं त्याची समजूत पटली.
त्याच्याबरोबरच्या बोलण्यातनं त्याचाही इतिहास समजला. महाराष्ट्र स्कूटर्स नंतर त्यानं अनेक उद्योग केले, पण नंतरच्या मंदीत ते धड चालले नाहीत. मला म्हणाला,"सायेब, तुमच्यासरीक मानसांनीच हात दिला म्हून ह्ये हाटिल हाये. पोरगं शिकावं आसं वाटत हुतं, पन न्हाई शिकलं. योक ल्येक हुती, तिचं लगीन लावून दिलं. बरी हाय्‌. भुईंज ला आसतीं. सकाळच्याला बायकू हाटिल बगती, दोनपारनंतर म्या बसतूं. बरं चाललंय तुमच्या आशिर्वादानं".

दादूनं माझ्यापुढ्यांत गरम चहाचा दुसरा कप भरून ठेंवला. मी चहा चहाचा पहिला घोंट घेतांच चहाची पूड तोंडांत गेली. तोंड कसनुसं झालं.
दादू म्हणाला,"काय झालं सायेब? च्या ब्येस्‌ न्हाई झाला?" मी म्हटलं,"दादू, चहा उत्तम झालाय. अगदी मराठा कूटरची आंठवण झाली बघ. पण चहात पूड आलीय्‌. जरा गाळून दे परत."

दादूनं चमकून आधी पोराकडं, मग गाळणीकडं बघितलं. गाळणीला तळाशी पडलेलं भोंक बघून त्याचे डोंळे तांबारले. पोराकडं बघत तो गरजला,"सद्या भाड्या! आसल्या गाळण्यातला च्या लोकास्नी पाजताय्‌ व्हय? सादा च्या करता यी ना, आनि हाटिल चालिवत्यात बेनी. शिकला आसतास भडव्या चार यत्ता, तर येवडी अक्कल तर आली आसती न्हवं? ठिवा सायेब त्यो कप."

दादूनं त्वरेनं माझ्यासमोरचा कप मोरीत रिकामा केला. खुंटाळ्यावरचा स्वच्छ कांचेचा ग्लास काढला. क्षणार्धांत नेसलेल्या शुभ्र धोंतराचा सोगा सोंडून ग्लासच्या तोंडावर पसरत त्यातनं ग्लासभर चहा गाळला, आणि माझ्यापुढं ठेंवत म्हणाला," वंगाळ झालं सायेब, पोरगं गाडाव्‌ हाय्‌. आतां पिऊन बगा. येक कन्‌ बी भुकटी न्हाय लागनार च्या त." !!!

दादूचं जगावेगळं अगत्य बघून आवाक्‌ होत मी हात  कपाळाला हात,  आणि तो अमृततुल्य चहाचा कप ओंठाला लावला. !!!

आज जेव्हां कधी कुणा दोस्ताचा फोन येतो, की संध्याकाळी बरिस्टा त जमायचंय्‌ ‘, तेव्हां मी सबळ कारणं देत, तो नियोजित अड्डा, कुठल्यातरी अमृततुल्य भुवनावरच भरवायचा आग्रह धरतो.

कारण मला पक्कं ठाऊक असतं, की डॉलरच्या तालावर नाचणार्‍या आजच्या परदेशवेड्या जमान्यात, ’बरिस्टा , शंभर रुपयांची नोट फेंकली, की तथाकथित इन्टरनॅशनल ब्रॅंण्ड ची कॉफी कदाचित्‌ मिळेलही.

पण तिथं डोईच्या मुण्डाश्यानं बाकडं साफ करणार्‍या दादू पहिलवानाचं अगत्य, आणि त्याचा जगावेगळा अमृततुल्य ‘,प्रत्यक्ष शंभर डॉलरची नोट जरी वाजवली, तरी कुठून मिळणार?

                                               
                                                                                                                        ----- रविशंकर.
                                                                                               
*****************************

No comments:

Post a Comment