Search This Blog

Wednesday, 10 August 2016

॥ मिडास आणि पायपर ॥

॥ मिडास आणि पायपर ॥





मिडास आणि पायपर ह्या दोन कथा मी लहानपणीं आं वांसत वडिलांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेल्या...
' कश्यालाही हात लावला की सोनं च सोनं !!... ...
मग काय हव्या तितक्या गोट्या,भोंवरे,विट्या-दाण्डू... ...अन्‌ काय काय आणतां येईल कोंपर्‍यावरच्या पारिसा अण्णा च्या दुकानातनं... ...आणि मग गल्लीतली सगळी पोरं माझ्याभोंवती गोळा होणारच... ...नुस्तं खेंळायचं मग...!!!....काय मज्जा येईल नाही? '
असलं कांहीतरी भन्नाट चक्र डोंक्यात गंरगंरायला लागायचं तेव्हां... ... ...
आणि मोठ्ठा झाल्यावर ' मिडास ' व्हायचं मी अगदी ठंरवूनच टाकलेलं असायचं त्या पोरवयांत.......... 
पुढं तरूणपणीं टिकेकर मास्तरांच्या तोंडून पण अनेक गोष्टी ऐकल्या... ...' मिडास ' ची गोष्ट तर ऐकलीच, नंतर ' पाईड पायपर ' ची पण गोष्ट ऐकली...फक्त श्रवणभक्तिचा कान तात्त्वज्ञानिक होता, एव्हढाच काय तो फरक.
ह्या दोन गोष्टीनीं मात्र मला आयुष्यभर पुरून उरेल इतकं अनमोल तात्त्वज्ञानिक जाणतेपण शिकवलं... ... ...
तथापि हे ' मिडास ' आणि ' पायपर ' मला कधी काळीं प्रत्यक्ष्यांतही बघायला मिळतील, असं मात्र मला कधी स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं. 
त्याचाच हा किस्सा...

दोन हजार बारा सालांतला कडक उन्हाळा सुरूं होता. सहसा आम्ही उन्हाळा संपेतोंवर कुठं परगांवी जात नाही, अगदी अटळ कारण असल्याशिवाय. पण तेव्हां ठाण्याला राहणार्‍या आमच्या बंधूंचा म्हणजे सदयरावांचा, आग्रहाचा दूरध्वनि आला की आठवडाभर रहायला या, आम्ही मोकळेच आहोत म्हणून.
झालं... ...आजो [ म्हणजे मी ] - आज्जी [ म्हणजे आमच्या सौ. इंदिराजी ] मुंबईला निघालेत म्हटल्यावर छोट्या गुण्डाप्पा नं [ हा गुण्डाप्पा म्हणजे आमची चार वर्षांची उपद्व्यापी नात - चि. दीक्षा ] सगळं घर डोक्यावर घेतलं, आणि मग आम्ही बाडबिस्तर्‍याबरोबर हा गुण्डाप्पा पण कांखोटीला मारून ठाणं गांठलं.

पहिले एकदोन दिवस ख्यालीखुशाली विचारण्यात आणि गप्पाटप्पा छाटण्यांत आळसांत गेले, आणि तिसर्‍या दिवशीं हा गुण्डाप्पा कंटाळून घरातल्या बायकांना त्रास द्यायला लागला, म्हणून दुपारीं चार-साडेचार च्या सुमाराला त्याची मस्ती जिरवायला त्याला बोटाला धंरून बाहेर निघालो.
सौ. इंदिराजींनी नेहमीच्याच धोरणीपणानं निघतांना हातात चारदोन पिशव्या अन्‌ वाणीसामानाची एक यादी कोंबलीच...!!! 
वर आणखी ' धांदरटपणा न करतां सगळं सामान नीट बघून अन्‌ मोजून आणा ' असा दम पण भंरला... ...
आतां ह्या मस्तवाल पहिलवानाला बरोबर घेऊन सामान कसं काय आणायचं ?
ही विवंचना सोंडवत मी त्याचं बोंट धंरून घराबाहेर पडलो, अन् शेंजारच्या ' वसंत विहार ' ह्या आलिशान श्रीमन्त सोसायटीच्या फाटकातनं शिरून, तिथल्या प्रशस्त मैदानातनं ' डी मार्ट ' कडं जाणारा जवळचा रस्ता धंरला... ... ...

उन्हाळ्याचे दिवस असल्यानं मैदानात ठिकठिकाणीं लावलेल्या झाडांखाली, सिमेंट च्या बाकड्यावर, आणि हिरवळीवर पन्नाशी-साठी ओलांडलेली माणसं गारवा खात विसांवलेली होती... ...कांही आख्याड्यात रमीचे डाव रंगलेले होते...कुठं राजकारणावर वादावाद्या चाललेल्या होत्या, कुठं कुठं बाकड्यावर आज्ज्यांच्या कानगोष्टी-विणकामं इ. उद्योग चाललेले होते, मधल्या भागांत गुण्डाप्पा च्या वयाच्या पोरांचा टेनिस चा चेंडू घेऊन फुटबॉल चा सामना - [ म्हणजे बॉल कमी फूट ज्यादा ] - ऐन भरात आलेला होता... ... ...
म्हटलं ' डी मार्ट ' मधली गुण्डाप्पा ची मस्ती निस्तरण्याआधी जरा पांच मिनिटं टेंकावं. म्हणून मग एका कोंपर्‍यातलं अर्धं रिकामं दिसलेलं बाकडं हेरलं, अन्‌ त्यावर जरा टेंकलो.
गुण्डाप्पा ची बोंट सोडून इतस्तः हुंदडी सुरूं झाली... ... ...
बाकड्यावर शेंजरीच एक गृहस्थ बसलेले होते...पंच्याहत्तरी ला टेंकलेले असावेत, पण एकटेच बसलेले दिसत होते. आजोबा चांगले सधन कुटुंबातले असावेत, असं एकूण थाटावरनं दिसत होतं... ... ...
बागेत आलेले असले तरी कडक इस्त्रीचा थ्री पीस सूट, व्यवस्थित जामानिमा, चेहरा बघून भांग पाडून घ्यावा इतके चंकचंकीत पॉलिश केलेले बूट , शेंजारी तितकीच चंकचंकीत सागवानी लाकडाची काठी, डोंळ्यावर न्यायाधीचाच्या थाटाचा काळ्याभोर फ्रेमचा चष्मा, चेहर्‍यावर अमाप विद्वत्तेचं तेज... ...बघतांक्षणीं छाप पडेल असं रुबाबदार व्यक्तिमत्त्व... ...पण गंमत म्हणजे चष्म्याआडचे शोंधक डोंळे मात्र ' टाईम्स् ‌' सारख्या भारदस्त वृत्तपत्राऐवजी  चक्क हातांतल्या  ' चांदोबा ' वर केंद्रित झालेले दिसत होते...!!!
मला गम्मत च वाटली आजोबांची...चांगले पंच्याहत्तरीचे असावेत आजोबा...अन्‌ ह्या वयात त्यांना ' चांदोबा ' त  वाचण्यासारखं काय सापडत असावं बरं? बरं नुस्ते वाचताहेत म्हणावं, तर आजोबा चांदोबा वाचण्यांत इतके दंग झालेले होते, की मी शेंजारच्या मोकळ्या जागेवर येऊन बसल्याचंही त्यांना भान नव्हतं...,' आयला, कमालच आहे ह्या आजोबांची... ...'
एकूण ' कलंदर ' वाण असावं, असं माझ्या ध्यानांत आलं.
मी हुंदडणार्‍या गुण्डाप्पा वर लक्ष्य ठेंवून विचार करत होतो, की ' डी मार्ट ' कसं निभवावं?
तेंव्हढ्यात शेंजारी बसलेल्या आजोबांनी च मला हटकलं," एक्स्यूज्‌ मी सर... ..."
मी," येस् सर ?..."
आजोबा," चांगलाच वांड दिसतोय्‌ हा गोटू तुमचा... ..."
मी," अहो कांही विचारूं नकां... ...घाम काढतो हा आमचा सगळ्यांचा दिवसभरात. "
आजोबा, " हरसिद्ध पार्क मध्ये राहतां ना तुम्ही? "
मी," नाही...म्हणजे माझे बंधू राहतात तिथं... ...त्यांच्याकडं आलोय्‌ आठवडाभर..." 
आजोबा," काय नांव तुमच्या बंधूंचं? "
मी," नानिवडेकर. "
आजोबा," आय्‌ सी... ... ...म्हणजे सदयजी नानिवडेकर का?...ए बिल्डिंग मध्ये राहणारे?
मी," होय ... तेच. "
आजोबा," आणि तुम्ही कुठं असतां? "
मी," मी पुण्यात स्थायिक आहे... ..."
आजोबा," सदय जी तुमचे कोण ?"
मी," ते माझे मोठे भाऊ... ..."
आजोबा," असं होय? अरे वा वा वा... ...छान... ...मी मराठे... ...त्या समोरच्या डी इमारतीत राहतो मी." 
आजोबा नी मग माझ्या हातातल्या पिशव्यांकडं बघत विचारलं," कुठं शॉपिंग्‌ ला चाललय्‌ काय? "
मी," होय... ...डी मार्ट मधनं वाणीसामान आणायचं होतं...तिकडं चाललोय्‌... ..."
" आणि हा गोट्या ?", आजोबांनी गुण्डाप्पा कडं बोंट दाखवत विचारलं.
"हा गोट्या नाही...' गोटी ' आहे !! "... ... ...मी गुण्डाप्पा कडं निर्देश करीत गौप्यस्फोट केला,"... ... आमची नात...दीक्षा... ...". 
" ओ.........हो हो हो हो हो... ...", आजोबा सात मजली हंसत म्हणाले," अहो ' गोटी ' कसली ही?... ...चांगला ' गुण्ड ' दिसतोय्‌ हा पहिलवान...!!! तरीच इथं विसांवलात...डी. मार्ट्‌ मध्ये जायच्या आधी... ...!!! काय खरं ना?"
मी," होय... ..."
," मग हा गोट्या बरोबर घेऊन खरेदी कशी काय आटोपणार तुम्ही ? ", आजोबा.
मी," तो च विचार करतोय्‌... ..."
आजोबा," असं करा... ...हा गोटू राहूं द्या माझ्याजवळ...तुम्ही जा...आणि निवांतपणे तुमचं डी मार्ट उरकून या परत... ...तोंवर मी सांभाळतो ह्या ला..."
मी चंमकून आजोबांच्याकडं बघायला लागलो...
नुस्ती तोंडओंळख असतांना हे गृहस्थ ' गोटू ला ठेंवून जा ' म्हणताय्‌त...!! 
मुंबईत कधीही कांहीही घडूं शकतं... ...
इथं मुलं पळवणार्‍या टोळ्या पण असतात असंही वांचलं-ऐकलेलं... ...!!!
मी कंचरायला लागलो," अहो संवय आहे मला त्याची... ...राहूं द्या."
आजोबा," अहो असं काय करताय्‌?...हिला बरोबर घेऊन तुमचा बाजारहाट कसा काय उरकणार सांगा मला?... ...
अगदी खुश्शाल जा सोडून हिला इथं...आरामात या तुमची खरेदी करून, अन्‌ घरीं परत जातांना हा गोटू घेऊन जा तुमचा...काय? मी इथंच आहे अजून तास-दीड तास तरी ... ...मी घेईन तिची काळजी...कसलीही चिंता करूं नकां तुम्ही... ..."
मी," नको नको... ...राहूं द्या...उगीच कश्याला तुम्हांला त्रास? " असं म्हणत मी चि. गुण्डाप्पाला हांका मारल्या. मातीत बरबटलेला गुण्डाप्पा दुडदुडत माझ्याजवळ आला, अन्‌ माझ्या गळ्यात पडला.
," आजो..."
मी," काय रे गुण्ड्या ?"
गुण्डाप्पा," आजो...मला लाल फुगा घेऊन देशील दी माल्त मद्ये? "
आजोबा म्हणाले," बघा...हे असंच असतं सगळं लचाण्ड... ...अहो या जाऊन तुम्ही खुशाल...राहूं द्या तिला इथं माझ्याजवळ....काय?"
मी आतां विचात पडलो...
आजोबा कुणा टोळीवाल्या सारखे दिसत तर नव्हते...पण त्यांचं हे गळ्यात पडणंही मला खटकायला लागलं... ...छे...छे... ...नकोच ते...उगीच कांहीतरी नस्तं लचाण्ड व्हायचं.
मी गुण्डाप्पाचं बोंट धंरत निघायला लागलो, तसे आजोबा म्हणाले." सॉरी हं... ... आतां आलं लक्ष्यांत माझ्या... ...आपला पूर्वपरिचय नाही म्हणून कंचरताय्‌ ना तुम्ही?... ...थांबा जरा एक मिनिट."
इतकं बोलून आजोबांनी त्यांच्या कडक इस्त्रीच्या कोटाच्या खिश्यातनं करकरीत अत्याधुनिक ऍपल स्मार्ट्‌फोन बाहेर काढला, आणि कुठल्यातरी नंबरला फोन लावला," सदयजी... ...गूड्‌ नून...मी मराठे... ...कसं काय चाललंय्‌?... ...अहो कांही नाही विशेष...तुमचे बंधू भेटलेत इथं आमच्या ' वसंत विहार ' च्या बागेत... ...होय होय... ...नात पण बरोबर आहे...अगदी मिठ्ठास गोड आहे हा गोटू तुमचा......... तर काय झालंय्‌ की ते चाललेत डी मार्ट मध्ये सामान खरेदीला... ...तर मी त्यांना म्हटलं की नातीला राहूं द्या माझ्याजवळ, अन्‌ या जाऊन तुम्ही डी मार्ट मध्ये...काय? अहो वेळ जातां जात नाही ना? म्हणून...हो हो... ... तर नवाच परिचय असल्यामुळं जरा कंचरताय्‌त गोटू ला माझ्या ताब्यात द्यायला...आलं लक्ष्यांत?... ...नाही नाही... ...मी घरीच आहे आज... ...आणि हवं तर तासाभरानं गोटू ला तुमच्या घरीसुद्धां पोंचवतो की... ...काय? मग जरा बोलता काय त्यांच्याशी? "
असं म्हणून आजोबांनी मोबाईल माझ्या हातात दिला...," घ्या सर... ...तुमचे बंधू च आहेत फोनवर "
बोलायच्या आधी मी प्रथम मोबाईलवर आलेला नंबर बघितला...!!!... ...हो, उगीच भानगड नको कांही व्हायला.
सदय च होता फोनवर," रवि अरे कांही काळजी करूं नकोस... ...आम्ही ओंळखतो मराठे काकां ना... ...वसन्त विहार मध्येच राहतात ते...त्यांच्याजवळ दीक्षाला सोडायला कांही हरकत नाही...तुला सोयीचं असेल ना, तर तिला घरीं पोंचवायला सांग त्यांना...पोंचवतील ते तिला घरीं... ...अगदी निर्धास्तपणे जा डी मार्ट ला... ...कांही काळजी करूं नको तिची... ...ठीक?...चलो बाय्."
मी मोबाईल आजोबांच्या हातात परत ठेंवत म्हणालो," माफ करा हं... ...म्हणजे............"
आजोबा," अहो साहजिकच आहे हे असं होणं... ...त्याचं काय घेऊन बसताय्‌ एव्हढं........अं? 
चला, या जाऊन निवान्त तुम्ही... ...तोपर्यंत मी ही खेंळतो जरा तुमच्या गुण्डाप्पा बरोबर... ..."
मी मग् गुण्डाप्पा कडं वळलो," गुण्डा... ...मी जाऊन येऊं डी मार्ट्‌ मध्ये?... ...तूं खेळशील ह्या आजोबांच्या बरोबर? येतांना लाल फुगा घेऊन येतो तुझा... ...काय?
गुण्डाप्पा आतां बटाट्याएव्हढे डोळे करून मराठे आजोबांच्याकडं बघायला लागला... ...," तुज्यं नांव काय?"
आजोबा माझ्याकडं बोंट दाखवत म्हणाले," हा ' आजो ' ना तुझा? "
गुण्डाप्पा," हूं........."
आजोबा," आणि मी तुझा ' आज्या ' !!!... ... ...काय?"
मी गडबडलो," अहो...अहो...काय बोलताय्‌ हे?"
आजोबानी खो खो हंसत बॉंब टाकला," अहो बरोबरच आहे ते... ...माझं नांवच ' अजित मराठे ' आहे...!!!... ...म्हणून मी ह्या चा ' आज्या '... !!!!... ... काय?"
मी आतां मात्र आजोबांच्याकडं आं वांसून बघत कपाळाला हात लावला...!!!! 
गुण्डाप्पा आतां खुदुंखुदूं हंसायला लागला," हूं...हूं...हूं...हूं... .... ...तूं मला ब्लू फुगा देशील आज्या?"
आजोबां नी आतां गुण्डाप्पा ला उचलून कांखोटीला मारला," अरे ब्ल्यू च काय गुण्डाप्पा... ...रेड, ग्रीन,यलो,पर्पल, सगळे फुगे आणूं या आपण !!!... ...चला चला..." म्हणत आजोबा मला डोंळ्यानीच ,' या जाऊन...' म्हणून खूण करत निघायला लागले...
अन्‌ मी गुण्डाप्पा ला दंटावलं," गुण्ड्या हे बघ... ...हे खूप मोठ्ठे आजोबा आहेत बरं कां...ताता म्हणायचं त्यांना... ...मी येतो तुझा फुगा घेऊन...तोपर्यंत नीट खेळ... ...काय? रडायचं नाही... ...दंगा करायचा नाही अजिबात... ...काय? आणि हे बघ... ..."
आजोबां मला मध्येच तोंडत म्हणाले," अरे हो...हो...हो...,म्हणजे ज्यासाठी ह्याला मी ठेंवून घेंतोय्‌, तेंच करूं नको म्हणून सांगताय्‌ की ह्याला तुम्ही...!!!... ...ते कांही नाही रे गुण्ड्या... ...खूप खूप खेळायचं आपण...काय?... ...आणि मस्ती पण करायची ... ...चला चला फुगे आणायला... ..."
असं म्हणून गुण्डाप्पा च्ं बोट धंरून ' आज्या ' आजोबा पसार झाले, अन्‌ मी ' डी. मार्ट ' कडं मोर्चा वळवला... ...
मला ह्या ' आजोबां ' ची गम्मत च वाटायला लागली... ...नव्हे, नवल च वाटायला लागलं...
कुठल्या अन्‌ कसल्या मातीनं देवानं घडवलं असेल या माणसाला?
त्यांचं पोरांत पोर होणं, त्यांच्या राहणी-रुबाबाशी सफाचट्‌ विसंगत तर होतंच, शिवाय हातातला तो ' चांदोबा '... ... ...
' डी. मार्ट् ' उरकून परत आल्यावर ह्या ' आजोबां ' ची सविस्तर मुलाखत च घ्यायचं मी ठंरवून टाकलं... ... ...

सौ. इंदिराजी नी दिलेली यादी चांगलीच लांबलचक होती...ती सगळी भंरायला चांगला अर्धा तास गेला, आणि मग नंतर पैसे अदा करायच्या रांगेत अजून पाऊण तास... ...म्हणजे मला डी. मार्ट आटोपून परत फिरायला चांगला सव्वा तास उलटलेला होता...!!
आतांपावेतों गुण्डाप्पा नं आजोबा ना अगदी जेरीला आणलेलं असणार... ...
मी हातांतला सात आठ किलो बोजा सांभाळत दुडक्या चालीनं कसाबसा ' वसंत विहार ' पर्यन्त पोंचलो...
बघतों तर काय..........
मघांचच्या बाकड्यावर फक्त आजोबाच बसलेले दिसले... ...हातातल्या ' चांदोबा ' त डोकं खुपसून... ... ...
आजोबांच्या शेंजारीच बाकड्यावर निरनिराळ्या रंगांचे डझनभर तरी फुगे पडलेले, अन्‌ आईस्क्रीम कोन ची टंरकावलेली चांदी पण पडलेली दिसत होती... ...
सुमारे दीड दोनशे फुटांवर मघांचच्या त्या फुटबॉलपटूं चा खेळ रंगलेला दिसत होता.
अन्‌ आश्चर्य म्हणजे चि. गुण्डाप्पा कांठावर नुस्ता उभा राहून त्या पोरांचा खेंळ बघत होता... !!!
गुण्डाप्पाचं तोंड आईस्क्रीम नं बरबटलेलं, अन्‌ हातांत मनमोहक रंगांचे दोनतीन फुगेही धंरलेले... ... ...
पण आश्चर्य म्हणजे फुगे अन्‌ आईस्क्रीम वर जीव ओंवाळून टांकायच्या वयाच्या त्या पोरांचं त्या कश्याकडंही लक्ष्य नव्हतं... ...!!!

मी हातातलं सामान जमिनीवर ठेंवीत आजोबांच्या शेंजारी टेंकलो...आजोबांचा प्रसन्न चेहरा कसलातरी विरस झाल्यागत म्लान दिसत होता. !! 
आजोबा माझ्याकडं वळत विचारते झाले," काय...झाली कां खरेदी आटोपून मनासारखी?...म्हणजे... ... तुमच्या सौं च्या मनासारखी? "
मी ही थोडी गम्मत करीत आजोबांची फिरकी तांणली," ते आत्तांच कसं काय सांगणार हो?... ..."
आजोबा," म्हणजे? "
मी टांग मारली," म्हणजे त्याचं काय आहे, की घरीं गेल्यावर माझं काय होतंय्‌, त्यावर ते ठंरणार... ...!!! "
आजोबा आतां खो खो हंसायला लागले," होः ... होः ...होः ...होः ...म्हणजे अस्सल भारतीय आहांत तर... ...' इंदिराजी गायब, तो बन्दा नायब ' !!! ...काय? खरं की नाही?... ...द्या टाळी !!! "
आजोबा टाळी द्यायला माझ्याकडं वळले, अन्‌ आत्तां कुठं माझं त्यांच्या उंची सुटाकडं लक्ष्य गेलं..........
गुण्डाप्पा नं त्यांच्या उंची कोटावर चारदोन ठिकाणी आईस्क्रीम चे ठिपके सांडून ठेंवलेले दिसत होते...!!!
मी विलक्षण खजील होत म्हणालो," माफ करा हं...म्हणजे तुम्ही मोठ्या मनानं गुण्डाप्पा ला ठेंवून घेतलात, पण खरं तर मी च त्याला सोडायला नको होतं तुमच्याकडं... ... ...भलताच वाण्ड आहे तो... ...
तुमची हरकत नसेल, तर तो कोट द्या माझ्याकडं, म्हणजे तो साफसूफ करून घेऊन उद्यां सायंकाळपर्यन्त मी पोंचवीन तुमच्याकडं... ... ..."

आजोबां चा आवाज आतां हंळवा झाला," अहो ह्या डागांचं काय घेऊन बसला आहांत?... ...कुठल्याही धुलाई केंद्रात हा कोट दिला, तर तो  एका दिवसांत कुठलाही धोबी अगदी चकाचक्‌ करून देईल ... ... ...होय की नाही? "
मी," अहो म्हणूनच तर मी म्हणतोय्‌... ... ...द्या तो माझ्याकडं उतरवून........."
आजोबांच्या डोंळ्यात आतां दंव जमा झाल्याचा मला भास झाला... ... ...
रुमालानं चष्मा पुसत ते उत्तरले," आतां मला एक सांगा, हे डाग पडेपर्यंत तुमच्या गुण्डाप्पा कडून जे कांही मला मिळालंय्‌ ना, ते कुठल्या ' डी. मार्ट ' नाही तर ' बिग बझार ' मधनं आणू शकतोय्‌ मी पैसे मोजून?... ...की कुठल्या देवाला सांकडं घालून नाहीतर नवस बोलून मिळणाराय् ते ?... ...
खरं सांगायचं तर तुमच्या गुण्डाप्पा बरोबर पहिला अर्धा तास अगदी चंगळच झाली माझी म्हणा ना... ...चांगला खेळला माझ्याबरोबर बेदम मस्ती करत... ...पण मग नंतर त्याला ह्या पुढ्यातल्या फुटबॉलवाल्या मुलांच्यात सामील होऊन हुंदडी घालायची होती... ... ...अहो फुगे अन्‌ आईस्क्रीम त्याला असा कितीसा वेळ बांधून ठेंवणार इथं?... ...असल्या गोष्टीनां ह्या त्याच्या समवयस्क मित्रमैत्रिणींच्या घोळक्याची सर थोडीच येणार आहे?... ... ...तेव्हां तो पळालाय्‌ तिकडं, अन्‌ मी इथं बसलोय्‌ त्याच्यावर पाळत ठेंवून... ... ..."
इतकं बोंलून आजोबा नी परत ' चांदोबा ' त लक्ष्य घातलं.... ... ...

आतां आजोबांची मुलाखत घ्यायला कांही हरकत नव्हती, म्हणून मी सूतोवाचं केलं," सर... ...एक विचारूं तुम्हांला ? "
आजोबां नी हातातला ' चांदोबा ' मिटला, अन्‌ मांडीवर ठेंवत म्हणाले," विचारा की काय विचारायचं आहे ते... ...अगदी बेशक विचारा."
मी," म्हणजे... आपण काय करतां सर?... ...म्हणजे असं बघा... ..."
आजोबा हंसून म्हणाले," समजलं मला... ...मी सेवानिवृत्त झाल्याला चौदा वर्षं होत आली...' एअरोस्पेस् इंजिनियरिंग्‌ ' हे माझं व्यवसायक्षेत्र.
त्या क्षेत्रांत माझी हयातच गेली म्हणा ना."
मी," मूळचे कुठले आपण? "
आजोबा आतां चांगलेच मोकळे झाले, अन्‌ मनःपूर्वक बोलायला लागले... ...
त्यांच्या बोलण्यातनं समजलं की ते मूळचे कोंकणातले...वैभववाडी नांवाच्या अगदी छोट्या गांवांत जन्मलेले.
तिथं प्राथमिक शिक्षण घेऊन मग पुण्याला गेले, आणि मिळतील ती अर्धवेळ कामं करीत, माधुकरी मागून दिवस काढत अभियांत्रिकी ची पदवी प्रथम क्रमांकाच्या मानांकनासह प्राप्त केलेली... ...नंतर मग मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवीही प्रथम मानांकनासह... ...त्यानंतर स्पेन देशातल्या ' एअरोस्पेस् टेक्नॉलॉजी सेंटर ' मध्ये संशोधन करून डॉक्टरेट् प्राप्त केलेली. शेंवटी अमेरिकेत स्थलांतर, आणि तिथल्या नासा या जगद्विख्यात संस्थेमध्ये कांही वर्षं जबाबदार्‍या पेंलून भारतात पुनरागमन आणि शेंवटी इस्रो या आपल्या अवकाश संशोधन संस्थेत उपसंचालक या मानाच्या पदावर वीसएक वर्षं कामही केलेलं... ...
माझा अंदाज अचूक होता तर... ...आजोबांची विद्वत्ता त्यांच्या चेंहर्‍यावरच दिसून येत होती... ...न सांगतांही.
मी," खरं सांगायचं तर तुमचं हे चांदोबा वाचन बघून मला गंमत वाटली... ...अजूनही आपण चांदोबा त रमतां?...नवल आहे."
आजोबा नी आतां चांदोबा मिटून शेंजारी बाकड्यावर ठेंवला, अन् चष्मा खिश्यातल्या रुमालानं पुसत मला म्हणाले," नवल कसलं आलंय्‌ त्यात? अहो, तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगणारं हे एक अद्वितीय मासिक आहे म्हणून ते मला वाचायला आवडतं इतकंच ... ...तुम्हांला आहे तत्त्वज्ञानात रस?"
मी आतां चांगलाच खूष झालो," अहो आहे काय, तत्त्वज्ञान...विशेषतः ' समृद्ध जीवनाचं तत्त्वज्ञान ' हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे... ...वा वा वा... ...अगदी नेमके गांठ पडलात इथं असे अचानक."
आजोबा आतां खुलले... ...," अहो लोकांचा उगीचच एक गैरसमज असतो की तत्त्वज्ञान हा एक अतिक्लिष्ट विषय असून तो समजण्यासाठी भलते जाडजूड ग्रंथ वगैरे वांचावे लागतात... ...खरं की नाही?"
मी," अगदी खरं बोललात आपण... ..."
आजोबा," अहो हा चांदोबा, पञ्चतन्त्र, इसापनीति, तेनालीरामन, अकबर-बिरबल असली पुस्तकं मी आजही वाचतो... ...तत्त्वज्ञान समजण्यासाठी माणूस कुठला ग्रंथ वांचतो, हे महत्त्वाचं नसतं... ...लहान मुलं ही पुस्तकं मुद्रित ओंळीबरहुकूम वांचतात, म्हणून त्यांना त्यातल्या गोष्टी सापडतात, मी ही पुस्तकं मुद्रित ओंळींच्या मधल्या जागेत वांचत असतो, म्हणून तीच पुस्तकं मला तत्त्वज्ञान शिकवतात... ..."
मी," अगदी अचूक बोंललात सर... ...तत्त्वज्ञान समजण्यासाठी वाचनापेक्ष्याही त्यावरचं चिंतन हे निर्णायक महत्त्वाचं........आणि आपली मुलंबाळं वगैरे ?"

आजोबा," दोन मुलगे आहेत मला...उत्तम कर्तृत्त्व गाजवताय्‌त आपापल्या क्षेत्रांत. थोरला रासायनिक अभियन्ता आहे आणि धांकटा शल्यविशारद झालाय्‌. दोघांची शिक्षणं, लग्नकार्यं इथं भारतातच झाली."
मी," अरे वा...म्हणजे बराच मोठा गोतावळा असेल तुमच्या घरीं... ..."
आजोबांचा आवाज किंचित कांतर झाला," नाही... ...दोन्ही मुलं परदेशांत आहेत...मोठा जर्मनी मध्ये असतो, आणि धांकटा अमेरिकेत आहे."
मी," म्हणजे तुम्ही दोघे च असतां इथं मुंबईत... ..."
आजोबा," मी एकटाच असतो इथं... ... ...सौभाग्यवती दोन वर्षापूर्वीच गेल्या............."
आतां मलाच कसंतरी व्हायला लागलं," माफ करा सर... ...मी आपलं सहज म्हणून विचारलं... ..."
आजोबा आतां हंळवे झाले," अहो साहजिकच आहे हे विचारणं...तुमची काय चूक त्यात?... ...तुमच्या बंधूंबरोबर आमचे संबंध घरच्यासारखेंच आहेत...त्यांना माहीत आहे हे सगळं... ...मग तुम्हांला सांगायला कसला संकोच ?... ...मोकळं झालं की जरा बरं वाटतं इतकंच... 
आजोबांची मुलाखत आतां हंळवी झाली... ... ...
," तर झालंय्‌ असं की, मुलं जेव्हां परदेशांत जायला जेव्हां निघाली होती, तेव्हां दोघांनाही मी ' परदेशात काय कमावायला जायचं असतं ते पहिल्यांदा नीटपणे ओंळखा ' असं सांगितलं होतं...
दोन्ही मुलं स्वकर्तृत्त्वावर परदेशांत निघालेली होती, पण सुनांची अवस्था मात्र ' आयतोबा ' सारखी होती... ...
तश्या दोन्ही सुना पण चांगल्या शिकलेल्या संवरलेल्या आहेत, पण असे नवरे वरले एव्हढीच काय ती त्यांची परदेशगमनातली पुण्याई... ...आणि त्याचं अखेरीं व्हायचं तेंच झालं... ...सुनांच्या डोंक्यात परदेश चंढायला वेंळ लागला नाही... ...
मग हळूं हळूं त्यांचं इथल्या गणगोतांबरोबरचं वागणं बोलणं चढेलपणाचं व्हायला लागलं, आणि एक एक करत बहुतेक सगळेच आम्हांला दुरावले... ... ...
आतां माझ्या ह्या अश्या स्वभावानं फरक इतकाच पडलाय्‌ की माझ्यापासून ते सगळे दहा हात अंतरावर राहण्याऐवजी दोन हात अंतरावर राहिलेत... ...पण एकदां जे अंतर पडलं ते कायमचंच.   
दहा एक वर्षापूर्वीं मुलं परत मायदेशांत जाऊं या असं म्हणायला लागलीं तेव्हां दोन्ही सुना कांखा झंटकून मोकळ्या झाल्या... ...
त्यांना मायदेशापेक्षां 'डॉइश् मार्क' अन्‌ 'डॉलर' अधिक जवळचा वाटत असावा... ...
शेंवटी मुलंही हतबल झालीं अन्‌ तिकडंच स्थायिक झालीत... ...
आमची मोठी नात आतां ' जुनिअर ' म्हणजे आपल्याकडच्या दहावी-अकरावी च्या स्तरावर तिकडं शिकते आहे... ...दोन एक वर्षांपूर्वी तिचं ' डेटिंग ' सुरूं झालं, आणि सूनबाईंच्या पायांखालची वाळू सरकली... ...आतां आमची सगळी नातवण्डं परदेशांतच जन्मलेली, अन्‌ वाढलेली... ... ...तिथल्या समाजप्रथांनुसार 'डेटिंग' करण्यांत कांहीच गैर मानलं जात नाही... ... ...पण सूनबाईनां मात्र ते झेपेना... ...
पण कोंकणातलं हापूस आंब्याचं कलम काश्मीर च्या जमिनीत लावायचा अट्टाहास तर त्यांनी स्वतःच मांडलेला... ...आपलेच दांत अन्‌ आपलेच ओंठ... ...सांगणार कुणाला?
मग मुलाच्या आग्रहाखातर राहिलो जाऊन त्याच्याकडं चारसहा महिने, पण परिस्थितीत कांहीच फरक पडला नाही... ...
जन्मापासून परदेशातच राहिलेल्या त्या षोडषी ला पौर्वात्य संस्कृतीचे डोस थोंडेच मानवणार होते?
आमच्या सौभाग्यवती तर सोळा सोमवार, पासून शाकंबरी च्या नवरात्रापर्यन्त सगळे उपासतापास करणार्‍या... ...
त्यांना हा आघात सोंसला नाही...त्यांनी त्यावेळीं जे अंथरूण धंरलं, ते कायमचंच... ...
शेंवटी शेंवटी मानसोपचार तज्ञाच्या देंखरेखीखाली ठेंवावं लागलं त्यांना, अन्‌ त्यातच त्या गेल्या... ... ...
मग मुलगा बराच हट्ट धंरून बसला होता, की तुम्ही आतां इथंच रहा म्हणून... ...
तथापि मी तरी काय करणार होतो मग तिथं राहून?
शेंजारच्या घरांत राहणार्‍याला नुस्तं भेंटूं म्हटलं तरी आधी दूरध्वनि करून त्याची अपॉइंट्मेंट् घ्यायची प्रथा तिकडं...
ना कुणी बोंलायला, ना खेंळायला, ना भांडायला, ना रागवायला, ना मस्ती करायला... ... ...आणि आपल्याकडं इथं तर हे सगळं दुथडी भंरभंरून वाहतं... ...
शेंवटी आलो परत मुलाची समजूत घालून... ...आतां सगळंच मोकळं मोकळं झालेलं आहे... ...
तसं म्हणायला नातवण्डांच्या बरोबर ' व्हीडीओ चॅटिंग ' होतं अधनं मधनं... ...अहो पण त्या एल्. सी. डी. स्क्रीनवर दिसणार्‍या नातवण्डाच्या अंगाखांद्यावर हात थोडाच फिरवतां येतोय्?.... ...ऑं?...की त्यांना आजोबाच्या कुशीत शिरतां येतंय्‌ स्क्रीन भेंदून? 
अधून मधून मुलं नातवण्डं येतात इकडं महिना पंधरा दिवस सुट्या लागल्या की.
पण सुनांना त्यांच्या मुलांनी इथल्या ह्या समोर खेंळणार्‍या मुलांच्यात मिसळलेलं-खेंळलेलं आवडत नाही...' बिलो डिग्निटी ' वाटतं ते त्यांना... ...त्यावरून एकदोन वेळां इथल्या मुलांबरोबर त्यांचे खटकेही उडालेत... ... ...
झालं फक्त एव्हढंच, की ही मुलं आतां माझ्याही जवळ फिरकेनाशी झालीय्‌त... ...
थोंडक्यात सांगायचं तर... ...तर माझा ' मिडास ' झालाय्‌... ..."
मला कांही बोध झाला नाही, " म्हणजे सर? मी नाही समजलो..."
आजोबा," ' मिडास ' चं काय व्हायचं रविशंकरजी?... ...हात लावील त्याचं सोनं...होय की नाही? "
मी," बरोबर "
आजोबांनी मग अखेरचा बॉंब टाकला," माझं तरी काय वेगळं झालंय्?... ...
माझी स्वतःचीच पुंजी मला दोनतीन जन्म पुरून उरेल कदाचित्‌...
भरीला  मुलांनी पाठवलेले ' डॉलर ' अन्‌ ' डॉइश मार्क्स् ' दरमहा खात्यात येऊन पडताय्‌त... ... ...
ते कधी आले न्‌ किती आले हे ही कधी बॅंकेत जाऊन बघितलेलं नाही मी... ...काय करायचं ते बघून?... ...फक्त आयकर खात्याची भर... ...
पण तुमचा हा गुण्डाप्पा, ही समोर खेंळणारी पोरं, अन्‌ दुरावलेले गणगोत ते  ' डॉलर ' अन्‌ ' डॉइश मार्क्स् ' मोजून परत थोडेच मिळवतां येणाराय्‌त? 
आतां समोरच्या ह्या फुटबॉल खेंळणार्‍या घोळक्याकडं बघा जरा... ...तुमचा गुण्डाप्पा ही त्यांच्याच वयाचा आहे ना? "
मी," होय तर..."
आजोबा," पण मग तो असा कांठावरच कां उभा आहे?...त्या फुटबॉल च्या गदाड्यात तो कां नाहीय्‌? "
मी आतां चक्रावलो," खरंच आहे तुम्ही म्हणताय्‌ ते...एक मिनिट थांबा हं ... ...जरा बघून येतो मी काय झालंय्‌ ते ", असं म्हणत त्या पोरांच्या घोंळक्याकडं मी मोर्चा वळवला... ... ...
चि. गुण्डाप्पा रडवेला होऊन नुस्ताच उभा होता... ... ...
त्याला गुदगुल्या करत मी विचारलं," काय रे गुण्ड्या तूं कां जात नाहीस फुटबॉल खेंळायला... ...ऑं? "
गुण्डाप्पा आतां रडायलाच लागला," ती मुलं मला खेंळायला घेत नाहीयेत आजो..."
मी चंरकलो... ...अन्‌ त्या पोरांतल्या दोघांतिघांना हांक मारली.
खेंळ थांबला, अन्‌ ती पोरं माझ्याकडं आली.
मी," काय् मस्त खेंळ चाललाय्‌ रे तुमचा... ... ...ह्या आमच्या गुण्डाप्पा ला पण घ्या की तुमच्या टीममध्ये खेंळायला...काय?... ...एकदम फर्मास फुटबॉल खेंळतो हा... ...बघा तरी खेंळून ह्याच्याबरोबर..."
पोरं जरा बांवचळलीच... ...आणि डोळे मोठ्ठे करून माझ्याकडं आश्चर्यानं बघायला लागलीं.........
मग त्यातल्या चुणचुणीत म्होरक्यानं मला विचारलं," हा गुण्डाप्पा ' तुमचा ' आहे काय काका? "
मी बुचकळ्यात पडलो," ' तुमचा ' आहे काय... ...म्हणजे काय रे बाळा ? "
," म्हणजे ' त्या ' आजोबांच्या घरातला नाही हा ? ", पोरग्या नं दूर बाकड्यावर बसलेल्या मराठे आजोबांच्याकडं बोट दाखवत मला विचारलं.
आतां माझाच त्रिफळा उडाला," अरे नाही रे बाबा... ...हा ' माझा ' आहे...कळलं?
मी पलीकडं डी मार्टमध्ये गेलो होतो ना? म्हणून हा त्या आजोबांच्या बरोबर बसलेला होता इथं... ... ...
आणि हा त्या आजोबांच्या घरातला असला तर काय बिघडतं रे?... ...ऑं?... ...मग?...घेताय्‌ ना ह्याला खेंळायला तुमच्याबरोबर ? "
पोरगं," त्या आजोबांच्या घरातल्या काकू ' डर्टी ' म्हणतात आम्हांला...!! म्हणून आम्ही पण त्यांना खेंळायला घेत नाही आमच्यात... ... "
मी हादरूनच आतां कपाळाला हात लावला !!!... ...
इतका द्वेष या लहान मुलांच्या मनांत? अन्‌ तो ही इतक्या जातिवन्त खिलाडू ' आजोबां ' च्या वाट्याला ?

त्या पोरानं मग मी अधिक कांही विचारायच्या आंतच गुण्डाप्पा चा हात धंरला, " चल खेंळायला... ...येतोस? "
आणि गुण्डाप्पा माझ्याकडं वळून म्हणाला, " आजो... ...ह्याला पण आण ना एक फुगा... ..."
मी " जा तूं ह्याच्याबरोबर गुण्डाप्पा... ...खेळ...मी आलोच तुझ्या मित्रांना पण फुगे घेऊन ... ... काय ? "
गुण्डाप्पाचा हात धंरून ते पोरगं आपल्या घोळक्याकडं पळत सुटलं... ... ...
," अरे ह्या चे काका आपल्याला पण फुगे आणणाराय्‌त...चला...चला "

इतक्यात बागेच्या फटकातनं खरोखरीच हातांत रंगेबेरंगी फुगे अन्‌ पतंगांची चंवड धंरलेला एक फाटकासा दिसणारा खेळणीवाला बागेत शिरला... ... ...
आणि बघतां बघतां पठ्ठ्या पोरासोरांच्या गराड्यात अक्षरशः बुडून दिसेनासा झाला...!!!
मी भराभर चालत मग मराठे आजोबांच्या जवळ परत गेलो... ...
त्यांच्या झालेल्या विरसावर लावायचं रामबाण मलमच माझ्या हातीं असं अचानक पडलेलं होतं... ... ...!!!
आजोबांनी तोंड उघडायच्या आंतच मी त्यांची बखोटी धंरून त्यांना ओंढत म्हणालो," चला चला... ...त्या फुगेवाल्याकडं जाऊन येऊं जरा "
असं म्हणत त्या फुगेवाल्याची गाडी गांठली, अन्‌ थोडीशी घुसाघुशी करून पांचदहा रंगीबेरंगी फुगे, आणि एक पतंगही दोर्‍याच्या रिळासकट खरेदी केला, नी आम्ही परत फिरलो.
अन्‌ काय होतंय्‌ ते कळायच्या आंतच गुण्डाप्पासकट मघांचच्या त्या पोरांच्या टोळधाडीत सापडलो...!!!
" काका मला...आजोबा मला " चा गिल्ला करीत पोरं चक्क आम्हांला झोंबायला लागली...
मग त्यांना हुलकावण्या देत आम्ही हातांतला जामानिमा सांभाळत पळायला लागलो, तशी सगळी पोरंही आमचा पाठलाग करीत पळत सुटली...!!!
पण त्या चपळ पोरांना असे किती वेंळ आम्ही हुलकावण्या देऊं शकणार होतो?
अखेरीस पोराटोरांनी आम्हांला गांठलंच, अन्‌ सगळे फुगे न्‌ पतंग गायब करीत ती पसारही झाली... ...

आम्ही आतां परत मघांचच्याच बाकड्यावर येऊन बसलो, नी आजोबांनी तोंड उघडलं," अनुभवलंत रविशंकरजी काय... ..."
मी आतां आजोबांना मध्येच तोंडत म्हणालो," विसरा ते सर... ...आत्तां मजा आली की नाही... ...चंकवाचंकवी खेंळायला? "
आजोबांचा विरस आतां सफाचट पळाला... ...!!
आणि ते डोंळे मिचकावत मला म्हणाले," परत एकदां जायचं काय फुगे आणायला?... ...हो...हो...हो...हो..."
आतां मी पण हंसायला लागलो, अन्‌ आजोबांनी त्यांच्या तात्त्वज्ञानिक प्रवचानाचं निरूपण करायला सुरुवात केली... ...
," पण अजून एक गम्मत तुमच्या ध्यानांत आलीय्‌ काय रविशंकरजी? "
मी गडबडलो," काय?... ...कसली गम्मत? "
आजोबा हंसले," समोर जे बघताय्‌ त्यातली... ..."
मी," नाही बुवा... ..."
आजोबांनी अचानक विचारलं," तुम्ही ' मिडास ' आणि ' पाईड पायपर ' ह्या गोष्टी केव्हांतरी वांचलेल्या ऐकलेल्या असतीलच.
मी," केव्हांतरी काय सर?... ...अक्षरशः शेकडों वेळा "  
," आतां असं बघा रविशंकरजी... ...", 
आजोबा उजवा तळवा स्वतःच्या छातीवर ठेंवत म्हणाले," ह्या ' मिडास ' ला मघांशी ' पाईड पायपर ' व्हायचे कडक डोंहाळे लागलेले होते !!...
आणि तुम्ही ते यथेच्छ पुरवलेतही... ...होय ना ?... ...त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... ..."
मी," अहो धन्यवाद कसले आलेय्‌त त्यात?... ...आपली मस्ती आणि थोडीशी गम्मत... ..."
आजोबा," आतां त्या फुगेवाल्याकडं बघा जरा निरखून... ...काय चाललंय्‌ त्याचं? "
मी समोर बघितलं.................
समोरच्या फुगेवाल्याची गाडी आतां पार रिकामी झालेली होती...
त्याच्या सभोंवतालची पोरासोरांची झुंबडसुद्धां गायब झालेली होती... ...
आणि त्याचं खुषीत गोळा झालेला गल्ला मोजणं सुरूं होतं... ...एकदां...दोनदां...तीनदां...परत परत... ... ...
आणि प्रत्येक मोजणीबरोबर त्याच्या चेंहर्‍यावरचं हसूं पण आकर्ण रुंदावत चाललेलं होतं...!!
आजोबा मला कोंपरखळी मारत म्हणाले," आलं लक्ष्यांत काय गम्मत झालीय्‌ ती?... ...मी ही प्रथमच बघतोय्‌."
तरीही मला कांही बोध होईना...म्हटलं," गल्ला भरपूर जमलेला असल्यामुळं खुषीत आलाय्‌ बेटा "
आजोबा," हा फुगे-खेळणीवाला आहे ना, तो खरं तर एका परीनं ' पाईड पायपर ' च आहे...
कुठंही गेला की पोरांचा आणि त्यांच्यामागनं थोरांचा थंवा मागे लागतो त्याच्या...खरा भाग्यवान आहे बेटा... ...
फक्त हे भाग्य त्याला स्वतःलाच समजलेलं नाहीय्‌... ... ..."
मी," ते कसं काय? "
आणि आजोबांनी मग मला चितपट धोबीपछाड मारली," त्याला ' मिडास ' व्हायचे किती कडक डोहाळे लागलेत ते बघताय्‌ ना समोर...ऑं? !!!
' मिडास ' आणि ' पाईड पायपर ' ह्या गोष्टी मीही अनेक वेळा वांचलेल्या आहेत तुमच्यासारख्या... ...
माणसाचा ' मिडास ' झाला, की त्याला ' पायपर ' व्हायचे डोहाळे लागतात हे मला चांगलंच उमजलेलं होतं... ...
पण त्याचा एकदां कां ' पायपर ' झाला, की त्या ' पायपर ' ला ही मग ' मिडास ' व्हायचे डोहाळे लागतात हे मात्र माझ्या ध्यानींमनींही नव्हतं...!!!
काय अफलातून गम्मत आहे ना रविशंकरजी? "
असं विचारत आजोबा माझ्याकडं बघून खो खो हंसायला लागले... ... ...!!
आणि त्यांची अचाट मर्मभेदीं तात्त्वज्ञानिक उमज बघून आं वांसत मी च कपाळावर हात मारून घेतला...!!!! 

******************************************************************************
-- रविशंकर.
१० ऑगस्ट २०१६. 



No comments:

Post a Comment