Search This Blog

Sunday, 3 July 2016

॥ पावली चा स्पार्टाकस ॥





," आरं ए जयड्या...," रेवडेकरांचा बाळ्या माझ्याकडं बोंट दाखवत जया लुकतुके ला म्हणाला," तुझ्याकडं पावली आस्ली ज्यास्तीची, तर दे की ह्या रव्या ला...पुढच्या पिक्चर च्या वेळेला ते देतंय्‌ की रं तुला परत... ...काय रे रव्या?"
मी कांही न बोलतां नुस्ती मुण्डी डोलवली... ...!!

एकोणीसशे सहासष्ट सालातली, मे महिन्यातली ती एक कडकडीत दुपार होती... ...
जेवणी-खाणी आटोपून आमच्या कोल्हापुरातल्या सणगर गल्लीतली तमाम घरं दुपारच्या विश्रांतीसाठी आडवी झालेली होती... ...दुपारचे साडेबारा वाजत आलेले होते.. ...म्हणजे सिनेमाच्या तिकिटासाठी रांग लावायला निघायची वेळ भरत आलेली होती... ... ...एकटा मी वगळतां बाकी ताट्यांचा उद्या, मोहित्यांचा किन्या, रेवडेकरांचा बाळ्या, दिवाणांचा पक्या, लुकतुक्यांचे जया, सुव्या, इ. बाकी तमाम पोरांच्या खिश्यांत अधेल्यां [ म्हणजे आठ आणे ] चा खुर्दा खुळखुळत होता. !!
झालं होतं असं, की त्या काळीं कोल्हापुरात उमा नांवाच्या एकमेव चित्रपटगृहांत एकसे एक सवाई असे इंग्रजी चित्रपट पाठोंपाठ झळकत असत...अगदी बंदुकीच्या नळीतनं सुटतलेल्या फैरीसारखे सटासट्‌... ... आणि ते सगळेच आम्हां बालचमू ला बघायचे असत. अगदी घट्ट तुमानी घालून दे दणादण पिस्तुलं झाडत घोड्यावर बसून दौडणार्‍या काऊबॉईज् पासून ते तुफानी युद्धपट, हिच्‌कॉक् चे  चित्तथरारक रहस्यपट, ड्रॅक्युला - फ्रॅंकेन्स्टीन सारखे भयपट, इटस्‌ अ मॅड मॅड वर्ल्ड्‌ सारखे विनोदपट... ...असले काय काय भन्नाट चित्रपट झळकायचे, आणि आम्हांला ते सगळेच बघायला हवे असायचे.
पण मूलभूत सांसारिक गरजांचीच जेमेतेम तोंडमिळवणी होत असणार्‍या त्या जमान्यात असली ' लागला नवा चित्रपट की फेंक पैसे, अन्‌ जा बघायला ' असली आजच्या सारखी चंगळबाजी शक्यही नव्हती, अन्‌ समाजमान्यही नव्हती...किंबहुना सिनेमाचं वेड हे एक प्रकारचं घृणास्पद व्यसन समजलं जायचं त्या काळांत... ...!!

पोराटोरांनी सकाळी साडेपांच वाजतां उठून सात वाजतां शाळेत पळणं...दुपारी चार वाजतां घरीं परतलं की गल्लीतल्या कुणाच्यातरी घरीं तिथल्या आयाबाया जे काय हातांवर ठेवतील ते हादडणं... दुपारी गल्लीत दगड, गोट्या, बटणं, सिगारेट ची रस्त्यात पडलेली रिकामी पाकिटं, चिंचोके, गजगे, सायकलींचे फेकून दिलेले टायर, असल्या बिनपैश्याच्या वस्तूं गोळा करून तर्‍हेतहेचे खेळ जीव जाईस्तोंवर खेळणं, तिन्हीसांजा झाल्या, की आपापल्या घरीं परवचा म्हणणं, आणि शाळेत दिलेले गृहपाठ पुरे करून जेवून झोंपणं, आणि ते नाही झाले, तर दुसर्‍या दिवशी शाळेत पाठी फुटेंतोंवर मास्तरांचा मार खाणं, असा सर्वसाधरणपणे  दिनक्रम असे. वडीलधारी पुरुष माणसं अखंड संसार रेंटण्याच्या उद्योगांमागं, तर बायकामाणसं आलंगेलं, घरंदारं, गुरंढोरं, अन्‌ रांधण्या-वाढण्यांत आकंठ बुडालेल्या. पोरांच्याकडं लक्ष द्यायला वेळ कुणाला होतां?
तेव्हां आम्हां पोरांना वर्षाला दोन सदरे-चड्ड्यां चे जोड, अन्‌ शाळेसाठी लागणारं साहित्य आणून दिलं की सगळं भागलं... ...सिनेमा-नाटकं-हॉटेल-आईस्क्रीम असली चंगळ कुणाच्या खिजगणतीतही नसायची, तर त्यासाठी पैसे कुठून मिळणार? अगदीच हट्ट-रडारड झाली घरांत तर वर्षातनं दोनएक वेळा अधेली [ म्हणजे आठ आणे ] हातावर पडायची...त्यातच मग गोट्या-विट्या पासून ते सिनेमा-आईस्क्रीम पर्यंत सगळे चंगळवाद आम्हांला भागवावे लागायचे.
मग पोरं घरीं वास लागूं न देतां गल्लीतल्या शेजारीपाजारी राहणार्‍या आयाबायांची अडली-नडली कामं - अगदी वाण्याच्या दुकानातनं उदबत्ती आणून देण्यापासून ते गांवभर गुरांच्या मागनं फिरून जमिनी सारवायला शेण गोळा करून आणून देण्यापर्यंत - तत्परतेनं करून द्यायची, आणि त्यांनी खूष होऊन हातावर ठेवलेला लाडू-चकली च तुकडा तोंडात, अन्‌ चवली-पावली [ म्हणजे दोन आणे - चार आणे ] चं नाणं खिश्यांत घालून ,' काकू.... ...आई-आण्णां ना सांगूं नका बरं कां शेण गोळा करायला गेलो होतो म्हणून ' अशी गळ घालून पसार व्हायची.
तात्पर्य हे की तमाम काकूं ना आळीपाळीनं कधी ना कधी असल्या गरजा लागायच्याच...त्यामुळं हे सगळं ' तेरी भी चुप और मेरी भी चूप ' छाप अलिखित साटंलोटं काकू-पोरांच्या त कायमचं चाललेलं असायचं.
ह्या असल्या वरकमाईची भर खिश्यात पडत असल्यामुळंच आम्हां पोरांना सगळेच नाहीत, तरी बरेच चित्रपट बघायला जातां यायचं. प्रसंगीं एखाद्याच्या खिश्यात गल्ला तुटपुंजा असला, तर दुसरी पोरं उधारीत त्याचा भरणा करायची, अन्‌ ऋणको ला पुढच्या सिनेमाला जायची वेळ येईतोंवर ते बिनव्याजीं कर्ज फेडायला लागायचं... ...नाही फेंडतां आलं तर कंपूतनं कायमची हकालपट्टी ठंरलेली असायची. 

तर या वेळीं गोची अशी झालेली होती, की दोन दिवसांपूर्वीच गोट्या खेंळतांना माझा ऐरा [ ऐरा म्हणजे कांचेची मोठी गोटी ] पक्या च्या गोटी चा टोला बसून फुटलेला होता...मग नवीन ऐरा आणायला खिश्यात शिल्लक असलेले चार आणे खर्च झालेले होते... ... आणि माझ्या खिश्यात खडखडाट झालेला होता.!!
भंरीला माझं बालदुर्दैव असं, की त्याच संध्याकाळी उमा चित्रपटगृहावरचा फलक बदलला, अन्‌ पिळदार शरीरयष्टीच्या कर्क डग्लस्‌ ची भूमिका असलेल्या स्पार्टाकस् चा फलक लागला...!!!
सगळी पोरं मग संध्याकाळीं कोपर्‍यावरच्या सायकलींच्या दुकानाच्या फळकुटावर जमली, तिथं दुसर्‍या दिवशीं, म्हणजे आज दुपारी तीनच्या खेळाला जायचं नक्की झालं... ...अन्‌ मी रडवेला झालो... ...!!
' सगळे ' शिनिमा ' बघायला जाणार आणि आपला मात्र चुकणार ', या एकाच चिंतेनं मला घेरलं... ...त्यांच्यात सामील व्हायचं असेल, तर कसंही करून अधेली [ म्हणजे आठ आणे  ]  जमा करावी लागणार हे मला कळून चुकलं...!!!

घरातनं दमडी देखील मिळणार नाही हे मला पक्कं माहीत होतं...
मग दुसर्‍या दिवशी रविवार असून देखील मी सकाळीच लौकर आवरून घराबाहेर पडलो...रस्त्यात चरत फिरणारी एक म्हैस हेरली, अन्‌ तिच्या मागोमाग दीडदोन तास पायपीट करत फिरलो. अखेर नशीब उजाडलं एकदाचं, अन्‌ म्हैसबाई नी शेण टाकलं. तत्क्षणीं ते गोळा करून मी आमची सणगर गल्ली गांठली, अन्‌ घरोंघरीं [ आमचं वगळून !! ] च्या काकूं ना विचारत फिरायला लागलो, ' शेण हवंय्‌ का? ' म्हणून. 
तथापि गुढी पाडवा तोंडावर आलेला असल्यामुळं बहुतेक बायां नी घरं केव्हांच सारवून टाकलेली होती... ...!!
आतां काय करायचं?
पण माझं नशीब जोरावर असावं त्या दिवशीं... ...दिवाणांच्या माई माजघरातली जमीन सारवतांना दिसल्या, अन्‌ मी सरसावलो... ...
माई," काय रे गुलामा... ...काय हवंय्‌? "
मी," माई... ...माई...."
माई," अरे माई माई काय लावलंय्‌स?... ...काय झालंय्‌ ...ऑं?... ...धडपडलाय्‌स की काय कुठं?"
मी," नाही माई... ...शेण हवंय्‌ काय?"
माई," लबाडा... ...तुला कसं कळलं रे मला शेण हवंय्‌ म्हणून?... ...आणलंय्‌स काय गोळा करून?... ...ठेव तिथं त्या हार्‍यात." [ हारा म्हणजे टोपली ].
मी शेणाच्या बुट्टी त तो लगदा टाकला, अन्‌ हात धुवून उभा राहिलो.
माई नी हात धुवून मग माझ्या हातावर बेसनाचा लाडू ठेवला, अन्‌ म्हणाल्या," झालं आतां... ...खूष?"
मी लाडू खात म्हणालो," माई... ...माझा ऐरा फुटलाय्‌ खेळतांना... ..."
माईं चे डोळे बारीक झाले," तरीच... ... म्हणून शेण गोळा करून आणलंस होय?... ...लब्बाड कुठला..."
असं म्हणत माई नीं त्यांचा डबा उघडून पावली माझ्या हातावर ठेवली, अन्‌ तंबी भरीत म्हणाल्या," गोटी फुटली म्हणून असं शेण गोळा करत फिरायचं नसतं गांवभर ... ...काय? लोकांना कळलं ना, तर शेण घालतील तुझ्या आईबापांच्या तोंडांत... ..."
मी पावली खिश्यात टाकत विचारलं," माई... ...खरंच तोंडात शेण घालतात काय लोक?... ...ईईईई....घाण."
माई तंडकल्या," पळ मेल्या आतां, नाहीतर सुधाताई [ माझी आई ] ना सांगीन बघ नांव तुझं "
मी पार्श्वभागीं पाय लावून पळत सुटलो...!!!
' चला... ...पावली तर गोळा झाली, आतां अजून एक पावली मिळाली, की झालं काम.'

पण गोची अशी झाली होती, की एव्हढीशी कमाई होईतोंवर जेवायची वेंळ झाली...सगळी पोरं आपापल्या घरांकडं सुटली, अन्‌ जेवणं उरकून वडीलधारी माणसं आडवी झाल्यावर इथं हारुगल्यांच्या सायकलींच्या दुकानाच्या फळकुटावर जमलेली होती...
आणि माझा एकट्याचाच असा ' पावली चा बल्ल्या ' झालेला होता... ... !!! 

बाळ्या च्या प्रस्तावावर जया नं चड्डी च्या दोन्ही खिश्यांत हात कोंबून ते उलटे केले...
आणि तळवे बाळ्यासमोर पसरत म्हणाला," फकस्त गिन्नी च हाय माज्याकडं...मी न्हाय्‌ द्येनार... ... " [ गिन्नी म्हणजे एक आणा ]
पक्या," आरं ह्ये रव्या द्येतंया न्हवं तुला परत म्होरच्या येळंला?... ...मंग आन ती गिन्नी हिकडं "
तशी बाळ्या नं चपळाई नं गिन्नी परत खिश्यात कोंबली," आरं वा व्वा रं बेन्या... ...आनि म्या काय खाऊ मदल्या इंटरवल ला?... ...ऑं?"
जया चा मुद्दा बिनतोड होता... ... ...!!
आतां सगळ्यानीच काखा वर केल्या," ह्ये बग रव्या, आतां धा मिण्टांत कसं बी करूनश्यान्‌ पावली गोळा कर... ...न्हायतर तूं बस हितंच आन्‌ वाजीव टाळ्या... ...आमी निगालो बग आतां शिनिमाला... ..." 

मी सगळ्यांच्या तोंडाकडं नुस्ता बघत बसलो... ...
घसा दाटायला लागला, अन्‌ डोंळ्यात पाणी पण गोळा व्हायला लागलं... ... ...
झा s s s s s s s s लं... ...संपलं सगळं आतां... ... ...
कुठून आणायची पावली दहापांच मिनिटांत?

पण त्या जगद्धात्री [ माझं आराध्य दैवत...कोल्हापूरची महालक्ष्मी ] च्या कानांवर माझा मूक आक्रोश पडला असावा कदाचित्‌... ... ...
एक मध्यमवयीन - म्हणजे आमच्या काकांच्या [ माझे वडील ] वयाचे, धोतर-कोट टोपी अश्या पेहरावातले - गृहस्थ इकडं तिकडं शोधक नजरेनं बघत बघत समोरच्या चौकात अवतरले, अन्‌ आमच्या सणगर गल्लीकडं वळले... ...
आम्हां पोरांना बघून त्यांनी मला हांक मारली," ए गोट्या... ...असा इकडं ये बघूं जरा..."
मी रडवेल्या चेहर्‍यानं पुढं गेलो," काय काका? "
काका चिंतातुर नजरेनं मला न्याहाळत म्हणाले," अरे काय झालंय्‌ तुला?... ...कां रडतोय्‌स?... ...ऑं?"
मी कांहीच न बोलतां उभा राहिलो.
काका," अरे ' काका नानिवडेकर ' ह्या च गल्लीत राहतात ना रे?... ...मला जरा घर दाखवतोस काय त्यांचं? " [ काका नानिवडेकर म्हणजे माझे वडील ]
माझा चेहरा तत्क्षणीं उजळला," हो हो दाखवतो की...मला माहीत आहे ते... ...पण पावली देणार काय मला? " !!!
ते काका मोठे मजेशीर असावेत...माझ्याकडं बघत त्यांनी कपाळाला हात लावला...!!! अन् म्हणाले," अरे लबाडा... ...खाऊ हंवाय्‌ ना?...काय?... ...ही घे पावली... ... ...चल दाखव आतां मला त्यांचं घर."
असं म्हणत त्यांनी चार आण्याचं चकचकीत नवंकोरं नाणं माझ्या हातावर ठेंवलं... ...!!
' पावली च्या स्पार्टाकस्‌ ' तिढा तत्क्षणीं सुटला... ... ...!!!
मी बोक्याच्या चपळाई नं ती पावली खिश्यात कोंबली...!!
त्या काकां चं बोंट धंरून मग मी आमच्या घरापासून कसाबसा दोनशे फूट अंतरापर्यंत आलो...
आणि आमच्याच घराच्या दरवाज्याकडं बोंट दाखवत," ते...ते बघा घर " म्हणत काकांचं बोंट सोडून उमा चित्रपटगृहाकडं धूम ठोंकली...!!!

पहिलाच खेंळ असल्यामुळं चित्रपटाला तुफान गर्दी उसळलेली होती...
पण किन्या मोहिते आणि पक्या दिवाण ह्या कंपूतल्या ' रड्या एक्स्पर्टस् ‌' नी डोंळ्यांना कोपरं लावत नेहमीचं रड्याचं नाटक झक्क वठवलं...
मग रांगेत उभ्या असलेल्या एकदोन धटिंगण पहिलवानांना पाझर फुटला," आरं जाऊं द्या रं फुडं ह्येनला... ...बारकी पोरं हायेत म्हनून ढकालताय्‌सा व्हंय्‌ भाईर?... ...ओ पैलवान... ...व्हा जरा बाजूला आन्‌ जाऊं द्या फुडं ह्या पोराटोरांन्‌ला... ...हंs s s s s s गाश्शी... ...जावा रं फुडं पोरानों... ...वो मामा...जरा ह्या पोरान्‌ला टिकिटं त्येवडी काडूनश्यान्‌ द्या बगूं... ..."
अश्या तर्‍हेनं आमच्या कंपूची वर्णी पहिल्या दहापांच नंबरांत लागली, अन्‌ तिकिटं हातांत पडतांक्षणीं चित्रपटगृहांत पोबारा करीत आम्ही चांगल्या मनाजोग्या - म्हणजे जिथं बसून पुढच्या रांगेत एखादा भव्य पटकेवाला पहिलवान जरी येऊन बसला, तरी पडदा नीट दिसेल - अश्या खुर्च्या पटकावल्या, मग दहा एक मिनिटांत अंधार होऊन न्यूज रील संपलं अन्‌ चित्रपट सुरूं झाला... ... ...
अवघ्या रोमन साम्राज्याला एकहाती आव्हान देऊन त्याचा सोळा वेळा पराभव करणार्‍या जिगरबाज स्पार्टाकस् ला पडद्यावर बघणं हाच एक थरारक अनुभव होता. चित्रपटातली गाजलेली ' स्पार्टाकस् - इडिपस् ' ची जीवघेणी लढत सुद्धां श्वास रोंखून बघितली... ...
आणि सकाळपासून गोळा केलेल्या शेणाच्या लगद्याचं सार्थक झालं. !!!

मध्यंतर व्हायला आलं, अन्‌ बाळ्या बाहेरच्या खाऊ गाड्यांवर गर्दी उसळण्याआधीच खाऊ घेण्यासाठी आम्हांला चिमटे घेत पैसे गोळा करून पसार झाला...
जिभेवर तिथल्या प्रसिद्ध राजू भेळवाल्याची भेळ अन्‌ शेवगाठ्यांची चंव तंरळायला लागली... ... ...
तेव्हढ्यात बाळ्या हातांत बांधलेले कागदी पुडे सांभाळत परत आत आला...
पडद्याकडं पांठमोरा होऊन सरकत सरकत माझ्या शेजारच्या खुर्चीकडं आला... ...
अन्‌ काय होतंय् ते कळायच्या आंत माझी मुण्डी पकडून मला दोन रांगांमधल्या मोकळ्या जागेत खाली दडपून माझ्याकडं डोंळे फाडफाडून बघायला लागला," रव्या...पळ राण्डंच्या झंटक्यात शाळेकडं... ...न्हाईतर मार खातंय्‌स बग आतां... पळ पळ... ...!!!"
मी बांवचळलो," मी काय केलंय्‌ रे बाळ्या?... ...ऑं? "
बाळ्या माज्या कानांत फेंफरं आल्यागत किंचाळला," बेन्या...आरं तुज्या म्होरच्या खुर्च्यावर त्ये दुपारचे पावलीवाले काका बसल्यात तुमच्या काकांच्या संगट... ... ...!!
पळ...!! पळ भोसडीच्च्या बुंगाट आतां, न्हायतर काकांच्या लाता खातंय्‌स बग आतां हितंच थेटरात... ... ...!!!! "
असं म्हणत बाळ्यानं मला बाजूच्या खुर्च्यावर बसलेल्या लोकांच्या पायावरनं रांगत दरवाज्याकडं ढंकलून दिला...!!!
तसा मी कपाळावर हात मारून घेत, लोकांचे शिव्याशाप खात कसाबसा दरवाजा गांठला... ... ...
अन्‌ खत्रूड नशिबाला लाखोली वाहत, पार्श्वभागीं टांचा बडवत जिवाच्या आकांतानं शाळेकडं धूम ठोंकली... ...!!!!

सिनेमा संपल्यावर बाकीचे सगळे शाळेत जमा झाले...
रात्र पडायला आलेली होती, अन्‌ प्रत्येकाला परवचेची वेळ व्हायच्या आंत घरीं हजर व्हावं लागणार होतं... ...
मला तर स्वतःच्या घरीं परतायचीच भीति वाटून पोटांत गोळा आलेला होता, अन्‌ कापरं पण भरायला लागलेलं होतं... ...!!!
मग किन्या-पक्या-बाळ्या नीं त्या सभेतच सगळ्यांना दम भंरून बजावलं, की माझ्या घरच्यानीं जरी खोदून खोदून विचारलं तरी रव्या आपल्या बरोबर होतं, असं कुणीही सांगायचं नाही... ...अगदी मार खायची वेळ आली तरी.
शाळेतली आणीबणीची सभा बरखास्त झाली, अन्‌ सगळे आपपल्या घरांकडं पळाले.
सुदैवानं माझ्यावर एव्हढीच खैर केलेली होती, की ह्या काकां च्या जोडगोळीनं मला - म्हणजे आमच्यातल्या कुणालाच - चित्रपटगृहात बघितलेलं नव्हतंच. बहुधा ते दोघे अंधार होऊन चित्रपट सुरूं झाल्यावर काळोखांत आंत येऊन बसलेले असावेत...त्यामुळं गडबडीत त्यांचं लक्ष्य आमच्याकडं गेलेलंच नव्हतं.
पुढच्या आठवड्यात घरांतले सगळेच स्पार्टाकस् बघायला निघाले, आणि तेव्हां माझा चुकलेला उत्तरार्ध बघून पुरा झाला.
त्या जगद्धात्रीनं माझी काळजी यथेच्छ वाहिली खरी... ...पण अश्या जगावेगळ्या तर्‍हेनं...!!

पुढं कमावता झाल्यावर अनेक उत्तमोत्तम चित्रपट सौ. इंदिराजीं [ हे माझ्या बायको चं टोपण नांव ] सह आवर्जून बघितले...त्यांनाही चित्रपट बघायची जात्याच आवड असल्यानं तीही हौस पुरी झाली.
यथावकाश सहस्रक ओलांडल्यावर सिने प्रक्षेपक [ प्रोजेक्टर्स् ] आणि लेखणी आयुधांचा [ पेन ड्राईव्हज्‌ ] जमाना आला, आणि मग घरी एक प्रक्षेपकच विकत घेऊन त्याची प्रतिष्ठापना केली, अन्‌ लहानपणी उमा चित्रपटगृहात बघितलेले बहुतेक सगळेच चित्रपट संग्रहित करून घरच्यांसह अगदी पोंटभर बघितले... ...
पण लहानपणीची ' ती ' मजा कांही केल्या परत येईना...!!!

एकदां असेच रात्रीं जेवणखाण आंवरून आम्ही स्पार्टाकस् बघत घरीं बसलेलो होतो...
चित्रपट तोच...रंगकर्मीही तेच जगप्रसिद्ध... ...कथानक पण तेंच थरारक... ... ...
पण कांही केल्या ' त्या ' स्पार्टाकस् ची गंमत कांही अनुभवाला येईना... ...!!
शेंवटी सौ. इंदिराजींना मी प्रस्तुत कथा पण सांगितली, अन्‌ म्हणालो," हे असं कां होतंय्‌?... ...' तसली ' मजा आतां कां येत नाहीय्‌? "
सौ. इंदिराजी मखखपणे म्हणाल्या," आतां कशी परत येईल ती? "
मी," कां बरं?... ...असं कां होतंय्‌ आतां ?"
सौ. इंदिराजी," अहो ते तसंच असतं सगळं...
खरी गोष्ट अशी आहे, की त्यावेळी वाटणारी मजा ही ' स्पार्टाकस् ' मध्ये सामावलेली नव्हतीच मुळी...मग आतां परत कशी येईल ती?"
मी बांवचळलो," स्पार्टकस्‌ मध्ये सामावलेली नव्हती? मग कश्यात सामावलेली होती ती मजा?"
सौ. इंदिराजी," अहो त्यावेळी वाटणारी मजा ही तुटपुंज्या साधनसामुग्रीसह प्रतिकूल परिस्थिती बरोबर  झगडत जगण्यात सामावलेली होती...!!
असं बघा...त्यावेळी हा स्पार्टकस्‌ बघण्यासाठी कसं जिवाचं रान केलंत की नाही तुम्ही...अगदी शेण गोळा करून विकण्यापर्यंत?
आतां स्पार्टाकस् बघण्यासाठी तुम्हांला कसले काय कष्ट पडताय्‌त? अन्‌ कसलं डोंबलाचं जिवाचं रान करायला लागतंय्‌ सांगा मला?... ...नुस्तं बटण दाबलंत की हवा तेव्हां हवा तिथं स्पार्टकस् सेवेला हजर होतोय्‍... ...होय की नाही?"
मी," खरं आहे ते. "
सौ. इंदिराजी मग समारोप करीत म्हणल्या," नेमकं हे असं झाल्यामुळंच तुमच्या डोंक्यातली ' ती ' मजा कायमची गायब झालेली आहे...!!!
कारण स्पार्टाकस् बघण्यासाठी ते जिवाचं रान करणंच आतां संपलेलं आहे... ...!!!
आणि जगण्यातली खरोखरीची अस्सल मजा ही मुळात कश्यासाठीतरी जिवाचं रान करण्यांतच सामावलेली असते...!!!
म्हणूनच विनाकष्ट उपलब्धि चं जगणं ज्याक्षणीं सुरूं होतं ना, त्याक्षणींच हे जिवाचं रान करणं संपलेलं असतं...!! अन्‌ पाठोपाठ त्यात सामावलेली मजा पण कापरासारखी उडून गायब होत असते...!!!! ... ...कळलं आतां नीट? "  

इतकं बोलून सौ. इंदिराजी चेहर्‍यावरची सुरकुती देखील न ढंळवतां मख्खपणे आमच्या शयनकक्षाकडं चालत्या झाल्या... ... ...!!!
अन्‌ मी कपाळाला हात लावून त्यांची विधानं तत्त्वज्ञानावर घांसून बघत रात्रभर जागत बसलो. !!!!

तेव्हां वाचकहो, आतां ' तो ' स्पार्टाकस् परत दाखवायची हमी जर कोण देत असेल, तर तो बघण्यासाठी काय वाट्टेल ते करायची आपली आज तयारी आहे... ...अगदी रस्त्यात पडलेलं शेण गोळा करून विकायची सुद्धां... ...!!!
अडचण फक्त एव्हढीच आहे, की ते गोळा केलेलं शेण ठेंवून घेऊन हातावर चकचकीत पावलीचं नाणं ठेंवणार्‍या माई दिवाण नाहीतर ताई लुकतुके आतां कुठून आणायच्या? 

********************************************************************************
-- रविशंकर.
२ जुलै २०१६. 

No comments:

Post a Comment