॥ कृत्तिकात्मक गुण्डाप्पा ॥
पहाटे पहाटे साखरझोपेत असतानांच दूरध्वनीची घण्टा खणखणली, आणि मोठ्या प्रयासानं उठून चुरचुरणारे डोळे चोळत मी दूरध्वनीयंत्राचा श्रावक उचलून कानाला लावला.
अपरात्री तीन साडेतीन वाजतांच सौ. इंदिराजी ( आमच्या सौ. सुमीता ) ना रत्ना इस्पितळात पोंचवून घरीं परतून जेमतेम दोनएक तासच जरा डोळा लागला होता. चि. सौ. स्निग्धा ( आमची ज्येष्ठ कन्या ) ला गरोदरपणीचे दिवस भरल्यामुळं अपरात्रीच वेणा सुरूं झालेल्या होत्या, अन् सासरच्यांनी तिला रत्ना मध्ये प्रसूतीसाठी दाखल केलेलं होतं. लेकीचं बाळंतपण कसं काय पार पडतंय् ही चिंता मनाच्या गाभार्यात कुठंतरी खोलवर दडलेली असल्यानं गाढ अशी झोंप कांही लागलेली नव्हती... ...
पलिकडून श्रावकातनं सौ. इंदिराजींचा दमदार आवाज कानांवर आदळला," अहो... ... जागे झालाय् ना नीट?...मी बोलतेय्... ...ताई ला मुलगी झाली...प्रसूति नैसर्गिकपणेच पार पडली... ... पहाटे पांच वाजून सत्तावन्न मिनिटांची जन्मवेळ आहे ... ... लिहून घेलतलीत ना नीट?... ... हं...बाळ बाळंतीण सुखरूप आहेत... ... ... पोरगी म्हणजे गब्बू झालाय् चांगला... ... साडेआठ पौण्ड वजन भरलं.!! आतां अंघोळ झाली की लगेच पत्रिका करायला घ्या... ... ताई च्या सासूबाई नां जन्मनक्षत्र हवं आहे बाळीचं... ... काय? "
मी च सुटकेचा श्वास सोडला, आणि बेहद्द खूष होऊन श्रावक जाग्यावर ठेवला.
चि. सौ. स्निग्धाच्या बाबतीत मी जरा ज्यास्तच हळवा आहे असं सौ. इंदिराजीं चं कायमचं ठाम मत... ... असो बापडं, पण खरं म्हणजे मला मुलांच्यापेक्षा मुलीच ज्यास्त आवडतात... ...हळव्या आणि प्रेमळ असतात म्हणून. तात्पर्य, नात अवतरली म्हणून मी च बाकी सगळ्यांच्या पेक्षा दहापट खूष झालो. !!
गुरुवारचा दिवस होता...तारीख ८ जुलै २०१०... ... कृष्ण एकादशी चा जन्म... ...योग उत्तम दिसत होता. शिवाय सौ. इंदिराजींनी फतवा काढलेलाच होता. सकाळचे आठ वाजत आलेले होते. त्यामुळं मी त्वरेनं तोंड वगैरे धुवून चांगला कडक चहा करून घेतला. वर्तमानपत्र वाचायचं काम दुपारीवर ढकललं, आणि पटापट अंघोळ करून नाष्टा उरकून ’बाळी’ ची पत्रिका करायला घेतली.
ज्योतिषाचा माझा व्यासंग साधारण पंचवीस एक वर्षांचा असल्यामुळं भराभर गणिती आकडेमोडी होत पत्रिका कागदावर साकारायला लागली. मी लेखणी खाली ठेंवेतोंवर अकरा वाजायला आले होते. काम संपवून मी सकाळचा दुसरा चहा उकळून गाळून घेतला आणि भरलेला कप समोर ठेवून ’बाळी’ ची पत्रिका नीट बघायला समोर ओंढली... ... जसजसा एकेक ग्रहयोग बघत गेलो तसतसे डोळे विस्फारायला लागले, आणि शेवटी मी च स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!
पुढच्या पिढीतला पहिला ’कृत्तिका नक्षत्रात्मक’ गडी नेमका सूर्योदयाच्या क्षणालाच उपजलेला होता. !!!
कृत्तिका नक्षत्राचे गुण पुरेपूर दृग्गोचर व्हायला आणखी काय हवं होतं?
संपूर्ण राशीचक्रात मिथुन रास आणि कृत्तिका नक्षत्राचे आमच्या कुटुंबाशी बहुधा पिढ्या न् पिढ्यांचे ऋणानुबंध असावेत कदाचित. आधीच्या पिढीत अकराजणांपैकी सहा जण आणि आमच्या सध्याच्या सहा जणांच्या कुटुंबापैकी चौघेजण ह्या मिथुन-कृत्तिके च्या दुक्कलीवर जन्मलेले आहेत. ( पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात असल्या कौटुंबिक साधर्म्य दर्शविणार्या विलक्षण योगांना साधर्म्ययोग अथवा Synastry असं म्हणतात. ) ते कमी पडले म्हणून की काय, तिसर्या पिढीतला हा पहिला फलंदाज पण ह्याच योगावर जन्मला होता. !!
अवघ्या नक्षत्रचक्रात हे रजोगुणी राजसिक नक्षत्र तापटपणा साठी नावाजलेलं आहे. तथापि ह्या तापटपणाला निष्कपटीपणाचं अन् जिवापाड प्रेमाचं अभेद्य कवचही लाभलेलं असतं, हे बहुतेक जणांना ज्ञात नसेल.
आक्रस्तळेपणा बरोबरच न्यायनिष्ठुरता, सत्यनिष्ठा, अर्धांगनिष्ठा, आणि प्रखर स्वत्त्व, हे गुणही ह्याच नक्षत्रात ओतप्रोत भरलेले आहेत. जीव ओवाळून टाकणं कश्याशी खातात, ते ह्या कृत्तिकावतारांकडून शिकावं.
नवर्याच्या रथाच्या निखळायला आलेल्या चाकाला क्षणार्धात हाताचा आंस घालून त्याचा जीव वाचवायचा भीमपराक्रम केवळ कृत्तिकात्मक कैकेयीनंच करावा. व्यवहारचतुर कौसल्या-सुमित्रांत ती धडाडी नी धमक नसते.
’पटलं तर पाऊस पाडतील, अन् खटकलं तर उभं गाडतील’ ही म्हण यच्चयावत कृत्तिकात्मकांना चपखलपणे लागूं पडते.
संतापी सत्यभामा आणि सद्धर्मनिष्ठ आभाळमयी गांधारी ह्या महानायिका पण ह्याच कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या.
गम्मत म्हणजे करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी हे माझं आराध्यदैवत पण ’कृत्तिकात्मक’ च आहे हे विशेष.
एकूण काय, तर पुढच्या पिढीची सुरुवात पण कृत्तिकेच्या षट्कारानं झालेली होती.!!
मी सौ. इंदिराजीनां दूरध्वनी करून हे सगळं सांगितलं, आणि नव्या कृत्तिकामयी ला भेंटायला जायच्या तयारीला लागलो.
लेकीच्या सासरकडच्यानीं मुहूर्त बघून नातीची शांत करून घेतली, आणि बारसं करून तिचं आद्यनाम दीक्षा असं ठेवलं.
सौ. त्यावेळी म्हणाल्या," पांच नावं ठेवायची असतात... ... तुमच्या मनांत काय आहे?"
मी उत्तरलो," ही सूर्योदयाला जन्मलेली असल्यानं उदिता असं एक नाव ठेवूं या, पण हा गडी तडाखेबंद होणार हे नक्की... ...
म्हणून मी आपला त्याला ’गुण्डाप्पा’ असं संबोधणार आहे.!!
सगळे खो खो हंसायला लागले, अन् सौ. इंदिराजीनीं स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!
’दीक्षा’ या शब्दाचा कोषातला अर्थ असा आहे...
॥ दिव्यंज्ञानंयतोदद्यात्कुर्यात्पापस्यसंक्षयम् तस्माद्दीक्षेति सा प्रोक्ता...इति ॥
अर्थ: जी दिव्य ज्ञान प्राप्त करून देते आणि पापसंहार करते अशी सात्त्विक जीवनप्रणाली म्हणजे दीक्षा.
त्यातलं दिव्यज्ञान वगैरे गुण्डाप्पा च्या बाबतीत लांबच राहिलं.
प्रत्यक्ष्यात गुण्डाप्पा दुदूबत्ता पिऊन दिसामासीं वाढायला लागला...
अन् ’दीक्षा’ नावाऐवजी ’गुण्डाप्पा’ हेच नाव सार्थ करायला लागला.!!
पांचव्या महिन्यातच पालथा होऊन सातव्या महिन्यात बसायला-रांगायला लागला... ...
नवव्या-दहाव्या महिन्यातच पावलं टाकायला लागला, अन् मिथुन राशीचे गुण दाखवत घरभर नाना उचापतीही करायला लागला... ... ...
कृत्तिका नक्षत्राशी इमान राखत वस्तूंची फेकाफेकी-आदळआपट पण सुरूं झाली... ...
अन् लेकीच्या घरातल्या जमिनीवरच्या कपाटांतलं सगळं सामान बघतां बघतां माळ्यावर स्थलांतरित झालं. !!!
अकराव्या महिन्यात माझ्या माण्डीवर बसून गुण्डाप्पा मलाच संगणक शिकवायला लागला... ...(ह्या प्रसंगाचंच छायाचित्र कथेच्या प्रारंभी चिकटवलेलं आहे.)
’आजोबा’ ला सुटसुटीत करून मला ’आजो’ म्हणून हांका मारायला लागला... ...
अफाट कल्पक चाळे अन् दंगामस्ती करायला लागला.
आपल्याला कुणी हंसतंय अथवा आपली टिंगल करतंय असा नुस्ता संशय आला तरी त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायला लागली... ... ...
एकदां असंच कांहीतरी झालं, अन् आई हंसल्याचं निमित्त झालं.
प्रत्यक्ष्यात आई दुसर्याच संदर्भात हंसली होती, पण गुण्डाप्पानं नुस्त्या संशयानंच हातातला आईचा ’सामसुंग गॅलॅक्सी’ गोफण मारल्यागत भिरकावला.
भिंतीवर आदळून त्या वीस पंचवीस हजारांच्या स्मार्टफोन चा असा कांही चेंदामेंदा झाला, की दुरुस्तीवाल्यानं सांगितलं ’ह्याच्या दुरुस्तीचा खर्च करण्यापेक्षां नवीनच स्मार्टफोन घ्या, तेच स्वस्त पडेल.’ !!!
हळूंहळूं हा गुण्डाप्पा, लेकीला एकटीला कांही आवरेना, म्हणून मग त्याच्यावर जागता पहारा ठेवण्यासाठी सौ. इंदिराजी आणि लेकीच्या सासूबाई आळीपाळीनं लेकीकडं मुक्काम ठोकायला लागल्या.
सौ. इंदिराजी लेकीकडं मुक्कामाला गेल्या की मी घरीं एकटाच उरे, अन् कधीकधी जाम कंटाळा येई.
मग शनिवार रविवार गाठून सौ. इंदिराजी असतांना मग मीही गुण्डाप्पाबरोबर खेळायला लेकीकडं जायला लागलो.
गुण्डाप्पा अडीच वर्षांचा असतांना एका शनिवारी असाच दुपारी तीनच्या सुमाराला लेकीकडं गेलो.
गाडी खाली वाहनतळावर लावतोय् न लावतोय् तोंच पांचव्या मजल्यावरील लेकीच्या घरातनं गुण्डाप्पाचं काळी तीन पट्टीतलं रडं कानांवर आदळलं.
गुण्डाप्पा अगदी पोंटतिडिकेनं खच्चून रडत होता... ... ...!!
झालं...उद्वाहनाची वाट न बघतां मी दडदडत दहा जिने चढून पांचव्या मजल्यावरच्या लेकीच्या घरांत धापा टाकत दाखल झालो...
पाहतो तर काय,
दरवाज्यांत सोसायटीचा रखवालदार अवघडून उभा, अन् सौ. इंदिराजीं चा चेहरा चिंताग्रस्त.
चार मोठ्या माणसांशी टक्कर देत जमिनीत घट्ट पाय रोंवून चि. गुण्डाप्पा ताठ मानेनं लढत देत उभा होता.
बिचार्याजवळ फक्त रुदनास्त्रच तेव्हढं काय ते होतं. पण त्याचा पुरेपूर वापर करत त्याचं रडं काळी तीन पट्टीत पोंचलेलं होतं... ...
त्याची आई संतापानं लालेलाल होत गरजली," चूप... ...आवाज बंद आधी !... ...नाहीतर आतां रट्टे बसतील...समजलं?... ...तोंड बंद.!! "
आणि प्रत्युत्तरादाखल चि. गुण्डाप्पाची रड्याची सम क्षणार्धांत काळी पांच पट्टीत गेली. !!!
प्रसंग बांका होता... ...मी क्षणाचाही वेळ न दवडतां गुण्डाप्पाचा ताबा घेत म्हणालो," अगं काय झालंय काय इतकं गुण्डाप्पावर बरसायला... ...ऑ?"
लेक उसळली," तुम्ही उगीच तिची बाजूं घेऊन मध्ये पडूं नकां बाबा... ...फार शेफारलीय् ती हल्ली... ...वांडपणा अतिच झालाय तिचा... ...
कुठं किती लक्ष्य ठेवणार हिच्यावर?... ...सकाळपासून हेच सुरूं आहे आज... ...हट्ट नी रडं... ...चांगली हाणली पाहिजे धरून."
मी," अगं पण काय केलं काय हिनं ते तर सांगशील? की तुम्ही सगळेच पोरकट झालाय् कचां कचां ओरडायला?"
लेकही कृत्तिकात्मका...," काय झालं ते आईलाच विचारा... ... " म्हणत दुपारच्या सुट्टीत घरीं जेवायला आलेली लेक न जेवतां तशीच बाडबिस्तरा आवरून तंणतंणत ऑफिसला परत निघून गेली... ... ...
गुण्डाप्पा आ परजून उभाच होता... ... ...!!!
त्याला मी उचलला, आणि माझ्या सदर्याच्या खिश्यावर ’जादू करून बघ’ म्हणून सांगितलं, तसं त्याचं रडं जरा निवळलं.
मग ," अल्लामंतर कोलामंतर छू " करून त्यानं माझ्या सदर्याच्या खिश्यात हात घातला...
अन् हाताला जिवापाड प्रिय असलेली हापूस आंब्याची वडी लागतांच त्याचा चेहरा नुस्ता फुलून आला... ...रडं एकदाचं थांबलं.
अन् दोन्ही गोबर्या गालांना मोहक खळ्या पाडत तो असा कांही मिठ्ठास हंसला की ज्याचं नाव ते.
त्यानं बेहद्द खूष होऊन गळामिठी घालत माझा गोड पापाही घेतला.
मग मी विचारता झालो," काय झालं रे गुण्डा...कां रडत होतास तूं ?... ...आई नं मारलं तुला?... ...ऑं?"
गुण्डाप्पा," नाही आजो... ... माल्लं नाही... ...सगळे हंसले आणि रागावले मला... ... ..."
अच्छा... ... ...म्हणजे सगळा मामला मारझोडीचा नसून मानापनाचा होता तर.
आतां मी सौ. इंदिराजींकडं मोर्चा वळवला," काय झालं काय असं, म्हणून गुण्डाप्पा इतका पोटतिडिकेनं रडत होता?"
आणि मग सौ. इंदिराजी आणि दारात उभा असलेला रखवालदार यांनी जे कांही रामायण सांगितलं, ते ऐकून मला घेरी यायचीच काय ती बाकी राहिली.!!!
चि. गुण्डाप्पाबरोबर सकाळपासून पिदडून दुपारी जेंवणंखाणं झाल्यावर सौ. इंदिराजी जरा आडव्या झाल्या होत्या, अन् चि. गुण्डाप्पा शेजारीच खेळत होता.
त्यानं मुख्याध्यापिका होऊन खेळण्यातल्या सगळ्या बाहुल्या-पशुपक्ष्यांची शाळा भरवलेली होती.
थंकल्यामुळं असेल कदाचित, पण सौ. इंदिराजीं ना आपला कधी डोळा लागला ते समजलंच नाही... ...
अचानक मध्येच कश्यानंतरी जाग्या झाल्या, अन् बघतात तर काय,
दुपारचे पावणेतीन होत आलेले...
गुण्डाप्पाच्या खेळण्यांची शाळा इतस्ततः पसरलेली... ...
गच्चीचं अन् घराचं दार, दोन्ही सताड उघडी... ... ...
अन् चि. गुण्डाप्पा गायब...!!
झालं...सौ. इंदिराजींच्या काळजाचा ठोकाच चुकला... ...झालं काय नातीचं?
घरभर शोधून झालं...अगदी पलंग अन् चौपायांखाली पण डोकावून झालं... ...गुण्डाप्पा घरात नव्हता.!!
लेक अन् जावई ऑफिसात गेलेले... ... घरीं दुसरं कुणीच नाही... ...
पांचव्या मजल्यावरच्या सगळ्या घरांच्या घण्ट्या वाजवून शेजार्यापाजार्यांकडंही शोध घेऊन झाला... ...कुणालाच कांही माहीत नव्हतं.
अन् गुण्डाप्पाचाही कुठं पत्ता नव्हता...!!!
आतां मात्र सौ. इंदिराजी नां ब्रह्माण्ड आठवलं, अन् त्यांच्यावर रडकुण्डीला यायची वेळ ओढवली...
अखेर मनाचा हिय्या करून लेकीला दूरध्वनी करायला त्यांनी यंत्राचा श्रावक उचलला न उचलला, तोंच घराची घण्टी खणखणली... ... ...
बाहेर येऊन पाहतात तर सोसायटीचा रखवालदार चि. गुण्डाप्पाची बखोटी धरून दरवाज्यात उभा.!!
चि. गुण्डाप्पाच्या कांखोटीत बद्दू ( त्याचा बाहुला ) होता, आणि चेहर्यावर तोच प्रसन्न निरागसपणा... ... ...
झालं होतं असं की सौ. इंदिराजींचा डोळा लागल्यावर ह्या गुण्डाप्पानं पायात चपला सरकवून बद्दू ला कांखोटीला मारला...
आणि घराच्या दरवाज्याची सरकवायची कडी चंवड्यावर उंच उभा होत सरकवून काढली... ...
आणि केवळ अडीच वर्षाचं ते पोर तब्बल पांच मजले - म्हणजे दहा जिने - उतरून तळमजल्यावरच्या वाहनतळावर गेलं होतं... ...!!!
अन् तिथं खुर्चीत बसून पेंगणार्या रखवालदाराला हलवून जागा करून सांगत होतं की ’हा बद्दू माझं ऐकत नाही...मस्ती करतो...याला कोंडून ठेव.’ !!!!
इतकं महाभारत झाल्यावर मग सौ. इंदिराजी मला म्हणाल्या," अहो काय करायचं आतां हिच्यापुढं?... ...नशीब आपलं, कुठं रहदारीच्या रस्त्याबिस्त्यावर नाही गेली हे बाहुलं कांखोटीला मारून... ... ...कसं सांभाळायचं हे पोर सांगा मला?...ताई उगीच नाही संतापली... ...चांगला खुराक द्यायला हवा होता.!!!"
मी म्हटलं," हे बघा, मला कांही हे रामायण आवडलेलं नाही... ...मुळात गुण्डाप्पाला तरी कुठं कळत होतं आपण काय करतोय् ते... ...ऑं?
तुमचा डोळा चुकून लागला हे मान्य, पण गुण्डा चा त्यात काय दोष? त्यानं मस्ती केल्यावर तुम्ही मोठी माणसं जे करतां, नेमकं तेच त्यानं केलं ना बद्दू च्या बाबतीत? पोरं अनुकरणातनंच सगळं शिकत असतात... ...समजलात? वर आणखी सगळा उद्वेग तुम्ही दोघीनी त्याच्यावरच काढलात होय?... ...मग संतापणारच तो...लक्ष्यात ठेवा, जातिवन्त कृत्तिका नक्षत्र आहे हे... ...तेव्हां आपण स्वतःच ज्यास्त सावध आणि दक्ष राहणं हे श्रेयस्कर... ... ...समजलं? तुम्ही पडा जरा स्वस्थ...मी चहा करतो आतां... ...तो घेऊं या म्हणजे जरा तरतरी येईल... ...मग मी च खेळतो गुण्डाप्पाबरोबर तासभर तरी... ...ठीक?"
इतकं व्याख्यान झोडून मी महाभारताचं युद्धपर्व समाप्त केलं.
मग मी अन् गुण्डाप्पा नं मिळून फर्मास चहा तयार केला. तो त्यानं आज्जी ला मोठ्या प्रेमानं नेऊन दिला न् सांगितलं की ’मी केलाय्’ म्हणून.!!
चहा झाल्यावर मग मी जरा वर्तमानपत्रात डोकावलो... ...चि. गुण्डाप्पाची सामानात कांहीबाही खुडबूड चालूं होती... ...
थोड्या वेळानं अचानक तो पुढ्यात येऊन उभा राहिला.
कांखोटीला एक जमिनीपर्यंत लोळणारी भरलेली पिशवी, हातात पर्स, अन् झक्पक् तयार झालेला गुण्डाप्पा अगदी छाकटा दिसत होता. !!
गुण्डाप्पा," आजो... ...ए आजो..."
मी," काय रे गुण्डा?"
गुण्डाप्पा," आजो..........आपण बेंगलोरला जायचं.?"
चि. गुण्डाप्पा खुषीत आलेला दिसत होता... ...त्याच्या सुपीक टाळक्यात कांहीतरी शिजतंय् एव्हढं मला समजलं.
आणि मी पतंगाचा मांजा सोडायला सुरुवात केली... ...
मी," बेंगलोरला जायच? ते कश्याला रे?"
गुण्डाप्पा," चित्ती चं लग्न आहे म्हणून..." ( तामिळ मध्ये मावशी ला चित्ती म्हणतात )
मी," असं होय?... ...कुठल्या चित्ती चं लग्न आहे रे?"
गुण्डाप्पा," माहीत नाही आजो... ...पण कुठल्यातरी चित्ती चं लग्न आहे... ... आपण जायचं बेंगलोरला?"
मी," जाऊं या की... ...पण कोणकोण जायचं ?"
गुण्डाप्पा," तूं आणि मी."
मी," अरे वा... जाऊं या की... ...पण कसं जायचं रे गुण्डाप्पा?"
," अरे आजो...", गुण्डाप्पा कपाळाला हात लावत म्हणाला," एरोप्लेन नं जायचं... ...ही बघ मी तिकिटं पण काढलीय्त... ..."
असं म्हणत चि. गुण्डाप्पा नं हातातल्या पर्समध्ये खुडबुडून रंगीबेरंगी कागदाचे कापलेले दोन चौकोनी तुकडे मला दाखवले. !!!
मी त्याची कल्पकता अन् उचापती बाण्याची दाद देत विचारलं," आणि बाकीचे रे गुण्डाप्पा?... ...आई-अप्पा... ...पाटी-ताता...आज्जी...हे सगळे कसे येणार?"
गुण्डाप्पा," ते मला रागावतात, म्हणून ट्रेन नं येणार... ...आपण दोघंच एरोप्लेन नं जायचं...!!!"
गुण्डाप्पाची उट्टं काढायची कल्पनाही और होती.
मी," आणि कधी जायचं आपण बेंगलोरला?... ...सामान भरायला हवं ना बॅगेत?... ... कपडे, खाऊ, तुझी खेळणी... ...सगळं घ्यायला हवं ना बरोबर?"
गुण्डाप्पा नं मला कांहीच समजत नसल्यासारखा कपाळाला हात लावला," आजो, मी सामान भरलंय् सगळं...हे बघ."
असं म्हणून त्यानं बखोटीला लोंबकळणार्या पिशवीकडं बोट दाखवलं. !!!
मी थक्क होत विचारलं," मग कधी जायचं रे आपण गुण्डाप्पा?"
गुण्डाप्पा नं खांद्याच्या पिशवीत शोधाशोध करून एक चष्म्याची लांबट डबी काढून मोबाईल सारखी कानाला लावली, तीत कांहीतरी बोलला, अन् मला म्हणाला," लगेच जायचं आजो... ...टॅक्सी येतीय् दहा मिनिटांत... ...चल."
मी," गुण्डा, अरे बेंगलोरला जायला पैसे हवेत ना आपल्याजवळ?"
चि. गुण्डाप्पा नं हंळूच त्याची पर्स उघडली... ... ...
आणि तिच्या आडव्या कप्प्यात खुपसून ठेवलेली व्यापारातल्या नोटांची चळत बाहेर काढून दाखवत माझा सफाचट त्रिफळा उडवला. !!!
आणि सौ. इंदिराजी आमच्याकडं पाठ फिरवून कपाळाला हात लावून हंसायला लागल्या...
त्यांनाही खेळातली गम्मत आतां जाणवली, आणि त्या हातातलं काम बाजूला सारून दिवाणावर विराजमान झाल्या... ... आमची हवाई सफर बघायला.
झालं... ...गुण्डाप्पा ची टॅक्सी बरोबर सहा वाजतां हजर झाली... ...
दिवाणखान्यात पसरलेल्या जमिनिवरच्या बैठकीतली गादी म्हणजे गुण्डाप्पाचा विमानतळ होता... ...
आणि शेजारची गादीच्या खुर्च्यांची जोडी म्हणजे विमानातल्या ’सीट’ होत्या.
सौ. इंदिराजी नां ’बाय्-बाय्’ करून आम्ही निघालो... ... ...
चि. गुण्डाप्पा नं स्वतः टॅक्सी चालवत आजो ला विमानतळावर नेलं... ...
सामानाचं ’चेक् इन्’ करून झोंपायच्या खोलीतल्या आरश्यासमोर आजो ला उभा करून त्याचा ’सेक्युरिटी चेक’ ही पार पाडला... ... ...
आणि पंधराएक मिनिटांनी उड्डाणाचा पुकारा झाल्यावर मी आणि गुण्डाप्पा विमानात जाऊन बसलो.
गुण्डाप्पा नं माझ्या कानांत सांगितलं," आजो... ...विमानात गडबड करायची नाही... ...अगदी हळूं बोलायचं... ...!!"
मी," कां रे गुण्डाप्पा?"
गुण्डाप्पा," विमानात गडबड केली ना आजो, तर विमानकाका येतो, आणि खिडकीतनं बाहेर फेंकून देतो आपल्याला...!!!"
मी," असं होय?... ...मग काय करायचं रे?"
गुण्डाप्पा," चूप बसायचं, नाही तर जो-जो करायची... ...बेंगलोर यायला ’नाईण्टी नाईन अवर्स’ लागतात. !!!"
मी," मग मी जाऊं जो-जो करायला?"
गुण्डाप्पा," जा...तिथं गादीवर जो-जो कर आजो."
मी," बेंगलोर आलं की उठवशील ना मला गुण्डा?"
गुण्डाप्पा," हो... ...मी नाही जो-जो करणार कांही... ... ...तूं करायची आजो."
चि. गुण्डाप्पाच्या आज्ञेबरहुकूम मी समोरच्या गादीवर जाऊन आडवा पडलो.
," आजो.. ए ... आजो"
मी," काय रे गुण्डाप्पा?"
," हे बघ... विमान ना... ...आधी हळूं पळतं... ...मग मोठ्ठ्यांदा पळतं... ...नंतर उडतं... ...घाबरायचं नाही... ...तूं जो-जो कर.", इतकं बजावून चि. गुण्डाप्पा टेंचात खुर्चीच्या पाठीवर रेंलून बसला. !!
आणि... ...गादीवर उताणा पडून मी डोळे मिटले... ... ...
तो दिवस डोळा लागायच्या मुहूर्ताचाच दिवस होता की काय कोण जाणे.
कारण थोड्या वेळानं दिवसभरच्या थंकव्यामुळं खरोखरच माझा डोळा लागला... ...
आजूबाजूच्या गलक्यानं जाग येऊन बघतो तों सायंकाळचे साडेसात वाजत आलेले होते...!!!
लेक-जावई पण ऑफिस संपवून घरीं परतलेले होते, आणि सोफ्यावर सौ. इंदिराजीबरोबर चहा घेत दूरदर्शन बघत बसलेले होते.
आमचा विमानप्रवास अजून सुरूंच असावा... ... ...
कारण चि. गुण्डाप्पा माझ्या शेंजारीच गादीवर बसलेला होता... ...आजो वर जागता पहारा करीत.
मला गम्मतच वाटली," गुण्डाप्पा... ...बेंगलोर आलं?"
गुण्डाप्पा," नाही आजो ... ...अजून खूप वेळ आहे..."
तेव्हढ्यात कन्येचं लक्ष्य चि. गुण्डाप्पा कडं गेलं, अन् परत तेंच सुरूं," आई...अगं हिला स्वेटर घातला नाहीस काय?...थंडी किती वाजतेय् बघ तरी."
सौ. इंदिराजी," अगं मघाशीच तर घातला होता... ... ती बाबांच्या बरोबर खेळत होती तेव्हां..."
लेकीचं लक्ष्य आतां कुठं माझ्याकडं गेलं... ... ...
चि. गुण्डाप्पा नं चेन उघडून अंगातला स्वेटर काढलेला होता, आणि तो स्वेटर आतां माझ्या छातीवर लोळत पडलेला होता... ... ...
लेक," दीक्षा s s s s s s s ....आज्जी नं स्वेटर घातला होता ना अंगात?... ...कां काढून टाकलास मग?"
चि. गुण्डाप्पा नुस्ताच आईकडं बघत बसला.............
तशी लेक तडकली," किती वेळां सांगायचं तुला अंगातला स्वेटर काढायचा नाही म्हणून?...आधीच सर्दी-खोकला झालाय् तरी... ... ..."
झा ssssssss लं... ...मला खात्रीच वाटायला लागली की मघाचचं युद्धपर्व आतां परत सुरूं होणार.!!
मी तत्क्षणीं सौ. इंदिराजीना नजरेनंच खूण केली अन् त्या सूत्रं हातांत घेत लेकीला म्हणाल्या," अगं काढला असेल पोरानं खेळतांना... काय त्याचं एव्हढं घेऊन बसलीय्स?"
मग चि. गुण्डाप्पा ला त्यांनी उचलून घेत विचारलं," दिकुली...स्वेटर घातला होता ना तुला मी... ...बेंगलोरला जाताना?... ...मग कां काढून टाकलास?"
गुण्डाप्पा," विमान उंच उंच गेलं ना.............."
सौ. इंदिराजी," बरं........मग?"
गुण्डाप्पा," तिथं पुष्कळ थंडी होती......."
सौ. इंदिराजी," अगं हो s s s s s s s....मग स्वेटर कां काढून टाकलास अंगातला?... ... खूप थंडी होती ना विमानात?"
," आजो ला किनई, जो-जो करायची होती ना विमानात?... ... आजो ला थंडी वाजेल म्हणून त्याला घातला मी... ..."
इतकं बोलून, हातातल्या पेल्यातलं दूधही न सांडतां धड पितां न येणार्या वयाचं ते पोर आज्जीकडं निरागस डोळ्यानीं बघायला लागलं...!!
सौ. इंदिराजीही त्याच्याकडं आ वांसून बघायला लागल्या... ...अन् बघतच बसल्या... ...!!!
अन् त्याला हिटलरी शिस्त लावायला निघालेल्या आमच्या लेकीनंच स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
लेकीकडं बघत मग मी विचारलं," बघितलंस.....?
कृत्तिका नक्षत्र हे असंच असतं... ...त्याचा तापटपणा फक्त दिसतो जगाला... ... ... पण हे रूप किती जणांना दिसतं?
दुपारी तुम्ही जो पाहिलात ना, तो शुद्ध कृत्तिकेचा अवतार होता.. ... ... तर आत्तां जो बघताय् तो विशुद्ध कृत्तिकेचा अवतार आहे... ...
तुम्हांला सांगितलं नव्हतं मी की ’पटलं तर पाऊस पाडतील, नी खटकलं तर उभं गाडतील’ म्हणून?... ...ते हे असं असतं........आतां समजलं?
तुमच्या पिढीतल्या सगळ्याच जोडप्यांना आपलं पोर जगावेगळं व्हायला हवं असतं... ...
पण पाळण्यात दिसणारे त्याचे जगावेगळे पाय सांभाळायची त्यातल्या किती आई-बापांची तयारी असते सांग मला?"
एव्हढं सांगून मी आज्जीच्या कडेवरच्या गुण्डाप्पाला उचलून कांखोटीला मारला... ... ...
अन् त्याची उरलीसुरली रग जिरवायला घराबाहेर पडलो.!!!
********************************************************************************************
-- रविशंकर.
१ जानेवारी २०१५.
No comments:
Post a Comment