Search This Blog

Monday, 30 June 2014

॥ टिनपाट ॥

॥ टिनपाट ॥




" नानिवडेकर साहेब, अगदी मनापासून अभिनंदन... !!", माझे लंगोटियार श्री. प्रदीप देवधर केशरी पेढा तोंडात टाकत म्हणाले.
ती २०१२ सालातल्या ऑगस्ट महिन्याची एकोणीस तारीख होती... ...’रॉयल एन्फील्ड’ च्या शो रूम मध्ये माझे लंगोटियार ’बुलेटतज्ञ’ श्री. प्रदीप देवधर, मी स्वतः,  नवीन गाड्या बघायला आलेली चारदोन गिर्‍हाइकं, आणि आमच्या सौ. इंदिराजी,  इतकेजण माझ्या नवीन ’बुलेट्‌ इलेक्ट्रा’ भोंवती गोळा झालेलो होतो... 
सौ. चं खरं नांव सुमीता... ...त्यांच्या ’पोलादी व्यक्तिमत्त्वा’ मुळं मी आपलं त्यांना ’इंदिराजी’ म्हणतो. !!!
ह्या आमच्या सौ. इंदिराजी म्हणजे अस्सल सणसणीत हैद्राबादी कारभार... ... ... आतनं बाहेरनं पक्क्या कामाठी...
घरांत मटण बिर्याणी शिजवायला घातली, की आख्ख्या गल्लीभर लवंगा-वेलदोडे घातलेल्या मसाल्याचा वास घंमघंमलाच पाहिजे. 
करणं-संवरणं बेदम... बोलणं बेदम... खाणंपिणं बेदम...कुवत बेदम... ... आणि त्यांचे रट्टेही बेदम... माझ्यासकट पोरंही उगाच नाही सुतासारखी सरळ झाली.!!!
त्यांनी पुण्यातल्या मंगळवार इस्पितळात जन्मतानांच करून ठेंवलेला साडेदहा पौंड वजनाचा विक्रम आजतागायत गेली त्रेसष्ट वर्षं अबाधित आहे. !!
सौ. इंदिरजींनी त्यांच्या मातोश्रीनां गरोदरपणातले शेंवटचे दोनएक महिने खाटेलाच खिळवून ठेंवलेलं होतं... ...
मी त्यांना खोंचकपणे म्हणतोही की," ’वेटलिफ़्टिंग’ सारख्या ’पोटलिफ़्टिंग’ च्या ऑलिंपिक स्पर्धा भरत असत्या, तर तुमच्या मातोश्रीनीं तहहयात जगज्जेतीपद भूषवलं असतं.!!! "  

श्री. देवधरांनी दुचाकीची पूजा करून हार घातला... ... नारळ फोडला...आणि मी जमलेल्यानां पेढे वाटायला सुरुवात केली...
तेव्हढ्यात शोरूम चे मालक श्री. संतोष ढोणे स्वतःच ’सगळं ठाकठीक झालंय्‌ ना’, हे बघायला हजर झाले, आणि मी त्यांच्यापुढं पेढ्यांचं खोकं धंरलं," घ्या संतोषजी."
संतोष," नमस्कार देवधरसाहेब... ... अलभ्य लाभच म्हणायचा... ... अं?... ...काय आम्हाला चोरून गाडी घेतलीत वाटतं?... ... अगदी थांगपत्ताही लागूं दिला नाहीत तो?"
"नाही रे बाबा...माझी नाही... ...’ह्यां’ च्या गाडीची पूजा करायचा हुकूम सुटला म्हणून आलो.", देवधर माझ्याकडं बोट दाखवत म्हणाले.
संतोष ढोणे नं तोंडात दोन पेढ्यांचा तोंबरा भरत मला आपादमस्तक न्याहाळलं... ... ...," अभिनंदन साहेब... ... ... ही तुमची गाडी?... ... मुलासाठी घेतली वाटतं?"
मी," मुलासाठी नाही हो... ... मलाच वापरायचीय्‌."
संतोष," तुम्ही वापरणार ही गाडी साहेब... ... ऑं?... ...विश्वास नाही बसत आपला... ... चेष्टा करताय होय माझी? "
मी गप्पच... ...
संतोष,"साहेब एक विचारूं काय,... ...हरकत नसेल तर?"
मी," हो... ...खुशाल विचारा की..." 
संतोष," साहेब राग मानूं नकां... ...पण वय काय तुमचं?... ... म्हणजे सेवानिवृत्त तर झाला असालच ना?... ... ...आतां ’ह्या’ वयात ’बुलेट’?"
मी," चौसष्ट." 
देवधर," अरे बाबा, ’बुलेट प्रेमा’ शी वयाचा काय संबंध? ही ’ह्या’ ची तिसरी ’बुलेट्‌’आहे... ... गेली वीसएक वर्ष हे ’बुलेट्‌’ च वापरताय्‌त... ... 
एकजात सगळ्या गाड्यांच्या पुढं मी च तर नारळ फोडलेत की !! ...
हे बघ... ... ... भारतीय बनावटीच्या यच्चयावत दुचाक्यात ही एकच दुचाकी अक्षरशः वेड लावणारी आहे... ... खरं की नाही?
ह्या दुचाकीची एकदां कां संवय लागली रे लागली, की चारचाकी पण तीपुढं नकोशी वाटायला लागते... ...काय?"
मी," प्रदीप, ह्याचा अनुभव मात्र मी जेव्हां ’इण्डिका’ खरेदी केली ना, तेव्हां घेतला बघ... ... ...’इण्डिका’ पोरांनी च बहुतांशी वापरली... ... मी आपला ’बुलेट’ वरच.!!
देवधर,"पटली खात्री संतोष आतां?... ... ...नानिवडेकर साहेबांची ’बुलेटनिष्ठा’ वादातीत आहे म्हणून? "
संतोष ढोणे नं कोपरखळी मारत माझं माप काढलं," वा वा वा नानिवडेकर साहेब... ...अभिनंदन !! ... ... हे तुमचं म्हणजे...एकदम ’बाजीराव-मस्तानी’ छापच आहे म्हणा की‌...!!! "
देवधरांनी वर फोडणी मारली," अरे बाबा ’ते’ पण फिकं म्हणायला हवं‌... ... ... बिचार्‍या वहिनी च कायम फणफणत असतात... ...हीः हीः हीः हीः !!!! " 
देवधर-संतोष नी एकमेकांना टाळ्या देत माझं काढलेलं माप साजरं केलं... ... परत एकदां मला तोंडभर शुभेच्छा दिल्या... ...आणि पूजा एकदाची आटोपली.  

काळ्याभोर रंगाची ती गाडी खरोखरच राजसिक देखणी दिसत होती... अन्‌ मी तर तिच्यावर फिदा च झालो होतो. 
कोल्हापूरला आमच्या घरी माझे वडील ’बुलेट’ वापरायचे... ... शेतीवाडी च्या गांवी चकरा मारायला...
कॉलेजच्या वयात वडील घरी नसतांना, आम्ही पोरं ती ’बुलेट’, चावी च्या वायरशी खेळ करून चालूं करायचो, आणि गांवभर पळवायचो. 
नंतर इंलिनिअरिंग कॉलेज ला पुण्याला असतांना माझ्या अनिल ग्रोव्हर नांवाच्या मित्राची ’बुलेट’ वापरली....
यथावकाश नोकरीचा श्रीगणेशा केला...कमाई सुरूं झाली... ... तरी ’बुलेट’ घेणं हे स्वप्न च राहिलं... 
त्याचं पहिलं कारण म्हणजे हे स्वप्न त्या काळीं तरी आवाक्याबाहेरचं होतं.!! 
त्यामुळं लग्नापूर्वी सुरुवातीला मी ’लॅंब्रेटा’ वापरत असे. 
दुसरं कारण आमच्या ’सौ. इंदिराजी’. ह्या मूळच्या जरी पक्क्या हैद्राबादकर असल्या, तरी जन्मलेल्या पुण्यातच... ... 
तेव्हां त्यांचं ’हमारा बजाज’ वर प्रेम असणं ओघानं आलंच. !! 
त्यामुळं विवाहानंतर पहिली चारपांच वर्षं मी ’बजाज चेतक’ वापरली... ... पण ' बुलेट ' चं स्वप्न कायम खुणावत राहिलं. 
पुढं नोकरीत टाटा मोटर्स मध्ये स्थिरावल्यानंतर मात्र सौ. इंदिराजीं चा विरोध मोडीत काढून मी पहिली ’स्वकष्टार्जित बुलेट’ खरेदी केली.
सौं इंदिराजीं नी तिच्यावर बसतांक्षणींच तोंडपट्टा सोडला," कसली मेली गाडी ही... ...!!! आसन वीतभर तरी रुंद आहे काय हिचं?... ...
हिच्यापेक्षा ’चेतक’ कितीतरी बरी... ... चांगल्या गरगरीत रुंद सीट आहेत तिच्या... ... ! मी नाही बसणार ह्या गाडीवर मुळीच.!! तुम्हीच वापरा खुशाल एकटेच. !!! "
म्हणून मग सौ. इंदिराजींच्या ने-आणी साठी ’बजाज चेतक’ पण मी वापरात ठेवली. 
आमच्या ’सौ. इंदिराजी’ चं अढळ प्रेम ’हमारा बजाज’ वरच. !!!... ...हा बहुधा पुण्यात जन्मल्या-वाढल्याचाच परिपाक असावा. !!!!
त्यापुढं ही बुलेट मी एकट्यानंच तब्बल बारा वर्षं जातिवंत अरबी घोड्यासारखी वापरली... ... आणि जपलीदेखील. 
यथावकाश मुलं मोठी झाल्यावर ’इण्डिका’ चं आगमन झालं... ... पोरं आणि सौ. इंदिराजी जाम खूष... ... ... 
मी मात्र माझ्या अरबी घोड्याची साथ आणि पाठ कांही सोडली नाही.
यथावकाश साठीही ओलांडली, आणि चि. मुग्धा [ आमची कन्या ] नं सावधगिरीचा इशारा दिला," बाबा आतां ही पायानं किक्‌ मारायची गाडी बदलून बटण स्टार्ट वाली गाडी घ्या... ...’बुलेट’ ची किक्‌ आहे ती... ...उलटी बसली तर गुडघा मोडायचा एखाद्यावेळी... ... साठी उलटलीय्‌ तुमची आतां. !! "
मलाही कन्ये चं म्हणणं पटलं... ...पण बाजारात तर बटण स्टार्ट ची ’बुलेट’ तोपावेतों दाखल झालेली नव्हती.
आणि मला ’बुलेट’ खेंरीज दुसरी दुचाकी वापरायची कल्पनाच पंचत नव्हती... ... म्हणून मग तोंवर मी कळ काढायचं ठंरवलं... ...  
आणि ’इण्डिका’ नंतर पुढच्याच वर्षी एक तप वापरून नव्यासारखी जपलेली जुनी ’बुलेट’ मी खरेदीच्या किंमतीपेक्षा सव्वापट चढ्या किंमतीला विकली,
आणि थोडे पैसे भरीला घालून बटण स्टार्ट असलेली नवीन बुलेट खरेदी केली... ... ...तिचीच पूजा आत्तां आटोपलेली होती. 
"तुमचा नव्या ’बुलेट’ बरोबर संसार सुखाचा होवो. !! ", अशी खोंचक शुभेच्छा देऊन श्री. देवधर निघून गेले... ...तोंपावेतों संध्याकाळचे साडेपांच वाजत आले होते.
शो रूम मधल्या लेखनिक कामगारांची जामानिमा आवरून घरी निघायची लगबग पण सुरूं झालेली होती..
मी गाडी ची कागदपत्रं ताब्यात घेतली...टूलसेट तपासून डिकीत ठेवला... ...
श्री. संतोष ढोण्यानी परत तोंडभर शुभेच्छा दिल्या...चोंख सेवेची खात्री दिली...आणि ’चार दिवसांनी नंबर टाकून घ्यायला या’ म्हणून सांगितलं.
मी दुचाकी चालूं करून सौ. इंदिराजी नां मागच्या सीटवर बसायला सांगितलं, अन्‌ टेंचात पहिला गिअर टाकला... ...

तेंव्हढ्यात श्री. ढोणे दंचकून जवळ जवळ ओंरडलेच," साहेब... अहो साहेब ... ... जरा उतरा बघूं गाडीवरनं... ... मागचं चाक बहुतेक पंक्चर आहे. !! "
मी आ वांसत कपाळाला हात च लावला.!! ... ... आणि आम्ही चडफडत गाडीवरनं खाली उतरलो.
श्री. ढोण्यांनी शोरूम बंद करून घरी निघालेल्या शेवटच्या मेकॅनिक ला हांक मारली," परशुराम...ए परशुराम... ... इकडं ये ताबडतोब... दुकान बंद करूं नकोस इतक्यात."
खुशीत घरीं निघालेला परशुराम धांवतच हजर झाला," काय साहेब?... कश्याला हांक मारलीत? "
ढोणे," अरे साहेबांच्या ह्या गाडीची सोंपवणूकपूर्व देखभाल ( पी. डी. आय.) तूं च केली होतीस ना रे? मागचं चाक पंक्चर आहे हे लक्ष्यात कसं नाही आलं तुझ्या...ऑं? "
आतां परशुरामानं च कपाळाला हात लावला.!!! ... ..."असं कसं होईल साहेब? गाडी तर मी स्वतःच तयार केलेली होती... ... बघूं द्या मला काय झालंय्‌ ते... ..."
मग माझ्याकडं वळून म्हणाला," फक्त दहाच मिनिटं थांबा साहेब... ... टायर पंक्चर असला तर आख्खं चाक च बदलून टाकतो."
दहा मिनिटं राहिली बाजूलाच... ... गॅरेजकडं निघेलाला परशुराम दहा सेकंदातच परत आला," संतोष साहेब... अहो सगळं ठाकठीक आहे की.!!... ... कांहीही झालेलं नाही चाकाला.!!!"
संतोष," अगदी पक्की खात्री केलीस ना परशुराम?... ... बघ बरं... ... नाहीतर आपल्या इज्जतीचं खोबरं व्हायचं देवधर साहेबांपुढं... ..."
परशुराम," नानिवडेकर साहेब... अगदी बेशक गाडी घेऊन घरीं जा... ...बाकी सगळी माझी जबाबदारी... ...बस्स?... ... मग तर झालं? " 
संतोष ढोणे आणि परशुरामजी नां मग धन्यवाद देऊन आम्ही निघालो...एव्हांना दिवेलागण होत आलेली होती... तसा बर्‍यापैकी उजेड होता... ... 
म्हटलं घरीं पोंचायच्या आत अंधार पडलाच तर लावूं दिवा गाडीचा... 

आधीच घरीं निघायला थोडासा उशीरच झालेला असल्यामुळं मी कर्वे रस्त्याला फाटा देऊन मस्तानी स्मारकाच्या मोकळ्या पर्यायी रस्त्यानं गाडी दामटली.
स्वतःच्या अरबी घोड्यावर स्वार व्हायचं सुख कांही औरच होतं... ... पण त्यात बिब्बा पडायचा योग आलेला असावा बहुतेक.
थोडं पुढं जातोय्‌ न जातोय्‌ तोंच एका मोटरसायकलस्वारानं सुसाटत आम्हांला ओलांडून गाडी पुढं काढली, आणि हातानं खूण केली ’मागचं चाक पंक्चर आहे’ म्हणून... !!!
झा s s s s s s s s s लं... ... मला कांहीच उलगडा होईना... ... पंक्चर झाल्यासारखी गाडी मागं ओंढत तर नव्हती.!!... ... मग?
मी गाडी रस्त्याकडेला घेऊन थांबवली, अन्‌ सौ. इंदिराजी नां पायउतार व्हायला सांगितलं.
सौ. इंदिराजी तंणतंणतच गाडीवरनं उतरल्या... ...," मेल्यानां धड कामं करायला जमत नाहीत.!!... ... तोंड फाटेस्तंवर आश्वासनं देण्यात फक्त पटाईत सगळे. !!
काय दिवे लावणार ही तुमची लाखाची ’बुलेट’, ते दिसतंच आहे.!!!... ... ... हिच्यापेक्षां बजाज ची ’चेतक’ च शतपट बरी.!!! " 
"बस्स करां तुमचं हे पुणेरी ’हमारा बजाज’ प्रवचन", मी ही आतां पुरता पिकलो," थांबा जरा गप्प... ... काय झालंय ते बघूं द्या मला."
असं करवादत गाडी मी मधल्या स्टॅण्डवर चंढवली, अन्‌ हनुमान बैठक मारत मागचा टायर तपासला... ... ...
आणि माझा देखील ’परशुराम’ झाला... ... पंक्चर-बिंक्चर कां s s s s s ही नव्हतं...!! टायर अगदी ठणठणीत अन्‌ टमटमीत होता. !!!

’टायर ठणठणीत आहे’ असं म्हटल्यावर सौ. इंदिराजी त्या मघाचच्या मोटरसायकलस्वाराला लाखोली वाहत पुनश्च ’बुलेटारूढ’ झाल्या, अन्‌ मी गाडी घराकडं सुसाट सोडली.
दोनएक किलोमीटर पुढं जातोय्‌ न जातोय्‌ तोंच परत तोंच प्रकार...!!
दुसरा एक स्कूटरवाला आम्हाला ओलांडून पुढं गेला, आणि पुन्हां त्याच खाणाखुणा... ...’मागचा टायर पंक्चर आहे’ म्हणून. !!!
आतां मात्र सौ. इंदिराजी नी वटहुकूमच सोडला," काय वाट्टेल ते झालं तरी आतां घरीं पोंचल्याशिवाय गाडीवरनं मी मुळीच उतरणार नाही.!!
गाडीचं जे काय व्हायचं ते खुशाल होऊं दे... ... !!! "
माझी बोलती च बंद झाली अन्‌ मनातल्या मनात मी त्या भानामतीला लाखोली वाहत अंधार दाटून आल्यामुळं पुढचा दिवा लावला... ...
पाहतो तर काय... ... दिव्याचा प्रखर झोत समोर तीनचारशे फुटापर्यंत लांबवर पडलेला होता. !! 
मी जाम खूष होत उट्टं काढलं," बघितलंत, कसा झळझळीत प्रकाश पडतोय्‌ तो... ... नाहीतर तुमची ’हमारा बजाज’... ... घासलेटची चिमणी सुद्धां बरी तिच्या दिव्यापेक्षा. !!! "
सौ. इंदिराजी," समजला बरं तुमचा कुजकटपणा... ... ह्या तुमच्या ऐरावतानं पांच किलोमीटर धांवेतोंवर चार वेळा खाली उतरवलंय्‌ मला... ... समजलं? "
प्रतिवाद्याला चारीमुण्ड्या लोळवण्यात त्या नन्मतःच वाकबगार... !!! मी कांही न बोलतां ऍक्सिलरेटर पिरगळला, अन्‌ अरबी घोड्याच्या डौलात माझी ’बुलेट’ धावायला लागली.

आतां पूर्ण अंधार पडला, अन्‌ समोरून येणार्‍या एका वाहनानं ’अपर-डिपर’ झंळकवत मला ’डिपर’ वर दिवा लावायची खूण केली, तसं मी झंटक्यात डिपर चं बटण दाबलं... ...
आणि उताणा पडायचाच काय तो बाकी राहिलो...!! गाडीच्या ’अपर’ मध्ये मला चक्क रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे शेण्डे दिसायला लागले. !!!
म्हणजे गाडीच ’अपर’ आत्तां लागलेला होता... ... !!!
तात्पर्य, त्या समोरून येणार्‍या वाहनवाल्यानं मला ’डिपर’ लावायची खूण जेव्हां केली, तेव्हां माझ्या ’बुलेट’ चा दिवा ’डिपर’ वरच होता. !!!!
मी चारपांच वेळां ’अपर-डिपर’ चं बटण हलवून बघितलं तरी तो च प्रकार. मग मला एक मूलभूत शंका आली... ... ...
मी कपाळाला तिसर्‍यांदा हात लावत गाडी पुन्हां रस्त्याकडेला घेऊन थांबवली... गाडीचं इंजिन आणि दिवा चालूंच ठेंवला अन्‌ सौं इंदिराजी नां म्हणालो," जरा उतरा खाली."
सौं. इंदिराजी गाडीवरून उतरल्या... ... 
आणि गाडी ताब्यात घेतल्याक्षणापासून सुरूं झालेल्या ’भानामती’ चा मला एका क्षणांत उलगडा झाला... ... ... 
मग कपाळाला हात लावून धन्य धन्य होत मी सौ. इंदिराजी नां म्हटलं," आतां पुरती समजली मला ही सगळी ’पंक्चर’ ची भानगड... ... ..."
सौ. इंदिराजी," काय समजलं तुम्हाला आतां?... ...चला घरीं लौकर... मला स्वयंपाकाला उशीर होतोय्. ‌"
मी मख्खपणे सौ. इंदिराजी ना म्हणालो," ह्या सगळ्या भानगडीला कारणीभूत काय आहे माहीताय्‌ तुम्हाला? "
सौ. इंदिराजी," काय आहे तरी काय कारणीभूत "
मी," तुम्ही स्वतःच. !!!! "
सौ. इंदिराजी," डोंबल तुमचं... ... मी काय केलं? "
मी," स्वतःच बघा आतां तुम्ही ह्या नव्या ’बुलेट’ चं काय करून ठेवलं ते... ... ..."
मग मी डावीकडचा पृष्ठदृष्यदर्शक आरसा जरा  पाठीमागचं चाक दिसेल इतपत फिरवला, 
आणि सौ. इंदिराजी नां म्हटलं," हं... ... आतां बसा गाडीवर अन्‌ बघा आरश्यात तुमचा पराक्रम."
" बघूं... बघूं ", म्हणत सौ. इंदिराजी अधीर होत गाडीवर बसल्या आणि पुढच्या आरश्यात वांकून डोंकावल्या... ... ...
गाडीचे मागचे दोन्ही धक्केरोधक चांगले इंचभर दबलेले होतेच... ... 
वर आणखी पूर्ण हवा भरून टम्म झालेला मागचा टायर पुरता चेंपटून ’पंक्चर’ झाल्यागत खाली बसलेला होता. !!!!!
आतां दस्तुरखुद्द सौ. इंदिराजीनीच आं वांसत बोलती बंद होऊन स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
आणि दुसर्‍याक्षणीं तंणतंणत ताड्‌दिशी गाडीवरून खाली उतरल्या. !!!
मी," बघिलंत? ... ... आतां जरा पुढं नीट बघा ... हा ’डिपर’ चा प्रकाशझोत पुढं रस्त्यावर पडतोय्‌ ना सरळ ?...रस्ता दिसतोय ना तुम्हांला? "
सौ. इंदिराजी," हूं... ... ... म s s s s s s s s s ग? "
मी प्रकाशझोत तसाच ’डिपर’ वर ठेवत म्हटलं," हं... ... बसा आतां परत गाडीवर, अन्‌ बघा काय होतंय्‌ ते."
सौ. इंदिराजी गाडीवर बसतांच पुन्हां एकदां मागचे धक्केरोधक ( शॉक ऍब्सॉर्बर्स ) करकरत चांगले इंचभर खाली बसले... ... ... 
आणि ’डिपर’ चा प्रकाशझोत वर उचलत सरळ समोर पडायला लागला. !!
मी दिव्याचं बटण ’अपर’ वर केलं... आणि त्या प्रकाशझोतात दुरर्फा असलेल्या झाडांचे चक्क शेंडे दिसायला लागले... ... ...!!!

कपाळाला हात लावत मी सौ. इंदिराजी नां म्हटलं," बघिलंत? अश्या तुम्ही मागं बसल्यावर मी टम्म फुगलेला टायर कुठून आणू, आणि रस्त्यावर पडणारा ’डिपर’ तरी कुठून आणू? "
सौ. इंदिराजी मख्खपणे वतवतल्या," टिनपाट गाड्या खरेदी केल्या की असंच होतं !!!! ... ... समजलात? " 
मी हतबुद्ध होत म्हणालो," अहो हिच्यापेक्षा दणकट गाडी कुठून आणूं मी तुमच्यासाठी? आख्ख्या भारतात इतकी दणकट दुचाकी दुसरी बनत नाही.!!! "
सौ. इंदिराजी," हिला दणकट म्हणणारे पण हिच्याच लायकीचे...!!! मी गळ घातली की काय तुम्हाला ही गाडी घ्यायला ?... ... ऑं?... ...
आपली ’चेतक’ लाखपटीनं बरी हिच्यापेक्षा... ... अजिबात दबत नाही ती पाठीमागनं... ...!!... ... कळलं? "
आतां मी पण चिडलो," कशी दबेल?... ... अहो तसल्या टिनपाट स्कूटरमध्ये धक्केरोधक दबायला जागाच कुठं असते? 
म्हणून तर ते दगडासारखे कडक बनवलेले असतात... ... तुम्हां पुणेकरांच्या आवडत्या सायकलींसारखे !!! ... ...समजलात? " 
सौ. इंदिराजी," समजली तुमच्या इंजिनिअर लोकांची लायकी !! ... ... साध्या गाड्या धड बनवतां येईनात... !!! 
धोब्याची गाढवं बरी ह्या गाड्यांपेक्षा... ... ती अशी बसत तरी नाहीत खाली !!!! ... ... कळलं?
चला आतां लवकर घरी... ... पाठीमागनं रस्तादुरुस्तीचा ताफा येतोय्‌ तो बघा आधी ... ...
ह्या गदाड्यात जर अडकलो ना, तर तासभर लागेल अजून घरीं पोंचायला... ...चला."
मी पाठीमागं वळून पाहिलं... ... 
रस्तादुरुस्तीच्या पथकातल्या डांबरीकरण करणार्‍या पांचसात कामगारांचा घोळका खांद्यावर फावडी घेऊन चालत येत होता... 
त्यांच्यामागं भाक्‌ भुक्‌ करत गजगतीनं चालणारा रोड रोलर ... ...
आणि रोड रोलर च्या मागनं फरपटत निघालेली उकळत्या डांबराची भट्टी... ... 
मोठी मजेशीर वरात दिसत होती ती.
सौ. इंदिराजी," चला आतां...बघताय्‌ काय असे बावळटासारखे?... ... डांबरवाले कधी बघितले नाहीत की काय तुम्ही?... ... ’स्थापत्य अभियंता’ आहात ना? "
मी," खरंय्‌ तुमचं इंदिराजी... पण आतां तुम्हाला ह्या ’बुलेट’ चा दुस्वास करायची गरजच नाही. ... ... हिच्यापेक्षाही दणकट गाडी घेऊं आपण तुमच्यासाठी !!! ... ... ... काय? "  
सौ. इंदिराजी," अय्या !!! ... ... खरंच? "
मी," ’खरंच?’... ... म्हणजे काय?... ... हे मॉडेल बघा पसंत पडतंय्‌ कां तुम्हाला ते."
असं म्हणून ’कुठलं मॉडेल हो?’ असं चीत्कारणार्‍या सौं इंदिराजींकडं बघत मी पाठीमागनं येणार्‍या रोड रोलर कडं बोट दाखवलं... ... !!!
आणि सौ. इंदिराजी नी परत एकदा स्वतःच्या कपाळाला हात लावत, 
माझ्या पाठीत, हयातभर आठवणीत राहील असं कळवळायला लावणारा एकच सणसणीत हैद्राबादी रट्टा घातला. !!!!!

**************************************************************************************

-- रविशंकर.
३० जून २०१४.

No comments:

Post a Comment