Search This Blog

Saturday, 16 November 2013

॥ ट्वेंटी-ट्वेंटी ॥

॥ ट्वेंटी-ट्वेंटी ॥



आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ’स्थापत्य अभियांत्रिकी’ विभागाच्या परीक्षा हॉल चा व्हराण्डा 

प्रथम वर्षाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गंजबजेला होता............
सगळीच ’एफ्‌. ई.’ ची ’ज्युनिअर’....अर्थात मुरलेल्या ’सीनिअर्स’ च्या दृष्टीनं बावळट पोरं. !!
सकाळचे साडेआठ वाजलेले............ठीक नऊ वाजतां ’ फ्लुइड मेकॅनिक्स्‌ ’ च्या टर्म वर्क चा वीस मार्कांचा पेपर सुरूं व्हायचा होता.......

कुणी नोटीस बोर्डावर लागलेल्या याद्यांत कांहीबाही शोंधीत होते,.... कुणी ऐनवेळची उजळणी करीत वह्या पुस्तकं उघडून बसलेले......
तर टारगट पोरांचे घोळके इतस्ततः पसरून गप्पा छाटत टंवाळ्या करत वेंळ काढीत होते.......
अन्‌ आमचं टोळकं ह्या टारगट पोरांपैकीच एक होतं.
सत्या लेले, बाबू मानकर, मी स्वतः, अरूण ऊर्फ बाप्या साने, शिरीष भालवणकर ऊर्फ भाल्या, 
अन्‌ सगळ्यांचा ’टग्या शिरोमणी’ शोभेल, असा आमचा अनिल ऊर्फ अन्या ग्रोव्हर.
ह अन्या म्हणजे खंरोखंरीच टग्याशिरोमणी होता.........
आख्खी पहिली टर्म ह्यानं ’स्थापत्य अभियांत्रिकी’ च्या वर्गालगत असलेल्या अण्णाच्या कॅण्टीन मध्ये, 
नाहीतर बोटक्लब च्या कॅफेटेरियामध्ये चकाट्या पिटत, अथवा पोरींच्या कळा कांढत, कांढलेली होती..........
ह्या अन्या च्या वडिलांचं कॅम्प मधल्या एम्‌. जी. रोडवर विविध खेंळांच्या साहित्याचं भलंमोठ्ठं दुकान होतं.
घरचं सगळं असं गरगरीत......अन्‌ भंरीला अन्या हा एकुलता एक मुलगा......
मग आणखी काय हवं होतं जातिवंत टग्या व्हायला?
सायकलीसाठी सुद्धां घरी हट्ट धंरावा लागायच्या त्या जुन्या काळांत, हा अन्या 
चंकचंकीत नवी कोरी लॅम्ब्रेटा स्कूटर मिरवत कॉलेजला यायचा. 
बहुतांशी त्याची लॅम्ब्रेटा लायब्ररी किंवा लेक्चर हॉल ऐवजी बोटक्लब अथवा अण्णाच्या कॅण्टीन समोरच्या 
स्टॅण्डवरच लागलेली असायची,... अन्‌ तिथंच कुठंतरी हा अन्या टंवाळ पोरांपोरींच्या गराड्यात सापडायचा.

’जरा तुझी सायकल देतोस काय रे दहा मिनिटांसाठी?’ असं विचारल्यावर 

जणूं कांही ’नेसूंची लंगोटी’ च मागितल्यागत चेंहरा करून, ’सॉरी यार........ पंक्चर झालीय्‌’!! 
अशी लोणकढी थांप मारणार्‍या सदाशिव-नारायण-शनवार पेंठी बेंरकी पोंरांच्या मानानं, 
हा अन्या मात्र ’भले तरी देऊं कांसेची लंगोटी’ वाल्या तुकरामांचा वंशज शोंभणारा होता, एव्हढं मात्र खरं.!! 
त्याची लॅंब्रेटा अक्षरशः कुठल्याही दोस्ताच्या हातांत दिसायची....अन्या कधीच कुणालाही नाही म्हणत नसे. 
बहुधा त्याच्या लॅम्ब्रेटावर, तो स्वतः सोडून इतर पोरंच पोरीं फिरवत असायची.
अन्या ग्रोव्हर च्या लॅम्ब्रेटावरच गूळपीठ जंमवलेली अशी डझनभर तरी जोडपी कॉलेजांत होती.....!!
ह्या पांठीमागच्या सीटवरच्या ’गूळपिठां’ नां आमच्या गॅंगमध्ये ’पे-लोड’ असा परवलीचा शब्द होता. !!
अन्‌ केंवळ ह्या एका गुणाच्या जोंरावरच अन्या ग्रोव्हर आख्ख्या कॉलेजांत लोकप्रिय होता.......
त्याला, हांकेला ओ देणार्‍यांची कमी कधीच पडली नाही.
त्यामुळं अन्या ला सबमिशन्‌ अथवा टर्म वर्क साठी स्वतः कधीच झिजावं लागलं नव्हतं....
ही कामं दोस्तांमार्फतच परस्पर व्हायची........
त्यामुळंच अन्यानं पुस्तकांत डोकं घालणं सोडाच, पुस्तकांत कधी डोंकावलेलंही नव्हतं....!!

आणि नेमकी ही च विवंचना आमच्या टोंळक्यात चर्चेचा विषय झालेली होती........

" सत्या...नान्या...बाप्या....भाल्या....साल्यांनो कांहीतरी करा लेको.........नाहीतर बल्ल्या ठंरलेला आहे !!", 
अन्या कपाळाला हांत लावत किंचाळला ," आधीच भावे मास्तरचं आमच्यावर फार ’प्रेम’.............
आणि अजून पुस्तक पण उघडलेलं नाही रे......" !!
ह्या भावे सरांच्या प्रत्येक तासाला हजेरी आली की ’येस्सर’ अशी आरोळी ठोंकून 
अन्या मागच्या दारानं अण्णाच्या कॅण्टीनकडं पसार व्हायचा.
हे भावे सरांनी बरोबर हेरलेलं होतं....अन्‌ त्यामुळंच अन्याची चड्डी सुटायची वेंळ आलेली होती.!!
बाप्या म्हणाला," हे बघ अन्या, भावे मास्तरची तुझ्यावर कितीही खुन्नस असली ना, 
तरी तो तुला नापास करणार नाही बघ..............पैज आपली"!!
"नक्की करील बाप्या.....लागली पैज ", अन्या.
बाप्या," हे बघ अन्या, वीणा भावे एकदां रस्त्यांत कुठल्यातरी मोर्च्याच्या दंगडफेंकीत अडकली असतांना 
तिला वांचवून तुझ्या लॅंब्रेटावर सुसांट पळवत घरी तूं च सुखरूप पोंचवली होतीस ना?......
भावे मास्तर कितीही खडूस वाटला ना, तरी तो असले उपकार विसणारा नाही.......!! तेव्हां नापास व्हायची चिंताच सोड तूं" 
मी म्हटलं," अरे बाप्या, पण ह्या अन्या नं कांहीतरी चार ओंळी तरी लिहायला हव्यात ना  त्यासाठी.....अं?....
की कोरा पेपर तपासूनच भावे मास्तर ह्याला पास करणाराय्‌?"
"ते पण खरंय्‌ नान्या.......भाल्या म्हणाला",.........कांहीतरी आयडिया काढा बुवा....नाहीतर अन्याचं कांही खरं दिसत नाही."!!
मी," अन्या, असं कर....फक्त तीन च धडे गिरवायचे आहेत....माझ्या किंवा भाल्याच्या नोट्स्‌ घे..... अन्‌ घोंकून टाक लगेच........काय?"
अन्या,"आणि भावे मास्तर नं सगळीच गणितं घातली तर रे नान्या?.....थिअरी घातलीच नाही तर काय करायचं मग ?"
अन्या ची शंका अगदी रास्त होती......सगळी गॅंग च गप्प झाली......
अचानक इतका वेंळ गप्प असलेल्या बाबू मानकरनं चुटकी वाजवली........
," आयडिया !! अन्या तूं पास झालास म्हणून समज...."!!
आम्ही उडालोच," ऑं?........ते कसं काय रे बाबू?"
बाबू म्हणाला," हे बघा.......आपल्या गॅंगमध्ये हा भाल्या आणि नान्या....हे दोघंच ’फ्लुइड मेकॅनिक्स्‌’ मधले दादा लोक आहेत....बरोबर?"
बाप्या," ते खरंय् रे‌....पण भाल्या न्‌ नान्या ढीग दादा असले, तरी त्यामुळं हा अन्या कसा काय पास होणाराय्‌ रे.....ऑं?"
"आधी ऐका तर पुरतं....", बाबू," हे बघा....टर्मवर्क चा पेपर आहे....
त्यामुळं फायनल सारखे आपल्याला ठंराविक सीट नंबर दिलेले नाहीत....कुणीही कुठंही बसलं तरी चालतंय्‌......बरोबर?"
"बरोबर बाबू", आख्खी गॅंग.
" तेव्हां अन्या तूं काय करायचं.....की हॉलचं दार उघडलं रे उघडलं की मुसण्डी मारायची............
अन्‌ नान्या-भाल्या च्या बरोबर मधली जागा पटकावायची.......काय?"
"ठीकाय्‌.........पुढं?", अन्या.
" आणि नान्या-भाल्या, तुम्ही दोघांनी पेपर लिहितांनां, अन्याला, मुद्दाम न डोकांवतां सहज दिसतील, असे ठेंवायचे....कळलं?
आणि अन्या..... एव्हढं झालं की मग पुढं काय करायचं,..... ते तुला सांगायला नकोच !!.....काय ? "
सगळ्या गॅंग ला बाबू मानकर ची भन्नाट आयडिया एकदम पटली, 
अन्‌ एकमेकांना ’थम्सप्‌’ दांखवत सगळे परीक्षा्र्थी हॉल च्या दिशेनं सुटले.
ठंरल्याप्रमाणं सगळं निर्विघ्नपणे पार पडलं अन्‌ सगळ्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला.
फक्त गोची एकच झाली होती.............अन्या ची दुष्ट शंका खरी ठंरली होती.
पेपर एकूण वीस मार्कांचा होता......तीन प्रश्न प्रत्येकी दहादहा मार्कांचे दिलेले.....त्यापैकी कुठलेही दोन सोंडवायचे होते.
अन्‌ भावे मास्तरांनी तिन्ही प्रश्नांमध्ये गणितंच टांकलेली होती.....ती ही एकजात धोंबीपछाड. !!
तेव्हां भाल्या-नान्या सकट सगळ्यांना एकच आशा होती.
सोंडवलेल्या दोन गणितांपैकी गेलाबाजार एक तरी बरोबर येईल, अन्‌ टर्म वर्क कांठावर तरी सुटेल म्हणून.!!

पेपर झाल्यावर दुपारी तीन वाजतां ’इलेक्ट्रिकल मशीन्स्‌’ विषयाची प्रॅक्टिकल ची परीक्षा होती.

मध्ये तासभर मोकळा होता....अन्‌ पोंटांत कावळेही कोंकलायला लागले होते.
म्हणून आमची गॅंग अण्णा च्या कॅण्टीन मध्ये मिसळ-पावावर तांव मारायला घुसली.
सगळ्यांचे चेंहरे जरा ओंढलेलेच दिसत होते.......
आश्चर्य म्हणजे अन्या मात्र सफाचट निश्चिंतपणे शिट्टी वाजवत होता......!!
आम्ही म्हटलं," अन्या साल्या, भाल्या-नान्या पण कुंथताय्‌त.....अन्‌ तूं एव्हढा बिनधास्त कसा रे ?"
अन्या," त्याचं काय आहे यार.....ह्या ’दादा’ लोकांचं जे होणाराय्‌ ना...... 
तेंच आपलंपण होणार !!.....मग कसली काळजी आलीय्‌.....ऑं?"
अन्या चं तर्कशास्त्र ऐकून आख्ख्या गॅंग नं कपाळांना हांत लावले. !!

दुपारचे दोन वाजले.........तीन वाजतां ’इलेक्ट्रिकल मशीन्स्‌’ विषयाच्या प्रॅक्टिकल ची परीक्षा सुरूं होणार होती.

" ए भाल्या.....’इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल’ ला कोण येणाराय्‌ रे ? कांही माहिती काढलीय्‌ काय?", मी भाल्याला विचारलं
" बहुधा ’कोठारी’ आहेत.......", भाल्यानं बॉंम्ब टांकला. !!
" म्हणजे अन्या मेला परत......", बाप्या म्हणाला," पुनश्च हरि ओम्‌ !! "
"कोठारीं सरां चं अन्या वर किती ’प्रेम’ आहे, ते आख्ख्या कॉलेजला माहीत आहे....", भाल्या म्हणाला. 
बाप्या साने,"अन्या ला डझनभर प्रॅक्टिकलना तरी कोठारी सरांनी हांकलून दिलाय्‌ लॅबोरेटरीतनं !!", 
" ठार मेलो साल्यानों....... कांहीतरी करा आतां ", म्हणत अन्या नं कपाळाला हांत लावला. !!

तेंव्हढ्यांत बाबू मानकर उगवला.....न्‌ अन्याला हंळूंच म्हणाला," अन्या तुझा सीट नंबर किती लागलाय्‌ रे?"

" सत्तावीस", अन्या हंताशपणे म्हणाला.
बाबू,"हे बघ अन्या, सत्तावीस नंबर ला बहुतेक ’इण्डक्शन्‌ मोटर’ चा प्रयोग लावलाय्‌......!!
आतां.....ह्या ’इण्डक्शन्‌ मोटर’ च्या प्रॅक्टिकल च्या सत्या च्या नोट्‌स्‌ घे......अन्‌ घोंकून पांठ कर लगेच.....
अजून पाउण तांस आहे बघ.......!!! 
जा पळ साल्या.....थांबूं नकोस इथं.......... नाहीतर आम्हांला गोत्यांत आणशील." 
अन्या नं," थॅंक्स्‌ बाब्या.....लव्हली ! ", म्हणत उडीच मारली.....अन्‌ नोट्‌स्‌ कांखोटीला मारून धूम ठोंकली.!!
त्या दिवशी अन्या चं नशीब खंरंच जोरावर असावं.

प्रॅक्टिकल बरोबर तीन ला सुरूं झालं.......बाबू मानकरनं कांढलेली माहिती अचूक होती. !!

अन्या च्या समोरच्या टेबलावर ’इण्डक्शन्‌ मोटर’ चा च संच लावलेला...........
अन्या जाम खूष झाला,........ अन्‌ प्रॅक्टिकल न करतांच भराभर घोंकलेले आंकडे भंरून मोकळा झाला. !!
कोठारी सर आपला कडक चेहरा सांभाळत हॉलभर फिरत होते.....आमचं आपापल्या प्रयोगांत लक्ष गुंतलेलं.....
त्यामुळं कोठारी सर अन्या जवळ येऊन कधी उभे राहिले, ते मला न्‌ बाबू ला कळलं देखील नाही.

कोठारी सर," काय ग्रोव्हरजी.....झालं काय प्रॅक्टिकल......अं? अजून पंधरा मिनिटं शिल्लक आहेत. "

"होय.......झालं सर.....चार्ट तयार आहे....", अन्या चांचरत म्हणाला.
"बराय्‌ तर...आतां सांगा बरं....’इण्डक्शन्‌ मोटर’ ला कनेक्शन्‌ कसं देतात ते?", कोठारी सर.
अन्या," सर...’इण्डक्शन्‌ मोटर’ ला डायरेक्ट्‌ कनेक्शन्‌ देतां येत नाही.....
’स्टार-डेल्टा स्टार्टर’ मधूनच ते द्यावं लागतं सर.......", 
अन्या तासापूर्वीची घोकंपट्टी व्यवस्थित ओंकायला लागला......
अन्‌ मी व बाबू मानकर चांगलेच सुखांवलो.
अन्याचं तारूं बहुतेक पैलतीराला लागणार अशी चिन्हं दिसायला लागली !!
कोठारी सर," ठीक...ठीक....आतां प्रत्यक्ष दाखवा बरं ही कनेक्शन्स्‌ कशी जोडतात ते?"
अन्या,"प्रथम हे असं स्टार कनेक्शन्‌ जोंडून मोटर सुरूं करायची,......
आणि वेंग पकडला, की मग ही अशी डेल्टा कनेक्शन्‌ वर टांकायची.", अन्या नं बोटं दांखवत उत्तर दिलं.
" अरे वा वा....उत्तम,"कोठारी सर," अभ्यास चांगला झालेला दिसतोय्‌......आतां एकच प्रश्न."
अन्या," काय सर?"
कोठारी," आतां मला सांगा, ’इण्डक्शन्‌ मोटर’ प्रत्यक्षांत सुरूं केली, की वेंग पकडेपर्यंत कशी कार्य करते? "
अन्याची सफाचट दाण्डी उडाली !!......हे सत्या नं दिलेल्या प्रॅक्टिकल च्या नोट्‌स्‌ मध्ये कुठंच नव्हतं.....
हा तर थिअरी चा प्रश्न.....अन्या गडबडला.....अन्‌ काय होतंय्‌ कळायच्या आंत घुमायला लागला....
" घटक्‌....खाट्‌....घूं...घूं...घूं...घूं,,.घूं.........ठाक्‌....व्हांव्‌....व्हांव्‌....व्हांव्‌....व्हांव्‌....व्हुइंग्‌‌‌‌..................!!!"
आख्खी लॅब पोंटं धंरून खंदाखंदा हंसायला लागली.........!!!
अन्‌ कोठारी सरांनी हतबुद्ध होत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!

दुसर्‍या दिवशीची तंणावपूर्ण सकाळ.....

सगळीच गॅंग ओंढलेले चेहरे घेंऊन ’स्थापत्य अभियांत्रिकी’ च्या नोटीस बोर्ड जंवळ घोंटाळत उभी.
कारण कालच्या टेस्ट पेपर चा निकाल थोंड्याच वेंळात नोटीस बोर्डवर लागणार होता.......
यथावकाश भावे सर आले......., 
अन्‌ त्यांनी पहिल्या झंटक्यात नांव पुकारलं," अनिल ग्रोव्हर.........." !!
अन्या संटपटत पुढं झाला..........," यस्सर....?"
अन्‌ भावे सरांनी खड्या सुरांत जाहीर केलं...," अनिल ग्रोव्हर यांना वीस पैकी वीस मार्क मिळालेले आहेत......!!
आणि एकदाही पुस्तक न उघडतां त्यांनी हा पराक्रम केलेला आहे....!!!
त्यासाठी ह्या ’ ट्वेण्टी-ट्वेण्टी ग्रोव्हर’ चं मी अभिनंदन करतो......कमॉन्‌ कमॉन्‌...."
असं म्हणत भावे सरांनी अन्या शी दंणकून हस्तांदोलन केलं..........!!
जमलेल्या सगळ्या ’स्थापत्य विशारदां’ चे डोंळे कपाळांत गेले. !!!
भराभर सगळ्या पोंरांना तंपासलेल्या उत्तरपत्रिका देंऊन भावे सर निघून ही गेले.
दादा समजल्या गेलेल्या मी अन्‌ भाल्या दोघांनाही वीसपैकी फक्त दहा च मार्क मिळालेले होते. !!!
बाकीच्यांपैकी बर्‍याच वीरांचं तर शून्यावरच पानिपत झालेलं होतं. !!!
झालं.....ह्या अन्या नं सगळ्यांनां टांग मारून कांहीतरी ’शाळा’ करून ठेंवलीय्‌, एव्हढं गॅंग च्या लक्ष्यांत आलं....
अन्‌ अन्या चा ’पंचनामा’ करायला बोटक्लब च्या अण्णा कॅण्टीनवर गॅंगचा ’पोलीस-चंवकशी’  अड्डा जमला. 

सत्या," अन्या....साल्या....काय शाळा केलीस तें खरं खरं सांग मुकाट्यानं"

"काय न्‌ कसली शाळा लेको.......ऑं?", अन्या थण्डपणानं म्हणाला.
" तुझी उत्तरपत्रिका आण आधी इकडं......", भाल्या.
अन्या नं शांतपणे उत्तरपत्रिका मी अन्‌ भाल्यापुढं संरकवली...... 

मी एक आणि तीन क्रमांकांची गणितं सोंडवली होती....

पैकी तिसरं गणित बिनचूक होतं, अन्‌ पहिल्यांत भोंपळा मिळाला होता. !
भाल्या नं दुसरं आणि तिसरं अशी गणितं घेंतली होती.....
पैकी दुसरं गणित बिनचूक होतं, आणि तिसर्‍या गणितात त्याचा त्रिफळा उडाला होता....!!
आम्ही अन्या ची उत्तरपत्रिका समोर ओंढली.....
अन्‌ सगळ्या गॅंग ला आतां फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं. !!!

अन्या नं अगदी बिनचूकपणे भाल्याचं दुसरं अन्‌ माझं तिसरं, अशी दोन्ही बिनचूक गणितं सही सही उतरवून कांढलेली होती.!!!

’ट्वेण्टी-ट्वेण्टी ग्रोव्हर’ चं रहस्य हे असं अफलातून होतं. !!!
अन्‌ त्याचा कर्ता-करविता आमच्याकडं मख्खपणे पहात बसलेला होता.....!!!!
"अन्या साल्या", भाल्या चंवताळला," तुझं भलं करायला गेलो,..... अन्‌ आमचा राडा करून ठेंवलास."
"राडा मी केलाय्‌ होय?...अरे वा रे लेको.....",
आतां अन्या पण चंवताळला, "फुटा आतां इथनं..........न्‌ मला पण जाऊं द्या मुकाट....
साला,कधी नव्हे असला ’पे-लोड’ समोर ’शाईन्’ मारायचा चान्स्‌ आलाय्‌.......म्हणून जंळताय्‌ होय?", म्हणत अन्या उठला देखील.
मी अन्याला बखोटी धंरून खाली बसवला," तूं शाईन्‌ मार लेका.....अन्‌ आम्ही काय टिमक्या वाजवायच्या काय रे ’पे-लोड’ समोर.....ऑं?",
आतां मी पण चंवताळलो," हे निस्तरायचं कसं ते सांग.....तर सुटलाय्‌स साल्या."

अन्या शांतपणे खाली बसला, " लेकों....तुमची टांळकी फक्त पुस्तकांतच चालायची.....इथं नाहीत. ! 

असलं लचाण्ड कसं निस्तरायचं, ते ’फ्लुइड मेकॅनिक्स’ च्या पुस्तकांतही दिलेलं नसतं....अन्‌ भावे मास्तर पण शिकवत नसतात.....!!
त्यासाठी अन्या ग्रोव्हरचा क्लास लावावा लागतो...............समजलात?"!!!
सगळी गॅंग गारेगार झाली.......
अन्या च्या अंगांत आतां धर्मेंद्र संचारला........."लेकिन फिकर मत करो यारों......सच्चे दोस्त ही मुसीबत में काम आते हैं............"
"ही डायलॉगबाजी सोड अन्या.......लचाण्ड कसं निस्तंरायचं ते बोल फक्त", भाल्या फिस्कारला.
अन्या," हे बघ भाल्या....तुझा ’पे-लोड’  आहे ’फर्ग्युसन्‌’ चा......अन्‌ ह्या नान्या चा ’एस्‌. पी.’ चा.....होय ना?"
" बरं असतीलही कदाचित......", मी राजकारणी पवित्रा घेंतला......
"असतील नव्हे नान्या.....आहेत !!.....काय? आणि हे दोन्ही ’पे-लोड’ लक्ष्मी रोड वर गळ्यांत गळा घांलून रोज फिरत असतात!!.....बरोबर?"
" तें समजलं रे अन्या ", सत्या लेले फिरकी तांणत बोलला," पण त्यांत कुणाला इंटरेस्ट आहे....? "
अन्या," मग तुम्हाला इंटरेस्ट तरी कश्यांत आहे रे साल्यानों ? "
मी अन्‌ भाल्याकडं बोंट दाखवत सत्या नं टांग मारली," अन्या.... ते ’पे-लोड’ ’ह्यां’ च्या गळ्यांत गळे घांलून कुठं कुठं फिरत असतात तेंव्हढं बोल !!"
सगळ्या गॅंग चे कान टंवकारून उभे झाले.............भाल्या अन्‌ मी गांरठलो.....!!
" आणि काय काय करतात तें पण सांग ", बाबू नं वर तंडका मारला. !!!
सगळी गॅंग आमच्याकडं बघत फिदी-फिदी हंसायला लागली......
आणि मी अन्‌ भाल्या नं कपाळाला हांत लावले. !!!!

" ते काय कराय्‌चंय्‌ रे तुम्हाला......ऑं ?.....आतां असं करा", अन्या लॅंब्रेटा च्या चांव्या आमच्या पुढ्यांत टांकत म्हणाला
" काय करा?", भाल्या.
"टेंचात कॉलरी तांठ करून लॅंब्रेटा घेंऊन जा तुमच्या ’पे-लोड’ कडं ’वैशाली’ त.......", अन्या
" आणि काय ’टेन-ट्वेण्टी’ च्या पिपाण्या वांजवूं?" मी.
" तसं कुठं म्हणतोय्‌ मी?", अन्या," सांगा ठंणकावून....’टेन-टेन नान्या’....अन्‌ ’टेन-टेन भाल्या’ म्हणून !!........वर आणखी कॉफी पण उकळा!!"
" धन्य आहेस अन्या", बाबू म्हणाला," ही असली बंडलबाजी अंगलट आली तर काय?"
अन्या," कसली आलीय्‌ बंडलबाजी त्यांत?.....नरो वा कुंजरो वा......!! काय?.....
आणि ’नरो वा कुंजरो वा ’ पंचतं च’..............ठाऊक आहे ना?"
मी अन्‌ भाल्या," तें कसं काय ’पंचतं च’ रे अन्या......‘ओं?"
सगळ्या गॅंग ची कींव करत अन्या म्हणाला," लेको पंचणाराच.....अगदी शंभर टक्के पंचणारच.....
साले हो..... तुमच्या ’पे-लोड’ ना ’ट्वेंटी-ट्वेंटी ग्रोव्हर’ कुठं माहीताय्‌?.......ऑं ? !!!!" 
आ वांसलेल्या गॅंग कडं तुच्छतेनं बघत ’ट्वेंटी-ट्वेंटी ग्रोव्हर’ नी आपली कॉलर तांठ केली.....
अन्‌ क्षणार्धांत पांठ फिरवून, स्वतःच्या ’पे-लोड’ वर ’शाईन्‌’ मारायला पसार झाले. !!!!!

वाचकहो, ’ट्वेंटी-ट्वेंटी ग्रोव्हर’ च्या ’टेन-टेन’  गोळ्या अगदी अचूक बसल्या, हे वेगळं सांगायला नकोंच.

नुस्ती ’वैशाली’ ची कॉफी च मिळाली नाही....तर यथावकाश ह्या ’पे-लोड’ नी आमच्या गळ्यांत वरमाला ही घातल्या.....!!
त्या पण ’स्कॉलर’ नवरे गंटवले म्हणून ' शाईन्‌ ' मारत. !!!......आणखी कसला पुरावा हवाय्‌ तुम्हांला?
आतां एकच करा.....ही चित्तरकथा तेंव्हढी आमच्या ’पे-लोड’ नां सांगायला जायच्या भानगडीत मात्र पडूं नकां.
कारण तुमचंही कधीतरी कुठंतरी असं च ’ नरो वा कुंजरो वा’ झालेलं असणारच !!!!!.............काय?
  

*******************************


रविशंकर.

१६ नोव्हेंबर २०१३. 

No comments:

Post a Comment