|| भोले बाबां चं ग्राईप वॉटर ||
संस्कृतातल्या सुभाषितभाण्डारात एक मजेशीर सुभाषित असं आहे…
आशा नाम्ना, मनुष्याणां विचित्रा पदशृंखला |
तेन बध्दाः प्रधांवन्तिर्मुक्तास्तिष्ठन्ति मेरुवत् ||
तात्पर्य, मनुष्य प्राण्यांच्या पायांत ' आशा ' नांवाची एक विचित्र बेडी जंखडलेली असते. त्या बेडी त जंखडलेला माणूस आशापूर्ति सांठी अखण्ड धांवत सुटतो, तर तीतनं मुक्त झालेला माणूस मेरुपर्वताप्रमाणं स्थिरबुध्द राहतो…!!
या आशे ची चांगली बाजू अशी, की ती प्रयत्नवादाची जननी असते…पण मनुष्य एकदां कां आशे ला लागला, की त्याला काय काय करावं लागेल, तें फक्त भोलेबाबा च सांगूं शकतील…!!
तर आमच्या सौ. इंदिराजी या देवभोळ्या वगैरे अजिबात नाहीत, फक्त निखळ देवभक्त आहेत. त्यामुळं च आमच्या घरांत दररोज उठून उपास-तापास, आरत्या-प्रसाद, अंगारे-धुपारे, असलं कांहीही कर्मकाण्ड अजिबात नसतं. अखण्ड चालते, ती दैवतांची केवळ मनोभावें उपासना…
तसं मला स्वतःलाही कसलीं कर्मकाण्डं रुचत-पंचत नाहीत. त्यामुळं घरीं वर्षातनं फक्त दोनच देवकार्यं होतात...पैकीं पहिलं नवरात्रांतले नऊ दिवस दिवेलागणी ला मातोश्रीं चं ब्रह्माकृत शक्तिसूक्ताचं पठण, आणि महाशिवरात्री ला भोले बाबां चं रावण रचित ताण्डवाचं पठण...बस्स… बाकीं इतर कांही नाही…
मातोश्री जगदंबादेवी आणि सोमेश्वर हीं आमची कुलदैवतं, आणि उपास्यदैवतंही आहेत…
पूजाअर्चा-तीर्थप्रसाद इत्यादि कर्मकाण्डांपेक्ष्यां उपास्य दैवतां ना दररोज फक्त ओंवाळून त्यांची अखण्ड उपासना करणं हें आम्हांला तर्कवादानं ज्यास्त पटतं, म्हणून हें सगळं असं आहे…
आजपावेतों आम्ही दर वर्षाआड थोडा थोडा करत जंवळपास ऐंशी टक्के भारत फिरून बघितला.
त्या भ्रमंतीत जिथं जिथं या कुल-उपास्य दैवतांची अधि़्ष्ठानं आम्हांला आढळलीं, तिथं तिथं सौ. इंदिराजी नी कटाक्षानं मला पुढं घालून या दैवतांची जोडीनं दर्शनं घेतलीं… …
आजपांवेतों आमची एकूण बारा पैकीं दहा ज्योतिर्लिंगं बघून झाली, आणि मातोश्रीं ची जंवळपास एकशे दहा देवस्थानं पण बघून झालीं… ...पैकीं शहाण्णव सालीं केलेल्या मध्यप्रदेश भ्रमंतीत उज्जैन मधल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला आम्ही गेलो होतो, तिथला हा भन्नाट अनुभंव… … …
*********************************************************************
,“ अहो...जागे झालां काय तुम्ही…?...उठा आत्तांच्या आत्तां...न् अंघोळ उरकून् तंयार व्हा बघूं पट्कन्...गीझर तांपून आतां वाफा यायला लागल्यायत त्यातनं...उठा म्हणतेय ना ?...कसली मेली झोंप म्हणायची ही… ...कुलदैवताच्या दर्शनाला निघायचंय, तर काय उत्साह शिरलाय अंगात ओंडक्यासारखं लोंळत पडायला… ...वा...वा...वा...छा s s s s s s s न...”
सौ. इंदिराजी नी असं वंतवंतत माझ्या अंगावरची जाड दुलई खंस्सदिशी ओंढून कांढली...न् मी धंडपडत-डोंळे चोंळत-कसाबसा उठलो झोंपेतनं… …,“ अहो जरा…”
सौ. इंदिराजी नी बखोटी धंरून मला उभा केला, आणि स्नानगृहाकडं ढंकलत गंरजल्या, “ जरा नाही, न् बिरा नाही...अंघोळ बिंघोळ उरकून तंयार व्हा लगेच...साडे सात होत आलेत...महाकालेश्वराच्या दर्शनाला जायचं आहे आत्तां… ...विसरलात की काय तुम्ही ?…ऑं ?...की कालचा तो शिसा भिनलाय डोंक्यात अजून ?”
झालं होतं असं, कीं आदल्या दिवशीं उज्जैन नगरी फिरून बघतांना तिथल्या जंतर मंतर वर, तें दांखवायला पाहुण्यांना घेऊन आलेला माझा महाविद्यालयीन दोस्त विनोद शर्मा अचानक च भेंटला होता...तो मूळचा भोपाळचा, पण गेल्या कांही वर्षांपासून उज्जैन ला स्थायिक झालेला होता… …
कितीतरी वर्षांनीं अशी अचानक गांठ पडली, न् विनोद नं आग्रह करकरून सायंकाळीं त्याच्या घरीं आम्हांला भोजनाला बोलावलं…
मे महिन्यातल्या कडक उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणून त्यानं थंडगार बीअर च्या दोन बाटल्याही आणून ठेंवलेल्या होत्या. मग निवांत दोन तीन तास सगळ्या जुन्या आंठवणी नां उजाळा देत गप्पा-टप्पा झालेल्या होत्या...विनोद ची बायको विशाखा पण चांगलीच बोलघेवडी, आणि मुळात पंजाबी कुटुंबातली असल्यानं पुढारलेली पण होती… आमच्या सौ. इंदिराजी जरा मोजकं च बोलणा-या, पण विशाखा नं बघतां बघतां त्यांच्याशी पण चांगलं संधान जुळवलं… …
तिनं ' तुम्ही बीअर घ्याल कां थोडीशी ?’ असं विचारल्यावर सौ. इंदिराजी नी जेव्हां ' तें मद्य असतं ना ?’ असं विचारलं, तेव्हां विशाखा काय समजायचं तें समजली, न् तिनं दोघींसाठी शीतपेयं बनवली...आणि मग बीअर च्या बाटल्या मला न् विनोदला च संपवाव्या लागल्या होत्या… …
निरोप घेऊन निघतांना विनोद सौ. इंदिराजी नां म्हणाला, “ मग उद्यां चा काय कार्यक्रम आहे भाभीजीं चा ?”
सौ. इंदिराजी नी मग त्यांना ' भगवान शिव ' हें आमचं कुलदैवत आहे, म्हणून उद्यां महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचा बेत आहे ' म्हणून सांगितलं…
तेव्हां विनोद मला डोंळे मिचकांवत म्हणाला होता..., “ नाना… ...इथं फक्त महाकालेश्वराचं दर्शन घेऊन ज्योतिर्लिंगा ची यात्रा संपन्न होत नाही...तें झाल्यानंतर तिथनं जंवळच असलेल्या कालभैरवाचंही दर्शन घेऊन तिथं भोग चंढवायचा प्रघात आहे… ...तेव्हां भाभीजी नां कालभैरवाच्या दर्शनालाही न विसरतां घेऊन जा...महाकालेश्वर मंदिरातले उपाध्याय तसं सांगतीलच तुम्हांला… ...काय ?”
मला न् सौ. इंदिराजी ना फारसा कांही बोध झाला नाही, पण आम्ही होकारार्थीं मुण्ड्या डोंलवल्या होत्या… …
मी टॉवेल उचलत सौ. इंदिराजी नां विचारलं, “ म्हणजे...काय म्हणायचं आहे नेमकं तुम्हांला ?”
सौ. इंदिराजी आणखीन च चिडल्या, “ उगाच वेड पांघरून पेडगांवचा रस्ता धंरूं नकां… … तुम्हांला ठाऊकाय मला काय म्हणायचंय तें ... "
मी समजूत कांढायचा सूर लावला,“ म्हणजे विनोद शर्मा बद्दल बोलताय काय तुम्ही ?… ...अहो, त्यानं काल जे आणलं होतं ना, ती दारू नव्हती… ...बीअर म्हणतात त्याला...ते शीतपेयांसारखंच असतं…औषधापुरतं च मद्य असतं त्यात...कळलं ?”
सौ. इंदिराजीं चे डोळे आतां चांगलेच बारीक झाले,“ फुकट शेंडी लावायला जायचं नाही मला… समजलं ?…बघितलंय मी स्वतः च, कसल्या रॉकेल च्या शिशाएव्हढ्या हांतभंर उंच बाटल्या होत्या त्या…"!!
मी मग नको तेव्हां वकिली पवित्रा घेतला, “ हें बघा...माझं ' सुरां ' बरोबर उत्तम जमतं, असं सगळेच म्हणतात...बरोबर ना ?”
सौ. इंदिराजी मख्ख च, “...बरं……..म s s s s s s ग ?”
आमच्या सौ. इंदिराजी मुळात दाक्षिणात्य...मग मी त्यांच्याकडं च निर्देश करत टांग मारली, “ आणि ' असुरां ' बरोबर पण माझे सूर चांगले जुळतात… !!!...काय ?… ...पण ' सुरे ' बरोबर माझं फारसं जमत नाही, हें तुम्हांला तरी ठाऊक असायला हंवं …”
सौ. इंदिराजी सर्वोच्च न्यायालयातल्या वकिली ची सनद कांढूनच जन्मलेल्या… …
त्यांनी मला च चितपट लोंळवला, “ फारसं जमत नाही… ...म्हणजे बुधलाभंर ढोंसत नाही…!!!...होय ना ? … ...असल्या ' सुरां ' पेक्ष्या ' असुर ' च काय, ' बेसूर ' ही बरे …!!!...समजलं ?
लॉजवर परत येतांना रस्त्यानं झोकांड्या खात आलां नाहीत… ...नशीब माझं… …!!!
...तुमचे सगळे लंगोटीयार असलेच आहेत काय… ...बाटल्या च्या बाटल्या रिचंवणारे?...ऑंं ?”
प्रकरण फार तांपवून चालणार नव्हतं… ...म्हणून मग मी टॉवेल-कपड्यां चं पांढरं निशाण फंडकवलं, आणि ' बं बं भोलेनाथ ' चा गजर करत स्नानगृहाकडं धूम ठोंकली… …!!!
सगळीं आंवराआंवर करून पोषाख चंढवून मग आम्ही निघालो...वाटेवरच्याच एका उपाहारगृहांत उपवासी नाष्टा उरकून घेतला, आणि भोलेबाबांच्या दर्शनार्थ महाकालेश्वर मंदिराकडं मोर्चा वंळवला… …
चौदाव्या शतकातलं हेमाडपंती बांधणीचं महाकालेश्वर मंदिर म्हणजे शिलपकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. तिथं पोंचल्यावर प्रवेशद्वारापासूनच लागलेली भलीमोठी दर्शन रांग बघून सौ. इंदिराजी जरा चंपापल्याच…, “ केव्हढी दांडगी रांग लागलीय हो ही… ...इथं रांगेत दिवसभंर तांटकळून नुस्तं दर्शन झालं, तरी नशीब च म्हणावं लागेल… ...तरी सांगत होते कोंकलून तुम्हांला... ... लंवकर आंवरा म्हणून… …”
मी फक्त खांदे उडवले…, “ चिंता करूं नकां तुम्ही… ...भोलेबाबा घेतील आपली काळजी बरोबर…तुम्ही इथं च थांबा रांगेत...मी आजूबाजूला जरा वास कांढून येतो ' किती वेळ लागेल ' याचा…”
सौ. इंदिराजी कुलपतीं चं दर्शन करायचं म्हणून अगदी पारंपारिक रोजच्यासारखंच ठंसठंशीत कुंकू बिंकू लावून वेणीत मोग-या चा गजरा माळून आलेल्या होत्या…
त्यांनी बटव्यात खुडबुड करून पांचशे ची नोट कांढून माझ्या हातात दिली, “ चंवकशी तर कराच किती वेळ मोडेल याची...आणि साग्रसंगीत पूजासाहित्याचं छानसं तबक पण घेऊन या पटकन् "
मी मग देवळाच्या दोन्हीं अंगांना हारीनं लागलेल्या पूजासाहित्याच्या दुकानांत फेरफंटका मारला...तिथल्या दुकानदारांनी सांगितलं की ' कांही चिंता करूं नकां साहेब… ...इथं दररोज च अशी तोबा गर्दी उसळलेली असते… ...पण पोलीस फटाफट् रांग हंलवतात...साधारण तासाभंरात दर्शन होईल तुमचं… ...चपला-बूट ठेंवा हंवे तर इथं च…”
मी मग एका दुकानातनं पूजा साहित्यानं गंरगंरीत भंरलेलं तबक खरेदी केलं, न् परत सौ. इंदिराजींकडं आलो, “ हं हें घ्या...पूजे चं तबक...आहे ना तुम्हांला हंवं तसं ?...जरा महाग पडलं...पण…”
सौ. इंदिराजी नी मला मध्येच तोंडलं, “ वा...छान आहे की तबक… ...आणि हें बघा...महाग वाटतंय म्हणून घांसाघीस केलीत की काय तुम्ही दुकानदाराबरोबर ?…ऑं ?...नाहीतर तुमचं म्हणजे ना...नको तिथं कर्णावतार, न् नको तिथं घांसाघीस...काय ?”
मी, “ कळतंय मला तेंव्हढं...हं... हे घ्या उरलेले दोनशे…”
सौ. इंदिराजी तश्या व्यवहारी… ...त्यांनी मग त्यांतली शंभराची एक नोट स्वतःजंवळ ठेंवली, न् दुसरी माझ्या हातात दिली, “ हे बघा...दर्शन जरी जोडीनं झालं ना, तरी हें वेंगळं वेंगळं च ठेंवायचं देवाला...आणि प्रसाद पण वेगवेगळा मागून घ्यायचा पुजा-याकडून...समजलं नीट ?...एकानं च हंजार जरी अर्पण केले ना देवाला, तरी पुजारी एक च नारळ देतात मेले… ...तेव्हां प्रसादाचे नारळ पण वेगवेगळे मागून घ्यायचे......त्यातला एक वाटा आपण बरोबर नेऊं घरीं, आणि दुसरा इथंच तुमच्या शर्मां च्या घरीं द्यायचाय… ...नीट लक्ष्यात ठेंवा सगळं…”
आमचं नशीब त्या मुहूर्ता ला जोरावर असावं… …
दुकानदारानं सांगितल्यानुसार सुमारे पाऊण तासातच आमचा नंबर लागला, आणि आम्ही भोलेबाबांच्या गाभा-यात शिरलो एकदाचे… …
गाभा-यातलं दगडी गोपुर आणि त्याच्या तळाशीं छोट्या सुबक गाभा-यात स्थापन केलेलं तें स्वयंभू ज्योतिर्लिंग बघून डोंळ्यां चं पारणं फिटलं… …
मग समोर बसून तांडव पुटपुटत भोलेबाबांची जोडीनं यथासांग पूजा केली, आणि सौ. इंदिराजीं चा चेहरा उजळला…, “ बरं झालं बाई...महादेवाला च काळजी आपली म्हणायला पाहिजे...नाहीतर असल्या तोबा गर्दीत मनासारखी पूजा तरी हातनं धंड होतीय की नाही कांही कळत नव्हतं… ...घोर च लागलावता जिवाला…”
मी फक्त मान डोलवली…न् पुजा-या ला विचारलं, “ झालं ना सगळं प्रथेनुसार यथासांग…?”
“ इथलं सगळं झालं साहेब …”, पुजा-या नं सांगितलं.
, “ म्हणजे ?...अजून कांही राह्यलंय काय ?”...सौ. इंदिराजी.
तेव्हां आदल्या दिवशीं विनोद नं जें सांगितलं होतं, तें च पुजा-यानं पण सांगितलं…
, “...माई...इथलं झालं सगळं यथासांग...पण या ज्योतिर्लिंगाची यात्रा इथल्या कालभैरवनाथा चं दर्शन करून तिथं भोग चंढवल्याशिवाय संपन्न होत नाही...तेव्हां तें ही करून घ्या...इथनं जंवळच क्षिप्रा नदी च्या पलीकडच्या भागात तें मंदिर आहे...रिक्षा नं तिथं पोंचायला पंधरा-वीस मिनिटं च लागतात फक्त…”
एव्हढं सांगून पुजा-या नं हळद-कुंकू-नारळ-इ. प्रसादा चे दोन पुडे बांधून सौ. इंदिराजीं च्या हातांत दिले, आणि आम्ही भोलेनाथांच्या मंदिरातनं बाहेर पडून रस्त्यावर आलो… …
मी, “...ज्योतिर्लिंगा चं दर्शन तर छान च झालं...नाही ?...आतां काय करायचं पुढं "
सौ. इंदिराजी, “ काय करायचं म्हणजे काय ?...रिक्षा बघा पटकन्...कालभैरवा च्या दर्शनाला जायचं…”
तोंपावेतों पोटात भोजनाच्या भुकेची जाणीव व्हायला लागलेली होती…
मी, “ ठीकाय...पण असं बघा...आतां पाऊण वांजत आलाय… ...या गर्दीतनं तिथं पोंचायला अजून अर्धा तास तरी लागेल असं मला वाटतंय...म्हणजे जंवळजंवळ सव्वा वाजणार तिथं पोंचायला...आणि तिथंही बहुधा इथल्यासारखीच दर्शनाची गर्दी उसळलेली असणार… ...तिथं रांगेत च जर पोंटांत कावळे कोंकलायला लागले, तर काय करायचं मग ?...तेव्हां आपण…”
सौ. इंदिराजी नी च माझं वाक्य पुरं केलं, “...तेव्हां आपण भंरपेट जेवणखाण करून मग तिकडं जाऊंया...असं च ना ?… ...बाई...बाई...बाई...तुम्हांला ना...सदा न् कदा खादडीची च चिंता लागलेली…!!...नाही ?...इथं आलोय कश्याला आपण, आणि तुम्हांला चिंता कश्याची लागलीय...वा वा...छान...हें बघा...आज कधी नव्हे तो पटापट मनसोक्त देवदर्शनं घंडायचा योग उगवलेला दिसतोय...कळलं?...तेव्हां कुरकुरायचं नाही अजिबात… ...चला रिक्षा बघा पटकन् आधी… ...खाण्यापिण्याचं सगळं नंतर बघूं दर्शन झाल्यावर… ...आणि एक वेळ अगदी उपास घडला, तरी कांही आभाळ कोंसळणार नाहीय आपल्या टांळक्यांवर...तेंव्हढंच पुण्य पडेल पदरांत… ... समजलं ...?”
माझ्या तोंडाला अशी सफाचट पट्टी मारून मग सौ. इंदिराजी नी हातातल्या थैलीतनं बटाट्याच्या उपासाच्या चिवड्याचं एक मोठ्ठं पुडकं माझ्या हातांत कोंबलं…, “ हं हें ठेंवा तुमच्याजंवळ… ...आणि रांगेत असतांना पोटात कावळे कोंकलायला लागलेच, तर हें च हादडा…!!!...काय ?”
' सौ. इंदिराजी उवाच ' पुढं आमची काय मात्रा चालणार ?
मी मुकाट तें पुडकं कांखोटीच्या थैलीत भंरलं, समोरनं जाणा-या रिक्षा ला हात दांखवला, आणि आम्ही साधारण दुपारीं दीड च्या सुमाराला कालभैरवाच्या मंदिरात पोंचलो… … …
तें मंदिर पण महाकालेश्वराच्या मंदिरासारखंच हेमाडपंती बांधणी चं अप्रतिम शिलपकला असलेलं मंदिर होतं… ...महाद्वार बघतांच आम्ही खूष झालो, न् भुकेचाही जरा विसर च पडला…
कालभैरवाच्या देवळातही दर्शनाला भंली मोठी रांग लागलेली होती…
झालं...सौ. इंदिराजी नी परत एकदां पिशवीत खुडबुडून माझ्या हातात हंजाराची नोट ठेंवली, “ हे बघा...मी थांबते इथं च नंबर लावून रांगेत...तुम्ही पूजासाहित्याचं तबक, भोग, सगळं घेऊन या… ...आणि जरा चंवकशी पण करून या काय कितीसा वेळ लागेल दर्शन व्हायला तें...कळलं ?”
मी नोट खिश्यात ठेंवली, न् आजूबाजूच्या पूजासाहित्याच्या दुकानांकडं मोर्चा वळवला...त्यातल्या त्यात एक दुकानदार भैयाजी जरा बरे दिसले, न् मी तिथं थांबून दुकान न्याहाळायला लागलो… …
समोरच्या फळीवर हळद-कुंकू-अष्टगंध-बुक्क्याचे ढीग लावलेल्या परातीं ठेंवलेल्या होत्या, शेंजारी नारळांचा ढीग, आंतल्या दुकानातलं ठार कांही दिसत नव्हतं, इतक्या टपरी च्या छताला रंगीबेरंगी फुलांच्या माळा लंटकत होत्या…
त्या जरा बाजूला सारून मी थोडासा आंत गेलो, न् दुकानातलं साहित्य बघायला लागलो.
समोर भोलेबाबांच्या नानाविध अवतारांतल्या तसबिरी मांडलेल्या...पलीकडं साखर फुटाणे-बत्ताश्यांची ताटं भंरून ठेंवलेलीं दिसत होतीं, त्या शेंजारीच काळीं आणि पांढरी शिवलिंगं ओंळीनं मांडून ठेंवलेलीं...पलीकडं भस्मा चे राखाडी गड्डे, रुद्राक्षांच्या माळा ठेंवलेल्या होत्या…
शेंवटीं सगळा्यात पांठीमागं असलेल्या कांचेच्या कपाटांकडं माझं लक्ष्य गेलं, न् मला जागच्या जागीं घेरी यायची च काय ती बाकी राहिली… …
त्या कांचेच्या कपाटांत चक्क दारू च्या भंरलेल्या बाटल्या ओंळीनं मांडून ठेंवलेल्या दिसत होत्या…!
गंमत म्हणजे आ s s s s s गदी जॅक डॅनियल्स, रेड नाईट, ओल्ड स्मगलर सारख्या स्कॉच पासून तें थेट नारंगी मोसंबी सारख्या अस्सल देशीं मालापर्यन्त तमाम सगळे प्रकार तिथं हंजेरी लावून रांगेत बसवलेले होते… …!!
महागंमत म्हणजे त्यापुढच्या रांगेत कांही ग्राईप वॉटर च्या बाटल्याही हारीनं मांडून ठेंवलेल्या दिसत होत्या…!!!
शिवाय समोर विकायला ठेंवलेल्या पूजासाहित्याच्या तबकांतही एकेक बाटली ठेंवलेली दिसत होती… …!!!!
तें बघून माझी दांतखीळ च बसायला लागली…
मी मग गल्ल्यावर मांडी ठोंकून बसलेल्या ' भैय्याजी ' नां हंळूच पाचारण केलं…
भैयाजी खोः खोः हंसले, “ या साहेब...पुण्याचे काय तुम्ही ?”
मी, “ होय...पुण्याहून आलोय आम्ही...काल महाकालेश्वराचं दर्शन झालं...तिथल्या पुजा-यानीं सांगितलं, की तें झाल्यावर मग इथं कालभैरवाचं दर्शन घेऊन भोग चंढवून प्रसाद ग्रहण केल्याशिवाय महाकालेश्वराच्या ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल होत नाही… …
म्हणून आज आलोय इथं दर्शनाला… ...एव्हढ्या गर्दीतनं कितीसा वेळ लागेल हो दर्शन व्हायला ?”
भैयाजीनी सांगितलं, “ ही अशी गर्दी इथं रोज च असते साहेब...पण पोलीस भंराभंर संरकवतात पुढं लोकांना...कांही चिंता करूं नकां तुम्ही...तासाभंरात दर्शन होईल तुमचं...घ्या...हें पूजासाहित्याचं तबक घ्या...न् चपला-बूट ठेंवा इथंच हंवे तर…
आणि प्रसाद घेऊन झाला, कीं या निवांत परत...कुठलं तबक देऊं साहेब ?...हें दीडशे चं आहे...हें तीनशे चं...आणि हे सातशे चं आहे…”
सगळ्या तबकांतलं सामान तर जंवळपास सारखंच दिसत होतं...मग मी विचारलं, “ भावांत इतका फंरक कश्यामुळं भैयाजी ?”
भैयाजी हंसले, “ भोगा च्या बाटल्यामुळं असा फंरक आहे किंमतीत साहेब…”
मला कांही कळलं नाही...मी मग तबकातल्या बाटलीकडं बोंट दांखवत विचारलं, “… ...म्हणजे भैयाजी ?… ...अभिषेक वगैरे करावा लागतो काय तिथं देवाला ?”
भैयाजी आतां पोंट घंरून हंसायला लागले, “होः...होः...होः...होः...बरोबर आहे साहेब...पुण्याचे बम्मन ना तुम्ही ?...तुम्हांला इथलं कांहीच माहीत नसणार… …
त्याचं काय आहे साहेब...की कालभैरव हें भोलेबाबांचं च रूप...पण तें कापालिक सांप्रदायीं शिवभक्तांचं उपास्य दैवत असल्यानं त्याला दारूचा च भोग चंढवावा लागतो...आतां दर्शन करतांना बघाल तुम्ही...आंतले पुजारी बाटलीतला थोडा नैवेद्य देवाला पांजतात, आणि उरलेली बाटली प्रसाद म्हणून देतात परत…”
मी, “...बापरे...आणि तो च प्रसाद आम्ही घ्यायचा?...म्हणजे...नारळ,बत्तासे असलं कांही देत नाहीत प्रसाद म्हणून ?”
भैयाजी, “ नाही साहेब...तें सगळं पूजेत खर्च होतं… ...उरलेली बाटली च फक्त प्रसाद म्हणून परत देतात… ...तो च घेऊन टांकायचा, न् काय… ...”
मी आतां भैयाजीं च्या देखत च कपाळाला हात लावला…!!!
, “ आणि भैयाजी...ह्या देशीं दारू च्या बाटल्या पण प्रसादाच्या ?…मग यापेक्ष्या तें पलीकडं ठेंवलेलं ग्राईप वॉटर नेलं भोग चंढवायला, तर नाही काय चालत ?”
भैयाजी नी आतां भंरगच्च मिश्यांवर तांव दिला, “ साहेब...तो सगळा हातभंट्टी चा माल आहे...पहिल्या धारे चा…!!!
अहो हातभट्टी चा माल भंरायला ला देशी-विलायती दारूसारख्या बाटल्या थोड्याच मिळणार ?...तीं कुठल्या मिळेल त्या बाटल्यांत भंरली जाते साहेब… ...अहो, भोलेबाबां ना सगळे भक्त सारखेच...ज्यानं त्यानं आपापल्या ऐपतीनुसार भोग चंढवावा...काय ?...हें विलायती चं तबक च घ्या साहेब...तुमच्यासारख्यांना बाकीचं कांही रुचणार नाही…”
मी मग भैयाजी नां लोटांगण घातलं…, “ बीबीजी आहेत रांगेत उभ्या...त्यानां च विचारून येतो भैयाजी...थांबा जरा "
मी भंराभंर चालत रांगेत उभ्या असलेल्या सौ. इंदिराजी नां गांठलं, न् त्यांना सगळं रामायण सांगितलं… …
तें ऐकल्यावर सौ. इंदिराजीनी ' शिव शिव ' करत भंर रांगेतच कपाळाला हात लावला …!!!
, “ शीः...शीः...शीः...कसल्या हो या प्रथा...कुणी तळीरामा नं च बांधलेलं दिसतंय हें मंदिर बहुतेक... काय करायचं आतां ?”
मी फक्त खांदे उडवले, न् मौनव्रत धांरण केलं… …
रांगेत आतां आमच्या पुढं चार-पांच च माणसं राहिलेलीं होतीं… …
सौ. इंदिराजी विचारात पडल्या, पण क्षणभंरच, मग त्यानी च तोंड उघडलं, “ हे बघा...हें म्हणजे आतां ' आलिया भोगासी…’ सारखं लचाण्ड होऊन बसलंय बोकाण्डीला...आतां इथनं परत फिरून हें दर्शन चुकवलं, तर इतकी धंडपड करून केलेलं ज्योतिर्लिंगाचं दर्शनही वाया जाणार… ...असं करूंया...तुम्ही इथं च थांबा...मी बघते काय करायचं तें…”
इतकं सांगून सौ. इंदिराजी मी दांखवलेल्या दुकानाच्या दिशेत गायब झाल्या… …
आणि दहा मिनिटांतच पूजासाहित्याचं तबक घेऊन परत आल्या… … …
आणि त्यांच्या हातांतल्या तबकातली ' ग्राईप वॉटर ' ची बाटली बघून मग मी कपाळावर हात मारून घेतला…!!!
, “ अहो...हें...हें...काय घेऊन आलाय तुम्ही ?...कळतंय तरी काय तुम्हांला...ऑं ?...अहो मला तरी सांगायचं होतं तबक आणायला…मी आणलं असतं बघून सगळं...”
सौ. इंदिराजी नी ओंठांवर तर्जनी ठेंवत मला गप्प रहायची खूण केली, “ कळतंय मला...काय आणायचं, न् काय नाही तें...समजलं ?”
मी, “ काय कळतंय तुम्हांला यातलं…?”
सौ. इंदिराजी नी आतां मला च चितपट धोबीपछाड मारली, “ तुम्ही न् तुमचे लंगोटीयार दोस्त उड्या मारत जें ढोंसतां ना, तें च आहे हें…!!!...कळलं ? ...काय झालं ना, की दारू ची बाटली पूजेच्या तबकात ठेंवून देवळात जायची इतकी शरम वाटायला लागली मला, की मग त्या भैया दुकानदाराला मी च तें ह्या ग्राईप वॉटर च्या बाटलीत भंरून द्यायला सांगितलं… ...सातशे च्या नोटा वांजवल्यावर मेल्या नं उड्या मारत दिलं भंरून…!!!...काय ?
खरंच धन्य आहांत तुम्ही लोक… ...काल भगवान महाकालेश्वर पांवले, न् आज कालभैरवनाथ हें असे भंरभंरून पावले तुम्हांला… …!!!...चला आतां...पुजारी बोलावतोय आपल्याला गाभा-यात…”
आमची जोडीनं कालभैरवनाथाची पूजा पण यथासांग पार पडली. मग पुजा-या नं तबकातली बाटली एका वाडग्यात अर्धी ओंतून घेतली, आणि वाडग्यातला द्रव कालभैरवाच्या विक्राळ तोंडात सावकाश ओंतला… ...मिनिटभंरात गुड गुड आवाज होत वाडगा रिकामा झाला. आणि उरलेली बाटली त्यानं प्रसाद म्हणून आम्हांला परत दिली.
आणि
आमची दहाव्या ज्योतिर्लिंगाची
यात्रा अखेर सुफळ संपूर्ण
झाली एकदाची… …
पूजा
आटोपल्यावर मग आम्ही गाभा-यातनं
बाहेर पडून मंदिरामागच्या
विशाल प्रांगणात बाहेर आलो…
सभोंवती नजर फिरवली, न् आम्ही दोघांनी तत्त्क्षणीं एकमेकांकडं आं वांसून बघत कपाळांना हात लावले…!!
आवारात ठिकठिकाणीं माणसं कोंडाळीं करून बसलेलीं होतीं...मधोंमध ज्यांच्या त्यांच्या ऐपतींनुरूप आणलेल्या कालभैरवाच्या प्रासादाच्या बाटल्या, आणि चिवडे-फरसाण-शेंगदाणे-मटण -मासे, असलीं खाद्यं मांडून भैरवभक्तांचं मजेत ' प्रसाद ग्रहण ' चाललेलं होतं… …!!!
तें बघून सौ. इंदिराजी म्हणाल्या, “ चला लौकर इथनं...लॉज वर जाऊंया परत...तीन वांजत आलेत, आणि पोंटांत कावळेही कोकलायला लागलेत आतां… ...चला लवकर.”
मी हातातली ' ग्राईपवॉटर ' ची बाटली त्यांना दांखवली… ...हें असंच घेऊन लॉजवर परत जाणं शक्य नाही आतां इंदिराजी… ...तिथं बाहेरनं मद्य आणायला बंदी आहे…!!! "
सौ. इंदिराजी नां आतां कुठं ध्यानांत आलं, की काय लचाण्ड होऊन बसलं होतं तें…
सौ. इंदिराजी , “ अहो खरंच की...बरोबर आहे तुम्ही म्हणताय तें… ...काय करायचं आतां आपण ?”
मी, “ लॉजवर च काय, हें घेऊन बाहेर कुठंही जाणं पण अवघड आहे आपल्याला…”
सौ. इंदिराजी, “...कांहीतरीच बोलूं नकां तुम्ही… ...हें पिशवीत टांकून नेतां येईल की आपल्याला कुठंही...चला...आधी जेवण उरकून घेऊंया जंवळच कुठंतरी…”
मी मग त्यांना गोची काय झाली होती, ती समजावून सांगितली, “ त्याचं काय झालंय इंदिराजी, की चांगल्या दर्जाच्या दारू च्या बाटल्यांची बुचं असतात ना, तीं गळतीरोंधक बनवलेलीं असतात… ... हें आपण ' ग्राईप वॉटर ' च्या साध्या बाटलीत भंरून घेंतलंय...आतां ही बाटली पिशवीत कोंबून कुठं जातांना जर पिशवीतच गळती लागली, तर आख्ख्या आसमंतात दारू चा वास घंमघंमेल… ...मग काय करायचं आपण ?...हें बघा कसं असतं तें…
मी मग हातातली ' ग्राईप वॉटर ' ची बाटली सौ. इंदिराजी नां नुस्ती उलटी करून दांखवली, आणि तिच्या बुचातनं थेंब थेंब जमिनीवर गळायला लागले…!!!
आतांं सौ. इंदिराजी नी कपाळाला हात लावला…, “ खरंच...महा लचाण्ड च होऊन बसलंय हो हें...आतां करायचं काय आपण ?”
मी त्यांना म्हटलं, “ जरा गप्प रहा तुम्ही...मी च बघतो आतां काय करायचं तें…”
मी मग तत्त्क्षणीं विनोद ला दूरध्वनि लावला, न् त्यानं तो लगेच उचलला पण, “ काय नाना ?...झालं काय कालभैरवा चं दर्शन यथासांग ?...मझा आया की नही ?”
मी, “ कसला मझा न् काय साल्या… ...अडकून पडलोय देवळातच...कुठायस तूं आत्तां ?”
विनोद, “ कुठाय म्हणजे ?...घरीं च आलोय जेवायला...आज जरा उशीरच झालाय घरीं यायला…”
मी, “ जेवणं झालीं काय तुमची ?”
विनोद, “ नाही रे बाबा...विशाखा कबाब भांजतीय आंत...तंयार झाले की बसणार जेवायला...येताय काय इकडंच जेवायला ? ”
मी, “ बं बं भोलेनाथ… ...भाभी ना सांग चार माणसांसाठी कबाब बनवायला, न् साल्या सगळा जामानिमा पिशव्यांत भंरून तुम्ही च या आतां इकडं झंटक्यात सगळी गोची निस्तरायला … …”
विनोद, “...च्यायला...काय गोची झालीय रे बाबा तुमची ?”
मी, “...तें इथं आलात की सांगतो सगळं...पोंटांत कावळे कोंकलायला लागलेत, आणि इथनं बाहेर पडतां पण येईनासं झालंय… …”
विनोद, “ कां रे बाबा...ज्यास्त झाला की काय प्रसाद तुला ?”
मी, “ सांगतो सगळं तुला...आधी इकडं ये डबा घेऊन झंटक्यात...वाट बघतोय आम्ही तुमची...कळलं ?”
विनोद, “ ठीकाय...बेफिक्र रहो जनाब बिल्कुल...बंदा हाजिर हो जाएगा आप की खिदमत में ठीक आधे घंटे के अंदर… ...ए विशाखा… ...अगं चौघांसाठी भाज कबाब...नाना चा फोन आलाय आत्तांच, की कालभैरवाच्या देवळात दोघे अडकून पडलेत म्हणून...निघायला हंवं पटकन आपल्याला...”
पंधरावीस मिनिटांनी विनोद-विशाखा भाभीं ची जोडगोळीं हातातल्या पिशव्या सांवरत आम्हांला शोंधत हंजर झाली, न् सौ. इंदिराजी नी सुटके चा श्वास टांकला… …”
माझ्या हातातली भोलेबाबांच्या ' ग्राईप वॉटर ' ची बाटली बघून दोघांना काय झांलं होतं, तें बरोबर समजलं… …
तसा टारगट विन्या खोः...खोः...खोः...करत हंसायला लागला, न् विशाखा भाभी पण तोंडाला दुपट्टा लावून फिसफिसायला लागल्या…!!!
मी, “ विन्या...साल्या...अरे काल सांगायचंस तरी की हें दर्शन म्हणजे काय प्रकार असतो तें…”
विन्या खीः खीः खीः करत म्हणाला, “ नाना...अरे मग असली भन्नाट मजा कशी काय अनुभंवायला मिळाली असती तुम्हांला…?...आणि समज, की जर सांगितलं असतं काल तुम्हांला सगळं, तर हें दर्शन तुम्ही रहित केलं असतं काय ?”
मग विशाखा भाभी नी तोंड उघडलं… ...," चला भाभीजी...आधीच पोंटांत कावळे कोंकलायला लागलेत सगळ्यांच्या...जेवून घेऊंया लगेच…”
मग विशाखा भाभी न् सौ. इंदिराजी डबे उघडायला लागल्या…
मी मग हातातल्या बाटली कडं बोंट दांखवत विनोद ला म्हटलं, “ ह्या चं काय करायचं रे विन्या ?...हें असं बाहेर कुठंच नेतां येई ना, म्हणून तर अडकून पडलो इथं, न् तुला फोन करावा लागला…”
विनोद नं हातातल्या बाटलीकडं बघितलं…, “ नाना...साल्या काय रे हें ?...यू टू ?”
मी सौ. इंदिराजीं कडं बोंट दांखवलं, “ तूं समजतोयस तें हें नाहीय विन्या… ...इंदिराजी नी स्वतः च आणलंय हें दुकानातनं…”
विनोद, “ कुठला ब्रॅंड आणलाय भाभीजी नी हा ?”
मी खांदे उडवले…
विनोद, “ भाभीजी...कुठला ब्रॅंड तुम्हांला दिलाय हा दुकानदारानं ?”
सौ. इंदिराजी, “ नीटसं कांही कळलं नाही मला...पण तें तस्कर असतात ना ?...तसलं कांहीतरी नाव सांगितलं त्यानं...अहो दारू ची बाटली पूजेच्या तबकात ठेंवून देवळात न्यायची मलाच इतकी शरम वाटायला लागली ना..., म्हणून मी च त्याला सांगितलं, की ती बाटली फोड, न् ह्या बाटलीत भंरून दे म्हणून…”
विनोद, “ किती पैसे घेतले त्यानं तबकाचे भाभीजी ?”
सौ. इंदिराजी, “ सातशे घेतले… ...त्यानं दुसरीं स्वस्तातलींं तबकं पण दांखवली...पण मी च सांगितलं की हें च दे म्हणून… ...म्हटलं देवकार्य आहे...कुठं कांही कमी पडायला नको...होय की नाही ?”
विन्या चा चेहरा आतां उजळला, “...क्या बात है...आपकी परख का भी जवाब नही भाभीजी ...नाना...अरे ही स्कॉच आहे…' ओल्ड स्मगलर ' यार…!!”
मग तो विशाखा भाभीं कडं वळला, “ विशू...हें बघ...हे इथं टांकूनही देतां येत नाहीय, न् बाहेरही घेऊन जातां येत नाहीय...आतां समजलं नाना-नानी इथंच कसे अडकून पडले ते ?...तेव्हां हें आतां इथं च संपवणं भाग आहे… ...आतां असं करूं या...तुुम्ही दोघीं शास्त्रापुरतीं बोटं बुडवून चांखा हा प्रसाद, जेवा पोंटभंर, न् भाभीजी ना सोबत घेऊन इथला मायाबाजार फिरव त्यांना, आणि फिरून झालं तुमचं, की सरळ रिक्षा पंकडून घरीं जा दोघी...काय ? पांठोपांठ आम्ही येतोच इथलं सगळं आंवरून...चला प्रसाद घ्या भाभीजी…तुमचा मान पहिला...!!!”
सौ. इंदिराजी त्या उघडलेल्या ' ग्राईप वॉटर ' च्या बाटलीकडं कसनुसं तोंड करून नुस्त्याच बंघत राहिल्या… …
विनोद मग विशाखा भाभींकडं वळला…, “ विशू...असं कर...तूं च घे प्रसाद सर्वप्रथम...म्हणजे मग भाभीजी नां पण कांही अवघड वाटणार नाही… ...चला...बं बं भोलेनाथ…” !!!
तसं विशाखा भाभीजी नी बाटलीत एक बोट बुडवून कालभैरवाचा प्रसाद चांखला, मग सौ. इंदिराजी नी पण तोंड कसंतरीच करत तें - पाप-पुण्य काय असेल तें - कर्म पार पाडलं… ...दोघीं जेवायला लागल्या…"
मी, “ विन्या...हें असं देवळाच्या आवारात बसून दारू प्यायची, म्हणजे कसंतरीच वाटतंय बाबा…”
विनोद, “ बाबा रे...इथनं सुटायचं असलं ना तुला, तर तें तुझं सोंवळं बिवळं ठेंव खुंटीला टांगून यार...न् प्रसाद संपवायला लाग झंटक्यात... ...चल उचल ग्लास तुझा...थ्री चीअर्स टु कालभैरवनाथ…”
शेंवटीं मी न् विनोद देवळाकडं पांठ फिरवून बसलो, आणि कालभैरवाच्या प्रसादा चे पेले तिथंच तोंडांना लावून मोकळे झालो… …!!!
बायकांची जेवणं झालीं, न् दोघी जायला निघाल्या, तसा विनोद म्हणाला, “ व्हा पुढं तुम्ही न् काय असेल ती खरेदी एन्जॉय करून थेंट घरीं जा… ...आम्ही येतोच पांठोंपांठ…”
तश्या जायला निघालेल्या विशाखा भाभीजी मागं वळल्या, “ कांही हंरकत नाही आमची...पण घरीं च परत या, म्हणजे झालं…!!!...काय ?”
दोघी पांठी फिरवून निघाल्या, तश्या मी विनोद कडं खत्रुड नजरेनं बघत भिवया उंचावल्या…
विन्या तंसा जाती चा खिलाडू...हातातला ग्लास उंचावत म्हणाला, “ हॅंसो हॅंसो यार...कोई बात नही...घर घर में इंदिराजी ही तो होतीं है… ...वुई बोथ आर सेलिंग इन द सेम बोट… ...बं बं भोलेबाबा…” !!
सगळं आंवरून मग आम्ही रिक्षा पंकडून विनोद च्या घरीं पोंचेंतोंवर संध्याकाळचे सहा वाजत आलेले होते...त्या दोघांनी रात्री च्या भोजनाला थांबायचा खूप आग्रह केला, पण दुस-या दिवशीं पहांटे पांच ची आगगाडी आम्हांला पकडायची होती, त्यामुळं तें कांही जमलं नाही… …
निघतांना विशाखा भाभीजी म्हणाल्या, “ परत या बरं कां नाना लवकरच भाभीजी नां घेऊन…”
सौ. इंदिराजी नां टांग मारायची अशी आयती संधी आलेली...ती मी थोडीच दंवडणार ?… …
मी विनोद कडं बघत डोंळे मिचकांवले, “ एकदम पक्का वादा भाभीजी… ...जाम आवडलं आपल्याला इथलं देवदर्शन… ...आतां लंगोटीयारांच्या जथ्थ्याबरोबर नक्की यायला हंवं परत कालभैरवाच्या दर्शनाला… ...काय विन्या ?”
आणि चप्पल चंढवून निघायला लागलेल्या सौ. इंदिराजी नी तत्त्क्षणीं त्यांच्या ' एक लोहार की ' चा हिसका दांखवला, “...छान च आहे कल्पना… ...नाही कां गं विशाखा ?...फक्त आपापल्या घरांतनं निघतांना सगळ्यांनी कायमचा गाशा गुण्डाळूनच बाहेर पडायचं… …!!!...काय भावजी ?”
आतां विशाखा भाभी तोंडाला दुपट्टा लावून फीः...फीः...फीः...करायला लागल्या… …
आणि मी न् विनोद नं एकमेकांकडं आं वांसून बघत आपापल्या कपाळांवर हात मारून घेतले… …!!!
**************************************************************
-- रविशंकर.
११ ऑगस्ट २०२६.
No comments:
Post a Comment