Search This Blog

Sunday, 22 March 2026

|| राजद्वारे श्मशाने च ||

 || राजद्वारे श्मशाने च ||

,“ ' जीव जडणं ' या शब्दप्रयोगा चा नेमका अर्थ तुला ठाऊकाय ऍरिस्टॉटल ? ” मास्तर त्यांच्या चष्म्याच्या जाड भिंगांआडून मिष्किलपणे मला न्याहाळत विचारते झाले… …

१९७४ सालातल्या दिवाळीतले ते दिवस होते…शीतल हवामानाच्या शरद ऋतूतली ती एक सुखद दुपार होती...

मी आज माझ्या परीनं जो कांही आहे, तसा मला आमूलाग्र घंडवणा-या माझ्या आद्य गुरू श्री. टिकेकर मास्तरांना दिवाळी च्या शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद ध्यायला मी मास्तरांच्या घरीं गेलेलो होतो…

नेहमीप्रमाणं, मला जन्मदात्रीसमान असलेल्या मास्तरांच्या सौ. माई नी माझा आवडता हळिवाचा लाडू देऊन माझी वास्तपुस्त केली, आणि माई नां नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतल्यावर माई नी त्यांच्या आस्थेतला प्रश्न बाहेर काढला,“ काय रे बाबा… … आतां दोनाचे चार करायचं कांही डोक्यात शिरलंय की नाही तुझ्या अजून ?...की ह्यां च्या बरोबर वाद घालतच जन्म कांढणारायस ? ”

मी जरा गडबडलोच...," माई...तिथं च तर पंचाईत व्हायला लागलीय...म्हणून तर… …”

मला मध्येच तोंडत माई प्रसन्न हंसल्या...,“ म्हणून तर इथं आलायस...होय ना ?… ...आतां ' बायको कशी शोंधायची असते ?’ यावर तुमचे गुरुशिष्यांचे वितंडवाद … ...काय ?… …”

माझी जरा पंचाईत च झाली,“ माई… ...आई-काका नी मुली बघायला सुरुवात तर केलीय...आणि चार-पांच मुली बघूनही झाल्यायत… …”

माई,“ मग अडचण कसली-काय आहे रे तुझी ?...कधी कधी ना, तुम्हां मुलांचं वागणं कांही कळतच नाही आम्हांला...अरे फक्कडशी मुलगी पसंत करायची, न् मोकळं व्हायचं माळ घालून तिला… … आहे काय न् नाही काय त्यात ? ”

मी गळफंटलो,“ ती च तर नेमकी अडचण आहे माई… ...एकजात सगळ्याच मुली ना नटवून-थंटवून दांखवायला आणतात, आणि सगळ्याच फक्कड वाटतात… ...आतां काय करायचं ? ”

तेंव्हढ्यात माईं च्या तांवडीतनं मास्तरानी च माझी सुटका केली… …,“ या...या...ऍरिस्टॉटल… ...आज कसे काय फिरकलात मास्तरांच्याकडं ?”

मास्तरांना माईनी च उत्तर दिलं ,“ काका-वहिनी नी तुमच्या शिष्यासाठी मुली बघायला सुरुवात केलीय… ...आतां ' सुयोग्य बायको कशी निवडायची ?’ या विषयावर गुरूं चं प्रवचन ऐकायला आलेत तुमचे शिष्योत्तम…!!!… कळलं ?…”

मास्तर आतां खोः खोः हंसले,“ असा आहे होय मामला एकूण ?… छान… … या ऍरिस्टॉटल...बसा इथं असे माझ्याजंवळ… …

माई आतां स्वतःच्या कपाळाला हात लावत स्वयंपाकघराकडं गायब झाल्या… …!!

तेव्हां मास्तरांनी कथेच्या प्रारंभीं उल्लेखलेला तो प्रश्न मला विचारलेला होता… … …

झालं… ...गाडं एकदां तत्त्वद्न्यानाकडं वळल्यावर मग ' बायको कशी निवडायची असते ? ’ हा मूळ प्रश्न राहिला बाजूलाच…’ जीव जडणं कश्याशी खातात ? ’ या विषयावर आमची जुंपली… …

मी सरळसोट उत्तर दिलं,“ म्हणजे काय मास्तर ?...जीव जडणं म्हणजे एखादी व्यक्ति आपल्याला खूप आवडणं…”

मास्तर,“ जीव जडणं, याचा अर्थ इतकाच मर्यादित नसतो ऍरिस्टॉतल… …”

मला कांही कळलं नाही…,“ म्हणजे काय मास्तर ?”

मास्तर,“ एक छानसं सुभाषित सांगतो तुला समजावून...म्हणजे चटकन् समजेल...”

मास्तरांनी ' सुभाषित ' म्हटल्यावर मी जरा संरसावून बसलो, न् कान टंवकारले… … …

 

 

मास्तर," तर सुभाषित असं आहे ऍरिस्टॉटल…


|| उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे जीवनान्तके

  राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स जिवलगः ||


मी जरा पुढं सरकलो,“ म्हणजे काय मास्तर ?”

मास्तर हंसले,“ म्हणजे असं बघ, की जी व्यक्ति आपल्यावर, आपण ज्याला ' जिवापाड ' म्हणतो ना, तसं निस्सीम प्रेम करते, त्या च व्यक्ति ला तत्त्वद्न्यानात ' जिवलग ' असं म्हणतात…”

मी,“ पण जिवापाड म्हणजे काय मास्तर ?”

मास्तरांनी आतां विवेचन सुरूं केलं,“ जिवापाड म्हणजे जिवापार...म्हणजेच स्वतःच्याही जिवापलीकडं…”

मी आतां मास्तरांना थेट भिडलोच,“ मला नाही पटत हें मास्तर...माणसाला स्वतःच्या जिवापलीकडं असं काय प्रिय असूं शकेल ? ”

मास्तर,“ याचा ' स्वतःच्या जिवापेक्ष्याही अधिक ' असा शब्दशः अर्थ इथं सुभाषितकर्त्याला अभिप्रेत नाहीय ऍरिस्टॉटल… …' स्वतःच्या जिवापेक्ष्याही ज्यास्त माणसाला दुसरं कांहीच प्रिय नसतं… ...पण माणसाचं स्वतःच्या जिवाइतकंच दुस-या कश्यावर तरी प्रेम मात्र नक्कीच असूं शकतं...मग ती एखादी वस्तू असेल, व्यक्ति असेल, उपास्य दैवत असेल, प्राणी असेल, एखादी निर्मिती असेल, किंवा इतर कांही असेल...इथपर्यंत आलं लक्ष्यात ?”

मी,“ थोडं थोडं समजतंय…”

मास्तर,“ अजून मोठा कळता झालास ना, की समजेल सगळं स्वच्छपणें...सध्या इतकं पुरेसं आहे… …

आतां असं बघ, कीं जगात आपल्या संपर्कात आईवडिलांपासून तें अगदी पार अनोळखी व्यक्तीपर्यंत अनेक माणसं वावरत असतात… ...होय की नाही ?”

मी,“ होय मास्तर...अगणित माणसं असतात…”

मास्तर,“ आणि यांतले कुणीही आपले ' जिवलग ' असूं शकतात… ...तें नात्यातले किंवा रक्ताचेच असायला हंवेत, असं कांही अजिबात नसतं… ...इथपर्यंत समजलं ?"

मी,“ समजतंय मास्तर थोडं थोडं...पण मग यातले ' जिवलग ' नेमके कसे ओंळखायचे ?...”

" छान प्रश्न विचारलास," मास्तर म्हणाले," तर सुभाषितकार सांगतायत, की ' जिवलग ' कुणाला समजायचं ? तर जी व्यक्ति आनंदाच्या प्रसंगीं, संकटकाळांत, दुर्भिक्ष्यकाळीं-म्हणजेच दुष्काळांत-, जिवावरच्या प्रसंगांत, राजाच्या दरबारात-म्हणजेच मानसन्मानांच्या प्रसंगांत-, आणि अंतकाळीं मसणवटीतही आपली साथ कदापि सोडत नाही, अश्या जीवाला च ' जिवलग ' असं म्हणतात… … आतां समजलं ?”

मी,“ होय समजतंय मास्तर...पण अशी कुणी व्यक्ति खंरोखंरीच असूं शकते ? ”

मास्तर,“ कां नाही असूं शकत ?...महाभारतातल्या अंगराज कर्णाचं च उदाहरण बघ...या सुभाषिताचा इतका चपखल दृष्टांत दुसरा कुठला दांखवून देतां येईल ? ”

मी,“ खरंय मास्तर… ...असा जिवलग मिळणं हें नशीब च म्हणावं लागेल… …”

मास्तर,“ यातला अजून एक बारकावा लक्ष्यांत ठेंव ऍरिस्टॉटल…”
मी,“ कसला बारकावा मास्तर ? ”

मास्तर,“ यातल्या उत्सवे-म्हणजेच आनंदी प्रसंगांत-आणि राजद्वारे-म्हणजेच मानसन्मान प्रसंगांत-साथ सोडणारे लोक हें दोन प्रकारांत मोडतात… …”

मी गळफंटलो," हें मात्र नाही कळलं मास्तर…"

मास्तर," सांगतो समजावून… ...मला असं सांग, अश्या प्रसंगांना कोण गैरहजर राहतील ?”

मी,“ ज्यांना इतर कांही व्यवधानं असतील, असे लोक…”

मास्तर, “ किंवा तुझ्याबरोबर वरकरणी गोड बोलणारीं, पण मनातनं तुझ्यावर आंकस असलेली माणसं… ...बरोबर ?”

मी,“ बरोबर आहे हें मास्तर...असे आंतनं जंळणारे लोकही अश्या प्रसंगांत अनुपस्थित राहतील…”

मास्तर, “ तर या दोन्ही वर्गात मोडणा-या लोकांना ' जिवलग ' म्हणतां येत नाही...इथपर्यंत समजलं ?”

मी,“ असं कसं म्हणतां येईल मास्तर ? व्यवधानांमुळं अनुपस्थित राहणा-या लोकांचं काय ?”

मास्तर, “ तें तसं असतं याचं कारण हें की असे लोक एका मर्यादित अर्थानं स्वार्थी असतात… …खरा ' जिवलग ' तुझ्या आनंदात सहभागी व्हायला कधीच टाळाटाळ न करतां, किंवा सबबी न सांगतां आवर्जून अगत्यानं स्वतःची व्यवधानं बाजूला सारून धांवत येतो, म्हणूनच त्याला ' जिवलग ' म्हणतात… ...आतां समजलं नीट ?”

मी, “ मग खरे ' जिवलग ' कसे काय ओंळखायचे मास्तर ?”

मास्तर, “ तें ही सांगतो… ...

तर जीवनांतके-म्हणजेच आपण ज्यांना निर्वाणीचे प्रसंग म्हणतो ना-अश्या प्रसंगांत च आपल्या परिचितांची खरी कसोटी लागत असते… ...तिथं जे साथ सोडत नाहीत, तें च खरे जिवलग म्हणतां येतात, मग ते रक्ताचे असोत, वा नसोत…अश्या माणसांना तत्त्वद्न्यानात ' सुहृद् ' असंही म्हणतात...इथपर्यंत समजलं सगळं ?”

मी,“ बरंचसं समजलं मास्तर…”

मास्तर मंदसं हंसले,“ आणि अश्या जिवावरच्या प्रसंगांत जी व्यक्ति आपली साथ कदापि सोडत नाही, अशी सर्वात जंवळची व्यक्ति जी असते ना, तिला ' जन्माचा जोडिदार किंवा जन्माची जोडिदारीण ' असं म्हणतात…"

मी, “ हें सगळं ठीकाय मास्तर… ...पण अनेक पर्यायातनं अशी व्यक्ति नेमकी कशी वेंचायची ?”

मास्तर, “ हा खरा कळीचा प्रश्न विचारलास ऍरिस्टॉटल… ...तर अशी व्यक्ति नुस्ती निरखून-बोलून अचूकपणे निवडणं ही कर्मकठीण गोष्ट असते… ...

तीसाठी उदंड व्यावहारिक अनुभंव गांठीशी असावा लागतो, जो तरूण वयामुळं तुझ्या गांठीला नाही...बरोबर ? ”

मला आतां कुठं मास्तरांचा रोंख जाणवायला लागला…" होय की मास्तर… ...अगदी असंच झालंय बघा माझं… मग आतां करायचं काय ? ”

मास्तर,“ हें कां मी तुला फोड करून सांगायला हंवंय ऍरिस्टॅटल ?”


मी काय तें समजलो…

उभ्या हयातीत माझ्या कुठल्याच प्रश्नाचं सरळसोट उत्तर न देतां मला सगळंच शिकवणा-या माझ्या मास्तरांनी ही समस्या पण थेट उत्तर न देतां सफाचट् सोंडवलेली होती… …!!!

मी वांकून मास्तरांना नमस्कार केला,“ येतो मास्तर...”

,“ समृध्दो भंव…” मास्तरांनी मला तोंड भंरून आशीर्वाद दिला… …


माझ्या आज्जी ( पितामही ) चं माझ्यावर जिवापाड प्रेम…

आणि बघतां बघतां माणसं पांरखण्या-जोंखण्याच्या तिच्या असामान्य कौशल्याचे मी ढिगानं अनुभंवही पाहिलेले होते… …!!

अखेर मी खासगीत तिला च माझी जन्माची जोडिदारीण निवडायला सांगितलं…

खरं तर नात्यागोत्यातल्या न् आई च्या निकटवर्तीयांपासून तें थेट सांगून आलेल्या अपरिचित कुटुंबांतल्या मुलींपर्यंत तमाम ' चि. सौ. कां.’ उपवर वधूपक्षांतनं आज्जी नं विचक्षणपणे आमच्या सौ. इंदिराजीं ना अचूक वेंचून काढलं...  

आणि मी डोळे झांकून सौ. इंदिराजी ना माळ घालून मोकळा झालो… …!!!

उंब-यावरचं माप ओलांडून घरात आल्याच्या दुस-या दिवसापासून सौ. इंदिराजी नी अवघ्या घरादाराचा जो एकहातीं ताबा घेतला, तो आजतागायत तंडाखेबंदपणे निभावलाय…

तेंही स्वतःची नोकरी सांभाळून… ...

उभ्या जन्मात मला ना घराकडं कधी बघावं लागलं, ना पोरांकडं कधी बघावं लागलं… … …

अतएव पितामाही नमोSस्तुभ्यम्...!!!

पुढं बाहेरच्या जगाचे अनुभंव घेतां घेतां मी असे ' जिवलग ' निवडायला न् जोडायला सुरुवात केली…जो उद्योग अजूनही अखंड सुरूं च आहे.

' जिवलग ' जोडायचा निकष एकच...नितळ स्वच्छ मन, आणि सरस्वती चा ' तथाSस्तु '… ...बस्स इतकंच.

माझ्या संग्रहित सदर जिवलगांत आभियंते आहेत...तत्त्वद्न्यानी आहेत...भाषातद्न्य आहेत...संगीतवाले आहेत...अभिनेते आहेत… स्वयंपाकी आहेत…टप-यावाले आहेत...रिक्षावाले आहेत...शेतकरी आहेत...गोपाळ आहेत...पेपरवाले आहेत...अगदी बॅंडवाले सुध्दां आहेत… …

मागच्या आंठवड्यात चि. गुण्डाप्पा ( नात चि. दीक्षा ) ची दहावी ची परीक्षा संपली, आणि तो ' कुठं तरी सहलीला जाऊं या ' म्हणून आजो च्या मागं लागला, म्हणून आम्ही सगळेच चार दिवस अलिबाग ला गेलो होतो… …

सहल चांगली झाली…

गुण्डाप्पा महाखूष झाले… …

आणि दोन दिवसांपूर्वीं आम्ही पुण्याला घरीं परतलो… … …

दुस-या दिवशीं सकाळीं सकाळीं च ट्रंपेट च्या कर्णमधुर आवाजानं झोंपमोड झाली, म्हणून उठून गच्चीत गेलो, तर घरासमोरच जिवलगातले एक ' मामा ' उभे…

ठिगळं लावलेली पण स्वच्छ पाटलोण आणि सदरा, खांद्याला एक कापडी झोळी लटकत होती…

पायांत स्वस्तातल्या रबरी चपला…

आणि तोंडाला लावलेल्या ट्रंपेट वर भंवताल साफ विसरून मामा ' प्यासे पंछी ' या १९५४ सालच्या चित्रपटातलं ' तुम्ही मेरे मीत हो…' हें माझं लाडकं गाणं च वाजवत फिरत होते…!!

 

 


हे मामा गेल्या तीसेक वर्षांपासूनचे माझ्या परिचयातले जिवलग…

मी त्यांना ' मामा ' म्हणून च ओंळखतो, आणि तें पण मला ' सायेब ' म्हणून च ओंळखतात… …

आम्ही कधी परस्परांना एकमेकांची नावं-गावं ही विचारलेली नाहीत...

तेव्हांपासून मामा त्यांच्या घरातल्या-नात्यागोत्यातल्या पंधरासोळा कलाकारांच्या बॅण्डपथकाचे एकहातीं मालक होते… …

लग्नं-मुंजीं तल्या वरातींची कंत्राटं घ्यायचे...बक्कळ कमाई होती…

मामा शब्दशः लक्षाधीश होते…

सगळं छान चाललेलं होतं… …

पण कोरोना ची साथ उपटली, न् मामांचं नशीब फिरलं…

त्या महामारीत मामांच्या घरातलीं आणि बॅंडपथकातलीं एकूणएक माणसं एकापांठोंपांठ एक अशी कोरोना च्या भक्ष्यस्थानीं पडलीं… …

सगळ्यांचे इलाज-उपाय आणि रुगणालयांची भंरमसाठ देयकं भागवतां भागवतां गांठीशी होतं नव्हतं तें सारं सारं गेलं…

शेंवटीं स्वतःचं पोंट भंरायला मामां ना एकेक करत सगळी वाद्यंही विकावी लागली… ... ...

अखेरीस शिल्लक राहिलं ते स्वतः मामा, आणि ती मामां ची एकमेव ' जिवलग ' ट्रंपेट… …

तीवरच भान विसरून ऐकत रहावी इतकी कर्णमधुर गाणी वांजवत मामा आतां दिवसभंर रस्तोंरस्तीं-गल्लोंगल्लीं भंटकतात… …

तें कुणापुढंही हात पसरत नाहीत…

रसिक श्रोते स्वतः होऊन जे कांही झोंळीत टांकतील, तेंव्हढंच समाधानानं स्वीकारतात…

रसिक दात्यांना हंसून धन्यवादही देतात…

आणि त्यांची ' जिवलग ' ट्रंपेट प्राण ओंतून फुंकत पुनश्च मार्गस्थ होतात… … …

मामां ना बघून मी मुखमार्जनही विसरत जिन्यावरनं खाली उतरलो, न् मामा नां सामोरा गेलो. त्यांना कांही रोख रक्कमही अगत्यानं दिली… ...

,“ नमस्कार मामा… ...कसे आहांत ?...बरं चाललंय ना पोंटापाण्याचं एकंदरीत…?”

मामा,“ बरं हाय सायेब...तुमच्यासारखी माणसं हायतीं, म्हून प्वाटापान्याचं भागतंया कसंतरी… ...कुटं व्हतासा काल तुमी ?”

मी,“ असं कां विचारताय मामा ?”

मामा हंसले,“ आवो सायेब...कालच्याला ह्या बाजूकडनं भाईर पडलो...म्हनलं भ्येटावं तुमास्नी, न् जावं फुडं…”

मी,“ अहो नाती ला अलिबाग दांखवायला गेलो होतो चार दिवस… ...काल रात्री च परत आलो...काय झालं मामा ?”

मामा हंसले,“ आवो तुमी भ्येटताल म्हूनश्यान् हितं घंटाभंर तुमचंच गानं वाजवत वाट बगितली सायेब तुमची… …

दिसला न्हाईसा कुटं...तंवा लई वंगाळ वाटलं बगा, म्हून आजच्याला पुन्ना पयल्यांदा हितं च आलो … …

आतां लई झ्याक् वाटलं बगा तुमी दिसल्यावर… …"

मी, “ मामा...आतां कुणीतरी नात्यागोत्यातलं पोरगं घ्या ठेंवून जंवळ, आणि निवांत दिवस काढा… ...हें असं किती दिवस गल्लोंगल्लीं फिरणार तुम्ही आतां ह्या वयात ?”

मामा हंसले, “ त्ये बांडगुळाचं जिणं व्हईल सायेब … ...त्यापरीस हाय ह्ये च बरं हाय… ...व्हय का न्हाई सांगा मला ?… ...

तुमचं बरं हाय न्हवं सगळं द्येवाच्या किरपेनं ?...

निगतो आतां सायेब… ...राम राम... ”

दुस-या क्षणीं मामा त्यांची ट्रंपेट तोंडाला लावत मार्गस्थ झाले… … …


आणि पन्नास वर्षांपूर्वीं माझ्या मास्तरांनी मला ' जिवलगा ' ची जी व्याख्या विशद करून सांगितली होती ना ...

तिचा मला ' याचि देहीं याचि डोळां ' साक्षात्कार झाला… … …!!!


*********************************************************************

-- रविशंकर.

२१ मार्च २०२६.

 


No comments:

Post a Comment