|| स्वयमेव हन्त्यपप्रवृत्तिः ||
एका खेडेगांवात बायजाबाई नांवाच्या एक सत्तरीला टेंकलेल्या म्हाता-या, पण कष्टाळू विधवा आज्जीबाई रहात होत्या...
पोरंबाळं-नातवंडं असं घरीं रक्ताचं कुणीच माणूस नसल्यानं बिचा-या एकट्याच रहात असत. रोज दुपार होईतोंवर जंवळच्या रानात जाऊन जांभळं-पेरू-करवंदं-आंवळे वगैरे रानमेवा गोळा करायचा, तिथंच कुठंतरी झाडाखालीं सांवलीत बसून स्वतः च रांधून सोबत आणलेला भाकर तुकडा खायचा, घंडीभंर विसांवायचं, आणि नंतर थेट गावातल्या बाजारात जाऊन रानमेवा विकून चरितार्थ चालवायचा, हा आज्जीबाईं चा नित्याचा दिनक्रम...
तसं आज्जीबाईं चं तोंड चांगलंच फंटकळ होतं खरं, पण आख्ख्या गांवात सूद्न्यपणासाठी त्या विख्यात असल्यामुळं भंले भंले आज्जीबाईनां वंचकून असायचे... ...
आज्जीबाईं च्या बाजाराकडं जा ये करायच्या वाटेवर ढग्या नांवाचा एक विशीतला निरुद्योगी गांवकरी रहायचा. दररोज ये जा करतांना आज्जीबाई ना तो बघावं तेव्हां घराच्या अंगणात रस्त्याकडेला टांकलेल्या दोरीच्या बाजल्यावर निवांत लोळत पडलेला दिसायचा...केवळ लोळत पडण्याशिवाय दुसरं तिसरं कांहीही करतांना आज्जीबाई नां ढग्या कधीच दिसायचा नाही... ...!!
आज्जीबाईनां त्याचं नेहमीच नवल वाटायचं, की हा लोळ्या पोंटापाण्याची व्यवस्था कशी करत असेल ?
एके दिवशी रानातनं बाजाराकडं जातांना रोजच्याप्रमाणं बायजाबाई नीं ढग्या ला बाजल्यावर लोळत पडलेला बघितला, न् त्यांनी ढग्या ला आवाज दिला, “ ही डुईवरली पाटी खालीं उतराया जरा हात लाव रं ढग्या...”
ढग्या चा शेषशायीं अवतार कांही ढंळला नाही, “ तूं च आपली आपली उतरीव की आज्ज्ये...लय कट्टाळा आलाय बग...”
तश्या डोंक्यावरची रानमेव्यानं भंरलेली पाटी स्वतःच कशीबशी खाली उतरवून जमिनीवर ठेंवत बायजाबाई ढग्याशेंजारी बाजल्याच्या कडेवर बसल्या..., “ पाणी देतोस जरा प्यायला ढग्या ?”
ढग्याचं उताणा पडून तें च तुणतुणं परत वाजलं, “ त्ये तितं फुड्यातल्या गाडग्यामंदी हाय बग आज्ज्ये... ...घ्ये आपलं आपलं...”
बायजाबाईनां काबाडकष्टांची रोंजचीच संवय होती...
गाडग्यातलं पाण्यानं तहान भागवून त्या हाश् हुश् करत परत ढग्याशेंजारी बाजल्यावर टेंकल्या, “ ह्ये आसं बारा म्हैनं दीसभंर लोळत पडूनश्यान् तुजं प्वाट कसं काय चालतंया रं ढग्या...आॅ ?”
खरं तर रस्त्यानं जा ये करणा-यांना टोप्या घालून ढग्या चा उदरनिर्वाह चालायचा.
पण बायजा आज्जी ना तें कसं सांगणार ?
ढग्या कुशीवर वळला, “ चालतंया कसं तरी म्हातारे... ...काय करायचं ?”
आज्जीबाई मग पदरानं वारा घेत आई च्या मायेनं ढग्या ला म्हणाल्या, “ आरं बाबा...आसं निस्तं दीसभंर लोळत पडूनश्यान् कुनाचं कंदी प्वाट भंरलंय काय रं ?... ... तुज्यासारक्या तरन्याताट्यानं कसं खंसखंसून कामधंदा कराया पायजेल... ...काय ?”
ढग्या ला आतां आज्जीबाईंची फिरकी तांणायची लहर आली, “ निस्तं समज आज्ज्ये, की कामधंदा क्येला मी... ...फुडं ?”
आतां बायजाबाईं चा उत्साह वाढला, “ आरं कामधंदा क्येलास न्हवं, की ब्येस पैका लागंल गाटी ला...”
ढग्या, “ समज लागला पैका गाटी ला... ... मंग फुडं काय ?”
आज्जीबाई, “ मंग दोन चार वावर जिमीन इकत घिऊनश्यान् शेतीभाती करायची... ...”
ढग्या नं कूस बदलली, “ समज त्ये बी क्येलं म्हनून आज्ज्ये...मंग फुडं काय कराचं ?”
आज्जीबाई, “ आरं येड्या, मंग फर्मासपैकी बायकू आनायची घंरदार बगाया...”
ढग्या, “ समज की त्ये बी क्येलं म्हातारे... ...फुडं ?”
आज्जीबाई, “ आरं मंग पोरंबाळं व्हत्याल तुमास्नी...तीं वाडवायची...तरनीताटी झाली तुज्यावानी, की मंग त्यांची लगीनं...नातवंडं...आरं लय कामं करायची आसत्यात बाबा...काय सांगायचं तुला ?...”
ढग्या आतां उठून आज्जीबाई शेंजारी बाजेवर मांडी घालून बसला, “ समज आज्ज्ये...तूं म्हन्तीयास न्हवं, तसं झालं समदं करून... ...मंग फुडं काय कराचं गं ?”
आज्जीबाई, “ आरं ह्ये समदं झालं न्हवं कां, की मंग द्येवाचं नाव घ्येत आराम करायचा बाळा...”
ढग्या आतां डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताची मूठ आंपटत म्हातारी ला म्हणाला, “ आतां तूं सांगितल्यालं येवडं समदं करूनश्यान् मंग आरामच करत्यात न्हवं आज्ज्ये ?...मंग आत्तां बी म्या त्येच करतूया न्हवं ?...!!!”
ढग्या चं तें अजब तर्कट ऐकून म्हातारी नं आपल्या कपाळाला हात लावला...!!
चतुर बायजाबाईं च्या आतां ध्यानांत आलं की ' हे दांडकं हाणल्याशिवाय वळणारं रेडकू नव्हे...’
पण आज्जीबाई नी गांवातल्या भंल्या भंल्या ना पाणी पाजलेलं मात्र ढग्याला ठाऊक नव्हतं... ...
आज्जीबाई आतां हंसल्या, “ ' समज आराम बी करूनश्यान् झाला आज्ज्ये...मंग फुडं काय ?’ आसं कसं न्हाई इच्च्यारलंस बरं मला ढग्या तूं ?”
ढग्या आतां संरसावून बसला, “ बरं इच्च्यारतो तूं म्हंतीयास तर... ...समज झाला आराम बी करून...फुडं ?”
आज्जीबाई, “ मंग कंदीतरी मरायचंच आस्तंया मानसाला... व्हंय का न्हाय ढग्या ?”
ढग्या नं आज्जीबाईनी टांकलेला गळ अचूक गिळला, “ व्हंय... ...खरं हाय तुजं म्हातारे..."
आणि आज्जीबाई नी ढग्या ला तत्त्क्षणीं चितपट लोळवला, “ व्हंय न्हवं ?...मंग येवडं समदं करूनश्यान् कंदीतरी जर मरायचंच आस्तंया, तर मंग आत्तां च कां मरत न्हाईस रं मुडद्या ?... ...आॅं ?”
ढग्या ला असा चारीमुण्या चितपट लोळवून बायजाबाई नी हातातली फंडक्याची चुंबळ डोंक्यावर बसवली...
मग जमिनीवरची रानमेव्यानं गच्च भंरलेली अवजड टोपली स्वतः च उचलून डोंक्यावर घेतली... ...
आणि आं वांसून कपाळाला हात लावलेल्या ढग्याकडं पांठ फिरवून आज्जीबाई बाजाराच्या दिशेत विशीतल्या तडफेनं चालायला लागल्या... ... ...!!!
ढग्या चं पुढं काय झालं ?
तो आज्जीबाईं चं बोंट धंरून कामाला लागला, की तसाच बाजल्यावर हंयातभंर पडून राहिला ?
आणि आज्जीबाईं चं तरी पुढं काय झालं ?
त्या ढग्या ला परत भेंटल्या, की कायमच्या गायब झाल्या ?
चिंतन-मंथन केल्याशिवाय त्याचं उत्तर मला तरी कसं सापडेल ?
**********************************************************************************
-- रविशंकर.
२८ मार्च २०२५.
No comments:
Post a Comment