Search This Blog

Friday 1 July 2022

॥ ईफ् यू कॅन् वॉक... ... ॥

 

॥ ईफ् यू कॅन् वॉक... ...

 

चंमकलात ना शीर्षक वांचून ?... ...

छे: छेः...कांही चुकलेलं नाहीय् त्यात... ...आणि हा मुद्राराक्षसाचा प्रताप पण नाही...

हे आहे आमचा संसार गेली तब्बल अठ्ठेचाळीस वर्षं खंणकावून एकहातीं चालवलेल्या सौ. इंदिराजीं चं ब्रीदवाक्य... ...

,“ ईफ यू कॅन वॉक... ... व्हाय राईड ? ”

आणि माणसाला जर समर्थ-समृध्द व्हायचं असेल, तर हें च बरोबर आहे, अशी आमच्या कुतुंबातल्या एकजात सगळ्यांची त्यांनी शेंकडों वेळा वाजवून प्रचिती देऊन खात्री च पटवून दिलेली आहे... ...

त्यामुळं आमच्या पोरांना तरी त्यात कसलीच शंका राहिलेली नाही... ... ...

आतां जाणतीं झाल्यावर तीं ही त्यांच्या पोरांना म्हणतायत...

,“ ईफ यू कॅन वॉक, व्हाय राईड ? ”

मात्र सदर ब्रीदवाक्यानं एक दिवस खुद्द सौ. इंदिराजींची च खोड तोडलेली होती... ...!!!

त्याची च ही चित्तरकथा... ... ...

 

****************************************

 

, “ चू SSSSSSSSSS....!! एकदां सांगितलं ना तुला, की मी स्चतः च तुला फर्मास गणवेष शिवून देईन म्हणून ?....ऐकायला नाही आलं तुला ? ”

सौ. इंदिराजी चिरञ्जीव चि. मीलन बाबूं वर तंडकल्या.

१९८८ सालातल्या जून महिन्यातली एक गडबड-धांदलीची सकाळ. मुलांच्या शाळा सुरूं व्हायच्या बेतात होत्या.

सगळ्या घरांत पोरांसोरांच्या शालेय साहित्य-गणवेष खरेदी ची धांदल उडालेली होती... ...

झालं होतं असं, की चिरञ्जीव त्यांच्या समवयस्क पोरांपेक्षा वीतभंर ज्यास्त उंचीचे असल्यानं त्यांच्या मापाचा गणवेष शाळेनं सांगितलेल्या गणवेषांच्या दुकानांपैकी कुठल्याच दुकानात उपलब्ध नव्हता, आणि यावरून लक्ष्मी रस्त्यात च रण माजलेलं होतं... ...

चिरञ्जीव दुकानातला च गणवेष हंवा म्हणून हंटून बसलेले, तर वेगळ्या मापाचा गणवेष ऑर्डर नुसार शिवून द्यायची किंमत दुकानदारानं तिप्पट सांगितलेली, म्हणून सौ. इंदिराजीं चा भंडका उडालेला होता, आणि ' गेला खड्डयात तो लुटारू दुकानदार... ..." म्हणत ,“ बघतेच कसा ह्याचा गणवेष होत नाही तो... ...दुकानातला आयता काय झंक् मारील असा, दुकानाच्या अर्ध्या किंमतीत ह्याचा गणवेष शिवून देते की नाही बघा... ...” अशी सौ. इंदिराजी नी संतापून ' इंदिरा गर्जना ' केलेली होती.

त्यासाठी कापडांच्या दुकानांकडं त्यांनी मोर्चा वळवला, आणि हे महाभारत रस्त्यात च सुरूं झालं... ...

मी मग ' कृष्णाजी यादवां ' ची भूमिका घेत ' सामोपचारा ' चं तुणतुणं वाजवलं, “ अहो, याच्या मापाचा गणवेष एकदोन दुकानांत नाही मिळाला, तरी कुठं ना कुठं तरी तो मिळेलच की... ...बघूं या बाजार धुंडाळून...कश्याला ह्याचा उगीच हिरमोड करताय ? ”

सौ. इंदारिजी नीं माझ्या ' कृष्णशिष्टाई ' चं तत्त्क्षणीं श्राध्द घातलं,“ मी काय करतेय, ते मला समजतंय...!!...कळलं ?... ...

दुप्पट-चौपट पैसा वाया घांलवून ह्या चे लाड-हट्ट पुरवायला आपला घाम गाळून कमावलेला पैसा कांही उतूं चाललेला नाही...!!!...गणवेषा चं काय करायचं, ते मी बघून घेईन...काय ? ”

मी मूग गिळले... ...!!

तरी चिरञ्जीवांनी एक अखेरचा केविलवाणा वार करून बघितलाच,“ पण आई...बाबा म्हणतायत तसं बाकी दुकानं फिरून बघायला काय हंरकत आहे गं ?...कुठल्यातरी दुकानात तयार गणवेष मिळेलच की नाही?...आणि तयार गणवेष जर मिळाला ना, तर तो शिवत बसायची तुझी कटकटही वांचेल की नाही ?...म्हणजे आमच्या बाई म्हणतात तसं 

' ईफ यू कॅन राईड, व्हाय वॉक ? ’

सौ. इंदिराजी नीं लेकाच्या वकिली चं ही बघतां बघतां श्राध्द घातलं,“ नेहमी लक्ष्यात ठेंव मिली,“ तूं आत्तां जे कांही बकलास ना ?, त्याला ' आळशी शेख महंमदा चं तत्त्वद्न्यान ' असं म्हणतात... ...”

चिरञ्जीवां चा त्रिफळा उडाला,“ म्हणजे काय गं आई ? ”

सौ. इंदिराजी,“ तूं अजून लहान आहेस ना... ...आत्तां तुला नाही कळायचं ते...मोठ्ठा झालास ना बाबांच्याएव्हढा की मग कळेल...पण हे नेहमी लक्ष्यांत ठेंव, शहाणी माणसं नेहमी म्हणतात 

,“ ईफ यू कॅन वॉक...व्हाय राईड ? ”... ...

तुझा तयार गणवेष दुकानांत नाही मिळाला, म्हणून काय बिघडलं ?...तुझी आई तुला असा कांही फर्मास गणवेष शिवून देईल, की शाळेतली सगळीं पोरं हेवा करतील तुझा... ... काय ?...बघच तूं... ...आणि... ...”

चिरञ्जीवांचा चेहरा किंचितसा उजळला... ...खरंच आई ? ”

आणि सौ. इंदिराजी चिरञ्जीवां चा गालगुच्चा घेंत म्हणाल्या,“ आणि आपण स्वतः च तुझा गणवेष शिवला तर आपले जे पैसे वांचतील ना, त्यांचं आपण आईस्क्रीम आणि बदाम-पिस्ते आणून खायचे... ...दुप्पट मजा आणि फर्मास गणवेष...!!!...काय ?”

चिरञ्जीवां चा हिरमुसलेपणा आतां कुठल्याकुठं पळाला... ... ...

त्यांना एव्हढं च ठाऊक नव्हतं, की सौ. इंदिराजी एकदां कां चंवताळल्या, की किती बरसतात ते... ... ...

शाळे चा गणवेष साधा सुती सदरा-चड्डी असा होता...पण त्या दिवशीं सौ. इंदिराजी नी फर्मान सोडलं,“ चला कॅंप मधल्या ' रेमण्ड ' च्या शो रूम कडं... ... ...”

तिथं गणवेषाच्या चड्ड्यांसाठी एक नंबरी टेरिवूल चं, आणि सद-यांसाठी ' रेमण्ड ' च्या च दमदार टेरिकॉट कापडांची खरेदी झाली...तसंच पुढं सरकून ' झोडिऍक ' च्या दुकानात देखणा कमरपट्टा पण खरेदी करून झाला... ...आणि तोंपावेतों बराच उशीर झाला, म्हणून घरीं परततांना वाटेत      ' मॉडर्न कॅफे ' त शिरून चिरञ्जीवांचा आवडता मसाला डोसा, आणि वर आईसक्रीम चं टॉपिंग असा भंरगच्च ' खादडी कार्यक्रम ' पण झाला.

आणि तासाभंरापूर्वीच लक्षमीरोड वर हिरमुसलेले चिरञ्जीव घरीं पोंचेपावेतों ढेरी ला तंडस लागून स्कूटरवर च गांढ झोंपले... ...!!

पुढच्या तीन एक दिवसांतच सौ. इंदिराजीनीं लेका ला दिलेलं वचन रात्रंदिवस कष्ट करून प्रत्यक्ष्यांत साकारून दांखवलं...

,“ मिली...ए मिली...जरा इकडं ये बरं... ...”

मिली महाराज हातातली लेखणी खाली ठेंवून हजर झाले...,“ काय गं आई ? ”

पायांशी इतस्ततः विखुरलेल्या कातलेल्या कापडांच्या ढिगात शिलाई यंत्रावर सौ. इंदिराजी 

' मास्टर टेलर ' च्या थाटात बसलेल्या होत्या...,“ हा गणवेष चंढवून जरा रहा बरं माझ्यासमोर उभा... ...कसा काय बेतला गेलाय ते मला बघूं दे जरा ... ...”

चिरञ्जीव मिली महाराज नवा गणवेष चंढवून आईसमोर उभे राहिले... ...

सौ. इंदिराजी,“ अरे...पट्टा नाही बांधलास तूं ?... ...ये बरं पट्टा घालून पटकन् ... जा पळ...”

चिरञ्जीव आंतल्या खोलीत जाऊन पट्टा-बिट्टा चंढवून पुनश्च परत येऊन माताजीं समोर उभे राहिले... ...

सौ. इंदिराजी शर्टाचं खोंचण नीटनेटकं करीत म्हणाल्या,“ दुकानांतला तयार गणवेष घालून तूं आरश्यात स्वतःला बघितलं होतंस ना परवां दिवशीं ?....आतां आरश्यापुढं उभा राहून बघ, आणि मला सांग की कसा झालाय तुझा नवा कोरा गणवेष ?...काय ? ”

चिरञ्जीव पलीकडच्या खोंलीतनं च किंचाळले,“ आई शप्पत... ...कसला भारी दिसतोय गं आई हा गणवेष... ...शाळेत कुणाचाच गणवेष इतका कडक दिसणार नाही...!!! ”

 


सौ. इंदिराजी,“ आतां कळलं काय की

' ईफ यू कॅन वॉक...व्हाय राईड ? ' 

असं मी तुम्हां दोघांना नेहमीच कां सांगत असते ते ?... ...

नेव्हर फर्गेट् मिली...दॅट ईफ यू कॅन वॉक...ऑलवेज प्रेफर वॉकिंग टु रायडिंग... ...खूप खूप फायदे असतात त्याचे... ...काय ?... ...

मोठा झालास ना, की कळेल तुला सगळं आपोआप... ... ...”

चिरञ्जीव,“ ह्यात आपला नेमका काय फायदा झाला गं आई ? ”

सौ. इंदिराजी आतां प्रसन्न हंसल्या,“ अरे एक च काय... ...कितीतरी फायदे झालेत आपले...ठाऊकाय तुला ?

चिरञ्जीव,“ खरं च कां गं आई ? ”

सौ. इंदिराजी,“ मग ? उगीच कां मी हा सगळा उपद्वयाप करत बसले ?... ...आतां असं बघ मिली...दुकानदारांनी आपल्याला तयार गणवेषाची किती किंमत सांगितली होती ? ”

चिरञ्जीव,“ आठशे रुपये एका जोडीचे... ...”

सौ. इंदिराजी,“ आतां आपण घरींच शिवलेल्या ह्या गणवेशांना किती खर्च आला, ते ठाऊक आहे तुला ? ”

चिरञ्जीव,“ किती खर्च आला ? ”

सौ. इंदिराजी,“ तीनशे चाळीस रुपये प्रत्येक गणवेषाला... ...”

चिरञ्जीवां चे डोळे आतां विसफारायला लागले,“ आईशप्पत ...!!... ...खरंच ?”

सौ. इंदिराजी, “ मग ?...वाटलं काय तुला ? "

चिरञ्जीव,“ म्हणजे आई... ...तीन गणवेषांचे मिळून चारशे साठ गुणिले तीन...म्हणजे एकूण तेराशे ऐंशी रुपये वांचले आपले आई ?”

सौ. इंदिराजी,“ ते तर वांचलेच...शिवाय इतरही बरेच कांही फायदे झालेत आपले... ...”

चिरञ्जीव,“ ते काय गं आई ? ”

सौ. इंदिराजी, “ दुसरा फायदा हा, की ह्या वांचलेल्या पैश्यातनं आपण तुझ्यासाठी-ताईसाठी छान-छान गोष्टींची पुस्तकं, नाहीतर खायला सुका मेवा-गुलाबजाम-श्रीखंड किंवा आईस्क्रीमही आणूं शकतो...होय की नाही ? ”

चिरञ्जीव,“ आयला...गंमत च आहे की ही सगळी आई... ...”

सौ. इंदिराजी,“ आणि त्यातलं कांहीच तुम्हांला नको असेल, तर पुढच्या वर्षाचे तुझे गणवेष सुध्दां या वांचलेल्या पैश्यातनंच शिवतां येतील... ...अगदी मोफत...हो की नाही ?”

चिरञ्जीवानी आतां आ वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावला, “ खरंच की गं आई... ...एकदम सही आहे तुझी ही आयडिया... ...हीः...हीः...हीः...”

सौ. इंदिराजी,“ अजून गंमत कुठं संपलीय सगळी ? ”

चिरञ्जीव,“ म्हणजे...? ”

सौ. इंदिराजी, “ आतां असं बघ...की तुझे गणवेष मी घरीं च शिवेन असं मी बाबां ना जेव्हां म्हणाले होते ना, तेव्हां मला च ठाऊक नव्हतं, की ते कसे शिवतात म्हणून... ...!! ”

चिरञ्जीव,“ आई शप्पत... ...कमाल च आहे तुझी आई सगळी... ...”

सौ. इंदिराजी,“ मग मी काय केलं असेल ?...सांग बघूं...”

चिरञ्जीव,“ काय केलंस...?”

सौ. इंदिराजी, “ अरे सोप्पं आहे अगदी...मी शिवणकलेचं पुस्तक विकत आणलं, आणि त्यांत बघून बघून स्वतः च शिवून टाकले तुझे गणवेष, न् काय... ...हे बघ...”

चिरञ्जीव,“ म्हणजे शिवणकाम पण शिकून झालं की तुझं...हो ना आई ? ”

सौ. इंदिराजी, “ ते पण या वांचलेल्या पैश्यातनंच...आतां कळलं बरोबर, की  

' ईफ यू कॅन वॉक... व्हाय राईड ? 

असं मी तुम्हांला कां सांगत असते ते ?...नेहमी लक्ष्यात ठेंव मिली...आपण कष्ट करायला कधीही काचकुच करायची नसते... ...आळशी शेख महंमद तसं करीत बसतात... आणि स्वतःच्या आळशीपणापायीं प्रत्येक बाबतीत हे असे दुप्पट-चौपट पैसे पण घांलवत बसतात...अश्या लोकांना काय म्हणतात ठाऊक आहे तुला ?”

चिरञ्जीव,“ काय म्हणतात ?”

सौ. इंदिराजी हंसल्या, “ पढतमूर्ख...”

चिरञ्जीव,“ हीः...हीः...ही...”

आतां सौ. इंदिराजी नी प्रवचानाचं छानपैकी निरूपण केलं

 , “ हे नेहमी लक्ष्यांत ठेंव मिली की जो माणूस प्रत्येक बाबतीत कष्ट उपसायला तयार असतो, त्याचे आत्तां तुला सांगितलं ना, तसे नेहमी फायदे च फायदे होत असतात... ...हिंदी भाषेत ' पॉंचों उंगलियॉं घी में ' असं म्हणतात ना... ...त्याचा अर्थ कळला आतां बरोबर ?”

चिरष्जीव, “ हो...कळलं सगळं आई...पण अजून एक फायदा झाला की गं... ...”

सौ. इंदिराजी, “ कसला फायदा झाला अजून ?”

चिरञ्जीव चीत्कारले, “ काय तूं पण आई... ...अगं तुझे शिवणाच्या क्लासच्या फी चे पैसे पण वांचले नाहीत काय ?”

सौ. इंदिराजीनी च आतां लेकाकडं आं वांसून बघत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!

मग लेकाच्या गालाचा कंरकंचून गालगुच्चा पण घेतला...!!! 

आणि लेकाला दिलेल्या शब्दाला जागून पुढचा महिनाभंर दर दिवसाआड निरनिराळ्या पक्वान्नां चा-आईस्क्रीम्स् चा धंडाका पण उडवून दिला...अगदी पोरांना नको नको होईस्तंवर...!! 

सौ. इंदिराजी नीं आमचा संसार तहहयात या च सूत्रावर केला... 

ईफ यू कॅन वॉक... ... व्हाय राईड ?’ 

असं त्या मलाही नेहमीच सुनावत आलेल्या आहेत...अगदी आजतागायत.

पोरांचे खायचे-प्यायचे एकूण एक लाड-कोड त्यांनी यथेच्छ पुरवले... ...पण स्वतः स्वयंपाकघरांत घाम गाळून... ...

अगदी महाराष्ट्रीय-गुजराती-पंजाबी, इतकं च काय, पण आंतरखण्डीय पदार्थांचेही विविध प्रकार त्यांनी पोरांना ओं येईस्तंवर खाऊं घातले... ...पण उभ्या जन्मांत त्यांनी पोरांच्या हातांवर शाळेच्या फाटका समोर लागलेल्या हातगाड्यांवरचं खरकटं खायला कधी दमडीही टिकवली नाही... ...

अगदी गारेगार किंवा बर्फगोळेही त्यांनी माझ्या खंनपटीला बसून, मला घरांतच तयार करून पोरांना खायला घालायला लावले... ...

चंगळबाजीसाठी घट्ट गांठ मारून बन्द केलेलं त्यांच्या थैली चं तोंड, शालेय वस्तू-पुस्तकं-सुका मेवा-रंगसाहित्य- वैद्न्यानिक प्रयोगांचं सामान-प्रवास-घरातलं खाणं-पिणं- खेळांचं सामान-आरोग्य, इत्यादी कसदार गोष्टींच्या बाबतीत मात्र सताड उघडत असे... ...आपल्या आर्थिक आवाक्यात जे कांही सर्वोत्कृष्ठ दर्ज्या चं बसेल, तें च मुलांनां उपलब्ध करून द्यायचं...हा त्यांचा खाक्या.

बाजारातल्या किंमती जर भंरमसाठ वाटत असतील, तर बाजारातल्या दर्जाच्याही तोंडात मारील असं सगळं कांही स्वतः खंपून मुलांना उपलब्ध करून द्यायचं, यावर त्यांचा कटाक्ष असायचा... ... यांत गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत तसूंभंराचाही फंरक झालेला नाही.

तात्त्पर्य, ‘ काटकसर ' आणि ' कंजूषी ' या दोहोंतला नेमका फंरक ठामपणे जाणलेली गृहिणी, म्हणजे आमच्या सौ. इंदिराजी... ...

या तत्त्वाचा च अवलंब करीत त्यांनीं संसारात बक्कळ पैसाही वांचवला, आणि सुयोग्य गुंतवणूक करीत तो कैक पटीनीं वाढवीत संसार समृध्द पण केला...अगदी दृष्ट लागावा असा... ...

सौ. इंदिराजीं च्या या तत्त्वद्न्यानाचा खंणखंणीत पुरावा पुढं पोरांनीं गेल्या दोन वर्षांपासून जगभंर मरणथैमान घालणा-या कोरोना महामारीच्या लाटेतही अनुभंवला... ...

या लाटेत सर्वाधिक कोण मेले ?

तर जगातले ऐषआरामी-चंगळवादाला सोकावलेले तमाम तथाकथित विकसित-प्रगत देशांतले लोक... ...


त्यांचा मुकुटमणी म्हणावी अश्या अमेरिकेत तर सर्वाधिक बळी या कोरोनानं स्वाहा केले... खालोखाल युरोप, मध्यपूर्व वगैरे... ... ...

कारण होतं, ऐषआरामी-चंगळवादी-आळशी जीवनशैली कवटाळल्यामुळं रसातळाला गेलेली त्यांची रोगप्रतिकारशक्ति...

आणि तिच्याही मुळाशी असलेलं युरोपियन-अमेरिकनांचं आळशीपणा-सुखलोलुपता-चंगळवादा चं आंचरट तत्त्वद्न्यान...

' ईफ् यू कॅन् राईड... ...व्हाय वॉक ? ’

 

 

तर सौ. इंदिराजीं चा कायदा याच्या नेमका उलट .... ...

  ' ईफ् यू कॅन् वॉक... ...व्हाय राईड ? ' 

अमेरिका-युरोप च्या मानानं आशिया-आफ्रिका खंडांतली माणसं या कोरोना यमदूतावर बघतां बघतां मात करूं शकली, याचं कारण कष्ट करून आपोआप अंगीं विकसन पावलेली प्रखर रोगप्रतिकारशक्ति हें च होतं... ...

आजही उपरोक्त सुखासीन देशांत हा यमदूत मृत्यूं चं तांडव करीतच आहे, हे विशेष.

तथापि सौ. इंदिराजीं च्या या तत्त्वद्न्यानानं एकदां त्यांचा च सफाचट् त्रिफळा उडवला...!!!

त्याचं असं झालं, की २००२ सालीं आमच्या ' बापू ' [ म्हणजे कन्या चि. सौ. मुग्धा ] नी आपलं सूत स्वतः च जुळवलं...

हेवा करावा असं सासर त्यांनी निवडलेलं होतं... ...

साहजिकच चि. बापूं चं शुभमंगल यथासांग मोठ्या हौसेनं पार पाडायचा विडा सौ. इंदिराजी नी उचलला.

वराकडच्या माणसांच्या मानापानांच्या खरेदीचा विषय जेव्हां घरांत निघाला, तेव्हां सौ. इंदिराजी एका भंल्या सकाळीं सकाळीं च माझ्या पुढ्यात माझ्या आवडत्या चविष्ट दंडप्या पोह्यांची भंरगच्च बशी समोरच्या टी पॉय वर हंळुवार हातानं ठेंवीत शेंजारी सोफ्यावर बसल्या..., “ अहो...मी काय म्हणते... ...”

सौ. इंदिराजी अश्या सौजन्यशील वागायला लागल्या, की मामला संशयास्पद असतो, असा माझा तहहयात अनुभंव आहे...!!

मी पोह्यांचा बकाणा भंरीत म्हणालो, “ बोला बोला काय तें तुमचं... ...”

सौ. इंदिराजी, “ आंचरटपणा ठेंवा बाजूला तुमचा, न् नीट ऐका मी काय म्हणतेय ते... ...”

मी, “ आतां तुम्हांला बोला बोला म्हटलं, यात काय आंचरटपणा केला मी ?”

सौ. इंदिराजी, “ तुमचा साळसूद-सालसपणा दुस-या कुणालातरी जाऊन सांगा !!...काय ?”

मी, “ आतां तरी बोलाल काय बोलायचं आहे ते ?”

सौ. इंदिराजी, “ तुम्ही पुढच्या आंठवड्यात दिल्ली ला जाणार आहांत ना त्या कसल्यातरी बिझिनेस स्पर्धेसाठीं ?”

मी सावध झालो, “ होय...जाणाराय...त्याचं काय ?”

सौ. इंदिराजी, “ तर मी म्हणतेय की ताई च्या लग्नाच्या आपल्या गणगोतांच्या मानापानांची खरेदी दिल्लीतच करूंया... ...!!!”

आतां मला पोत्यातनं बाहेर पडलेला बोका स्वच्छ दिसला...!!!

, “ छान...म्हणजे कंपनी मला दिल्लीला पांठवतीय राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा लढायला...लग्नाचा बस्ता बांधायला नव्हे... ...

ती लढाई लढूं, की ही तुमची खरेदी करत बसूं मी... ...ऑं ?”

सौ. इंदिराजी, “ तसं नाही हो कांही म्हणत मी... ...”

मी, “ ' तसं ' कांही नाही तर मग ' कसं काय ' म्हणणं आहे तुमचं...?”

सौ. इंदिराजी नी आतां त्यांचा हुकुमी सोटा बाहेर काढला, “ हे बघा...इथल्या मानानं दिल्लीचा कापड बाजार कल्पनातीत स्वस्त आहे...माझी एक मैत्रिण गेली होती कुणाच्यातरी लग्नाला दिल्ली ला गेल्या च महिन्यात...ती सांगत होती.... ...तेव्हां ताई च्या लग्नाचा बस्ता दिल्लीत च बांधायचा... ...कळलं ?”

मी, “ ते ठीकाय तुमचं सगळं बोलायला... ...पण बस्ता बांधणार कोण ?...त्यासाठी मला अजिबात वेळ नाही... ...”

सौ. इंदिराजी, “ तुम्ही कश्याला काळजी करताय?...मी असेन ना बरोबर तुमच्या...काय ?”

मी कपाळाला हात लावला, “ अहो ही ऑफिसखातीं दिल्लीवारी आहे...घंरची नव्हे... ...हें  हें असलं कांही नाही करतां येणार मला ऑफिस चं काम सोडून... ...”

सौ. इंदिराजीं च्या आवाजात आतां विलक्षण गोडवा उतरला, “ अहो, तसं म्हणतेय काय मी ?”

मी, “ हे बघा...तुम्हांला जे कांही म्हणायचं आहे ना, ते मला घोळात न घेतां सांगा... ...ठीकाय ?”

सौ. इंदिराजी, “ मी म्हणते, की तुमच्या स्पर्धेला जोडून पुढं दोन-तीन दिवसांची रजा टाका म्हणजे झालं... ...तुमची स्पर्धा बिर्धा आटोंपली, की पुढचे दोन दिवस आपण खरेदी उरकून टाकूं या सगळीच... ...म्हणजे आहेर पण घंसघंशीत करतां येतील, आणि बक्कळ पैसा पण वांचेल आपला...म्हणून म्हणतेय मी... ...”

सौ. इंदिराजीं च्या कल्पनेत व्यावहारिक शहाणपण दिसत होतं...

मी, “ अशी कितीशी बचत होईल असं वाटतंय तुम्हांला ?”

सौ. इंदिराजी, “ अंदाजे तीस-चाळीस टक्के तरी वांचतील असा अंदाज आहे माझा...कदाचित त्याहीपेक्षा ज्यास्तच... ...”

एक तर एकुलत्या एका लेकी चं लग्न...त्याचं बजेट किती फुगत जाईल, याचा आम्हांला तरी कांहीच अंदाज लागत नव्हता...

अगदी कार्यालयापासून ते दागदागिन्यांपर्यंत एकजात सगळ्या गोष्टीं सौ. इंदिराजी नीं स्वतः जातीनं एकहातीच पार पाडलेल्या होत्या... ...त्यांच्या सांसारिक कर्तृत्त्वाबद्दल मला पक्की खात्री असल्यामुळं मी अखेरीस पांढरं निशाण फंडकवलं..., “ ठीकाय तुम्ही म्हणताय तर...बघतो कसं काय जमेल ते...”

सौ. इंदिराजीनीं आतां शेंवटचा खिळा पण घण मारून पक्का ठोंकला, “ असलं गुळमुळीत आश्वासन नकोय मला...

उद्या च्या उद्या च रजेचा अर्ज टांका...आणि तुमचे वरिष्ठ जर कुरकुरायला लागलेच, तर मी स्वतः येईन बोलायला त्यांच्याशी...काय?”

मी, “ त्याची कांही गरज पडणार नाही...तुम्हांला तोंड देण्यापेक्षां तात्काळ रजा मंजूर करून मोकळे होतील ते...!!! ”

सौ. इंदिराजी, “ S S S S S S स्सं... ...आणि विमानाचं माझं आरक्षण पण उद्याच्या उद्या च करून टांका...आपल्या खर्चानं...काय ?”

मी कपाळाला हात लावत हुकुमांची अंमलबजावणी करून मोकळा झालो...!!!

सौ. इंदिराजी नां राजधानीतली बस वाहतूक किती जगप्रसिध्द नामांकित आहे, एव्हढं च फक्त ठाऊक नव्हतं... ...

ठंरल्यानुसार आम्ही उभयतां राजधानी दिल्ली त दाखल झालो...

कंपनीची राष्ट्रीय स्तरावरची बिझिनेस सायम्युलेशन स्पर्धा एकदाची थाटामाटात पार पडली... ...

आमच्या चमू नं द्वितीय विजेत्या चं पटकावलेलं पारितोषिकही दंणक्यात मेजवानी करून सौ. इंदिराजी नीं दिल्लीत च साजरं केलं... ...

आणि दुस-या दिवशीं आम्ही दिल्लीतल्या करोल बाग मार्केट कडं मोर्चा वळवला.

१९९८ सालीं तरी दिल्लीतली सार्वजनिक बस वाहतूक ही सरकारपेक्षांही खाजगी बसेस दौडवणा-या सरदारजी,  अन् हरयाणवी जाट लोकांच्या ताब्यात होती.

दरेक मार्गावर धांवणा-या प्रत्येक सरकारी बसमागं-पुढं या पंजाबी-हरयाणवी लोकांच्या चारसहा बसेस तरी हंमखास धांवत असायच्या.

सरकारी बसची तिकिटं मार्गपल्ल्यानुसार पांच ते वीस रूपये, तर या पंजाबी-हरयाणवी बसेस ला एक ते तीन रुपये असे तीन च तिकीटदर असायचे...आणि तीन रुपयांचं तिकिट जर काढलं, तर आख्ख्या मार्गावर कुठूनही कुठपर्यंतही कितीही वेळां खुशाल जातां यायचं... ...!!

बसेस ची अवकळा फक्त बघायची नाही...पत्रे इतस्ततः लोंबणा-या, हॉर्न ऐवजी तोंडांनी ' बाजू-बाजू ' किंवा ' हटो-हटो ' असं घसे फुटेतों बोंबलणारे क्लीनर असलेल्या, अन् थेट टपावर सुध्दां खंचाखंच प्रवासी कोंबलेल्या त्या बसेस मधनं प्रवास करणं हा एक मुलुखावेगळा मनोरंजक पण देहभंजक अनुभंव असायचा...!!!

 


 


तथापि आमच्या सौ. इंदिराजी मात्र त्या यंत्रणेवर बेहद्द फिदा झालेल्या होत्या... ...

माणशीं केवळ तीन रूपयांत कुठंही-कितीही फिरा...!!!

 

 

ती भन्नाट वाहतूक यंत्रणा बघून सौ. इंदिराजींच्या बस्ता-खरेदी च्या उत्साहाला अक्षरशः त्सुनामी ची भंरती चंढली...!!

आम्हांला गरगरायला लागेतोंवर त्यांनी गरांगरां दिल्ली फिरत बस्ता खंरेदीचा धंडाका लावला... ...!!!

आणि पुण्याच्या मानानं इथल्यापेक्ष्याही सरस दर्जाच्या मालाचे दिल्ली च्या ठोंक बाजारातले भाव बघून खुद्द सौ. इंदिराजींचे च डोळे फांटले...!!

आणि माझे पांढरे व्हायची वेंळ आली... ...!!!

करोल बाग , कॅनॉट प्लेस चे बाजार पालथे घालून टपेस्ट्री-बेडकव्हर सेटस् ची खरेदी झाली...

त्या ठोंक बाजारातही कित्येक दुकानदारांना सौ. इंदिराजीनीं आपल्या ' वाटाघाटीकौशल्या ' चा पुणेरी हिसका खंणकावून दांखवला... ...!!

त्यांतल्या बहुतांशी दुकानदारांनीही कपाळाला हात लावले खंरे, पण गि-हाईक रिक्तहस्ते अजिबात सोडलं नाही... ...  

बरोबर घेतलेली रोकड संपायला आली, तेव्हां सौ. इंदिराजी नी ,' इतका छान योग जुळून आलाय, तर साड्या, आणि शर्ट-पॅंट ची कापडंही दिल्लीत च खंरेदी करून टाकूं ' असा फंतवा जारी केला...मग तिथल्याच कुठल्यातरी बॅंकेच्या रोकड यंत्रावरनं मी रक्कम काढून त्यांच्या हंवाली केली, आणि दिल्ली च्या दुस-या टोंकाला असलेल्या लजपत मार्केट कडं आम्ही मोर्चा वळवला.

आतांपावेतों खांद्यावरच्या दोन पिशव्या, आणि हातातली परदेश विमान प्रवासाला नेतात ना, तंसली एक भंलीमोठ्ठी बॅग खरेदी नं गच्च भंरलेल्या होत्या...

पण सौ. इंदिराजी बिल्कुल डगमगल्या नाहीत...

तिथं लजपत मार्केटमधल्या भंर रस्त्यांत च लागलेल्या प्रवासी बॅगांच्या दुकानातल्या सेलमधनं त्यांनी आणखी एक विमान प्रवासाच्या आकाराची सुरेख बॅग, जिची किंमत पुण्यांतल्या बाजारात किमान सतरा-अठराशे रुपये तरी असेल, असली बॅग बेदम घासाघीस करून केवळ सव्वा तीनशे रुपयांत खरेदी केली, आणि ती शिगोशीग भंरत त्यांची लग्न बस्ता खरेदी संपेतोंवर सायंकाळचे पावणे सात वाजायला आलेले होते...!!

तोंपावेतों हातांपायांची लाकडं व्हायला आली होती, म्हणून मग जंवळच असलेल्या एका उपाहारगृहांत शिरून आम्ही थोंडी पोंटपूजा उरकून घेतली... ...

मी," तुम्ही आंवरा तुमचं कॉफीपान आतां आरामात...मी मस्तपैकी टॅक्सी घेऊन येतो, आणि हे सगळे ढीग टॅक्सीत टांकून थेट कॅनॉट प्लेस गांठूं आतां...काय ?"

सौ. इंदिराजी," कांही नको... ...बसनं च जाऊं हॉटेलला परत..."

महाखूष झालेल्या सौ. इंदिराजीं चा उगीच हिरमोड व्हायला नको, म्हणून मी तोंड गपकन् मिटलं, आणि सामानाचे भारे ओंढत हंळूंहंळूं चालत परतीच्या बस स्टॉपवर आम्ही पोंचलो एकदाचे.....

दोन मिनिटांत च सौ. इंदिराजीं ची आवडती सवारी ' कन्नाट पिलेस ' चा पुकारा करीत हजर झाली... ...

निखळलेले पत्रे खंडाखंडा वाजणा-या गाडीत ' किन्नर शीट ' वर एक भंरगच्च गलमिश्या-कल्ले-दाढीधारी सरदारजी ' कन्नाट पिलेस  कन्नाट पिलेस ' नांवाचा पुकारा करीत खिडकीतनं बाहेर काढलेल्या घणसर हातांनं दणाणा पत्रा बंडवीत होते... 

सौ. इंदिराजी नीं हात करतांच प्रवाश्यांनी खंचाखंच भंरलेला तो ऐरावत ' घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्राक् खाड खाड खाड खाड ' असा छातीत धंडकी भंरवणारा आवाज करीत एकदाचा थांबला...

दुस-या क्षणीं किन्नर सरदारजी नीं ' फुटो-फुटो यार...मॅडम खडी है समान के साथ...दिखता नही क्या बे ? ' अश्या गर्जना करीत...दरवाज्याकडं मुसंडी मारली...

दरवाज्यात उभ्या असलेल्या पंधरावीस धटिंगणांना ' हटो-हटो ' म्हणत धंक्के मारीत मागं ढंकलून फटाफंट् आमच्या विमानप्रवास बॅगा एका हातानं च उचलून आंत घेंतल्या, लगेच मला धंरायला तोंच हात पुढं केला...

मी उजव्या हातानं सौ. इंदिराजीं चा हात धंरून डाव्या हातानं सरदारजीं चा 'हात पकडला...

आणि सरदारजी नीं एका च हिसड्यात सौ. इंदिराजीसकट मला बसमध्ये वर ओंढून घेंतलं... ...!!!

बस मिळाली म्हणून जाम खूष होत सौ. इंदिराजी  खांद्याची वजनदार पिशवी खाली जमिनीवर उतरवून ठेंवीत घाम पुसायला लागल्या...

मी सरदारजींं चे आभार मानत त्यांच्या हातावर ' व्ही. आय. पी. सवारी ' चे तीन दुणे सहा रुपये ठेंवले. सरदारजी नी ते कुर्त्याच्या फूटभंर खोल खिश्यात कोंबून परत दरवाज्याच्या दिशेत मुसंडी मारली...

सौ. इंदिराजी नी मला ' जरा सामान सांभाळा ' असं सांगितलं...

मग त्या जरा टेंकायला म्हणून मोकळं आसन कुठं दिसतंय कां हे बघायला लागल्या... ...

आणि दुस-या क्षणीं बसच्या टपाकडं डोळे फिरवत त्यांनी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!

बसमधले एकूणएक सत्तर-ऐंशी प्रवासी उभें च होते...

पत्र्याचा डबा च जणूं म्हणावा अश्या त्या बसमध्ये बसायला एकही बाकड्याचा पत्ता नव्हता... ...!!!  

 

सौ. इंदिराजीं ची ती अवस्था बंघून मला तंसल्या परिस्थितीतही खीः खीः खीः खीः व्हायला लागलं...

आजूबाजूचे प्रवासीही खुसफुसायला लागले...

तसा सौ. इंदिराजी नी त्यांचं हंमखास गि-हाईक - म्हणजे माझ्याकडं त्यांच्या ' मुलुखमैदान ' चा मोर्चा फिरवला," कसली मेली दळभद्री बस ही... "

मी तसली सुवर्णसंधी थोडीच दंवडणार होतो ?

," मग तीन रुपयांत तुम्हांला दिल्लीभंर फिरवायला काय ऐरावत हंवाय काय...ऑं ?"

सौ. इंदिराजी आतां उसळल्याच,"अहो पण टेंकायला अगदी आंब्याच्या फळकुटांची तरी बांकडी असायला हंवीत की नकोत...ऑं ?...प्रवाश्यांनी काय तंगड्या तुटेतों उभं राहूनच प्रवास करायचा की काय म्हणते मी ?"

मी हंसलो," त्याचं काय आहे इंदिराजी...."

सौ. इंदिराजी चंवताळल्या," काय?...काय आहे त्याचं? "

मी किन्नर सरदारजींकडं निर्देश केला," हे सरदारजी आहेत ना, हे तुमचे खंदे समर्थक-अनुयायी आहेत...काय ?"

सौ. इंदिराजी फिस्कारल्या," म्हणजे?...काय म्हणायचं काय आहे तुम्हांला ?"

मी परत हंसलो," तुम्ही नेहमी म्हणता ना, की ' ईफ यू कॅन वॉक...व्हाय राईड ' म्हणून ?"

सौ. इंदिराजीं चे डोळे आतां एकदम बारीक झाले," बरं म s s s s ग?...त्याचा काय संबंध इथं ?...ऑं ?"

आणि मी किन्नर सरदारजींकडं बोंट दांखवून फिरकी टांग हाणत चितपट कुस्ती मारली," तसं च हे सरदारजी म्हणतात ' ईफ यू कॅन स्टॅण्ड...व्हाय सिट ? ' "

असं म्हणून मीही सौ. इंदिराजीं कडं डोंळे बारीक करून बघायला लागलो... ...! 

आतां बसमधली सगळीच माणसं ख्याः ख्याः ख्याः ख्याः करायला लागली... ...!!

आणि दस्तुरखुद्द सौ. इंदिराजी नीं भारताच्या राजधानीतच भंर बसमध्ये परत एकदां स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला... ...!!!

*********************************************************************

-- रविशंकर.

१ जुलै २०२२. 

    

 

  


     


No comments:

Post a Comment