Search This Blog

Sunday, 25 May 2025

|| काष्ठकर्मीं नमोस्तुभ्यम् ||

|| काष्ठकर्मीं नमोस्तुभ्यम् ||


, “ अहो...ऐकलंत काय ?... ...हें कुरियर कसलं काय आलंय तें बघा जरा...”

सौ. इंदिराजीं चा पुकारा कानांवर आदळला, आणि मी संगणकावर चाललेलं दृष्यपट्टिकासंपादनाचं काम थांबवून घराच्या दरवाज्याकडं निघालो... ...

२०१८ सालच्या जून महिन्यातली ती एक ढगाळ वातावरणाची दुपार होती...वार होता शुक्रवार.

आदल्या दिवशीच, येणा-या रविवारीं यू ट्यूब वर करायच्या सांगितिक प्रीमिअर चं ध्वनिमुद्रण पार पडलेलं होतं, आणि त्याची ध्वनिपट्टिका मुद्रित-संपादित करून आमच्या सहकारिणी उषाबाई नी लगोलग मला पांठवलेली होती, जिचं दृष्यपट्टिकेत रूपांतरण करायचं काम मी करत होतो, तोंच सौ. इंदिराजीं चा पुकारा कानीं पडला होता... ...

, “ कोण आलंय ?...कश्याला हांक मारलीत ?... ...” मी घराच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या सौ. इंदिराजी ना विचारलं.

सौ. इंदिराजी, “ अहो हा कुरियरवाला आलाय कसलं तरी पुडकं घेऊन...म्हणून हांक मारली तुम्हांला... ...मी तरी आंतरजालावरनं कांही मागवलेलं नाही...तेव्हां हें कुठून काय आलंय तें बघा जरा...मी चहाच्या तयारीला लागते "

आदल्या आंठवड्यातच आम्ही भाड्याच्या तात्पुरत्या घरातनं आमच्या पुनर्विकसित नवीन घरांत मुक्काम हंलवलेला होता. घर कसं सजवायचं, याचा बारीक-सारीक विचार सौ. इंदिराजी नीं दोन-तीन महिने आधीच करून ठेंवलेला होता. आणि त्यानुसार एकेका गोष्टी चं काम चाललेलं होतं... ...पडद्यांची कापडं-चोपडं आणून सौ. इंदिराजीनी तें शिवायलाही घेंतलेले होते...

अवजारं-हत्यारांनी करण्याजोगीं सगळीं कामं मी अंगावर घेंतलेलीं होतीं... ...

या दरम्यान ' गच्चीत, धुणी वाळत घालायला खालीवर संरकवतां येणा-या दांड्या मला बंसवून घ्यायच्या आहेत ', असं कधीतरी सौ. इंदिराजी बोलून गेल्या होत्या, म्हणून मी आंतरजालावर थोडीफार शोधाशोध करून ती ऑर्डर दिलेली होती... ...

कुरियरवाला , " सर, धुणी वाळत घालायच्या दांड्यांच्या सांगाड्याची ऑर्डर आहे ही...रवीन्द्र नानिवडेकर तुम्हीच ना ?”

ऑर्डर माझी च होती...मी भ्रमणध्वनि वर विक्रेत्याकडून आलेला परवलीचा आंकडा सांगून तें साडगं ताब्यात घेतलं... ...

, “ कसलं पुडकं आलंय हो ?”, सौ. इंदिराजी नी स्वयंपाकघरातनं विचारलं.

मी, “ कांही नाही... ...तुम्हांला गच्चीत धुणी वाळत घालायच्या खालीवर सरकणा-या दांड्या बसवून हंव्या होत्या ना? तें साडगं आलंय...”

, “ अय्या...खरंच ?...कधी मागवल्यात तुम्ही त्या ?... ...आणि मला सांगायचं नाही कां आधी ?...उघडा बघूं तें पार्सल...काय-कसं आहे तें बघूं द्या मला आधी...आलेच मी चहा घेऊन... ...”, सौ. इंदिराजी स्वयंपाकघरातनं चिरकल्या.

सौ. इंदिराजी दुपाारचा चहा-बिस्किटं आणीतोंवर मी तें गांठोडं, वरच्या चिकटपट्टया कांपून कांढून उघडलेलं होतं, आणि तें सगळं साडगं जमिनीवर मांडून ठेंवलेलं होतं... ...

त्यातल्या धुणी टांगायच्या गंजरोधक पोलादी चंकचंकीत नळ्या, रांद्याच्या सुबक कप्प्या लावलेल्या पट्ट्या, नायलॉन च्या छान पातळ दो-या...सगळं बघून सौ. इंदिराजी अगदी हंरखून गेल्या... ...

, “ मस्त च आहे हो हें सगळं... ...किती ला पडलं हें ?”, सौ. इंदिराजी.

कुठल्याही वस्तूची पारख करून झाली , आणि पांठोंपांठ सौ. इंदिराजी नी तिची किंमत विचारली नाही, असं आजतागायत कधीच घडलेलं नाही... ...

, “ कश्याला किंमत विचारताय ?... ...आवडलं ना तुम्हांला ? ... मग झालं...”, मी टोलवायचा प्रयत्न केला.

सौ. इंदिराजी, “ अरे वा रे वा...असं कसं ?...माझ्या घरातल्या वस्तूची किंमत मलाच ठाऊक नाही, असं होऊन कसं चालेल ?”

आमच्या घराचा उल्लेख करतांना सौ. इंदिराजी नेहमीच ' माझं घर ' असाच करतात... ...’ आपलं घर ' असा चुकूनही कधी करत नाहीत...!! आणि मलाही तें कधीच खंटकत नाही...

याचं कारण आहे त्यांचा स्वतःच्या घरावर असलेला अपरंपार जीव... ...

तो इतका जबर आहे, की आमचं शुभमंगल झाल्यास आजतागायत गेल्या पन्नास वर्षांत त्या सलग दोन-चार दिवसही त्यांच्या माहेरीं रहायला गेलेल्या नाहीत... ...माहेर गावातलंच असूनही...

जेव्हां अधनं मधनं तास-दोन तास त्यांच्या आई-वडिलांना भेंटायला जातात, तेव्हांही घरीं परतेंपर्यंत त्यांचा एक तरी डोळा घारीसारखा स्वतःच्या घरावर रोंखलेला असतोच...

परिणामीं गेल्या पन्नास वर्षांत मला पिशव्या घेंऊन भाजीपाला-किराणा आणायला कुठल्या दुकानात-अगदी राहत्या पेठेतल्या सुध्दां - कधीही जावं लागलेलं नाही... ... ...

१९७४ सालीं विवाह झाल्यावर नवा नवा संसार थाटला, तेव्हां मला एकदां हें अचानक ध्यानांत आलं, न् मी त्यांना म्हणालो, “ अहो...अधनं मधनं चार-दोन दिवस जात जा माहेरीं आई-बाबा नां भेंटायला...बरं वाटेल त्यांना...”

तेव्हां सौ. इंदिराजी निरागस चेह-यानं उत्तरल्या होत्या, “ महिना-दोन महिन्यातनं माहेरीं जाऊन आई-बाबा नां चांगले तास दोन तास भेंटून येतेय की मी...नवीन काय सांगताय मला त्यात ?...आणि गावात रहायला मला माझंं घर असतांना ऊठसूट आईच्या मांडीवर बसायला माहेरीं कश्याला जाऊं मी ?... ...आपापल्या घरचे व्याप तिला न् मला काय कमी आहेत ?”...!!

सौ. इंदिराजीं चं तें उत्तर ऐकल्यानंतर , मी ठंरवलं, की वेळ-वखत बघून एकदां थेट सासूबाईनां च विचारून घ्यावं हें गौडबंगाल नेमकं कसं-काय आहे तें... ...त्यालाही एक कारण होतं...

आमच्या सौ. इंदिराजी नां दोन सख्ख्या बहिणी...भाऊ नाही... ...पैकी सौ. इंदिराजी या मधल्या.

तर यात एक गोची अशी होती, की सासूबाई ज्येष्ठ-कनिष्ठ जावयांशी अगदी मोजकंच – म्हणजे नगण्य म्हणावं इतकंच- बोलायच्या, पण माझ्याबरोबर बोलतांना मात्र बेदम अघळपघळ...अगदी पोंटचा मुलगा म्हणावा, इतकं ऐसपैस... ...

त्यामुळं त्यांच्याजवळच सदर गौडबंगालाचा कांही मागमूस लागेल, अश्या कल्पनेनं मी एकदां खासगीत त्यानांच याबद्दल छेडलं... ...

आमच्या सासूबाई सौ. इंदिराजींच्याही पलीकडच्या निघाल्या... ...

त्यांनी, “ असं बघा जावईबापू... ...माझ्या आई ला - म्हणजेच तुमच्या आज्जेसासूबाईनां - वर जाऊन वीसेक वर्षं उलटलीं... ...आतां मी ही जर असंच आई आई करत ऊठसूट माहेरीं पळायचं ठंरवलं ना, तर दिवसाआड स्वर्गवासी व्हावं लागेल मला...!!! काय ? " असलं उत्तर मला ऐकवलेलं होतं...

आणि कानाला धोंडा लावून मी उलटपावलीं घरीं परतलेलो होतो...

तात्पर्य, आमच्या घराच्या प्रवेशद्वाराचा जो उंबरा आहे ना, त्याचं आम्ही आतां ' एल. . सी.’ उर्फ ' लाईन ऑफ कंट्रोल ' असं नामकरण केलेलं आहे...!

हद्दीच्या आतला घराचा भूभाग हा भारतीय हद्दीत मोडतो, जो सौ. इंदिराजीं च्या हुकुमतीत चालतो... ...!!

आणि हद्दीपलीकडचा बाहेरचा भूभाग, पाकिस्तानात मोडतो...जिथं मी सुखेनैव नाना उचापतीं करीत राहतो... ...

एकंदर तब्येतीच्या दृष्टीनं हितकर असतं तें...!!!

, " सांगा ना...किती ला पडलं हें साडगं ?", सौ. इंदिराजी.

मी," अठराशे ला पडलं...ठीक आहे ना ? "

सौ. इंदिराजी, " खरं सांगायचं तर आहे छानच हें...पण अठराशे म्हणजे जरा महाग च वाटतंय मला..."

मी मग विषय संपवला," आहे ना छान, तुम्हांला हंवं तसं ?...मग सोडून द्या अठराशे ची बात..."

सौ. इंदिराजी," हें साडगं गच्ची च्या छताला बसवावं लागेल ना हो ?...कसं बसवतात हें ? "

मी मग सौ. इंदिराजी नां तें कसं बसवावं लागेल तें विशद केलं...

पुढं दोन-चार मिनिटं सौ. इंदिराजी कांही बोलल्या नाहीत...त्या विचारात गढलेल्या होत्या... ...

चहा संपवून कप मेजावर ठेंवत मग त्या म्हणाल्या," ठीकाय...सुतार लागेल ना हें जाग्यावर बसवायला ?"

मी," होय...सुताराचं च काम असतं हें...पण आपण च करून टांकूं या की तें...कश्याला हंवाय सुतार-बितार असल्या कामाला ?...तोंडं फांटेतोंवर वाट्टेल ती मजुरी मागतात हे कारागीर लोक हल्ली..."

सौ. इंदिराजी नी हात वर करून माझं बोलणं मध्येच तोडलं," अजिबात हा उपद्व्याप करायच्या भंरीला पडायचं नाही...समजलं ? ...आतां आपली साठी उलटलीय, हें लक्ष्यांत ठेंवा पहिलं... ...आपलं घर मुळात पहिल्या मजल्यावर...त्यात गच्ची अरूंद... ...भंरीला छत दहा फूट उंचीवर, म्हणजे तिपाईवर उभं राहून ही सगळी सर्कस करायची...असंच ना ?"

मी," बरोबर आहे तुमचं सगळं...पण..."

सौ. इंदिराजी," पण नाही न् बीण नाही...अजिबात तसले कांही उपद्व्याप करायचे नाहीत...वृंदी च्या घरीं कसलं तरी लाकूडकाम चाललेलं आहे सध्या...मी बघते काय करायचं तें... ...तोंपर्यंत घरीं मी नसतांना कसल्याही हनुमान उड्या मारायला अजिबात जायचं नाही... ...!!!...समजलं ?"

मी मग तो नाद सोडून देऊन माझ्या उद्योगांना लागलो...

पुढं दोन-चार दिवसांनीं सौ. इंदिराजी म्हणाल्या," सुतार मी ठंरवलाय...उद्यां सकाळीं दहा वाजतां येतो म्हणालाय काम करायला...तीन हजार मागितले मेल्यानं अडलेलं बघून...पण दगदग तर टंळतीय ना, म्हणून कबूल झालेय मी... ...तोंडं फांटेंस्तोंवर मजु-या सांगायला लाजलज्जा पण वाटत नाही या हंरामखोरांना... "

सुतार यायच्या आदल्या दिवशीं मी मग सगळं साडगं तेलपाणी घालून जय्यत तयार ठेंवलं...

सौ. इंदिराजी ना त्या दिवशीं सकाळीं कुणाच्या तरी लग्नाला जायचं होतं... ...तें रहित करून त्यांनी घरातली सकाळची कामंधामं नऊ वाजेपर्यंतच उरकलीं, आणि आम्ही सुतारबुवा ऊर्फ काष्ठकर्मी उगवायची वाट पहात थांबलो... ...

अकरा वाजतां सकाळचा दुसरा चहा झाला...तोपावेंतों सुतारमहाशयांचा पत्ता नव्हता... ...

साडे अकरा वाजतां मी सकाळची रपेट मारायला बाहेर पडलो, न् साडेबारा वाजतां घरीं परतलो, तोपर्यंत तरी सुतार महाशय उगवलेले नव्हते... ...!!

मी," सुताराला दूरध्वनि करून बघा तरी..." मी सौ. इंदिराजी ना म्हटलं...

," मेल्यांना आयतं काम मिळालं तरी अंगात येतंय " म्हणून करवादत सौ. इंदिराजी नी सौ. वृंदावहिनींशी संपर्क साधला...दहा मिनिटांनी त्यांचा दूरध्वनि आला, की ' सुतारबुवां चा भ्रमणध्वनि क्रमांक लागत नाहीय...' !!

आम्ही मग जेवणं-धुणी उरकून घ्यायच्या मागं लागलो...

तें ही सगळं आटोंपलं...आतां दुपारचे दोन वाजत आलेले होते... ...

सौ. इंदिराजी मग त्यांचं पडदे शिवण करायला बसल्या...

दुपारचे चार वाजेतोपर्यंत त्यांचे तीन पडदे पण शिवून झाले, तरी सुतारबुवां चा पत्ता नव्हता... ...!!!

," सुतार अजून तरी उगवलेला नाही... ...काय करायचं ?", मी सौ. इंदिराजी कडं बघत विचारलं.

सौ. इंदिराजीं ची सहनशक्ति बहुधा संपलेली असावी.

त्यांनी शांतपणे शिवणकाम नीट आंवरून ठेंवलं ...न् मग त्यांची हुकुमी ' घनगर्ज ' धंडाडली...

," ' काय करायचं ? ' म्हणजे ?... ...सुतार गेला खड्ड्यात...!!...कामं ज्यास्त झालीत, म्हणून माज चंढलाय मेल्याला...!!!

दुपारचा चहा टांकते मी, तोंपर्यंत हत्यारं काढा बाहेर सगळीं ...बघूं साडगं कसं जाग्यावर बसत नाही तें..."

मी तें साडगं बसवायला लागणारीं हत्यारं निवडून मेजाच्या खणांतनं बाहेर कांढलीं...

मग चाराचा चहा झाल्यावर तेंच चहाचं मेज गच्चीत ओंढत नेऊन ठेंवलं... ...

विजेचं छिद्रयंत्र जोडायला गच्चीत खोंबण नव्हती, म्हणून शयनक्ष्यातल्या खोबणीला तारा जोडून त्या गच्चीपर्यंत लांबवत नेल्या, न् सौ. इंदिराजी नां म्हटलं," आधी ह्या कप्प्यांच्या पट्ट्या छताला भोंकं पाडून बसवाव्या लागतील...

त्यासाठी आपल्याला दोघांनाही चौपाईवर चंढून उभं रहायचं आहे...तुम्ही एका हातानं ही कप्पीपट्टी या इथं छताला चिकटवून दाबून धंरायची...हें विद्युज्जोडणीचं रीळ दुस-या हातात पेलून धंरायचं...न् मी छिद्रयंत्रानं आधी दोन्ही टोकांच्या कप्पीपट्ट्यांची छिद्रं पाडून घेतो...पुढचं काम तुलनेनं सोपं आहे...कळलं ?

सौ. इंदिराजी फक्त हंसल्या...

आणि पुढच्या दोन तासांतच तें आख्खं साडगं सफाचट् जाग्यावर बसवून आम्ही मोकळे झालो...!!!

 

 

 

," बघा आतां दांड्या खालीवर करून तुमच्या मनासारखं सगळं झालंय काय तें "...मी छिद्रयंत्रा चा पसारा आंवरत सौ. इंदिराजी ना सांगितलं...

सौ. इंदिराजी नी मग दुपारीं धुलाई यंत्रात धुतलेलं धुणं बाहेर कांढून तें बादलीत भंरून आणलं.

," यातले अंगपोस, पलंगपोस, चादरीं असले कांही वजनदार कपडे एखाद्या दांडीवर वाळत घालून ती खालीवर करून बघा, म्हणजे येईल अंदाज तुम्हांला..." मी बाकी सगळा पसारा आंवरून ठेंवायला सुरुवात करीत सौ. इंदिराजी ना सांगितलं.

त्यांनी तें सगळं करून एक दांडी कपड्यासकट दोरी खेंचून वर चंढवून बघितली, आणि सौ. इंदिराजीं चा चेहरा आतां उजळला...," अय्या...किती लोण्यासारखं गुळगुळीत झालंय हो हें सगळं... ...मस्त च. "

मी," झालं ना सगळं आतां मनासारखं तुमच्या ? "

सौ. इंदिराजी," वा...वा...झालं कसं ?...ह्यासाठी मेजवानी झंडायला नको ?

संध्याकाळीं सौ. इंदिराजी नी ' चिकन हंडी विथ आईस्क्रीम ' चा धंडाका उडवून ' वस्त्र वाळवणी ' चं उद्यापन करून टांकलं...

जेवणं उरकून आम्ही मसाला पानं चंघळत दिवाणखान्यातल्या दिवाणावर बसलो, अन् सौ. इंदिराजीं च्या तोफे चा परत धंडाका उडाला," आतां येऊं तर द्या त्या मेल्या सुताराला परत... ...कशी चामडी लोळवते बघा त्याची...चांगले बक्कळ तीन हंजार कमाई झाली असती...आतां बसेल बोंबलत..."

मी," तो कसला येतोय आतां परत तुमची पायताणं खायला ?... ...आज चार पांच हजारीं दुसरा बकरा सांपडला असेल बेट्याला..."

सौ. इंदिराजी," पण दररोज चार पांच हजारी बकरा त्याला थोडाच सापडणाराय ?... ...चांगलं तीन हजारांचं गाजर लावलंय मी...जातोय कुठं तो ?... ...चार दोन दिवसांतच चांटत येतोय की नाही बघा..."

सौ. इंदिराजीं चा होरा अगदी अचूक होता...

सुतार महाशय दुस-या दिवशीं भंल्या सकाळीं नऊ च्या ठोंक्यालाच जिभल्या चांटत हंजर झाले...!!!

मी स्नानगृहात अंघोळीला शिरलो होतो... ...

सुतार," त्ये कापडं वाळवायच्या दांड्या बसवायचं काम सांगटलं व्हतं न्हवं बाई तुमी ?...त्ये बगाया आलोया... ..."

बाई ," बाळंतपण झाल्यावर डोहाळेजेवणं करायला आलाय काय इथं तुम्ही ?...ऑं ? "

बाईं ची अशी फाड् दिशी पहिली कानफटात खातांच काष्ठकर्मी हेलपाटले...," तसं काय न्हाई बाई..."

बाई," तसं काय न्हाई ?...मग कसं काय हाय ?...सांगतां काय जरा तोंड उचकटून ?...तुमचं घड्याळ चोवीस तास मागं आहे काय जगाच्या ? "

सुतार," तसं काय बी न्हाई बाई...जरा समजून घ्या..."

बाई," काय समजून घ्या?...माणूस मेल्यावर हे...हे...असं औषध द्यायला आलाय तुम्ही...!!...नाही ?"

सुतार," मंजी...काम झालंय काय बाई ?"

बाई," मग काय काल सकाळपास्नं सनया-चौघडे वांजवून तुमची वाट बघत बसलोय की काय आम्ही ?...ऑं ? "

बाईं चे असे चार-पांच दणके खाल्ल्यावर सुतारा नं आतां पवित्रा बदलला," न्हाई...मंजी आजून बशिवलं नसंल, तर आत्तां लगीच द्येतो बसवून बाई..."

बाई," माझं घर म्हणजे जहागीरदारांची धर्मशाळा वाटली की काय तुम्हांला ?...कंदी बी या, न् कंदी बी जा...!!! ...ऑं ?"

सुतार आतां काकुळतीला आला," खरंच झालं बसवून बाई ?...आजच्याला काय बी काम न्हाय बगा हाताला..."

बाई," तुझ्या पायातलं पायताण कांढून ठेंव इथं, न् आंत येऊन तूं च बघ की साडगं बशिवलं कां न्हाई ते...चालतंय ?"

" चालतंय की बाई...चुकी झाली बगा...पन राग नकां मानूं " म्हणून गयावया करत सुतार महाशय बाईंच्या मागोमाग गच्चीत गेले...

त्यांनी कपडे वाळत घातलेलं तें साडगं ' याचि देहीं याचि डोळां ' बघितलं... ...

आणि आं वांसून कपाळावर हात मारून घेत त्यांनी बाई ना विचारलं," ह्ये...आस्लं फस्कलास...कुनी बशिवलं बाई ?"

 

 

 

आणि मी अंघोळीला शिरलेल्या न्हाणीघराकडं बोंट दांखवत दुस-या क्षणीं बाई काष्ठकर्मीं चा तेरावा घालून मोकळ्या झाल्या...

, “ बाबा रे... ...तुला ज्या सुताराला बघायचं आहे ना,...तो आंत अंघोळीला बसलाय... ...मी फार बरी म्हणशील, असला तो सुतार आहे बघ...

तेव्हां अंघोळ उरकून बाहेर येऊन तो तुला धंरायच्या आंत इथनं खंसकायचं बघ झंटक्यात ...!!!...काय ?”

तशी बाई पुढं कांही बोलायच्या आंत काष्ठकर्मी नी कपाळाला हात अन् पार्श्वभागीं टांचा लावून घराबाहेर धूम ठोंकली...!!!


*********************************************************************

-- रविशंकर.

२३ मे २०२५.


 



No comments:

Post a Comment