Search This Blog

Wednesday, 2 January 2019

॥ मूलपिण्डोऽबाधितः ॥

"शुभप्रभात वैद्यबुवा...नमस्कार..." मी डॉ. कर्नाटकी च्या मेजावर टकटक करीत म्हटलं
" ये ये नाना...बस बस... ...जरा एक मिनिट थांब बरं कां... ...हे एव्हढं टिपण पुरं करून बघतोच तुझ्याकडं...काय?
इतकं बोलून डॉ. अजित कर्नाटकी ऊर्फ 'आज्या' नं पुढ्यातल्या गलेलठ्ठ पुस्तकांत पुनश्च डोकं खुपसलं...
त्याच्या हातातली लेखणी समोरच्या वहीतल्या पानावर सुबक अक्षरात टिपण काढूं लागली... ...
अन्‌ मी समोरच्या खुर्चीत बसकण मारीत मख्खपणे त्याच्याकडं बघत बसलो.......

१९९८ सालच्या हेमन्त ऋतूतल्या गुलाबी थण्डीचे दिवस होते...वार रविवार.
तसं म्हटलं तर आज 'आज्या' चा आठवड्याच्या सुटी चा दिवस...सकाळी आठ - साडेआठ वाजेपर्यंत लोळत पडण्याचा...
तथापि मी आदल्या रात्री च दूरध्वनी करून त्याला 'उद्या सकाळी तुझ्या दवाखान्यात भेंटूं' असा निरोप दिलेला असल्यामुळं स्वारी भल्या सकाळीच अंघोळ बिंघोळ उरकून, दवाखान्यात येऊन बसलेली होती... ...
हा अजित कर्नाटकी म्हणजे पक्का कानडीअप्पा... ...
इयत्ता पांचवी ते प्रथम वर्ष बी.एस्सी. म्हणजे तब्बल नऊ वर्ष विद्यार्थी दशेत आम्ही एकमेकांबरोबर काढलेली असल्यामुळं आमची दोस्ती होती म्हणण्यापेक्षां लंगोटीयारी होती असं म्हणणं अधिक उचित ठरेल.
त्याची बायको - म्हणजे सौ. अलका वहिनी - पण धारवाडच्या. त्यामुळं घरादारातला खाक्या पक्का कर्नाटकी...आणि म्हणून आम्हां चौघांचं ( आमच्या सौ. सुमीता - ऊर्फ इंदिराजी - धंरून ) अगदी तहहयात दाट मेतकूट जमलेलं होतं.
प्रथमवर्ष बी. एस्. सी. नंतर मी जीवविज्ञानाशी फारकत घेऊन अभितयांत्रिकीची धुरा उचलली, तर आज्या चा गणिताशी छत्तीस चा आंकडा असल्यामुळं त्यानं गणिताला घटस्फोट देऊन जीवविज्ञानाशी लग्न लावलं, आणि वैद्यकीला प्रवेश घेतला.
तश्यात ह्या आज्या ला वैद्यकी व्यतिरिक्त इतर अनेकविध छन्द होते म्हणून आमच्या लंगोट्या जरा ज्यास्तच घट्ट जखडलेल्या असाव्यात. त्यातलाच एक ( माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा) छन्द म्हणजे त्याला असलेला संस्कृत भाषा आणि तत्त्वज्ञानतला रस... ...बस्स् आणखी कश्याची फोडणी लागते मैत्रीचं खमंग थालीपीठ जमायला?
फक्त ह्या आज्या चा एकच गुण खटकणारा होता... ...तो म्हणजे पराकोटीचा फंटकळपणा, आणि उघडं-नागडं सडेतोड बोलणं.
पण आमच्या लंगोटियारी च्या आड त्याचा फटकळपणा कधीच आला नाही, कारण त्यामागचा त्याचा प्रामाणिकपणा आणि समोरच्या माणसाच्या भल्याची त्याला वाटणारी कळकळ मला पुरती ठाऊक होती, आणि सौ. इंदिराजींबरोबरचे अनुभव जमेला धंरून, मी त्याच्या फंटकळ बोलण्याकडं दुर्लक्ष करायला शिकलेलो होतो... ... 

अजित दोनचार मिनिटांनी लेखणी समोरच्या वहीवर ठेंवीत पुसता झाला" हं बोल नाना... ...कसला किडा चांवला तुला काल रात्री...ऑं?...जरा बघूं दे मला... ..."
मी,"कसला किडा?"
अजित," किडा नाही चांवला?... ...मग साल्या, माझ्या साखरझोंपेचं खोबरं करून कश्याला फरपटलंस मला इथं?"
मी," सांगतो... ...त्याचं काय आहे... ...की..."
अजित," त्याचं कांहीही नाहीय्... ...समजलं?...आणि हो...इथनं बाहेर पडल्यावर अलका नं तुला धंरून घरीं फरपटत नाष्ट्याला आणायला सांगितलंय्... ...तेव्हां"
मी," अरे पण इंदिराजी फांडून खातील मला... परस्पर गायब झालो तर...त्याचं काय?"
अजित,"तूं यायच्या आधीच तुझ्या इंदिराजी नां फोन करून मी माझ्या घरीं बोलावून घेतलंय्... ...नाष्ट्याला... ...काय?"
मी,"म्हणजे नाष्टा खायला घालून अलका वहिनींच्या देखत माझी बिन पाण्यानं झालेली बघायची आहे म्हण की तुला... ..."
अजित,"मऽऽऽऽऽऽऽग? उट्टं नको काढायला वाजवून?"
मी पांढरं निशाण बाहेर काढलं," ठीकाय् बाबा... ...बघ मजा माझी... ...पण आत्तां ऐकशील काय कश्यासाठी आलोय् ते?"
अजित,"हीः हीः हीः हीः हीः हीः ... ...बोला नानासाहेब..."
मी," अति गुप्ततेचं वचन हवंय् मला... ...म्हणजे..."
अजित," म्हणजे 'अलका-इंदिरा आणि कं' ला कसलाही थांगपत्ता लागतां कामा नये... ...असंच ना?... ...ठीकाय्...दिलं वचन... ...हं बोल आतां... ...काय बिघडलंय् तुझं?"
मी," मला थोडसं जाड व्हायचंय्... ... ..."
अजित,"काऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽय?"
मी," म्हणजे थोडंसं गुटगुटीत आणि गाल-बिल जरा वर यायल हवेत मला...तेव्हां एखादी गोळीबिळी लिहून दे बघूं जाड व्हायला पट्‌दिशी... "
आज्या तसा फंटकळच,"हे कसले भिकारलक्षणी डोहाळे लागले तुला आतां?... ...ऑं?
आणि आतां चाळिशीत गाल गुबगुबुबीत कश्याला रे व्हायला हवेत तुला? की वहिनी नां आतां गालगुच्चे घ्यायला सांगणाराय्‌स?... ...तब्येत बिब्येत बरी आहे ना तुझी?"
मी," हे बघ आज्या...साल्या आरश्यासमोर उभा राहिलो ना, की हे बसके गाल आणि सपाट ढेरी बघायचा कंटाळा आलाय् मला... ...
तेव्हां ढेरीबाबाही जरा वर येईल असा एखादा जमालगोटा लिहून दे बघूं झंटक्यात...काय?"
अजित,"डोकं ठिकाणावर आहे ना तुझं नाना?... ...अरे सुसाट सुटलेलं अंग चंवळीच्या शेंगेसारखं बारीक करायला हल्ली जिवाचा आटापिटा करतात लोक... ...
लठ्ठपणानं गांजलेले डझनावारी लोक (विशेषतः बायका), 'बारीक व्हायच्या रेसिपीज्' विचारायला इथं येऊन दररोज डोकं पिकवतात माझं... ... आणि तुझं बघावं तर गिअर उलटा पडलेला दिसतोय्... ...
भूक-तहान कांही कमी झालीय् काय तुझी?"
मी,"छे...छे...छे... ...तहान-भूक अगदी मस्त आहे... ...रोज चार वेळा अगदी व्यवस्थित खातो-पितो की मी...तरी पण ढेरी आणि गाल कांही बाळसं धरीना झालेत... म्हणून... ..."
अजित,"आणि झोंप?"
मी,"अगदी छान लागते... ...इंदिराजी म्हणतात 'ओंडक्यासारखे झोंपून लोळत पडूं नकां सकाळी' म्हणून."
अजित,"व्यायाम करतोस काय रोजच्या रोज?"
मी,"म्हणजे काय?...सकाळी पेलाभर गरम पाणी प्यालो, की पहिल्या प्रथम तीस-पस्तीस मजले चढ उतार करतो... ...मग स्नायु तांणण्यासाठी वीसएक मिनिटं योगासनं, आणि नंतर मग सकाळचा पहिला चहा. असा रोजचा परिपाठ असतो माझा..."
अजित,"जरा इकडं वजनकाट्यावर उभा रहा... ... बघूं या वजन किती आहे ते... ...अरे वा...सहासष्ट किलो?... ...झकास...!!"
मी,"कसलं डोंबलाचं झकास?...माझ्या उंचीला - म्हणजे १८२ सें. मी. उंचीला - तुझ्या शास्त्रानुसार किती असायला हवं माझं वजन?"
अजित,"साधारण सत्तर ते शहात्तर किलो म्हणजे उत्तम म्हणतां येईल... ..."
मी मग आज्या ला कंचाट्यात धंरला,"तूंच बघ... ...मी सांगतोय् ना, की जरा जाडी वाढायला हवीय् म्हणून?"
आज्या नं आतां कपाळाला हात लावला,"अरे बाबा माझ्या... ...वजन सरासरीपेक्षां थोडसं कमी असणं, हे ते ज्यास्त असंण्यापेक्षा केव्हांही उत्तमच असतं... ...एकदां कां वजन वाढायला लागलं ना, की मग ते आंवरणं कर्मकठीण... ...तेव्हां आहे हे अगदी झकास आहे नाना तुझं... ..."
मी," तरी पण... ..."
आज्या नं माझा 'तरी पण' उडवून लावीत म्हटलं,"हे बघ नाना... ...तुला तत्त्वज्ञानांत सांगतो म्हणजे पटेल... ..."
मी कान टंवकारले...
आज्या,"ते सुभाषित तुला माहीत असेलच... ...
मी,"कुठलं सुभाषित?"
अज्या," ।। आशा नाम्ना मनुष्याणां विचित्रा पदशृंखला   
       तेन बद्धार्प्रधावन्तिर्मुक्तास्तिष्ठन्ति मेरुवत्‌ ।।

तेव्हां तूं ह्या जाड व्हायच्या आशेला लागलेला असाल्यानं तुझी अशी गोची झालेली आहे... ...!!
आतां असं बघ की तुझ्या घराण्यात सगळ्यांचाच पिण्ड सडपातळ अंगकाठीचा आणि उंची ज्यास्त, असा आहे...होय ना? तुझे आई वडील, सख्खी भावण्डं यांच्यात कुणीही जाडही म्हणतां येणर नाहीत इतके सगळे सडपातळ आहेत... ...बरोबर? तात्त्पर्य, जाड-बारीक असणं हे बर्‍याच अंशी आनुवंशिक आणि नगण्य प्रमाणांत माणसाच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं...तुला कधी थंकवा-बिकवा, किंवा निरुत्साह जाणवतो काय?...नाही ना? आणि हे बघ...एकदां कां जाडी वाढायला लागली, आणि आंवरली नाही ना, तर मग तज्जन्य सगळ्या कटकटी कायमच्या मागं लागतील तुझ्या... ...आहे ते झक्क आहे अगदी...तेव्हां हे जाड व्हायचं खूळ ताबडतोब डोंक्यातनं काढून टाक...म्हणजे मेरुवत् स्थितप्रज्ञ होशील... ...!! काय?"
मी," मग तुझ्याकडं कश्याला भल्या सकाळी तडफडलो इथं?... झक् मारायला?... ...ते कांही नाही... ...अगदी थोडं कां होईना, पण जाड व्हायचंय्‌ मला... ...
आमच्या इंदिराजी बरोबर रस्त्यातनं चालत निघालो नां कुठं, की अगदी १० चा आकडा दिसत असणार आमची जोडी म्हणजे... ...ते कांही नाही... ...औषध लिहून दे झंटक्यात, म्हणजे मी निघालो."
झालं... ...मी असा हट्टाला पेंटल्यावर आज्या च्या कपाळावर मधोमध एक सूक्षम आंठी पडली... ...एक क्षणभरच...
मग दुसर्‍या क्षणीं त्यानं चुटकी वाजवत समोरचं बाड पुढ्यात ओंढलं... ...त्यातल्या वरच्या कागदावर कांहीतरी खरडलं...
मग त्या कागदाची घडी घालून तो एका लखोट्यात बन्द करून लखोट्याचं तोंड डिंकानं चिकटवलं, आणि लखोटा माझ्या हातात देत म्हणाला
,"ठीकाय् तर नाना... ...होऊं दे तुझ्या मनासारखं... ...हे औषध लिहून दिलंय् मी... ...फक्त हा लखोटा वहिनी कडं पोंचवायचा, की तुझं काम झालंच म्हणून समज....
मात्र एक च अट आहे... ..."
मी," आतां कसले फाटे फोंडायला लागलाय्‌स तूं ?"
अजित मख्ख चेंहरा करून म्हणाला," अरे बाळसं वाढवण्यासाठी तुला करण्यासारखं कांहीच नाहीय् ह्या त... ...जे काय करायचं आहे ना, ते तुझ्या सौ. इंदिराजीना च करावं लागणार आहे...!! ... ...काय?
तेव्हां हा लखोटा असाच्या असा सीलबन्द अवस्थेत सौ. इंदिराजींच्या हातात नेऊन ठेंवायचा... ...अजिबात न फोंडता... ...कळलं नीट?"
मी,"अरे पण मी अट घातली होती ना, की ' अलका-इंदिरा आणि कं.' ला ह्यातलं कांही कळतां कामा नये म्हणून?... ...त्याचं काय?"
अज्या डोंळे मिचकावत म्हणाला,"अरे बाबा ती च तर गोची आहे ना... ...अलका राहूं दे बाजूला एकवेळ, पण तुझं बाळसं वाढवायला तुझं औषधपाणी-खाणंपिणं वगैरे तुझ्या इंदिराजीनाच सांभाळायचं आहे ना? त्या देतील ते खाण्यापिण्याशिवाय तुला स्वतः करण्यासारखं असं कांहीच नाही ह्यात... ...तेव्हां हा लखोटा फक्त इंदिराजी ना नेऊन देणे... ...अजिबात न उघडतां...समजलं सगळं?
आणि कांही काळजी करूं नकोस साल्या... ...अलका ला  यातलं अवाक्षरही कळणार माही... ...मग तर झालं ना?"
इतकी हमी दिल्यावर मात्र मग मी आज्या ची खनपटी सोंडून लखोटा खिश्यात कोंबत त्याला धन्यावाद दिले,"थॅंक्स् आज्या... ..."
आणि 'चबी चीक्स्' च्या ढगावर तरंगायला लागलो... ...
," तेरी थॅंक्स् को मारो गोली...चल लवकर आतां... ...पोंटात कावळे कोंकलायला लागलेत माझ्या... ...अलका वाट बघत असेल घरी आपली" म्हणत आज्या नं मग दवाखाना गुंडाळून मला त्याच्या गाडीत कोंबला, अन् स्टार्टर मारून गाडी त्याच्या घराकडं दामटली...

सौ. इंदिराजी तिथं आधीच येऊन ठेंपलेल्या होत्या...
सौ. अलका वहिनी आणि इंदिराजींची भोजन मेजावर गरम गरम वाफाळलेल्या इडल्या-वडे आणि नारळाच्या चटणीची माण्डामाण्ड करायची लगबग चाललेली होती... ...
मग काय... ...बाह्या सरसावत आम्ही सगळेच त्या थाळ्यांवर तुटून पडलो.
आश्चर्य म्हणजे गप्पाटप्पात आज्या च्या बोलण्यात माझ्या 'बाळसे हट्टा' चा पुसटसा देखील उल्लेख आला नाही... ...त्यानं त्याचा शब्द तंतोतंत पाळलेला होता.
नाष्टा-गप्पाटप्पा वगैरे उरकून मी आणि सौ. इंदिराजी मंडई कडं सुटलो, आणि भाजीखरेदी उरकून जेंवायच्या वेळेला घरीं परतलो.
भोजन झाल्यावर मग मी हंळूच आज्या नं दिलेला लखोटा सौ. इंदिराजीं च्या हातात ठेंवला... ...
सौ. इंदिराजीं च्या कपाळावर एक सूक्षम आंठी पडलीच,"हे काय आहे?"
मी टांग मारली,"अगं सकाळी फिरायला गेलो होतो ना, तेव्हां आज्या दवाखान्यात आलेला सापडला, म्हणून सहजच डोंकावलो. तर बोलतं बोलतां म्हणाला की माझी तब्येत जरा रोडावलेली दिसतीय् म्हणून‌... ..."
सौ. इंदिराजी नी तोंफ डागली,"तब्येत रोडावायला तुम्ही कधी दारासिंग दिसत होता?... ...ऑं?"
मी,"अगं तसं नव्हे गं... ...त्याला लक्ष्यांत आलं असावं म्हणून 'भूक-झोंप नीट आहे ना?' म्हणून विचारत होता. आणि कसलंरतरी शक्तिवर्धक पण लिहून दिलंय् वाटतं त्यानं... ...म्हणाला की 'हा लखोटा फक्त सुमीता च्या हातात दे... ...ती करील सगळं व्यवस्थित' म्हणून... ...बघ तरी काय औषध लिहून दिलंय्‌ त्यानं ते?"
सौ. इंदिराजी,"कांहीतरी थापा मारूं नकां मला... ...ही तुमचीच कांहीतरी नवीन शक्कल दिसतेय्... ...लोकांच्या तब्ब्येतींवर पुरुषां चं असं बारीक लक्ष असत नाही कधी... ...तुम्हीच कांहीतरी नवीन खूळ डोंक्यात घेऊन गेला असाल त्यांना पिडायला... ..."
असं करवादत सौ. इंदिराजी नी लखोटा टंरकावत आतला कागद बाहेर काढून वाचला... ...
अन् कपाळाला हात लावत पोंट धंरधंरून फिदीफिदी हंसायला लागल्या... ... ...!!!
मी चक्रावलो... ...,"काय झालं काय असं दात काढायला तुम्हांला?"
सौ. इंदिराजी नी खोः खोः खोः खोः करीत तो कागद माझ्या हातात कोंबला,"मी म्हटलं नव्हतं, तुमचाच कांहीतरी आचरटपणा असणार म्हणून?....
हीः हीः हीः हीः हीः ... ... बरी खोड तोडली भावजीनीं... ...हे बघा."
मी कागद सौ. इंदिराजींच्या हातातनं हिसकावून घेत वांचायचा चष्मा डोंळ्यावर चंढवला, आणि त्यावर नजर टाकली...
आणि 'आज्या' ला लाखोली वाहत कपाळावर हात मारून घेतला... ...!!
कागदावर आज्या च्या वळणदार फर्ड्या मराठीत लिहिलेलं होतं...
------------------------------------------------------
श्री. रविन्द्र शं. नानिवडेकर.
' मानसोपचार तज्ञाला ताबडतोब दांखवून त्याच्या सल्ल्यानुसार पुढील औषधोपचार करणे ' .......!!!
-- सही
डॉ. अजित रा. कर्नाटकी.
------------------------------------------------------
त्यानंतर पुढं महिनाभर तरी मी आज्या बरोबर संपर्क ठेंवला नाही... ...!!
आणि 'बाळसे हट्ट' आपोआपच माझ्या डोंक्यातनं हद्दपार झाला... ...
पण त्या हट्टाची हद्दपारी अल्पजीवीच ठरणार होती हे विधिलिखित मात्र आमच्यापैकी कुणालाच तेव्हां ठाऊक नव्हतं... ...

झालं असं की, पुढं दोनतीन आठवड्यातच मराठवाड्यातल्या किल्लारी नांवाचं खेडेगाव अपरात्री आठ रिश्टर स्केल च्या भूकंपानं हादरलं आणि अक्षरशः जमीनदोस्त झालं... ...
अवघ्या भारतभरातनं दशदिशांनी... अगदी परदेशातनं सुद्धां ... किल्लारी कडं मदतीचे लोंढे दुथडी भंरून वाहूं लागले... ...
आणि एक दिवस माझ्या टाटा मोटर्स मधल्या वरिष्ठांनी मला पाचारण करून सांगितलं की, 'टाटा उद्योगसमूहाला लातूर-उस्मानाबाद हमरस्त्यालगत सरकारनं दहा एकर जमीन भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. टाटा हाउसिंग् डेव्हलपमेण्ट् कॉर्पोरेशन ह्या आपल्या समूहातल्या कंपनीवर, त्या जागेत जवळपास दीडएकशे घरं अणि चार किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते बांधून भूकंप पीडितांसाठी एक छोटसं गांव मोफत बांधून द्यायची जबाबदारी आलेली आहे. पण टी. एच्. डी. सी. कडं हया प्रल्कपाचं नियंत्रण करण्याइतके अनुभवी तज्ञ अभियन्ते नाहीत. तेव्हां असं ठरलं आहे की, आपल्या उद्योग समूहातील टाटा स्टील, टाटा पॉवर, आणि इतर कंपन्या त्यांच्यातर्फे वरिष्ठ अभियन्ते पुरवणार आहेत, आणि प्रकल्प व्यस्थापक-नियन्त्रक आपल्या कंपनीतून आळीपाळीनं पाठवायचा आहे.
प्रकल्पाचा सर्व आर्थिक भार टी. एच्. डी. सी. नं उचलेला आहे, तसंच त्यांचे अभियन्ते ही कनिष्ठ पातळीवर काम करायला हाताशी असणार आहेतच. प्रकल्प व्यवस्थापक थेट टी. एच्. डी. सी. चे मुख्य अभियन्ता, आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचना-निर्देशांनुसार काम करील. टी. एच्. डी. सी. नं लातूर मध्येच प्रकल्प नियंत्रण कार्यालय एका आरामशीर निवासी हॉटेलात उघडलेलं आहे. तिथंच प्रकल्पावर काम करणार्‍या सगळ्या कर्मचार्‍यांची निवास-भोजन व्यवस्था केलेली आहे. प्रकल्पाच्या जागांवर जा-ये करायला दोन जीप्स् आणि स्थानिक चालक नेमलेले आहेत. प्रकल्पाचं जमिनीच्या पातळ्या मोजणीचं प्राथमिक कामही गेल्या आठवड्यात सुरूं झालेलं आहे. तेव्हां हे आव्हानात्मक काम हाताळायला तुम्हांला पुढील चारपांच दिवसांत लातूरला जाऊन या प्रकल्पाचा ताबा घ्यायचा आहे... ...मला खात्री आहे की तुम्ही हे काम नक्कीच उत्तम प्रकारे पार पाडाल... ...तेव्हां बेस्ट् लक्... ...तुमचं लातूर गाडीचं आरक्षण झालं, की मला सांगा.'

तसं म्हटलं तर 'भूकंपग्रस्त पुनर्वसन' या विषयातला पूर्वानुभव आमच्या खात्यातल्या कुणालाच - अगदी आमच्या विभागप्रमुखांना देखील - नव्हता. तेव्हां ते नवीन आव्हानात्मक काम मी आनंदानं स्वीकारलं.
जवळपास एक वर्षभर बदली म्हटल्यावर सौ. इंदिराजी नी जरा कुरकुर केलीच, पण त्याही अखेरीस राजी झाल्या, आणि मी डिसेंबर च्या अठ्ठावीस तारखेला पुण्याहून लातूर ला दाखल झालो.
टी. एच्. डी. सी. नं सगळी व्यवस्था खरोखरीच उत्तम केलेली होती, त्यामुळं ती विवंचना उरायचं कांहीच कारण नव्हतं.
लातूरला गेल्यावर विविध कंपन्यातल्या भारतभरातनं आलेल्या सहकार्‍यांच्या ओंळखी-पाळखी पहिल्याच दिवशी पार पडल्या. सुरुवातीला सहकारी, प्रकल्प व्यस्थापक म्हणून माझ्याबरोबर वीतभर अंतर राखून बोलायचे, पण माझ्या गप्पिष्ट स्वभावामुळं पुढील चारदोन दिवसांतच तो दुरावाही गळून पडला, आणि एकूणच प्रकल्पाचं काम आतां वेग घेणार असं आतनं वाटायला लागलं न लागलं तोंच पांचव्या दिवशीच किल्लारी-राजेगांव परिसरात प्लेग ची साथ फुटली... ...बघतां बघतां लातूर उस्मानाबाद सकट आख्ख्या मराठवाडाभर वणव्यासारखी पसरली... ...
आणि समस्त वर्तमानपत्रांत मुखपृष्ठांवर तश्या बातम्याही झंळकल्या...!!
झालं...एकच कल्ला उडाला... ...
रातोरात आमच्या सौ. इंदिराजीं चा दूरध्वनि,"ताबडतोब ऑफिसला कळवून पुण्याला परत निघून या...."
दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे टी. एच्. डी. सी.च्या व्यवस्थापकीय संचालकांचा दूरध्वनि,"मला आपल्या माणसांची चिन्ता लागून राहिली आहे...त्यांची सर्वतोपरी काळजी घेणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे... ...तेव्हां त्या दृष्टीनं तुम्हांला यत्किंचितही धोका जाणवला, तरी तत्क्षणीं प्रकल्पाचं काम थांबवायचे सर्वाधिकार मी तुमच्याकडं सोंपवतो आहे...तेव्हां कसलाही धोका पत्करायचा नाही... ...
दररोज रात्री ९ वाजतां माझ्या घरीं दूरध्वनि करून मला परिस्थिची माहिती देत चला."
दुसर्‍या दिवशी दुपारी आमच्या साहेबां चा दूरध्वनि,"तिथली एकूण परिस्थिति काय आहे? कितपत चिंताजनक आहे? टी. एच्. डी. सी. च्या वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार पुढं काय काय करायचं ते ठंरवा... ...नेहमीप्रमाणं दर रविवारी पुणे ऑफिस ला येऊन प्रकल्पाचा अहवाल सादर करा... ...इ. इ."
त्यात आणखी भर म्हणजे सरकार नं लातूर उस्मानाबाद महामार्गालगतच पत्र्याच्या टपर्‍या उभारून जे एक कामचलाऊ 'आपत्कालीन प्लेग रुग्णालय' सुरूं केलं, ते नेमकं आमच्या प्रल्कपाच्या जागेलगतच्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावरच.
आमच्या लातूरच्या मुक्कामी हॉटेलातही दिवसाआड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे लोक येऊन 'गॅमेग्झिन्' पावडर चे शिडकावे करायला लागले... ...
आमच्या प्रकल्पाच्या पंचक्रोशीत पण कांही कांही ठिकाणी प्लेग झालेले उंदीर उघड्यावर तडफडून मरतांना दिसायला लागले...
आणि आमचं सगळ्यांचं धाबं दणाणलं.
परिस्थिति आतां हाताबाहेर जाते की काय याचा मला अंदाज येई ना.
म्हणून मग मी किल्लारी-राजेगांव च्या प्रकल्पावरच्या माझ्या आणि कंत्राटदार श्री. सावरकरांच्या झाडून सगळ्या सहकार्‍यांची एक बैठक घेतली. आणि प्रत्येकाचं मत अजमावलं.
बहुतेकांचा सूर असा दिसला, की सरकारनं प्रतिबंधात्मक उपाय योजना कार्यान्वित केलेल्या आहेतच, तेव्हां रेंटतां येतंय् तोपर्यन्त काम चालूं ठेवूं, कारण आत्तांआत्तांच जोर पकडलेलं काम पुनश्च हरि ॐ करून आत्तांचा वेग पुनश्च पकडेतोंवर कांही महिने तरी वाया जातील.
अजून तरी आपल्या किल्लारी आणि राजेगांव च्या प्रकल्पावरचा कुणीही माणूस प्लेग नं बाधित झालेला नाही... ... आणि तसं कांही झालंच तर मग ताबडतोब काम थांबवून सागळ्यांना आपापल्या गांवी रवाना करूं, आणि तसं सगळ्या संबंधितांना पण कळवून टाकूं या म्हणजे झालं.
तात्पर्य, सगळ्यांनी प्रकल्पाचं काम थांबवायचं का? आणि कधी? या बाबतीतला निर्णय माझ्यावर सोंपवला.
दुसर्‍या दिवशी मी सगळ्या वरिष्ठांना ( सर्वप्रथम सौ. इंदिराजी ना ) दूरध्वनि करून 'सगळं आलबेल' असं कळवून टाकलं... ...
आणि प्रकल्पाचं काम तसंच पुढं चालूं ठेंवलं... ... ...
दिवस सरत होते.
प्रकल्पाचं काम वेगात चालूं होतंच पण आसपासच्या इतर कंपन्यांच्या प्रकल्पापेक्षां कितीतरी पुढं गेलं होतं... ...
या सगळ्या गदाड्यात सौ. इंदिराजीं च्या,'दर दिवसा आड मला फोन करून खुशाली कळवत जा' या तंबी चा मला चक्क विसरच पडला.
आणि साधारण पंधरवड्यानंतरच्या एके दिवशी संध्याकाळीं आम्ही कामावरून आमच्या हॉटेल वर परत आलो तर काय...
दस्तुरखुद्द सौ. इंदिराजी च स्वागतकक्ष्यांत आमची वाट पहात बसलेल्या दिसल्या...!!
सोबत त्यांनी 'आज्या' ला पण गचांडी पकडून फंरपटत आणलेला होता... ...बरोबर असलेला बरा म्हणून...!!!

त्या दोघांना तिथं बघून मी सगळ्यांच्या देंखत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
'आज्या' सोबत होता म्हणून, नाहीतर सौ. इंदिराजीं च्या 'मुल्क-ई-मैदान' चा तिथंच धंडाका उडाला असता.
गंमत म्हणजे मला बघून आज्या आणि सौ. इंदिराजी दोघंही आपापल्या कपळांना हात लावून फिदीफिदी हंसायला लागले... ...!!!
मी चक्रावलोच,"काय रे बाबानों...असं फिदीफिदी हंसायला काय झालंय् तुम्हाला... ...ऑ?"
सौ. इंदिराजी नी तोंड उघडायच्या आतच आज्या म्हणाला," काय झालंय् ते खोलीत गेल्यावर सांगतो... ...पण आधी आमच्या चहापाण्याची कांहीतरी व्यवस्था करशील की नाही साल्या?
सलग दहा तास अखण्ड बस प्रवास करून अंग अगदी आंबून गेलंय्... ..."
मी मग लॉज च्या व्यवस्थापकाला सांगून आज्यासाठी माझ्या खातीं एक खोली घेतली...तीत आज्याबरोबर माझ्या सहनिवासी मित्राला जोडून दिलं आणि आमची खोली मी व सौ. इंदिराजी साठी मोकळी करून घेतली. इतकं झाल्यावर मग तळमजल्यावरच्या भोजन कक्ष्यांत दोघांना घेऊन गेलो आणि पोंटभर खाऊं घातलं... ...
कॉफी चे कप समोर आल्यावर मग मी आज्या ला छेडलं," हं...बोल आतां... ...असे आचानक कसे काय आलात इथं? मला आधी कळवायचं तरी? आणि मघांशी मला बघून असं फिदीफिदी हंसायला काय झालं तुम्हां दोघांना?"
आज्या सौ. इंदिराजी कडं निर्देश करीत म्हणाला," अरे बाबा... ...तुझा पंधराएक दिवस दूरध्वनि आलाच नाही ना, तेव्हां ह्या नी लातूर ची आरक्षणं आधी करून मगच फतवा काढला की दोन दिवस लातूर ला जाऊन यायचं...म्हणून आलो... ...काय करणार?"
मी," 'काय करणार?' म्हणजे काय?"
अज्या,"अरे बाबा, मला सांग आपल्या अखिल भारतात इंदिराजीं पुढं कुणाचं कांहीतरी कधीतरी चाललंय् काय... ...ऑं?...आलो फरपटत नी काय?"
आतां मी सौ. इंदिराजी कडं मोर्चा वळवला,"आणि असं बत्तिशी दाखवायला काय झालं होतं तुम्हां दोघांना मघाशी?"
सौ. इंदिराजी नी फिसफिसत त्यांची हुकुमी धोबीपछाड मारून मला चितपट लोळवला,"आरश्यात बघतां ना रोज स्वतःला?... ...कसले टाम्‌ टुम् झालाय गेल्या दोन महिन्यांत इथं आल्यापास्नं...माहीताय्? जराशी ढेरीही फुगलेली दिसतेय् तुमची... ...म्हणून हंसायला आलं मघांशी... ...कळलं?"
मी,"काय रे आज्या, तुला पण मी जाड झाल्यासारखा वाटतोय् काय?... ...नाही म्हणजे तूं पण दात काढत होतास मघांशी... ..."
मला मध्येच तोंडत आज्या चीत्कारला,"साल्या जाड कसला, चांगला गरगरीत झालाय्‌स प्लेग ग्रस्त लातूर मधलं खाणंपिणं हादडून...पाच एक किलो तरी वजन वाढलेलं असावं तुझं... ...
याचसाठी माझ्या खनपटीला बसला होतास ना, इकडं यायच्या आधी?... ...लातूर चं हवा पाणी मानवलं साल्या तुला, म्हणून मघांशी हंसूं फुटलं आम्हांला तुला बघून... ..."
लॉज च्या स्वागतकक्ष्यातच वजनकाटा होता. आम्ही तिघांनीही तिथं जाऊन माझं वजन करून बघितलं...तर खरोखरच ते सहा किलो नी वाढलेलं होतं...!!"
आतां मात्र मी पुनश्च माझ्या कपाळाला हात लावला...
आणि सौ. इंदिराजीं ची 'मुल्क-ई-मैदान' धंडाडली,"मी घरीं आजन्म तेलातुपातलं साजूक खाणंपिणं - मटण बिर्याणी सकट - खाऊं घातलेलं ह्यांच्या अंगाला लागलं नाही, आणि इथल्या प्लेगग्रस्त वातावरणातलं कदान्न अन्‌ गढळ पाणी कसं मानवलंय् बघताय् ना भावजी?... ...ह्यांचं नशीबच असलं इदरकल्याणी, त्याला ती महालक्ष्मी तरी काय करील?...कपाळ?"
मी ही आतां बुचकळ्यात पडलो,"खरंच आज्या, माझा विश्वास च बसत नाहीय् ह्यावर... ...असं कसं काय होऊं शकतं?"
आज्या,"हे बघ नाना, कुणाला काय न् कधी तब्येतीला मानवेल, हे वैद्यकशास्त्राला ही अचूकपणे सांगतां येत नाही... ...तेव्हां मी काय बोलणार यावर?"
आतां सौ. इंदिराजी संरसावल्या,"पण मी सांगते ना... ...ह्यां चं त्या राजाच्या भिकारीण पट्टराणी सारखं झालंय्... ..."
मी उसळलो,"म्हणजे?... ...काय म्हणायचं काय आहे तुम्हांला?"
सौ. इंदिराजी,"सांगते...
एक चक्रवर्ती राजा होता. तो एके दिवशी सकाळी राजधानीतनं फेरफटका मारत असतांना एका मन्दिराबाहेर भिक्षा मागत बसलेली एक भिकारीण त्याच्या दृष्टीला पडली...
पाहतांक्षणीच राजा भिकारणीवर बेहद्द फिदा झाला...कारण फांटक्या वस्त्रात असली तरी भिकारीण अलौकिक 'जातीची सुंदरा होती.!!
झालं...राजानं मागचा पुढचा कांही विचार न करतां तिला रथात घालून राजवाड्यात आणली, आणि मुहूर्त बघून तिच्याशी विवाह केला...एव्हढंच नव्हे तर तिल पट्टराणीही करून मोकळा झाला... ...
भूतलावरची यच्चयावत सुखं भिकारणीसमोर हात जोडून उभी राहिली... "
आम्ही,"मग पुढं काय झालं?"
सौ. इंदिराजी,"पहिले कांही दिवस दोघांचे स्वर्गसुखात गेले, आणि दोनचार महिन्यातच राणीसाहेब खंगायला लागल्या... ...!!"
अज्या," आरं तिच्यायला... ..."
सौ. इंदिराजी," आणि सहा एक महिन्यातच पट्टराणीसाहेबा खंगून अंथरुणाला खिळल्या... ...!!!"
मी," बापरे... ...मग?"
सौ. इंदिराजी,"सांगते... ...मग राजानं सगळ्या राज्यभरातले निष्णात वैद्यराज इलाज-उपाय करायला आणले, पण कुणाच्याच औषधोपचारांनी राणीसाहेब बाळसं कांही धरेनात... ..."
आज्या आतां फिसफिसायला लागला,"म्हणजे थेट ह्या नाना सारखीच अवस्था झाली म्हणा की त्यांची... ...हीः  हीः हीः हीः ...राजवाड्यातली पंचपक्वान्नं खाऊन राणीसाहेब खंगायला लागल्या...!!!"
सौ. इंदिराजी,"ऐका तर... ...खरी गंमत पुढंच आहे... ..."
आज्या,"हं... ...बोला बोला तुम्ही...नाना कडं बिल्कुल लक्ष देऊं नकां..."
सौ. इंदिराजी,"तर झालं होतं काय, की हे सगळं रामायण सुरूं असतांना राजाचा वजीर राजधानीत नव्हता. तो परत आल्यावर त्याला हे सगळं जेव्हां समजलं तेव्हां त्यानं राजाला सल्ला दिला की,' हे सगळे औषधोपचार ताबडतोब बन्द करून मी सांगतो तेव्हढाच उपाय करून बघा... ..."
राजा,"अरे बाबा जिथं सगळ्या राजवैद्यानी शर्थीचे इलाज करून हात टेंकलेत, तिथं तुझं डोकं चालवून काय होणाराय्?"
वजीर,"महाराज, फक्त मी सांगतो तेव्हढं करा... ..."
राजा,"त्यानं काय होईल?"
वजीर,"राणीसाहेब पंधरवड्यात टमटमीत होतील... ...!!!"
राजा,"काय सांगतोस काय?"
वजीर,"अगदी शंभर टक्के... ...खात्री आहे मला... ..."
राजा,"आणि तसं नाही झालं तर?"
वजीर,"महाराज, मी सांगतोय् तसं च होतंय् की नाही ते स्वतःच बघा...आणि तसं नाहीच झालं, तर वजीराचं पद मी सोडून देईन."
राजा,"टीकाय्... ...बोल, काय उपाय करायचा?"
वजीर,"सर्वप्रथम राणीसाहेबांचं पंचपक्वान्नांचं खाणंपिणं बंद करून टाकायचं, आणि त्यांच्या महालातल्या कोनाड्यात, वळचणीत, सांदी-सपाटीत वाळक्या भाकर्‍या, सुललेला मिरच्यांचा ठेंचा, आणि गूळ वगैरे पदार्थ जागोजागीं पेरून ठेंवायचे..."
राजा,"बाबा रे, आधीच त्यांचा अस्थिपंजर झालाय्... ...तश्यात हे असलं कांहीतरी करून त्यांचं कांही बरं वाईट झालं म्हणजे?"
प्रधान,"तसलं कांऽऽऽऽऽऽहीही होणार नाही... ...दुसरं म्हणजे आठवड्यातनं दोन तीन दिवस, एक वेळ सारे कोनाडे वगैरे खडखडीत रिकामे ठेवायचे... ...त्यात कांहीही खाद्य-पेय ठेंवायचं नाही...
थोडक्यात राणीसाहेबांना दर एक दोन दिवसाआड दिवसातनं एक वेळ कडकडीत फांके पडले पाहिजेत... ...!!"
राजा,"हे बघ बाबा, ही तुझी विषाची परीक्षा घेऊन राणीसाहेबांचं कांही बिघडलं ना, तर थेट सुळावर चंढवीन मी तुला... ...समजलास?"
वजीर,"मान्य आहे महाराज मला... ...!!...आणखी एक..."
राजा," आणखी काय करायचं राह्यलंय् अजून?"
प्रधान,"नीट ऐका... ...राणीसाहेबांची तमाम उंची-भरजरी वस्त्रंप्रावरणं गायब करायची, आणि त्या जागीं फांटकी-विटकी धंडोती ठेंवायची, जेणेकरून त्यांना ती च वापरावी लागतील...जमेल महाराज?"
राजा,"ठीकाय्... ...तुला इतकी खात्रीच वाटतेय्, तर हा पण एक अखेरचा उपाय करून बघूं या... ..."
प्रधान," आणि राणीवशातल्या तमाम दास-दासी नां स्वतः जातीनं सक्त तंबी देऊन ठेंवायची, की या आज्ञां चं जर कोणी उल्लंघन करील तर तत्क्षणीं त्याला किंवा तिला तोफेच्या तोंडी दिलं जाईल... ... काय?"
झालं... ...राजानं दुसार्‍या क्षणींच हरकार्‍यांना बोलावून सगळी व्यवस्था करून टाकली...
राणीसाहेबांचे हाल कुत्रं खाई ना... ...!!
धड ल्यायला चांगलं चुंगलं वस्त्र मिळेना, धड खायला-प्यायला मिळेना... ...
जे मिळेल ते शिळं-पाकं खायला लागलं, भंरीला दर दिवसाआड कडकडीत उपवास पण घडायला लागले... ... ...
आणि काय आश्चर्य...
वजीराच्या भाकितानुसार राणीसाहेबांची तब्येत झंपाट्यानं सुधारायला लागली, आणि पंधराएक दिवसात त्या अगदी पहिल्यासारख्या टमटमीत झाल्या... ...!!!"
कथेचं निरूपण करून मग सौ. इंदिराजी आज्याला म्हणाल्या,"तेव्हां ह्यां चं थेंट त्या भिकारणीसारखंच झालंय्... ...!!
घरीं तिन्हीत्रिकाळी मी रांधलेलं चमचमीत हादडून ह्यां ना कधी मानवलं नाही, आणि आतां इथलं बाजारचं निकृष्ट खाणंपिणं, आणि प्लेग दूषित पाणी पिऊन कसे टमटमीत भंरलेत बघा... ...!!!"
आतां मात्र आज्या आणि मी, आम्ही दोघांनीही आपापल्या कपाळांना हात लावले...!!
आज्या,"म्हणजे वहिनी... आपल्या व्यवहारवादी म्हणी आहेत ना,...म्हणजे 'तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कारलं कडू ते कडूच', किंवा 'कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच' इत्यादी, तसलंच कांहीतरी या नाना चं झालंय् म्हणा की."
सौ. इंदिराजी फिसफिसत उत्तरल्या,"कसं बोललात... ...अगदी हे च म्हणायचं होतं मला... ..."
आज्या नं आतां त्यावर तत्त्वज्ञाची फोडणी मारली,"खरं सांगायचं तर वहिनी, या नाना ला मी परोपरीनं सांगत होतो, की 'स्वभावान्नास्त्यौषधम्'..."
सौ. इंदिराजी,"खरंच आहे ते अगदी..."
अज्या,"अहो, ' स्वधर्मे मरणं श्रेयो परधर्मे भयावहः ' असं भगवद्गीता पण सांगते ना?... ...पण पटवून घेतलं तर तो नाना कसला?
     इथं यायच्या आधी माझ्या खनपटीलाच बसलेला होता, ' मला जाड व्हायची कांहीतरी गोळीबिळी लिहून दे' म्हणून...
     अगदी पांठ सोडी ना, तेव्हां मग मी ते तुम्हांला दाखवायला सांगितलेलं 'औषध' लिहून दिलं शेंवटी... ...हीः हीः हीः हीः हीः ...."
मी त्या दोघांचं कधीतरी पोंटभर उट्टं काढायचा निश्चय करून गप्प बसलो... ... ...!!!

होतां होतां पुढच्या सहाएक महिन्यांत आमचे किल्लारी-लातूर चे दोन्ही पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाले.
त्यांचा हस्तांतरण समारंभही एकजात सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटानं पार पडला...
आमच्या चमू चं सगळ्यानीं तोंड भरून कौतुकही केलं. भूकंपानं होरपळलेली जवळपास तीनएकशे कुटुंबं आपल्या नवीन घरकुलांत रहायला आलेली बघून आम्ही सगळे भरून पावलो... ...
आणि मी लातूर ला गेल्यास जवळपास एक वर्षभरानं पुण्याला स्वगृहीं परतलो... ...
तोपावेतों तब्येत चांगलीच भंरलेली होती...माझं 'चबी चीक्स्' चं स्वप्नं ही बर्‍यापैकी साध्य झालेलं होतं...!!
त्या खुषीत मी सौ. इंदिराजी आणि आज्या ला माफ करून टाकलं, आणि झालं गेलं विसरून गेलो... ...
पण नियतीच्या मनांत कांहीतरी वेगळंच होतं... ...
साधराण महिनाभर उलटला असेल नसेल....
एका रविवारी सौ. इंदिराजी नी वाणीसामान भंरण्यासाठी 'डी. मार्ट्' ला जायचं फर्मान काढलं, आणि दुपारीं जेवणखाण आटोपून आम्ही गाडी काढून डी. मार्ट् गांठलं.
दुपारी तीन ची वेळ असल्यामुळं डी. मार्ट् मध्ये तसा शुकशुकाटच होता.
आम्हांला बघितल्यावर डी. मार्ट् चा मॅनेजर सुब्रह्मण्यम हंसून सामोरा आला,"काय साहेब...नमस्कार वहिनी... ...बर्‍याच दिवसांनी दिसताय् इकडं..."
सौ. इंदिराजी," गेलं वर्षभर हे पुण्याबाहेर होते ना तेव्हां माझं इथं येणं दोनतीन वेंळाच काय ते झालं मुलीबरोबर...काय म्हणताय्?"
सुन्रह्मण्यमम,"कांही नाही...साहेबांची तब्येत चांगलीच सुधारलेली दिसतेय्, म्हणून आपलं हटकलं... ..."
माझ्या तब्येतीचा विषय निघतांच सौ. इंदिराजींचं लक्ष दरवाज्यातच असलेल्या वजनकांट्याकडं गेलं, अन् त्यांनी हुकूम सोडला,"चला...आधी तुमचं वजन बघूं या करून, मग करूं खरेदी काय ती."
मी,"अगं पण... ..."
सौ. इंदिराजी,"पण नाही न् बीण नाही...चला... ...रहा उभे त्या वजनकांट्यावर..."
मी निमूटपणे कांट्यावर उभा राहिलो, तर वजन भंरलं अठ्ठ्याहत्तर किलो...!!
झाऽऽऽऽऽऽलं...सौ. इंदिराजी नी आतां कपाळाला हात लावला,"अहो तुमचं वजन चक्क बारा किलो नी वाढलंय्... ...आतां आहार नियंत्रण करायला हवं..."
मी नकाराधिकार उपसला," हे बघा...माझ्या उंचीला अठ्ठ्याहत्तर किलो म्हणजे कांही बेसुमार वजन नव्हे...समजलं? तेव्हां हे तुमचं 'आहार नियंत्रण' वगैरे काय ते बासनात गुण्डाळून ठेंवा... ...ते मुळीच जमायचं नाही आपल्याला... ...सांगून ठेंवतो."
सौ. इंदिराजी उसळल्या,"कुणाला सांगून ठेंवताय्?...आणि हे...हे असंच फुगत राहून जर कांही नस्ती लचाण्डं मागं लागली, तर मग काय करायचं आपण...ऑं?"
मी,"अहो...जरा ऐका मी काय......."
सौ. इंदिराजी नी माझ्याकडं दुर्लक्ष करीत मोबाईल बाहेर काढून आज्या चा नंबर फिरवला,"मी सुमीता बोलतेय् भावजी... ...रात्री उभयतां जेवायला यायचं आहे आमच्याकडं...
...नाही नाही...तसं कांही विशेष कारण नाही... ...आपलं सहजच गप्पाटप्पा मारायला... ...तेव्हां नक्की या...आम्ही वाट बघतो...काय?...हो...हो...नाना पण घरीच असतील... ...धन्यवाद."
मी,"कळलं मला आतां... ...आज्या ला मधे घालून माझं बौद्धिक घ्यायचं आहे ना तुम्हांला 'लठठपणा निर्मित समस्या' या विषयावर?"
सौ. इंदिराजी नी लेग् कट् मारला,"चला लौकर आतां....गर्दी वाढायच्या आत खरेदी उरकून टाकूं.......कळलं?"
मी मुकाट कांखोटीला मारलेल्या रिकाम्या पिशव्या उघडल्या, आणि सामान भंरायला सुरुवात केली... ...!!

ठंरल्याप्रमाणं रात्री आज्या-अलका भोजनाला दाखल झाले...
गप्पाटप्पात मध्येच सौ. इंदिराजी नी मुख्य मुद्याला हात घातला,"भावजी... ...आपण लातूर ला गेलो होतो तेव्हां तुम्हांला मी सांगितलेली भिकारणीची गोष्ट आंठवत असेलच..."
आज्या,"होय तर...तसली फर्मास गोष्ट कशी काय विसरेल हो?... ..."
सौ. इंदिराजी,"त्या गोष्टीत राजाच्या चतुर वजीरानं जशी करामत केली ना, तसलीच कांहीतरी करामत आतां तुम्हांला करून दाखवायची आहे.!!"
आज्या आतां डोळे फांडून सौ. इंदिराजी कडं बघायला लागला," 'तसलीच कांहीतरी करामत'...म्हणजे काय वहिनी?"
सौ. इंदिराजी नी आतां ऐरणीवर निर्णायक घांव घातला,"त्या गोष्टीतल्या 'राणीसाहेब' जश्या वाळल्या होत्या ना?...त्या उलट हे आमचे 'राजेसाहेब' आतां भंरमसाठ फुगायला लागलेत... ...काय?"
मी आतां वार्‍याची दिशा ओंळखत आज्या कडं मोर्चा वळवला," हे बघ आज्या... ...हिचं कांहीही ऐकायचं नाही, आणि मनावर तर मुळीच घ्यायचं नाही... ...समजलास?...नाहीतर माझ्याशी गांठ आहे बघ."
आज्या,"अरे पण वहिनींचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकायला काय हरकत आहे रे नाना?"
सौ. इंदिराजी नी मला बोलायची संधीच दिली नाही,"तेव्हां भावजी...त्या गोष्टीतल्या वजीरा नं जशी राणीसाहेबांना गुटगुटीत बनवायची करामत करून दाखवली ना, तशी ह्या आमच्या दिवसागणिक टम्म होत चाललेल्या 'राजेसाहेबां' ना आठ पंधरा दिवसात अगदी बेतशीर सडपातळ करून दाखवायची करामत तुम्हांला करायची आहे !!! ...काय?"
मी अखेरचा प्रयास केला,"हे बघा इंदिराजी...सडपातळ व्हायचा प्रयत्न करायला, माझा लठठपणा कांही ओंसंडून वहायला लागलेला नाही...समजलं? तेव्हां मी कसलेही उपचार बिपचार करून घ्यायला तयार नाही... ...साला कधी नव्हे ते नवसासायासानं भरल्यासारखं अंग जरा भंरलंय् तर तुमचं पोंट दुखायला लागलंय काय?... ...ऑं?"
सौ. इंदिराजी नी आतां आज्याची च कोंडी केली,"हे बघा भावजी... ...हे...हे बाळसं असंच वाढत गेलं आणि त्यातनं कांही भलत्याच समस्या जर उद्भवल्या, तर त्या मला नी तुम्हांलाच  निस्तराव्या लागतील...!!... ...कारण ह्या बाबतीत आमचे वजीर तुम्हीच...!!!... ...होय ना?"
आतां खुद्द आज्या नं च स्वतःच्या कपाळाला हात लावला," अहो काय भलतंच सांगताय् वहिनी?... ...अगदी छान टुमटुमीत झालाय् की हा नाना... ...हे खूळ काढून टाका डोंक्यातनं तुमच्या...कांही होणार नाही नाना ला..."
मी लगेच आज्या ची री ओंढली,"ऐकलंत?... ...एक वैद्यकवाचस्पति च सांगतोय् की मला कांहीही होणार नाही म्हणून... ...समजलं?"
सौ. इंदिराजी नी त्यांचं प्यादं पुढं सरकवलंच,"कांही होणार नाही हे कोण छातीठोंकपणे सांगूं शकेल गं अलका?...नाहीतर मधुमेह बिधुमेहासारखं कायमचं लचांड ह्यांच्या मागं लागलं, तर काय करायचं मग?... ...ते कांही नाही...ह्यांच्या खाण्यापिण्यातलं तेल-तूप-साखर-सामिष वगैरे कटाप् करावंसं वाटतंय् मला..."
आतां मात्र मी सुद्धां कपाळाला हात लावला," हे बघा, हे असलं कांहीही चालणार नाही मला... ...अखेरचं सांगतोय्...!!!"
असं रण माजल्यावर मात्र आज्या च्या कपाळावर क्षणभर एक सूक्ष्मशी आंठी पडली... ...
आणि आश्चर्य म्हणजे दुसर्‍या क्षणीं आज्या नं माझा इन्दिरामोक्ष केला,"एक उपाय सांगतो वहिनी... ...करून बघाच फक्त काय होतंय् ते..."
सौ. इंदिराजी आतां खुषीत येऊन चीत्कारल्याच,"आतां कसं बोललात भावजी... ...बोला काय करायचं?"
अज्या,"कांहीही करायचं नाही...!!!"
सौ. इंदिराजी बांवचळल्याच,"म्हणजे?... ...काय म्हणायचं काय आहे तुम्हांला भावजी?"
आज्या मिश्किल हंसत म्हणाला,"मी जे म्हटलं तेंच... ...तुम्ही कांहीच करायचं नाही... ...!!!"
सौ. इंदिराजी,"म्हणजे काय?...ह्यांचं तेल-तूप-साखर-बिर्याणी हादडणं असंच चालूं ठेंवायचं?"
अज्या,"होय वहिनी... ...तुमच्या नेहमीच्या खाण्यापिण्यात कांहीही फरक करायचा नाही... ..."
आतां सौ. इंदिराजीनीच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला,"अहो मग ह्यांचं असं हे सगळं हादडणं असंच सुरूं राहिलं, तर हे बारीक कसे काय होणार मग... ...ऑं?"
आज्या आतां गालातल्या गालात हंसला,"ते मला नकां विचारूं वहिनी... ...पण पुढच्या दोनतीन महिन्यात हा नाना सडपातळ नाही झाला ना, तर वैद्यकी सोंडून देईन मी कायमची !!!... ...काय?"
आतां मात्र सौ. इंदिराजी सफाचट् निरुत्तर झाल्या...नी मूग गिळून गप्प बसल्या... ...!!
असली नामी संधी मी तरी कशी काय सोडणार?,"शतशः धन्यावाद आज्या तुला... ...लंगोटियार आहेस खरा...!!!"
सौ. इंदिराजी नी तंबी भंरलीच,"तर तर...उंदराला मांजर साक्षी... ...'खरे लंगोटियार' काय?... ...
आतां नीट कान उघडे ठेंवून ऐकून ठेंवा तुम्ही दोघेही... ...
दोनच्या जागी तीन महिने मी वाट बघेन हे सडपातळ व्हायची...
ह्यांच्या खाण्यापिण्यातही काडीचा फरक करणार नाही मी... ...
पण तीन महिन्याभरांत तुमच्या ह्या 'नानां' चा फुगवटा जर कां नाही ओंसरला ना, तर तुम्हां दोघांच्याही लंगोट्या जाग्यावर राहणार नाहीत सांगून ठेंवते !!! ... ...काय?... ...ऐकलत ना नीट?"
आम्ही सौ. इंदिराजी ना कोपरापासून हात जोडले... ...आज्या म्हणाला,"ठीकाय् वहिनी... ...हरकत नाही..."
आज्या चे मी नजरेनंच शतशः आभार मानले... ...मला उपासमारीतनं सोंडवल्याबद्दल...
आणि आमचा चौघांच्या दिनचर्याही होत्या तश्याच चालूं राहिल्या...
सौ. इंदिराजी नी पण घरांत हा विषय परत छेडला नाही ... ...
त्या तश्या दिलेल्या शब्दाच्या पक्क्या असल्यानं माझ्या 'तेल-तूप-गोडधोड-सामिष' वगैरे हादडण्यात पण कांहीच फरक पडला नाही... ...
असाच एक महिनाभर गेला, आणि हळूं हळूं सौ. इंदिराजी चिंतामुक्त व्हायला लागल्या... ...
दोन एक महिने उलटेतोंवर तर त्या आनंदीही दिसायला लागल्या... ...!!
आणि पुढच्या पंधरवड्यात तर त्या चक्क खुषीत वावरायला लागल्या... ...!!!
एक दिवस मला च कांहीतरी शंका आली, अन् मी त्यांना छेडलंच,"काय झालंय् आज तुम्हांला?... ...अगदी खुषीत दिसताय् म्हणून विचारलं..."
सौ. इंदिराजी,"आरश्यात बघिलंत काय स्वतःला नीट निरखून?"
मी,"म्हणजे?... ...काय झालं?"
सौ. इंदिराजी,"आतां कसे पहिल्यासारखे छान अंगाबरोबर दिसताय् म्हणून म्हटलं...!!! ...नीट बघितलंत काय आरश्यात?"
मला ती दुष्ट शंका आतां परत छळायला लागली...पण नुस्तं आरश्यात बघून काय समजणार होतं स्वतःचं स्वतःला?
मी तांतडीनं जामानिमा चंढवून बाहेर पडलो... ...आगगाडीचं स्टेशन चालत केवळ पांच मिनिटांच्याच अंतरावर होतं... ...
तिथल्या फलाटावरच्या वजन कांट्यावर उभा राहून मी चपळाईनं एक रुपयाचं नाणं त्यात ढंकललं...
वजनाचं तिकीट बाहेर येतांच चटकन् उचलून ते मी बघितलं... ...
अन् फाड्दिशी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!
लातूरहून परत  आल्यावर ऐंशी किलोपर्यन्त चंढलेलं माझं वजन आतां चक्क अडुसष्ट किलोवर घंसरलेलं होतं... ...!!!
आज्या ची बत्तिशी अशी फळलेली होती...!!
मी तत्क्षणीं त्याला दूरध्वनि लावला,"काय आज्या... ...कसं काय चाललंय् एकूण?"
आज्या," अगदी फाकडू... ...बोल कशी काय आंठवण काढलीस?"
मी,"आज संध्याकाळी उभयतां भोजनाला आमच्या घरीं या... ...सुट्टी च असल्यामुळं जरा निवान्त गप्पा ही होतील... ...काय?"
आज्या ला माझ्या मनातल्या खळबळीचा कांही वास लागलेला दिसला नाही...
,"ठीकाय् येतो आठ वाजतां." म्हणून त्यानं दूअध्वनि ठेंवला.
घरीं गेल्यावर मी सौ. इंदिराजी ना ही खबर ऐकवली... ...त्या पण खूष झाल्या...माझ्यातल्या 'खळबळी' चा बिल्कूल सुगावा न लागतां... ...
सालं नशीब आज जोरावर दिसत होतं... ....
सौ. इंदिराजीं ची हैद्राबादी मटण बिर्याणी आणि वर आईसक्रीम हादडून झाल्यावर पोटांवर हात फिरवत आमच्या गप्पांची बैठक जमली...
आणि कुणाला कांही कळायच्या आंतच मी थेट विषयाला हात घातला,"आज्या मला एका प्रश्नाचं खरंखुरं उत्तर हंवय्... ..."
आज्या," बोला नानासाहेब... ..."
मी,"माझं वजन परत अडुसष्ट किलो पर्यन्त घंसरलंय्... ...ते 'चबी चीक्स्' ही गायब झालेत... ..."
आज्या,"बरं... ... ...मग?"
मी," मग काय?... ...त्या दिवशी तूं इंदिराजी नां हे असं होण्यासाठी काय करायला सांगितलंस खासगीत?"
आज्या नं कानांवर हात ठेंवले,"कसलं काय खासगी न् बिसगी?... ...तुझ्यादेंखत च मी वहिनी नां स्वच्छपणे सांगितलं ना, की नाना च्या खाण्या-पिण्यात कांहीही फरक करायचा नाही म्हणून?"
मी,"मग तरी मी असा बारीक कसा काय झालो?... ...थेट पहिल्यासारखा?"
आतां सौ. इंदिराजी नी सिक्सर ठोंकली,"अहो, त्या गोष्टीतली भिकारीणा नाही कां पंचपक्वानं हादडून वाळकुटी झाली?... ...तुमचं नशीबही तसलंच खत्रूड!!!... ...त्याला भावजी काय करतील?"
मी,"हे बघ आज्या... ...माझ्या आहारात तूं काय घालायला सांगितलंस इंदिराजी ना?... ...बोल."
आज्या,"अरे बाबा माझ्या... ...मी वहिनी नां कांहीही सांगितलेलं नाही... ...त्या म्हणताय्‌त ना...तसंच झालंय तुझं... ...तुला एकूण स्वगृह मानवत नाही असं दिसतंय्... ...त्याला काय करायचं?"
तरी माझी शंका कांही फिटे ना,"मग मी परत असा इतका बारीक कसा काय झालो?... ...आपोआपच? ... ...ऑं?"
आज्या,"हे बघ नाना... ...तुला वैद्यकशास्त्राच्या भाषेत ते सांगून कांहीही पटणार नाही... ...तेव्हां तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगतो... ...काय?"
मी फिस्कारलो,"तर तर... ...माझी मर्मस्थानं तुझ्याइतकी दुसर्‍या कुणाला माहीत असणार?... ...आणि तुझ्या तात्त्वज्ञानिक विश्लेषणांत, एखादा माणूस पोंटभर पौष्टिक खाऊन पिऊन सुद्धां बारीक कसा काय होऊं शकतो याचा पण खुलासा असेलच... ...नाही?... ...कारण की तुझ्या वैद्यकशास्त्रालाही ज्या गोष्टीची कारणमीमांसा माहीत नाही, त्या गोष्टीबद्दल इंदिराजी नां 'अजिबात काळजी करूं नकां...हा नाना  हमखास सडपातळ होणारच' अशी अगदी छातीठोकपणे खात्री देत होतास ना?... ...म्हणून म्हटलं..."
आज्या,"होय तर... ...तुझ्या यच्चयावत शंकाकुशंकांचे झाडून सगळे खुलासे आहेत माझ्या निरूपणात... ...काय ?"   
मी," तेव्हां... ...प्रारंभ कुर्यात् गुरुदेव श्रोतृवृन्दो उपस्थितः ...!!!"
आज्या,"त्याचं असं आहे नाना, की संस्कृतात याबद्दल एक मजेशीर सुभाषित आहे... ...ते असं आहे
      ॥ कुष्ठमांसाशनेनैव गृध्रस्य पुष्टिर्भवेत्
तात्पर्य, गिधाड असतं ना, ते जसं सडलेलं-कुजलेलं मांस खाऊनच धष्टपुष्ट होतं, तसंच कांहीसं तुझं लातूरला गेल्यावर झालं नाना... ...तिथलं बाजारचं निकृष्ट खाणं-पिणं च तुझ्या तब्ब्येतीला मानवलं, त्याला काय करणार?"
अलका वहिनी,"धन्य आहे नाना तुमची...!!!... ...हीः हीः हीः हीः हीः हीः ..."
सौ. इंदिराजी,"धन्य नाहीतर काय?... ...ह्यां चं नशीब च असलं खत्रूड आहे, त्याला कोण काय करणार?"
आतां मी उसळलो,"वा वा वा वा वा वा .... गुरुदेव, आतां असं बघा, की तर्कदृष्ट्या गिधाडाला जर सडकं-कुजकं मांस मानवत असेल, तर मग चांगलं चुंगलं खाऊन ते दुप्पट पुष्ट झालं पाहिजे... ...काय?
               आतां माझी तब्ब्येत त्या गिधाडासारखीच... ...तेव्हां इथं ह्यां च्या हातचं सुग्रास हादडून माझ्या अंगावर ढीगभर तरी मांस चंढायला हवं होतं... ...नाही आज्या?"
आज्या गुरुदेवांनी आतां निरूपण सुरूं केलं,"इथंच तर सगळी गोम आहे नाना...तुम्ही सुभाषिताचा दुसरा चरण कुठं ऐकलाय् अजून?"
सौ. इंदिराजी,"बोला...बोला भावजी...होऊन जाऊं द्या...!!"  
आज्या,"दुसरा चरण असा आहे...
      कुपुष्टि पौष्टिकाहारात्मूलपिण्डोऽबाधितः ॥  !!!
      म्हणजे गिधाडाला जर चांगलं पौष्टिक खाणंपिणं खायला घातलं तर त्याची त्या पौष्टिक आहारानं पुष्टि होण्याऐवजी उलट कुपुष्टि च होते... ...!!
      तात्पर्य, पौष्टिक आहार खाऊन गिधाड गरगरीत होण्याऐवजी उलट वाळायला लागतं... ...वहिनींच्या गोष्टीतली भिकारीण जशी पंचपक्वान्नं खाऊन खाऊन खंगली ना, अगदी तसंच... ...!!!
सौ. इंदिराजी,"म्हणजे तुपात तळा, नाहीतर साखरेत घोळा... ... ..."
आज्या," अगदी बरोबर बोललात वहिनी...
        त्याचं असं आहे की, जगातल्या सर्व चराचर वस्तु आहेत ना, त्या प्रत्येकाचा निसर्गानं घडवलेला एक मूळ स्वभाव...ज्याला आपण तब्ब्येत, किंव पिण्ड म्हणतो तो...त्यालाच आम्ही वैद्यकीत              'कॉन्स्टिट्यूशन्' असं संबोधतो, तो कधीच बदलत नाही, असं सुभाषितकार सांगताय्‌त.
       तात्पर्य, गिधाडाचा पिण्ड हा नुस्ता सडकं कुजकं मांस खाऊन पुष्ट होण्याचा नसून, त्याव्यतिरिक्त कांहीही - अगदी ताजं उत्तम मांस सुद्धां - खाल्लं, तर रोडावण्याचाही असतो... ...
       तसंच कांहीसं ह्या नाना च्या तब्ब्येतीचं गौडबंगाल आहे...म्हणून तर लातूरला गेल्यावर त्यानं बाळसं धरलं, आणि स्वगृहीं परतल्यावर घरचं पौष्टिक खाऊन-पिऊन तो पुन्हां वाळला... ...!!!"
मी आतां कपाळाला हात लावीत म्हटलं,"मग आतां 'चबी चीक्स्' साठी कांहीच उपाय उरला नाही काय रे आज्या... ...ऑं?"
सौ. इंदिराजी नी संधी साधलीच,"कां नाही उपाय?... ...आहे की..."
मी कान टंवकारले,"काय?... ...काय आहे उपाय तुमच्या डोंक्यात?"
सौ. इंदिराजी,"कांही नाही... ...लातूरपेक्षा ज्यास्त खत्रूड गांवी बदली करून घ्यायची कायमची... ...!!!"
आतां आम्ही सगळेच हीः हीः हीः हीः हीः करायला लागलो... ...अन् सौ. अलका वहिनीनी एकदम चुटकी वाजवली,"सुमे... ...कदाचित असंच असेल नानांचं..."
सगळे,"काय कसं असेल नाना चं?"
आणि सौ. अलका वहिनीनी अखेरचा बॉंब टाकला,"म्हणजे असं बघा...की आपण जे खातो-पितो ना, त्यापासून रक्तात साखर तयार होते, आणि तिच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते...बरोबर?"
आज्या," अगदी बरोबर... ..."
सौ. अलका वहिनी,"आतां जाडी केव्हां वाढेल? तर त्या साखरेचं जर श्रमून ज्वलन झालं नाही, तर तिचं चरबीत रूपांतर होणार...आणि  बाळसं वाढणार...काय?"
सगळे,"अगदी बरोबर... ...मग पुढं?"
सौ. अलका वहिनी,"तर नानांच्या बाबतीत काय होत असेकल, की त्यांना एका खाण्या-पिण्यातनं जी ऊर्जा प्राप्त होते, ती सगळी च्या सगळी पुढचं खाणं-पिणं पंचवण्यातच खर्च होत असावी... ...!!
               त्यामुळं चरबी वाढायला अतिरिक्त साखरच शिल्लक उरत नसेल त्यांच्या शरीरात, तर नाना कसे काय बाळसं धंरतील, अगदी तिन्हीत्रिकाळी तेल-तूप-मटणाचा मारा केला तरी?... ...ऑं?"
सौ. अलका वहिनीं चा अचाट तर्कटषट्‌कार बघून मी कपाळाला हात लावत जागीं च चितपट झालो... ...!!!
अन् आज्या आणि सौ, इंदिराजी पहाडी आवाजात पोटं धंरधंरून खदांखदां हंसत सुटले... ...!!!!

****************************************************************************************** -- रविशंकर.
१ जानेवरी २०१९.

   

Monday, 13 August 2018

॥ साध्य-साधन ॥" मराठे काका...मला एक तात्त्वज्ञानिक कूटप्रश्न पडलाय्‌...आणि बरीच डोकेफोड केली मी तो सोडवण्यासाठी, पण नेमकं उत्तर कांही सापडत नाहीय्‌..." मी समोर मेजावर काकांनी आणून ठेंवलेला चहाचा कप उचलीत प्रस्तावना केली.
दोन हजार बारा सालातले हिंवाळ्याचे दिवस होते, आणि रविवार दुपारची निवान्त वेळ नेमकी पकडून मी मराठे काकांचं डोंकं पिकवायला त्यांच्या घरीं टंपकलेलो होतो... ...

हे मराठे काका - म्हणजे श्री. अजित मराठे म्हणजे माझे ठाणेस्थित बन्धू श्री. सदय यांचे कौटुंबिक स्नेही...त्यांच्या शेंजारच्या 'वसन्त विहार' सोसायटीत राहणारे.
माझ्यापेक्षां फारतर आठदहा वर्षांनी ज्येष्ठ असतील...त्यांची ओंळखही तशी अपघातानंच झाली होती...
अन्‌ तीतूनच आमच्यातला समान बन्ध - म्हणजे तत्त्वज्ञानाची आवड - ही तोण्डओंळखीचं रूपान्तर घनदाट स्नेहात करायला कारणीभूत ठंरलेली होती.
दुसरा समान दुवा म्हणजे आम्हां दोघांनाही दुपारीं जेवण झाल्यावर दोनचार तास तांणून द्यायची संवय अजिबात नाही. 
त्यामुळं आम्हांला एकमेकांच्या घरीं केव्हांही ( अगदी अपरात्री सुद्धां ) डोंकवायची मुक्त मुभा प्राप्त झालेली होती, जिचं पर्यवसान पोंटभर तात्त्वज्ञानिक वादावादीत अगदी हटकून व्हायचं.
कारण मराठे काकांची अफाट तात्त्वज्ञानिक उमज...डोकं पिकवणार्‍या व्यावहारिक जगातल्या समस्याही ते तत्त्वज्ञानाच्या सारीपाटावर चुटकीसरशी सफाचट उलगडून दाखवायचे.
म्हणूनच ठाण्याला जेव्हां जेव्हां मी बन्धूंच्या घरीं जात असे, तेव्हां माझा वेळ बन्धूंच्या घरातल्या इतकाच - कदाचित थोडा ज्यास्तच - ह्या मराठे काकांच्या सोंबत व्यतीत होत असे.

(या मराठे काकांची ओंळख करून घ्यायची असेल, तर या च ब्लॉगवरची ' मिडास आणि पायपर ' ही कथा वाचकांनी आधी वांचून मग या कथेचा आस्वाद घ्यावा.) 

"आधी चहा तर पोंटांत रिचवूं या रविशंकरजी...त्याशिवाय तत्त्वज्ञान कसं काय सुचणार आपल्याला...ऑं?" मराठे काका खोः खोः हंसत म्हणाले.
"अहो चहा पण गोड लागेनासा झाला, म्हणून तर छळायला आलोय् तुम्हांला..." मी पण त्यांचा चेण्डू टोंलवीत म्हटलं.
" वाहव्वा... बहोत खूब... " मराठे काका चहाचा कप तोंडाला लावीत म्हणाले," घ्या...चहा घ्या आधी... ...नाहीतर थण्ड होईल तो... ...आणि थण्ड झाल्यावर आसामी चहाची लज्जत जिभेला काय डोंबल कळणाराय्?... ... हं... ...सांगा...कसला काय कूटप्रश्न पडलाय् तुम्हांला?"
मी," कूट प्रश्न असा आहे की, एकाच कुटुंबात जन्मलेल्या; एकाच घरातल्या वातावरण-संस्कारांत - घडलेल्या अन्‌ वाढलेल्या दोन भावंडांच्या शैक्षणिक कर्तृत्त्वात इतका नजरेत भंरण्यासारखा फरक पडूं शकेल काय? आणि फरक पडत असेल, तर त्याचं कारण काय असूं शकतं?"
मराठे काका," 'इतका' फरक म्हणजे कितीसा फरक म्हणताय्?"
मी," ' इतका ' म्हणजे अगदी उत्तर - दक्षिण ध्रुवां इतका."
" नवलच सांगतां आहात की... ...आणि ' एकाच घरांत जन्मलेल्या ' म्हणजे... ...", मराठे काका हनुवटी खांजवीत विचारते झाले, " सख्खी भावंडं असं म्हणायचं आहे काय तुम्हांला?... ...
मी,"गोष्ट अशी आहे की हे दोघे भाऊ एकमेकांचे सख्खे नाहीत, पण चुलत भाऊ लागतात. आपण त्यांना यशवंत आणि जयवन्त असं संबोधूं या... ...
एकत्र कुटुंब असल्यामुळं दोघेही एकाच घरांत जन्मलेले, एकाच वातावरणांत - म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कारिक वगैरे - वाढलेले आणि घडलेले पण... ..."
मराठे काका,"तरीही फरक पडूं शकेल की...अगदी सख्ख्या भावंडांचं कर्तृत्त्व तरी तुलनेनं सारखं कुठं असत?...किंबहुना बर्‍याच कुटुंबांत ते कमीज्यास्त असलेलं आपण पाहतोच की... ...मग तुम्हांला प्रश्न कसला पडलाय्?
मी," झालं असं, की दोघेही दहावी-बारावी च्या परीक्षा अगदी उत्कृष्ठ म्हणतां येणार नाही, पण बर्‍यापैकी ७०-८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले... ...म्हणजे बुद्धी-आकलनाचा आवाका सुद्धां दोघांचा साधारणपणे समसमान आहे असा ढोबळ मानानं निष्कर्ष निघेल... ...बरोबर?"  
मराठे काका," बरोबर...आलं लक्ष्यांत... ...पुढचं काय?"
मी,"दोघांनाही अभियांत्रिकी शिकायची हौस होती...पण  सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जमान्यात पदवीच्या अभियांत्रिकी ला स्वार्हतेवर प्रवेश मिळणं दोघांनाही शक्य नव्हतं..."
मराठे काका,"मग पुढं काय झालं?"
मी," सांगतो... ...तर दोघांपैकी धाकटा जयवन्त...त्याला मुंबईला सोमय्या संस्थेत विद्युत् अभियांत्रिकी च्या पदविकेच्या अभ्यासक्रमाला स्वार्हतेवर प्रवेश मिळाला, आणि तो तिथं रुजूं पण झाला..."
मराठे काका,"आणि यशवन्ताचं काय झालं पुढं?"
मी," तो माझ्याकडं सल्ला मागायला आला होता, ' पुढं काय करूं?' असा प्रश्न घेऊन..."
मराठे काका,"मग? काय सल्ला दिलात तुम्ही त्याला?"
मी," त्याच्या बोलण्यातनं असं समोर आलं की त्याला ' प्रगत प्रतिमा तंत्रशास्त्र' - म्हणजे ज्याला आपण ' हाय् टेक् इमेजिंग् टेक्नॉलॉजी ' म्हणतो, त्यात प्रगति करायची होती, आणि त्यासाठी अमेरिकेला जायचं त्याच्या डोंक्यात शिरलेलं होतं. पण बारावी च्या गुणपत्रिकेवर तर इथं भारतातल्या कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत पण प्रवेश मिळणं कठीणच होतं.... ...आणि म्हणून पुढं काय करावं, हा सल्ला विचारायला तो माझ्याकडं आलेला होता. बरं, प्रतिमा तंत्रशास्त्राबाबतीत बोलायचं, तर त्याला त्या विषयासंबन्धी कसली प्राथमिक जुजबी माहितीही नव्हती, हे विशेष.... ... "
मराठे काका," म्हणजे त्या वयात त्याला ' गुलाबी स्वप्नं ' म्हणजेच इंग्रजीत ज्याला ' रोझी ड्रीम्स् ' म्हणतात, ती पडत होती तर..."
मी," अगदी बरोबर... ...आणि हे त्याच्याबरोबर झालेल्या संवादांतनं माझ्या ध्यानांत आलं..."
मराठे काका,"मग?... ...काय सल्ला दिलात त्याला तुम्ही?"
मी," दुसरा काय आणि कसला सल्ला देणार? मी त्याला एव्हढंच सांगितलं, की काय करतांना - म्हणजे कुठल्या विषयाचा अभ्यास करतांना - तुला तहान-भूक विसरायला होतं, ते आधी शोंधून काढ, आणि त्याच क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाच्या मागे लाग... ...मग ती कुठलीही शाखा असो. 
तुला नेमकं काय अभ्यासायला-करायला जिवापाड आवडतं, हे दुसरं कुणीही तुला सांगूं शकणार नाही... ...ते तुझं तुलाच शोंधून काढायला हवं... ..."
मराठे काका," अगदी योग्य सल्ला दिलात रविशंकरजी... ...मग काय केलं त्यानं पुढं?"
मी," इथंच सगळी गोची आहे मराठे काका... ...जयवन्त त्यानं स्वतः निवडलेली विद्युत् अभियांत्रिकी शिकत असतांना ह्या यशवंत नं बारावीच्या पुढचं एक वर्ष अभियांत्रिकी ला फाटा देऊन 'जी. आर्. ई.' च्या परीक्षेचा ध्यास घेतला... ... अगदी रात्रंदिवस तो 'जी. आर्. ई.' च्या खटपटीत व्यग्र असायचा... ..."
मराठे काका,"छान छान... ...म्हणजे कांहीतरी आवडीचं सापडलं तर त्याला... ...मग समस्या शिल्लक कुठं राहते?"
मी," ऐका तर...झालं असं, की पहिल्या प्रयत्नांत हा यशवन्त 'जी. आर्. ई.' तनं कांही पार पडूं शकला नाही... ...म्हणून त्यानं पुढं सहासात महिने दुसरं कांहीच न करतां परत 'जी. आर्. ई.' साठी परत जोर लावला... ...तिथं पण तो तंरून गेला...पण नामवन्त अमेरिकन विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांत मात्र जेमतेम अगदी कांठावरच उत्तीर्ण झाला. परिणामी त्याला अमेरिकेतल्या महागड्या पदवी शिक्षणासाठी ना कुठली शिष्यवृत्ती मिळाली, ना इतर व्यवस्था पत्करणारा कुणी जोखीमदार प्रवर्तक ऊर्फ स्पॉन्सरर् मिळाला..."
मराठे काका," मग काय झालं? सोडून दिला नाद त्यानं अमेरिकेला जायचा?"
मी," छे छे छे... ...उलट त्याचा अमेरिका गमनाचा हट्ट ज्यास्तच बळावला... ...इतका, की अखेर घरच्यांना एकूणएक खर्चवेंच पत्करून, थोडीफार मालमत्ता विकून, आणि वर आणखी कर्ज काढून, चाळीस पन्नास लाख रुपये ओंतावे लागले, तेव्हां कुठं हा यशवन्त अमेरिकेला रवाना झाला. बिचार्‍यांनी हे सगळं एकाच आशेवर केलेलं असावं...म्हणजे अमेरिकेला जाऊन तरी हा नेटानं उच्च शिक्षण प्राप्त करील, मग बक्कळ कमाई करून सगळं कर्ज-व्याजही फेंडील, आणि यथाशक्ति इकडं कुटुंबाला आर्थिक हातभारही लावील, अशी आशा त्यांनी बाळगलेली असणार."
मराठे काका," मग पुढं प्रगत प्रतिमा तंत्रशास्त्रांत कांही केलं काय त्यानं?"
मी," अहो, तेंच तर सगळं कोडं आहे... ..."
मराठे काका," म्हणजे?"
मी," अहो कसली प्रतिमा अन्‌ कसलं त्यांचं उच्च तंत्रज्ञान... ...सगळा बट्ट्याबोळ झालाय् त्याचा... ...गेल्या वर्षीच इथं भारतात आलेला असतांना भेंटून गेला मला, तेव्हां सगळी रामकहाणी सांगत होता... ...
   अमेरिकेतल्या कुठल्यातरी तृतीय चतुर्थ दर्जाच्या विद्यापीठात त्याला कसाबसा ' दळण वळण अभियांत्रिकी ' ला प्रवेश मिळाला. तिथं त्यानं कसेबसे पांचसात महिने काढले, पण ते कांही जमेना त्याला, मग 
   पडेल ती कामं - अगदी वाढप्याची सुद्धां - करीत कसाबसा तो पनामा ला गेला ... ...तिथं अश्याच कुठल्यातरी गल्लीबोळातल्या विद्यापीठात वार्‍या करीत कशीबशी त्यानं द्रव अभियांत्रिकीची पदविका       मिळविली... ...पण पुढं पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचं कांही नांव घेतलं नाही त्यानं... ..."
मराठे काका,"अरे बापरे... ...मग सद्ध्या कुठं असतो तो? आणि काय करतो?"
मी," सद्ध्या तो ऍरिझोनातल्या कुठल्यातरी आय्. टी. कंपनीमध्ये डाटा मॅमेजर म्हणून काम करतो... ...मला म्हणत होता की ' नाइदर मनी इज् देअर, नॉर् डू आय् फ़ील् हॅपी नाऊ.' 
    सांगा... ...आतां काय करायचं पालकांनी त्याच्या?"
मराठे काका नी आतां कपाळाला हात लावला," समस्या आहे खरी ज्वलन्त... ...अमेरिका वेडानं झपाटलेल्या बर्‍याच तरूण मुलांचं असंच कांहीतरी कडबोळं झालेलं मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे खरं... ...
   बरं त्या जयवन्ता चं काय झालं पुढं?... ...अभियान्त्रिकी झाली त्याची?"
मी," होय तर... ...अगदी उच्च श्रेणीत नाही तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला तो. यशवन्त आधीच अमेरिकेत असल्यामुळं त्यानंही थोडाफार मदतीचा हात दिला असेल त्याला, पण स्वार्हतेच्या जोरावर सान    फ्रान्सिस्को विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्यानं शिष्यवृत्ती, अन् प्रायोजनही मिळवलं, आणि चारएक वर्षांपूर्वी तो पण अमेरिकेला गेला... ..."
मराठे काका," काय केलं त्यानं पुढं अमेरिकेत जाऊन?"
मी," त्यानं मात्र उत्तम प्रकारे उच्च श्रेणीत ऊर्जा जनन अभियांत्रिकी - म्हणजे 'पॉवर् जनरेशन् इंजिनिअरिंग्' विषयात पदवी प्राप्त केली, त्यानंतर स्वार्हतेवर 'पर्यायी ऊर्जा स्रोतांचं तंत्रज्ञान' म्हणजे ' अल्टर्नेटिव्ह्     एनर्जी रीसोअर्सेस् टेक्नॉलॉजी' च्या क्षेत्रांत पदव्युत्तर पदवीही मिळविली, आणि तो सद्ध्या ' मात्सुशिता इलेक्ट्रिक् ' या जगप्रसिद्ध जपानी कंपनीत सौर ऊर्जा संशोधनाच्या प्रकल्पांत भरघोंस योगदानही     देतोय्‌... ..."
मराठे काका," वा वा वा... ...बहोत खूब... ...म्हणजे दोघांपैकी एकाला तरी यशप्राप्ति झाली म्हणायची... ...उत्तम... ...मग आतां यात तुम्हांला कूट प्रश्न काय पडलाय्?"
मी," तर मला आतां असं सांगा, की थोड्या वेळापूर्वीच मी म्हटल्याप्रमाणं हे दोघे चुलत भाऊ एकाच कुटुंबांत जन्मलेले आहेत... ...बरोबर?"
मराठे काका," बरोबर."
मी," दोघांच्या वयांत फारतर तीनेक वर्षांचाच फरक असेल नसेल... ...यशवन्त हा जयवन्तापेक्षा थोडासा वयानं ज्येष्ठ... ..."
मराठे काका," हूं... ...हूं...ठीक."
मी," दोघे लहानपणापासून एकाच घरांत, एकाच संस्कारांत वाढलेले... ...बरोबर?"
मराठे काका,"अगदी खरं... ...पुढं?"
मी," दोघांची बौद्धिक कुवत - किंवा इंग्रजीत आपण जिला 'आय् क्यू.' असं म्हणतो, ती पण जवळपास तुल्यबळ म्हणतां येईल... ...शाळेतल्या प्रगतीवरून... ...ठीक?"
मराठे काका,"अगदी योग्य."
मी," मग कूटप्रश्न असा आहे की बारावी नंतरच्या दोघांच्या शैक्षणिक-व्यावसायिक कर्तृत्त्वांत इतका अगदी उत्तर-दक्षिण ध्रुवां इतका ठंशठंशीत फरक कश्यामुळं पडला? 
मराठे काका आतां मात्र विचारात पडले... ...पुढची दोनचार मिनिटं ते अगदी विचारचक्रात गढून स्तब्ध बसलेले होते... ...
मी पण धीर धंरून गप्प बसून राहिलो... ...म्हटलं, कश्याला उगीच त्यांच्या चिंतनात व्यत्यय आणा फुकाच?
मग अचानक त्यांनी मला विचारलं," मला असं सांगा रविशंकरजी, हा यशस्वी झालेला उच्चशिक्षित भाऊ म्हणजे धांकटा जयवन्त च ना?"
मी," होय...तो च."
मराठे काका," अमेरिकेला गेल्यानंतर तो कधी तरी भारतात येऊन गेला असेलच... ...हो ना?"
मी उत्तरलो," येऊन गेला तर... ...गेल्या वर्षीच आला होता, आणि मला पुण्यात घरीं भेंटून पण गेला... ..."
मराठे काका," मग गप्पा-गोष्टी अगदी दिलखुलास झाल्याच असतील तुमच्या... ..."
मी," झाल्या की... ... एक रात्रभर तो माझ्या घरीच मुक्कामाला होता... ..."
मराठे काका," मग?... ...काय काय सांगितलं त्यानं तुम्हांला... ...अमेरिकेतल्या वास्तव्य-अनुभवांबद्दल?"
मी," विशेष असं कांही नाही... ...खुषीत होता अगदी... ...म्हणाला..."
मराठे काका," काय म्हणाला तो तुम्हांला?... ...शक्यतों त्याच्याच शब्दांत सांगा... ...अगदी अवाक्षराचाही फरक न करतां... ...जमेल?"
मी," बघतो प्रयत्न करून... ...हूं ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ काय बरं म्हणाला तोऽऽऽऽऽऽऽ?... ... ...हांऽऽऽऽऽस्सं
    तो म्हणाला की ' इथं भारतात प्रथम वर्ष विद्युत अभियांत्रिकी शिकायला सुरुवात केली, ती गुणवत्तेनुसार मिळालेला अभ्यासक्रम करायचा म्हणून... ...दुसरा कांही पर्यायच नव्हता माझ्यासमोर.
    मग हळूं हळूं विद्युत् अभियांत्रिकी जशी समजायला लागली, तसा तीतला रस वाढायला लागला... ...दुसर्‍या वर्षीं तर ते सगळं मनापासून आवडायला लागलं.
    तितक्यात मग अचानक यशवन्त चा दूरध्वनी आला एक दिवस, की 'सध्याच्या पात्रतेवर एखाद्या अमेरिकेतल्या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा कां देत नाहीस?' म्हणून.
    मग म्हटलं बघूं या तरी प्रयत्न करून... ...तसं बघितलं तर मुळात कुठलाही अभ्यासक्रम इथं भारतात केला काय, अमेरिकेत केला काय, किंवा अगदी उत्तर ध्रुवावर जाऊन केला काय, मूलभूत ज्ञान तर तेंच     असतं ना? अमेरिकेसारख्या देशात डोंक्यात असलेल्या ज्ञानाला कदाचित व्यावसायिक क्षेत्रात विस्तृत प्रमाणावर वाव असूं शकेल इतकाच काय तो फरक...कदाचित् पुढं संशोधन क्षेत्रातही तिथं इथल्यापेक्षा       अधिक चांगल्या संधी असूं शकतील असं वाटलं, अन्‌ दिली परीक्षा. आणि गंमत म्हणजे काका, पहिल्याच फटक्यात चक्क उत्तम श्रेणीत उत्तीर्णही झालो, अन्‌‍ मान्यवर अश्या सान फ्रान्सिस्को विद्यापीठाची       शिष्यवृत्ती पण मिळाली. प्रायोजक मिळवायला यशवन्तची मदत झाली, नी तो ही प्रश्न मिटला. पुढं पुष्कळ शिकायची इच्छा तर होतीच आधीपासून. मग इतकं सगळं जुळून आल्यावर गेलो शेंवटी         अमेरिकेला... ...
    तिथं गेल्यावर असं लक्ष्यांत आलं की विषय तें च असले, तरी ते शिकवायच्या तिथल्या पद्धती खूपच प्रगत आणि विकसित आहेत. आणि तिथले अध्यापकही त्या त्या विषयातले किडे म्हणावेत इतके
    पट्टीचे निष्णात तज्ञ असतात. मुळात विद्युत् अभियांत्रिकी ही कल्पकतेची कसोटी बघणारी शाखा, तिला प्रगत शिकवण्याची फोडणी बसल्यावर मग आणखी काय हवं होतं? मलाही कळलं नाही कधी
    पदव्युत्तर पदवी धारक झालो ते. आतां सध्या ' मात्सुशित इलेक्ट्रिक् ' नांवाच्या कंपनीत संशोधक म्हणून नोकरी करतोय्, आणि लवकरच सौर ऊर्जा अभियांत्रिकी त पी. एच्. डी. करायची खटपटही चालूं
    आहे... ...
    खूप खूप समाधान मिळतंय्‌ काका... ...अमेरिकेला जायचं धाडस केल्याचं चीज झाल्याबद्दल... ...' 
    इतकं उद्धृत करून मी मराठे काकांना म्हणालो " अगदी खडा न् खडा हें च शब्द नसतील कदाचित... ...पण त्याच्या एकंदर बोलण्याचा मथितार्थ असाच होता... ..."
मराठे काकांचा चेहरा एका क्षणांत उजळला," दॅऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽटस् इट् रविशंकरजी... ...मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर?"
मी उडालोच," कसलं उत्तर म्हणताय् तुम्ही?... ...चेष्टा करताय् काय माझी... ...ऑं?"
मराठे काका आतां हंसायला लागले," अहो आत्तां तुम्ही जयवन्त च्या बोलण्याचं जे थोंडक्यात विवेचन केलंत ना, त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे... ...!!! फक्त ते तुम्हांला जाणवलेलं नाहीय्     इतकंच..."
आतां मात्र हतबुद्ध होत मी च कपाळाला हात लावला," ते कसं काय?... ...आतां तुमचं आख्यान सुरूं करा बघूं... ...त्याशिवाय हा गुंता कांही सुटेल असं वाटत नाही..."
मराठे काकांनी मग डोळे मिचकांवत मला विचारल," मग काय रविशंकरजी... ...वन् फॉर् द रोड...आपल्या आसामी चहाचा... ...काय म्हणताय्?"
मी त्यांनी पुढं केलेल्या हातावर मनमुराद हंसत फाड्दिशी टाळी दिली," चला होऊन जाऊं द्या... ...पुण्डलीक वरदा हाऽऽऽऽऽऽऽरि विठ्ठल...!!!"
मराठे काकांनी किटलीतल्या चहानं आमचे कप परत गच्च भंरले आणि माझ्यापुढं बाकरवडी ची ( चितळ्यांच्या ) बशी संरकवीत प्रवचनाला प्रारंभ केला," त्याचं काय आहे रविशंकरजी... ..."
मी पहिली वडी तोंडात टाकीत संरसावून बसलो," हं बोला...ऐकतोय् मी."
मराठे काका," जरा विस्तारानं सांगतो म्हणजे नीट लक्ष्यात येईल तुम्च्या... ...तर मामला असा आहे की, कुठल्याही मनुष्याला आपलं आयुष्य यशस्वी रीत्या सुखासमाधानानं जगायचं असेल, तर त्याला मुळात कांही गोष्टी नीटपणे समजलेल्या असाव्या लागतात, असं तत्त्वज्ञान सांगतं... ...बरोबर?
मी," अगदी खरं"
मराठे काका," पहिली गोष्ट म्हणजे त्याला त्याच्या व्यावसायिक कार्यक्षेत्रातलं ज्ञान नीटपणे समजलेलं असावं लागतं... नाहीतर त्याचा 'आय्. टी. यन्' होतो...बरोबर?"
मी हंसायला लागलो,"शंभर टक्के बरोबर."
मराठे काका," दुसरी गोष्ट म्हणजे व्यावहारिक शहाणपण... ...जेणेकरून मिळवलेल्या कमाई चा- मग ती आर्थिक असो वा इतर कुठल्या प्रकारची... ...सुयोग्य विनियोग कसा, कधी, अन् कुठं किती करायचा,          आणि महत्त्वाचं म्हणजे कुठं कसा नी किती करायचा नाही, हे ही नीटपणे समजलेलं असावं लागतं... ...त्याशिवाय तो अंगावर पडणार्‍या जबाबदार्‍या निभावून धडपणे चरितार्थ चालवूं शकणार          नाही... ...खरं की नाही?"
मी," बरोबर... ...ते ज्यांना धडपणे समजलेलं नसतं, त्यांचाही शेंवटी ' आय्. टी. यन् ' च होतो... ...!!"
आतां मात्र मराठे काकां नी च आपल्या कपाळाला हात लावला," हे ही खरंच आहे... ...दररोजच पाहतो आहोत की आपण... ...अहो वीतभर कमाई, अन्‌ हातभर खर्च असला चंगळबाज खाक्या असेल तर       डोंक्यावर मणभर कर्ज व्हायला असा कितीसा वेंळ लागणार? अहो ह्या आय्. टी. वाल्यांमध्ये पुढच्या चार चार-पांच पांच वर्षांचे आख्खे पगार कर्जांच्या हप्त्यांत बुडवून बसलेले बक्कळ महाभाग बघितलेत       मी... ...
     जाऊं द्या तो विषय... ...तर उत्तम जगायला माणसाला अवगत असावी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्यशास्त्र आणि कला क्रीडां चं ज्ञान... ...त्याशिवाय जगणं कसं काय  फुलणार-फळणार?"
मी," अगदी बरोबर... ...बरं पुढ?...या सगळ्याचा माझ्या कूटप्रश्नाशी कसा काय संबंध पोंचतो?"
मराठे काका," ऐका तर पुढं... ...उत्तम जगण्यासाठी प्राप्त असावी लागणारी चंवथी आवश्यक गोष्ट म्हणजे त्याच्या चरितार्थाशी निगडित असलेलं गणिताचं आवश्यक ज्ञान - मग त्यात तोण्डी आंकडेमोडीपासून ते      प्रगत कॅलक्युलस् पर्यन्त सगळे भाग आले... ...कारण गणित हे सर्वव्यापी आद्यशास्त्र... ...खरं ना?"
मी," अगदी बरोबर... ...अगदी रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्यापासून ते उच्चशिक्षित संशोधकांपर्यन्त प्रत्येकाला गणित हे लागतंच... ...बरं पुढं... ..."
मराठे काका,"तर गंमत अशी आहे, की या चार पांच मूलभूत गोष्टी अवगत असल्या की कुठल्याही माणसाला त्याचं आयुष्य सन्मानानं - समाधानानं जगतां येतं... ...म्हणजे माणसाला तितकी कुवत प्राप्त होते      असं तत्त्वज्ञान म्हणतं... ...होय की नाही?"
मी," बरोबर... ...पण कूटप्रश्नाचं उत्तर?"
मराठे काका,"सांगतो...तर गंमत अशी आहे की आत्तां सांगितलेल्या गोष्टी माणसाला जितक्या कमी-अधिक प्रमाणात अवगत असतील, तितक्या प्रमाणात तो यशस्वी आणि सधन होत जातो, आणि या गोष्टी जर      प्रकर्षानं अवगत असतील तर तो प्रसिद्धही होईल आणि श्रीमन्त ही होईल...पण समृद्धही होईल असं मात्र म्हणतां येणार नाही... ...त्यासाठी त्याला त्याच्या परीनं तत्त्वज्ञान समजलेलं असणं आवश्यक      असतं असं मला वाटतं.... ...सहमत आहांत?"
मी," अगदी शंभर टक्के... ...कारण तत्त्वज्ञानाची जाण असल्याशिवाय एकतर आयुष्यात घडणार्‍या घटनांची कार्य कारण मीमांसा करतां येत नाही, आणि येणार्‍या अनुभवांचे अन्वयार्थही नीटपणे समजूं शकत     नाहीत... ...मग प्रत्येक बाबतीतला नीर-क्षीर विवेक कसा काय करतां येईल? तेव्हां श्रीमन्त होणं जर कठीण मानलं, तर समृद्ध होणं हे महाकर्मकठीण मानावं लागेल... ...होय की नाही?"
मराठे काका," कसं बोललात...तेव्हां इतका कुटाणा झाल्यावर आतां तुमच्या कूटप्रश्नाचं निरूपण करूं या... ...ठीक?"
मी कान टंवकरले," हं... ...हं...बोला की..."
मराठे काका,"तेव्हां रविशंकरजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका तत्त्वज्ञानी माणसानं तेराशे वर्षांपूर्वीच दिलेलं आहे...!!! ते सुभाषित असं आहे... ...


         ॥ साधनेनाप्नुतं साध्यं साध्येन न साधनम्‌
           साध्यसाधनव्यत्यासाद्दु:खमाप्नोति मानवः ॥

तात्त्पर्य यशवन्त-जयवन्त या दोन भावांना या सुभाषिताचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे जाणवला होता... ...!!"
मला ती ग्यानबाची मेख कांही आकळेना,"म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हांला?"
मराठे काका,"मला असं म्हणायचं आहे की, ' साधनेनाप्नुतं साध्यं ' - म्हणजेच साधनाचा वापर करून ईप्सित साध्य करायचं असतं, हे जयवन्ता ला जाणवलेलं होतं... ...म्हणून तो शिकण्यासाठी अमेरिकेला गेला, आणि भवितव्याचं त्यानं सोनं केलं... ..."
मी," मग यशवन्ता चं काय?... ...त्यानं पण 'जी. आर्. ई.' तनं पार पडतांना रक्त आटवलेलं होतंच की... ...नाही?"
मराठे काका," इथंच तुमची गफलत झाली... ...यशवन्ता च्या बाबतीत झालं असं की त्याला साध्य-साधन यातला फरक धडपणे जाणवलेला नव्हताच, आणि ' साध्येन न साधनम् ' - म्हणजेच ईप्सित हे               साधन मिळवण्यासाठी वापरायचं नसतं... ...हे शहाणपण ही कळलेलं नव्हतं... ..."
मी गडबडलो,"फोड करून सांगा... ...नीटसं नाही कळलं... ..."
मराठे काका," तात्त्पर्य, जयवन्त हा शिकण्यासाठी अमेरिकेला गेला, तर यशवन्त हा अमेरिलेला जाण्यासाठी शिकत होता... ...!! आतां आलं लक्ष्यांत सगळं?"
मराठे काकांचं अचूक निरूपण ऐकून थक्क होत आतां मी चा कपाळाला हात लावला... ...!!
मराठे काका," त्यामुळंच यशवन्त च्या बाबतीत 'अमेरिका गमन' हे त्याचं साध्य म्हणजे ईप्सित असल्यामुळं, त्यासाठी शिकणं हे त्याचं साधन होऊन बसलं...  ...
           परिणामी, अमेरिकेला जाण्याचं स्वप्न साध्य झाल्यावर त्याची साधनाची गरज संपलेली होती... ... ...!!!
           पुढं त्याचं पर्यवसान कश्यात झालं, ते तुम्हीच सांगितलंत मला थोड्याच वेळापूर्वी... ...हो की नाही?
           अमेरिका वेडानं पछाडलेल्या इथल्या पोरांचं पुढं जे कांही होतं, तें च त्याचंही झालं... ...फक्त ते तो अमेरिकेला गेल्यानंतर झालं...इतकाच काय तो फरक.
           त्याच्या डोंक्यात साध्य-साधनाचा व्यत्यास झालेला असल्यानं त्याचं जे कांही झालं, त्यापेक्षा वेगळं कांही होणं शक्य तरी होतं काय सांगा मला रविशंकरजी?"
निरूपण उरकून आतां मराठे काकां नी रम् चा प्याला उचलल्याच्या थाटात पुढ्यातला चहाचा कप उचलीत मला शुभेच्छा दिल्या," नाऊ अवर् वन् फॉर् द रोड... ...चीअर्स् रविशंकरजी... ..."
आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या व्यासंगानं थक्क होत मी पण पुढ्यातला आसामी चहाचा कप उचलून त्यांच्या कपावर आदळीत दाद दिली," चीअर्स् काका... ...ऍण्ड् थॅंक् यू.... ..."

---------------------------------------------------------------------------------------------------
-- रविशंकर.
ऑगस्ट १२ २०१८.

Saturday, 17 March 2018

॥ एंटर् द ड्रॅगन् - एक्झिट्‌ द ड्रॅगन् ॥

॥ एंटर् द ड्रॅगन् - एक्झिट्‌ द ड्रॅगन् ॥


प्रस्तवाना...
प्रिय वाचकहो,
सांप्रत आपल्या महान देशात आपल्या मायबाप सरकार नं व्हॅट् कर, विक्री कर, सेवा कर, जकात कर, यंव्‌ कर, त्यंव्‌ कर, इ. इ. जनतेच्या मानगुटीवर बसवलेल्या त्याच्या नानाविध करांच्या कडबोळ्याचं श्राद्ध घालून, त्याऐवजी ' जी. एस्‌. टी. ' नामक नवीन आश्चर्यकारक अपत्य जनतेच्या मानगुटीवर मारलेलं आहे. जुनी अपत्यं गायब झाल्यामुळं डोकं जरा तरी ठिकाणावर येईल, अश्या गोड गोड भ्रमात गाजरं खाणार्‍या जनतेचं टाळकं ठिकाणावर येण्याऐवजी, ते पार पिकवून कायमचं फिरवून दाखवायची अजब करामत या नव्या गुटगुटीत बाळानं करून दाखवलेली आहे...!!
माझे पुण्यातले फार जुने अक्षरशः लंगोटीयार श्री. उकिडवे, यांनी त्यांच्या अफलातून विनोदबुद्धीनं, साक्षात् ब्रह्मदेवाच्या बापालाही सात जन्मात सुटणार नाही, असलं हे भन्नाट कडबोळं, मला गेल्या आठवड्यात फक्त तासाभरांत सफाचट् उलगडून दाखवलं...!!
ह्या उकिडव्यांच्या दोन गंमती आहेत बरं का...
त्याचं काय आहे, की ते आहेत साठी चे, पण चेहरा आहे पांच वर्षांच्या निरागस बाळाच्या धाटणी-भावा चा... ...
दुसरी गोची म्हणजे श्री. उकिडव्यांची जन्मजात खोड...म्हणजे किस्से ऐकवतांना जवळपास प्रत्येक वाक्याच्या शेंवटी ते श्रोत्याला ,'बरोबर?' अस प्रश्न विचारतात.
त्यामुळं होतं काय, की त्यांचं कथाकथन म्हणजे अंगठा चोंखणार्‍या बाळानं श्रोत्याला सर्वोच्च न्यायालयातल्या कटघर्‍यात उभा करून त्याची केलेली उलटतपासणी होऊन बसते...
त्यामुळं होतं काय, की त्यांनी दिवाळीतला साधा फटाका जरी फोंडला, तरी श्रोत्याच्या कानीं आदळतो हायड्रोजन बॉंब चा धंडाका... ...आणि त्यामुळं ऐकणार्‍याचं 'खी: खी: खी:' होण्याऐवजी 'व्हॉ: व्हॉ: व्हॉ: व्हॉ:' व्हायला लागतं...मग खुर्च्या उलट्या-पालट्या व्हायला असा कितीसा वेळ लागणार?
तात्पर्य, हंश्याचं श्रेय किश्श्या ला जातं १० टक्के, आणि सादरीकरणाला जातं ९० टक्के.  
[या उकिडव्यां चा परिचय ज्या वाचकांना करून घ्यायचा असेल, त्यांनी या च ब्लॉग् वरची ' थ्री जी ' शीर्षकाची कथा आधी वाचून त्यानंतर या कथेचा आस्वाद घ्यावा.]
' जी. एस्‌. टी. ' चं कडबोळं सोडवायची त्यांची अचाट् रीती होती, जगभर गाजलेला 'ब्रूस ली' चा अजरामर दे धमाल चित्रपट 'एंटर् द ड्रॅगन्'...!!!
तसला चमत्कार बघून आम्ही दोघे आपापली कपाळं थडाथडां बडवून घेत ठार वेडयागत खदांखदां हंसत सुटल्यामुळे, आम्ही मग-मगभर गिळलेल्या चहाचे फंवारे दशदिशांत उडून, श्री. उकिडव्यांच्या दुकानातल्या त्यांच्या स्पॉट्‌लेस्‌ केबिन चा अक्षरशः राडा झाला.!!!!
चला तर...श्री. उकिडव्यांच्या 'एंटर् द ड्रॅगन्' चा प्रीमियर शो बघूं या त्यांच्याच दुकानात, तोंडात चार बोटं घालून दे झमाझम्‌ शिट्ट्या मारत... ...
थोडी हकीकत... ...थोडा फॅंसाना...
आपपल्या खुर्च्या तेंव्हढ्या सांभाळा म्हणजे देव पावला...!!!... ...काय?
------------------------------------------------------------------------------------------------------ 
स्थळ: आमच्या डहाणूकर कॉलनीतलं श्री. उकिडव्यांचं 'ओरिएंटल कॉम्प्युटर्स् ' दुकान...
वेळ : दुपारी चार ची.
क्लॅप् ....

टक्...टक्...
------
टक्...टक्...टक्...टक्...
उकिडवे: ," अरे नाना...तुम्ही?...या या या... ...बसा बसा बसा बसा... ...अगदी मुहुर्तावर आलाय्‌त."
मी," धन्यवाद उकिडवे... ...काय म्हणताय् ?...सगळं निवान्त?"
उकिडवे: ," अहो कसलं निवान्त अन्‌ कसलं काय आलंय्‌ नाना... ..."
मी," का हो?... ...काय झालं?"
उकिडवे: ," अहो, हे नवीन 'जी. एस्. टी.' नामे कराचं गुटगुटीत बाळ घातलंय्‌ ना जन्माला आपल्या सरकारनं... ...जुन्या करांच्या कडबोळ्याचं श्राद्ध घालून?"
मी," त्याचं काय?"
उकिडवे: ," अहो...त्याचं महालचाण्ड होऊन बसलंय्... ...ब्रूस ली चा 'एण्टर द ड्रॅगन्' सुद्धां झक् मारील, असला ' एंटर् द ड्रॅगन् - एक्झिट्‌ द ड्रॅगन् ' झालाय् त्या बाळाचा... ...ठाऊक आहे तुम्हांला?"
मी," फिरकी ताणताय्‌ काय उकिडवे, बकरा गावलाय्‌ म्हणून?"
उकिडवे: ,"नाना...अहो खरंच अफलातून लचाण्ड झालंय्‌ हे... ...निवान्त आला असलात तर दाखवतो सगळा लाइव्ह् प्रीमिअर तुम्हांला..."
मी," मी आहे हो अगदी निवान्त... ...तुमचं काय?... ...नाही... ...म्हणजे पुढ्यात कांहीतरी हिशेब-ठिशेबांचा गदाडा चाललेला दिसतोय् तुमचा, म्हणून म्हटलं..."
उकिडवे: ,"अहो तें च महालचाण्ड चिवडत बसलो होतो... ...मरूं द्या ते...ब्रह्मदेवाच्या बापाचं पण डोकं ठार येडं करून ठेवील असला भन्नाट मसाला आहे हा... ..."
मी," आरं तिच्यायला... ...काय सांगताय् काय उकिडवे?"
उकिडवे: ," सांगतो...बसा... ...अरे ए सद्या... ...आठदहा चहा घेऊन ये झंटक्यात... ...जा पळ."
मी," आठदहा चहा कुणासाठी उकिडवे?"
उकिडवे: ," आपल्यासाठीच हो...तिच्यायला, दहा-दहा रुपये हादडून दोन चमचे चहा विकायला लागलेत भोसडीचे... ...बघताय्‌ ना?"
मी,"खरंय्‌ तुमचं... ...सगळ्यांनीच कमरेचं सोडून डोक्याला गुण्डाळलंय् हल्ली... ...पण मोजणारेही आचरट आहेत ना, खटाखटा?...काय करायचं?... ...हं बोला."
उकिडवे: ,"तुम्हांला माहीत आहेच नाना, माझ्या नवीन सदनिकेचं बांधकाम चाललंय म्हणून...बरोबर?"
मी," बरोबर."
उकिडवे: ,"आतां असं बघा, की आतांपर्यन्त हे नानाविध करांचं जे जुनं कडबोळं होतं ना, त्याची टक्केवारी खरेदीखतात नमूद करून लिहिलेली होती, आणि मी तितके पैसे  विकसकाला - म्हणजे बिल्डर ला - करार करतांनाच मोजलेले होते... ...बरोबर?"
मी," बरोबर."
उकिडवे: ," ह्या पहिल्या टक्केवारी ला आपण 'क्ष' म्हणूं या."
मी,"ठीकाय्‌...पुढं"
उकिडवे: ," आतां ह्या 'जी. एस्. टी.' नामे नवीन बाळाच्या नियमानुसार वेगवेगळ्या वस्तू-सेवा वर लागणार्‍या करांची टक्केवारी वेगवेगळी आहे...आणि तिचा आवाका हा  शून्य ते अठ्ठावीस टक्के इतका विस्तृत आहे... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर. "
उकिडवे: ," आतां एखाद्या व्यवहारात - समजा माझ्या या सदनिके च्या च व्यवहारात - वेगवेगळ्या वस्तूं आणि वेगवेगळ्या सेवा ज्या कांही लागल्या, आणि इथून पुढे लागणार असतील, त्यांचं गणित माण्डून त्याची सदनिकेच्या एकूण किंमतीशी जी कांही टक्केवारी निघेल, तिला आपण 'य' म्हणूं या... ...काय?"
मी," ठीक... ...पुढं?"
उकिडवे: ," आतां या 'क्ष' आणि 'य' यांतील नक्त फरक जो निघेल, त्याला आपण 'झ' म्हणूं या...म्हणजे माझ्या सदनिकेवर 'झ' टक्के इतका कर मला सरकारला भरावा  लागेल...जितका कांही असेल तितका... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर... ...मग आत्तां मघाशी ती च झटापट चालली होती की काय तुमची...ऑं?"
उकिडवे: ,"बरोबर ओंळखलंत नाना... ...तें च कडबोळं उलगडत बसलो होतो मघांशी... ...भल्याभल्यांची टाळकी फिरवणारं हे लचाण्ड आहे तरी काय ते बघावं म्हणून"
मी," भल्याभल्यांची...म्हणजे हो?"
उकिडवे: ,"अहो हा च सगळा 'एण्टर द ड्रॅगन' चा प्रीमियर होऊन बसलाय्‌... ...मोजून सव्वीस विक्री कर सल्लागारांचे उंबरठे झिजवून झालेत... ...कुणालाच सांगतां येई ना झालंय्‌ की ही 'झ' टक्केवारी नक्की किती निघेल ते... ...असला महाभन्नाट राडा झालाय्‌ सगळा... ...माहीताय्‌? कोण म्हणतंय्‌ दोन टक्के, कुणी सांगतंय्‌ अठ्ठावीस टक्के, कुणी सांगायला लागले सोळा टक्के भरावे लागतील, कुणी कुणी बोलेचनात...असलं महालचाण्ड झालंय सगळं. माझा एक स्नेही विक्री कर उप आयुक्त पदावरून निवृत्त झाला गेल्याच वर्षी. वाटलं तो तरी सांगूं शकेल म्हणून... ...त्याला पण भेंटून आलोय् सकाळीच."
मी," मग?... ...काय म्हणाला तो?"
उकिडवे: ,"आयला, त्यानं असली काय फर्मास सिक्सर ठोंकलीय्‌ म्हणताय् नाना? चेण्डू माझ्या च टाळक्यावरनं थेट मैदानाच्या बाहेर...!!! ...फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं बघा मला..."
मी,"काय सांगितलं त्यानं तुम्हांला?"
उकिडवे कपाळाला हात लावत म्हणाले: ,"तो म्हणाला, की विकसकालाच तुम्हांला अकरा टक्के द्यावे लागतील...!!!... ...बोला."
आतां मात्र मी ही स्वतःच्या कपाळाला हात लावला,"ही: ही: ही: ही: ... खी: खी: खी: खी: .... ....च्यायला महा आचरटच लचाण्ड झालंय्‌ म्हणा की हे सगळं...खी: खी: खी: खी: .... ...."
उकिडवे,"अहो मग सांगतोय्‌ काय तुम्हांला मघांपास्नं मी?...ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ...तें च कडबोळं बघत बसलो होतो आत्तां तुम्ही आलांत तेव्हां."
मी,"हूं: हूं: हूं: हूं: हूं: हूं: ... ... मग काय झालं पुढं?"
उकिडवे,"झालं असं की हा माझा मित्र जो सांगितला ना आत्तां तुम्हांला...तो राजधानीत स्थायिक आहे...म्हणजे तिथंच मी त्याला भेंटून सारं रामायण-महाभारत सांगितलं की या 'झ' बद्दल बाकीचे जाणकार काय काय अठरापगड मतं सांगताय्‌त ते... ...आलं लक्ष्यांत?"
मी," हो...आलं. मग काय म्हणाला तो तुम्हांला?"
उकिडवे,"तो म्हणाला, की असं होऊं शकतं...किंबहुना होतं पण बर्‍याचवेळा. कारण कायदा करतांना तो लिहिणार्‍याला कधीच परिपूर्ण लिहितां येत नसतो. त्यामुळं त्या मसुद्यात नेहमी त्रुटी-पळवाटा राहतात.दुसरं असं की माझ्यासारखे तो कायदा राबवणारे सरकारी अधिकारीही कांही सर्वज्ञानी नसतात...माणसंच असतात ती. तिसरं कारण असं,की सरकार बाहेरचे करसल्लागार पण कसलेले विद्वान असतातच की...अगदी आमच्यापेक्षांही कसलेले असूं शकतात. त्यामुळं मी जे कांही तुला आत्तां सांगितलं ना, ते  म्हणजे माझं व्यक्तिगत मत...आणि व्यक्तिगत मतं ही असल्या क्लिष्ट कायद्यांच्या बाबतीत भिन्नभिन्न असणं अगदी साहजिक आहे...त्यामुळं कुणा एखाद्याचं मत हे कांही ब्रम्हवाक्य ठरूंच शकत नाही...अगदी माझं सुद्धां... ...कळलं सगळं आतां?
मी म्हटलं की हो...कळलं मला...पण करायचं काय आतां? मार्च अखेरीपूर्वी कर जर देय असेल, तर तो भरावा लागेल ना मला?...त्याचं काय?"
उकिडवे,"आतां कळीची गम्मत ऐका नाना... ...
म्हणजे 'झ' ची टक्केवारी राहिली बाजूलाच, मुळात हा कर मी विकसकाला देणं लागतोय्, की तो मला देणं लागतोय्, हे सुद्धां कुणाला धडपणे सांगतां येईना झालंय..."
मी कपाळाला परत हात लावला,"खी: खी: खी: ......उकिडवे ...खरोखरंच अस्सल महालचाण्ड झालंय् हे... ...मग काय म्हणाला तुमचा मित्र?"
उकिडवे,"अहो ते आपले सेन साहेब आहेत ना... ...ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ हो... ..."
मी,"हो आलं लक्ष्यांत..."
उकिडवे,"ते पण त्या वेळी राजधानीत च होते...कुठल्यातरी विद्वद्सभेत व्याख्यान द्यायला आले होते...तर माझा मित्र म्हणाला, की आपण त्यांनाच जाऊन भेंटूं या... ...तें च कांहीतरी ठामपणे सांगूं शकतील, अशी आशा आहे... ...इथं सरकारदरबारी आहे वजन माझं...बघूं या भेंट देताय्‌त काय ते... ...कांही सांगतां येत नाही, कारण फार  मोठे विद्वान आहेत, पण अगदी साधेसुधे आहेत असं ऐकून आहे...चल बघूं या तरी काय होतंय्‌ ते..."
मी,"मग पुढं काय झालं?"
उकिडवे,"नाना...अहो विश्वास बसणार नाही तुमचा कानांवर... ...म्हणाले 'आहे मोकळा तासभर...या लगेच'... ...अहो इतके साधेसुधे असतील असं कुणाला स्वप्नांत देखील खरं  वाटणार नाही...अक्षरशः असामान्य असतात ही माणसं...स्वच्छ पांढरा सुती झब्बा,बंगाली धोंतर,नाकावर काळाभोर बारीक काचांचा वाचायचा चष्मा, आणि  चेहर्‍यावर धों धों ओंसण्डून वाहणार्‍या अफाट विद्वत्तेचं झळाळणारं तेज...अक्षरशः शारदे चं दर्शन झालं बघा..."
मी,"   खरंय्‌ तुमचं उकिडवे... ...अशीच माणसं असतात ही...बाकीचे पाव हळकुण्डानं दसपट पिवळेधमक होणारे ठार आचरट...बरं काय म्हणाले ते?"
उकिडवे,"अहो ते ही चक्रावले ते सगळं बघून... ...म्हणाले,' हे इतकं क्लिष्ट करून ठेंवलंय्‌ ना, की मलाही कांही ठामपणे निष्कर्ष काढतां येणं कठीण आहे... ...या मसुद्याचं चक्क जगप्रसिद्ध कडबोळं करून ठेंवलंय्‌ हे कुणीतरी...कुणालाच न सुटणारं. या मसुद्याची कलमंच इतकी विरोधाभासी करून ठेंवलेली आहेत की, त्यातनं कुणालाच...तुम्ही लोक म्हणतां ना, तसं अगदी ब्रह्मदेवालाही कांही ठाम निष्कर्ष काढणं कठीण आहे...!!!!"
मी आतां मात्र फाड्कन् कपाळावर हात मारून घेतला,"   ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ... ...धन्य आहे या कडबोळ्याची उकिडवे...अक्षरशः धन्य धन्य आहे..."
उकिडवे,"अहो मग सांगतोय्‌ काय मघांचपासून तुम्हांला मी?... ...आलं लक्ष्यात सगळं आतां?
मी," ही: ही: ही: ही: ......आलं आलं... ...खुः खुः खुः खुः खुः ...मग काय झालं पुढं?"
उकिडवे,"अहो काय होणार दुसरं तिसरं... ...लोटांगण घालून साकडंच घातलं त्यांना...म्हणालो," कांहीतरी 'गजेन्द्रमोक्ष' करां आमचा साहेब आतां...मार्ग दाखवा सुटायचा यातनं  कांहीतरी... ...तुम्हीसुद्धां सांगूं शकत नसाल, तर दुसरीकडं कुठं जाणार आम्ही?"
मी," मग ? काय म्हणाले ते?"
उकिडवे,"अहो जातिवन्त विद्यावन्तच ते नाना... ...मार्ग दाखवणार नाहीत असं होईलच कसं?"
मी,"काय म्हणाले?"
उकिडवे,"ते म्हणाले, असं बघा...ह्या कडबोळ्याचा नाद च सोडून द्या तुम्ही...तुमची चिन्ता इतकीच आहे ना, की मुळात शिरावर करदायित्त्व आहे काय? आणि असलंच, तर ते नेमकं किती टक्के? तर असं करा, की मुळात करदायित्त्व आहे काय? एव्हढ्याचाच निकाल लावून घ्या. आणि ते जर कांही नसेल, तर ह्या 'झ' च्या नेमक्या टक्केवारीचा विचार करायचं कांही कारणच उरणार नाही... ...होय की नाही? आणि समजा दायित्त्व असलंच, आणि ते गणितानं काढतां येतच नसेल, तर ते कांहीतरी व्यवहारी सूज्ञपणा वापरून अदमासे तरी ठंरवतां येईल की नाही? आणि तें च प्रमाण मानून व्यवहार पुरा करतां येईल की नाही? तर असं करा...राजधानीत च आहांत,तर आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांना जाऊन भेंटा... ...आदरणीय आहेत ते, आणि तडफदारही...सध्या भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोंपटलेले आहेत त्यांनी... ...आणि सर्वसामान्य नागरिकांना तर अगदी आवर्जून भेंटतात ते... ...तर त्यानांच जाऊन  भेंटा...काय? ते नक्की कांहीतरी मार्ग काढतील यातनं... ...ठीक?
नमस्कार... ...बरं वाटलं भेंटून...या आतां"
मी," देव च पावला म्हणायचा उकिडवे तुम्हांला... ...मग पुढं काय झालं?"
उकिडवे,"सांगतो...माझ्या मित्रा नं खटपटी करून दुसर्‍या दिवशी ती भेंटीची व्यवस्था केली, पण माझी एकट्याची...म्हणाला की ही माणसं खूप कार्यमग्न असतात, आणि असल्या ठिकाणी एकाच्या कामासाठी दहा जणांचं लटांबर न्यायचा शिष्टाचारही नसतो...तेव्हां तूं एकटाच जाऊन ये...सगळं ठीक होईल... ... दबकून जाऊं नकोस बिल्कुल म्हणजे झालं.
मग काय, गेलो दुसर्‍या दिवशी प्रधानमंत्र्यांना भेंटायला...तर काय मजा च मजा झाल्या ते काय सांगूं नाना तुम्हांला... ..."
मी," मजा झाल्या... ...म्हणजे? अनेक मजा झाल्या असं म्हणताय्‌ की काय उकिडवे?"
उकिडवे,"होय...अगदी तसंच. आतां ऐका एकेक सगळ्याच सांगतो.   
पहिली मजा म्हणजे आमचा विकसक च ह्या 'जी. एस्. टी.' नामे मानगुटीवर बसलेल्या ड्रॅगन च्या कंचाट्यात सापडला...म्हणून तो झाला 'एण्टर द ड्रॅगन्' चा  प्रीमियर शो...बरोबर?"
मी," बरोबर."
उकिडवे,"दुसरी मजा म्हणजे मी ह्या 'जी. एस्. टी.' च्या ड्रॅगन च्या तावडीतनं सफाचट् सुटलो...म्हणजे तो झाला 'एक्झिट् द ड्रॅगन्' चा प्रीमियर शो...बरोबर?"
मी," बरोबर."
उकिडवे,"तिसरी मजा म्हणजे अगदी ऐनवेळी एक छानशी कल्पना मला सुचली...मी ती प्रधानमंत्र्यांना सुचवली...त्यांना ती इतकी आवडली,की त्यांनी तिच्या अंमलबजावणीची चक्रं फिरवायला तात्काळ प्रारंभ केला,कडकडून माझी पाठ थोंपटली, आणि मला एक हेलिकॉप्टर पण बक्षीस दिलं... ...भ्रष्टाचार निर्मूलनाचं छानपैकी कार्य केल्याबद्दल.!!"
मी," उगीच फिरकी ताणूं नकां माझी उकिडवे...मी चांगला ओंळखून आहे तुम्हांला... ..."
उकिडवे,"अगदी देवाशप्पथ नाना... ...फिरकी नाही आहे ही... जरा ऐका तर खरं"
मी,"हं... ...बोला तुम्ही."
उकिडवे,"आतां मूळचा - म्हणजे ब्रूस ली चा 'एण्टर द ड्रॅगन्' जरा डोंळ्यासमोर आणा... ...उजळणी करूं त्याची... म्हणजे हल्ली ज्याला रीकॅप् का कायसं म्हणतात ना?...तें"
मी,"हूं.........."
उकिडवे,"तर हा सिनेमा सुरूं झाला, की आपल्याला सुरुवातीला त्या चिनी लामांच्या मठातला ब्रूस ली चा पहिला सामना दिसतो. तो संपला, की मग हॉंगकॉंग बंदराचा देखावा वगैरे दिसतो... ...बरोबर?"
मी,"बरोबर."
उकिडवे,"या हॉंगकॉंग बंदरापासून दूरच्या कुठल्यातरी एकाकी बेटावर मार्शल आर्टस् शिकणार्‍या लोकांची एक वसाहत असते, आणि कुणी हान नांवाचे महाराजे ते राज्य चालवीत असतात...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"या हान साहेबांचा 'ओ हॅरा' नांवाचा एक दाढीवाला पहिलवान अंगरक्षक असतो, 'ऍना' नांवाची एक गोड यजमानीण असते, आणि 'बोलो' नामक एक टकरीच्या  लढतीचा पहिलवानी रेडोबा पण असतो...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"या बेटावर हे हान साहेब दर वर्षी मार्शल् आर्टस् चे सामने भंरवीत असतात... ...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"हा जो मघाशी 'ओ हॅरा' सांगितला, तो मार्शल आर्टस् चा मेरुमणी- म्हणजे ब्रूस ली-च्या भगिनी च्या आत्मघातकी मृत्यूस कारणीभूत ठंरलेला असतो...बरोबर?"
मी,"बरोबर."
उकिडवे,"या ब्रूस ली ला अपरिचित, पण एकमेकांचे मित्र असलेले दोन पहिलवान म्हणजे जॉन सॅक्सन आणि जिम केली, जे या वार्षिक सामन्यात हजेरी लावण्यासाठी निघालेले असतात ...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"मग हे तिघे जण वेगवेगळ्या मार्गांनी हॉंगकॉंग बन्दरात पोंहोचतात...ब्रूस ली भगिनीच्या समाधीचे दर्शन घेऊन,जॉन सॅक्सन कर्ज वसुलीला आलेल्या पठाणांचा खात्मा करून,आणि जिम केली धंरायला आलेल्या पोलिसांची वाट लावून...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"मग हे तिघे एका दांडग्या आगबोटीतनं हान साहेबांच्या त्या बेटावर एकत्र दाखल होतात... ...बरोबर?
मी,"बरोबर."   
उकिडवे,"दस्तुरखुद्द यजमानीण ऍना बाई प्रेमाने, आणि रेडा बोलो तिरस्काराने त्यांचे स्वागत करतात...बरोबर?
मी,"बरोबर."   
उकिडवे,"मग ऍनाबाई सगळ्या पहिलवान पाहुण्यांचे लटांबर त्यांच्या विश्रामगृहापर्यन्त घेऊन जातात...बरोबर?
मी,"बरोबर."   
उकिडवे,"मग पाहुणे हातपाय तोण्डे धुवून ताजेतवाने व्हायच्या उद्योगाला लागतात...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"तितक्यात यजमानीणबाई, पाठोपाठ तरूण गुलगुलीत सेविकांची वरात मिरवीत सगळ्या पाहुण्यांच्या कक्षांत आळीपाळीने शिरतात...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"प्रत्येक पाहुण्यापुढे ती वरात उभी करून त्या एकेकाला मूकपणे आस्थेने विचारतात, की 'परवादिवशीच्या लढतींचा आदल्या दोन रात्रींभर सराव करायला यातला कांही मालमसाला तुम्हांला हवाय का रे बाबानो?'...बरोबर?"
मी साठीच्या उकिडव्यांच्या पाच वर्षाच्या निरागस चेहर्‍याकडं बघून कपाळाला हात लावला," हीः हीः हीः हीः हीः हीः हीः हीः ... ..."
उकिडव्यांचं पुराण एकाच पट्टीत सुरूं च होतं," मग त्यातले थंकले-भागलेले पाहुणे 'कांही नको' म्हणतात... ...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"कांही कांही भुकेजलेले नमुन्यापुरता एखादाच नग ठेंवून घेतात... ...बरोबर?"
मी,"खू: खू: खू: खू: खू: खू: खू: ...."   
उकिडवे,"कांही पिसाळलेले महाभाग चार-पाच नगही ठेंवून घेतात... ...बरोबर?"
मे,"ख्या: ख्या: ख्या: ख्या: ख्या: ख्या: ख्या: ... ... काय हे उकिडवे?...खीः खीः खीः खीः .... ...."
उकिडवे,"अहो बोला की नाना... ... बरोबर आहे ना सगळं?"
मी 'खोः खोः खोः खोः खोः खोः खोः' करत, होकारार्थी मुण्डी डोंलवीत, 'चालूं द्या तुमचं' म्हणून हातानंच नुस्ता इशारा केला.!!!
उकिडवे,"इकडं सहकार्‍यांचे सराव सामने ऐन भरांत रंगलेले असतांना ब्रूस ली साहेब एकटेच अपरात्री बाहेर पडून बेटावर नाना उचापती करून ठेंवतात...म्हणजे दोरीला लोंबकळत त्या भुयारात खाली उतरणं, रक्षकांना रपारप् ठोंकून काढणं, कैद्यांचे तुरुंग शोंधून काढणं, तो नाग पकडून बखोटीच्या पिशवीत कोंबून ठेंवणं...वगैरे... ...बरोबर?"
मी,"बरोबर."   
उकिडवे,"मग सकाळीं पहिल्या दिवशीचे तीन निकाली सामने होतात.पैकी पहिल्या सामन्यात 'जिम केली' महाशय हान साहेबांच्या तालमीतल्या प्रतिस्पर्धी पहिलवानाला चारदोन थंपडा,आणि दोनतीन लाथा घालून सफाचट् आडवा करतात. दुसर्‍या सामन्यात 'जॉन सॅक्सन' साहेब प्रेक्षकांतल्या एका नं मारलेली पैज पुरेशी फुगेतोंवर प्रतिस्पर्धी पहिलवानाचे तडाखे खात दोनदां लोळण घेतात. तिसर्‍या खेपेला पैज पुरेशी फुगल्याचा संकेत मिळताच प्रतिस्पर्ध्याला हातापायांनी एकाच वेळी तीन रट्टे आणि दोन लाथा घालीत त्याचं भदं करून सामना आणि पैज जिंकतात... ...बरोबर?
मी," हो: हो: हो: हो: ... अगदी बरोबर."
उकिडवे,"मग तिसरा तो चित्तथरारक ओ हॅरा आणि ब्रूस ली साहेबांमधला सामना...ज्यांत ब्रूस ली साहेब त्या दाढीधार्‍याला पहिल्या दोनतीन झंटक्यांतच थोबाडावर दणके घालून अर्धमेला करून ठेंवतात...मग पुढील दोन डावात मान-पाठ-छातीवर दे दणादण चक्री लाथा घालून त्याला पाऊण मेला करून ठेंवतात, आणि निघून जायला लागतात.
इतक्यात पाठी
मागे तो दाढीवाला खाली पडलेल्या दोन दारू च्या बाटल्या एकमेकीवर आंपटून फोंडीत ब्रूस ली साहेबांना जिवे मारायला त्यांच्या अंगावर धांवून जातो, तेव्हां ब्रूस ली साहेब धांवत जाऊन त्याच्या छाताडात अखेरची निर्णायक लाथ घालून त्याला भुईसपाट करतात. मग अमानवी आवाजांतली एक विचित्र आरोळी ठोंकीत त्याच्या छाताडावर माकडासारखी उंच उडी घालून एक निर्णायक लत्ताप्रहार करीत त्याला यमसदनीं धाडून मोकळे होतात... ...बरोबर?"
मी,"हुः हु: हुः हु: ... ...एकदम बरोबर."

उकिडवे,"तर नाना...इथं आपल्या 'एण्टर द ड्रॅगन्' चा पहिला भाग संपला. दुसरा भाग म्हणजे मोकळ्या मैदानातलं ते अखेरचं कुरुक्षेत्र झाल्यावर मग झाडांआडून ती नौदलाची हेलिकॉप्टर्स येतात बघा... तो दुसरा तुकडा. आतां हे दोन्ही तुकडे एकत्र जोडले ना, की आपला संपूर्ण 'एण्टर द ड्रॅगन्' तयार होतो, ज्याचा ह्या 'जी.एस्.टी.' नामक लफड्याशी थेट संबन्ध आहे... ...आलं लक्ष्यांत?"
मी," हो आलं लक्ष्यांत... ...पुढं. "
उकिडवे,"तर मी मघांशी म्हटल्याप्रमाणं प्रधानमंत्र्यांना, आमच्या भेंटीत, जो जमालगोटा इलाज ऐकवला ना, तो तंतोतंत असाच. फक्त तुमच्या ऐवजी माझ्यासमोर प्रधानमंत्री ' बरोबर ' असा प्रतिसाद देत माझ्यासमोर बसलेले होते... ...कळलं सगळं नीट?"
मी," हो कळलं सगळं...पुढचं काय ते सांगा."
उकिडवे,"तर झालं असं, की ठंरल्याप्रमाणं मी आपला दुसर्‍या दिवशी सकाळी प्रधानमंत्र्यांना भेंटायला गेलो, तर गंमत अशी झाली, की स्वागत कक्षांत खुद्द तें च कांही लोकांशी बोलत उभे होते. त्यांच्या स्वीय सहाय्यकांची खुर्ची रिकामी दिसत होती... कुठंतरी गेले असावेत बहुधा. म्हणून मी आपला तिथंच घुटमळत वाट बघत अवघडून उभा होतो. आणि गम्मत अशी झाली, की खुद्द प्रधानमंत्र्यांचंच लक्ष माझ्याकडं गेलं, आणि ते चाललेला संवाद खण्डित करून स्वतःच माझी विचारपूस करायला आले."
मी,"च्यायला...ग्रेट च आहांत तुम्ही उकिडवे...अभिनन्दन."
उकिडवे,"नाना...अहो माझं कसलं डोंबलाचं अभिनन्दन करताय्?अभिनन्दन प्रधानमंत्र्यांचं करा...ग्रेट ते आहेत... ...मी नव्हे."
मी,"खरंच आहे ते...मग पुढं काय झालं?"
उकिडवे,"मला जरा दडपणच आलेलं होतं....कारण साधा बुशकोट-पाटलोण असा वेष, सूट बूट असलं कांही नाही... ...पायांत जराश्या फाटलेल्या चपला, आणि समोर देशाचा गाडा एकहाती रेंटणारे प्रधानमंत्री उभे. त्यांनी येण्याचं कारण मला विचारलं. मी माझी ओंळख एक सर्वसामान्य नागरिक अशी करून दिली...मग हे 'जी. एस् टी.' च्या महालचाण्डाचं महाभारत ऐकवलं त्यांना, हे ही ठांसून सांगितलं की 'कांही देय कर निघत असेल, तर तो मुदत संपण्याआधीच मी भरूं इच्छितो, कारण की उभ्या जन्मात मी एका दमडीचा देखील देय कर चुकवलेला नाही, आणि 'करचुकव्या' असा शिक्का उर्वरित आयुष्यभर कपाळीं मिरवायची माझी अजिबात इच्छा नाही... ...
तेव्हां माझा 'गजेन्द्रमोक्ष करा' अशी हात जोडून विनन्ति आहे... ...आणि आख्ख्या जगात तो केवळ आपणच करूं शकाल, असं मला आपले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ सेन साहेबांनी स्वतःच सांगितलेलं आहे.'
मग काय धमाल झाली नाना माहीत आहे?"
मी,"काय धमाल झाली मग?"
उकिडवे,"अहो नाना...प्रधानमंत्र्यांनी सगळ्या उपस्थितांदेखत, हिन्दी नटनट्या झंक्‌ मारतील, असली गपाक्‌ दिशी चक्क मिठीच मारली मला त्या स्वागत कक्षात, आणि अक्षरशः गंदगंदून आलं हो त्यांना... ..."
मी,"आरं तिच्यायला... ...भन्नाट् "
उकिडवे,"मग हंळूंच कानांत कुजबुजले की ,' उभ्या जन्मांत एका दिडकीचाही देय कर न चुकविलेले तुम्हीच एकमेव भेंटलात ... धन्य धन्य झालो...!!!"
मग मला हाताला धंरून त्यांच्या कक्षांत घेऊन गेले, आणि 'चिन्ता माझ्यावर सोडा...फक्त समस्या तेव्हढी सविस्तर सांगा' असं म्हणाले."
मी,"   धन्य आहांत तुम्ही उकिडवे."
उकिडवे,"पुढं ऐका तर. मग मी त्यांना अथ ते इति समग्र लचाण्ड सांगितलं. त्यांनी अर्थमंत्र्यांना दूरध्वनि केला...ते ही उपस्थित झाले.
मग अर्थमंत्र्यांनी स्वतःच ते सगळं कडबोळं बघितलं, पण त्यांनाही 'झ' ची टक्केवारी ठोसपणे कांही सांगतां येई ना !!... ..."
मी,"हीः हीः हीः हीः हीः हीः हीः हीः ........धन्य आहे.!!!"
उकिडवे,"ऐका पुढचं नाना...ते महाधन्य आहे.
मग अर्थमंत्र्यांनी ह्या 'जी. एस्‌. टी.' विधेयकाचा मसुदा ज्या जगप्रसिद्ध महाभागानं लिहिलेला होता, त्यालाच पाचारण केलं... ...
ते पाप्याचं महापितर हजर झालं...तळागाळाच्या राखीव कोट्यातलं अस्सल ' कोहिनूर ' रत्न होतं ते बेणं... ....
डाव्या कानावर शिसपेन्सिल खोंचलेली, आणि तोण्डात 'किमाम ३२० ' चा तोबरा... ...ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: ...काय सांगायचं?"
मी,"मग काय झालं पुढं?"
उकिडवे,"आतां ऐका त्या तिघां मान्यवरांतल्या संवादाचा रीकॅप्... ..."
अर्थमंत्री,"या...बसा... ...हा 'जी.एस्.टी.' करकायद्याचा मसुदा तुम्हीच लिहिलेला आहे... ...होय ना?"
कोहिनूर," होय साहेब..."
अर्थमंत्री,"अहो ह्या मसुद्यात काय काय कलमं कोंबून घातलीय्‌त तुम्ही?...जमीनधारणा कायदा, तलाक कायदा, फेरा कायदा, आयकर कायदा, शरीयत कायदा, हिन्दु कायदा, गुन्हेगारी दण्डसंहिता कायदा, दत्तकविधान कायदा, मृत्युपत्र कायदा... ...अल् कायदा च काय तो शिल्लक ठेंवलेला दिसतोय्‌ तुम्ही... ...काय?"
कोहिनूर थेंट अर्थमंत्र्यांकडं बोंट दाखवीत प्रधानमंत्र्यांना म्हणाले,"मी कांही केलेलं नाही साहेब... ...ह्यानीं च मला ते करायला सांगितलं होतं...ते पण धंमकी देऊन... ...मी काय      करणार?"
प्रधानमंत्र्यांनी कपाळाला हात लावला,"काय सांगितलं होतं यांनी तुम्हांला धंमकावून?"
कोहिनूर छाती पुढं काढीत म्हणाले,"ह्यांनी मला धंमकी दिली, की,' याद राखा... ...प्रस्तुत 'जी.एस्.टी.' कायद्याचा मसुदा 'सर्वसमावेशक' व्हायलाच हवा... नाहीतर तुमची कांही धंडगत नाही...!!!!'
म्हणून मी मग सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात सहा महिने ठाण माण्डून बसलो होतो रक्त आंटवत... ...तिथल्या एकूण एक पुस्तकांतलं एकेक कलम घालून हा मसुदा मी बनवला... ...!!!!
काय चुकलं माझं ते तुम्ही च सांगा साहेब..."
प्रधानमंत्र्यांनी उठून ' कोहिनूर ' शी हस्तांदोलन केलं,"धन्य धन्य आहांत आपण... ...सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम करायला आवडेल का आपल्याला?... ...विचार करतो..." 
कोहिनूर रत्न मग अर्थमंत्र्यां वर बोंट रोंखत गरजलं,"ऐकलंत?.... ...तळागाळातला राखीव देशभक्त आहे मी...समजलात? धंमकी-बिमकी द्याल, तर माझ्याशी गांठ आहे... ...याद राखा !!!!"
अशी गर्जना करून मग कोहिनूर रत्ना नं ब्रूस ली ची ती जगप्रसिद्ध गिरकी कोलांटी उडी मारली, आणि आमच्या डोंक्यावरनं सुसाट भिरभिरत ते कक्षाबाहेर अदृष्य झालं...!!!!
उकिडवे,"शेंवटी मी च जरा भीड चेंपून प्रधानमंत्र्यांना विचारलं, की 'हे महालचाण्ड निस्तरायचा एक जमालगोटा रामबाण उपाय माझ्या अल्पबुद्धीला सुचला आहे...आपली  हरकत नसेल, तर ऐकवतो...' तर दोन्ही मंत्री हात जोंडून मला म्हणाले, 'ताबडतोब सांगा...फार उपकार होतील... ...तात्काळ तेरावा घालून सगळेच अंघोळीला गंगातटाकी जाऊं या.... ....!!! "
मी,"ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ह्या: ....."
उकिडवे,"मग मी दोघां मा. मंत्रीमहोदयांना आपला मघांचचा उजळणी केलेला 'एण्टर द ड्रॅगन्' चा प्रीमियर साद्यन्त ऐकवला...आणि त्यानंतर झालेला आमच्या तिघांचा संवाद येणेप्रमाणे... ... ...
.............................................................................................
प्रधानमंत्री,"आलं लक्ष्यांत सगळं माझ्या...आतां तुमचा हा जमालगोटा काय आहे तेव्हढं सांगा."
उकिडवे," तर माझा प्रस्ताव असा आहे, की ही तिसरी निर्णायक लढत तुमच्या-माझ्यात लावायची, एका झंटक्यात या महालचाण्डाचा निकाल लागेल...हा एक च उपाय दिसतोय्‌ मला... ...बघा पटतंय्‌ का ते."
प्रधानमंत्री,"पण या लढतीत कोण कुणाचा असणार ?"
उकिडवे," सांगतो... ...
आपल्या भारत नामे खण्डाचे मालक राजे - दुसर्‍या शब्दांत हान राजे - म्हणजे आपणच...बरोबर?"
प्रधानमंत्री,"बरोबर"
उकिडवे," मी सामान्य नागरिक या नात्यानं सामन्याचा आमंत्रित... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"अगदी बरोबर."
उकिडवे," तात्पर्य ओ हॅरा आपला पठ्ठा ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"आणि ब्रूस ली तुमचा पठ्ठा... ...असंच ना?... ...छान छान... ...एकदम मान्य."
उकिडवे," आपण फक्त लढत लावून द्यायची आणि मजा बघत बसायचं...जर माझा ब्रूस ली आडवा झाला, तर माझ्या या फाटक्या अवताराचा आदर करून मला झेंपेल इतकाच देय कर अदमासाने सांगा...इथल्या इथं सन्मानानं भरतो."
प्रधानमंत्री,"एक मिनिट...एक मिनिट...मला आधी हे सांगा, की तुमचा हा असा फाटका अवतार कश्यामुळं झाला? कोण जबाबदार आहेत याला?"
उकिडवे," साहेब, आपल्या देशातले बांधकाम क्षेत्रातले जगविख्यात विकसक, आणि आजन्म प्रामाणिकपणे भंरत राहिलेले कर या द्वयीमुळं माझी ही अशी दयनीय-प्रेक्षणीय अवस्था झालेली आहे...!!!"
मी,"होः होः होः होः होः...ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः...ही: ही: ही: ही: ही: ही: ही: ही: ही: ही: .....!!!"
प्रधानमंत्री,"धन्यवाद सांगितलंत म्हणून...सगळ्यांना बघून घेतो...चिन्ता करूं नकां... ...बरं पुढं?"
उकिडवे," आणि माझ्या ब्रूस ली नं जर आपला ओ हॅरा झोंपवला, तर ताबडतोब करदायित्त्वमुक्तीचा दाखला तेव्हढा सहीशिक्क्यानिशी दिलात, तर फार उपकार होतील..."
प्रधानमंत्री,"उत्तम...उत्तम...अहो खरं तर मी च तुमचे उपकार मानायला हवेत...आमच्या 'स्वच्छ भारत अभियानात' मोलाचं योगादान दिल्याबद्दल. धन्य झालो आपली भेंट झाली म्हणून... भारमातेचे सुपुत्र आहात खरे...सगळा प्रस्ताव आम्हांला मान्य आहे...आणखी काय?"
उकिडवे,"हे महालचाण्ड निस्तरायला पुण्यनगरी ते राजधानी पर्यंत फंरपटत पदयात्रा करीत इथवर आलेलो आहे... ...न्याय दिलात म्हणून ऋणी आहे आपला...आतां हात जोडून शेंवटची एकच विनन्ति आहे आपल्याला."
प्रधानमंत्री,"अहो विनंति कसली करताय् तुम्ही? काय हवं ते मागा...दिलं म्हणून समजा... ...काय?"
उकिडवे,"सदर प्रस्तावित 'एण्टर द ड्रॅगन्‌ ' एकदाचा पार पडला, की मला माझ्या स्वगृही पोंचवायची तेंव्हढी व्यवस्था केलीत तर बरं होईल...'एण्टर द ड्रॅगन्‌ ' सारखीच    उड्डाणव्यवस्था झाली तर महदुपकार होतील... ...बायकोपोरं काळजी करीत असतील माझी...बाकी कांही नाही."
प्रधानमंत्री,"झाली म्हणून समजा... ...काय? परत पोंचवणारं हेलिकॉप्टर ही ठेंवून घ्या कायमचं, कांही हरकत नाही माझी... ...
आणखी कांही पाणबुडी,विनाशिका, रणगाडा, स्वनातीत मिग् २०, वगैरे कांही हवं असलं तर सांगा...अनमान करूं नका बिल्कुल... ...एखादं ब्राह्मोस क्षेपणास्त्रही हवं तर देतो...!!"
उकिडवे,"धन्य झालो साहेब आपली भेंट झाली."
प्रधानमंत्री,"धन्यवाद...आतां पुढं काय?"
उकिडवे," हें च लढतीचं मैदान... ...आपला ओ हॅरा दाखवा साहेब."
प्रधानमंत्री ( अर्थमंत्र्याकडे बोंट दाखवीत )," हे आमचे ओ हॅरा... ...आतां आपले ब्रूस ली उतरवा मैदानात."
.............................................................................................................................
उकिडवे," तर नाना, मी काय केलं असेल ते ओंळखा बघूं?"
मी,"काय ओंळखूं डोंबल?...ही: ही: ही:... ...टाळकं गंरगंरायला लागलंय्‌ माझं उकिडवे... ...हूः हूः हूः हूः ..."
उकिडवे," नाना...मी फक्त 'जी. एस्‌. टी.' चा जगड्व्याळ मसुदा खंरडणार्‍या राखीव कोट्यातल्या, अदृष्य झालेल्या त्या कोहिनूर रत्ना च्या दिशेंत बोंट दाखवलं,"आत्तां जे भिरभिरत अदृष्य झाले ना... ...तें च आमचे ब्रूस ली... ...!!!"
दुसर्‍या सेकंदाला दोन्ही सन्मानयीय मंत्र्यांनी आ वांसून कपाळांना हात लावीत सह्याशिक्के ठोंकून करदायित्त्वमुक्ती चा दाखला माझ्या हातात ठेंवला... ...!!!!"
मी ," ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः .............!!!"
उकिडवे," तर नाना... ...हा झाला आपला ' एण्टर द ड्रॅगन् ' चा प्रीमियर शो... ...दुसरा पुण्यात झाला...!!!"
मी," आरं तिच्या आयला... ...म्हणजे तो अजून बाकीच आहे काय?"
उकिडवे," मग?...सांगतोय्‌ काय तुम्हांला नाना?... ...पण त्या आधी...त्या ' कोहिनूर ' चं पुढं काय झालं, ते सांगतो."
मी,"बोलत रहा उकिडवे... ...असला भन्नाट मसाला तुम्हीसुद्धां याआधी नव्हता ऐकवलात कधी..."
उकिडवे,"मग माझी सुटका झाल्यावर ते गाळीव रत्न चालतं झालं... ...
त्यानंतर मग आम्हां तिघांचा जो खासगीत संवाद झाला, तो येणेप्रमाणे..... ....
--------------------------------------------------------------------------------------------------
प्रधानमंत्री,"अर्थमंत्रीजी... ...ह्या ' कोहिनूर ' ला ताबडतोब नारळ द्या...हे पदरीं बाळगणं धोंक्याचं आहे..."
अर्थमंत्री," ते अशक्य आहे साहेब... ...खास आरक्षित कोट्यातलं कोहिनूर रत्न आहे ते... ...'आगीतनं फुफाट्यात' असला प्रकार होईल तो."
प्रधानमंत्री,"का?"
अर्थमंत्री,"महाक्रान्ति मोर्चे धंडकतील इथं चोवीस तासांत... ...रंगीबेरंगी झेंड्यांचे...मग काय करायचं आपण?"
प्रधानमंत्री,"कुठल्या रंगांचे झेण्डे म्हणताय्?"
अर्थमंत्री,"एक भगवा तेव्हढा सोडून बाकी सगळेच रंग असतील साहेब... ...नस्ता उपद्याप होऊन बसेल तो... ..."
प्रधानमंत्री,"मग काय करायचं आतां? कारण तुमच्या खात्यात हे रत्न राहणं म्हणजे कपाळमोक्षच होणार आपला...स्पष्टच दिसतंय्‌."
अर्थमंत्री,"आणि सध्या काय झालंय्‌ साहेब, की हे बॅंक बुडव्यांचं जे वारूळ फुटलेलं आहे ना? त्यातनं एक मोदी (माफ करा...आपण नव्हे !!!), आणि दुसरा चोकसी, असे दोन च नाग आतापावेतों बाहेर पडलेले आहेत... ...अजून किती आत वळवळत बसले असतील, कांही सांगतां येत नाही... ..."
प्रधानमंत्री,"पण तुमचा काय अंदाज आहे?...अजून कितीसे असतील आत?"
अर्थमंत्री,"कांही सांगतां येत नाही साहेब...आपण तिघेजण सोंडून कदाचित बाकीचे सगळे एकशे अठ्ठेचाळीस कोटी पण असतील...!!! खरं काय ते त्या विधात्यालाच ठाऊक...!!!!
त्याचं काय आहे, की हे नीरव मोदी प्रकरण फुटायच्या आधी मी दररोज कार्यालयीन कामकाज संपलं की घरीं जात असे..."
प्रधानमंत्री,"मग आतां.....?"
अर्थमंत्री,"हल्ली महिनाभरातनं एखादा दिवस कसाबसा घरीं जाऊन येतो...!!... ...कधी कधी तें पण होत नाही...!!!
गेल्या महिन्यांत तर सौ. नी ' सी. बी. आय्. ' च्या कार्यालयात जाऊन मी हरवल्याची तक्रारही दिलेली होती...!!!!
गृहमंत्र्यांना सांगून ते निस्तरावं लागलं मला सगळं... ...काय करायचं आपणच सांगा."
दोन्ही मंत्रीगण चिंतामग्न झाले... ...
उकिडवे,"साहेब, माझ्या अल्पबुद्धी ला एक कल्पना सुचतेय्‌... ...म्हणजे आपल्या स्वच्छ भारत अभियानाला माझाही खारीचा हातभार लागेल...हरकत नसेल तर सांगतो."
प्रधानमंत्री,"अहो मग वाट कसली बघताय्‌ ?...बोला बोला लगेच... ...सांगा."
उकिडवे,"ते आपण मघांशी म्हणालात ते... ...' सर्वोच्च न्यालायाचे सरन्याधीश ' वगैरे... ...आलं लक्षांत? त्यावरून ही कल्पना सुचली मला... ...
साप भी मरेगा और लाठी भी सलामत रहेगी असं मला वाटतंय्... ...पण तुम्हीच ठंरवा काय ते..."
प्रधानमंत्री,"काय सांगताय् काय?... ...बोला बोला लगेच...ताबडतोब अंमलबजावणी करून टाकूं या...बोला फक्त."
उकिडवे,"तर काय करायचं की, आपल्या कार्यालयात एक ' देशद्रोही आरोप कक्ष ' स्थापन करायचा... सर्वोच्च न्यालायाच्या आधीन ठेंवून. 
मग असलीच वेंचक कर्तबगार गाळीव रत्नं इतर खात्यांतनं सदर कक्षांत कायमची हलवायची...म्हणजे ' स्वच्छ भारत अभियान ' पार पडेल... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"बरोबर...छान... ...असली गाळीव रत्नं उदण्ड झालीत सरकारात, ह्या आरक्षणांमुळं...पुढं?"
उकिडवे,"मग ह्या कोहिनूर रत्नाला त्या कक्षाचा प्रमुख करून त्याची बदली तिथं कायमची करून टाकायची... ...'म्हणजे लाठी तुमच्या नजरेखाली सलामत...बरोबर?"
प्रधानमंत्री,"बिल्कुल बरोबर... ...आतां सापांचं काय ते सांगा."
उकिडवे," ऐका...मग एक नवीन अभियान जाहीर करायचं ' देशद्रोही बुडवा, भारत घडवा ', आणि त्याची जगभर धूमधंडाक्यात जाहिरात करून टाकायची... ...म्हणजे पुढच्या    निवडणुकीचाही प्रश्न निकालात निघेल...बरोबर?"
प्रधानमंत्री,"एकशे दहा टक्के बरोबर... ...छान छान... ...बरं पुढं?"
उकिडवे,"मग संसदेत एक ' देशद्रोही दण्डसंहिता ' बिल पास करून घ्यायचं... ...शिक्षा फक्त दोनच...पहिली ' ब्राह्मोसाय स्वाहा ', आणि दुसरी ' हिन्दी महासागराय स्वाहा '...काय?."
प्रधानमंत्री,"झालं म्हणून समजा... ...मग काय करायचं?"
उकिडवे," मग हे सगळे जे कांही देशद्रोही नाग असल्या वारुळातनं बाहेर निघतील,-मग त्यांत बॅंक बुडव्यांपासून ते करबुडव्यांपर्यंत, आणि दादा-भाऊ पासून खाऊ-खाऊ पर्यन्त    सगळे आले-त्यांची सगळी चौकशी ई. डी. अथवा सी. बी. आय्‌ तर्फेच होणार...बरोबर?"
प्रधानमंत्री,"अगदी बरोबर...ती सगळी खाती माझ्याच ताब्यात आहेत... ...पुढं?"
उकिडवे,"मग ह्या चौकशी यंत्रणांचे सारे अहवाल त्यांना या देशद्रोही आरोप कक्षाला सादर करायला सांगायचे, म्हणजे त्यांचं काम संपलं...बरोबर?"
प्रधानमंत्री,"बरोबर... ...एकदम फर्मास कल्पना..."
उकिडवे,"मग हा देशद्रोही कक्ष प्रत्येक खटल्याचं आरोपपत्र ह्या गाळीव रत्नांकडून तयार करवून ते सर्वोच्च न्यायालयात दाखल करील, की काम झालं... ...एका झंटक्यात आपलं ' देशद्रोही बुडवा,भारत घडवा ' अभियान पूर्ण झालंच म्हणून समजा."
प्रधानमंत्री,"वा वा वा...क्या बात है... ...बहोत खूब...पण ते कसं होणार? तेव्हढं सांगा."
उकिडवे,"सांगतो...ह्या गाळीव रत्नांनी लिहिलेली समस्त आरोपपत्रं, ह्या 'जी. एस्. टी.' च्या मसुद्यासारखीच जगड्व्याळ अगम्य असणार...बरोबर?"
प्रधानमंत्री,"बेशक बरोबर...मग?"
उकिडवे,"तात्पर्य, ती वाचून आरोप नेमके काय आहेत, ते खुद्द त्या गाळीव रत्नानांही सांगतां येणार नाही, जगातल्या कुठल्याही बॅरिस्टरच्या खापर पणज्याला पण त्यातल्या अवाक्षराचाही बोध होणार नाही, आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही त्यांचा थांगपत्ता लागणार नाही... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"अगदी बरोबर आहे तुमचं...पण त्यानं साध्य काय होणार?"
उकिडवे,"अगदी सरळ आहे साहेब... ...असलं अगम्य आरोप पत्र वाचल्यावर ह्या देशद्रोह्यांचा बचाव करायला त्यांचं वकीलपत्र घ्यायचा महामूर्खपणा जगातला कुठला वकील करेल? आणि समजा कुणी केलाच, तरी कसला डोंबलाचा बचावाचा युक्तिवाद तो करूं शकणाराय् सर्वोच्च न्यायालयात?... ...बरोबर?."
प्रधानमंत्री,"दहा लाख टक्के बरोबर...झकास... ... अफलातून... ...म्हणजे बचावाच्या सार्‍या पळवाटांना बूच... ... बरोबर?"
खुद्द उकिडव्यांनी च आतां कपाळाला हात लावला !!! ,"बाकी सोपंच आहे...बचाव च नाही म्हटल्यावर न्यायमूर्ती धंडाधंडा एकतर्फी खटले निकाली काढून हातोडे बडवत शिक्षा ठोंठावून मोकळे होणार...बरोबर?"
प्रधानमंत्री," बरोबर...बरोबर."
उकिडवे,"दण्डसंहितेत शिक्षा फक्त दोनच... ...पहिली ' ब्राह्मोसाय स्वाहा ', आणि दुसरी ' हिन्दी महासागराय स्वाहा '... ...म्हणजे समजा न्यायमूर्ती स्वतःच जरी भ्रष्ट असले, तरी त्यांच्या पण मुसक्या आंवळलेल्या...करतील काय?!!!!.... बरोबर?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर."
उकिडवे,"आतां सांगा...होईल की नाही एका झंटक्यात ' स्वच्छ भारत '?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर." 
उकिडवे,"दुसरा फायदा म्हणजे अण्डा सेल बांधून, त्यांत हे असले देशबुडवे जावई डोंक्यावर बसवून घेंऊन आजन्म सांभाळत बसण्यात होणारा जनतेच्या पैश्याचा अपव्यय ही  टंळेल... ...बरोबर?
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर."
उकिडवे,"तात्पर्य...राजकोषाच्या तळाला पडलेलं भगदाड सफाचट् सीलबन्द...!!... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर."
उकिडवे," तात्पर्य...राजकोष गुटगुटीत बाळसं धंरणार... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर."
उकिडवे,"तात्पर्य...विकासकामांचा धंडाका उडणार... ...सैन्य दलांच्या दण्ड-बेटकुळ्या टंरटंरून फुगणार...!!!... ...बरोबर?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर."
उकिडवे,"तात्पर्य...फुरफुरून दांखवणार्‍या ईशान्यस्थित, आणि दहशतवादी पोंसणार्‍या वायव्यस्थित सख्ख्या शेंजार्‍यांच्या शेंपट्याही एका झंटक्यात त्यांच्याच तंगड्यांत जाणार...!!!!... ... बरोबर?" 
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य... ...बरोबर...
अरे कोण आहे रे तिकडं?... ...जरा पाणी आणा प्यायला...लगेच ... !!! "
उकिडवे,"तात्पर्य... ...आपल्या ' स्वच्छ भारताचा ' चा बघतां बघतां ' महासत्ता भारत '... ... बरोबर?"
प्रधानमंत्री,"धन्य...धन्य...उकिडवेजी... ...अस्सल दुर्दम्य देशभक्त आहांत खरे...या वर्षीचं 'महापद्मविभूषण' राखून ठेंवतोय्‌ आपल्यासाठी... ...सारी व्यवस्था चोंख होईल...काय?
...आतां एक सांगा आम्हांला... ..." 
उकिडवे,"काय म्हणताय?... ...काय सांगूं?"
प्रधानमंत्री,"माझ्या खुर्चीत बसाल?... ...हवं तर मी च आपला स्वीय सहाय्यक होतो... ...!!! "
उकिडवे,"धन्यवाद... ...मी तेंव्हढा दुर्दम्य कणखर नाही... ...हा माझा आपला खारी चा वाटा समजा  इतकंच... ...मग रजा घेऊं मी आतां आपली?"
प्रधानमंत्री,"धन्यवाद...देश आपला सदैव ऋणी राहील उकिडवेजी... ...धन्य धन्य... ...या." 
-----------------------------------------------------------------------------------------------------
मी," आयला...सगळं अचाटच आहे हे उकिडवे..." 
उकिडवे," अहो नाना कसलं काय अचाट आलंय्‌ त्यात?...मी आपलं काय सुचलं ते त्यांना सांगितलं एव्हढंच...
तर असा राजधानीतला प्रीमियर आटोपून मग मी पदयात्रा करीत पुण्याला घरीं परत आलो..."
मी,"पदयात्रा?...अहो पण ते हेलिकॉप्टर मिळालं होतं ना तुम्हांला?.......मग?"
उकिडवे," त्याचं काय झालं, की प्रधानमंत्र्यांची गांठभेंट उरकून मी जेव्हां त्या हेलिकॉप्टर मध्ये बसायला गेलो, तेव्हां त्याचा वैमानिक मला म्हणाला, की 'हवाईदलाच्या कायद्यानुसार फांटकी पादत्राणे चंढवून यात बसायला मनाई आहे...!!! सबब आपला नांवपत्ता लिहून द्या...हेलिकॉप्टर पोंचवायचं काम माझं... ...बाकी तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या...!!!! ' 
मग नांवपत्त्याची लिहून दिलेली चिठ्ठी खिश्यात कोंबून तो भुर्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌र्र्‌ कन् उडून निघून गेला....!!!"
मी,"हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः हॅः ......"
उकिडवे," स्वगृहीं पोंचेतोंवर पायांची लाकडं झालेली होती. जरा गरम पाण्याच्या घंगाळ्यात पाय बुडवून शेक घेत बसलो... ...सौ. नी चहाचा कप हातात ठेंवला.
चहा संपवून कपबशी मेजावर ठेंवतोय्‌ न ठेंवतोय्‌ तों च भ्रमणध्वनी कोंकलायला लागला... ..."
मी," बर...............?"
उकिडवे,"पलिकडून आमचा विकसक ' ओ हॅरा '  गरजला ,' ताबडतोब ' जी. एस्. टी.' चा चेक हजर करा... ...वाट बघतोय्‌ '... ..."
नशीब माझं... ...पुढं अजून कांही ' ही...हो...हा...हू ' अश्या गर्जना नाही ऐकायला आल्या.!!! "
मी,"मग?...गेलात लगेच तसल्या अवस्थेत?"
उकिडवे,"काय करणार?...नाईलाज होता माझा... ...गेलो न्‌ काय "
मी,"  ' गेलो न्‌ काय ' म्हणजे नेमकं काय? "
उकिडवे,"सांगतो...
त्याच्या-माझ्यातला सामना, म्हणजे हुबेहूब ' एण्टर द ड्रॅगन ' मधल्या ' ब्रूस-ली ' आणि ' ओ हॅरा ' मधल्या निर्णायक लढतीची चक्क पुनरावृत्ति झाली... ...


मी,"आईशप्पथ !!!... ...ते कसं काय?"
उकिडवे,"ऐका नीट... ...
गेल्या गेल्या त्यानं त्या ' ही...हो...हा...हू ' च्या गर्जना करीत मला खुद्द ' ब्रूस ली ' पण झक् मारील असल्या नेत्रदीपक, ते घूमचक्कू का काय म्हणतात ते...त्याच्या नेत्रदीपक कसरती पण करून दाखवल्या... ...तो 'ओ हॅरा ',  ' ब्रूस ली ' ला बुक्की मारून एक फळकूट फोंडून दाखवतो ना, अगदी त्या च थाटांत."मी,"टंरकलात काय उकिडवे?... ...हे लोक त्या कलेत जगप्रसिद्ध असतात, म्हणून म्हटलं... ..."
उकिडवे,"छे हो....कश्यात काय न्‌ फांटक्यात पाय म्हणतात ना, तसलं कांहीतरी झालं बघा ते सगळं..."
मी,"म्हणजे?"
उकिडवे,"मी थेंट ' ब्रू
ली ' च्या थाटात खिश्यातला तो प्रधानमंत्र्यांच्या सहीशिक्क्याचा करदायित्त्वमुक्ति चा दाखलाच त्याच्या थोंबाडावर दोनचार वेळां फाड्‌दिशी वाजवला... ...."


मी,"आयला धमाल... ...बेणं त्या ' ओ हॅरा ' सारखंच अर्धमेलं होऊन लडबडायला लागलं की काय?"
उकिडवे," काय होणार होतं दुसरं तिसरं?..."
मी,"आरं तिच्या... ...मग पुढं काय झालं?"
उकिडवे," मग मी हातातला दाखला ' ब्रूस ली ' च्या घूमचक्कू सारखा सपासप्‌ फिरवत त्याच्या टाळक्यात हाणला...!!"मी,"खु: खु: खु: खु: खु: खु: खु: खु: ...."
उकिडवे,"मग तो विकसक नामे ' ओ हॅरा ', ' ही...हो... हा...हू ' ऐवजी  ' कूं...कूं...कूं...कूं ' करायला लागला... !!!"


मी,"हीः हीः हीः हीः हीः हीः हीः ... ...."
उकिडवे,"मग मी त्याच्या छाताडावर अखेरची लाथ घालत ठंणकावलं की ' मी किती रकमेचा कर देय आहे, ते ह्यावर सही करणार्‍यानांच जाऊन खुशाल विचार '...!!! "


मी,"खी: खी: खी: खी: खी: खी: खी: खी: खी: खी: ... ..."
उकिडवे,"मग त्या मल्टिप्लेक्स् मध्ये एकाच वेळी ड्रॅगन् चे दोन प्रीमियर शो झाले... ..."
मी,"म्हणजे?"
उकिडवे,"म्हणजे माझ्या मानगुटीवर बसलेल्या 'जी. एस्. टी.' नामे ड्रॅगन् च्या विळख्यातनं माझी सफाचट् सुटका झालेली असल्यानं, विकसक माझा अस्सल ' एक्झिट् द ड्रॅगन् ' चा प्रीमियर शो बघत होता...!!!"
मी,"आणि तुमचं काय उकिडवे?"
उकिडवे,"आणि मी ' क्यां क्यां क्यां क्यां क्यां क्यां ' करणार्‍या जातिवन्त ' केष्टो मुखर्जी ' च्या अस्सल ' एण्टर द ड्रॅगन् ' चा प्रीमियर शो बघत होतो...!!!!!"इतकं सांगून साठी चे उकिडवे, त्यांच्या पांच वर्षे वयाच्या निरागस चेंहर्‍यानं, टप्पोर्‍या डोंळ्यांनी माझ्याकडं बघायला लागले... ...!!
मी आ वांसत कपाळाला हात लावीत डोंळे फांडफांडून त्यांच्याकडं बघायला लागलो... ...!!!
दुसर्‍या क्षणीं आपापलीं कपाळं हातांनी थंडाथंडा बडववून घेंत ' ख्याः ख्याः ख्याः ख्याः ख्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ' करीत ठार वेड्यागत हंसायला लागलो...!!!!
आम्ही ज्यांत बसलो होतो, त्या खुर्च्या क्षणार्धात उलट्या-पालट्या झाल्या...!!!
मघांशी मग-मगभर गिळलेल्या चहाचा फुंसाटा पोंटातनं ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा फस्स्‌दिशी वर उसळला...!!!!
आणि उकिडव्यांच्या सुबक स्पॉटलेस् केबिन चा बघतां बघतां अक्षरशः राडा झाला.... !!!!

*****************************************************************************************
रविशंकर.
मार्च १८ २०१८.