Search This Blog

Saturday, 26 April 2025

|| बोधकथैषा लघुत्तमा ||

 तत्त्वद्न्यानातल्या ' बोधकथा ' वाचायला, न् त्यावर चिंतन करायला मला प्रचण्ड आवडतं...

या कथांची एक गंमत असते. त्या मुद्रित ओंळींबरहुकूम वाचल्या, तर लहान पोरांच्या गोष्टी असतात, आणि दोन दोन ओंळींच्या मध्ये जर वाचतां आल्या, तर त्यांत दडलेलं तत्त्वद्न्यानाचं अफाट भाण्डार सापडतं.

फक्त तशी संवय आपल्याला लावून घ्यावी लागते इतकंच... ...


तसं म्हणायला अकबर-बिरबल, इसापनीति, चाणक्यनीति, पंचतंत्र , विक्रम-वेताळ, चांदोबा मासिक, इत्यादींसारखं साहित्य हें बालसाहित्यात मोडतं, पण वर म्हटल्याप्रमाणं हीं च पुस्तकं जर दोन दोन ओंळींच्या मध्ये वांचतां आलीं, तर अमाप व्यवहारी शहाणपणानं ठांसून भंरलेला सुलेमान चा खजिनाच हाताला लागतो, असं म्हटलं, तर त्यात कसलीही अतिशयोक्ति होणार नाही... ...

विशेषत: पंचतंत्रावरचे संस्कृतातले टीकाग्रंथ जर वाचले, तर ही बाब अगदी प्रकर्षानं जाणवते...

फक्त हें साहित्य नुस्तं वाचून बाजूला न ठेंवतां, त्यावर चिंतन-मंथन करायची आवड मात्र असायला हंवी, तर आणि तरच त्या गोष्टींमागं दडलेल्या तत्त्वद्न्याचा साक्षात्कार आपल्याला होऊं शकतो...अन्यथा नाही.


हा उपद्व्याप करण्याचा आद्य फायदा हा असतो, की माणसाच्या दृष्टी चा नैसर्गिक आंवाका जो बत्तीस अंश चाळीस कलांचा असतो, तो एकदां तत्त्वद्न्यान समजायला लागलं, की बघतां बघतां दोनशे सत्तर अंशापर्यंत विस्तारूं शकतो, आणि मग बाह्य जगातल्या वास्तवात घडणा-या सकृद्दर्शनीं अनाकलनीय भासणा-या अनेकविध घटनांमागची कारणमीमांसा स्वच्छपणे दिसायला लागते... ...


तीतनं हाताला लागलेल्या या कथा... ... ...


             

|| व्यवहारे विचक्षणता ||


एकदां एक गरीब शेंतकरी बाजारात वर्षभंराच्या सांठवणीसाठी तांदूळ खरेदी करायला गेला.

घंरची सांसारिक परिस्थिती तशी ओंढगस्तीचीच असल्यानं बायको नं त्याला जातांना बजावून सांगितलेलं होतं, की ' सगळा बाजार फिरून तांदळाच्या भावांची आधी नीट चौकशी करां...

मग जिथं कमीतकमी भाव असेल, त्या दुकानांतनं च तांदूळ खरेदी करा...

आणि दुकानदार सांगेल त्या भावातही चांगली घांसाघीस करून मगच तांटूळ खरेदी करां ... ... आणि आधी तांदूळ बघून ताब्यात घेंतल्यावरच पैसे द्या...कारण भाव पाडून मागितला, की दुकानदार मालाच्या प्रतीत फंसवतात... ... ...कळलं? ’


बिचा-याच्या बायको ची आख्खी हयात काटकसरीनं संसार करीत भाजीपाला बाजारात च खरेद्या करण्यांत गेलेली होती...ती तरी नव-याला दुसरा तिसरा काय सल्ला देणार ?


झालं...शेंतकरी मामा कमरेला कसा आंवळून ठोंक धान्यबाजारात गेले. सगळा बाजार फिरून त्यांनी भावांचा आधी अंदाज घेतला...

मग एक विक्रेता नक्की करून त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या तांदळाच्या राशीजंवळ बसलेल्या विक्रेत्याबरोबर खरेदीच्या वाटाघाटी सुरुं केल्या... ...


प्रथम चुना तंबाखू ची देवाण-घेवाण होऊन दोघे एकमेकासमोर बसले, आणि त्यांच्या वाटाघाटीं सुरूं झाल्या...

बरीच खेंचाखेंची करून मामांनी भावही ठंरवला... ...

पण दिवस मावळायला आला, तरी मामांची तांदूळ खंरेदी कांही तंडीला जाई ना...!!


कारण विक्रेत्यालाही कांटकसरीनं संसार चालवणारीच बायको होती... ...!!!


मामा म्हणत होते ' आधी पसंत केलेला माल बैलगाडीत भंरा, मग पैसे '

तर विक्रेत्या नं टुमणं लावलेलं ' आधी पैसे द्या, मग माल गाडीत भंरतो '


अखेर सुर्य बुडायची वेंळ आली, न् दोघांच्याही डोंक्यात काय झालेलं होतं, त्याचा लख्खदिशी प्रकाश पडला.


झालं होतं असं, की दोघे परस्परांकडं पांठ करून वाटाघाटीचं गु-हाळ घालत दिवसभंर बसलेले होते... ...!!!

 



ते मग उलटे वळून एकमेकांना सामोरे होऊन बसले...

आणि मामां ची तांदूळ खरेदी पुढच्या दहा मिनिटांतच पार पडली... ...!!!


मामांना चार पैसे भाव वाढवून द्यावा लागला...

आणि विक्रेत्याला स्वतः च वाहून मामांच्या बैलगाडीत तांदूळ मोफत चंढवून द्यावा लागला... ...


यात गंमत अशी झालेली होती, की विक्रेत्यानं तांदूळ बैलगाडीत मोफत भंरून दिल्यामुळं शेतकरी मामांचे जितके पैसे वांचले, नेमके तितकेच पैसे भाव वांढवून द्यावा लागल्यामुळं ज्यास्त खर्च झालेले होते...!!


आपापल्या घरीं परतल्यावर फायदेशीर व्यवहार केल्याबद्दल व्यापारी बायको च्या तोंडभंर कौतुकाला पावला...

शेंतकरी मामा नां मात्र आतबट्ट्याचा व्यवहार केल्याबद्दल कान किटेंतोंवर बायको च्या शिव्या खाव्या लागल्या... ...!!!


असं कां झालं ?


मी वर प्रास्ताविकात म्हटलंय ना, तसं चिंतन-मंथन केल्याशिवाय तें कसं काय सांगणार ?... ...

 

**********************************************************************************

-- रविशंकर.

२७ मार्च २०२५.


No comments:

Post a Comment