|| अतिलोभात्कार्यनाशः ||
त्रेतायुगातल्या काळात अवन्ती नगरीत एक अतिशय गरीब पण ब्रह्मदेवभक्त भटजीबुवा रहात होते.
आर्थिक परिस्थिति ' अठरा विश्वे ' असली, तरी बुध्दिमान होते...
तथापि बुध्दिमान असूनही शहाणे मात्र नव्हते ...!!
उपजत टगे तर होतेच, पण महा हांवरट देखील होते... ...
कायमच्या मानगुटीला बसलेल्या दारिद्र्यानं कंटाळून एके दिवशीं भटजीबुवांना धर्मपत्नि नाही नाही तें बोलल्या... ...
त्यामुळं संतापून ' आतां गजान्त लक्ष्मी प्राप्त करूनच तुला तोंड दांखवायला घरीं येईन ' अशी भीष्मप्रतिद्न्या करून भटजीबुवा तिरीमिरीला येऊन घरातनं जे बाहेर पडले, ते थेट गोंडवनात चालते झाले, आणि तिथं इरेला पडून त्यांनी बारा वर्षं ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या केली... ...
अखेर साक्षात ब्रह्मदेव प्रसन्न होऊन भटजीबुवांसमोर अवतरले, “ तुझ्या तपश्चर्येनं मी प्रसन्न झालोय भक्ता... ...काय हंवा तो वर माग...”
भटजीबुवा जाम खूष झाले...
तपश्चर्या फंळाला आलेला तो क्षण, अन् साक्षात ब्रह्नदेव समोर बसलेले... ...
त्यांची ' तपश्चर्या ' पुरेपूर वसूल करायला आतां त्यांच्या डोंक्यातला जातिवन्त टग्या जागा झाला, न् क्षणार्धात वकिली पवित्र्यात शिरला...
भटजीबुवा, “ धन्य धन्य झालो देवा आपल्या दर्शनानं...”
ब्रह्मदेव, “ मग घे मागून तुला काय हवं तें "
भटजीबुवा, “ तें च कळत नाहीय देवा..."
ब्रह्मदेव, “ कां बरं ?...काय अडचण आहे तुझी ?”
भटजीबुवा, "आपली परिमाणं मला परिचित नाहीत देवा...”
ब्रह्मदेव, “ म्हणजे ?...काय जाणून घ्यायचं आहे तुला ?”
भटजीबुवा, “ देवा...आपली एक वीतभंर अंतर म्हणजे आम्हां माणसांच्या परिमाणात किती अंतर भंरेल ?”
ब्रह्मदेव, “ दहा कोटी मैल...”
भटजीबुवा, “ आपला एक धान्याचा दाणा म्हणजे माणसांचे किती दाणे होतील देवा ?”
ब्रह्मदेव, “ चार कोटी पोतीं होतील...”
भटजीबुवा, “ आपली एक गुंजभंर वजन म्हणजे मानवांच्या भाषेत किती वजन भंरेल ?”
ब्रह्मदेव, “ चारशे अब्ज मण भंरतील तुमचे...”
भटजीबुवा मग तोंडातनं गळायला आलेली लाळ गिळत पहिल्या झंटक्यात म्हणाले, “ मग मला तुमची एक च पै द्यावी देवा...!!”
आणि , “ इथंच थांब भक्ता...दोन मिनिटांतच तुझी पै घेऊन हा आलोच " म्हणत दुस-या झंटक्यात ब्रह्मदेव अंतर्धान पावले... ... ...!!!
भटजीबुवांचं पुढं काय झालं ?
तें निराश होऊन स्वगृहीं परतले, की आणखी कडक तपश्चर्या करायला हिमालयात चालते झाले ?
घरीं परतले असतील, तर बायको नं त्यांना घरांत घेतलं, की हांकलून दिलं ?
आणि हिमालयात गेले असतील, तर त्यांना अखेर प्राप्त काय झालं ?...ब्रह्मदेवांची पै, की शहाणपण ?
तें चिंतन-मंथन केल्याशिवाय मला कसं काय सांगतां येईल ?
बोधकथांची ही च तर गम्मत असते...त्या स्वतः लघुत्तमा असल्या, तरी वाचकाला प्रदीर्घ काळापर्यंत चिंतनांत जंखडून ठेंवतात... ...
************************************************************
-- रविशंकर.
२७ मार्च २०२५.
No comments:
Post a Comment