Search This Blog

Thursday 8 June 2023

|| तुका म्हणे ...भाग १ ||

  || निरंजन ||

संत तुकाराम हे माझे अत्यंत आवडते संत कवि...

संत म्हणूनही...आणि असामान्य रचनाकार म्हणूनही... ...

पण तुकोबांवर माझं मनापासून प्रेम असण्याचं तिसरं च एक व्यावहारिक कारण आहे... ...

तें म्हणजे आजतागायत त्यांच्या ओंव्यानीं मला सौ. इंदिराजींच्या तंडाख्यातनं अगणित वेळां सफाचट वांचवलेलं आहे...अगदी बालंबाल.....

सौ. इंदिराजी फंणफंणल्या, की ' तुका म्हणे...' अशी सुरुवात करून एक पदरची, प्रसंगाला साजेशी ओंवी त्यांना ऐकवायची...की झालं...

अश्यांपैकी हा पहिला किस्सा... ...

त्याचं काय आहे, कीं करवीरनिवासिनी श्रीजगदंबा ऊर्फ मातोश्री म्हणजे आमचं कुलदैवतही, आणि माझं व्यक्तिगत उपास्य दैवतही.

त्यामुळं कोल्हापूर च्या मंदिरात त्यांची जशी आहे, तशी - अगदी अंगावरच्या दागदागिन्यांसह - मातोश्रीं ची तंतोतंत हुबेहूब प्रतिमा असलेलं मखर आमच्या घरातल्या दिवाणखान्यात आम्ही यथाविधि प्रतिष्ठापित केलेलं आहे, ज्याच्या समोर दररोज सकाळ-सायंकाळ स्नान आटोंपलं, कीं मी गायत्री करतो...गेली अठ्ठेचाळीस वर्षं हें सत्र अखण्ड चालूं च आहे... ...

 

 

तर सदा न् कदा व्हायचं काय, की निरंजन तबकात ठेंवून आरती ओंवाळतांना त्यातलं वातदान लडबडून तिरकं व्हायचं...कधीं कधीं तर इतकं, की तें कलंडून निरांजनातनं बाहेर पडेल की काय अशी भीती देखील वाटायची... ...

 

 

जरा नीटपणे निरीक्षण केल्यावर मग त्याचं कारण माझ्या ध्यानात आलं...वातदाना चा आकार निरंजनाच्या वरच्या खळग्यापेक्षा अगदी केंसभंर मोठा तर होताच, शिवाय त्याच्या पायांची टोंकंही अणकुचीदार होती, ज्यांमुळं तें निरंजनाच्या वरच्या वाटीवजा खळग्यात समतल बसायचं नाही... ...

एकदां अशीच आरती करतांना हा प्रकार सौ. इंदिराजीं च्या देंखत च झाला...तश्या सौ. इंदिराजी माझ्यावरच उखडल्या," अहो जरा तबक घट्ट धंरून सावकाश फिरवा की आरती...निरंजन खाली पडलं तर काय करायचं ?... ...तुमची पूजा-अर्चा सुद्धा ना...घिसाड्यासारखी असते अगदी... ...!!!...कुत्रं मागं लागलंय काय तुमच्या ?...ऑंं ?"

मी मग गायत्री आंवरल्यानंतर सौ. इंदिराजी नां तसं होण्यामागचं तांत्रिक कारण सांगितलं, तर त्या आणखीनच उखडल्या," मी पण ह्या च निरंजनानं आरती करते...तेव्हां बरं नाही लडबडत तें ?...उगाच नस्त्या शेंड्या लावूं नकां मला...धंडपणे आरती ओंवाळायला शिका आधी...समजलं ?"

तरी मी चिकाटी सोडली नाही...," अहो...हे बघा... ...ह्या वातदानाला जरा मोठ्या घाटाचं च निरंजन असणं आवश्यक आहे...तसं तें असेल, तरच हे वातदान त्यात नीटपणे समतल बसेल...तेव्हां... ..."

," निरंजन नवीन आणू या...असंच ना ?" सौ. इंदिराजी नी मनकवडेपणानं माझं मनोगत पुरं करीत विचारलं..."

मी," अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही..."

सौ. इंदिराजी नी आतां अस्तनीतला नकाराधिकार बाहेर काढला," कांही नवं बिवं निरंजन आणायचं नाही... समजलं?"

मी," कां म्हणून ?"

सौ. इंदिराजी इतिहासकालीन वस्तूंवर अगदी जिवापाड प्रेम करतात...जितकी वस्तू अधिक जुनी, तितकं तिच्यावरचं सौ. इंदिराजीं चं प्रेम अधिकच वाढतं... ...आमच्या घरातला मिक्सर तर तब्बल बेचाळीस वर्षांचा जुना आहे, आणि म्हणूनच तो सौ. इंदिराजींच्या गळ्यातला ताईत झालेला आहे...!!

सौ. इंदिराजी," हे निरंजन कांही साधंसुधं नाहीय बरं...मी या घरात जेव्हां प्रथम पाऊल टाकलं ना, त्या म्हणजे माझ्या गृहप्रवेशाच्या वेंळीं तुमच्या आई नी हें च निरंजन तबकात उजळवून मला ओंवाळलं होतं... तेव्हां हे निरंजन म्हणजे आईं ची आंठवण आहे माझ्यासाठी... ...कळलं? ...तेव्हां नवीन बिवीन निरंजनाचं गाजर चंघळत असाल, तर विसरून जा तें... ...काय ?"

तरीही मी माघार घेतली नाही," मग काय असं च जीव मुठीत धंरून रोज मातोश्रीं ची आरती करायची ? "

सौ. इंदिराजी,"," जीव मुठीत कश्याला धंरायला लागतोय ?... ... माझ्यासारखी धंडपणे आरती ओंवाळायला शिका आधी...नवीन निरंजन अजिबात विकत आणायचं नाही ...!!! "

असला निर्णायक घण मारून सौ. इंदिराजी तरातरा शयनकक्षाकडं चालत्या झाल्या, आणि मी कपाळाला हात लावला," तुका म्हणे... ..."

सौ. इंदिराजी गर्रकन मागं वळल्या ," ...काय?...काय म्हणालात ?"

मी जाम कळ काढत गळा काढला...

 

," तुका म्हणे त्यातल्या त्यात | पैका दंडपावा बटव्यात

   खर्च-वेंचा त्यात हात | घालूं नये अजिबात || "

 

सौ. इंदिराजीं चे डोळे आतां बश्याएव्हढे गरगरीत झाले...," समजलं...समजलं बरं... ...तुकोबांनी ही तुमची गाथा ऐकून वर स्वर्गात कपाळावर हात मारून घेतला असेल... ...काय?...त्यांची गाथा इंद्रायणी नं डोंक्यावर घेंतली...ठाऊक आहे ना तुम्हांला?"

मी इंदिराजीं च्या गळाला अलगद लटकलो," ...आणि माझी ? "

सौ. इंदिराजी नी मग चितपट तंडाखा हाणला," तुमची इंद्रायणीत बुडवायच्या लायकीची आहे...!!!... समजलात ? "

शयनकक्षाकडं तरातरा चाललेल्या पांठमो-या सौ. इंदिराजींकडं बघत मी परत कपाळाला हात लावला...!!

सौ. इंदिराजी तर नव्या निरंजनाच्या प्रस्तावाचं पहिल्या झंटक्यात च असं श्राध्द घालून मोकळ्या झालेल्या होत्या...

आतां आपल्यालाच कांहीतरी गुपचुप पणे करावं लागणार हे मला कळून चुकलं... आणि मी यथायोग्य संधी ची वाट बघत बसलो... ...

तशी मातोश्री नां त्यांच्या निस्सीम भक्तांची काळजी असतेच...त्यामुळं मला हंवी असलेली संधी पुढं तीन च दिवसांनी त्यानी माझ्या पदरात अलगद टाकली... ...

," अहो...ऐका जरा मी काय सांगतेय तें...", सौ. इंदिराजी दुपारची जेवणं आटोंपल्यावर मला हांक मारत म्हणाल्या..."

मी," अं...हं हं...बोला...काय म्हणताय ?"

सौ. इंदिराजी," अहो...सकाळी आई चा फोन आला होता..."

मी," काय म्हणतायत सासूबाई एकंदरीत ?"

सौ. इंदिराजी," कांही नाही...फोनवर आई चा आवाज जरा थंकल्यासारखा जाणवत होता, म्हणून जरा भेंटून येते तिला... ...तासाभंरात येईन परत... ..."

आमच्या इंदिराजीं चा अगदी पहिल्यापासून स्वगृहावर आतोनात जीव... ...

इतका, की आमचं लग्न झाल्यास आजतागायत तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांत त्या एकदाही एखाद्या दिवसापेक्षां ज्यास्त काळ माहेरीं गेलेल्या नाहीत...या बाबतीतला त्यांचा हा विक्रम गिनीज बुक मध्ये नोंद व्हायला कांहीही हंरकत नाही...!! 

मी," मग या की आई नां भेंटून...ब-याच दिवसांत तुम्ही गेलाच नाहीत माहेरी ...अगदी निवांतपणे विचारपूस करून या... ...!!!...कसली घाई आहे धांवत पळत तासाभंरात घरीं परत यायची...?"

सौ. इंदिराजी," हे बघा...मी तासाभंरातच येईन परत... ...घरीं कामं पडलीत ढीगभंर...ती कोण करील ?...आणि हे बघा... ..."

मी," ...काय बघूं ?"

सौ. इंदिराजी," नस्ता खेतरीपणा बस करा...मी घरीं येईतोंवर कसलेही नस्ते उपद्व्याप करून ठेंवायचे नाहीत मला निस्तरायला...काय ?"

मी," हें सांगायलाच हवंय काय ?"

सौ. इंदिराजी," अगदी बजावून सांगायला हंवंय... समजलं?...जाऊन येते मी... "

सौ. इंदिराजी नी माहेराकडं प्रस्थान ठेंवलं, आणि माझ्या डोंक्यात निरंजन भुणभुणायला लागलं... ...कांहीतरी उपाय करायची आयती चालून आलेली ती सुवर्णसंधी...निरंजनात वातदान नीट बसत नाही, आणि नवीन मोठं निरंजन आणायला सौ. इंदिराजी कांही तयार नाहीत... ...मग काय करतां येईल बरं ?"

जरा आडव्या डोंक्यानं विचार करतां करतां अचानक एक कल्पना सुचली...साँप भी मरेगा,और लाठी भी सलामत... ...वा वा वा...

मी महाखूष होत ताबडतोब माझे लंगोटीयार शरदराव दातारांना फोन लावला...सुदैवानं शरबा त्यांच्या कारखान्यातच होते...

वा वा वा...नशीब सिकंदर दिसतंय तर आज... ...

श-या," काय रे नाना...कसला किडा चांवला तुला आज ?"

मी," फालतू गप्पा बाजूला ठेंव श-या...तांतडीचं काम आहे... ...घांसणीयंत्र मोकळं आहे काय तुझं आत्तां ?"

श-या," ग्राइंडर होय ?...तो मोकळाच आहे की आत्तां...काय करायचंय तुला त्याच्यावर ?"

मी,"आत्तां गप्पा नकोयत म्हणून सांगितलं ना तुला ?...दहा मिनिटांत पोंचतोय मी तुझ्या कारखान्यात..."

मी पटापट देवघरातलं निरंजन आणि वातदान धुवून पुसून खिश्यात टाकलं, कपडे चंढवले, आणि शरदरावांच्या कारखान्याच्या दिशेत बुलेट हाणली...

शरदराव माझी वाट च बघत बसलेले होते...," एव्हढं आग लागलेलं कसलं काय काम काढलंयस नाना ?..."

मी," आग लागूं नये कुठं, म्हणून धांवत-पळत आलोय...सगळं मागाहून सांगतो तुला... ...कार्यभाग उरकून पाऊण तासात च घरीं परतायचंय मला... ...घासणीयंत्र कुठाय ?"

श-या नं यंत्राच्या दिशेत बोंट दाखवलं, आणि मी खिश्यातले पवित्र ऐवज बाहेर कांढून यंत्राचा ताबा घेतला... ...

श-या," अच्छा अच्छा... ...म्हणजे सुमा वहिनी माहेरीं गेलेल्या आहेत तर... ...आणि तासाभंरात घरीं परत येणार असतील...होय ना नाना ?"

मी," आत्तां कांही विचारूं नकोस श-या... ...काम करूं दे मला..."

मी मग श-याकडनं व्हर्निअर मागून घेतला... ... निरंजनाची वरची वाटी आणि वातदानाची सगळी मापं घेतली, आणि वातदान ग्राइंडर वर लावलं...

आधी त्याच्या तिन्ही तंगड्या एकसारख्या मापांत निरांजनाच्या वरच्या खळगीत चंपखल बसतील इतपत घांसून कमी केल्या...मग तिन्ही तंगड्यांची टोंकं घांसून गोलसर गुळगुळीतही करून घेतली... ...

वातदान आतां निरंजनात अगदी चपखल समतल बसलं, आणि मी ग्राइंडर बंद करून वातदान आणि निरंजन खिश्यात टांकलं," धन्यवाद श-या... ...येऊं काय आतां ?"

श-या नं माझ्याकडं डोंळे बारीक करून बघितलं," थांब जरा...कुठं निघालास काम झाल्या झाल्या तूं ?... ... चहा मागवलाय, तो घेऊं या, आणि मग पळ तूं कुठं पळायचा तो... ..."

मी," चहा आत्तां नको श-या... ...घरीं पोंचायची घाई आहे...नंतर बघूं चहाचं..."

श-या," वृंदा चे फुकट जोडे खायचे नाहीत मला... ... काय?...हा आलाच बघ चहा... ...तो घे, नी मग नीघ ... "

श-याकडचा चहा संपवून मी कप खाली ठेंवला," येतो श-या... ...आणि हे बघ..."

श-या नं डोंळे मिचकावले," अतिगुप्तता पाळायची ना याबद्दल?... मला नवं आहे काय हें सगळं?...पार तोंडाला कुलूप च...अगदी वृंदा ला सुध्दां पत्ता लागूं देणार नाही... ...काळजी च सोड तूं... ...झालं?... आणि हे बघ..."

मी," आतां आणखी काय ?"

श-या," कांही अडचण आलीच, तर वृंदा ला फोन कर... तिला मघाशीच फोन करून तसं सांगून ठेंवलंय मी..."

मी," छान...काय काय सांगितलंस तूं वहिनी ना ?"

श-या पांठीवर थांप मारत म्हणाला," कांही नाही रे...वृंदा ला सांगून ठेंवलंय की नाना वर जर फांसावर चंढायची वेंळ ओंढवलीच, तर ताबडतोब त्याच्या घरीं धांव, आणि काय असेल तें रामायण- महाभारत निस्तर म्हणून ...!!!...ही: ही: ही: ही: ..."   

शरदरावांचा निरोप घेऊन मी गाडी हाणत घरून निघाल्यापासून पन्नास एक मिनिटांनी कसाबसा परत घरीं पोंचलो...

निरंजन आणि वातदान पुन्हां घांसून पुसून चकाचक करून त्यात वात-तेल वगैरे घालून परत देवघरांत ठेंवून दिलं न दिलं, तोंच दरवाज्याच्या घंटी चा गजर झाला, आणि सौ. इंदिराजी नी घरात पदार्पण केलं... ... ...

 


माझा चेहरा आपोआप साळसूद झाला...," आलात ?...या... काय म्हणतायत सासूबाई ?"

सौ. इंदिराजी जरा दम घेत सोफ्यावर बसल्या," ठीक आहे सगळं...जरा दम्या नं उचल खाल्ली होती...आतां बरी आहे ती...तुम्हांला कां घेऊन आले नाही म्हणून विचारत होती मला... ..."

मी," ठीकाय...पुढच्या आठवड्यात मी त्या बाजूला जाणार आहेच, तेव्हां भेंटून येईन आई-बाबा नां..."

सौ. इंदिराजी जरा अस्वस्थ च दिसत होत्या," ...नवल आहे म्हणायचं... ..."

मी चंमकलो," कसलं काय नवल आहे ?..."

सौ. इंदिराजी," घरात तर सगळं जागच्या जागीं च दिसतंय... "

मी सावध झालो," तुम्ही घर नेहमीच हेवा करावा इतकं टापटिपीत ठेंवता...त्याचं कसलं काय नवल वाटतंंय तुम्हांला ?"

सौ. इंदिराजी," आज अगदीच पाघळायला लागलाय तुम्ही... ...कांहीतरी गडबड असणार...नक्कीच. "

मी," तुमचा संशयकल्लोळ झालाय...दुसरं तिसरं कांहीही नाही..."

सौ. इंदिराजी कांही प्रतिक्रिया न देतां शयनकक्षाकडं कपडे बदलायला गेल्या...

 

संध्याकाळचं खाणं पिणं चहा आटोपल्यावर मी मग स्नानाला गेलो... ...

स्नान बिन उरकेतोंवर सौ. इंदिराजी नी मातोश्रीं च्या आरती चं तबक तयार करून ठेंवलेलं होतं... ...

मी त्या गांवचा नसल्यागत आव आणून कपाळीं नाम रेंखला, आणि कुंकवा चा करंडा ठेंवायला देवघराकडं गेलो...

आणि जागच्या जागीं च माझा पुतळा झाला... ...

सौ. इंदिराजी देवघरातलं निरंजन चारी बाजूनी निरखून बघत होत्या...!!!

सौ. इंदिराजी," काय हो... ..."

मी," काय म्हणताय ?"

सौ. इंदिराजी," मी म्हणतेय की हे वातदान निरंजनात हे असं चपखल सरळ उभं कसं काय बसतंय ?"

मी चेहरा आणखीनच साळसूद केला," सरळ झालं तें ?... ...जगदंब जगदंब..."

सौ. इंदिराजीं चे डोळे आतां अचानक वांसले, अन् माझ्याकडं वळत मग बारीक झाले," मातोश्रीं नां कश्याला ओंढताय यात ?...मी विचारतेय की हे वातदान निरंजनात आतां सरळ उभं च्या उभं कसं काय बसतंय म्हणून...तिरकं बसत होतं ना तें ?...काय ?"

मी कांखा वर केल्या," तुका म्हणे..."

सौ. इंदिराजी," हं म्हणा एकदाचं ' तुकोबां ' ना काय म्हणायचंय तें... ..."

मी, दुसरी ओंवी ठोंकून दिली ...

 " तुका म्हणे पूजा साधन | बैसे तिरके निरंजन

      कलत्राच्या डोंळां अंजन | नेटके होतां  ||  "

सौ. इंदिराजी," वा...वा...वा...छा ऽ ऽ ऽ न... ...बरेंच मुरलेले दिसतायत तुकोबा तुमचे...काय ?...ज्याला अंजन - म्हणजे काजळी- धंरत नाही, तें निर् अंजन...म्हणजेच निरंजन...होय ना? "

मी चेहरा तसा च मख्ख ठेंवला," अगदी बरोबर बोललात..."

सौ. इंदिराजी मग निरंजनाकडं बोंट रोंखून गरजल्या," ह्या त नसलेलं अंजन डोंळ्यांत जाऊन आतां टक्क उघडलेत डोळे माझे !!...समजलात ?... कुठं गेला होतां मी बाहेर पडल्यानंतर ?...ऑं ?"

वा-याची दिशा हेंरून मी तोंड गप्प च ठेंवलं...

सौ. इंदिराजी या चुकून एल. आय. सी. त नोकरीला लागल्या...खरं तर त्या आय. बी. , सी. बी. आय. , ई. डी. अश्या कुठल्यातरी तपास खात्याच्या संचालक व्हायच्या पात्रतेच्या आहेत...!!  

त्या मग माझ्या कार्यशाळेत गेल्या...

तिथं मेजावर पडलेला माझा भ्रमणध्वनि उचलून त्यावर त्यांनी कांहीतरी खुडबूड केली, आणि मग कुठंतरी फोन लावला," नमस्कार भावजी...मी सुमीता बोलतेय..."

भ्रमणध्वनीतनं पलीकडच्या बाजू नं शरबांचा च बारीक आवाज आला... ... !!! ," नमस्कार...बोला सुमा वहिनी...काय म्हणताय ?...आत्तां कशी काय आंठवण काढलीत ?...नाना बरा आहे ना ?"

मी आतां कपाळाला हात  लावला...!!

सौ. इंदिराजी," नाना बरे आहेत तुमचे... ... मला असं सांगा भावजी..."

शरबा," काय हंवय तुम्हांला ?"

सौ. इंदिराजी," अहो, तें धारवाल्यांकडं चाकू-सु-यां ना धार लावायचं यंत्र असतं ना?...तसलं यंत्र असेलच ना आपल्या कारखान्यात ?...स्वयंपाकघरातल्या चार पांच सु-या ना, जरा बोथट झाल्यायत, म्हणून विचारतेय... "

सौ. इंदिराजी च्या गुगली वर शरबां चा सफाचट् त्रिफळा उडाला ,"...हो...आहे की सुमा वहिनी...नाना ला द्या पांठवून काय असतील नसतील त्या चाकू सु-या घेऊन...देतो धार लावून लगेच...त्यांत काय एव्हढं ?"

सौ. इंदिराजी," छान...देते पांठवून सु-या ह्यांच्याबरोबर...पण मला तुमचं तें यंत्र परत एकदां जरा निरखून बघून एक सांगा भावजी..."

श-या," कसली माहिती हंवीय तुम्हांला यंत्र बघून...? "

सौ. इंदिराजी," त्याचं काय झालं भावजी...अहो गेल्या खेपेला घरीं दारावर आयताच एक फिरस्ता धांरवाला आला होता...त्याच्याकडनं मी सु-यां ना धारा लावून घेतल्या बघा...तर कुठल्याच सुरी नं कांदा धंड कापेच ना..."

श-या," बरं बरं...मग ? "

सौ. इंदिराजी," तें धारवाल्याला दाखवलं, तर मेल्यानं दांत काढत सांगितलं, की नुकती च एका पितळी चाकू ला धांर लावून दिलीय...त्यामुळं यापेक्षां आत्तां तरी ज्यास्त धार लागणार नाही म्हणून...बरं पैसेही मी आधीच देऊन बसलेले होते हो...मग काय करणार ?...बसले वापरत सु-या तश्याच...म्हणून तुमचं यंत्र परत एकदां नीट बघून त्यावर तुमच्या कामगारांपैकी कुणी पितळेचं कांही नुकतंच घांसलंय बिसलंय काय, तें मला सांगतां कां जरा ? "

श-या पण इंदिराजींच्या च पठडीतला...," हो...हो...बघून अर्ध्या एक तासांत फोन करतो तुम्हांला वहिनी..."

," ठीकाय भावजी...पण आंठवणीनं फोन करा...विसरूं नकां बरं का..." म्हणत सौ. इंदिराजी नी भ्रमणध्वनि जंवळच्या चौपाईवर ठेंवला...

आणि मला कोंपरांपासून हार जोडत बरसल्या," बाई...बाई...बाई...हद्द झाली तुमची आतां... ...अहो देवघराच्या सोंवळ्याची-पावित्र्याची कसली कांही जाणीव-समज आहे की नाही हो तुम्हांला ?...ऑं ?...मला वाटत होतंच, की एखादा तासभंर जरी गेले ना आईकडं मी, की लगेच तुम्ही हे...हे...हे...असले कांहीतरी विध्वंसक उपद्व्याप करून ठेंवणार म्हणून... ...अहो वातदान जरासं तिरकं बसतंय निरंजनात, म्हणून देवघरांत ठेंवलेलं निरंजन कुणी कारखान्यात नेईल काय घांसून बसतं करायला?...काय चाललंय काय हें तुमचं माझ्या घरात ?...ऑ ? "

मी," मग काय करूं ?...नवं मोठ्या घाटाचं निरंजन आणायला तर तुम्ही अजिबात तयार नाही...म्हणून मग..."

सौ. इंदिराजी आतां ज्यास्तच भंडकल्या," म्हणून मग हे वातदान भावजीं च्या कारखान्यात नेऊन ग्राइंडर वर घांसून बारीक करून आणलंत... ...होय ना ?"

मी," तुका म्हणे..."

सौ. इंदिराजी," हं बरळा काय त्या तुमच्या गाथेतल्या ओंव्या...माझ्याशिवाय आहे कोण दुसरं तिसरं त्या ऐकायला ?"

मी, " तुका म्हणे फुटतां | कल्पनेसी पंख

          काय करी शंख | अर्धांगी चा ? "

सौ. इंदिराजी आतां मातोश्रीं च्या मखराकडं वळल्या  ," छान...ऐकताय ना तुमच्या लेका चे प्रताप ? "

मग माझ्याकडं त्या ' मुल्क-ई-मैदान ' चा मोर्चा फिरला," मातोश्री नी तुम्हांला नकोत असल्या- नकोत इतक्या वळ्या पाडून मेंदू दिलाय, म्हणून तुमच्या टाळक्यातनं असल्या दळभद्री कल्पना उगम पावतात...समजलं ?...आतां तो मेंदू पण भावजींच्या कारखान्यात घेऊन जा एकदा, आणि ग्राइंडरवर घांसून त्याला पार गुळगुळीत करून आणा, म्हणजे मी तरी सुटेन एकदाची...!!! ...काय ?"

तेंव्हढ्यात माझा भ्रमणध्वनि खंणाणला... ...

सौ. इंदिराजी नी त्याला हात लावायच्या आंत मी च चपळाई करून तो उचलला...पलीकडनं श-याचा घोगरा आवाज आला,"नाना...तूं च बोलतोयस ना ?"

मी," होय...मी च बोलतोय... ..."

शरबा," जगबुडी ची घटका भंरलीय नाना...ताबडतोब वृंदा ला फोन कर...ती घरीं च आहे...!!"

आणि मी कांही बोलायच्या आंत च शरबा संधान खण्डित करून मोकळे झाले... ...!!!

 

मी लगोलग सौ. वृंदा वहिनीं च्या भ्रमणध्वनि चा नंबर लावला... ...

सौ. वृंदा वहिनी," काय म्हणताय भावजी ?... असा अचानक फोन ?... ...काय झालंय ?"

मी," जगबुडी ची वेंळ पातली...जमेल काय लगेच घरीं यायला ?"

सौ. वृंदा वहिनी," हे काय विचारणं झालं भावजी?... येते दहा मिनिटांत...मी जामानिमा करून तयारच आहे निघायला... ...पण..."

मी," पण...काय वहिनी ?"

सौ. वृंदा वहिनी," मी तिथं थंडकेतोंवर आमच्या ' मुलुख मैदान ' समोर टिकाव लागेल ना तुमचा ?...की पानिपतावरचा हुतात्मा होणाराय ?"

मी," बहुधा तशी च लक्षणं दिसायला लागलीयत मला... ..."

सौ. वृंदा वहिनी," असं आहे होय सगळं ?...तर मग एक करा ताबडतोब..."

मी," काय करूं ?"

सौ. वृंदा वहिनी," घरा चा दरवाजा उघडा लगेच...मी दरवाज्याबाहेर च उभी आहे... ...!!!"

शरबा-वृंदावहिनी च्या समयसूचकतेला, कपाळाला हात लावून दाद देत मी घराचा दरवाजा उघडायला धांवलो...!!!

भाऊ - भावजय असावेत तर असे...!! ...काय ?

 

***************************************************************************************

-- रविशंकर.

   ८ जून २०२३.  


  


 

  

 

   


  

 


 

   

    

  

     


 

  

  

      

            

















 

No comments:

Post a Comment