Search This Blog

Wednesday 26 April 2023

|| इंदिराजीं चं ' डायरॅक डेल्टा ' ||

|| इंदिराजीं चं ' डायरॅक डेल्टा ' ||

 

 ,” नाना...अरे ह्या व्होल्टेज च्या समीकरणाचं डेरिव्हेटीव्ह जर काढलं, तर या गणिताचं उत्तर काढतां येईल की नाही ?...” माझा मित्र शरद ऊर्फ श-या दातार चहाचा कप उचलून तोडाला लावूीत, आम्हां दोघांच्या मध्ये चहा-मेजावर ठेंवलेल्या कागदावरच्या किचकट आकृति वर बोंट ठेंवीत त्रासिकपणे विचारता झाला... ...”

 

दोन हजार सालातल्या दिवाळीतली ती एक प्रसन्न सकाळ होती... ...माझा लंगोटीयार शरद ऊर्फ श-या दातार आणि त्याच्या सौ. वृंदा वहिनी हे दांपत्य आमच्या घरीं दिवाळीतला फराळ करायला आलेलं होतं . शरदराव हे वाहन उद्योग संबंधित विद्युत् अभियांत्रिकीतले तद्न्य ... साहजिकच अवांतर गप्पाटप्पा झाल्यावर मग त्या व्यावसायिक समस्याकडं सरकल्या होत्या, आणि शरदरावांना आलेल्या एका समस्येवर त्यांचं-माझं खलबत रंगलेलं होतं... ...

 

मी,” तसं करून कसं काय उत्तर कांढतां येईल ?...”

-या,” कां नाही कांढतां येणार ?”

मी,” हे बघ श-या...प्रमाणबध्द बदलांचं हे समीकरण मांडून वास्तवात क्षणार्धात अफाट बदलणार-या व्होल्टेज चं उत्तर तुला कसं काय कांढतां येईल ?”

-या,” .... ....s s s s s ?”

मी,” त्यासाठी तुला व्होल्टेज च्या ' डायरॅक डेल्टा ' कार्मिका चं समीकरण मांडून त्यावर गणिती प्रक्रिया करावी लागेल... ...”

-या नं आतां कपाळाला हात लावला ,” आतांपावेतों माझं सगळं कॅलक्युलस गळगुळीत झालंय... ...तेव्हां आतां हें सगळं तूं च निस्तर... ...आणि...”

मी,” आणि मला आज संध्याकाळच्या आंत ह्या उच्च विद्युद्दाबाच्या तारांच्या वेटोळ्याला किती वेढे मारावे लागतील, तेंव्हढं सांग...बरोबर ?”

-या,” कसं अगदी मनातलं बोललास माझ्या ?... रात्रीं दहा अकरा वाजतां दूरध्वनि करतो तुला... ...काय ?”

मी कपाळाला हात लावत म्हणालो,” हे...हे म्हणजे परत ' बॅक् टु कॉलेज ' चाललंय म्हण की तुझं... ...मी बसतो डोकं खांजवत, आणि तूं फीर गांवभंर फंक्या मारत... ...काय ?”


माझ्या विधानाला लगोलग वृंदावहिनींनी फोडणी मारली ,” अगदी बरोबर बोललात भावजी तुम्ही... ...ह्यां चं ना... ...सदा न् कदा असं च असतं बघा... ...दुस-यांना लावायचं कामाला, म्हणजे हे गांवभंर फक्या मारायला मोकळे... ...!! “

इतका वेळ एखाद्या न्यायाधीशाच्या थाटात सगळं मख्ख चेंह-यानं शांतपणे ऐकत बसलेल्या सौ. इंदिराजी नी आतां अचानक तोंड उघडलं,” हे बरं आहे हं तुझं वृंदे...चोराच्या उलट्या... ...”

सौ. वृंदावहिनी,” काय ?...काय म्हणायचंय तुला सुमे ?... ...?”

सौ. इंदिराजी नी आतां वृंदावहिनीनां च चितपट टांग मारली,” काय गं...भावजी कॉलेजात असतांना फक्या मारत गांवभंर फिरायचे, म्हणून तर भेंटले ना तुला ?... ... काय ?...आणि त्यानंतर भावजी बरोबर फंक्या मारत तूं पण फिरत होतीस ना गांवभंर ?... ...त्याचं काय ?”

शरदराव आतां सौ. इंदिराजी नां फा ऽ ऽ ऽ ऽ डकन् टाळी देत बत्तिशी विचकून फीः फीः फीः करायला लागले... ...!

आणि सौ. वृंदा वहिनी नीं बोलती बंद होत कपाळाला हात लावला...!!


शरदराव मग आमचा निरॊप घेऊन निघण्यासाठी चुळबुळ करायला लागले, अन् वृंदावहिनीनीं अचानक मला विचारलं ,” भावजी...एक विचारूं काय तुम्हांला ?”

मी,” विचारा की बेशक...त्यात काय एव्हढं ?”

,” मला असं सांगा...”,सौ. वृंदावहिनी श-याकडं बघत म्हणाल्या...

-या,” हं... ...विचारा काय विचारायचं तें नाना ला... ..." ," नाना...बहुधा ' माझं कडबोळं नेमकं कश्यात झालं होतं ?’...ही च खंवचट उत्सुकता असणारपण हिला...काय ?”

सौ. वृंदावहिनी आतां सूचक हंसत माझ्याकडे वळल्या,” नाना...तें आत्तांच तुम्ही ह्यांना ' डायरॅक बियरॅक ' असलं कांहीतरी सांगत होता ना... ...ती गोची म्हणजे नेमकं काय असतं हो ?”

आतां शरदरावानीं नी त्यांचं खंवचट तोंड घडलं ,” छान...छान...हा नाना आतां विवेचन करणार, आणि आमच्या ' ह्या ' ना तें समजणार...! सगळाच आनंद... ...सुमावहिनी , तुम्ही आतां रात्रीच्या भोजनाच्या तयारीला लागा....!!...काय ?”

असली संधी दंवडतील, तर त्या आमच्या इंदिराजी कसल्या ?...,”अगदी बरोबर बोललात भावजी...ह्यां नी एकदां कां आ केला ना, की तुम्हांला आतां निघायला बहुतेक रात्र च होणार...!!...तेव्हां मी रांधायला लागतेच कशी...” असं म्हणत सौ. इंदिराजी नी स्वयंपाकघराकडं डुलत डुलत प्रस्थान केलं... ...

तुम्ही गप्प बसा हो मुकाट... ...म्हणे मला काय समजणार...मुळात तुमच्या च टाळक्याला मुंग्या आल्या , म्हणून तर आलोय ना आपण इथं ?... ...काय ? नाना कुठलीही गोष्ट अगदी छान सोप्पी करून सांगतात... "

-या ला असं ठंणकावून वृंदावहिनी नी खुर्चीत जरा पुढं सरसावून बसत मला इशारा केला,”...तुम्ही नकां लक्ष्य देऊं ह्यां च्या कुजकटपणाकडं नाना... ... हं सांगा आतां...काय असते ही ' डायरॅक ' भानगड ?“


सौ. वृंदावाहिनी ह्या मुळात कलाशाखेच्या विद्यार्थिनी... ...त्यानां हे गणितातलं लचांड सुगम करून कसं काय सांगायचं ? असा भुंगा माझ्या डोंक्यात भुणभुणायला लागला... ...कांही व्यावहारिक संकल्पनाच कामाला लावाव्या लागतील, ही खूणगांठ मनाशी बांधून मी तोंड उघडलं ,” असं बघा वहिनी... ...शालांत परीक्षेर्यंत तुमचं बीजगणित झालेलंच आहे , आणि तुम्हांला तें चांगलं अवगत होतं...त्यामुळं तुम्हांला मी आतां जे कांही सांगणार आहे, तें समजायला कांही कठीण पडणार नाही...

असं बघा, की शालांत बीजगणितापुढच्या उच्च गणितात ' कॅलक्युलस ' नांवाचा जो एक प्रकार असतो, त्यातली ही एक भानगड आहे, इतकंच...काय ?”

सौ. वृंदावहिनी ,” कॅलक्युलस...म्हणजे हे कसलं वेगळं बीजगणित असतं काय ?”

मी,” कॅलक्युलस म्हणजे व्यवहारातल्या प्रक्रिया - ज्यांची अचूक समीकरणं मांडतां येत नाहीत – त्यांची जवळपासच्या अंदाजांची समीकरणं मांडून त्यावरून अचूक उत्तरं काढायच्या प्रणालीं चं प्रगत बीजगणित असं ढोबळमानानं म्हणतां येईल.... ...”

सौ. वृंदावहिनी ,” अय्या...गंमत च आहे की ही... ...समीकरणं अंदाजांची, पण उत्तरं मात्र अचूक... ...असं कसं होईल ?”

मी,” त्याचं काय होतं की कॅलक्युलस मध्ये मांडलेल्या अंदाजे समीकरणातल्या अवलंबित अव्यक्तां च्या - म्हणजेच ज्याला इंग्रजीत आपण ' डिपेंडं व्हेरिेएबल् ' म्हणतो, त्यांच्या किंमती अचूक काढायच्या गणिती प्रक्रिया आहेत , ज्यांना ' मर्यादा सिध्दांत ' किंवा ' लिमिट थिअरी ' असं म्हणतात...त्यामुळं तें शक्य होतं... ...”

सौ. वृंदावहिनी ,” म्हणजे नेमकं काय ?...एखादं उदाहरण देऊन सांगतां येईल ?”

मी,”...आपण एखादं साधंसुधं उदाहरण घेऊं... ...समजा एखादं समीकरण असं आहे...


= क्ष वर्ग / ( क्ष – १ ) ठीकाय ?”


सौ. वृंदावहिनी ,” हं...हं...”

मी,” तर या समीकरणात ' क्ष ' च्या निरनिराळ्या किंमती घातल्या, तर त्यांच्याशी संबंधित ' ' च्या किंमती मिळतील...बरोबर ?”

सौ. वृंदावहिनी ,” एकदम बरोबर... ...”

मी,” आतां मला सांगा...की यात ' क्ष ' ची किंमत जर १ असेल, तर ' ' ची किंमत किती येईल ?”

सौ. वृंदावहिनी ,” म्हणजे बघा...१ चा वर्ग १, भागिले (१ उणे १ )... म्हणजेच १ भागिले शून्य... ...हें कसं काय सोडवणार भावजी ?...शून्या नं भागल्यावर ' ' ची किंमत अगणित येईल... ...”

मी,” आणि असल्या अगणित किंमतीचा प्रत्यक्ष्य वास्तवातल्या समस्या सोडवायला कांही उपयोग नसतो... ...होय ना ?”

सौ. वृंदावहिनी ,” अगदी बरोबर बोललात भावजी...मग काय करतात ?”

मी,” आतां असं समजा , की नेमक्या १ च्या ऎवजी आपण जर ' क्ष ' च्या , १ च्या अगदी निकटच्या - म्हणजेच १ अधिक तसूंभंर आणि १ उणे तसूभंर - अश्या दोन किंमती ह्या समीकरणांत घातल्या , तर तें सोडवून ' ' च्या संबंधित दोन किंमती काढतां येतील की नाही ?...त्या कांही अनंत-अगणित नक्कीच असणार नाहीत... ...फार फार तर अवाढव्य असतील इतकंच ...

सौ. वृंदावहिनी ,” अय्या ऽ ऽ ऽ ऽ ....किती मजेशीर आहे ना हे सगळं... ...?"

मी,” तर गणिती लोक मग नेमकं हें च करतात...”

सौ. वृंदावहिनी ,” पण नाना...तुम्ही सांगताय तश्या ' ' च्या काढलेल्या किंमती या ' क्ष ' च्या नेमक्या १ या किंमतीशी अर्थातच संबंधित नसणार... ...मग ती ' य ' ची नेमकी किंमत कशी काढतात ?”

मी,” असं बघा वहिनी...की मी जसं आत्तांच सांगितलं, तश्या ' ' च्या काढलेल्या दोन किंमतीही अर्थातच ' क्ष ' च्या १ किंमतीशी संबंधित असलेल्या ' ' च्या अचूक किंमतीच्या अलिकडच्या - पलीकडच्या अश्याच असणार , आणि हंवी असलेली नेमकी ' ' ची किंमत या दोन्हीच्या मध्ये कुठंतरी असणार... ...होय की नाही ?...ती मग कॅलक्युलस मधल्या कांही गणिती प्रक्रिया वापरून काढली जाते... ..."

सौ. वृंदावहिनी ,” बरं...बरं...तर असं आहे हे सगळं लचाण्ड एकूण... ...पण नाना... ...वास्तवात ही अशी अगणित किंमत असणारं कुठं काय असतं हो ?”

मी,” असतं तर... ...आतां असं बघा...की आपल्या घरात जे दिवे लागतात ना, तें त्यांना जोडलेल्या विद्युद्वाहिन्यातनं, म्हणजेच तारांतनं विद्युत्प्रवाह वाहत असतो, म्हणून उजळतात... होय की नाही ?”

सौ. वृंदावहिनी ,” अगदी बरोबर...”

मी,” तर होतं काय, की ही सगळी विद्युद्यंत्रणा - अगदी महानिर्मितीच्या जनित्रापासून ते आपल्या घरातल्या विद्युदुपकरणांपर्यंत – सगळं सुरळीत चालूं असतांना एका विशिष्ठ स्थिर अवस्थेला पोहोचलेली असते... ...जेव्हां वीज पुरवठा खण्डित होतो, तेव्हां तिला पहिला - तुम्ही आत्तांच म्हणालात तसा - प्रचंड विद्युद्दाबाचा दंणका बसतो , आणि जेव्हां वीज पुरवठा पुन्हां सुरूं होतो, त्या क्षणाला परत एकदां या यंत्रणेला तसाच कांहीसा दुसरा दणका बसतो... ...”

सौ. वृंदावहिनी ,” काय हो नाना... ...गेल्या महिन्यात आमचा मिक्सर जळाला बघा... ...तेंव्हांही वीज पुरवठा अचानक खण्डित झालेला होता... ...तुम्ही आत्तां म्हणालात, तसंच कांहीतरी झाल्यानं तर तो जळाला नसेल ?”

मी,” अगदी बरोब्बर ओळखलंत तुम्ही वृंदावहिनी... ...त्यामुळंच तो जळाला... ...”

आतां दुस-या चहाचे कप घेऊन आलेल्या सौ. इंदिराजीं चं तोंड सुटलं,” जळ्ळे मेले हे महापारेषणवाले... ...सगळं खा खा खाऊन संपवलंय... ...दर आंठवड्याला इकडं घरगुती विजेचे दर वाढवत सुटलेत, आणि तिकडं स्वतःशी संबंधित टग्या शेतक-यांची करोडोंची देयकं हे नालायक राजकारणी माफ करत सुटलेत... ...भिकारडे लेकाचे... ...!!! “

," तूं जरा थांब गं सुमे... ...नाना कांहीतरी मस्त सांगतायत...जरा ऐक तूं पण...हं सांगा नाना पुढं... ...”

मी चहाचा कप तोंडाला लावला,” तर आतां असं समजा वहिनी, की मला अश्या विद्युद्धक्कयापासून विजेची उपकरणं सुरक्षित ठेंवील, असं एखादं विजेचं उपकरण घरगुती ग्राहकांसाठी बनवायचंय... ...तर मला अश्या आडमाप विद्युद्धक्कयांच्या किंमतींची च समीकरणं मांडून तीं सोडवावी लागतील ना ?... ...”

सौ. वृंदावहिनी ,” अगदी बरोबर नाना... ...आतां आलं लक्ष्यांत थोंडंसं... ...”

मी,” तर तुमच्या तल्लख यजमानांची इथंच थोडीशी गडबड झालेली होती...जीवर आमचा मघांशी खल चाललेला होता... ...आतां आलं लक्ष्यांत सगळं ?”

सौ. वृंदावहिनी ,” आलं...आलं...पण तुमचं मघाशी ते जे ' डायरॅक कांहीतरी ' चाललेलं होतं, तें काय ?...आणि त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध ?”

मी,” सांगतो... ...असं बघा की मघांशी जे 'क्ष ' आणि ‘ य ' चं समीकरण तुम्हांला सांगितलं ना नमुन्यादाखल , त्यात काय होतं ? तर ' ' ची किंमत ' क्ष ' च्या पदावलीत लिहिलेली होती... ...बरोबर ?”

सौ. वृंदावहिनी ,” होय...बरोबर. “

मी ,” यालाच कॅलक्युलस मध्ये ' ‘ ' हें ' क्ष ' या अव्यक्ताचं कार्मिक म्हणजेच इंग्रजीत ' फंक्शन ' आहे असं म्हणतात , णि समीकरणाच्या उजव्या बाजूला त्या कार्मिकाची व्याख्या असं म्हणतात... ...हे विधान इंग्रजीत y = f ( x ) असं चिन्हांकित भाषेत लिहिलं जातं... ...किती सुटसुटीत आहे ना ही पध्दत ? “

सौ. वृंदावहिनी ,” आहे तर... ...म्हणजे मराठीत बोलायचं तर ...

= ( क्ष ) म्हणजेच य = फ गुणिले क्ष... ...बरोबर ?”

मी ,” नाही नाही...तसं नाही... ...”

सौ. वृंदावहिनी ,” मग ?... ...बीजगणितात तर असंच असतं ना सगळं ?”

मी ,” कॅलक्युस च्या परिभाषेत y = f ( x ) या विधानाचा अर्थ ‘ ' वाय् ' हे ' एक्स ' या अव्यक्ताचंं एक कार्मिक आहे ' इतकाच होतो... ...ती एक्स ची पदावली कांहीही असूं शकते...म्हणून या समीकरणावर जर कांही गणिती प्रक्रिया करायच्या असतील, तर यातल्या f ( x ) ची व्याख्या सर्वप्रथम मांडावी लागते...उदाहरणार्थ मघांच्या समीकरणातली उजवी बाजू क्ष वर्ग / ( क्ष – १ ) वगैरे... ...मग तीवर हंव्या त्या सगळ्या गणिती प्रक्रिया करतां येतात...ही एक प्रकारची ' शॉर्टहॅण्ड ' लिपी अहे असं समजा थोडक्यात... ...इथपर्यंत कळलं सगळं ?”

सौ. वृंदावहिनी ,” हो हो...कळलं...सांगा पुढचं...”

मी,” तर ही जी गणिती कार्मिकं असतात ना, यांचे आलेख जर काढून बघितले, तर खूपच मजेशीर दिसतात...कांहीं संथ लाटांसारखीं वरखाली होणारीं असतात... ...

 

 

 

तर कांही आमटीच्या उताण्या वाडग्यासारखीं...

 

 

 

कांही पालथ्या वाडग्यासारखीं पण असतात, तर कांही छत्तीसचा आकडा असलेल्या नवरा-बायकोसारखे परस्परांकडं पांठ करून असलेले वाडगे... ...”

 


 

सौ. इंदिराजी फक्त सूचक हंसल्या... ...!!

मी,” कांही कार्मिकं पुलांच्या कमानींच्या माळेसारखीं दिसतात...त्यांना ' सायक्लॉईड ' असं म्हणतात... ...

 


 

या कार्मिकाशी तर इतके गणिती आजतागायात झोंबलेले आहेत, की शेंवटी लोक त्याला ' हेलन ऑफ जॉमेट्री ' म्हणून संबोधायला लागले... ..." 

सौ. वृंदावहिनी ,”इश्श्य... ...म्हणजे हें असले झोंबाझोंबी चे चावट प्रकार गणिती लोक पण करतात काय ?” 

सौ. इंदिराजी,” मग ?... गणिती काय अन् अभियंते काय ... ...सगळे एकाच माळेचे मणि !!...ते सरळ असतात असं वाटतं की काय तुला वृंदे ? ... व्यवहारी भाषेत त्यांना ' भौतिक जगातनं उठलेलीं माणसं ' असं म्हणतात... ...बघावं तेव्हां कुठंतरी शून्यात ऊर्ध्व लागलेलं...!!!

सौ. वृंदावहिनी ,” तूं थांब गं सुमे रा... ...हं नाना...चालूं द्या तुमचं...”

मी ," तर कांही कार्मिकं हृदयाच्या आकाराचीही असतात...त्यांना ' कार्डिऑईड ' असं संबोधतात... ...”

सौ. वृंदावहिनी ,” म्हणजे ती हृदयाची बदामासारखी आकृति काढतात तशी ?... ...अय्या...सुमे... ... कित्ती मजेशीर रोचक आहे ना गं हे सगळं ?...हं... नाना ...सांगा पुढचं ...”

 

 मी,” आपल्या हृदयाचा स्पंदनालेख म्हणजेच ' कार्डिओग्रॅम ' जसा दिसतो ना, तशीही कांही कार्मिकं असतात, ज्यांना ' पल्स ट्रेन्स ' असं म्हणतात... ...”

 

 

 

सौ. वृंदावहिनी ,” हं...हं...”

मी,” तर अश्याच त-हेचं एक विचित्र कारमिक असतं, जे ' डायरॅक डेल्टा ' या नांवानं ओंळखलं जातं... ...हे इतकं विचित्र कार्मिक आहे , की सुप्रसिध्द गणिती ' आयझॅक न्यूटन ' नं वैतागून त्याला ' विकृत कार्मिक ' अर्थात् Perverted Function ' अशी शिवीही हांसडलेली आहे... ...”

सौ. वृंदावहिनी ,” असं ?... ...हं...बोला बोला...”

मी,” तर या ' डायरॅक डेल्टा ' ची नीट कल्पना येण्यासाठी सहारा चं सपाट वाळवंट डोंळ्यांसमोर आणा...ठीक ?”

सौ. वृंदावहिनी ,” हं...आणलं... ...”

मी,” आतां या सहारा वाळवंटातला कुठलाही एक बिंदु आपण आरंभबिंदु म्हणून गृहीत धंरूं या... ...तुमच्या आलेखात जसा असतो ना, तसा...ठीकाय ?”

सौ. वृंदावहिनी ,” ठी ऽ ऽ ऽ ऽ काय... ...धंरला...”

मी,” आतां या आरंभबिंदूवर च अगणित उंचीचा ' आयफेल टॉवर ' किंवा ' कुतुबमिनार ' असं कांहीतरी बांधलंय अशी कल्पना करा...”

सौ. वृंदावहिनी ,” हं...केली... ...”

मी,” आतां कोणत्याही ' डायरॅक ड़ेल्टा ' कार्मिकाचा त्रिमिती आलेख जर आपण काढला, तर त्याचं चित्र हूबेबूब या वाळवंटात उभ्या असलेल्या कुतुब मिनार किंवा आयफेल टॉवर सारखं दिसेल... ...म्हणजे आरंभबिंदू व्यतिरिक्त इतर कुठल्याही बिंदूवर या कार्मिकाची उंची शून्य , तर आरंभ बिंदूवर ती अगणित... ...

 

 

 

आणि याची दुसरी गंमत अशी, की या ' आयफेल टॉवर ' किंवा ' कुतुबमिनार ' च्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ कांहीतरी वास्तविक असतं, आणि ते गणितानं कांढतांही येतं, पण त्याचं घनफळ जर आपण काढायला गेलो, तर तें मात्र शून्य येतं... ... ”

सौ. वृंदावहिनी आतां तोंडाला रुमाल लावून फिदी फिदी हंसायला लागल्या... ... ...

आणि शरदरावांचा पारा चंढला ,”फिदी फिदी दात काढायला काय झालं तुम्हांला... ...?”

सौ. वृंदावहिनी ,” खीः खीः खीः खीः ... नाना... ...अहो तुम्ही नेमकं ' ह्यां ' चं च हुबेहूब वर्णन केलंत की... ...' म्हणजे...घरात आयफेल टॉवर - कुतुब मिनार एव्हढ्या तोंडगप्पा , तर घराबाहेर सगळीकडं सपाट मैदा... ...!!...नुस्त्याच फंक्या मारत गांवभंर फिरायचं... ...!!!... ...हीः हीः हीः हीः हीः ... “

सौ. वृंदावहिनीं चा तो चौकार बघून आतां मलाही फीः फीः फीः फीः व्हायला लागलं... ... ...

इतका वेळ मख्ख चेंह-यानं सगळं कथा-पुराण ऎकत बसलेल्या सौ. इंदिराजी नीं आतां माझ्या प्रवचनाचं पारणं फेंडायला निर्णायक तोंड उघडलं ,” नशीबवान आहेस तूं वृंदे... ... ...”

सौ. वृंदावहिनी चंमकल्या ,” खीः खीः खीः ... काय म्हणायचंय काय तुला सुमे नेमकं ?”

सौ. इंदिराजी अस्मादिका कडं निर्देश करीत उत्तरल्या,” असला ' बावन्नकशी डायरॅक डेल्टा ' तुझ्या पदरात पडला नाही म्हणून...!!

मी आतां वैतागलो,” का ऽ ऽ ऽ य?...काय म्हणायचंय तुम्हांला ?”

सौ. इंदिराजीं च्या अंगात त्या दिवशीं बहुधा सचिन तेंडुलकर संचारलेला असावा... ...

तसा सौ. इंदिराजीनी माझ्याकडं निर्देश करून पहिला षट्कार मैदानापार ठोंकला ,” म्हणजे घराबाहेर सगळं गुळगुळीत तर आहेच...ही पहिली चंपखल जुळणारी गोष्ट ..."

आतां शरदरावांनी परत एकदां कान टंवकारले....

माझं ' पानिपत ' व्हायला घातलेलं आहे, असा वास त्यांना लागलेला असावा...त्यांनी साळसूद चेहरा करीत बत्ती ला पलिता लावला," काय बोलताय काय हे वहिनी तुम्ही...?"

सौ. इंदिराजी नीं आतां लागोपाठ मैदानापार षट्कारांवर षट्कार ठोंकायला सुरुवात केली... 

," भंरीला घंरातला आयफेल टॉवर ' पण जमिनीखाली उलटा बांधलेला आहे... ...!!! “

 श-याला आतां उकळ्या फुटायला लागल्या," एक्झॅक्टली ...हीः हीः हीः हीः... क्या बात है सुमावहिनी ... ...! बहोत खूब...बहोत खूब...!! या घरातल्या उलट्या ' आयफेल टॉवर ' ला च तुम्ही ' नस्त्या उचापती ' म्हणत असतां ना ?... ...!!!...काय ?” 

,” तेंव्हढ्यावरच कांही भागलेलं नाहीय भावजी " ... ...सौ. इंदिराजी माझ्याकडं निर्देश करीत बरसल्या ," आमच्या ह्यां चा ' उलटा न्यूटन ' पण झालेला आहे... ...!! "

शरदरावां चा चेहरा आतां आणखीच निरागस झाला," म्हणजे हो वहिनी ?" 

सौ. इंदिराजी," म्हणजे असं, की ' लहान मांजरासाठी लहान, आणि मोठ्या मांजरासाठी मोठं भोंक ' एव्हढं च समजतंय... ...!!

बाकी माठ आणि पोकळ्यातला फंरक पण समजत नाही... !!!... 

नस्ते उपद्व्याप मात्र उलट्या ' आयफेल टॉवर ' एव्हढे... !!!!...काय ?”

श-या," ख्याः ख्याः ख्याः ...एकदम कडक...सुमावहिनी ..."

आतां सौ. वृंदावहिनीं चं पण कळत नकळत खूः खूः खूः व्हायला लागलेलं होतं....तरी बिचा-या माझा कैवार घ्यायला  धांवल्या," सुमे...कांहीतरीच बोलूं नकोस बरं तूं....मला असं सांग..."

सौ. इंदिराजी मख्ख च," काय सांगूं तुला ?"

सौ. वृंदावहिनीनीं आतां त्यांचा हुकुमी एक्का बाहेर काढला," मला असं सांग सुमे...की हे सगळं तुला ठाऊक असूनही तूं भावजीनां माळ कशी काय घातलीस म ऽ ऽ ऽ ग...?"

सौ. इंदिराजी माझ्याकडं निर्देश करीत उत्तरल्या," हे ' अस्सल डायरॅक डेल्टा ' कार्मिक आहे, हे गृहप्रवेशानंतर मला कळलं वृंदे...तोंपर्यंत..."

सौ. वृंदावहिनी," तोपर्यंत...काय ?"

सौ. इंदिराजी," तोपर्यंत तें ' कार्डिऑईड ' सारखं दिसत होतं...!!! ...समजलं ?"

श-या," ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ......"

सौ. वृंदावहिनींचं पण आतांपावेतों हीः हीः हीः हीः व्हायला लागलेलं होतं... ...तरी त्यांनी तेंही कसं बसं आंवरून धंरलं...

सौ. इंदिराजी अजून निर्विकारच होत्या ," तर हा विषय आज निघाला, तें फार बरं झालं बघ वृंदे... ..."

सौ. वृंदावहिनी," कां गं ?"

सौ. इंदिराजी," अगं माळ घातल्यापासून आजपावेतों मी फुकटच ह्या ' डायरॅक डेल्टा ' च्या डोंक्याचं गणित सोडवत बसले होते...त्याची दर महिन्याला श्मश्रू करावी लागते... त्यामुळं त्याला कांहीतरी गण्य क्षेत्रफळ असणार, हे उघडच आहे...काय ?...पण त्याच्या घनफळाचं गणित कांही केल्या सुटत नव्हतं बघ मला..."

सौ. वृंदावहिनी," म ऽ ऽ ऽ ऽ ऽ ग ?"

सौ. इंदिराजीनीं आतां अखेरचा निर्णायक विजयी षट्कार मैदानापार ठोंकत सामना खिश्यात घातला," आतां माझा मेली चा गणिताशी आजन्म छत्तिसाचा आकडा...तर आज कसा अगदी देव पावला बघ ना... ...आणि ह्यांनी स्वतः च सांगितलं, की तें शून्य असतं म्हणून...!!!...सुटले एकदाची ...!!!! "

असला चितपट षट्कार खंणकावून सौ. इंदिराजी मख्ख चेह-यानं रात्रीच्या भोजनाची व्यवस्था लावायला स्यंपाकघराकडं चालायला लागल्या... 

आतां श-याबरोबर सौ. वृंदावहिनीही कपाळाला हात लावून ख्याः ख्याः ख्याः करत माझ्याकडं बघायला लागल्या... ...!!

आणि त्यांच्या पाठोंपाठ, पाठमो-या गजगामिनी सौ. इंदिराजी नां कोंपरांपासून नमन करीत मग मीही कपाळावर हात मारून घेतला... ...!!!


-- रविशंकर.

२६ एप्रिल २०२३.





 

 

 

 

 

No comments:

Post a Comment