Search This Blog

Wednesday 7 December 2022

|| पीयूशी ||

|| पीयूशी ||

 


 

आपल्या देशात एक घोषवाक्य खूपच लोकप्रिय आणि सरकारप्रिय ही आहे...

' मेरा भारत महान ' हे ते घोषवाक्य... ...

गंमत ही आहे, की ' मेरा भारत ' खंरोखरीच जगांत सगळ्यात भारी देश आहे, अशी माझी तरी, असंख्य नमुनेदार अनुभंव गांठीला लावल्यावर बालंबाल खात्री पटलेली आहे... ...

फार लांबचं कश्याला? या कथासंग्रहातल्या एकूणएक कथा, हे घोषवाक्य च तर अधोरेखित करीत आहेत की... ...!!

त्याचं काय आहे, की ज्या देशातल्या सरकारचा तैमूरलंग, नोकरशाही चा शिराळशेठ, आणि जनतेचा शेखमहंमद झालेला असतो ना, तो देश खंरोखरीच जगात सगळ्यात महान- भारी देश असतो, आणि अश्या देशांत कल्पनातीत गंमती-जंमती घडत असतात... ...असो.

तर गेल्या सहस्रकाच्या शेंवटच्या दशकात झालं असं की तथाकथित स्वतःला प्रगत म्हणवून घेणा-या कित्येक ' सायबां ' च्या देशांतल्या सरकारांना अचानक ' वसुंधरा तपमानवाढी ' चा साक्षात्कार झाला......

लगोलग त्यांची सरकारं, पर्यावरणवादी संघटना, राजकीय पक्षांचे राजकारणी इत्यादी मातब्बर लोकांच्या जागतिक स्तरावर बैठकावर बैठका झंडल्या. त्यात ब-याच हम-यातुम-या, तूं- तूं मी- मी, वगैरे वगैरे यथासांग पार पडून मग त्यांनी पर्यावरण जतनाची जागतिक मानकं वगैरे तयार केली, आणि त्यातनं मोठ्या चतुराईनं स्वतःला वगळून, तीं मानकं तमाम अविकसित महान देशांच्या माथीं मारलीं... ...!!

 

 

 

महान अविकसित देशांत त्याचे परिणाम काय-कसे होणार, हे ह्या सगळ्या चंगळवादी-ऐषारामी जीवनशैलीला सोकावलेल्या साहेबी देशांना बरोबर ठाऊक होतं... ...

ह्यांच्या कर्ज- मदतीवरच कारभार अवलंबून असलेल्या जगभंरातल्या भुकेकंगाल देशांना तें जोखड मानगुटीवर घेण्याशिवाय कांही तरणोपायच नव्हता... ...आपल्या महान देशांचं मग काय झालं ?

परकीयांची हुजरेगिरी करीत स्वकीयांवर वरवंटा फिरवणं हे सोप्पं तर असतंच, पण फारच सोयिस्करही असतं... ...

तो तर आपल्या महान राज्यकर्त्यांचा पिढीजात धर्म...!!!

हा धर्म हाडींमाशीं भिनलेल्या आपल्या सरकारांनी नेमकं तेंव्हढं च परमकर्तव्य इमाने-इतबारे पार पाडलं... ...

केंद्र सरकारनं तांतडीनं प्रदूषण नियंत्रण कायदा करून तो राज्य सरकारांच्या माथीं मारला...

तैमूरलंगाचाच फंतवा तो...लगोलग तमाम राज्य सरकारांतल्या तैमूरलंगांनी पण त्याची च री ओंढत तो जनतेच्या माथीं मारला... ...

झालं एव्हढंच, की सदर कायद्याची प्रत्याक्ष्यात अंमलबजावणी कशी होणार?, कुठल्या यंत्रणा तो राबवणार?, त्याचा दुरुपयोग कसा- कितपत होऊं शकेल?, आणि हा सगळा उपद्व्याप करून खंरोखंरीच प्रदूषण नियंत्रणाचं उद्दिष्ट साध्य होईल, की आणखी नवीनच समस्या निर्माण होतील ? असल्या फालतू गोष्टीं चा विचारही न करतां, आणि तो जिच्या माथीं मारलाय, त्या जनतेला तो नीट समजावून देण्याचे कसलेही कष्ट न घेतां, हे सगळं झालं... ...

आतां आपल्या महान देशांतले नेते महान, राजकारणी टगे त्यांहून महान, जहागिरदार नोकरशहा ह्या दोन्हीहून महान, आणि असल्या बजबजपुरीत सरकारी वरवंट्यांना तोंडं देत जगतांना, या सगळ्यांकडून यथास्थित टगेगिरी शिकून मुरब्बी झालेली जनता या सगळ्यांहून महान... ...!!!

तुकोबांची एक मजेशीर ओंवी आहे...ते म्हणतात,

                                     व्यवहारी शहाणपण | चुना तंबाखू मळुन |

                                     ग्रंथपण्डित विधान | चितपट मारी || 

आतां पिढ्या न् पिढ्या चुना तंबाखू मळून देशभंर पचांपचां पिचका-या मारणा-या, आपल्या भ्रष्ट मंत्र्यासंत्र्यापासून ते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या सरकारी बाबूं चे अनुभंव घेत घेत, प्रत्यक्ष्य यमराजाला सुद्धां खांदे देऊन ' राम बोलो भाई राम ' चा गजर करीत पार वैकुंठाला पोंचवील, असलं भारीपैकी व्यवहारी शहाणपण पंचवलेल्या तितक्याच भ्रष्ट जनतेला असल्या सरकारी फतव्यांचं यथास्थित श्राध्द कसं घालायचं, हे कुणी शिकवावं लागतं थोडंच ?

नेमकं तें च ह्या प्रदूषण नियंत्रण कायद्याचंही झालं... ...

दर सहा महिन्यांनी दुचाकी वाहन मालकांनी, आणि दरवर्षीं चार चाकी वाहनमालकांनी आपल्या वाहनांची प्रदूषण चांचणी करून घेणं, आणि त्याचं सरकारी प्रमाणपत्र जवळ बाळगणं बंधनकारक केलं गेलं... ...

सर्वप्रथम वाहतूक पोलीस हवालदारांची चांदी झाली. चौकाचौकांत वाहतूक हवालदार-निरीक्षकांची टोंळकीं उभीं राहून वाहनं अडवायला, आणि वाहनमालकांना नाडवायला लागलीं. ज्यांच्या जवळ वैध प्रमाणपत्र नसेल, त्यांच्याकडून हजार हजार रुपयांच्या दंड वसुलीचं पेंव फुटलं...सरकारी तिजो-या लाखालाखांच्या दंडवसुल्यांनी फुगायला लागल्या...सरकार खूष... ...

मग परस्पर ' पोलीसमामा ' बरोबर तोडपाणी करून लोक आपली ' आग्र्याहून सुटका ' करून घ्यायला लागले, आणि वाहतूक हवालदार मालामाल झाले...तेही खूष.  

त्यापाठोंपाठ राज्य परिवहन कार्यालयातल्या बाबूं ची चलती झाली, कारण त्या कार्यालयाच्या सगळ्या शाखांवर प्रदूषण प्रमाणपत्र मिळवायला वाहनमालकांची तोबा गर्दी उसळली... ...तिथले बाबूही अमाप गबर झाले...ते अतिखूष.

ती गर्दी परिवहन कार्यालयातल्या बाबूं च्याही खाबूगिरीच्या आवाक्याबाहेर जायला लागल्यावर मग फिरत्या प्रदूषण चांचणी केंद्रांची टूम कुणा बेरकी बाबूच्या सुपीक डोंक्यातनं निघाली, आणि त्यासाठी पैसा गिळून कुणालाही परवान्यांची खिरापत वाटणा-या अधिकारी बाबू मंडळीनी नि त्यांच्या दलालांनी आपली उखळं पांढरीफंक्क करून घ्यायला सुरुवात केली... ...ते महाखूष.

मग काय...चंवथी नापास असलेल्या निरक्षर निरुद्योगी टग्यांपासून ते ' प्रदूषण चांचणी केंद्र ' च्या पाट्या करून देणा-या रंगा-यापर्यंत एकजात सगळ्या अशिक्षित ' उद्योगपति ' नां पैसा कमवायची खाण च सापडली... ...ते महा महा खूष.

कुठूनतरी एखादी डबडा झालेली मारुती ओम्नी पांच-दहा हजारांत भंगारात घ्यायची,दलालामार्फत सरकारी अधिका-यांना नैवेद्य दांखवून खरा-खोटा परवाना मिळवायचा, ' प्रदूषण चांचणी केंद्र ' अश्या दोन पाट्या रंगवून घेऊन त्या, त्या ड्बड्याला मागं-पुढं चिकटवायच्या, एक यंत्र गाडीत बसवून घ्यायचं, की कुठल्याही रस्त्यावर कुठंही ते डबडं उभं करून खों-यानं पैसा ओंढायाला सुरुवात... ...शाळेचं तोंड उभ्या जन्मांत बघायची गरज च उरली नाही... ...!!!

 


 


 

या सगळ्या गदाड्यात भ्रष्ट राजकारण्यांना विकत घ्यायची धंमक बाळगणारा पाव टक्का अतिश्रीमंत वर्ग, आणि आरक्षणांची गाजरं गिळून एकगठ्ठा मतांनीं राजकारण्यांना निवडून द्यायची ताकद असलेला तळागाळातला, दमडीचा कर न भंरतां सगळे सामाजिक फायदे लाटणारा, अशिक्षित, पण ' चुना-तंबाखू मळून ' शहाणा झालेला ऐंशी टक्के फुकटा वर्ग, ह्या दोघांची चांदी झाली... ...

आश्चर्य हे, की तमाम सरकारी आस्थापनांच्या, परिवहन मंडळांच्या, खासगी प्रवासी आणि माल वाहतूकदारांच्या वीस वीस-तीस तीस वर्षं जुन्या पत्रे लोंबणार-या डीझेल इंधनावर चालणा-या जुन्यापान्या भंकाभंका काळागिच्च धूर वातावरणात ओंकणा-या  डबडा गाड्या मात्र टेंचात रस्त्यांवर धांवतच राहिल्या...त्यांना ना कुठला कायदा लागू झाला, ना कुठला दंड मानगुटीवर बसला... ...!!      

भंरडला गेला तो फक्त इमाने इतबारे कायदे पाळून सरकारनं मानगुटीवर बसवलेले सगळे कर प्रामाणिकपणे भंरणारा पावणे वीस टक्के मध्यम वर्ग... ...ज्याला फक्त आपापसांत मौखिक वितंडवाद घालून लाथाळ्या करीत बसण्याशिवाय बाकी कांहीही जमत नसतं... ...

झुंडीच्या राजकारणातली ह्या वर्गाला उणे दोनशे टक्के अक्कल असते...!!!

 


 

आतां मी स्वतःही या च मध्यमवर्गात मोडत असल्यानं, माझ्यावरही गेल्या महिन्यातच, मुळात कल्याणकारी उद्देश असलेल्या या कायद्याच्या तैमूरलंगी अंमलबजावणीच्या कंचाट्यात गंळफंटायची वेंळ ओंढवलेली होती खंरी, पण मघांशी मी सांगितलं ना, तश्या ' चुना तंबाखू मळून ' व्यवस्थित शहाण्या झालेल्या एका बहाद्दर ' पीयूशी शेंटर ' वाल्यामुळं माझी चुटकीसरशी ' आग्र्याहून सुटका ' झाली. !!!

 


 

त्याचं असं झालं, की गेल्या महिन्यातल्या एका रविवारी सकाळी मी निवांत अंथरुणात लोळत असतांना आमच्या सौ. इंदिराजी नां माझं तें सुख बघवलं नसावं...

त्यांनी अंगावर पांघरलेली दुलई खंस्स् दिशी बाजूला ओंढून पुकारा केला," अहो...उठा आतां न् आंवरा बघूं तुमचं पटापट... ...लीला च्या मुलीच्या लग्नाला जायचंय... ...दहा पांच चा लवकरचा मुहूर्त आहे लग्नाचा...उठा...उठा आधी पटकन्..."

मी," ...काऽऽऽऽऽऽऽय?... ...मला तर काल कांहीच बोलला नव्हतां तुम्ही...आज लग्नाला जायचंय म्हणून... ...आऽऽऽऽहा...हा...हा..."

सौ. इंदिराजी," अहो काल शेजारच्या सदनिकेतली तळवलकर मंडळी आली नव्हती कां आपल्याकडं जेवायला ?... ...त्या धांवपळीत मी विसरलेच तुम्हांला सांगायला काल... ...आधी उठा झंटकन् आणि आंवरा पटापट तुमचं सगळं... ...साडे आंठ वाजलेत...नाष्टा ठेंवलाय चौपाईवर...उठा...उठा... ..."

सौ. इंदिराजींबरोबर वाद घालायलाही अजिबात वेळ नव्हता... ...

म्हणून मग मी जरा कुरबुरत च उठून तंडक स्नानगृहाकडं सुटलो... ...

 

बरोबर नऊ वाजतां मी आमची नॅनो चालूं करून वाहनतळावरनं इमारतीबाहेर काढली... ...

पांठोपाठ सौ. इंदिराजीही धांवत-पळत येऊन ' किन्नर शीट ' वर विराजमान झाल्या. आमची जुनी झालेली इंडिका विकून दोन वर्षांपूर्वीच ही नवीन सुटसुटीत गाडी आम्ही घेतलेली होती...

मी स्टार्टर मारून गाडीच्या डॅशबोर्डवर नजर टाकली, तर टाकीत जेमतेम पांच-सहा लीटरच इंधन शिल्लक असलेलं दिसत होतं... ...धन्य...

साहजिकच गीअर टांकत मी गाडी लग्नकार्यालयाच्या वाटेवरच असलेल्या पेट्रोल पंपाकडं वळवली... तोंपावेतों सव्वानऊ वाजलेले होते... ...

 

रविवार असल्यानं पंपावर आमच्यापुढं रांगेत तीनचार गाड्या उभ्या होत्या... ...!!!

 


 

आतां मात्र सौ. इंदिराजीं ची चुळबुळ सुरं झाली," मेल्या सगळ्यांना आपल्यापुढं रांग लावायला आत्तांच मुहूर्त सापडला ?...बाई बाई...कधी पोंचणार आपण ?...  ...सव्वानऊ तर इथंच वाजले... ..."

मी हंसलो... ...

सौ. इंदिराजी," फिदीफिदी करायला काय झालंय तुम्हांला...?"

बहुधा त्या दिवशी मातोश्रीं चा वरदहस्त माझ्या टाळक्यावर असावा...

सौ. इंदिराजीं ना कांही उत्तर द्यायची मला गरज च पडली नाही... ...

मेकॅनिक वाटावा असा एक इसम कुठूनतरी अचानक तिथं माझ्या पांठीमागनं उपटला, आणि सौ. इंदिराजीना अदबीनं म्हणाला," गाडीची ' पीयूशी ' कालच सपलीया म्याडम... ...लगीच कराया लागंल... ... !! "

तश्या सौ. इंदिराजी त्या बिचा-यावरच खेंकसल्या," तुझ्या ' पीयूशी ' ला पण संपायला हाच मुहूर्त सापडला होय रे ?"

त्या बिचा-यानं सौ. इंदिराजींकडं बघत कपाळाला हात लावला," आतां तुमच्या गाडीची ' पीयूशी ' कालच सपली, त्याला म्या काय करनार वो म्याडम ?..."

मी त्या ' पीयूशी शेंटर ' वाल्याला कोंपरानं ढोंसून गप्प रहायचा इशारा केला, न् सौ. इंदिराजी नां म्हणालो," पी. यू. सी. कालच संपली असेल, तर लगेच करून घ्यायला हंवी इंदिराजी... ..."

सौ. इंदिराजी वंतवंतल्या," अहो आधी च इतका वेळ गेलाय इथं, आणि पेट्रोल भंरून झाल्यावर ह्या पी. यू. सी. पायीं आणखी किती वेळ मोडेल ते काय सांगावं ?...लग्न आटपल्यानंतर मग पी. यू. सी. केली तर काय बिघडतंय ?...फारतर फिरून पुन्हां परत यावं लागेल इथं... ..."

त्या मेकॅनिक नं मग अति मौल्यवान खबर पुरवली,"...चालंल की म्याडम...पर त्याचं काय हाये ना...की..."

सौ. इंदिराजी," काय ?...काय आहे त्याचं...?"

पीयूशी पैलवानदादांनी मग माझ्याकडं बघत बॉंब टाकला," म्होरल्या शिग्नलवर पोलीसं जमल्याती सायेब... ...तीऽऽऽ बगा...ती चार पाच मानसं दिसत्यात न्हवं...ती आत्तांशीच दंड भंरूनश्यान पीयूशी कराया आल्यात बगा... ..."

सौ. इंसिराजीं चे डोळे आतां संशयानं बारीक झाले," तुला कसं समजलं रे, आमच्या गाडीचं पी. यू. सी. कालच संपलंय म्हणून ? "

पैनवान दादांनी आतां सौ. इंदिराजीं ची च इज्जत बाहेर काढली," काय म्याडम तुमी पन... ...आवो आतां ' आन लाईन ' झालंया न्हवं समदं?...कंच्या गाड्यांचं पी. यू. शी. सपलंया, त्ये माज्या मिशीनवर बी दिस्तंया की वो... ...म्हून तर सांगाया आलो म्या...तुमचं प्याट्रोल भंरूनश्यान् झालं का नाय, की म्होरं या चार पावलं...पांच मिण्टांत द्येतो बगा पीयूशी काडून तुमच्या गाडीचं... ..."

सौ. इंदिराजी नां गप्प रहायची खूण करीत मी ' पीयूशीदादां ' ना विचारलं," हे बघा पैलवान... ...आम्हांला लग्नाचा मुहूर्त गांठायचाय पंधरा मिनिटांत...मोजून पांच मिनिटांत आंवरेल ना तुमचं काय ते ?"

पीयूशीदादा," त्ये बगूं या की सायेब...प्याट्रोल भंरलं न्हवं, की वाईच जरा फुडं सरका...ह्ये समोर मिशीन दिस्तंया न्हवं, त्येच...पंपावरच हाय माजं दुकान...काय ?"

मी," हे बघ बाबा....ते तुझं ' बगूं या की ' ठेंव बाजूला... ...' म्याडम ' चा अवतार बघतोयस न्हवं कसा झालाय ते?... ...तुला जायला लागंल ' म्याडम ' च्या दाढंला...चालतंय तुला ?... ...पांच मंजे मोजून पांच मिण्टांतच उरकायचं झंटक्यात... ...जंमतंय काय ? "

' पीयूशीदादां ' ना आतां सगळं बरोब्बर समजलं," तुमी काळजीच सोडा तेची सायेब... ...पर सायेब..."

मी," आतां काय राह्यलं अजून ?"

पीयूशीदादा," मंजी सायेब...तुमचं बी आमच्यावाणीच हाय समदं म्हणा की !! ...लगीच या बरं का सायेब...म्या हाईच तितं..."

आतां आमच्या पुढ्यातल्या गाडीत पेट्रोल भंरून झालं, आणि मी गाडी पंपावर लावली. टाकी गच्च भंरुन घेतली...देयक भागवलं, आणि ' पीयूशीमामा ' च्या टपरीवर गाडी लावली एकदाची... ...

मामा नं गाडी जरा मागं-पुढं सरकवायला सांगून त्याला हंवी तशी लावून घेतली...मग त्यानं प्रदूषणयंत्राचा मापक गाडीच्या मागच्या धुराड्यात खुपसला...मग मला पुढचं झांकण उघडायला सांगून त्याखाली कुठंतरी यंत्राचा चुंबकीय फेरेमापक चिकटवून बसवला, न् म्हणाला," सायेब आतां विंजान चालूं करूनश्यान् ' आक्षिलेटर ' दाबा जरा... ...

मी ते सगळं करीत त्याला विचारलं," इंजिन कश्याला जोरात पळवायला हवं पैलवान ?...नुस्तं मागच्या धुराड्यात नळकांडं खुपसून होत नाही तपासणी ? "

' पीयूशीमामा ' त्यांच्या यंत्राशी खुडबुडत बोलले," तुमची गाडी ' चंवत्या युरू ' तली हाय न्हवं ? तेंच्या विंजानाचं ' आरीपेम ' बी मोजाया लागतंया मिशीनवर...तेच्याबिगर पीयूशी न्हाय निगत ह्या गाड्यांचं... ...आजून जरा ' आक्षिलेटर ' दाबा सायेब...त्यच्यामायला हेच्या... ... आजून जरा सायेब..."

मी कांही न बोलतां ' पीयूशीमामा ' नां जंवळ बोलावून गाडीच्या खिडकीतनं आंत डोंकावून बघायला सांगितलं, आणि ' पीयूशीमामां ' चे डोळे पांढरे झाले...!!

माझा ' आक्षिलेटर ' वरचा पाय पार गाडीच्या जमिनीला टेंकलेला होता... ...!!!

आतां ' पीयूशीमामा ' च माझ्याकडं आं वांसून बघायला लागले... 

मग त्यांनी त्यांच्या अस्सल गांवरान मातृभाषेत ' पीयूशी मिशीन ' च्या सात पिढ्यांचा उध्दार करत त्याच्याबरोबर कांहीतरी खुडबुड सुरूं केली... ...

 


 

आतां पावणेदहा होत आलेले होते, आणि सौ. इंदिराजींची ' मुल्क-ई-मैदान ' कधी धंडाडेल, याचा कांही भंरवसा उरलेला नव्हता... ...!!

म्हणून मग मी ' पीयूशीमामां ' ना म्हटलं," पैलवान...राहूं द्या नसलं होत तर... ...मी दुसरीकडं कुठंतरी करून घेतो...आम्हांला निघायला हवं आतां..."

' पीयूशीमामां ' नीं मग करांकरां डोकं खांजवत मला ' फक्त येक च मिण्टं दमा सायेब ' म्हणून इशारा केला...

मग दुकानाच्या फंळीवर हातातल्या मोबाईलशी खेंळत बसलेल्या ' बारक्या ' ला चार अस्खलित गांवठी शिव्या हांसडून आमच्या पाठीमागं ' पीयूशी ' साठी नंबर लावून उभी असलेली ' ॲक्टिव्हा ' पुढं घ्यायला सांगितली...

मग ती एका बाजूच्या आधारावर तिरकी उभी करून तिच्या मागच्या झांकणाखाली हात घालून आंत ' विंजाना ' वर कुठंतरी तो यंत्राचा ' आरीपेम ' मापक चिकटवला... ...

मग मला परत माझ्या गाडी चं इंजिन सुरूं करायला सांगितलं... ...

' ॲक्टिव्हा ' धंरून उभ्या असलेल्या ' बारक्या ' ला तिचं ' विंजान ' चालूं करून ' आक्षिलेटर ' पिरगळायला ओंरडून सांगितलं... ...

आणि दुस-या सेकंदाला माझ्या गाडीचं ' ठीक ठाक पीयूशी ' प्रमाणपत्र यंत्रातनं बाहेर काढून माझ्या हातात दिलं... ...," झालं सायेब...घ्या...!!! "

 


 

' पीयूशीमामां ' ची ती भन्नाट शक्कल बघून मी कपाळाला हात लावत मामांच्या हातावर शंभराची नोट टिकवली...!!

आणि पाकिटातनं अजून एक दहाची नोट कांढून ' पीयूशीमामां ' च्या हातावर ठेंवली," पैलवान... ...तुमची भन्नाट आयडिया आवडली आपल्याला... ..."

पीयूशीमामा माझ्याकडं गोंधळून बघायला लागले... ...

आणि मी त्यांना ," आपल्या खातीं ' कटिंग च्या पार्टी ' करून टाका...काय? " म्हणत गाडीचा गीअर टांकून ' आक्षिलेटर ' वर पाय दाबला... ...!!!

' पीयूशीमामां ' ची खबर अगदी बिनचूक होती... ...

पेट्रोल पंपापासून जेमतेम फर्लांगभंर अंतरावर असलेल्या सिग्नल च्या चौकात मी डावीकडच्या रस्त्याला गाडी वळवली, आणि कोंप-यावरच्या झाडाच्या आडोश्याला ' बकरे ' धंरायला लपलेल्या ' पोलीसमामां ' नी हात दांखवत गाडी अडवली......!!

मामांनी मग त्यांच्या भ्रमणध्वनिवर माझ्या गाडीचा नंबर टांकून सगळीं कागदपत्रं तपासली, न् तोंडातल्या पानाच्या रसाची पिचकारी रस्त्याकडेला मारून विजयी मुद्रेनं तोंड उघडलं," सायेब... ...' पीयूशी ' संपलंय गाडीचं कालच... ...हजार रूपये दंडाची पावती फांडावी लागंल मला... ...काय ?"

मी मख्ख चेह-यानं डॅशबोर्डमधला कप्पा उघडून तीन च मिनिटांपूर्वी ' पीयूशीमामां ' नी करून दिलेलं ' पीयूशी ' ' पोलीसमामां ' च्या तळव्यावर फाड् दिशी वाजवलं...!!

तें बघून ' पोलीसमामां ' चा चेहरा आधी कोमेजला...

आणि लगोलग पिळवटून काळाठिक्कर पडला... ...!!!

मी मग त्यानां च सांगून गाडी रस्त्याकडेला लावली...

सौ. इंदिराजी नां ' दोन च मिनिटांत आलो ' असं सांगत, त्यांच्या वटारायला लागलेल्या डोंळ्यांकडं ढुंकूनही न बघतां गाडीतनं पायउतार होऊन चालत परत ' पीयूशीमामां ' च्या टपरीवर आलो...

मामा गि-हाइकांची वाट बघत फळीवरच बसलेले होते...

मी त्यांना हांक मारली... ...

मामा चिंतातूर चेहरा करून सामोरे आले," काय झालं सायेब...?"

मी कांही उत्तर न देतां खिश्यातल्या पाकिटातनं पन्नासाची कोरी करकरीत नोट कांढून ' पीयूशीमामां ' च्या हातावर ठेंवली... ...

मामा बांबचळले," ह्ये कश्यापायी सायेब...? "

सिग्नलच्या चौकाकडं वळलेल्या मुठीचा अंगठा दांखवून  मी डोळे मिचकांवत उत्तरलो," त्या चौकातल्या ' मामां ' ची पार्टी चुकली... ...काय ?...ती पण आतां तुम्ही च करून टांका... ...!!

मग हाताचा पंजा पसरून तोच अंगठा ओंठांना भिडवत पुस्ती जोडली ," फक्त असली पार्टी करूं नकां म्हणजे मिळवली...!!! " 

मी त्यांच्याकडं पांठ फिरवून आल्या वाटेनं परत फिरलो,

आणि माझ्या पांठमो-या आकृतिकडं आं वांसून बघत दस्तुरखुद्द ' पीयूशीमामा ' नीं च आपल्या कपाळावर हात मारून घेतला... ...!!!

 


 

*****************************************************************************************

-- रविशंकर.

६ डिसेंबर २०२२.       


           

 

           

   

        

 

 

 

       

         

 

     

 

 

 

 

 














 

 

 




No comments:

Post a Comment