Search This Blog

Wednesday 13 July 2022

|| श्मश्रूक्रियायार्तत्त्वद्न्यानम् ||

|| श्मश्रूक्रियायार्तत्त्वद्न्यानम् ||


,” अहो, हे काय भदं करून घेतलंय तुम्ही तोंडा चं...ऑं ?”

स्नानगृहातनं टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या आल्या समोरच उभ्या असलेल्या सौ. इंदिराजी नी आ वांसून माझ्याकडं बघून कपाळाला हात लावीत पांठ वळवून मिसळण्याच्या डब्यातली हळद आणायला स्वयंपाकघराकडं धूम ठोंकली… ...

मी भंराभंर पाटलोण-सदरा चंढवून सद-या ची बटणं लावायला लागलो, तोंवर सौ. इंदिराजी तळहातावर हळद घेऊन धांवत आल्याच,” कसले नतद्रष्ट उपद्व्याप डोंक्यात येतात तुमच्या तिन्हीत्रिकाळ, कांही कळतच नाही कधी कधी...उभे रहा सरळ आधी इथं समोर मुकाट्यानं...”

मी,” अहो पण झालंय तरी काय असं, म्हणून अश्या वंतवंतायला लागलाय तुम्ही माझ्यावर… ...ऑं ?”

सौ. इंदिराजी नी माझी बखोट धंरून फंरपटत मला शयनकक्षांतल्या दर्पणासमोर नेऊन उभा केला,” बघा बघा… ...तुमचे उपद्व्याप...”

मी समोरच्या आरश्यात पाहिलं, तर गळा, जबडा, हनुवटी, अन् वरच्या-खालच्या ओंठांशेंजारील त्वचेवर जागोजागीं लालभंडक डाग पडलेले, आणि ब-याच ठिकाणीं खंरचटल्यासारखं होऊन थोडंबहुत रक्त देखील आलेलं होतं…!!!

,” रामा...रामा...अहो काय कानशी-रंध्यानं दाढी केलीत की काय आज ?”...सौ. इंदिराजी चिंताग्रस्त चेह-यानं जागोंजागीं हातावरची हळद चेह-यावर थांपत म्हणाल्या… …

आज सकाळीं जरा लवकरच आंवरून राज कपूर चा संगम सिनेमा बघायला अकरा वाजतां अलंकार सिनेमागृह गांठायचा आमचा बेत आदल्या रात्रीं च ठंरलेला होता, म्हणून मी आपलं लवकर उठून, सेफ्टी-रेझर नं नीट तुळतुळीत होत नाही म्हणून वस्त-यानं दाढी करून आंघोळ उरकलेली होती… …

दाढी केलेला भाग जरा भंगभंगत होता खरा, पण असलं कांही तरी होऊन बसलं असेल, याची अस्मादिकांना सुतराम कल्पना नव्हती…!!!

मी,” अहो...आपल्याला सिनेमाला जायचं होतं ना, म्हणून चांगली तुळतुळीत होण्यासाठी मी आज वस्त-यानं दाढी केली… ...“

सौ. इंदिराजी,” छा s s s s s s s s न… ..शिरच्छेद करून घेतला नाहीत...नशीब माझं…!!! ... ...कुठं आहे तो वस्तरा तुमचा ?”

मी,” तुम्हांला कश्याला हंवाय तो आतां ?……खूप धार असते त्याला चंरचंरीत...”

सौ. इंदिराजी,” बिनपाण्यानं हजामत करायला तुमची…...!!! ...समजलं ?...आणा तो वस्तरा इकडं...”

मी मुकाट्यानं दाढीसामानाच्या पेटीतला वस्तरा कांढून सौ. इंदिराजीं च्या हातावर ठेंवला…

सौ. इंदिराजीनीं दुस-या क्षणीं तो कच-याच्या डब्यात भिरकावून देत गर्जना केली,” इतउप्पर असलं कांहीही उंब-याच्या आंत आलेलं मला खंपणार नाही...हे ही समजलं ?...बाई...बाई…बाई ...एखादा दिवस जरी आई ला भेंटायला गेले ना, तरी घरीं परत येईतों कायम जीव टांगणीला लागलेला असतो माझा… … कधीं काय उचापतीं करून ठेंवाल तुम्ही म्हणून…”

निकराची परिस्थिती बघून मी विषय बदलला,” … ...मग ?...निघायचं आतां ?”

,” हे असलं भादरलेलं तोंड घेऊन कुणी मधुबाला येत असेल बरोबर संगम बघायला, तर जा खुश्श्याल घेऊन तिला च… …!!! ... काय ?”

नेसलेली साडी हॅंगरला अडकवीत, मला असला रट्टा खंणकावून सौ. इंदिराजी स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या…!!!

आतां काय करायचं ?

महाविद्यालयीन वयांत मी वस्त-यानं च दाढी करायचो...पण आतां ती ‘ हात की सफाई ‘ गायब झालेली दिसत होती एकूण.

संगम ‘ चा ‘ उमरकैद ‘ होऊन बसलेला होताच… ...ज्याला आतां कांही इलाज-उपाय नव्हता. कपडे तर चंढवलेले होते. तेव्हां ‘ गल्लीतल्या गल्लीत च जरा पाय मोकळे करून येतो ‘, असं सौ. इंदिराजी नां सांगून

‘ वस्तरा न वापरतां त्याच्याच तोलामोलाची तुळतुळीत दाढी विना जोखीम कशी करतां येईल ? ‘ यावर विचारमंथन करायला मी घराबाहेर पडलो...

जंवळच्या चौकातल्या कोंप-यापर्यंत मी गेलो...डोंक्यात विचारचक्र भिरभिरतच होतं... ...

अचानक कांहीतरी दिसल्यामुळं तें भंग पावलं, पण नेमकं काय दिसलं ? ते एकदम ध्यानांत आलं नाही...

फूटपाथ वर पथारी टांकून कंगवे-फण्या-मण्यांच्या माळा-कुंकवाच्या डब्या-केसांच्या पिना-बिंद्या-प्लॅस्टिक ची खेळणी बिळणी असल्या सटरफटर वस्तूं चं दुकान टाकून एक लुंगीवाला केरळी अण्णा बसलेला होता...

त्याच्या पथारीवरच तें कांहीतरी नजरेला पडलेलं असावं... ...

मी पीछे मुड करून परत ती पथारी गांठली, आणि अण्णा चा मांडलेला संसार नीट न्याहाळून बघूं लागलो... ... ...

आणि मग तें नजरेला पडलं...

अण्णाच्या विशाल पथारी संसाराच्या गदाड्यात एका कोंप-यात मांडून ठेंवलेले प्लॅस्टिक चे सेफ्टी रेझर माझ्या नजरेला पडलेले होते !!!

मला पडलेलं कोडं असं आपसूक च सुटलेलं होतं... ...

मी त्यातला एक रेझर अण्णा नं चौदा रूपये सांगितलेली किंमत बेदम घांसाघीस करून कमी करीत चार रुपयांत खरेदी करून खिश्यात घातला, आणि घंरची वाट धंरली... ...

घराचं दार उघडतांक्षणीं च हातातला रेझर सौ. इंदिराजीं च्या नजरेला पडलाच...” हे काय नवीन खूळ शिरलं आतां डोंक्यात...?”

मी रेझर पटकन् पाटलोणीच्या खिश्यात टांकीत उत्तरलो,” कांही नाही गं... ...जरा हे वापरून बघावं म्हणतो...”

सौ. इंदिराजीं चे डोंळे आतां बारीक झाले,” म्हणजे नवीन कांहीतरी उपद्व्याप... ...होय ना ?”

मी,” अहो उगीच कांहीतरी पराचा कावळा करूं नकां तुम्ही... ...ह्याला ' सेफ्टी ' रेझर म्हणतात...सुरक्षित असतं हे...कळलं ? “

सौ. इंदिराजी,” तर तर... ...किती साळसूद नवरा भेंटला गं बाई मला...!!!... ...ह्यानं च आतां दाढी करणार असाल...नाही ? “

मी चेह-यावरचं आश्चर्य गाडून टांकून माझ्या अभ्यासिका कम् यंत्रशाळेकडं मोर्चा वळवला, आणि तो सेफ्टी रेझर मेजाच्या खणांत सुरक्षित ठेंवून दिला ... ...

दुस-या दिवशीं सकाळीं सौ. इंदिराजीं चा कानोसा घेतला...त्यांची स्वयंपाकघरांत सकाळचा नाष्टा बनवायची गडबड चाललेली होती... ...मुहूर्त तर चांगलाच लागलेला होता...

तसा मेजाच्या खणातला तो सेफ्टी रेझर बाहेर कांढून यांत्रिक कामाच्या मेजावर ठेंवून त्याकडं बघत मी विचार करायला लागलो, आणि एक फर्मास कल्पना डोंक्यात चंमकली... ... ...

सेफ्टी रेझर चं डोकं हे चिमटीत पकडायच्या त्याच्या दांडीला काटकोनात बसवलेलं असतं...त्यामुळं वस्त-यापेक्षा तो वापरायला सोपा. तथापि त्याचं पातं धंरणारं डोकं हे दाढीच्या पात्यापेक्षां रुंदीला ज्यास्त असल्यानं पात्याची धारदार कड कातडीला थेट स्पर्शत नाही, त्यामुळं त्यानं वस्त-यासारखी तुळतुळीत दाढी होऊंच शकत नाही.

म्हणून मग मी बारीक करवतीनं त्याच्या डोंक्याची एकाच बाजूची कड अंगाबरोबर सफाचट कांपून टांकली... ...

 

आतां ' सेफ्टी रेझर ' मधनं एका बाजू नं सेफ्टी रेझर, तर दुस-या बाजू नं वस्तरा असं बहूपयोगी श्मश्रूपकरण तयार झालं... ...तेही फक्त चार रुपयांत...!!!

मी महाखूष होऊन शीळ घांलत तो रेझर कम् वस्तरा घेऊन स्नानगृहाकडं मोर्चा वळवला...

तिथल्या कपाटातनं दाढी करायचं एक नवं कोरं पातं,छोटा आरसा, आणि पाण्याचं भांडं इतकं साहित्य घेऊन परत कार्यशाळेत आलो. मग फरशीच्या मेजावर आरसा तिरका उभा करून ठेंवला, नव्या रेझर मध्ये नवंकोरं पातं बसवलं, हनुवटीच्या टोंकावर जरा पाण्याचा हात लावला, आणि नव्या श्मश्रूपकराणाची वस्त-याची बाजू अगदी अलगदपणे हनुवटीच्या टोंकावरून फिरवली... ...

आणि काय नवल...थेट पाजळलेल्या वस्त-याच्या थाटात हनुवटीच्या शेंड्यावरची रांठ दाढी सफाचट गायब झाली...!!!

तिथं तळवा फिरवून बघितला, तर एकदम ' ढाके की मलमल ' हाताला लागली न् काय विचारतां... ...!!!

आतां फुल्ल दाढी हाणायला कांही हंरकत नव्हती.

मी जाम खूष होत मग तोंडावरनं टॉवेल खंसाखंसा फिरवला न् पुन्हां आरश्यात बघितलं तर सौ. इंदिराजी पांठीमागंच उभ्या...,” हं करां सुरूं आतां... ...”

मी खुर्चीतनं उठून पांठीमागं वळून बघितलं, तर सौ. इंदिराजीं च्या हातांत एक किलो ची हळदीची बरणी दिसली... ...!!!

मी,”अहो...हे काय आरंभलंय तुम्ही...ऑं ?... ...मी काय मिलीएव्हढा लहान वाटतो की काय तुम्हांला...?”

सौ. इंदिराजी नी फक्त हाताचा पंजा पुढं केला...........,” रेझर...”

मी,” अहो पण... ...मी...”

सौ. इंदिराजी मख्ख च,”............रेझर...”

मी कळवळत माझं नवीन संशोधन त्यांच्या हातावर ठेंवलं...

सौ. इंदिराजीनी हळदीची बरणी आणि रेझर घेऊन स्वयंपाकघराकडं कूच केलं... ...

आणि दोनच मिनिटांनी ओंट्यावर दाण् दिशी वरवंटा हाणल्याचा आवाज आला...!!

माझ्या संशोधना चं श्राध्द पार पडलेलं होतं... ...!!!

आग्या वेताळाला उगीच आमंत्रण देऊं नये अशी म्हण आहे, म्हणून मग मी शहाणपण घेऊन एक दिवस बाजारातनं सुप्रसिध्द ' जिलेट ' कंपनीचा ' जिलेट कॉंटूर ' नांवानं विकला जाणारा सॅंडविच पात्यांचा, वस्त-याच्या दर्ज्याची दाढी करणारा म्हणून कंपनी ज्याची जाहिरात करीत असे, तो रेझर दोनशे रुपये मोजून आणला, आणि त्यानं पण दाढी करून बघितली, पण कसलं काय न् कसलं काय. दोनशे रूपये वाया गेले ते गेलेच, वर आणखी दाढीचे राठ खुंटही हाताला लागायला लागले ते वेगळेच. आतां इतके पैसे पण वाया घालवले म्हणून परत सौ. इंदिराजीं चे दणके खायला नकोत म्हणून मी स्वतःच तो रेझर कच-याच्या डब्याच्या थेट तळाशी टांकून त्यावर इतर कचरा भंरून तो झांकून टांकला...आणि सौ. इंदिराजी नां कसला वासही न लागतां तो थेट कचरा गाडीत रवाना झाला........


मग मी केशकर्तनकार डोंक्यावरचे केंस कापायला जे ' कुट् कुट् यंत्र ' वापरतात, तेही विकत आणून त्यानं दाढी करून पाहिली, पण रामा शिवा गोविंदा...

मग त्याचा वापर मी फक्त केशकर्तनांपुरता मर्यादित ठेंवला, आणि सरतेशेंवटीं कंटाळून मी ' तुळतुळीत वस्तरा दाढी ' चा नाद तात्कालिक कां होईना, सोंडून दिला अन् गप्प बसलो... ...

तत्त्वद्न्यानांत एक संस्कृत सुभाषित आहे...


|| सर्वबलाद्वरमेकं द्न्यानादमोघसामर्थ्यम्

      तस्मादपि तत्त्वद्न्यानं भुवनत्रयव्यापकम् || 

याचा अर्थ, सर्व प्रकारच्या बळांत द्न्यानबलाचं सामर्थ्यअमोघ असतं, आणि त्यातही तत्त्वद्न्यानानं प्राप्त होणारं सामर्थ्य हे सर्वश्रेष्ठ असतं, कारण ' तत्त्वद्न्यान हे त्रैलोक्यव्यापी असतं ‘, असं सुभाषितकार सांगतायत......कारण त्रिलोकातल्या तमाम चराचर वस्तू आणि त्यांची अव्याहत चालूं असलेलीं कार्यं यांच्या मुळाशी कुठलं ना कुठलं तत्त्व दंडलेलं असतंच...त्यांचं द्न्यान, म्हणून तत्त्वद्न्यान हे ' त्रिभुवनव्यापक '... ... 

तात्त्पर्य, मला श्मश्रूक्रियेतलं तत्त्वद्न्यान धंडपणे समजलेलं नव्हतं, हे या सर्व अपयशांचं मूळ कारण होतं असं माझ्या ध्यानांत आलं.

पुढं कांही काळानंतर आम्ही उभयतां युरोप बघायला गेलेलो असतांना नेदरलॅंड्स ला ही गेलो होतो. तिथं ऍम्स्टरडॅम शहर फिरून बघत असतांना मला अचानक फिलिप्स कंपनीच्या उपकरणांचं दुकान दिसलं. मला यंत्रांतंत्रांत स्वभावतः च रस असल्यामुळं साहजिकच आम्ही त्या दुकानांत शिरलो... ...

दुकानांतल्या सुबक वस्तु बघतां बघतां मला अचानक तिथं दाढी करायचं यंत्र दिसलं... ...

आतां जगप्रसिध्द फिलिप्स कंपनी चं यंत्र... ...ते ही माहेरगांवच्याच दुकानांत...तेव्हां कसली शंकाकुशंका घ्यायला जागाच नव्हती. मी ते सुबक यंत्र उचलून हातात घेऊन त्यावरचं किंमतीचं लेबल बघितलं, तर बावीस युरो किंमत दिसत होती...म्हणजे साधारण अठराशे रुपयांच्या आसपास... ...भंरमसाठच वाटली मला ती.

मी ते परत ठेंवायला लागलो, तर दुकानाचे मालक गल्ल्यावरून उठून माझ्याजंवळ आले...मला यंत्र आवडलं नाही कां अशी त्यांनी चंवकशीही केली... ...' यंत्र छान च आहे, पण आमच्या बजेट मध्ये किंमत बसण्यासारखी नाही ' असं मी म्हणतांच त्यांनी जागच्या जागीं किंमतीवर अडीच युरो - म्हणजे साधारण दोनशे रुपयांची सवलत द्यायची तयारी दांखवली...वर आणखी हे वापरून बघितल्यानंतरही जर तुम्हांला पसंत पड़लं नाही, तर ते सुस्थितीत असेल, तर आम्ही परत घेऊन तुमचे पैसेही तुम्हांला परत देऊं अशी खात्री पण दिली... ...

तेव्हढ्यांत सौ. इंदिराजी उगवल्याच,”वस्तरा दाढीसाठी बघताय काय हे ?...”

मी,” होय...”

सौ. इंदिराजी,” फिलिप्स म्हणजे दर्जा उत्तम च असणार... ...घेऊन टांका पसंत असेल तर...काय ?”

मी,” यंत्र छान च दिसतंय... ...पण किंमत कांही च्या कांही च आहे... ...चला निघूं या...”

सौ. इंदिराजी,” किती आहे किंमत याची ?”

मी,” छापील किंमत आहे बावीस युरो...पण हे मालक म्हणतायत की दोन युरों ची ते सवलत देतील म्हणून... ...तरी केवळ दाढी भादरण्यासाठी हे फारच होतंय... ...राहूं दे हे... ...चला...निघूं या आपण...”

सौ. इंदिराजी हंसल्या,” पण दाढी तर तुमच्या मनासारखी होईल ना यानं ?”

मी,” ते प्रत्यक्ष्य दाढी करून बघितल्याशिवाय कसं काय सांगतां येईल मला ?”

सौ. इंदिराजी,” अहो पण हे दुकानदार तर आत्तां च म्हणाले ना, की वापरून बघितल्यावरही जर हे आपल्याला पसंत नाही पडलं, तर ते हे यंत्र विना खिटपिट परत घेऊन पैसेही परत देतील म्हणून ? “

मी,” हो...तसा शब्द दिलाय त्यांनी... ...पण तें शक्य होणार नाही आपल्याला...”

सौ. इंदिराजी,” कां म्हणून शक्य होणार नाही ?”

मी,” अहो हे कुरियर नं इकडं यांच्याकडं परत पांठवायचाच खर्च यंत्राच्या किंमतीच्या पांच-सात पट येईल...त्याचं काय ?...तुमचा भारत महान आहे...!!!...ठाऊक आहे ना तुम्हांला सगळं ? “

सौ. इंदिराजी नी चकार शब्द न कांढतां वीस युरो पर्समधनं कांढून दुकानदाराच्या हातांत दिले... ...मेक द बिल प्लीज...”

दुकानदार ' शुअर...शुअर...मॅडम... ...थॅंक यू...’ म्हणत पावती करायला गल्ल्याकडं निघून गेला...

मी आ वांसून बघत च राहिलो...

सौ. इंदिराजीं च्या पर्समधनं तब्बल वीस युरोंचा गल्ला एका झंटक्यात बाहेर पडलेला... ...

तोही तुळतुळीत दाढीची बालंबाल खात्री नसतांना देखील... ...!!

मी चकित होऊन सौ. इंदिराजीं कडं बघत नुस्त्या प्रश्नार्थक भिंवया उंचावल्या... ...

सौ. इंदिराजी हंसल्या,” त्याचं काय आहे... ...”

मी,” काय आहे त्याचं...?”

सौ. इंदिराजी मख्खपणे उत्तरल्या,” तुमच्या उचापतींपायीं मंगळसूत्र च गायब होण्यापेक्षा वीस युरो गेलेले परवडतील मला...!!! ... ...काय ?”

त्यांचं ते उत्तर ऐकून भंर दुकानांत मी कपाळावर हात मारून घेतला...!!!

 

सरतें शेंवटी कसं कां असेना...पण आतां तरी दाढी थेट वस्त-यासारखी तुळतुळीत व्हायला कांही हंरकत नव्हती...

अवघ्या जगांतलं सर्वोत्तम ज्याला म्हणतात तें खुद्द फिलिप्सचं च यंत्र आतां माझ्या दिंमतीला हात जोडून हंजर राहणार होतं... ...ह्यापेक्ष्या अधिक सरस असं कांही ' श्मश्रू ' पुराणात घडेल असं अपेक्षिणं व्यर्थ होतं... ...

आम्ही शहर फिरून सायंकाळीं हॉटेलवर परतल्यावर सौ. इंदिराजी नी मला आंठवण केली,” अहो, त्या नवीन आणलेल्या यंत्रानं आतां दाढी करून बघा ना...म्हणजे काम समाधानकारक नसेल, तर तें इथल्या इथं च परत करून त्याचे पैसे पण परत घेतां येतील आपल्याला... ...”

मी,” अहो, ते इथं करणं शक्य नाही...कारण आपल्या भारतातल्या विद्युत खोंबणी नां जुळेल अशी पिन असलेलं यंत्र आपण घेतलेलं आहे... ...ते इथल्या चौकोनी भोंकं असलेल्या विद्युतखोंबणींला कसं काय जोडणार ?... ...आपण भारतात घरीं परत गेल्यावरच हे आजमावून बघतां येईल आपल्याला... ...”

सौ. इंदिराजी,” अहो, मग इथं हॉटेल पासून जंवळच एक विद्युतसामानाचं दुकान आहे ना कोंप-यावर ?...तिथं बघून या ना, की हे यंत्र इथं वापरायला जो अनुरूपक – म्हणजे ऍडॅप्टर – लागतो, तो त्या दुकानात उपलब्ध आहे कां म्हणून ?”

मी सौ. इंदिराजीं च्या समाधानार्थ त्या दुकानात पण जाऊन आलो, पण भारतातल्या गोल भोंकांच्या खोंबणी ना जुळेल, असा ऍडॅप्टर नेदरलॅंडस् मधला कोण दुकानदार ठेंवणार ?

तात्त्पर्य, यंत्राची पडताळणी भारतात घरीं परत गेल्यानंतरच करतां येणार होती... ...

हे समजल्यावर सौ. इंदिराजी नी भंडकून जगातल्या समस्त अभियंत्यांची अक्कल बाहेर काढली... ...!!!

पण त्याचा कांहीएक उपयोग होणार नव्हता... ...शेंवटीं त्या चंडफडत गप्प बसल्या... ... ...

आणि भारतात परत येऊन घरांत पाय ठेंवतांक्षणींच त्यांनी फर्मान काढलं,” दाढी आतां ब-यापैकी वाढलीय तुमची...ती नवीन यंत्रानं च करून बघा... ...काय ?"

मी मुंडी डोंलवली, न् गप्प बसलो........

घरीं नाष्टा-बिष्टा उरकल्यावर अंघोळीला जाण्याआधी मी दाढी ची तयारी करून तें फिलिप्स चं यंत्र बॅगेतनं बाहेर काढलं...

मान-गाल-हनुवटी चे भाग पाण्यानं ओंलसर केले, आणि मोठ्या झोंकात यंत्र चालूं करून हनुवटीवर वाढलेल्या खुंटांवर फिरवलं... ...

दाढी तशी छानपैकी गुळगुळीत झाली, पण तुळतुळीत कांही केल्या होई ना... ...!!

हनुवटीवर हाताचा तळवा फिरवून बघितला, तर अगदी किंचितसे कां होईनात पण खुंट हाताला लागत च होते... ...

सौ. इंदिराजीं चे वीस युरो चक्क वाया गेलेले होते... ...!!!

मी ते यंत्र निरनिराळ्या कोनातनं दाढीवर फिरवून बघितलं, मग कमी-ज्यास्त दाब देऊन पण परत परत वापरून बघितलं, पण छे... ...वस्त-यासारखी दाढी खुद्द माहेरगांवच्या फिलिप्स यंत्रानं पण होत नाही, हें च सिध्द झालं... ...

तसा सौ. इंदिराजी नी पुनश्च संतापून फंणफंणत ' फिलिप्स ' च्या सतरा पिढ्यां चा उध्दार केला...!!!

माझ्या ' तुळतुळीत श्मश्रू ' प्रकल्पा चं ' पुनश्च हरि ॐ ' होऊन बसलं... ... ...

आणि इथनं पुढं माझी ' श्मश्रू च्या तत्त्वद्न्याना ' ची खोदाई सुरूं झाली...असं कसं होतं ?... ...

जगप्रसिध्द फिलिप्स च्या यंत्रानं पण साध्या वस्त-यासारखी सफाचट दाढी कां होऊं शकत नाही ?...यामागं कांहीतरी ठोस कारणमीमांसा असणार ही तर दगडावरची रेघ... ... ...काय बरं असावी ती ?

मी मग मुळाला च हात घालायचं ठंरवलं. मातोश्रीं च्या कृपेनं चित्रकला चांगली अवगत आहेच. मग मी एका कागदावर कातडीवर उगवलेल्या खुंटांचं चित्र काढलं, आणि ते समोर ठेंवून विचार करायला लागलो, तेव्हां तुळतुळीत दाढीमागचं मूळ तत्त्व असं लक्ष्यात आलं,की वस्त-यानं दाढी करतांना वस्तरा अगदी केसांच्या मुळांलगत स्पर्श करीत कातडीला समांतर फिरतो, ज्यामुळं केसांचे खुंट मुळांपासून छाटले जातात, म्हणून वस्त-यानं सफाचट दाढी करतां येते... ...

तात्त्पर्य, ज्या उपकरणांनी हे होत नाही, तीं वापरून वस्त-यासारखी तुळतुळीत दाढी करतां येणारच नाही...इतकं हे मूलतत्त्व साधं-सरळ होतं...!!!

मग मी तें फिलिप्स चं यंत्र खोंक्यातनं बाहेर काढलं,त्याचं दाढी करतांना कारडीवर फिरणारं जाळ्या बसवलेलं तोंड उघडलं,आणि त्याची र्तकाग्रं म्हणजेच कटर हेड्स बहिर्गोल भिंगातनं नीट न्याहाळली, तेव्हां त्या यंत्रानं सफाचट दाढी कां होऊं शकत नाही तें स्वच्छपणे समजलं... ... 


र्तकाग्रं आणि त्यावरील जाळ्यांची झांकणं, ही शिरच्छेद केलेल्या गोल शंकू च्या आकाराची होती. साहजिकच त्या जाळ्यांचा टोंकांकडील नखाएव्हढा चपटा गोल भाग कातडीच्या ज्या ज्या भागांवर फिरेल, त्याच भागांची सफाचट हजामत होणार. तिरका भाग जिथं फिरेल, त्या जागांवरचे खुंट मुळांतनं छाटले जाऊंच शकत नाहीत... ...मग वस्त-यासारखी सफाचट दाढी कशी काय होणार ?...शक्य च नाही ते...यंत्र कातडीवर कितीही रेंटून फिरवलं तरीही... ...इतकं हे सगळं साधं-सोपं-सरळ प्रकरण होतं...!!!

तथापि तब्बल अठराशे रुपये मोजलेल्या त्या यंत्राला चार रुपयांच्या प्लॅस्टिक रेझरसारखी केराची टोपली तर दांखवतां येणार नव्हती... ...

म्हणून मी उद्दिष्ट साध्य होईंतोंवर त्या च यंत्रानं दाढी भागवायची,आणि पूर्ण चंपट्या आकारांची र्तकाग्रं असलेलं यंत्र मिळेतोंवर शोंध घेत रहायचा निर्णय घेतला, आणि तो विषय डोंक्यातनं कांढून टांकला... ... ...

योगायोग असा, की पुढील एक आंठवडाभंरातच आंतरजालावरच्या दुकानांत मला अभिप्रेत असलेलीं यंत्रं सापडलीं...!!

गंमत ही, की तीं एकजात सगळींच यंत्रं ' स्त्रीश्मश्रूयंत्रं ' या च नांवानं बाजारात उपलब्ध होतीं... ...!!!

त्या यंत्रांची र्तकाग्रं आणि त्यारील जाळ्या हे सगळे भाग दोन-अडीच इंच लांबीचे अर्धदंडगोलाकार होते. त्यामुळं त्यांच्या जाळ्यांची संपूर्ण लांबी दाढी करतांना कातडीला चिकटून फिरणार असं माझ्या ध्यानांत आलं...साहजिकच तश्या यंत्रांनी वस्तराछाप तुळतुळीत दाढी करतां येऊं शकेल असं अनुमान निघत होतं... ...प्रश्न होतां तो फक्त तसलं यंत्र प्रत्यक्ष वांपरून खात्री करण्याचा. पण तेही फार अडचणी चं दिसत नव्हतं...यंत्रांच्या किंमतींचा विस्तार साधारणपणे सहासातशे रुपयांपासून ते कमाल आठ हजारांपर्यंत होता... ...

 

मी मग त्या यंत्रांचं चंढत्या किंमतींनुसार वर्गीकरण केलं,आणि अगदीच खालच्या पायरीवरचं सवंग दर्जाचं पण नको, आणि ते पण वाया जायचं नशिबात असलं तर आर्थिक फंटकाही ज्यास्त नको, असं बघून सौ. इंदिराजी नां कांहीच थांगपत्ता लागूं न देतां सातशे रुपये किंमतीच्या एका यंत्राची र्डर देऊन टांकली...

जर यंत्र पसंत नाहीच पडलं, तर तें मिळाल्यापासून पुढील दहा दिवसांत परत करून पैसे परत घ्यायची पण सोय होती. त्यामुळं फिलिप्स च्या यंत्रासारखा पैसे वाया जायचा धोंका पण नव्हता त्यांत... ... ...

नेहमीप्रमाणं तीन-चार दिवसांनंतर सदर यंत्राचं पार्सल एक दिवस सकाळींच हंजर झालं...

योगायोगानं दाढीही करायची होतीच... ...

म्हणून मग मी सकाळचा चहा, व्यायाम,पेपर वाचन वगैरे सगळ्या गोष्टी आंवरून दाढीची सर्व तयारी केली... ...

गळा-हनुवटी-गाल-ओंठांशेजारचा भाग इ. सगळिकडं पाण्याचा हात फिरवून घेंतला, आणि चांचणी म्हणून नवीन यंत्र चालूं करून हनुवटीवर चारी दिश्यांत हंलक्या हातानं फिरवलं... ...

मग हाताच्या तळव्यानं तो भाग चांचपून पाहिला, आणि , “ या ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ हू ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ " अशी अत्यानंदानं आरोळी ठोंकीत उडीच मारली नाही एव्हढंच काय ते... ... ...

नवीन यंत्रानं अगदी शब्दशः थेट वस्त-यासारखीच तंतोतंत तुळतुळीत दाढी झालेली होती...!!!

मी परत एकदां खात्री करायला दुस-या हाताचा तळवा हनुवटीवरून फिरवला...

कसली शंका घ्यायला जागा च नव्हती... ... माझ्या ' मूलतत्त्व खोदाई ' ला मधुर फळ आलेलं होतं... ...

अगदी वस्त-यानं केल्यासारखी तुळतुळीत सफाचट् दाढी... ...ती पण केवळ सातशे रुपयांच्या यंत्रानं, आतां वस्त-यानं कापाकापी व्हायचा धोंकाही अजिबात राहिलेला नव्हता... ...आणि यंत्राची संपूर्ण दोन अडीच इंच लांबीची जाळी त्वचेला टेंकून दाढी भादरत फिरत असल्यानं एका झंटक्यात तितक्या रुंदीचा पट्टा सफाचट् भांदरून निघत होता... ...

मी आख्खी दाढी फिलिप्स चं यंत्र जितका वेंळ खात असे, त्याच्या एक पंचमांश वेळात म्हणजेच केवळ पांच-सात मिनिटांतच भादरून मोकळा झालो... ...!!!

मग तोडावर पाणी बिणी मारून आरश्यात बघत तें फडक्यानं पुसून कोंरडं करीत सौ. इंदिराजी ना हांक मारली,” अहो... ...अहो जरा इकडं या बघूं ताबडतोब... ...

सौ. इंदिराजी हातांत परत ती एक किलो ची हळदीची बरणी घेऊन डुलत डुलत आल्या... ...

त्यांनी बेसिन वर ठेंवलेल्या ' स्त्रीश्मश्रूयंत्रा ' कडं संशयानं बघितलं...पण बोलल्या कांहीच नाहीत,” काय झालं एव्हढा आरडाओंरडा करायला ?... ...घ्या ही हळद... ...”

मी,” हळदीची आतां अजिबात गरज उरलेली नाही इंदिराजी... ...”

सौ. इंदिराजी,”... ...म्हणजे ?... ...मला वाटलं की...की...”

मी हंसलो,” मी परत चेह-याचं भदं करून घेतलं... ...होय ना ?”

सौ. इंदिराजी,” होय...तसं वाटलं, म्हणूनच तर ही हळदीची बरणी घेऊन आले... ...झाली दाढी करून ?... ...कुठं रक्तपात बिक्तपात झालेला तर दिसत नाहीय् म्हणून विचारलं...”

मी,” अहो, नुसती तुळतुळीत दाढी करून झाली नाही, तर चक्क पूर्वीच्या मानानं फक्त एक पंचमांश वेंळातच झालीय दाढी करून माझी... ...आहांत कुठं ?”

सौ. इंदिराजीं नी आतां बेसिनवर पडलेल्या त्या ' स्त्रीश्मश्रूयंत्रा ' कडं बोट दांखवलं,” ' ह्या ' चा प्रताप वाटतं हा...?”

मी,” होय तर... ...हे माझ्या मूलभूत संशोधनाचं फळ... ...”

सौ. इंदिराजी नी माझ्या दाढी झालेल्या तुळतुळीत तोंडापुढं हात ओंवाळले,” धन्य आहे तुमची...हे एव्हढंच काय ते करायचं शिल्लक राहिलेलं होतं...!!!...आतां एक झकासपैकी ' लेडीज् ब्यूटी पार्लर ' सुरूं करा, म्हणजे मी पण धन्य होईन एकदाची...!!! “

मी आतां तंडकलो ,” झंक् मारलं तुमचं ' ब्यूटी पार्लर '...समजलांत ?... ...दाढी कशी झालीय ते बघा जरां हात फिरवून, न् सांगा मला ती वस्त-यासारखी सफाचट् झालीय की नाही ते... ...त्यासाठी हांक मारली तुम्हांला...कळलं ?”

सौ. इंदिराजी,” चेहरा कुरवाळून बघूं ?...आणि आत्तां ह्या वेळीं ?... ...डोंकं ताळ्यावर आहे ना तुमचं ?”

मी,” अहो तसलं कांही नव्हे हो...फक्त जरा हात लावून बघा, न् सांगा, की दाढी खरंच छान झालीय की नाही ते... ...पक्की खात्री व्हायला ' सेकंड ओपिनियन ' घेंतलेलं बरं म्हणून हांक मारली तुम्हांला मी... ...यांत कांही चांवटपणा वगैरे नाही माझा...कळलं ?”

सौ. इंदिराजी नी एक संपूर्ण मिनिटभंर समोर उभ्या रहात माझी दाढी डोंळे बारीक करीत अगदी बारकाई नं न्याहाळली...”

मी,” कशी काय झालीय दाढी ?...बोला...”

आणि सौ. इंदिराजी नी हाळदीची बरणी उचलून पांठ फिरवीत त्यांची हुकमी धोबीपछाड मारून मला चितपट लोळवलं,” आतां चित्रपटसृष्टीत हेलन नंतर तुमचा च नंबर लागेल... ...!!! “

सौ. इंदिराजी हीः हीः हीः हीः करीत स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या... ... ...

आणि मी हातातल्या ' स्त्रीश्मश्रूयंत्रा ' कडं बघत कपाळावर हात मारून घेंतला...!!!


*************************************************************

-- रविशंकर.

१२ जुलै २००२.

 

 

 

 



























































































































































































































 


No comments:

Post a Comment