Search This Blog

Friday 25 February 2022

|| रजकश्वानसंस्थिति: ||

 

,” बाबा...कधी कधी ना, तुमचं कांही कळतच नाही बघा... ...

सगळेच मरतात हल्ली ' यू. एस्.’ ला जायला, तर तुमचं हे असं... ... चांगला ' यू. एस्.’ ला जायचा कधी नव्हे तो ' गोल्डन चान्स ' आलाय, तर तुम्ही च असे मोडता घालायला लागलाय.. ” आमचे चिरञ्जीव तोंड कसनुसं करीत वंतवंतले... ...

२००९ सालातल्या ऑक्टोबर महिन्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती.

चिरंजीव मिली आणि स्नुषा सौ. क्षितिबाई दिवाळीच्या सुट्टीला जोडून आंठवडाभंराची रजा काढून घरीं दिवाळी साजरी करायला आदल्या दिवशीच बेंगलोरहून पुण्याला आलेले होते. आणि सकाळच्या नाष्ट्याला मेजावर आम्ही बसलो, तेंव्हां चिरञ्जीवांनी तो विषय उपस्थित केलेला होता... ...

मिली - क्षिति च्या जोडी नं त्या काळांत बेंगलोर ला तंबू ठोंकलेला होता. सौ. क्षितिबाई बेंगलोरांत एका अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापिका म्हणून चिकटलेल्या होत्या, आणि मिली महाराज बेंगलोरस्थित ' जी. .’ कंपनीत आदल्या वर्षभंरापासून रूजूं झालेले होते... 

आठएक दिवसांपूर्वीच त्यांना ही ' एअर बस ' नांवाच्या बोइंग विमानं बनवणा-या कंपनीत परदेशगमनाची सुवर्णसंधी चालून आलेली होती, पण मुलांना त्या वयांत अमेरिकेला जाऊं द्यायला माझा ठाम विरोध होता, आणि त्या मुद्द्यावरच संघर्ष पेंटलेला होता... ... ...

,” आलीय इतकी छान संधी चालून, तर ती घ्यायला काय हंरकत आहे हो? ”, सौ. इंदिराजी नी लेक-सुनेची तळी उचलून धंरली.

सौ. क्षिति ,” कां हो बाबा पण ?... ...कां नको जायला म्हणताय तुम्ही ?...म्हणजे...कांहीतरी ठोस कारणच असेल तर... ...”

मी,” कळपातल्या सगळ्या मेंढ्या खड्डयात उड्या मारतायत, म्हणून आपणही बिनडोकपणे खड्डयात उडी मारायची नसते क्षिति...तसं करणं आपल्या हिताचं असतंच असं नाही.”

मिली,” बाबा, पण कारण तर सांगाल... ...कां नको जायला अमेरिकेला ?”

मी थंडपणे उत्तरलो,” तुमचे दोघांचे वर्षभंरात आंचरट भणंग झालेले बघायचे नाहीत मला, म्हणून...”

 


चिराञ्जीव उसळले,” बाबा...हे कांहीतरी अति च बोलताय बरं का तुम्ही... ...इतके ढिगानं लोक अमेरिके ला जातात...ते सगळे च आंचरट होतात, असं म्हणायचं आहे काय तुम्हांला ?”

मी, “ शेंकडा ऐंशी टक्के महाभागांचं तें च होतं... ...वास्तव सांगतोय तुला मी...माझं मत नव्हे...”

 


सौ. क्षितिबाई, “ भणंग होतात, म्हणजे नेमकं काय होतं हो बाबा ?”

मी, “ फार छान प्रश्न विचारलास क्षिति... ...ते परिवर्तन फार मजेशीर पध्दतीनं होतं... ...त्याची सुरुवात झाली हे कुणाच्या लक्ष्यातही येत नाही... ...आणि जेव्हां लक्ष्यात येतं, तोंपावेतों कांही करायची वेंळ पण टंळून गेलेली असते... ...

चिराञ्जीव, “ तें कसं काय ? ”

मी," सांगतो... ...आंचरट व्हायची सुरुवात सर्वप्रथम फांटक्या-विटक्या जीन्स वापरायला लागण्यापासून होते...ज्या शहाणा मनुष्य लादी पुसण्यासाठी सुध्दां हातांत धंरणार नाही...मग टेरिवूल च्या भारदस्त पाटलोणी आंवडेनाश्या होतात... ...कारण त्या एक-दोनदां वापरल्या, की धुवाव्या लागतात... ...बरोबर ? ”

क्षिति, “ हे मात्र अगदी बरोबर बरं का बाबा... अहो आमच्या कॉलेजातली पोरं बघते ना मी...लेकाची सहा सहा महिने सुद्धां धूत नसतील त्या जीन्स बघा...इतक्या कळकट घाणेरड्या दिसतात त्या... ...ईईईई... ...शी शी शी शी... ...पोतेरीं बरी म्हणावी त्यांपेक्षां...”


 

मी, “ मग हळूं हळूं अंघोळी चा कंटाळा यायला सुरुवात होते...ती दिवसाआड सुरूं होते... ...त्यापुढं मग साप्ताहिक अंघोळ...बाकीच्या दिवशीं ' डी ओ.’ फंवारून भांगवणे...!! ... ...काय ? ” 

सौ. क्षितिबाई आतां तोंड फिरवून ' खीः खीः खीः ' करायला लागल्या...!!!...चिराञ्जीव नुस्तेच ऐकत होते...

मी विवेचन-प्रवचन सुरूं च ठेंवलं,“ मग यथावकाश हळूं हळूं दाढी करायचा कंटाळा यायला लागतो... ...बरोबर ? ”


 

सौ. क्षितिबाई चिरञ्जीवांच्या बोंटभंर वाढलेल्या खुण्टांकडं बघत कपाळाला हात लावून ' हीः हीः हीः हीः ' करायला लागल्या...

,“ बाबा...बरोबर आहे तुमचं अगदी...मला कधी कधी या मुद्यावर फंतवे काढावे लागतात घरात... ...” 

आणि चिरञ्जीवांनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!,“ काय हे बाबा... ... ..."

मी,“ मग केशकर्तनविधि हा हळूं हळूं षण्मासिक आणि अखेर वार्षिक होऊन बसतो...

आणि अश्या त-हेनं ह्या यू. एस. वेड्यांचे शेंवटी आंचरट भणंग होऊन बसतात...

सौ. क्षितिबाई,“ ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः... ... ...बाबा धन्य आहे तुमची...”

मी,“ धन्य यू. एस. वादी आंचरटांची आहे बाबानों... ...पुढचं ऐका...”

 


चिरञ्जीवही आतां कपाळाला हात लावत,“ खीः खीः खीः करत म्हणाले,“ बस बस बाबा आतां... ...बास करां...”

मी चेहरा मख्ख च ठेंवला,“ अजून पुढचं सांगायचं बरंच बाकी आहे बाबा... ...ऐका तर...”

अन् सौ. क्षितिबाईनी च पांढरं निशाण फंडकवलं,“ पुरे बाबा आतां... ...खाल्लीं तेंव्हढीं बास झालीं... ...खीः खीः खीः...”

मी,“ आतां एका छानश्या सुभाषितानं समारोप करतो... ...चालेल ? “

सौ. क्षितिबाई,“ अरे वा वा... ...सुभाषित?... ...चालेल बाबा...हं सांगा...”

मी,“ सुभाषितं आपल्याला प्रचण्ड शहाणपण शिकवत असतात हे नेहमी ध्यानात ठेंवा... आतां हे चाणक्य नीतितलं च सुभाषित बघ... ...आचार्य विष्णुशर्मा सांगतायत की...


|| काकापुरे निवासाऽर्थे स्वयं गच्छति यो बक:

      काकार्न परिवर्तन्ते, बकैव वायसो भंवेत्  ||


सौ. क्षितिबाई,“ काकापूर म्हणजे कुठलं गांव होतं काय त्या वेळीं बाबा ?”

मी,“ ' कावळ्यांचा थंवा ' या अर्थानं चाणक्यानं तो शब्द वापरलाय...”

चिरञ्जीव,” असं होय ?... ...बरं पुढं ?”

मी मग समारोप केला,“ तर चाणक्य ऊर्फ आचार्य विष्णुशर्मा सांगतायत, की एख़ादा बगळा जर काकापुरा त – म्हणजेच कावळ्यांच्या थंव्यात आपणहून नांदायला गेला, तर थंव्यातल्या बहुसंख्य शेकडों कावळ्यांत काडीचाही फंरक पडत नाही, तर उलट त्यांचे च गुण अंगीं चिकटून त्या एकाकी परक्या बगळ्याचा च कालांतरानं अखेर कावळा होतो, आणि तोही काव काव करायला लागतो... ...

तसं तुमचं होऊन बसूं नये, हे मी तुम्हांला मघांपासून सांगतोय...

एक नेहमी लक्ष्यांत ठेंवा पोरानों कुठल्याही बाबतीत ' काय करावं ' हे माणसाला एखाद्या वेळीं नाही कळलं, तरी त्याचं कांहीही बिघडत नसतं, ते शहाणपण प्रसंगानुरूप कधी ना कधी स्वानुभंवानं कळतंच... ...

पण ' काय करायचं नाही ' हे ठामपणे समजणं, हे मात्र निर्णायक महत्त्वाचं असतं...........

कारण तें च जर नाही समजलं ना, तर माणूस स्वतः च स्वतःच्या पायांवर धोंडा कधी मारून घेतो, हे त्याचं त्यालाही समजत नाही... ...काय ? आणि हे बघा...तुमची आयुष्यं तुम्हांलाच जगायची आहेत...तीं रसिकतेनं, विचक्षण शहाणपणानं जगायची, की महा आंचरटांसारखी जगायची हे तुमचं तुम्ही च ठंरवायला हवं, कारण तुम्हीं जे कांही कराल, त्याची बरी-वाईट फळं - जी काय असतील ती - तीं ही तुम्हांला च पत्करायची आहेत...आम्हांला नाही... ...तेव्हां नीट विचार करून काय ते करां...आमचं काम फक्त शहाणपण शिकवणं... ... कळलं आतां सगळं नीट ? ”

चिरञ्जीव, “ हो...आलं लक्ष्यांत सगळं बाबा...विचार करतो काय करायचं ते... ...”

विषय तिथंच संपला........

चिरञ्जीवानां काय वाटलं कुणास ठाऊक...त्यांनी ' यू. एस.’ चं खूळ डोंक्यातनं काढून टाकलं असावं... ... ...


पण माझ्या भाषेत सांगायचं, तर ' परदेशगमनकिड्या ' चा ' तेरावा ' कांही घातला गेला नाही...

असं च वर्ष दीड वर्ष उलटलं...

आणि जोडी पुढच्या दिवाळीत जेव्हां पुनश्च घरीं आली, तेव्हां परत ' पुनरागमनाय च ' सुरूं... ...

या वेळीं दस्तुरखुद्द सौ. क्षितिबाई नी च पुढाकार घेतलेला होता, “ बाबा... ...”

मी, “ काय गं ? ”

सौ. क्षितिबाई तश्या सौ. इंदिराजीं च्या तालमीत मुरलेल्या राजकारणी, “ बाबा...म्हणजे हा विषय तसा आईं बरोबर बोललेय मी...आणि त्यांची संमती पण आहे... ...”

मी, “ छान...म्हणजे माझा राष्ट्रपति करून ठेंवलायस म्हण की सरळ... ...फक्त सही चा मालक...शिक्के ह्यांनी आधीच मारलेले दिसतायत...” मी सौ. इंसिराजी कडं निर्देश करीत म्हणालो... ...

आमच्या सौ. इंदिराजी फक्त हंसल्या... ...

मी, “ बरं...आतां तरी सांगशील...इंदिराजीं चा वटहुकूम काय आहे तो ? ”

सौ. क्षितिबाई, “ तसं नव्हे हो बाबा... ...”

मी, “ तसं नव्हे ?... ...मग कसं आहे ? ”

सौ. क्षितिबाई नी आतां कपाळाला हात लावला... ...," बाबा...तुमच्याशी बोलायचं ना, म्हणजे उलट तपासणी ला सामोरं जायची तयारी ठेंवून च तोंड उघडावं लागतं... ...!! ”

मी, “ मी तरूणपणीं इंदिराजीं ची शिकवणी लावलेली होती...!!! ”

सौ. क्षितिबाई, “ हीः हीः हीः हीः.... ...तर मी काय म्हणतेय बाबा... ...”

मी, “ हं म्हण काय ते...”

आतां चिरञ्जीवांनी सूत्रं हातात घेतली, “ आम्हांला परत परदेशीं जायचा चान्स आलाय... ...”

मी, “ कुठल्या कंपनीत संधी मिळालीय तुला ? ”

चिरञ्जीव, “ ' रोल्स-रॉईस ' कंपनीत... ...इंजिन्स विकसन-उत्पादन विभागात...”

मी, “ अरे वा... ...छान...चांगलीच बाजी मारलीस की तूं...”

सौ. क्षितिबाई, “ मग...तुम्हांला काय वाटतंय बाबा... ...जाऊं आम्ही ?...कांही हरकत नाही ना तुमची?”

मी, “ अगं पण कुठल्या देशात जायला निघाला आहांत तुम्ही ?”

सौ. क्षितिबाई, “ इंग्लण्ड ला बाबा... ...जाऊं ?”

मी, “ जेवायलाही नाही थांबलांत तरी चालेल... ...शुभाऽस्ते पंथान: ... !! ”

सौ. क्षितिबाईं चा चेहरा उजळला, “ थॅंक यू बाबा... ...मला वाटत होतं की...”

मी, “ मी आडवा पडणार... होय ना ?”

आतां चिरञ्जीवांनी शड्डू ठोंकला, “ बाबा...हे तुमचं म्हणजे अगदी विचित्र आहे बरं का...म्हणजे गेल्या खेपेला जेव्हां मी विचारत होतो, तेव्हां अगदी ठाम व्हेटो... ...आणि हि नं विचारायचा अवकाश, की थेट ' जेवायलाही नाही थांबलांत तरी चालेल ' ... ... अति च पक्षपात चाललाय तुमचा हा...”

मी,“ तसं अजिबात नाही...”

चिरञ्जीव आतां भिडलेच,“ ' तसं ' नाही?...मग ' कसं ' आहे ?”

मी, “ तुमच्या ह्या वयांत नांदायला कुठं जाऊं नये हे तुला कळलं नाही, आणि कुठं जावं, ते क्षिति ला बरोबर कळलं, म्हणून तसं झालं...यात पक्षपाताचा सुतराम संबंध नाही... ...”

चिरञ्जीव, “ तुम्ही मुद्याला फांटा मारताय बाबा... ...पक्षपातच आहे हा... आणि तसं नसेल, तर मग ह्या तुमच्या ' पीछे मुड ' चा खुलासा करा...”

मी, " ठीकाय...करतो. मागच्या वेळेला मी तुम्हांला ' काकापुरे...’ चं सुभाषित सांगितलेलं होतं... ...म्हणजे ' व्हेटो ' चा खुलासा तेंव्हांच झाला... ...मान्य ?”

चिरञ्जीव, “ होय...मान्य.”

मी, “ ‘ आतां जेवायला पण नाही थांबलात तरी चालेल ' असं कां म्हणालो, ते सांगतो... ...

मी तुम्हांला एक गोष्ट नेहमी सांगत असतो...

ती ही, की माणसाला कधी, कुठं, आणि केव्हां ' काय करायला हवं ‘, हे प्रसंगीं कळलं नाही, तरी त्यानं कांही फारसं बिघडत नाही. नंतर कधीतरी ते त्याला अनुभंवातनं शिकायला मिळतंच, पण ' काय करायचं नाही ‘, हे मात्र ठामपणे पंचलेलं - नुस्तं समजलेलं पण पुरत नाही - असावंच लागतं, नाहीतर माणूस स्वतःच्याच कर्मानं स्वतःच्याच पायावर कु-हाड मारून घेतो... ...इथपर्यंत समजलं ? ”

क्षितिबाई, “ होय...समजलं बाबा. “

मी, “ आतां तुमच्या स्वकर्तृत्त्वानं तूं ' रोल्स रॉईस ' सारख्या जगप्रसिध्द कंपनीत.....तें ही तिथल्या इंजिनं बनवणा-या म्हणजेच कळीच्या तंत्रद्न्यान विभागात - काम करायला जातोयस, यातच आई-वडील म्हणून जे काय आम्हांला मिळायचं, ते मिळालं... ...आतां तुला तिथं पगारपाणी किती देतायत, हे कांही मी तुम्हांला विचारलेलं नाही...आणि त्यात आम्हांला - म्हणजे मला आणि तुझ्या आई ला - कांहीच रस नाही...पण अर्धं जग तब्बल दीडशे वर्षं टांचेखाली रगडायला अंगात काय पाणी असावं लागतं, आणि मनगटांत कसली धंमक असावी लागते, ते शिकून -प्राप्त करून-दोघे परत या,...त्यासाठी तुम्हांला इंग्लंड ला पांठवतोय आम्ही... ...

अमेरिका - जिथं जायला आपल्याकडची बिनडोंक पोरं स्वतःला विकून घ्यायलाही एका पायावर तयार असतात – हा देश मुळातच संस्कृतिशून्य देश... ...गाड्या, मॉल्स, चंगळबाजी, आणि सात आठ पर्यटनस्थळं, यांपलीकडं जिथं कांहीही नाही, खिश्यात असलेल्या डॉलरच्या थप्पीबरहुकूमच जिथं माणसाची किंमत ठंरते, आणि ' स्वतः जगा आणि इतरांना खुशाल मरूं द्या ' एव्हढीच जिथली संस्कारमूल्यं आहेत, असल्या समाजात राहून कुणाचाही वर्षभंरात पार भणंग मनुष्य च होत असतो... दुसरं काय होणार ?

काकापुरे निवासाऽर्थे ...’ चा अर्थ आतां तरी समजला नीट ? "

सौ. क्षितिबाई, “ हो बाबा... ...समजला...”

आतां जे कुणी ते करायच्या नादाला लागतात, त्यांचं पुढं काय होतं ते ऐका... ...

सौ. क्षितिबाई, “ म्हणजे बाबा... ...तस्मादपि रसास्वादं...होय ना ?”

मी सौ. क्षितिबाईं ची पांठ थोंपटली, “ अगदी बरोबर ओंळखलंस...तर सुभाषितकार म्हणतायत की


|| स्वजनद्वेषव्यवहारेणेकाकिन्भंवति मानवः

      न गृहे न नदीतीरे, रजकश्वानसंस्थितिः ||


चिरञ्जीव, “ म्हणजे काय हो बाबा ? ”

मी, “ त्याचा अर्थ असा आहे, की...

जो मनुष्य दुस-याच्या कच्छपीं लागून आपल्याच माणसांंचा द्वेष करायला लागतो, त्याचे आप्तेष्ट कंटाळून अखेर त्याचा तिटकारा करायला लागतात, आणि ज्यांच्या नादाला लागून तो हे करीत बसतो, त्यांच्या लेखीं तो त्यांचासाठी ' आप्त ' ही नसतो आणि ' इष्ट ' तर त्याहून नसतो... ...

सौ. क्षितिबाई, “ हे समजलं बाबा...पण ते पुढचं रजक बिजक काय भानगड आहे ?”

मी, “ ऐक...संस्कृतात धोब्याला ' रजक ' असं म्हणतात...” 

सौ. क्षितिबाई, “ ओ हो हो हो...आणि श्वान म्हणजे कुत्रं...म्हणजे... ...हिंदी भाषेत म्हणतात तसं... ...

' धोबी का कुत्ता, ना घरका ना घाट का... ...’ !!...असंच ना बाबा ?”

मी, " आतां कसं बोललीस... ...अगदी हें च या चंगळबाज अमेरिका वेडपटांचं शेंवटीं होऊन बसतं... ...

 

एकदां कां त्यांना ' डॉलर ' चा सत्तरी चा गुणाकार दिसायला लागला, की मग त्यांना अमेरिका म्हणजे अगदी स्वर्ग च वाटायला लागतो... ...

सौ. क्षितिबाई, “ हे अगदी बरोबर आहे बरं कां बाबा... ...अहो माझ्या दोनतीन मैत्रिणी फक्त पर्यटक म्हणूनच केवळ पंधरा दिवस च काय त्या अमेरिकेला जाऊन आल्या काय, आतां बघावं तर जातां-येतां त्यांची ' अमेरिका स्तवना ' ची एल्. पी. लोकांचे कान किटेतोंवर अखंड वाजत असते बघा... ...अगदी वीट येतो त्या लाळगळी चा... ...”

मी, “ तरी त्यात कांही अति च चुकतं, असं नाही...त्याचं काय आहे, की एखादी गोष्ट फारच आवडणं यात कांही चुकीचं नसतं... ...अमेरिका हा भूप्रदेश जसा असायचा तसा आहे...कुणाला तो आवडेल, कुणाला नाही आवडणार...त्यात गैर कांहीच नाही... ...पण या अमेरिका वाद्यां चं होतं असं, की हळूं हळूं ते स्वतःला च अमेरिकन समजायला लागतात, आणि तसंच आपल्या इथं च रहायला-वागायला लागतात... ...मग त्यांना आपल्या इथलं सगळंच - अगदी आपल्या संस्कृतिपासून ते सग्या-सोय-यापर्यंत – तद्दन फालतू वाटायला लागतं...

मग ह्या अमेरिके च्या कच्छपीं लागलेल्या वर्गातले चाळिशी-पन्नाशी चे पुरुष-बायका ' लेग्गी-बर्म्युडा ' घालूनच समाजात वावरायला लागतात...अगदी सारासार तारतम्य सोडून...”

सौ. क्षितिबाई, “ हीः हीः हीः हीः... ...पण तारतम्य सोडून कसं काय हो बाबा ? ”

मी, “ बघितलं नाहीस कधी ?...म्हणजे कार्यालयात जातांना बर्म्युडा... ...बाजारात जातानांही ती च अंगावर... ...लग्नकार्याला जातानां पण बर्म्युडातच... ...आणि कुणाच्या मयतीला जातांनाही ती च बर्म्युडा अंगावर... कपडे बदलायचे कष्ट कोण घेणार ?...काय ?”

सौ. क्षितिबाई, “ फीः फीः फीः फीः फीः... ...”

मी, “ हळूं हळूं मग ह्या ' लेग्गी-बर्म्युडा ' छाप आईबापांच्या विशी-पंचविशी तल्या पोरीबाळी अर्ध्या चड्ड्या घालून सगळीकडं राजरोस फिरायला लागतात... ... ...”

सौ. क्षितिबाई, “ ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः... ...”

आतां चिरञ्जीवानी च कपाळाला हात लावला, " खीः खीः खीः... ...काय हे बाबा...”

मी, “ काय हे काय ?... ... बाबांनों... ...बघताय ना सगळीकडं ह्या अमेरिकन व्हायच्या चंढाओढीला कसा ऊत आलाय तो ? ”

सौ. क्षितिबाई, “ बरोबर आहे बाबा तुमचं...कितीही आंचरट वाटलं ना, तरी हे वास्तव ब्रह्मदेवालाही नाकारतां येणार नाही...कितीही कडू लागलं तरी.”

मी, “ पटतंय ना ?...तर मग यथावकाश ह्या अमेरिकावाद्यां च्या मेंदूं चा ताबा ' मी पणा ' पटकावून बसतो, आणि इथल्या आप्तेष्ट-मित्र-परिचितांबरोबर चं त्यांचं वागणं-बोलणं-व्यवहार सगळंच चंढेलपणाचं होऊन बसतं, आणि इथं च नेमका सगळा बट्टयाबोळ होतो... ..असलं चंढेलपणा चं वागणं कुणाला आवडणार ?हळूं हळूं मग इथले त्यांचे आप्तेष्ट-मित्र-परिचित सगळे च त्यांना दुरावतात... "

," अगदी बरोबर आहे हे बाबा तुमचं निरीक्षण ", सौ. क्षितिबाई, “ मी असे कितीतरी घडलेले प्रसंग प्रत्यक्ष च बघितलेत...”

मी, “ बरोबर ना ?...आतां ह्या नाण्याची दुसरी बाजू काय असते, ते सांगतो... ...

' कुठलाही समाज घरात आलेल्या पाहुण्याला जेवायचं ताट देईल, पण त्याला बसायचा पाट देऊन आप्त-स्वकीय म्हणून कधीच स्वीकारत नसतो ' हा जगभंरातला व्यावहारिक कायदा... ...हे ही बरोबर ? ”

सौ. क्षितिबाई, “ बाबांचं विश्लेषण शंभर टक्के बरोबर आहे मीलन... ...पंचायला जड वाटलं तरी...

अगदी अलीकडं डोनाल्ड ट्रंप नी ' अमेरिकन फर्स्ट ' ची गर्जना केली होती ना, तेव्हां मी काय झालं ते वाचलंय पेपरांत...फार कश्याला, तेव्हां अमेरिकेत राहणा-या माझ्या मित्रमंडळातल्या तीन चार कुटुंबांतल्या लोकांनी तर जाम टंरकून आपल्या भारतीय नागरिकत्त्वावरही पाणी सोडल्याचं ठाऊक आहे मला... ...एक प्रकारची आत्महत्या च म्हणायला हंवी ही... ”

मी, “ अगदी बरोबर बोललीस तूं क्षिति... ...ह्या कृति ला ' स्वत्त्वा ची आत्महत्या ' असं म्हणतात........कुणाच्या तरी कच्छपी लागलेल्या माणसांच्या कपाळीं सटवाई नं तेंच विधिलिखित कोंरलेलं असतं बाबानों... ...आपलं घर-माणसं-देश सोडून गेलेला मनुष्य जगाच्या पाठीवर अगदी थेट उत्तर ध्रुवावर जरी रहायला गेला ना, तरी तिथल्या मूळ नागरिकांच्या दृष्टीनं तो उपरा च असतो......फार तर त्याला ' श्रीमंत उपरा ' म्हणतां येईल... ...”

सौ. क्षितिबाई नी आतां कपाळाला हात लावला, “ खीः खीः खीः खीः .... ....' श्रीमंत उपरा '...पण ' कच्छपी ' म्हणजे काय हो बाबा ? ”

मी हंसलो," ' कच्छपी ' नव्हे क्षिति... ...' कच्छप ' असा शब्द आहे तो संस्कृत भाषेतला... ...”  

सौ. क्षितिबाई, “ तें ठीकाय...पण ' कच्छपीं लागणं ' याचा नेमका अर्थ काय बाबा ? ”

मी, “ सांगतो... ...तुमच्या पिढी ची ओंळख म्हणजे विटक्या-फांटक्या-दश्या लोंबणा-या जीन्स... ...बरोबर ?"

सौ. क्षितिबाई, “ फीः फीः फीः फीः... ...”

चिरञ्जीव, “ बाबा... ...तसं कांही नाही बरं का...उगीच आपले खेंचत सुटलाय तुम्ही सगळ्यांना ... ...”  

मी, “ बहुतांशी तसंच दिसतंय की सगळीकडं आजकाल... ...जाऊं दे ते...कच्छप शब्दाची व्युत्त्पत्ति आधी समजून घ्या...तर मी काय सांगत होतो क्षिति तुम्हांला ? ”

सौ. क्षितिबाई, “ विटक्या-फांटक्या...”

मी, “ हां.....आणि आमच्या पिढी ची ओंळख म्हणजे नुस्त्या धुतलेल्या, किंवा इस्त्री केलेल्या सुती-टेरिकॉट-टेरिवूल च्या पॅंट आणि पांच-सहावारी साड्या... ...हे पण बरोबर ? ”

सौ. क्षितिबाई, “ बरोबर...”

मी, “ आणि आमच्या आधीच्या पिढ्यांची ओंळख म्हणजे स्वच्छ धुतलेलं करवतीकांठी धोतर -कोट, आणि नऊवारी पातळं.....

तर खेडेगावांत हिंडता-फिरतांना तुम्ही बघितलं असेल, की धोंतर नेसलेला पुरुष किंवा नऊवारी नेसलेल्या स्त्रियांच्या बरोबर जी लहान मुलं रस्त्यातनं चालत असतात ना, त्यांनी आई च्या पदराचं टोंक किंवा कासोटा, आणि वडील असतील तर त्यांच्या धोंतराचा कासोटा किंवा सोगा मुठीत गच्च पकडून धंरलेला असतो....भंरकटूं नये म्हणून...”

चिरञ्जीव, “ होय...होय...कितीतरी वेळां बघितलंय बाबा...”

मी, “ त्यामुळं होतं काय, की पोरं-बाळं रस्त्यात कुठं भंरकटत नाहीत, आणि ज्याचा सोगा म्हणा कासोटा म्हणा त्या पोरानं धंरून ठेंवलेला असतो, ते माणूस जिकडं जाईल, तिकडं तें पोर त्याच्या पांठोंपाठ आपोआपच फंरपटत जातं... ...बरोबर ? ”

सौ. क्षितिबाई, “ अगदी बरोबर बाबा...ते पोर इकडं-तिकडं कुठंही बघत असलं ना, तरी त्याचे आई,वडील जे कुणी असेल, त्याच्या मागोमाग बरोब्बर फंरपटत जातं... ...”

मी, “ तात्त्पर्य काय, तर एकदां कुणाचा तरी कासोटा- सोगा घट्ट पकडला की तो मनुष्य नेईल तिकडंच फंरपटत जाणं, एव्हढंच त्या पोराच्या नशिबात शिल्लक राहिलेलं असतं...त्याच्या स्वतःच्या इच्छेनं तें दुसरं कांहीही करूं शकत नसतं... ...”

सौ. क्षितिबाई, “ पण या सगळ्याचा आपल्या चर्चेशी संबंध कुठं येतो ? ”

मी हंसलो, “ तें साडी-धोंतरा चं सोगा-कासोटा वगैरे-जे कांही असतं ना त्या पोरानं मुठीत घट्ट पकडून धंरलेलं, त्याला संस्कृत भाषेत ' कच्छप ' असं म्हणतात... ...”

सौ. क्षितिबाई नी आतां थंक्क होत पुन्हां कपाळाला हात लावला, “ ओ हो हो हो हो...असं आहे तर एकूण सगळं... ... !!! एकदम मस्त बाबा... ... ' लय भारी ' पैकी आहे हे .... ....जन्मात कधी विसरणार नाही हे प्रवचन मी...”

मी," तुम्ही अमेरिकेला जायला निघाला होतां ना, तेव्हां ' काय करायचं नसतं ' हे तुम्हांला धंडपणे समजलेलं नव्हतं, आणि आतां इंग्लंड ला जायला निघालेले असतांना ' काय आवर्जून करायचं असतं ' हे ही धंडपणे समजलेलं नव्हतं, म्हणून तुम्हांला माझं वागणं विचित्र वाटलं, इतकंच... ...

आतां समजलं सगळं स्वच्छपणे ? ”

आतां मात्र दस्तुरखुद्द चिरञ्जीवानी च आं वांसत स्वतःच्या कपाळाला परत हात लावला...!!!

, “ समजलं बाबा...आतां आलं ध्यानांत सगळं बरोबर.”

 

पोरांनी यथावकाश इंग्लंड कडं प्रस्थान केलं... ...

 

आणि बरोब्बर चंवथ्या दिवशी च भंल्या सकाळी सौ. इंदिराजीं चा भ्रमणध्वनि खंणाणला... ...

सौ. इंदिराजी नी तो कानाला लावला, “ काय गं क्षिति?...काय म्हणतेयस ?... ...पोंचलात ना व्यवस्थित ?...तुमचे नोकरी-व्यवसाय झाले कां सुरूं...की नाही अजून?...हो...आहेत की... ...जरा थांब हं...देते बाबां ना फोनवर... ...अहो हे घ्या...क्षिति आहे फोनवर... ...तुम्हांलाच कांहीतरी भन्नाट गम्मत सांगायची आहे म्हणतीय...घ्या.”

मी श्रावक उचलला, " हं बोला गब्बूराव... ...काय म्हणताय दोघे...? ”

, “ हीः हीः हीः हीः हीः... ...बाबा... ...अहो... ...खीः खीः खीः खीः... ...”

मी, “ ही तुझी भन्नाट गंमत होय ?”

सौ. क्षितिबाई,“ बाबा... ...अहो इकडं येण्याआधी तुम्ही जे भन्नाट प्रवचन केलं होतं ना... ... ' ना घर का ना घाट का ' वालं ? ”

मी,“ बरं... ...त्याचं काय झालं "

सौ. क्षितिबाई,“ बाबा, अहो काल इथं मीलनचं च ' ना घर का ना घाट का ' होऊन बसलं बाबा...खीः खीः खीः खीः....”

मी, “ काय सांगतेयस काय तूं ? ”

सौ. क्षितिबाई,“ ऐका तर बाबा...कालपासून आमची काम धामं आम्ही सुरूं केली...तर मी इनस्टिट्यूटमधून माझी लेक्चर्स संपवून नेहमी च मीलन च्या आधी घरीं पोंचत असते, म्हणून जातांना घराची चावी माझ्याबरोबरच नेत असते नेहमी... ”

मी, “ बरं मग ?... ...ह्यात भन्नाट गंमत काय झाली ? ”

सौ. क्षितिबाई,“ ऐका बाबा फक्त...तर ह्या आपल्या महाराजांना बेंगलोरला ' जी. .’ त कामाला असतांना एकजात सगळ्या अमेरिकन संवयी चिकटलेल्या... ...तर हे नवीन नोकरीवर हजर व्हायला गेले नेहमीसारखे ' स्टोनवॉश जीन्स् आणि पुल ओव्हर ' चंढवून...तर काय झालं ठाऊकाय तुम्हांला ? ”

मी, “ काय झालं गं ? ”

सौ. क्षितिबाई,“ बाबा...अहो पहिल्याच दिवशी ब्रिटिश रट्टा खाल्ला महाराजांनी... ... कंपनी च्या गेटवरनंच गेटमन त्याला माघारीं घालवून देत म्हणाला...

' वुई आर एक्सट्रीमली सॉरी सर...बट वुई काण्ट अलाऊ एनिबडी टु एंटर दीज प्रिमायझेस विदाउट बीइंग इन कंपनीज ऑफिशिअल ड्रेस कोड सर... ...सी यू टुमॉरो, ऍण्ड हॅव अ नाइस डे ... ...!!!’

तुम्ही जे सांगत होता ना बाबा... ...ते ' काकापुरे... ...’ वगैरे...ते इथं पहिल्याच दिवशीं अगदी वाजवून बघायला मिळालं बाबा... ...हीः हीः हीः हीः हीः... ...”

मी,“ अरे बापरे...अगं पण तूं ते ' ना घरका ना घाट का ' चं कांहीतरी काय सांगत होतीस ?... ...”

सौ. क्षितिबाई,“ मग तें च तर सांगतेय ना बाबा तुम्हांला ? ...घराच्या चाव्या माझ्या कनवटीला... ...म्हणजे आपल्या महाराजांचं पण तें च होऊन बसलं ना बाबा.... ...' ना घर का ना घाट का ' ... ....खूः खूः खूः खूः खूः... ...!!! ”

आतां मात्र सौ. क्षितिबाईं च्या भन्नाट किश्श्यावर मी पण कपाळाला हात लावत खोः खोः हंसायला लागलो... ...!! 

चिरञ्जीवांचा ' ब्रिटिश बाप्तिस्मा ' इंग्लंडला गेल्यावर आंठवडाभंरातच असा पार पडला... ...

सौ. क्षितिबाईं चा मुहूर्त उगवायला मात्र पुढचं वर्ष उलटावं लागलं........

२०१३ सालीं सौ. इंदिराजी नां सोबत घेऊन जेव्हां मी युरोप ची सहल केली, ती त ' लंडन वारी ' होतीच.

आयते तिथवर जातोच आहोत, तर मुलांचा संसार बघून यावा म्हणून त्यांच्याकडं चार-दोन दिवस मुक्कामाला गेलो होतो. आम्ही त्यांच्याकडं पोंचल्याच्या दुस-या च दिवशीं सौ. क्षितिबाईं च्या नात्यातलं त्यांच्याच वयोगटातलं एक अमेरिकास्थित जोडपं त्यांच्या आई-वडिलां सह आम्हांला दिवसभंर भेंटायला आलं.. ...

अमेरिकेत जाऊन स्थिरावण्याचं कर्तृत्त्व नव-याचं... ...बाईं चं कर्तृत्त्व त्याला माळ घातण्यापुरतंच मर्यादित होतं. आई वडील साधेसुधे दिसत होते, पण बाई नां अमेरिके चा एव्हढा तोरा चंढलेला दिसत होता, की तेव्हढा खुद्द अमेरिकन नागरिकांनाही नसेल... ...

आल्या आल्या सकाळपासून च बाईंची ' अमेरिका स्तवना ' ची ' एल. पी.’ भोजनापर्यंत अखंड वाजली... ...मग भोजनोत्तर गप्पाटप्पांत ' आपल्या भारतातलं सगळं कसं फालतू असतं ' ची दुसरी ' एक्सटेंडेड एल. पी. ’ आमचे कान किटेंतोंवर वाजली... ...!!

दुपारीं मग त्यांनां च कांही प्रवासी खाद्यपदार्थ खरेदी करायचे असल्यानं मग आम्ही त्यांना घेऊन जवळच्या नेहमीच्या वाणिदुकानात गेलो... 

काउंटरवर असलेल्या इंग्रज पोरा नं बाई नां हंवे असलेले जिन्नस आणून बाईं च्या पुढ्यात काउंटरवर ठेंवले... ...

आम्हांला कांहीच खरेदी करायचं नसल्यानं, मी आणि सौ. क्षितिबाई गल्ल्यावर बसलेल्या इंग्रज मालकाबरोबर, त्यानं अगत्यानं दिलेलं कसलंतरी सरबत पीत त्याच्याबरोबर गप्पा छांटत उभे होतो... ...

इतक्यात आमच्या पाहुण्या ' अमेरिकन बाई ' कसलंतरी एक खोकं घेऊन गल्ल्याकडं आल्या, आणि दुकान मालकाला ' या खोक्याच्या लेबल वर अमुक तमुक कसं काय छापलेलं नाही ? ’ असं विचारायला लागल्या... ... 

दुकानदारानं शांतपणे त्या वस्तू चं, उत्पादकानं छापलेलं आठ-दहा पानी संपूर्ण माहितीपत्रक च खालच्या खणातनं बाहेर काढून बाईं च्या पुढ्यात ठेंवलं... ... ...

तें उघडून बघायचीही तसदी न घेतां बाई त्यालाच ' आमच्या अमेरिकेत हे सगळं वेष्टनांच्या लेबलवरच कसं छापलेलं असतं...’ वगैरे प्रवचन झोंडत सुटल्या...!! 

अन् मी सौ.. क्षितिबाईं नां कोंपरखंळी मारत कानांत हंळूच कुजबुजलो, “ आतां पुढं काय गंमत होतीय, ती बघ फक्त...”

दुकानदारानं तें सगळं शांतपणे ऐकून घेंतलं, आणि बाई चं ' अमेरिका स्तवन ' संपल्यावर कंचकून खंणकावली...

, “ थिंग्ज् आर डिफरंट ऍक्रॉस द ओशन यंग लेडी... ...

ब्रिटिश रुल्स् ऍण्ड सिस्टिम्स् गव्हर्न धिस नेशन... ...नॉट् अमेरिकन...ऍण्ड दे आर नॉट मेड ऑफ वेट मड, सो दॅट एनिबडी कॅन मोल्ड देम टु हिज ऑर हर व्हिम्स् ऍण्ड फॅन्सीज् ... ...!!! 

थॅंक यू फॉर व्हिजिटिंग अवर शॉप, ऍण्ड हॅव अ ग्रेट डे अहेड... ... ...”

अन् बाई दुस-या क्षणीं बिलाचे पैसे काऊंटरवर मोजून पावती घ्यायला सुद्धां न थांबतां आपलं फुटकं तोंड घेऊन दुकानातनं पळाल्या... ...!!!

सायंकाळीं सगळे पाहुणे-रावणे मार्गस्थ झाल्यावर संध्याकाळचा चहा घेतांना तो विषय जिघाला, तेंव्हां सौ. क्षितिबाई सौ. इंदिराजी ना म्हणाल्या, “ आई... ...आम्ही अमेरिकेला जायला निघालो होतो, तेव्हां बाबा कां आडवे पडले होते, आणि इकडं इंग्लंडला यायची परवानगी मागितली, तेव्हां ' जेवायलाही नाही थांबलात तरी हंरकत नाही ' असं कां म्हणाले होते, ते आज स्वच्छपणे अगदी बरोब्बर समजलं... ...” 

मी, “ ते समजलं हे ठीकाय गब्बूशेठ... ...त्यामागचं तत्त्वद्न्यान समजलं काय तुम्हांला नीट ?...”

सौ. क्षितिबाईं चा त्रिफळा उडाला, “ मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते... ...” 

मी हंसलो अन् , “ न गृहे न नदीतीरे... ...” म्हणत हाताचा तळवा पुढं केला... ... 

आणि सौ. क्षितिबाई च कपाळाला हात लावत माझ्या हातावर फाड् दिशी टाळी देत म्हणाल्या,

 “ रजकश्वानसंस्थिति: ..... !!! ”



-- रविशंकर.

२५ फेब्रुवारी २०२२.

No comments:

Post a Comment