Search This Blog

Thursday 16 September 2021

|| अक्षरसुधा ||

|| अक्षरसुधा ||

जन्माला आलेला प्रत्येक माणूस यशवंत होण्यासाठी आयुष्यभंर धंडपडत असतो.
यश हे प्रत्येकालाच खुणावत असतं...हवं असतं.
स्वकष्टार्जित यशाचा कुणी यथार्थ अभिमान बाळगतात...
कुणाकुणाच्या तें डोंक्यांतही चंढतं... ...
कुणाचा रथ जमिनीवरनं वीतवीतभंर हवेत वर उचललाही जातो... ...
अपयशाचं मात्र तसं नसतं...
त्याचं तोंडही बघायला कुणालाच नको असतं...ना त्याला कुणी वाली असतो.
पण ज्याचा अभिमान वाटावा,असं कुठलं अपयश असूं तरी शकेल काय ?
अश्या अभिमानास्पद अपयशाची ही कथा...
'अक्षरसुधा '

-- रविशंकर.
२४ ऑगस्ट २०२१.


***************************************************************************************** || अक्षरसुधा ||







," आई...ही रोजनिशी कसली आहे गं ...लेखन-बिखन कारतेस की काय तूं... ...ऑ ?"
मी हातातली सुबक बांधणीची, पण आतां जीर्ण झालेली, रोजनिशी आई ला दांखवीत विचारलं... ...

१९९४ सालांतल्या दिवाळीच्या मोसमातली ती एक सुखद शीतल दुपार होती...वेळ होती दुपारी चार-साडेचार ची.
आई दिवाळी चा सण असल्यानं दोन चार महिने नातवंडांत रमायला माझ्याकडं रहायला आलेली होती.

सकाळची जेवणंखाणं उरकून दुपारी जरा वामकु़क्षी साठी ती पलंगावर आडवी झालेली होती... ...
दिवाळी अगदी तोंडावर आलेली असल्यामुळं सौ.इंदिराजीं ची स्वयंपाकघरांत फराळ बनवायची धांदल चाललेली होती.
चि.बापूं आणि मिली चा दिवाणखान्यात चित्रकला स्पर्धेच्या तयारीचा धूमधंडाका उडालेला होता... ...
आई नं मला पडल्या-पडल्या मला हांक मारून तिच्या बॅगेतली औषधाची बाटली कांढून द्यायला सांगितलेली होती, म्हणून मी बॅग उघडली, तेव्हां अचानक मला ती रोजनिशी दिसली.
जेमतेम मराठी चंवथी पर्यंतच शिकलेल्या आई चं वाचन मात्र चौफेर आणि भंरपूर होतं, पण ती रोजनिशीही लिहीत असेल, अशी शंकासुद्धां मला कधी आली नव्हती, म्हणून जरा चकित होतच मी तिला उपरोक्त प्रश्न विचारलेला होता... ...

आई एक मोठ्ठी जांभई देत अंथरुणावर उठून बसली," काय विचारत होतास रे ? "
मी परत तिला तों च प्रश्न विचारला........
आई अंमळ अवघडत उत्तरली," अरे कसलं काय  घेऊन बसलायस... ...कांहीतरी छान वांचण्यांत आलं ना, तर ठेंवते आपली नोंद करून न् काय... ... चंवथी शिकलेली बाई मी...लेखना-बिखनातलं मला काय डोंबल कळतंय ?...बरं चार वाजलेत आतां...चहा चं बघायला हवं मला... ...तिकडं सुमीताचा फराळाचे घाणे घालून पिट्टया पडला असेल, त्याचीही व्यवस्था लावायला हवी कांहीतरी... ..."
मी," म्हणजे आई...ह्या रोजनिशीत तुझी कांही वैयक्तिक - खासगी म्हण हवंतर - टिपणं तर नाहीत ना?"
आई च्या नितळ भव्य कपाळावर कळत नकळत एक सू़क्ष्मशी आंठी पडली,"असं कां विचारतोयस रे ?"
मी,"अगं तसं कांही नाही गं...मला असं विचारायचं होतं, की तसं खासगी वगैरे कांही नसलं, तर ही डायरी मी उघडून बघितली तर चालेल?"
आई हंसली,"अरे बघ की खुशाल उघडून...त्यात काय एव्हढं ?... ...तुम्हां मुलांच्यापासून झांकपाक करून ठेंवावं,असं आहे काय माझ्यापाशी..ऑ ?"

मी खजील होत ती जीर्ण रोजनिशी कांखोटीला मारीत बॅग बंद करून आई च्या चौपाईखाली ढंकलली, आणि अभ्यासिकेत निवान्त जाऊन बसलो...
मेजावर अस्ताव्यस्त पसरलेली माझी अभियांत्रिकीची पुस्तकं एका कोंप-यात चंळत करून नीट लावून ठेंवायला सुरुवात केली.
तितक्यांत आई नं पाण्याचा तांब्या, बिस्किटांची बशी,आणि कढत चहाचा कप आणून मेजावर ठेंवला," जरा सावकाश हाताळ रे बाबा..." एव्हढं सांगून ती स्वयंपाकघराकडं निघून गेली.     
आणि मोठ्या उत्सुकतेनं मी पाण्याचं फुलपात्र तोंडाला लावीत हंळुवार हातांनी ती डायरी उघडली... ... ...
आणि अक्षरश: भान हंरपून तीतल्या नोंदी जो वांचत बसलो, तो दिवेलागण झाली, तरी वांचतच बसलो...!!

आईच्या त्या रोजनिशीत काय काय होतं, यापेक्षा काय नव्हतं, हें सांगणं सोपं म्हणायला हवं... ...
लहानपणीं शाळेत पाठ केलेल्या एकाहून एक सरस कविता..अगदी 'आजीचे घड्याळ' पासून ते थेट वामन पण्डित, मोरोपंत, श्रीधर, अनंत फंदी, रघुनाथ पण्डित, असल्या दिग्गज भाषाप्रभूंच्या काव्यातले निवडक वेंचे, टिळक, सावरकरांच्या लेखनातले वेंचक उतारे... ...गाजलेल्या नाटकांले निवडक संवाद, दासबोध-तुकारामांची गाथा यांतले निवडक उतारे.. ..काय नव्हतं त्या रोजनिशीत ?
बाहेर अंधारून आलं, तरी भान हंरपून मी ती डायरी चाळतच बसलेलो होतो...
आणि गारढोण झालेल्या चहाचा कप तसाच पडलेला होता... ...!!!

चाळतां चाळतां रोजनिशीच्या शेंवटच्या पन्नासएक पानांत आई नं तिच्या मोत्यासारख्या टपो-या वळणदार अक्षरांत रचलेल्या वीसएक कविता मला दिसल्या, आणि मी त्या बघतच राहिलो.
निर्दोष छन्दवृत्तबध्द बहुविध अलंकारांनी नटलेल्या त्या सर्वांगसुंदर रचना बघून थंक्क होत मग मी चक्क कपाळाला हात लावला... ...!!!

जेमतेम  मराठी चंवथी पर्यंतच लौकिकार्थानं शिकलेली एक बाई इतक्या समृध्द कविता करूं शकते, यावर माझा विश्वास च बसे ना....
आपली आई ही सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली एक निष्णात कवयित्री आहे, हा साक्षात्कार मला तेव्हां झाला...
त्यातली ओंवी वृत्तांत रचलेली एक कविता तर उत्कृष्ठ काव्यरचनेचे मापदण्ड काय असतात,तेंच विशद करणारी  होती...!!!

ते सगळं बघून हर्षभंरित होत मी जवळ जवळ किंचाळलोच," आई...ए आई... ..इकडं ये जरा लौकर..."
," आले आले...अरे काय झालं काय तुला असं किंचाळायला ?...धडपडलास की काय कुठं ? "
आवाजापांठोपांठ आई बेसन लाडवांच्या पिठानं माखलेल्या हातांनी तशीच आली...
आई,"कश्याला हांक मारलीस एव्हढ्या मोठ्यांदा ?...काय झालंय ? आणि हा चहाचा कप कां पडलाय इथं तसाच ? गरम असतांनाच प्यायला नको तो?..."
मी ,"आई...चहा मरूं दे... ...अगं हे बघ काय सापडलंय मला ते..."
आई,"सुमीता...ए सुमीता... ...जरा हात धुवून मीठ मोह-या घेऊन ये बरं लगेच..."
सौ. इंदिराजीं ची स्वारी हातात मीठ मोह-या घेऊन डुलत डुलत हजर झाली," मीठ मोह-या कश्यासाठी आई ?"
आई," कांही नाही गं... ...दिवेलागणीची वेळ झालीय ना, म्हणून...द्यृष्ट कांढून टाकते ह्याची...नादिष्टपणा गेलेला दिसत नाही ह्याचा अजून..."
मी,"आई...कमाल च आहे तुझी...अगं द्यृष्ट-बिष्ट काढायला मी काय कुक्कुलं बाळ आहे काय...ऑं ? "
सौ.इंदिराजीनी तेव्हढी संधी अचूक साधली ,"कुक्कुल्याचं कांही ठाऊक नाही मला, पण महा उपद्व्यापी मात्र आहे हे तुमचं बाळ आई..."
असला बोंचकारा काढून माझ्याकडं ढुंकूनही न बघतां सौ.इंदिराजी खंणकावून स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या...!!
,"तुला नाही त्यातलं कांही कळायचं " म्हणत आई नं चक्क माझी द्यृष्ट कांढून टाकली... ...

मी," झालं सगळं ?...आतां बस अशी इथं माझ्यासमोर, आणि मला सांग... ..."
आई," चहा गारढोण झालाय...तो आणते गरम करून...तो पी आधी, न् मग ऐकते तुझं पुराण काय ते..."
दोन मिनिटांनी माझ्या पुढ्यात कढत चहाचा कप आदळत आई पुढ्यातल्या खुर्चीत बसत म्हणाली,"हं बोल आतां...काय सांगत होतास तूं ? "
मी रोजनिशी उघडून तिच्या पुढ्यात धंरीत म्हटलं," ह्या कविता तूं लिहिल्याहेस आई ?"
आई," हो...माझ्या च आहेत त्या... ...पण असं कां विचारतोयस ?"
मी," म्हणजे असं बघ आई...त्याचं काय आहे की... ..."
आई चे डोळे आतां थेट सौ.इंदिराजींच्या थाटात बारीक झाले," काय ?...काय आहे त्याचं ?"
मी," म्हणजे... ...ह्या कविता खरंच तूं स्वतः लिहिलेल्या आहेत ?..."
आई," कां ?...मला लिहितां येऊं नयेत की काय कविता ?"
मी," तसं कांही नाही गं आई..."
आई," तसं नाही?... ...मग कसं ?"
मी," आई...तूं आतां मात्र अगदी 'हि'च्या थाटात बोलायला लागलीस बरं का... ...साक्षीदाराची वकिलानं उलट तपासणी घेतल्यासारखी..."
आई," बहुतेकवेळा सुमीताचं च बरोबर असतं...तुझा टगेपणा माझ्याइतका दुस-या कुणाला ठाऊक असणार ?"
मी," तर तर...काळू ला बाळू सामील..."
आई," काळू म्हणण्याइतकी सुमीता कांही काळी नाही बरं... ...गहूवर्णी म्हणतां येईल फारतर..."
मी," ते जाऊं दे गं आई सगळं...मला सांग, तुला भंरसभेत व्यासपीठावर जाऊन बक्षीस घ्यायला आवडेल ?"
आई," कश्याचं कसलं बक्षीस?"
मी," हे बघ...ह्या तुझ्या कविता आहेत ना,त्या एकजात सगळ्या पुरस्कारपात्र दर्जाच्या आहेत...ठाऊकाय तुला ? "
आई," टंवाळी करतोयस माझी ?... ...मला मेलीला कवितातलं काय कळतंय ?...मराठी चंवथी झालीय माझी फक्त..."
मी आतां आईचे दोन्ही हात हातांत घेतले,"थट्टा करत नाहीय मी आई तुझी...न् टवाळी तर मुळीच नाही...अगं कसलेले कवि च लिहूं शकतील,असल्या दर्जाच्या आहेत ह्या तुझ्या कविता...
कधी लिहिल्यास ह्या ?"
आई," अरे तूं लहान होतास ना, तेव्हां दुपारची जेवणंखाणी उरकल्यावर जरा तासभंर निवांतपणा मिळायचा तूं झोंपलास की...तेव्हां लिहायची आपलं काय सुचेल ते...त्याचं काय एव्हढं अप्रूप वाटतंय तुला ?"
मी," आई, हे बघ...आपण असं करूं या..."
आई," काय करूं या म्हणतोयस? "
मी," तुझा विश्वास नाहीय ना बसत मी काय सांगतोय त्यावर ?...तर आपण यातली एक कविता एखाद्या दर्जेदार मासिकाकडं पांठवून देऊं या...आणि बघूं या काय होतं ते पुढं...
कलासागर नांवाचं एक खूप दर्जेदार वार्षिक निघतं इथं प्रत्येक दिवाळीला...त्यांच्याकडं पांठवूं तुझी एखादी कविता...चालेल ?"


आई चा चेहरा आतां आंक्रसला," कांही नको पांठवायला..."
मी हिरमुसलो,"कां नको पांठवायला ?...अगं बघूं या तरी काय होतंय ते... ..."
आई,"माणसानं आपली मर्यादा ओंळखून असावं हे बरं रवि...कांहीतरी भंलतंच तुझ्या डोंक्यात भंरवून घेत असतोस सदा न् कदा... ...ह्या वयात माझं हंसं करून घ्यायचं नाही मला..."
मी,"कांही हसं बिसं होणार नाही आई... अगं... ..."
आई आतां रिकामा झालेला चहाचा कप उचलत उठलीच,"नको म्हटलं ना...?..."
पुरता विरस झालेला मी सुन्नपणे कांही न बोलतां तिच्याकडं नुस्ताच बघत बसलो...
आणि आई,"काय काय भंलतंच चाललेलं असतं तुझ्या डोंक्यात...कांही कळत नाही बघ मला कधी कधी..." असं पुटपुटत कप उचलून निघून गेली... ...
मी मग आईची ती कविता मेजावरच्या माझ्या वहीत जशी च्या तशी उतरून घेतली...
आई ची ती रोजनिशी बंद करून ट्रंकेत ठेंवली... ...
मग ट्रंक तिच्या चौपाईखाली ढंकलून, माझ्या इतर उद्योगांना लागलो,
आणि यथावकाश तो प्रसंगही विस्मृतीत जमा झाला ... ... ...

आई-काका नंतरच्या काळांत आम्हां भावण्डांच्याकडं त्यांच्या मर्जी-गरजा नुसार आळीपाळीनं रहायला येत असत.
आठ दहा वर्षांनंतर परत आई जेव्हां २००२ सालीं माझ्याकडं रहायला आली होती, तेव्हां आई च्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घ्यायची होती, ती निर्विघ्न पार पडली.
तिची शस्त्रक्रियापश्चात शुश्रुषा पुढं पंधराएक दिवस इस्पितळात चाललेली होती, तेव्हां एक दिवस कलासागर वार्षिकानं त्यांच्या आगामी दिवाळीअंकानिमित्त आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेची जाहिरात माझ्या वांचण्यात आली, आणि मला परत एकदां तिच्या कवितांचं स्मरण झालं...
मी मग तिचा रोष पत्करायचं धाडस करून तिच्या तमाम कवितांतली ती आदर्श कवितेचे मापदण्ड सांगणारी मला भावलेली कविता एका कागदावर सुवाच्य अक्षरात जशी च्या तशी उतरवून कांढली,आणि परस्परच कलासागरकडं स्पर्धेसाठी रवाना करून मोकळा झालो...
म्हटलं, बघूं या तरी काय होतंय ते... ...
चारपांच दिवसांनी मला कलासागरच्या परीक्षकांचा दूरध्वनि आला...
मी," नमस्कार...मी नानिवडेकर बोलतोय...आपला परिचय ?"
परीक्षक," नमसकार सर...मी हसबनीस बोलतोय...कलासागर वार्षिकाच्या तर्फे...श्रीमति सुधा नानिवडेकर आपल्या कोण ?"
मी,"आमच्या मातोश्री..."
परीक्षक," त्यांचं हार्दिक अभिनंदन करायला मी दूरध्वनि केलाय सर... ...त्यांना जरा बोलवतां ?"
मी," त्या आत्तां घरीं नाहीत...कांही निरोप असला द्यायचा, तर सांगा मला...मी पोंचवीन..."
परीक्षक,"अहो या वर्षीच्या कलासागरचं सर्वोत्कृष्ठ कवितेचं पारितोषिक त्यांच्या कवितेला जाहीर झालंय, म्हणून त्यांचं अभिनंदन करायला दूरध्वनि केला मी...!!!
कधी येतील त्या घरी परत ?"


माझा आनंद गगनात मावे ना,"अहो त्यांच्या गुडघ्यावर दोन दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झालीय...सध्या दवाखान्यात आहेत त्या...पण ही आनंदवार्ता मी सांगेन त्यांना...कांही काळजी करूं नका तुम्ही...
आणि ही शुभवार्ता दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..."
परीक्षक," अहो मला कसले धन्यवाद देताय सर ?...खरं तर आम्हीच तुम्हांला धन्यवाद  द्यायला हंवेत... ..."
मी," ते कश्यासाठी...? "
परीक्षक," इतकी सर्वांगसुंदर कविता आमच्या वार्षिकासाठी पांठवल्याबद्दल...प्रामाणिकपणे सांगतो तुम्हांला...या दर्जाची रचना क्वचित च बघायला मिळते...काय वयाच्या आहेत आपल्या मातोश्री ? !!!"
मी," ब्याऎंशी..."
परीक्षक," बापरे...पारितोषिक वितरण समारंभाला येऊं शकतील त्या?...म्हणजे...तब्येत ठीक-ठाक असली तर  येऊं शकतील काय असं विचारतोय मी...हवं तर आपल्या येण्याजाण्यासाठी वाहनाची सुध्दां सोय करूं आम्ही... ..."
मी," केव्हां आहे हा समारंभ ?"
परीक्षक," आजपासून बरोबर आंठ दिवसांनी सर... आपल्या मातोश्री जर येऊं शकत असतील, तर आवर्जून त्यांना घेऊन या सोबत... ...त्यांना प्रत्यक्ष भेंटायची फार इच्छा आहे...बघा कसं काय साधतंय ते...धन्यवाद सर...कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आम्ही रवाना केलेली आहे...ती उद्या संध्याकाळपावेतों तुम्हांला मिळेलच... ...धन्यवाद."
मी," तब्येत ठीक असली, तर नक्की घेऊन येईन त्यांना ...धन्यवाद..." म्हणत मी हातातला श्रावक खाली ठेंवला...
आणि कृतार्थ होऊन एक सुस्कारा सोडला...
आई च्या प्रतिभेचं-कष्टांचं सार्थक झालं होतं... ...

दुस-या दिवशीं निमंत्रण पत्रिका हातांत पडली.रात्री इस्पितळांत मला मुक्कामाला जायचं होतं, तेव्हां ती निमंत्रण पत्रिका मी सोंबत घेऊन गेलो...
जातांना काका हलवायाकडून एक किलोभंर पेढे पण बरोबर घेऊन गेलो.
इस्पितळातल्या आई ची देखभाल करणा-या कर्मचा-यांना आईबद्दल खूप आपुलकी होती...पेढे गट्टम् करीत सगळ्यांनी आई ची मुक्तकंठांनी वाहवा केली...
खुद्द आई च्या हातात पेढ्यांचं खोकं ठेंवल्यावर ती म्हणाली,"कश्याचे पेढे हे ? "
कश्याचे ते सांगितल्यावर म्हणाली,"शेंवटी केलास ना उपद्व्याप मला न सांगतां...?"
मी," मग काय करूं?...तुझ्या कष्टांना न्याय नको मिळायला ?"
आई," मला वाटत होतंच...तूं असा तसा गप्प बसायचा नाहीस म्हणून..."
मी," कसं वाटेल आई तुला व्यासपीठावर जाऊन हा सन्मान घ्यायला ?... अगं सुप्रसिद्ध साहित्यिक 

' फादर फ्रान्सिस दि ब्रिटो ' यांच्या हस्ते हॊणार आहे हा पारितोषिक वितरण समारंभ...आहेस कुठं तूं ?"
आई,"कांही कां असे ना...बरं वाटलं ऐकून...छन्दाचं चीज झालं माझ्या...जा तूं माझं पारितोषिक घ्यायला...पण सुमीताला सोबत घेऊनच जायचं..." म्हणत आई नं माझ्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला...
आणि माझ्या धंडपडीचं पण सोनं झालं... ...!!
आठवडाभंरात आई हिंडण्या फिरण्याइतकी ठंणठंणीत होणं कठीणच होतं.
शेवटी मी आणि सौ.इंदिराजी कार्यक्रमाला हजेरी लावून आई चं पारितोषिक आणि मानपत्र स्वीकारून आलो...


श्री. हसबनीस कार्यक्रमांत भेंटले...
त्यांच्या बोलण्यातनं हे पण समजलं,की स्पर्धेेचा निकाल द्यायला नेहमी साहित्यक्षेत्रातले चार वेगवेगळे मान्यवर परीक्षक म्हणून येत असतात...
त्यातला प्रत्येकजण पहिल्या तीन पारितोषिकांसाठी स्वतंत्रपणे तीन कविता निवडतो...साहजिकच परीक्षकांनी निवडलेल्या कवितांत मतभिन्नता असूं शकते.
पण त्या वर्षीं चारी मान्यवरांनी प्रथम पारितोषिकासाठी आई च्या कवितेची एकमुखानं प्रशंसा करीत तीवर शिक्कामोर्तब केलेलं होतं... ...!!!
हसबनीसांची ती टिप्पणी ऐकून, बी.ए. [ऑनर्स ] ला उच्च मराठी विषयात पुणे विद्यापीठाचं सुवर्णपदक जिंकणा-या दस्तुरखुद्द सौ.इंदिराजीही थक्क झालेल्या होत्या...
आणि उच्च मराठी विषयात पी.एच्.डी. संपादन केलेल्या आमच्या बहिणा बाईनीं सुध्दां आपल्या मराठी चंवथी पास आई चं ते लखलखणारं यश बघून थंक्क होत कपाळाला हात लावलेला होता... ...!!!
यथावकाश त्याच वर्षीं साहित्य परिषदेत भंरलेल्या साठ-सत्तर मान्यवरांच्या कविसंमेलनांतही मी आईची ती रचना सादर केली, तेव्हां तर अवघ्या सभागृहानं ती डोंक्यावर घेतलेली होती.
आणि जन्मदात्री च्या ऋणातनं अंशतः कां होई ना,उतराई झाल्याचं समाधान मला मिळालं... ...

२४ ऑगस्ट २००४ या दिवशीं आई चं दुःखद निधन झालं, आणि तिची ती एकमेव कविताच काय ती माझ्याजंवळ राहिली...
बाकी उरल्या फक्त आंठवणीच... ...
असाच पुढं दोन-तीन महिन्यांचा काळ उलटला, आणि एका भंल्या सकाळीं नाष्ट्याला माझ्या आवडत्या 'उडुपी उप्पीटा' ची भंरगच्च बशी माझ्या पुढ्यांत अलगद ठेंवीत सौ.इंदिराजी शेंजारी बसल्या," अहो...मी काय म्हणते......"
सौ.इंदिराजीं नी असा कांही आव आणला,की मामला संशयास्पद होऊन बसतो...!!!
मी सावध झालो,"काय म्हणताय ?"
सौ.इंदिराजीं,"आधी उप्पीट घ्या ते...गार होतंय... ..."
मी,"बोला...बोला...काय डोंक्यात घोंळतंय तुमच्या ?"
सौ.इंदिराजीं,"तुमची फालतू टंवाळगिरी ठेंवा बाजूला...काय ?"
मी,"अहो मी प्रामाणिकपणेच विचारतोय... ..."
सौ.इंदिराजीं,"मस्त ठाऊक आहे मला तुमचा निरागसपणा...तर मला काय वाटतंय की..."
मला उप्पीटाचा ठंसका लागला," बोला...बोला..."
सौ.इंदिराजीं,"आपल्या आई कसलेल्या कवयित्री होत्या...खरं की नाही ?"
मी,"बरोबर आहे...त्याचं काय ? "
सौ.इंदिराजीं,"तर मला असं वाटतंय, की आपल्या महाविद्यालयात दरवर्षीं एक कवितास्पर्धा भंरवून आईं च्या नावानं पारितोषिक आपण ठेंवूया...कशी वाटतेय तुम्हांला माझी कल्पना ? "
मी,"कल्पना छान च आहे तुमची...पण ती साकारणार कशी काय प्रत्यक्ष्यात ?"
सौ.इंदिराजीं,"म्हणजे काय ?...महाविद्यालयांत जाऊन मराठी विभागाच्या प्रमुखांशी बोलून बघूं या काय म्हणतायत ते...स्पर्धेचं आयोजन महाविद्यालय करील की अगदी आरामात...चांगलं पांच हजारांचं भंरभक्कम पारितोषिक ठेंवूं या आईं च्या नांवानं... ...स्पर्धेचं शीर्षक पण मी योजून ठेंवलंय...' अक्षरसुधा '...कशी वाटतेय कल्पना तुम्हांला ?"
मी,"कल्पना छान च आहे तुमची, पण ती प्रत्यक्ष्यात कशी उतरणार ? असं विचारतोय मी..."
सौ.इंदिराजीं,"म्हणजे काय ?...महाविद्यालयात जाऊन बोलायचं सध्या जे कोण मराठी चे विभागप्रमुख असतील त्यांच्याशी... ..."
मी,"मी असं विचारतोय, की आजच्या काळातलीं खंरकट्या ' स्लॅंंग् इंग्लिश ' मधनं मोडकं-तोडकं मराठी बोलणारी पोरं, आणि त्यांच्या स्लॅंग् पलीकडं खंरकटलेल्या मराठीचा अभिमान बाळगणारे त्यांचे आई-बाप, यातलं कुणी या स्पर्धेत भाग घेईल असं वाटतंय तुम्हांला ?"
सौ.इंदिराजीं नी आतां त्यांचा सोटा बाहेर काढला,"उगीच कांहीतरी आंचरटासारखे खोडे घालूं नकां...बराच काळ घोंळतीय ही कल्पना माझ्या डोंक्यात... ...जेवणीखाणी उरकलीं, की लगेच जाऊन येऊंयाच महाविद्यालयात... ...काय?"
मी शरणागती पत्करली,"ठीकाय...तुम्ही म्हणाल तसं... ..."

माझं भोजन उरकेंतोंवर सौ.इंदिराजीं फटाफट् जामानिमा करून तयार झाल्यासुध्दां, आणि आम्ही दुपारीं तीन वाजतांच मागमूस कांढत कांढत आमच्या महाविद्यालयातल्या मराठी विभागप्रमुख सौ.राधा चोपदार यांच्या कक्षावर जाऊन थंडकलो देखील... ...
माजी विद्यार्थी म्हटल्यावर बाई नी मोठ्या अगत्यानं आमचं मोकळेपणानं स्वागत करून चहा मागवला...
नमस्कार-चमत्कार वगैरे पार पडले, आणि आम्ही आमच्या येण्याचं प्रयोजन त्यांना सांगितलं.
मी,"एक प्रश्न विचारूं तुम्हांला मॅडम ?"
बाई,"अहो त्यात काय एव्हढं ?...विचारा की... ..."
मी,"ब-याच मासिकांत ' राधा चोपदार ' नांवाच्या कवयित्रीं च्या रचना बघायला मिळतात... ...त्या तुम्हीच कां ?"
बाई जरा संकोचल्या,"हो...मी च लेखन करते मासिकांत...छन्द म्हणून."
सौ.इंदिराजीं नी तो धागा अचूक पकडला,"वा वा वा...म्हणजे आमचं काम झाल्यात जमा झालंय म्हणायचं..."
बाई,"अहो,पण काम तरी काय आहे तुमचं ? ते सांगा की... ..."
सौ.इंदिराजीं नी मग त्यांच्या मनांतला प्रस्ताव बाईं ना विशद केला... ...
बाई खूष झाल्या प्रस्ताव ऐकून,"आभारी आहोत आम्ही तुमचे...ही काव्यस्पर्धा आयोजित करायला खचितच आवडेल आम्हांला...बरं, स्पर्धे चं शीर्षक काय ठेंवायचं ?..."
सौ.इंदिराजीं," ' अक्षरसुधा ' या नांवानं ही स्पर्धा आयोजित करायची...सुधाताई नांव होतं आमच्या सासूबाईंचं ...त्यांच्याच नांवानं हे पारितोषिक दिलं जाईल..."
बाई,"अरे वा...देखणं नांव सुचवलंत अगदी... ... खूप छान शीर्षक शोभेल हे... ...बरं आणखी कांही ? "
सौ.इंदिराजीं,"स्पर्धेत उतरलेल्या कवितांंची प्राथमिक छाननी तुमच्या प्राध्यापक चमू नं करायची आणि तीन कविता निवडून आमच्याकडं पांठवायच्या अंतिम निर्णायासाठी... ...
त्यातल्या सर्वोत्कृष्ठ कवितेला हे पारितोषिक आम्ही देऊं...आणि द्वितीय-तृतीय क्रमांकांसांठी महाविद्यालयाला जर पारितोषिकं ठेंवायची असतील,तर त्याला आमची कांही हरकत असणार नाही."
बाई,"उत्तम संकल्पना आहे तुमची...मला जरा प्राचार्यांशी बोलून घ्यावं लागेल, पण यांत कांही अडचण येईल असं मला वाटत नाही...जमूं शकेल हे सगळं...आतां एक प्रश्न उरतो..."
मी," बोला..."
बाई," कवितांच्या निवडीचे तुमचे निकष परीक्षकांना आधी सांगावे लागतील...ते काय असतील ?"
आतां सौ. इंदिराजीनी माझ्याकडं सूचक नजरेनं बघितलं... ...
मी,"ते मला कांही नीटसं नाही सांगतां येणार...पण ते विशद करणारी माझ्या आईनं च लिहिलेली आदर्श काव्याची व्याख्या दांखवतो तुम्हांला...चालेल ?"
बाई," अरे वा...कां नाही चालणार ?...त्यांच्याच नांवानं तर द्यायचं आहे ना हे पारितोषिक ?....बघूं..."
मी मग आईची ती गाजलेली ' माझी कविता ' छापलेला कलासागर चा दिवाळीअंक त्यांच्या पुढ्यांत ठेंवला...
बाई त्यांचा चष्मा डोंळ्यांवर चंढवीत ती कविता वांचायला लागल्या...
हळूंहळूं त्यांच्या चेंह-यावर आश्चर्य पसरायला लागलं...
यथावकाश त्यांचे नेत्रही विस्फारले,"धन्य आहेत तुमच्या आई...कोणत्या महाविद्यालयांत शिकवायच्या त्या ?"
मी,"काय म्हणालात तुम्ही ?"
बाई,"अहो मी विचारलं, कुठल्या महाविद्यालयात शिकवायच्या तुमच्या आई ? "
मला काय बोलावं ते कळेच ना...मी सौ.इंदिराजींकडं गपगार होऊन बघायला लागलो... ...
आणि सौ.इंदिराजीनी च तोंड उघडलं,"अहो कसलं महाविद्यालय न् काय... ..."
बाई आतां आं वांसून आमच्याकडं बघायला लागल्या,"म्हणजे...??"
सौ.इंदिराजीं,"अहो, रूढार्थानं शिकलेल्या-बिकलेल्या कांही नव्हत्या आमच्या सासूबाई... ...
त्यांच्या जुन्या  पिढीत मुलीनां शिकवायची पध्दत कुठं होती हो?"
बाई आतां खुर्चीतनं अर्धवट उठल्याच,"काय सांगताय काय ? म्हणजे  शिकलेल्या-बिकलेल्या कांही नव्हत्या तुमच्या सासूबाई ?"
सौ.इंदिराजीं," जेमतेम मराठी चंवथी पर्यंतच शिक्षण झालेलं होतं त्यांचं...पण छन्दवृत्तबध्द काव्याची खूप आवड होती त्यांना... ...म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक ठेंवायचंय आम्हांला..."
 
बाई खुर्चीत परत सावकाश बसल्या...
आणि त्यांनी आतां चक्क कपाळाला हात लावला," मॅडम...आपली संकल्पना खूप छान आहे...आणि प्रस्तावही महाविद्यालय अगदी आनंदानं राबवेल...पण..."
मी," पण काय ?... ...कांही अडचण वाटतेय काय तुम्हांला यात ?"
बाई उत्तरल्या,"प्रामाणिकपणे सांगायचं तर..."
सौ.इंदिराजी,"मोकळेपणानं सांगा कांही अडचण असेल तर मॅडम...आम्ही जरूर ती सगळी मदत करूं आपल्याला..."
बाई,"अडचण एव्हढीच आहे,की हे मापदण्ड निभावूं शकेल अश्या दर्जाची एखादी तरी कविता स्पर्धेत कुणी उतरवूं शकेल काय, ही च शंका वाटतेय मला...
म्हणजे असं,की मी स्वतः च जरी या स्पर्धेत उतरले ना,तरी ह्या मापदण्डांत चपखल बसणारी, ह्या कवितेच्या तोडीस तोड अशी, इतकी आशयघन-छन्दवृत्तबध्द उत्कृष्ठ कविता मी तरी करूं शकेन कां?, याचं उत्तर मलाही छातीठोंकपणे होकारार्थी नाही सांगतां येणार... ...मग या पारितोषिकाचं वितरण तरी कसं काय होणार ?

खरंच नशीबवान आहांत तुम्ही मॅडम...की अश्या असामान्य सासूबाई तुम्हांला लाभल्या... ..."
इतकं बोलून बाई आमच्याकडं चष्म्यातनं साश्चर्य बघायला लागल्या...

मी सौ. इंदिराजींकडं बघत मंद हंसलो... ...
मग दस्तुरखुद्द सौ.इंदिराजीनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!!
आणि 'अक्षरसुधा ' पारितोषिकाची कल्पना आम्हांला अखेर सोंडून द्यावी लागली... ...कायमची.

मी सुरुवातीला प्रस्तावनेत ज्याचा उल्लेख केला होता ना,ते ज्याचा अभिमान वाटावा, असं हे माझं पहिलं अपयश...

आई च्या निधनानंतर तब्बल चार वर्षांनंतर नंतर माझा स्वतःचा साहित्य प्रवास सुरूं झाला...
आजपाेतों र ट फ करीत,मराठी, हिंदी, इंग्रजी,आणि संस्कृत अश्या चार भाषांत मिळून एकूण पंच्याऐंशी कविता  लेखणीतनं कागदावर उतरल्या...
माझ्या ब्लॉगवरच्या कवितांच्या दालनाला भेंट दिलीत, त्या सर्व च्या सर्व कविता तुम्ही वाचूं शकाल... सगळ्याच रचना छन्द-वृत्त-मात्राबध्द आहेत... ...
 

पण तें सगळं वांचून तुम्ही जर मला असा प्रश्न विचारलात, की ' अक्षरसुधा ' पारितोषिकाच्या दर्जाची त्यांत एखादी कविता आहे काय ?' म्हणून,
तर त्याचं छातीठोंकपणे होकारार्थी उत्तर मी सुध्दां देऊं शकेन की नाही, हे मलाही सांगतां येणार नाही...!!! 

ज्याचा यथार्थ अभिमान बाळगावा,असं हे माझं दुसरं अपयश. 

कांही कांही अपयशं ही अशी असतात,की ज्यांचा अभिमान बाळगण्यांतच धन्यता वाटते... ...
 

ती ही अशी.

*****************************************************************************************
 

-- रविशंकर.
२४ ऑगस्ट २०२१.
   

No comments:

Post a Comment