Search This Blog

Thursday 10 March 2022

|| बालक – मालक - पालक ||

 

|| बालक – मालक - पालक ||

 

, “ हे...हे...हे...काय लिहून ठेंवलंयस तूं पेपरात मुग्धा ?...ऑं ? ”

सौ. इंदिराजी कपाळाला हात लावत समोर बसलेल्या आमच्या ज्येष्ठ कन्यका चि. मुग्धाबाई ऊर्फ ' बापू ' नां विचारत्या झाल्या... ... ...


१९८५ सालातल्या जानेवारी महिन्यातली ती एक शांत पूर्वसंध्या होती... ...सायंकाळचे साडे पांच वाजलेले होते... ...

आदल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या सहामाही परीक्षेचा निकाल सकाळींच शाळेत जाहीर झालेला होता...

आणि घरीं परतल्यावर चि. बापूं ची मराठी भाषेच्या परीक्षेची उत्तरपत्रिका बघितल्यावर, उच्च मराठी विषयात बी. . ला सुवर्णपदक पटकावलेल्या सौ. इंदिराजीं चा पारा चंढलेला दिसत होता एकूण... ... ...


मी कारखान्यातनं कामावरनं नुकताच घरीं परतलेलो होतो, आणि तोंड बिंड धुवून भोजन मेजावर सायंकाळच्या खाणं-चहा ची प्रतीक्षा करीत बसलेलो होतो... ...

तें समोर येणं राहिलं बाजूलाच... ...चि. बापूं ची च सांप्रत झाडाझंडती सुरूं झालेली दिसत होती... ...!!


म्हणून मग मी हस्तक्षेप करायला तोंड उघडलं, “ अहो... ...काय झालंय काय तुमहांला असं वंतवंतायला बापूं वर ?...जरा चहापाण्याची व्यवस्था बघा की कांहीतरी... ...”

, “ खड्ड्यात गेलं तुमचं ' चहा न् पाणी ' "... ...सौ. इंदिराजी आपलं अस्सल रूप प्रकट करीत हातातली चि. बापूं ची उत्तरपत्रिका माझ्या तोंडासमोर नाचवीत कडाडल्या, “ हे...हे बघा तुमच्या लाडक्या लेकी नं परीक्षेत काय प्रताप करून ठेंवलेयत ते... ...हिचं मराठी सुधारावं म्हणून ' टाईम्स ' बंद करून चांगला ' सकाळ ' चा रतीब लावला... ...पण वाचेल कोण तो ?... ...

आई नं मराठी त सुवर्ण पदक जिंकलं, आणि लाडक्या लेकीच्या मराठीची ही दुरवस्था बघा... ...”


सौ. इंदिराजी हातातली उत्तरपत्रिका माझ्या पुढ्यात फाड् दिशी आदळून ' चहा-पाण्या ' ची व्यवस्था करायला ओंट्याकडं चालत्या झाल्या...

आणि मी समोर हिरमुसून बसलेल्या बापूं च्या गोब-या गाला चा हंळूच गालगुच्चा घेत त्यांना जंवळ घेतलं, “ काय गडबड करून ठेंवलीयस बापू तूं ?... ...जरा दांखव बरं मला...”

चि. बापू , “ आई उगीच ओंरडतीय बाबा... ...मी बरोबर लिहिलंय सगळं, तरी...”

मी, “ दाखव बरं मला तू काय लिहिलंयस ते...”

बापू , “ पेपरात महात्मा जोतिबा फुल्यां वर निबंध लिहायला सांगितलाय...त्यात मी लिहिलंय की ' त्यांनी मागासवर्गीय महिलांच्या उध्दारासाठी आपलं सगळं आयुष्य वेंचलं ' म्हणून... ...तर आई आपली माझ्यावर च ओंरडत सुटलीय उगीच...”

मी, “ अहो मग बरोबर लिहिलंय की हिनं...काय चुकलं हिचं त्यांत ?”

सौ. इंदिराजी, “ आधी उत्तरपत्रिका बघा उघडून न् मग तोंड उघडा तुमचं...!!... ...काय ?”

मी मग उत्तरपत्रिका उघडत बापूं ना म्हणालो, “ हं दांखव बघू बापू मला...कुठं काय झालंय ते...? ”


चि. बापू नी मग संबंधित पान उघडून त्यावरील एका ओंळीवर बोंट ठेंवलं... ...

तिथं लिहिलेलं होतं...

' महात्मा जोतिबा फुल्यांनी मागा स्वर्गीय महिलांच्या उध्दारासाठी आपलं सगळं आयुष्य वेंचलं, म्हणून त्यांना महात्मा ही उपाधि मिळाली... ’ !!!

चि. बापू नी थेट मराठी च्या सीमेपार ठोंकलेला तो चौकार बघून मी कपाळाला हात लावून फीः फीः फीः फीः करत हंसायला लागलो...!!

आणि सौ. इंदिराजी नी मग माझ्या पुढ्यात चहा-पोह्यांची भांडी आंदळत दुसरा चौकार ठोंकला, “ उद्यांपासून हिच्या मराठी कडं आतां तुम्ही च बघा...!!... ...कळलं ? ”


मी आपला पांढरं निशाण फंडकवीत ' अहो सुधारेल हिचं मराठी हळूं हळूं... ...तुम्ही कश्याला त्रागा करताय उगीच ? ’ म्हणत समोरचे कांदेपोहे गिळायला सुरुवात केली........

आणि, “ ते कसं काय सुधारायचं, ते तुम्ही बाप-लेक च बघा आतां ", असं खंणकावून सौ. इंदिराजी भाजी आणायला निघाल्या... ...


तेंव्हढ्यात दार उघडून सौ. इंदिराजीं चे ' किञ्चित ज्यास्त लाडके ' चिरञ्जीव मिली महाराज घरात प्रकटले... ... ..., “ आई गं... ...”

सौ. इंदिराजी, “ प्रगति पुस्तक मिळालं काय रे ? ”

मिली, “ हो...मिळालं...आणि उत्तरपत्रिका पण... ...”

सौ. इंदिराजी, “ अरे वा..वा...बघूं बरं मला ते...आण इकडं...”

मिली महाराजांनी सौ. इंदिराजीं च्या हातात प्रगति पुस्तक ठेंवलं... ...

सौ. इंदिराजी च्या भिवया जराश्या आंक्रसल्याच, “ मराठी त हे दोन गुण कुठं कापलेत तुझे ? ”

मिली, “ ' शब्दां चे अर्थ सांगा ' च्या प्रश्नांत आई...”

सौ. इंदिराजी, “ काय झालं ?... ...काय चुकलंय तुझं?...मराठी ची उत्तर पत्रिका आण बरं इकडं तुझी... ...”

मिली, “ कांही नाही गं आई... ‘ भावजय ' शब्दा चा अर्थ विचारलेला होता...तो मी बरोबर लिहिलाय...तरी पण बाई नी गुण कांपलेत माझे... ...”

सौ. इंदिराजी ( उत्तर पत्रिका चांळत ), “ काय उत्तर लिहिलंयस तूं ? ”

मिली ( सदर ठिकाणी बोंट ठेंवीत ), “ हे...हे बघ... ‘ भावावर जय मिळवलेल्या बाई ला भावजय म्हणतात ' असं लिहिलंय मी... !!!...बरोबर आहे ना गं आई ? ”

मी कसंबसं हंसू दाबत सौ. इंदिराजी कडं बघायला लागलो...

चि. बापू परमानन्द होऊन खीः...खीः...खीः... करायला लागले... ...!!

आणि ' लाडक्या लेका ' नं थेट ' क्लाईव्ह लॉईड ' च्या थाटात मराठी भाषेच्या मैदानाबाहेर ठोंकलेला तो षट्कार बघून दस्तुरखुद्द सौ. इंदिराजीनी च आढ्याकडं डोंळे फिरवत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!!


पोरां चं मराठी सुधारायाला आतां मला कांहीच करायची जरूरी उरलेली नव्हती...

दस्तुरखुद्द सौ. इंदिराजी च मग दोन्ही पोरांच्या खंनपट्यांना अश्या काय बसल्या, की पुढच्या सहा महिनयांतच त्यांचं मराठी सुतासारखं सरळ झालं... ... ...!!!


यथावकाश मग जेव्हां माझा तत्त्वद्न्यान आणि संस्कृताचा व्यासंग सुरूं झाला, तेव्हां कुठं मला ह्या गडबडींमागचं कारण नीटपणे समजलं... ...

कुठल्याही माणसाच्या भा़षे चं खंरकटीकरण कां होतं, यावर संस्कृतातल्या सुभाषितकारांनी अचूक बोंट ठेंवलेलं आहे, ते असं... ... ...


|| वाचनंप्रत्यौदासीन्यं वैरं लेखनसमीचिनम्

      व्याकरणस्य विदारणं च, भाषादारिद्र्यमूलकम् ||


तात्त्पर्य, वाचनासंबंधी औदासीन्य असणं, लेखनाशी हाडवैर असणं, आणि व्याकरणाप्रति विध्वंसक प्रवृत्ति असणं, ही माणसाची भाषा दरिद्री होण्यामागची तीन प्रमुख कारणं असतात...अश्या मनुष्याचा तत्त्वद्न्यानात ' भाषादरिद्री ' या उपाधी नं गौरव केलेला आहे...!!!


पुढं एकविसावं शतक उलटून ' भ्रमणध्वनिं ' ची दशदिशांत लागण पसरल्यावर, या सुभाषितकारांच्या द्रष्टेपणाचा मला जो वाजवून प्रत्यय यायला लागला, तो आजतागायत येतोच आहे...

कुठल्याही गोष्टीची खंरकटी बाजू च वेंचून तिचा बेदम दुरुपयोग करण्यांत आपल्या पोराटारां चा हात अलम दुनियेत कुणीच धंरूं शकणार नाहीत... ...


दिवसेंदिवस या ' मोबाईल वेड्यां ' ची भाषा अधिकाधिक खंरकटी व्हायला लागली... ...

टी फॉर यू ' चं ' T 4 U ’ असं खंरकटीकरण झालंं...

‘ GREAT ’ शब्द लिहायचा, तर तब्बल पांच मुळाक्षरं कोण लिहिणार ? मग द्या ठोंकून ' GR8 ’...!!

तेंव्हढाच अधिकची दोन मुळाक्षरं लिहायचा त्रास वांचला... ...

आणि असल्याच जातिवंत खुळ्यांच्या बाजारांतला भाव पण वधारला... ... !!!

आपली भाषा खंरकटी होत चाललीय ह्याची ना कुणाला फिकीर, ना लाजलज्जा... ...

उलटपक्षीं त्या काळच्या विशीतल्यांना तर त्यांच्या खंरकटलेल्या भाषेचं च भूषण वाटायला लागलं... ...

ज्याची भाषा ज्यास्तीत ज्यास्त खंरकटी, तो महानायक समजला जायला लागला...


माणसाचं अधःपतन हे त्याच्या भाषेपासून सुरूं होतं, आणि भाषेपांठोंपांठ मग आवडी-निवडी - म्हणजेच अभिरुचि, मग संवयी, नंतर विचार, त्यापाठोंपाठ संस्कार, मग आचार ऊर्फ वागणूक आणि शेंवटी माणसा चं अवघं जगणं च खंरकटं होऊन बसतं.’

असा तत्त्वद्न्यांतला एक मूलभूत सिध्दांत आहे...

नेमकं हें च त्या काळानंतरच्या तरूण पिढ्यांच्या बाबतीत होऊन बसलं...

फार लांबचं कश्याला, शतकपूर्व काळांत मला दर वाढदिवसाला

' Many Many hearty compliments and returns of this auspicious day... ...May the Almighty bless you with all, that you deserve and strive for. ’

असे भरगच्च मनःपूर्वक संदेश आवर्जून यायचे...

गेल्या वाढदिवसाला एका स्वतःला अमेरिकन समजणा-या महाभागाचा

‘ Hpy Bdy ’

असा अतिप्रगत संदेश आला, आणि त्याची मी

‘ Tx ’

अशी टिचकी मारून महाप्रगत बोळवण करून मोकळा झालो होतो... ...!!


या महाभागांची सर्वप्रथम बुध्दि खंरकटी झाली...

मग प्रवृत्ति खंरकटी झाली...

पांठोंपाठ संस्कार खंरकटे झाले...

नंतर भाषा खंरकटी - म्हणजेच जिला ' स्लॅंग ' म्हणतात - तशी झाली...

मग खाणं-पिणं खरकटं झालं...

हळू हळू वस्त्रंप्रावरणं खंरकटी झाली...

नंतर लेखन खंरकटं झालं...

लगोलग श्रवण खंरकटलं...

यथावकाश वाचा खंरकटी झाली... ...

मग विचार खंरकटे झाले... ...

शेंवटी आचार खंरकटे झाले... ...

परिणामीं अवघं जगणंही खंरकटून गेलं... ...

आणि मर्कटं बरी म्हणावीत, अशी त्यांची सद्यावस्था झालेली दिसते आहे... ... ...!!!


या भाषेच्या ' T4U ' छाप लघुकरणाचा - म्हणजेच खंरकटीकरणाचा - हिसका कसा बसतो, ते मागच्या आठवड्यात च आम्हांला अगदी खंणकावून अनुभवायला मिळालं...........


उपरोक्त सुभाषिताच्या उत्तरार्धांत, माणसाची भाषा एकदां कां खंरकटी होऊन बसली, की त्याचे कसे अनर्थकारक दुष्परिणाम होतात, ते सुभाषितकार सांगतायत...


|| हताऽशुध्दा च भाषायामनर्थमूलमुपस्थितम्

     मुद्रादैत्यप्रमादेन पालको बालकायते ||


तर सुभाषितकार म्हणतायत की ' अश्या ' भाषादरिद्रां ' च्या लेखन-संभाषणांत अभिप्रेत अर्थांचे जे अनर्थ होतात, त्याचं मूळ त्यांच्या बिनडोकपणे मोडतोड करून खंरकट्या झालेल्या भाषांत सापडतं, आणि परिणामी ‘ पालका ‘ चा ‘ बालक ‘ ही होऊन बसतो...!!!


अगदी सहीसही असाच अनुभंव आम्हांला गत सप्ताहात गिळावा लागला, जो निस्तरायला किती काळ लोटणार आहे, आणि किती खस्ता खाव्या लागणार आहेत, ते मायबाप सरकारला च ठाऊक... ...

ते ब्रह्मदेवालाही सांगतां येत नसतं... ...!!!

त्याचं असं झालं.........

 

आमच्या दोघांच्या २०१३ सालीं काढलेल्या पारपत्रांची मुदत सद्य मार्च महिन्याच्या अखेरीस संपत होती...

साहजिकच सौ. इंदिराजी ' ताबडतोब पारपत्रांचं नूतनीकरण पार पाडून मोकळे व्हा ' असा अध्यादेश कांढून मोकळ्या झाल्या, आणि मी त्या खटपटीला लागलो... ...


आतां ती सगळी प्रक्रिया घरीं बसून सुध्दां आंतरजालावर पार पाडतां येत असल्यानं बरेच श्रम वांचणार होते...तथापि सौ. इंदिराजी नी ' आंतरजालावर विहित अर्जांतले रकाने भंरतांना अजिबात धांदरटपणा करूं नकां ' अशी सज्जड तंबी भंरलेली असल्यानं, सर्वप्रथम मी संबंधित स्थानकावरनं अर्ज कसे भंरायचे याची मार्गदर्शिका पायउतार केली, आणि ती सामोर उघडून ठेंवून अर्ज भंरायला सुरुवात केली एकदाची... ...

 


मी, “ अहो... ...इकडं या बरं जरा जलदीनं... ...

सौ. इंदिराजी, “ आले...आले...दोन अर्ज ते काय भंरायचेत, तर कुरुक्षेत्रावर जायला निघाल्याच्या थाटांत लागले हांका मारायला...!!! ... ...हं बोला पटकन् काय ते...काय हंवय तुम्हांला ?...तिकडं तळणीतलं तेल जळून जाईल माझ्या... ...”

मी, “ तुमची तळणी आधी बंद करा न् इकडं या पटकन् ... ...जरा नीट बघायला हवं या रकान्यात काय कसं भंरायचं ते... ...”

सौ. इंदिराजी हातातल्या झा-यासकटच आल्या, “ हं बोला झटपट काय ते...”

मी, “ हे बघा... ...या वयाच्या रकान्यात मी ७० आकडा भंरला...बरोबर ? ”

सौ. इंदिराजी, “ काय बरोबर ?... ...सत्तरी पूर्ण व्हायची आहे अजून माझी...सध्या आपली एकूणसत्तरी चालूं आहे...!!!...समजलात ? ”

मी कपाळाला हात लावला, “ अहो त्यानं असा कसला काय फंरक पडणाराय ? ”

सौ. इंदिराजी, “ सांगितलं ना ६९ च भंरा म्हणून ?...तुमच्या अर्जात खुश्शाल ९० कां भंरा ना...माझं काय जातंय ?...!!! ”

मी, “ हे भंरलं ६९...झालं?...आतां खाली हे सगळे ' अठरा वर्षाखालील अद्न्यान अर्जदारांच्या पालकां ' ची माहिती भंरायचे जे रकाने आहेत ना ?...ते सगळे अचेतन व्हायला नकोत कां आपोआप ? ”...ते सचेतन च राहतायत... ...त्यात काय भंरणं अपेक्षित असेल आपल्या मायबाप सरकारला? ”

सौ. इंदिराजी, “ अरे बापरे... ... खंरंच की...ह्या रकान्यात काय भंरायचं आतां ?...आंचरटपणाच आहे हा सगळा... ... ”

मी, “ आहे ना आंचरटपणा... ...तुम्हांला उगीच कां हांक मारली मी ?...काय करावं म्हणताय या रकान्यांचं आतां ? ”

सौ. इंदिराजी, “ आहेत तसेच मोकळे ठेंवले... ...तर ? ”

मी, “ आणि माहिती भंरली नाही म्हणून ' सरकारी बाबूं ' नी अर्ज च बाद केले... ...तर ? ”

सौ. इंदिराजी, “ तेही खंरच की...ह्या खंरकट्यां चा कांही नेम नाही...कधी काय करून ठेंवतील ते कुणी सांगावं ?... ...हयातभंर निस्तरत बसायचं मग..........”

मी, “ मग ?...काय करूंया म्हणताय तुम्ही ? ”

सौ. इंदिराजी, “ त्यात काय एव्हढं ?... ...आपल्याला लागूं नाहीत ना हे रकाने ?... ...मग ' N A ’ - म्हणजेच - ‘ NOT APPLICABLE ’ असं भंरून मोकळं व्हायचं, न् काय... ...

मी, “ तुम्हांला वाटतंय तितकं ते सोपं नाहीय इंदिराजी...पण ठीकाय...तुम्ही म्हणताय तर भंरून टाकूंया ' N A ’ म्हणून... ...हे बघा....या पहिल्या रकान्यात पालका चं स्वतःचं आणि वडिलांचं अशी दोनच नांवं भंरायची आहेत... ...हे इथं भंरलं N A म्हणून...ठीक ? ”

सौ. इंदिराजी, “ ठीकाय... ...पुढं...”

मी, “ आतां ह्या खालच्या रकान्यांत फक्त आडनांव च भंरायचं आहे... ...बरोबर ? “

सौ. इंदिराजी, “ हं...बरोबर...”

मी, “ हे बघा...इथं पण N A भंरुन टाकलं...काय ? ”

सौ. इंदिराजी, “ छान... ...काय पण खंरकटे अर्ज करून ठेंवलेत मेल्यांनी... ...झालं तुमचं ?....जाते मी आतां...तिकडं गॅसवर ठेंवलेलं तेल गरम झालं असेल आतांपावेतों... ...”

मी, “ हं...जा आतां तुम्ही... ...पुढचं सगळं बघतो मी कसं काय भंरायचं ते...”

 


 

मी मग शांतपणे अजिबात गडबड न करतां त्या अर्जात उर्वरित मागच्या-पुढच्या सात सात पिढ्यांची माहिती भंरून मोकळा झालो, न् तितक्यात सौ. इंदिराजी नी जेवणाचा पुकारा केल्यामुळं जेवायला उठलो... ...

भोजन यथासांग पार पडल्यावर मग सौ. इंदिराजीं चा तासभंर वामकुक्षी चा प्रियतम कार्यक्रम ठंरलेला असतो...त्यात कालत्रयींही बदल होत नसतो, पण त्या दिवशीं हे पारपत्रांचं काम कसं काय पार पडतंय ही उत्सुकता लागलेली असल्यानं त्या आपण होऊनच ' आधी हे पारपत्रांचं काम हातावेगळं करूंया ' म्हणत माझ्याशेंजारीच संगणकासमोर बसल्या...


मी, “ आधी ह्या तुमच्या अर्जा चं, तुम्ही च पुनरावलोकन करून घ्या, म्हणजे तुम्ही झोंपायला जायला मोकळ्या व्हाल...नंतर मी सावकाश माझ्या अर्जा चं काय ते करतो...”

,” ठीकाय चालेल ", म्हणत सौ. इंदिराजी खुर्ची पुढं सरकवून संगणकासमोर स्थानापन्न झाल्या... ...

मग मी, “ हं हा अर्ज उघडला बघा तुमचा...तो घ्या आतां तपासून...”, असं म्हणत खुर्चीवरनं उठायला लागलो, आणि अचानक सौ. इंदिराजी नी, " अहो हे बघा काय लचांड होऊन बसलंय...” म्हणत माझी बखोटी धंरून मला परत खुर्चीवर आदळला...!!!


मी संगणकाच्या पडद्यावर बघितलं, तर अर्जात सौ. इंदिराजीं चं वय ६९ नोंदलेलं होतं...

आणि त्याच्या खाली आम्ही अर्ज भंरतांना ' अद्न्यान पालक कर्त्या ' च्या नांवाच्या दोन रकान्यांत जे ' N A ’ असं ‘ NOT APPLICABLE ’ चं लघुकरण भंरलेलं होतं, त्यांचं आपोआपच एकत्रीकरण होऊन ती नोंद अशी होऊन बसलेली होती


Legal Guardian’s name :    N A N A .....!!!!

 



तो सरकारी महा आंचरटपणा बघून मी ' खीः खीः खीः खीः ' करायला लागलो...

आणि खुद्द सौ. इंदिराजी च कपाळावर हा मारून घेत ' ह्याः ह्याः ह्याः ह्याः ह्याः ' करायला लागल्या...!!!


आतां लचांड होऊन असं बसलंय, की...

एकतर एकदां दाखल केलेल्या अर्जात अर्जदाराला मग अवाक्षराचाही बदल करतां येत नाही...!

त्यासाठी मला बहुतेक सौ. इंदिराजी सह थेट दिल्ली गांठावी लागेल...

आणि खुद्द राष्ट्रपतीनां च समक्ष भेंटून त्यांच्या कचेरीत दयेचा अर्ज दाखल करावा लागेल, की...

 

," आमच्या धर्मपत्नि सौ. इंदिराजी यांना लहानपणीं त्यांच्या मातोश्री लाडानं ' बाळ ' म्हणून हांक मारीत असत, तथापि आतां त्या ६९ वयाच्या आहेत...सबब त्यांची गणना ' अद्न्यान बालकां ' करणं अयोग्य होईल...!!

अखिल दुनियेतले लोक माझ्या ' नानिवडेकर ' या आडनांवाचं लघुकरण करून मला ' नाना ' या नांवानं ओंळखतात हे जरी खरं असलं, तरी वास्तवात आणि माझं वय हे सौ. इंदिराजीं च्या वयापेक्षां तब्बल सात महिन्यांनी कमी असल्यामुळं माझी गणना ‘ नाना ‘ या नांवानं सौ. इंदिराजीं च्या पालकांत करणं हे सर्वथा अयोग्य होईल...ते होणं मला या जन्मांत तरी शक्य नाही... !!

तिसरं सत्य असं, की आमच्या विवाहाच्या दाखल्यावर माझी नोंद सौ. इंदिराजीं चा ' नवरा ' म्हणून आहे, आणि त्यानुसार वास्तवात मी सौ. इंदिराजीं चा नवरा म्हणजेच ' मालक ' लागतो... ‘ पालक ' कदापि होऊं शकत नाही...!!!

तेव्हां आम्हां अजाण लेकरांवर दया करा, आणि हे लचांड निस्तरा एकदाचं...!!! ”

तात्त्पर्य हे, की...

वास्तवात सौ. इंदिराजी ' बालक ' नाहीत...!

आणि मी नवरा या नात्यानं त्यांचा ' मालक ' आहे...!!

पालक ' त्रिवार नाही... ...!!!


आतां हे असलं लचांड निस्तरायला पल्या महान देशांत किती जन्म लागतील, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगूं शकत नाही... ...!!!

ते फक्त ' जातिवन्त सरकारी खंरकटे ' च सांगू शकतात... ... ...


आतां समजलं काय बाबांनों, ‘ भाषादारिद्र्या ' च्या कपाळीं नियाती नं कसले जीवघेणे भोग लिहिलेले असतात ते ?



-- रविशंकर.

१० मार्च २०२२. 

 

No comments:

Post a Comment