Search This Blog

Sunday 2 May 2021

|| चुना-तंबाखू मळुन ||

 

|| चुना-तंबाखू मळुन ||


संतशिरोमणि तुकोबां ची एक मजेशीर ओंवी आहे...


व्यवहारीं शहाणपण | चुना-तंबाखू मळुन

ग्रंथपंडित विधान | चितपट मारी !!!

 

इथं तुकोबां ना ' चुना-तंबाखू मळुन ' याचा अर्थ ' व्यवहारी जगात वावरून शहाणं होणं ' असा अभिप्रेत आहे...खंरोखंरीच ' चुना तंबाखू चा बार लावणं ' असा नव्हे.


तुकोबां च्या ह्या ओंवी चे असंख्य खंणखंणीत दांखले माझ्या आजवरच्या व्यवहारी हयातीत मी स्वतःच बघितलेले आहेत... ...

कुठल्याही विषयातला पंडित हा मुळात बुध्दिमान असल्याशिवाय तो पंडित होऊं च शकत नाही...बरोबर?

तर मग अश्या बुध्दिमान लोकांचं व्यवहारी जगात असं कडबोळं कां होतं ?

कारण असतं व्यावहारिक शहाणपणाचा ठार अभाव...त्यामुळं अश्या ग्रंथपंडितांना व्यवहारी जगांत एखादा चुना-तंबाखू मळणारा अशिक्षित माणूस सुध्दां बघतां बघतां चारीमुणड्या लोंळवूं शकतो...

संस्कृतातही असंच दुसरं एक सुभाषित आहे...ते असं आहे...

 

|| पाण्डित्यं तारतम्यं वा किं वरं मतिभूषणम् ?

तारतम्यविहीनत्वाद्वरा विद्याविहीनता

तारतम्ययुतामत्यार्विद्या कल्याणकारिणी

तस्माद्विच्छेदसंप्राप्तो पण्डितोऽपि विदूषकः ||


तात्पर्य, सुभाषितकार सांगतायत, की पांडित्य आणि तारतम्य ( म्हणजेच व्यावहारिक शहाणपण ) यातलं बुध्दि चं खरं आभूषण कोणतं ?...तर निर्णायकपणे व्यावहारिक शहाणपण च.

कारण त्याचा च जर अभाव असेल, तर व्यवहारी जगांत पुस्तकपण्डिताचाही बघतां बघतां विदूषक होऊन बसतो... ...!!

ह्या सूक्ताचेही आजवर शेंकडों नमुने मी प्रत्यक्ष्यांत बघितलेले आहेत...!!!

त्यातलाच हा एक वेंचक नमुना... ... ...

चुना-तंबाखू मळुन '

 

-- रविशंकर.

२ मे २०२१.

************************************************************


टक टक टक...

टक टक... टक टक टक टक... ...

रविवार च्या दुपारीतली झोंप चांळवली, आणि पलंगावरून डोंळे चोंळत-उठत मी अडणा संरकंवून खोली चा दरवाजा उघडला... ...

बघतो, तर समोरच्या ' नाना सपकाळां ' चा मुलगा ' ढग्या ' दरवाज्यात उभा होता... ... ...

१९९८ सालच्या जानेवरी महिन्यातली ती २६ तारीख होती...वेंळ होती दुपारी साडे चार ची.

सहसा दुपारीं वामकुक्षीसाठी मी कधी च झोंपत नाही... ...झोंपलो, तर नंतर उर्वरित दिवस आळसात वाया जातो म्हणून...

तर त्या दिवशीं राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असल्यानं माझ्या लातूर मधल्या ' हॉटेल सुहाना ' या निवासी हॉटेल च्या भोजनगृहांत सकाळी पक्वान्नांच्या जेवणाचा बेत होता, आणि त्यावर उभा-आडवा हात मारून झांल्यावर मग चांगलाच पेंगुळल्यामुळं मी जरा आडवा झालो होतो, तर ही ' टकटकी ' ची मक्षिका वामकुक्षीच्या पेल्यात पडलेली होती... ... !!


आतां मुळात मी कायमचा पुण्यात स्थायिक असतांना १९९८ सालांतल्या हिंवाळ्यात लातूरला कसा काय पोंचलो, आणि तिथं कश्यासाठी गेलो होतो, हे जाणून घ्यायचं असेल, या च ब्लॉगवरची ' मूलपिण्डोऽबाधितः ' ही कथा आधी वांचून नंतर प्रस्तुत कथेचा आस्वाद घ्यावा... ...सध्या इतकंच पुरे, की त्याकाळीं मी लातूरला सुहाना नांवाच्या निवासी हॉटेलात रहात होतो... ... ...


हॉटेल समोरच्याच घरांत सपकाळ आडनांवाचं एक शेंतकरी कुटुंब रहात होतं...

 


 श्री. नामदेराव उर्फ नाना, त्यांच्या पत्नि सौ. बायजाबाई ( यांना मी बायजा मावशी म्हणत असे ), थोरला मुलगा चि. संपत, त्याची बायको सौ. ऐश्वर्या, दोन वर्षांचा गोजिरवाणा नातू चि. सर्जेराव, आणि धांकटा मुलगा चि. आनंद ऊर्फ ' आंद्या '... ... इतकी माणसं घरांत नांदत होती... ...ह्या ' आंद्या ' ला गावांतली तमाम माणसं ' ढग्या ' म्हणून हांक मारायची...कारण काय ते ब्रह्मदेवालाच ठाऊक असावं...!!

नाना सपकाळांची लातूर जवळच्याच किल्लारी नांवाच्या खेंडेगावांत साठ-सत्तर एकर भुसार धान्यांची शेती होती, जी मोठा मुलगा संपत सांभाळायचा... ...

सून ऐश्वर्या मॅट्रिक झालेली असून लातूर मधल्याच एका बी. पी. . मध्ये नोकरी करायची, आणि धांकटा आनंदा सहावीत शाळेत शिकत होता... ...

लातूर जवळच्या किल्लारी-राजेगांव भागांत नुकताच साडेआठ रिश्टर स्केल चा दंणदंणीत भूकंप झालेला होता, आणि त्या तडाख्यात नानां चं किल्लारी गावांतलं घरदार पार उध्वस्त झांलेलं होतं... ...

आमचा टाटा उद्योग समूह लातूर-उस्मानाबाद हमरसत्यालगतच भूकंपग्रस्तांसाठी दीडशे घरकुलांचा एक पुनर्वसन प्रकल्प उभारत होता...

त्यातल्याच एका घरासाठी नाना सपकाळांची सरकारांत वर्णी लागलेली होती, आणि म्हणून आमची ओंळख-पाळख अश्या योगायोगानं झालेली होती... ...

 


नाना आणि त्यांच्या घरांतली सगळी माणसं मला ' विंजनेर सायेब ' म्हणून हांक मारायची...फक्त ' ढग्या ' च तेव्हढा मला ' दादासायेब ' म्हणायचा...

नाना-बायजा मावशी म्हणजे विधात्यानं गांठ बांधलेलं एक असामान्य जोडपं होतं

स्वतः नाना माळकरी असून विठ्ठल भक्त होते...आयुष्यांत आषाढीची पंढरपूर ची वारी एकदांही न चुकवलेले... ...' कुणाच्या ना अध्यात ना मध्यात , आपले उद्योग बरे नी आपण बरे ' सा साधा सरळ माणूस... थोंडक्यात सांगायचं, तर तुकारामांचे अवतार... ...

तर बायजा मावशी म्हणजे जन्मात कधी शाळेचं तोंडही न बघितलेल्या पण व्यवहारी शहाणपणांत डी. लिट. संपादित केलेल्या म्हणाव्यात, असल्या खंमक्या बाई ... ...

रविवारी, किंवा सुट्टया-सणावारांच्या दिवशीं घरांत कांही गोडधोड अथवा ' वश्याट् ' ( म्हणजे सामिष ) केलेलं असेल, तर बायजा मावशी अगदी ' मावशी ' च्या अगत्यानं तें चांखायला ढग्या मार्फत माझ्याकडं आंठवणीनं पांठवून द्यायच्या.

नानां ना सुपारीच्या खाण्डाचंही व्यसन नाही, तर बायजा मावशी थेट पुरुषी थाटात अंगठ्यानं डबीतला चुना कांढून तळहातावर खुशाल चुना-तंबाखू मळायच्या, आणि फाड् दिशी टाळी वांजवून दांढेखाली सफाईनं बार देखील भंरायच्या... ...!!

बोलण्यांत तर बघतां बघतां भंल्याभंल्याना कधी चितपट लोळवतील, कांही नेम सांगतां येणार नाही, असलं खमंग प्रकरण होतं एकूण... ...!!

 


त्यामुळंच नाना जरी शेतीवाडी बघत असले, तरी घरींदारीं सा-या व्यवहारांच्या आर्थिक नाड्या बायजा मावशी च सांभाळायच्या...

तात्त्पर्य, सारं सपकाळ कुटुंब बायजा मावशीं च्या करड्या अंमलाखाली सुखासमाधानानं नांदत होतं... ... ...

नानां चा ढग्या तेव्हां सहाव्या यत्तेत गणितात नापास झालेला होता, म्हणून नानां नी मला त्याचं गणित सुधारायची गळ घातलेली होती... ...

माझं प्रकल्पावरचं दैनंदिन कामकाज संपून सायंकाळीं सहा वाजेपर्यंतच आम्ही सगळे सहकारी निवासी हॉटेल वर परतत असूं.

टी. व्ही. बघायची मला फारशी आवड नाही, त्यामुळं हॉटेलवर परत आल्यानंतर मी तसा मोकळा च असायचो. म्हणून मग आंठवड्यातले चार दिवस मी ढग्याच्या गणिताची तयारी करून घ्यायला सुरुवात केली... ...

त्याचंही भलं होत होतं, आणि माझा पण छान वेळ जायचा... ... ...

नानां नी च सुरुवातीला जेव्हां आडून आडून मला शिकवणीच्या फी बद्दल छेडलं, तेंव्हां मी ' ढग्या चं गणित सुधारलं ना, की माझी फी मला मिळाली म्हणून समजा नाना ' असं उत्तर देऊन तो विषय संपवलेला होता... ...

नाना नां ह्याचं कोण अप्रूप वाटायचं...

आमचा ढग्या ' विंजनेर सायबा ' कडं शिकतूंया ' असं ते त्यांच्या कल्लेदार मिश्यांवर तांव देत कुणाकुणाला सांगायचे देखील... ...

नानांच्या कुटुंबाची राहणीही अगदी साधीसुधी...म्हणजे नाना धोंतर-कोट-टोपी च्या पेहेरावांत, तर बायजा मावशी नऊवारी दुटांगी इरकली लुगडं, बंद्या रुपयाएव्हढं ठंसठंशीत कुंकू, गळ्यात गंठण अश्या अस्सल मराठमोळ्या वेषात असायच्या, संपत-ढग्या ची जोडी विजार आणि सदरा अश्या सामान्य खेडवळ शेंतकरी अवतारात वावरायची... ...

अपवाद होता तो एकट्या ' ऐश्वर्या बाईं ' चा... ...

या ऐश्वर्या बाईं चं माहेर किल्लारी शेजारच्या राजेगांवातलं... ... 

माहेरचं कुटुंब भंक्कम सधन आणि वडील गांवचे सरपंच वगैरे होते... शिवाय एकटी च मुलगी असल्यानं माहेरीं बेदम लाडकोड झालेले असावेत... ...

तात्त्पर्य, हा लाडोबा सपकाळांच्या कुटुंबाला ' नाकापेक्षा मोती जड ' होऊन बसलेला होता ... ...

भंरीला आणखी कुठल्यातरी ' बी. पी. .‘  चिकटल्यावर या ' ऍशबाई ' नां ' म्हमई-फारीन ' चं वारं पण लागलेलं दिसत होतं... ...

त्यामुळं, केंसांचं टोंपलं करून, लेगी-टॉप चंढवून, फेशियल करून, लातुरांत फिरणा-या ऐश्वर्याबाई म्हणजे ढेबेवाडी सारख्या खेंड्यात राहणारी एखादी पारशी बाई जितकी

विरूप – म्हणजे मिस् फिट् - दिसेल, तितक्या ह्या ऐश्वर्याबाई नाना सपकाळांच्या साध्या-सुध्या शेंतकरी कुटुंबात डोक्यावर आलेल्या एखाद्या टेंगळासारख्या उठून दिसायच्या... ... ...!!!

 


नाना-मावशी-संपत नी कदाचित तिला समजावून पण बघितलेलं असावं...

तिच्या छानछोकी-खर्चिक राहणीपायीं घरांत कुरबुरीही व्हायच्या अधनं मधनं, पण ऐश्वर्या बाईं च्या नखरेबाज राहणी-वागण्यात ढिम्म कसला कांही फंरक पडलेला दिसत नव्हता... ... ...

ह्यावर बसलेली अजून एक खमंग फोंडणी म्हणजे ऐश्वर्या बाईं चं हाताबाहेर गेलेलं ' माहेर वेड ' ...

दर महिना-दोन महिन्यातनं कांही ना कांही फुटकळ फालतूं कारणं शोंधून ही पोरगी जी माहेरी संटकायची, ती कुणीतरी तिला परत आणायला जाईपर्यंत सासरीं फिरकायचीच नाही... ...!!!

आणि ह्याला च नानांच्या कुटुंबातले सगळे वैतागलेले दिसत होते... ...

तर सगळं असं होतं एकंदरीत... ... ...

...........................................................................................

...........................................................................................


मी,” काय रे ढग्या...काय काम आहे ? “

ढग्या,” नाना नीं इच्च्यारलंया की तुमी जरा मोकळं हायसा काय म्हूनश्यान... ...”

मी,” ते कश्याला ?... ...कांही काम आहे काय नानां चं माझ्याकडं ?”

ढग्या,” काय की बा...तुमच्यासंगट बोलायचं हाय आसं कायतरी म्हनत व्हतं बगा नाना...”

मी,” ठीकाय ठीकाय...जा...सांग नानां ना, की मी मोकळाच आहे, त्यांना यायला कांही हरकत नाही म्हणून....काय ?”

ढग्या,” सांगतो दादासायेब... ...जाऊ म्या ?”

मी,” हं...सांग जाऊन नानां ना...”

ढग्या उड्या मारत दडदडत जिना उतरून निघून गेला... ...


नाना येताहेत म्हटल्यावर मग मी तोंड-बिंड धुवून डोंळ्यावरची पेंग झंटकून टाकली, आणि लेंगा चंढवून झब्बा घालतोय न घालतोय तों च ' विंजनेर सायेब...यिऊं काय वो आंत ? ‘ असा आवाज आला, आणि पांठोंपाठ नाना सपकाळ खोलीत दाखल झाले.....

मी ,” या... ...या नाना...बसा बसा...”

नाना,” सायेब तुमची झोंप-बीप मोडली का काय वो म्या ?...न्हाई...मंजी तसं वाटतंया म्हून इच्च्यारतो आपलं... ...तसं कायतरी आसंल, तर मंग घंट्याभरानं यिऊं काय मंग ? ”

मी,” छे..छे...तसं कांही नाही नाना... ... अहो आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं नुस्ताच लोंळत पडलो होतो इतकंच काय ते...झोंपमोड वगैरे कांही नाही झालेली माझी... ...बसा अगदी आरामात तुम्ही... ...चहा घ्याल ना ?...नाही म्हणजे आतां दुपारच्या चहाची तुमची वेळ झालेलीच आहे, म्हणून विचारतोय... ...”

नाना,” आनि तुमचं काय ? “

मी,” अहो मी पण घेतोय ना चहा तुमच्याबरोबर ... ...” असं म्हणत मग मी हॉटेल मॅनेजर ला तळमजल्यावर फोन करून चहा-बिस्किटं मागवली... ...

नाना कसल्यातरी चिंतेत पडल्यासारखे दिसत होते...म्हणून मग मी च बोलायला सुरुवात केली...,” काय झालंय नाना ?...कसला घोर लागलाय तुम्हांला एव्हढा ? “

नाना,” बराबर वळाकलंसा बगा सायेब तुमी... ...म्हूनच आलोया तुमच्या संगट बोलाया...”

मी,” मग बोला की...अगदी मोकळेपणानं बोला... ...”

नाना,” तेचं काय हाय सायेब...तुमी घरातलंच हायसा म्हून बोलतोया...”

मी,” अगदी मोकळेपणानं बोला नाना...तुम्ही माझ्यापाशी जे बोलणार आहांत ना, त्यातलं अवाक्षरही या कानाचं त्या कानाला कळणार नाही...झालं आतां ?

नाना,” विंजनेर सायेब...आदीच तुमी यवडं करतायसा ढग्यासाटी...तेच्यात आजून किती तरास द्याचा तुमास्नी म्हून जीव कुचामतोया बगा...पर माजं तर डोस्कं च तंरकाटल्यागत झालंया ... ...काय बी कळंनासं झालंया बगा...काय करावं आन काय नगं त्ये... ...

तर मंगाशी बायजा च म्हनली, की तुमच्यासंगट वाईच इच्च्यार-इनिमय करा जावा, म्हूनश्यान आलोया... ...”

मला अंदाज आला, की कांहीतरी घरगुती पेंच निर्माण झालेला असावा नानांच्या घरांत...त्याशिवाय बायजा मावशी नी नानां ना इथं पिटाळलं नसतं... ...

मी,” माझी कांही मदत हंवीय काय नाना ? “

आतां नाना जरासे सैलावले,” तुमासनी ठावं हायच सायेब... ...आयशी ( म्हणजे सौ. ऐश्वर्या बाई ) दोन म्हैन्याआदुगर म्हायेराला गेल्ती त्ये... ...”

मी,” हो...ठाऊक आहे मला ते... ...मग ?”

नाना,” ती कालच्याला जी आलीया न्हवं काय मागारी , ती डोस्कं तंरकाटूनच आलीया बगा...”

मी,” कां?...काय झालं?... ...संपत बरोबर कांही भांडणतंटा-बिंटा तर नाही झाला तिचा ?”

नाना,” आवो सायेब... ...तसलं कायतर आस्तं,तर  निस्तराया काय आवगाड न्हवतं वो... ...हतं येगळंच आक्रीत व्हऊनश्यान् बसलंया... ...”

मी,” म्हणजे नेमकं काय झालंय नाना ?”

नाना,” तुमास्नी ठावं हायेच सायेब... ...आयशी चं वागनं-सवारनं... ...आन् बक्कळ पैका बी उडिवनं...”

मी गप्प च राहिलो.........

नाना,” तर आत्तां घरला वापस आल्यापास्नं तिनं धोंसरा च लावलाया बगा माज्या टकु-याला... ...”

मी,” कसला धोंसरा लावलाय म्हणताय नाना ?”

नाना मग सुस्कारा टांकत म्हणाले,” वायलं (म्हणजे वेगळं ) -हायाचं म्हनाया लागलीया आयशी... ...”

मी मग त्यांना जरा धीर देत चहा वगैरे दिला, आणि विचारलं,” मग संपत चं काय म्हणणं आहे ह्या बाबतीत ? “

नाना,” त्येचा तर पार ' शिराळशेट ' करूनश्यान् ठिवल्याला दिसतूंया मला ह्या आयशी नं विंजनेर सायब... ...आजाबात त्वांड उचकाटंना झालंय बगा त्ये ... ...आस्सं बी बोलं ना, आन् तस्सं बी बोलं ना झालंय... ... 

काय करायचं आतां सांगा मला ?

पयला इस्कोट मंजी किल्लारी च्या घरा-दाराची आदुगरच वाट लागलीया... ...आनि भंरीला ह्ये आसं आयशी च्या आंगांत आल्यालं हाय... ...

माजी उमर ट्येकलीया साटी ला, न् आतां घरा-वावराची भंकलं झाल्याली बगाया लावनार हाय काय त्यो पांडुरंग, काय कळंना झालंय बगा सायेब...”

नानां च्या डोंळ्यांत आतां मात्र पाणी तंरळलं... ...

तात्त्पर्य, मामला चांगलाच ऐरणीवर आलेला दिसत होता एकूण...

 तथापि नानांचं कुटुंब जरी मला परका मानत नसलं- माझा आदर करीत असलं- तरी रूढार्थानं मी कांही त्यांच्या घरातला ' रक्ताचा ' कुणी लागत नव्हतो.

म्हणून नानां ना कशी नि किती मदत करतां येईल, हे मलाही कोंडं च पडलं... ...

करायचं काय आतां ?

मी मग नानां ना पुण्या - मुंबई सारख्या पुढारलेल्या शहरांतल्या शेंकडों कुटुंबांत, त्यांच्या घरांत जे रामायण घडत होतं, तशीच रामायणं कुठल्या थंराला जाऊन घडत असतात, ते समजावून सांगितलं, आणि म्हणालो,” नाना...तुम्ही मला परका मानत नाही हे ठाऊक आहे मला, पण खरं तर हा वाद तुमच्या घंरातला रक्ताच्या नात्यातला वाद आहे, आणि खरं तर मी प्रत्यक्ष्यांत तुमच्या रक्ताच्या नात्यात बसत नाही, हे ही वास्तव लक्ष्यांत घ्या...तेव्हां मी मदत करायला सदर मामल्यात प्रत्यक्ष हस्तक्षेप करायला जाणं चुकीचं होईल...पण संपत ला खासगीत कांही सल्ला देऊन जर मदत होत असेल, तर तेव्हढी मी अवश्य करीन... ...”

,”ठावं हाय त्ये मला विंजनेर सायेब...तुमी म्हंतायसा त्ये येवाराला बी धंरूनश्यान हाय... ...बरूबर हाय तुमचं म्हननं आक्षी...पर संपतला श्यानपन सांगाया जाऊनश्यान काय बी उपेग हुयाची आशा न्हाय -हायल्याली सायेब आतां... ...मस् त्वांडं वाजवूनश्यान् दमलोया बगा म्या आन् बायजा बी... ...

गरीब हाय ह्ये आमचं पोरगं वो... ...पर आयशी नं तेला टाचंखाल्ती दाबून ठ्येवल्याला हाय बगा... ...

आखरीला आतां बायजानं च ठरीवलंया की आज सांच्यालाच येक डाव काय त्यो कंडका ( म्हणजे तुकडा ) पाडूनश्यान् मोकळं व्हवूं या म्हूनश्यान... ...तर बायजानं सांगटलं मला, की तुमास्नी भ्येटूनश्यान सांच्याला घरला यायची इनंती कराया... ... म्हनली की विंजनेर सायब जर कां बसलं हितं यिऊनश्यान् , तर मंग वंचावंचा त्वांडं वाजिवल्याबिगर समदं येवस्तेशीर पार तरी पडंल... ...म्हून आलोया तुमास्नी बंलवाया... ...यवडं कसं बी करुन करा सायेब संपत साटी...लई उपकार व्हत्याल बगा आमच्यावर... ... ...”

असं बोलत नानां नी खंरोखंरीच मला हात जोडले... ...!!

आणि मी च अंवघडून म्हणालो,” येईन मी नाना नक्की...पण हे असं उपकार-बिपकार असलं कांही बोलूं नकां...वेळ वखत बघून मावशीं च्या बोलण्याला कांही पाठबळ देतां आलं तर बघेन फक्त...चालेल ?”

नाना परत हात जोडून उठत म्हणाले,” नक्की या सायेब...इसरूं नगासा... ...लई उपकार व्हतील तुमचं... ...”


ठंरल्याप्रमाणं मी सायंकाळीं सात च्या सुमाराला रस्ता ओलांडून नानां च्या घराच्या दरवाज्याची कडी वाजवली...ढग्या नं दार उघडलं, आणि मी नानांच्या घंरातल्या बैठकीच्या खोंलीत प्रवेश केला... ...

महाभारतातली द्यूतक्रीडा तासभंर आधीच सुरूं झालेली असावी...

घराचे तुकडे करीतों ऐश्वर्या बाईंची मजल गेलेली स्वच्छ दिसत होतीच... ...

आणि संपतरावांचा ' जोरू का गुलाम ' झालेलाही अगदी धंडधंडीत दिसत होता...

अखेरीस खुद्द नाना च जेव्हां म्हणाले,” विंजनेर सायेब...डोस्कं पार तंरकाटल्यालं हाय आयशी चं... ...दिस्तंय न्हवं ?...आतां तुमी तरी कायतरी श्यानपन सांगा ह्या दोगांस्नी...पटलं, तर पांडुरंगाची किरपा म्हनायची आन् काय... ...”

तेव्हां मी मग ' सासू बोले सुने लागे ' च्या न्यायानं संपत ला, आजकालच्या जमान्यातल्या आईबापांनी लाडावून ठेंवलेल्या आंचरट पोरीं कश्या बेफाम झालेल्या असतात, आणि बिनडोक हटवादीपणा करून एकतर स्वतःच्याच पायांवर कशी कु-हाड मारून घेंतात, आणि दुसरं म्हणजे सुखी समाधानी हंसत्या खेंळत्या एकत्र कुटुंबांची कशी वाताहत करून ठेंवतात, जी आयुष्यभंर कधीही दुरुस्त करतां येत नाही, वगैरे वगैरे सगळं व्यवहारी शहाणपण समजावायचा निकराचा प्रयत्न करून बघितला...

पण सारं पालथ्या घड्यावर पाणी पडलं... ...

ऐश्वर्या बाई नी लावलेला ' वायलं -हायचा ' गळ संपतरावांच्या घश्यांत खोंलवर रुतून बसलेला दिसत होता... ...!!

आतां नानांच्या सुखी समाधानी कुटुंबाचे तुकडे कसे होणार एव्हढंच फक्त नक्की व्हायचं बाकी राहिलेलं होतं.......

मी मग बायजा मावशी नां नजरेनंच ' कांही उपयोग नाही ' अशी खूण केली... ...

आणि बायजा मावशीनीं कनवटीची चुना-तंबाखू ची चंची कांढली...

चंचीतनं दोन चिमट्याभंर तंबाखू डाव्या हाताच्या तंळव्यावर घेंतला...

मग चुन्याची डबी उघडून उजव्या हाताच्या अंगठ्यानं तीतनं नखभंर चुना कांढून तो तंबाखूच्या पत्तीत मिसळला... ...

आणि दोन्ही तंळव्यांत ते मिश्रण रगडत शांतपणे ऍशबाई कडं मोर्चा वळवला... ...

,” बास झाला तुजा कुटाणा आतां आयश्ये... ...येवडंच बोल की म्हननं काय हाय तुजं आतां शेवटाला ? “

ऍश,” आमास्नी वायलं -हायाचं हाय... ...बास् .”

बायजामावशी आतां संपतरावाकडं वळल्या,” आन् तुजं म्हननं बी आस्संच हाय काय रं बाबा माज्या ? “

संपतराव गेला तासभंर तोंडात धंरलेली गुळणी कांही सोडेनात... ...

नानां च्या भाषेत ' आस्सं बी बोलं ना, आन् तस्सं बी बोलं ना ' सुरूं झालं... ...

बायजा मावशीं च्या आवाजाला आतां किंचित धार चंढली,” तुजं काय म्हननं आसंल त्ये तुज्या त्वांडातनं सप्पाचट् आयकायचं हाये आमास्नी संपत ... ..."

संपतराव,” माजं काय न्हाई बा... ...आयशी च काय त्ये सांगल तुला...”

बायजा मावशी तंबाखू चोंळतच बोलल्या,” आस्सं हाय तर तुजं... ...काय हरकत नाय...”

मग ऍशबाईंकडं मावशीनीं तोंफे चा मोर्चा फिरवला,” आतां बोल सप्पाचट्...वायलं -हान्यापरीस आजून काय म्हननं हाय तुजं ? “

ऐश्वर्याबाई डोंळ्यावर लोंबणारी वीतभंर लांब झिपरी मानेला एक हिसडा देंऊन पाठीमागं भिरकावत उर्मटपणें उत्तरल्या,” किल्लारीतली आर्दी जिमिन...आनि... ...”

बायजा मावशी तंबाखू चोंळतच होत्या... ...

,” आनि काय आजून ?”

ऍश,” आनि ह्ये विंजनेर सायेब देत्याल त्ये नवं घर बी व्हयाला पायजेल हाय आमास्नी... ... हॉं. “

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” आस्सं व्हंय ?... ...आक्षी ब्येस हाय तुजं म्हननं पोरी ... ...

आतां ह्या आंदा ला बी आमास्नी उरल्याली आर्दी जिमिन द्येया होवी... ...तवा च न्याव व्हईल बरूबर... ...व्हंय कां न्हाय ?”

ऍशबाई गप्प च......

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” आतां समदी जिमिन तुमा दोगांत वाटून दिऊनश्यान् आमी दोगा जनांनी प्वाटं भंराया कुटं भीक मागत जायाचं, त्येवडं सांगतीस काय जरा समजावूनश्यान् आमास्नी... ...ऑं? “

आतां मात्र ऐश्वर्या बाईं चं फेशियल केलेलं तोंड काळवंडायला लागलं... ...!!

मग त्यांनी पण नव-याच्या पावलावर पाऊल टांकत निरुत्तर होऊन गुळणी धंरली... ...!!

बायजा मावशी तंबाखू चोंळत आतां नानांच्याकडं वळल्या,” उद्याच्याला वकिलास्नी बंलवूनश्यान् घ्याचं... ...काय? ... ... आनि...“

नाना नीं गप्प रहात मान डोंलवली... ...,” आनि काय म्हंतीयास बायजा...?”

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” आनि कायद्याचा कागूद करूनश्यान् घ्याचा ह्या दोगांचं आंगटं लावूनश्यान्... ...काय ?"

आतां संपतरावांनी मौनव्रत सोंडलं,” आतां कागूद आनि कश्यापायी आये ?”

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” येकदां काय ह्ये घरा-वावरा चं तुकडं क्येलं का न्हाय संपत, मंग ह्या आयशी ची कसलीबी पिरपिर आयकून घ्याची न्हाय आमास्नी... म्हूनश्यान् कागूद व्हनार... ... शिरलं डोंसक्यात तुज्या आतां...? “

संपतराव पुनश्च गुळणी धंरून मौनांत गेले... ...!!!

बायजा मावशी नी आतां तंबाखू चोंळत आयशीबाईंचं सफाचट् श्राध्द घातलं,” आतां कान खोंलूनश्यान् येकडावच आयकायचं म्या काय सांगतीया त्ये... ...काय? ”

ऐश्वर्याबाईं नी तरीही तांठ्यातच विचारलं,” काय आयकायचं ?”

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” द्येतो तुला हावं त्ये माज्या पोरी... ...काय ?

किल्लारीची आर्दी जिमिन द्येतो तुमची नावं लावूनश्यान् .... ....

ऍशबाई मग माझ्याकडं निर्देश करीत फिसकारल्या,” आनि ह्ये सायेब द्येनार हायती त्या नवीन घराचं काय ?”

बायजा मावशी तंबाखू चोंळत,” त्ये बी संपतच्या नावानं करून द्येतो... ...झालं आतां तुजं समदं ?”

ऍशबाई तोंडावर लोंबणा-या झिप-या पुनश्च मानेला हिसडा देंऊन पाठीमागं झंटकत विजयी मुद्रे नं उत्तरल्या,” व्हंय...झालं समदं आतां...”

बायजा मावशी नी मग फाड् दिशी टाळी वांजवून चुना-तंबाखू मळणीतली फक्की झंटकली, अन् तोंडात बार ठांसत चितपट कुस्ती मारली ,” ह्ये सगळं दिल्यालं घिऊनश्यान् न्हव-यासंगट कुटं बी जायाला वायली हायेस तूं.... ....सर्जेराव फकस्त जलमभंर आमच्यासंगटच हित्तं -हाईल... ... 

बोल...हाय कबूल तुला ?”

ऐश्वर्याबाईंचं तोंड आतां लालेलाल झालं...

डोंक्यावरचं हेअर स्टाईल केलेलं टोंपलं फिस्कारलं... ...

आणि कपाळाला हात लावत त्या कर्कश्य आवाजांत किंचाळल्या,” आरं वा रं वा... ...ह्ये बरं हाय की तुमचं...म्हंजी जिमिन घ्या, घर बी घ्या, आन् पोंटचं प्वार दिऊन टाकूनश्यान् चालतं व्हा... ... 

पोराबगर कशी काय जगनार म्या?... ...ऑं ? “

आणि बायजामावशी दुस-याक्षणीं फिस्कारलेल्या ऍशबाईं चा एका झंटक्यात तेरावा पण घालून मोकळ्या झाल्या,” आसं हाय व्हंय तुजं ?...आतां मी बी तुला ह्यो च सवाल इच्च्यारतीया टंवळे... ...जवाब पायजेल हाय मला तुज्या त्वांडातनं... ...!!!...काय ? “

ऐश्वर्याबाईं चं ब्यूटी पार्लर सुशोभित तोंड आतां काळं ठिक्कर पडलं... ...!!!

त्यांच्या मागं झंटकलेल्या वीत-वीत भंर लांब झिप-या आतां रया उतरून पोंतेरं झालेल्या तोंडावर परत लोंळायला लागल्या... ...!!!

आणि बायजा मावशी कडाडल्या,” आसंल जबाब तुज्यापाशी, तर वाजीव खंणकावून...

आनि नसंल दाडवान उचकाटत तुजं, तर गपगुमान ह्या घरामंदी सुक्कानं नांदाया शिकायचं... ...!!!

शिरलं का न्हाय तुज्या चार बुकं शिकल्याल्या टंकु-यात ?... ...

आनि जित्ती हाईस तोपत्तोर हान कां बिगार, घरामंदी ह्यो इषय भाईर काडायचा न्हाय नरड्यातनं आजाबात... ...!!!

लई नकरं बगितलं तुजं आजपत्तोर...पर हितनं फुडं घरां-दारांत तुजा कसलाबी चावटपना खंपनार न्हाय आमाला...

आनि नसंल जमनार तुला हेच्यातलं काय तरी, तर आत्तां च्या आत्तां तुजं हितं काय आसंल-नसंल त्ये गटुळं खांकोटीला मारूनश्यान् चालतं हुयाचं म्हायेराला जलमभंर... ...!!!     

आलं ध्येनांत समदं सप्पाचट् तुज्या ? “

रूढार्थानं ठार अशिक्षित असलेल्या बायजा मावशींच्या ' चुना-तंबाखू मळुन ' चा तो भन्नाट् तडाखा बघून थंक्क होत मग मी च कपाळाला हात लावला...!

संपतरावांच्या ' जोरू की गुलामी ' ला कायमचं बूच बसलं...!!

नानां चा चेहरा टंवटंवीत गुलाबासारखा नुस्ता फुलून आला...!!

आणि बायजा मावशींच्या ' चुना-तंबाखू मळुन ' च्या एकाच रट्ट्यांत पार पोतेरं झालेलं आपलं तोंड ओंजळीत झांकून मुसमुसत ' लातूर क्वीन ऐश्वर्याबाईं ' नी स्वयंपाकघंराकडं पोबारा केला...!!!!


तत्त्वद्न्यानांत जो एक मूलभूत सिध्दांत आहे की, ‘ माणसाची स्वतःची जी लायकी असते त्या च लायकीचं सगळं आयुष्यभंर त्याच्या वाट्याला येतं '.........

ते हे असं... ...

कारण माणसाचा ललाटलेख तो जन्मतःच सटवाई मुळीच लिहीत नसते, तर माणूस तो स्वतःच्या कपाळीं स्वतःच्याच कर्माच्या लेखणी नं स्वतःच जन्मभंर लिहीत बसलेला असतो...!!!

 

गीतेतला कर्मफल सिध्दान्त तरी दुसरं तिसरं काय सांगतो ?



************************************************************

रविशंकर.

२ मे २०२१.

No comments:

Post a Comment