Search This Blog

Thursday 22 April 2021

|| युक्तं पृथकमौषधम् ||

 

|| युक्तं पृथकमौषधम् ||




 

 ,” हं... ...बाळ...आतां आं कर बघूं जरा... ...हां... ...आस्सं...शहाणं आहे बाळ...हो ना ? ”

डॉ. नाईक आमची चार वर्षे वयाची कन्या चि. मुग्धा ऊर्फ ' बापूं ' चे गोबरे गाल चिमटीत धंरून दाबत म्हणाले...

चि. बापू नी आ केला...

डॉ. नाईकांनी हातातली विजेरी पेंटवून तिचा झोत चि. बापूं च्या तोंडात पाडत त्यांचा घसा नीट निरखून बघितला... ...न् म्हणाले,” हं...छान छान... ...करा आतां तोंड बंद... ...”

मी,” आतां पुढं काय डॉक्टर ? “

डॉक्टर,” हे बघ...हे सगळं निस्तरतां येईल... ... अगदी सफाचट... ...तर पहिली गोष्ट पाळायची म्हणजे मला दाखवायला आणलेल्या ह्या सगळ्या च्या सगळ्या प्रतिजैविकांना - म्हणजे ऍंटिबायोटिक्स ना- केराची टोपली दाखवायची... ...समजलं ?...याला तुमची तयारी असेल, तरच मी ही केस हातांत घेईन...अन्यथा नाही...!!! ”

 


सौ. इंदिराजीं चा चेहरा चिंताग्रस्त झाला,” पण डॉक्टर...पुण्यातले डॉक्टर तर म्हणतायत, की हिच्या टॉन्सिल्स ताबडतोब शस्त्रक्रिया करून कांढून टाकाव्या लागतील म्हणून...नव्हे, शस्त्रक्रियेसाठी हिला उद्यांच इस्पितळांत दाखल करा म्हणून सांगितलंय त्यांनी... ...”

डॉक्टर,” चिन्ता नको... ...मी आहे ना घट्ट बसलेला काय ते बघून घ्यायला ? कांहीही होणार नाही हिला... ...अगदी खंडखंडीत बरी होईल ही... ...मात्र दीडएक वर्ष तरी मी देईन ती औषधं धीर धंरून नियमितपणे द्यावी लागतील हिला...”

सौ. इंदिराजीं,” ठीकाय डॉक्टर... ...तुम्ही म्हणाल तसं...पण ह्यातनं पूर्ण बाहेर निघेल ना ही ?”

डॉक्टर,” ती जबाबदारी माझी... ... मग तर झालं ना ?... ...

... ह्या तुमच्या पतिराजांना लहानपणीं डांग्या खोंकला म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीत ' व्हूपिंग कफ ' म्हणतां ना, तो झाला होता...दीडएक वर्षाचा असतांना...इतका जोराचा, की खोंकून खोंकून हा काळा-निळा पडायचा...आणि त्यामुळं फिट्स देखील यायच्या ह्याला... ...विश्वास बसतोय ऐकून कानांवर ? ”

सौ. इंदिराजी,” खरंच डॉक्टर ?”

डॉक्टर,” ह्याच्या मातोश्री नां विचारा... ...सांगतील त्या सगळं तुम्हांला...अडीच वर्षं औषध चालूं होतं ह्याला...तेंव्हां कुठं निभावला त्यातनं...त्यानंतर मात्र आजतागायत ह्याला काधीच ना डांग्या खोंकला झाला, ना फिट्स आल्या...

( माझ्याकडं वळून ) काय रे बाबा... ...खरंय ना मी म्हणतोय ते ?”

मी,” खरंय तुमचं डॉक्टर... ...म्हणून तर हिला रातोंरात टॅक्सीत घालून पुण्याहून कोल्हापूरला घेऊन आलोय इथं दाखवायला तुमच्याकडं... ...”

इतकं झाल्यावर मात्र सौ. इंदिराजींची खात्री पटली... ...

डॉक्टरांनी मग चि. बापू नां पुन्हां आ करून जीभ बाहेर काढायला सांगितली...

मग शेंजारी असलेल्या औषधांच्या कपाटातनं एक कांचेची कुपी बाहेर कांढून तिचं भेंडाचं बूच काढून त्यांनी कुपी तिरकी करीत चि. बापूं च्या जिभेवर मागच्या बाजूला कुपीतल्या औषधाचा एक च थेंब टाकला, णि म्हणाले

,” झा ऽ ऽ ऽ ऽ ऽ लं...पळा आतां...”

 


 

मी,” आणखी काय औषधं वगैरे द्यावी लागतील काय डॉक्टर ? “

डॉक्टर हंसले,” व्रण पडलेल्या टॉन्सिल्स निस्तरायला एव्हढं पुरेसं आहे, पण हे परत उपटूं नये म्हणून दोन औषधं लिहून देतो... ...ही पुढचे अठरा महिने दररोज न चुकतां चार वेळां आलटून पालटून द्यायची... ...दोन दोन गोळ्या...

मी,” ठीकाय डॉक्टर... ... आणखी कांही?... ...खायचं प्यायचं पथ्य वगैरे? “

डॉक्टर हंसले,” पथ्य बिथ्य कांहीही नाही... ...सगळं खाणंपिणं चालेल... ...पाहिला महिनाभंर फक्त थंड पेयं, आईस्क्रीम असलं कांही अजिबात द्यायचं नाही.... ...समजलं ?”

मी,” हो... ...समजलं डॉक्टर...”

डॉक्टर ,” आणि तीन माहिन्यांनी एकदां दांखवायला घेऊन या म्हणजे झालं... ...”

मी निमूटपणे मुण्डी डोंलवली... ...

डॉक्टर ,” आणि एक अखेरची ताकीदवजा सूचना... ... “

मी,” ती काय डॉक्टर ? “

डॉक्टर ,” ही औषधं सुरूं असेपर्यंत माझ्या परवानगीशिवाय हिला कुठलंही प्रतिजैविक द्यायचं नाही...जर दिलंत, तर इथं परत फिरकायचं नाही !!!... ... काय ? “

सौ. इंदिराजी नी ते ऐकून कपाळाला हात लावला... ...!!!

मी मुकाटपणे मुण्डी डोंलवत डॉक्टरांचं बिल चुकतं केलं, आणि त्यांचा निरोप घेऊन चि. बापू ना कांखोटीला मारीत आम्ही तिथनं काढता पाय घेंतला... ...!!!

सौ. इंदिराजी,” असे कसे हो हे डॉक्टर तुमचे ?... ...रुग्णाबरोबर बोलायची ही काय पद्धत झाली ? “

मी हंसलो,” नाईक डॉक्टरांची बोलायची पद्धत ही अशीच फंटकळ आहे... ... लहानपणापासून आम्हां सगळ्यांना औषधोपचार करतायत ते... ...बापू सफाचट बरे होण्याशी घेणं आहे ना आपल्याला ? ... ... बाकीचं सोडून द्या. “

विषय तिथंच संपला, आणि चार दिवस कोल्हापूरच्या घरीं राहून आम्ही पुण्याला परतलो... ... ...


आश्चर्य हे, की चौथ्या दिवशी कोल्हारपूरहून पुण्याला परत यायला निघेपर्यंत चि. बापूं च्या व्रण पडून पिकलेल्या-सुजलेल्या टॉन्सिल्स चक्क जाग्यावर आलेल्या होत्या... ...!

टॉन्सिल्सवरचे व्रण पार गायब झालेले होते... ...!!

सूजही नव्वद टक्के उतरलेली होती... ...!!

आणि घश्याच्या श्लेष्मल त्वचेचा रंगही निरोगी लालसर गुलाबी झालेला होता... ...!!!

डॉ. नाईकांच्या औषधाचा तो चमत्कार बघून आतां मात्र सौ. इंदिराजीनीं पुनश्च कपाळाला हात लावला.......

सौ. इंदिराजी ,” अहो...बापू चा हा घसा बघा... ... खरंच देव पावला बाई... ...”

मी,” पटली ना खात्री आतां तरी ? “

सौ. इंदिराजी ,” पटली ... पटली... ...अहो पण कसं काय शक्य होत असेल हो हे ? “

मी,” त्याला ' हनेमान ची होमिओपॅथी ' असं म्हणतात... ... “

 


 

सौ. इंदिराजी ,” खरंच...विश्वासच बसत नाहीय ह्या चमत्कारावर... ...”

मी,” तमाम चमत्कार हे अविश्वसनीय च असतात इंदिराजी... ... एक मजेशीर सुभाषित सांगतो म्हणजे कळेल...

सौ. इंदिराजी,” कसलं काय सुभाषित ?”

मी,” हे सुभाषित मला माझ्या मास्तरांनी शिकवलेलं होतं... ...ते असं आहे...


|| पृथक्पृथग्मनुष्याणां प्रकृतिषु विभिन्नता

एकैव रोगनाशाय युक्तं पृथकमौषधम् ||


सौ. इंदिराजी,” याचा अर्थ काय ?”

मी,” सांगतो...तर सुभाषितकार असं सांगतायत, की प्रत्येक माणसाची प्राकृतिक जडण घडण ही एकमेवाद्वितीय असते, म्हणून एक च विकार असलेल्या प्रत्येक रुग्णाला त्याच्या त्याच्या प्रकृतिनुरूप रोगनिवारणार्थ वेगळं वेगळं औषध योजावं लागतं, तरच त्याचा उपयोग होतो... ...आलं ध्यानांत...?”

सौ. इंदिराजी ,” म्हणजे काय ?”

मी,” ऐका तर....समजा आपल्याला खोंकला झाला, तर आपले कुटुंब वैद्य – म्हणजेच ' फॅमिली डॉक्टर ' काय करतात ? “

सौ. इंदिराजी ,” काय करतात म्हणजे काय ?... ...औषधं देतात लिहून...”

मी,” बरोबर... ...आतां मला सांगा...की जर आपण दोघेही खोंकला झालाय म्हणून डॉक्टर कडं जर गेलो, तर ते साधारणपणे काय करतील?”

सौ. इंदिराजी ,” मला तुमचं हे कोंड्यातलं बोलणं कांही कळत नाहीये...काय म्हणायचंय तुम्हांला ?”

मी,” सांगतो...मी असं विचारतॊय की दोघांनाही जर खोंकला च झाला असेल, तर, डॉक्टर आपणां दोघांना सारखीच औषधं लिहून देतील, की वेगवेगळी देतील ?”

सौ. इंदिराजी ,” हे काय विचारणं झालं ? डॉक्टर दोघांनाही खोंकल्याचीच औषधं लिहून देणार...”

मी,” बरोबर ?...तर हे असं ऍलोपॅथीत च होतं...म्हणजे खोंकला म्हटलं, की अमुक अमुक औषधं, पोंटदुखी म्हटलं, की तमुक तमुक औषधं...अशी गणितं फक्त लोपॅथीत च असतात... होमिओपॅथी त अशी गणितं नसतात...

सौ. इंदिराजी ,” नवल च आहे...मग कशी गणितं असतात होमिओपॅथी त ?”

मी,” सांगतो...होमिओपॅथीत औषधं ही रोग्याची प्रकृती आणि लक्षणवैशिष्टयांनुसार योजली जातात...म्हणजे असं, की पन्नास रुग्णांना जर खोंकला झाला असेल, तर प्रत्येक रुग्णासाठी सुयोग्य औषध निरनिराळं असूं शकतं, तसंच पन्नास रूग्णांना जर निरनिराळे विकार असतील, तर त्या सगळ्यांंसाठी रामबाण असं एकच औषधही असूं शकतं... ... ...त्याला होमिओपॅथीत ' सिमिलिमम ' असं म्हणतात...आणि असं रामबाण औषध च फक्त रुग्णाच्या विकारांचं समूळ उच्चाटन करूं शकतं... अगदी कायमचं... ... ”

सौ. इंदिराजी,” अय्या... ...मजेशीर च आहे की हे सगळं... ... ... ”

मी ,” दुस-या भाषेत जरा सोपं करून सांगायचं म्हटलं, तर फक्त होमिओपॅथीत च रुग्णावर औषधोंपचार केले जातात, तर इतर पॅथीत रोगांवर औषधोंपचार केले जातात... ... आतां आलं लक्ष्यात सगळं ? ”

सौ. इंदिराजी,” खरंच... ...किती छान आहे ना हे सगळं ?...आपण जरूर शिकून घेऊं या... ...हाताशी असली कांही रामबाण औषधं घरीं ठेंवतां आली, तर किती छान सोयीचं होईल नाही ? “


विषय तिथं च थांबला, आणि यथावकाश आम्ही पुण्याला घरीं परतलो... ...

तीन महिन्यांची कसली कथा, चि. बापूं चा टॉन्सिल्स चा त्रास पुढच्या महिनाभंरातच नव्वद टक्के गायब झाला...!!

डॉ. नाईकांनी दिलेली औषधं नियमितपणे चालूंच होती... ...

तीन महिने उलटल्यावर जेव्हां आम्ही चि. बापूं ना दाखवायला परत डॉ. नाईकांच्याकडं गेलो, तेव्हां सौ. इंदिराजीनी मागच्या वेळेला सुचवलेलं माझ्या डोंक्यात होतं, म्हणून आम्ही आठवडाभंराची सुटी कांढूनच कोल्हापूरला गेलो, आणि चि. बापूं ची तपासणी वगैरे पार पडल्यानंतर दुस-या दिवशी मी परत डॉ. नाईकांना गांठलं... ...

आणि माझी उत्सुकतापूर्ती करण्यासाठी ' हे चमत्कारी शास्त्र नेमकं काय कसं आहे, याची त्यांच्याकडं जेव्हां चौकशी केली, तेव्हां त्यांनी विचारलं,” तुला नुस्तीच उत्सुकता आहे, की खरा खुरा रस आहे ह्या शास्त्रांत ?”

मी,” होय...होय... ...म्हणून तर विचारतोय...ह्या शास्त्राचा पद्धतशीरपणे कसा काय अभ्यास करतां येईल ?... ...कांही मार्गदर्शन करूं शकाल काय ? “

डॉक्टरांनी मग बरंचसं विस्तृत विवेचन विशद करून कांही उत्कृष्ठ संदर्भ ग्रंथांची यादीही मला करून दिली, आणि जमलं तर कलकत्त्याच्या ' बेंगॉल ॲलन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ' ची बी. एच. एम. एस. ची परीक्षा देऊन होमिओपॅथी वैद्यकीतली रीतसर पदवी प्राप्त करून घे असंही आवर्जून सांगितलं... ... ...

झालं... ...सौ. इंदिराजी च्या राज्यातल्या कायद्यानुसार ' आपण जरूर शिकून घेऊं या ' याचा साधा सरळ अर्थ म्हणजे ' हे शिकून घ्यायला तुम्ही हवा तितका कालावधी द्यायला खुशाल मोकळे आहांत... ...घरांतल्या तमाम चिंतांची कशी काय वासलात लावायची, ते मी बघून घेईन ' असा असतो...!!


ग पुण्याला घरीं परतल्यावर यथावकाश गावातली पुसतकालयं धुंडाळून ' होमिओपॅथी चिकित्साशास्त्र ' या विषयावरचे जगन्मान्य तद्न्यांनी लिहिलेले डझनभंर संदर्भग्रंथ मी प्रथम गोळा केले, आणि नोकरी धंदा सांभाळून उरलेल्या वेळांत या व्यासंगाचा जो श्रीगणेशा सुरूं केला, तो आज तब्बल सव्वीस वर्षं झाली तरी अखंड सुरूंच आहे, इतकं हे शास्त्र गुंगवणारं आहे... ... !!!

डॉ. नाईकांनी वर्तवलेल्या भाकितानुसार पुढं दीडएक वर्षं औषधं नियमित दिल्यानंतर चि. बापूं च्या तब्येतीची वारंवार घश्याचे विकार उपटण्याची मूळ प्रवृत्ती जी सफाचट गायब झाली, ती आजतागायत परत उपटलेली नाही... ...!!

सा व्यासंग आणि अनुभंव वाढत गेला, तसे मी अनेकविध विकारांवर उपयोगी पडणारी होमिओपॅथिक – बारा़क्षार औषधं घंरातल्या औषधिसंग्रहांत जमा करून ठेंवली, आणि भंरपूर वेळां वापरलीही... ...अगदी सर्दी-खोंकल्यापासून ते बेदम कांपण्या-भाजण्या च्या जखमांसाठी सुद्धां... ...

 


 

थोंडक्यात, आपत्कालीन प्रसंग वगळतां ( जे ऍलोपॅथी चं बलास्थान असतं ), घंरच्या घंरींच सर्व उपचारांची सोय झाल्यामुळं आमचे दवाखान्यातले हेलपाटे, आणि भंरमसाठ खर्चही उत्तरोत्तर कमी कमी होत गेले... ...

आणि तें आश्चर्य बघून अखेरीस सौ. इंदिराजीनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!!


मला तरुणपणांत दणके घांलून घडवणारे माझे आद्य गुरु टिकेकर मास्तरांनी मला ' नॉलेज इज पॉवर, ऍण्ड ऍब्सोल्यूट नॉलेज इज ऍब्सोल्यूट पॉवर ' हे जे तत्त्वद्न्यान शिकवलं होतं, त्याचे आजवर जे अगणित खंणखंणीत प्रत्यय मला आले, त्यापैकी हा एक नमुना... ...

या सगळ्यावर कडी करणारं खंणखंणीत नाणं गेल्या महिन्यात वाजलं...

इतकं खंणाखंण वाजलं, की ते ऐकून मी च कपाळाला हात लावला... ...!!


झालं असं, की तीनएक वर्षांपूर्वी आम्ही रहात असलेल्या इमारतीच्या पुनर्विकसन प्रकल्पाचं काम सुरूं झालं, आणि तिथून जवळच असलेल्या अलकनंदा सोसायटीतल्या एका सदनिकेमध्ये विकसकानं आमचं तीन वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरतं पुनर्वसन केलं.

आमचे ऍलोपॅथीतले कौटुंबिक वैद्य डॉ. मोघे यांचा दवाखाना आमच्या मूळ घरापासून पांच मिनिटांच्या चालीच्या अंतरावर आहे.

तीनएक महिन्यांपूर्वी पुनर्विकसन प्रकल्प पूर्ण होऊन आम्ही आमच्या मूळ घरीं रहायला परत आलो...

गेल्या महिन्यात घरांत कांही सुतारकामाचा उद्योग करीत असतांनां माझ्या डाव्या हाताच्या पंज्यावर हातोडी चा जोरदार फंटका बसला, आणि त्या वेदना कांही केल्या सहन होईनात... ...

साहजीकच ते आपत्कालीन लचाण्ड होऊन बसलं, आणि मी तडक डॉ. मोघ्यांचा दवाखाना गांठला... ...

 


सुदैवानं रांगेत कुणी रुग्ण बसलेले नसल्यामुळं मी थेट आंत शिरून डॉक्टरांना सुजलेला हात दाखवला... ...

त्यांनी दिलेली एक तीव्र वेदनाशामक गोळी गिळून मग हाताला पट्टी-बिट्टी बांधायचा सोपस्कार पार पडला, आणि औषधं लिहून देतांना त्यांनी साहजिकच माझ्या पूर्वेतिहासाची नोंदवही घडली, आणि तीतल्या नोंदी निरखत अचानक मला विचारलं,” तुम्ही रहायला कुठं असतां हल्ली नाना ? “

मी आवाक च झालो,” म्हणजे काय डॉक्टर ? काय म्हणायचं आहे तुम्हांला ? “

डॉक्टर,” माझ्या विचारण्याचा अर्थ हा, की घर-बीर बदललंत काय ? “

मी,” छे... ...घर कुठलं बदलतोय... ...समोर पुष्कराज अपार्टमेंटस मध्येच राहतोय की...गेली दोनएक वर्षं तिथलं पुनर्विकसनाचं काम सुरूं असल्यानं कोथरूडमधल्या अलकनंदा सोसायटीत तात्पुरता रहायला गेलो होतो...”

डॉ. मोघे,” मग इकडं केव्हांसे आलांत परत ?”

,” दोन महिने झाले की मूळ घरीं परत येऊन...सध्या घरांत सुतारकामाच्या उचापती करत बसलोय... ...त्या उद्योगात हे लचाण्ड होऊन बसलं...” मी पट्टी बांधलेल्या हाताकडं निर्देश करीत म्हणालो.

डॉक्टरांनी मग अचानक बॉम्ब टाकला,” गैरसमज करून घेऊं नकां नाना, पण मग फॅमिली डॉक्टर कुणी दुसरे गांठलेत काय तुम्ही ? “

मला आतां मात्र डॉक्टरांचा जरा राग च आला,” तसं कांही जर असतं, तर मग हा जायबंदी हात घेऊन त्यांच्याकडंच गेलो असतो की मी... ...इथं कश्याला आलो असतो ?”

आतां दस्तुरखुद्द डॉक्टर च कपाळाला हात लावत किंचाळले,” कृपया गैरसमज करून घेऊं नकां नाना... ...पण माझ्या ह्या नोंदीनुसार तुम्ही गेल्या चौदा वर्षांत इथं माझ्या दवाखान्यात फिरकलेलेच नाही आहांत कुठल्याच तक्रारीसाठी... ...म्हणून विचारतोय... !!!...अहो कसं काय शक्य आहे हे ? “

आतां मी च कपाळाला हात लावत फक्त हंसून डॉ. मोघ्यांना टांग मारली,” हे कसं काय शक्य आहे ते मी तुम्हांला काय सांगणार...कपाळ ?...अहो वैद्यकवाचस्पति तुम्ही आहांत की मी ? “


तात्पर्य, ‘ नॉलेज इज पॉवर, ऍण्ड ऍब्सोल्यूट नॉलेज इज ऍब्सोल्यूट पॉवर.........’

आतां पटलं ?


*********************************************************************

-- रविशंकर.

२२ एप्रिल २०२१.

 

No comments:

Post a Comment