Search This Blog

Sunday 7 March 2021

|| अपराजेयसामर्थ्यम् ||

 

|| अपराजेयसामर्थ्यम् ||


,” तेव्हां हे कायम लक्ष्यांत ठेंव ॲरिस्टॉटल, की… …

नॉलेज इज पॉवर, ऍण्ड ऍब्सोल्यूट नॉलेज इज ऍब्सोल्यूट पॉवर… … समजलं नीट ? ”

माझे आद्य गुरू श्री. टिकेकर मास्तर मला निरोप देतांना ' लिव्हिंग एक्सलन्स ' कश्याशी खातात, ते नीट समजावून सांगत होते… …

मी,” पण मास्तर, एखाद्याजंवळ नुस्तं द्न्यान असून काय उपयोग? … … तो जर काडी पैलवान असेल, तर त्याचा कसा काय निभाव लागेल जगांत?… … मला नाही पटत तुमचं म्हणणं… … "

१९६९ सालातल्या जून महिन्यातली ती एक पावसाळी कुन्द दुपार होती… ...

उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरहून पुण्याला प्रस्थान ठेंवण्याआधी मी पेढे देऊन आशीर्वाद घ्यायला माझे आद्य गुरू श्री. टिकेकर मास्तरांच्या घरीं गेलो होतो… ……

पेढे- बिढे देऊन मास्तरांनां नमस्कार करतांच त्यांचा ' समृद्धो भंव ' असा तोंडभंर आशीर्वाद ऐकल्यावर केलेल्या कष्टांचं सार्थक झालेलं होतं… … …

मग नेहमीसारखाच दुपारचा चहा घेतां - घेतां गप्पांची मालगाडी आपसूकच तत्त्वद्न्यानाकडं वळलेली होती, आणि ' अमोघ सामर्थ्य ' नेमकं कश्याला म्हणतात, या मुद्यावर आमचा वाद पेंटला होता………

मास्तर,” माझ्या वाक्याचा गर्भितार्थ असा नाही… … "

मी,” मग कसा आहे ?”

तेव्हां मग मास्तर त्यांच्या वाक्याचं बरंच तात्त्वद्न्यानिक विवेचन विशद करून अखेर म्हणाले होते,” एक छान सुभाषित सांगतो तुला, ते लक्ष्यांत ठेंव… …

तोंपावेतों मास्तरांच्या समोर बसून मी अगणित सुभाषितांची रसाळ विवेचनं ऐकलेली असल्यानं, त्यांनी सुभाषित म्हणतांच मी जरा संरसांवून बसलो… … …

मास्तर बोलतच होते,” तूं आत्तां जो आक्षेप घेतलास ना ॲरिस्टॉटल… तो अगदी बरोबर आहे… … निव्वळ द्न्यान मिळवून कुणालाच ' अमोघ सामर्थ्य ' - ज्याला ' इन्व्हिन्सिबल पॉवर ' असं इंग्रजीत म्हणतात- ते प्राप्त होत नसतं… …तर सुभाषित असं आहे, की...

 

    || शस्त्रशास्त्राधिकाच्च धनाद्देहबलाद्वरम्

   अर्जितद्न्यानचारित्र्यादपराजेयसामर्थ्यम् ||

 

मी,” बापरे...याचा अर्थ काय मास्तर ?”

मास्तर,” असा विचार जर केला ऍरिस्टॉटल...की मनुष्याला सामर्थ्य कश्याकश्यामुळं प्राप्त होतं ? तर शस्त्रांमुळं, शास्त्रांमुळं, अधिकारपदामुळं, धनसंपत्तीमुळं, तसंच शारिरीक म्हणजेच देहबलामुळं असं ढोबळमानानं म्हणतां येईल...बरोबर ?”

मी,” अगदी बरोबर मास्तर...”

मास्तर,” आतां या सगळ्यांची माणसाला सामर्थ्य प्रदान करायची क्षमता ही शास्त्र, संपत्ती, अधिकार, शस्त्र, आणि शारीरिक बळ अशी उतरत्या क्रमानं असते, ही पहिली गोष्ट… ...आलं लक्ष्यात ?”

मी,” हो...आलं लक्ष्यांत मास्तर… ...”

मास्तर,” आतां यापैकी कांही किंवा सगळी सुद्धां एखाद्याजंवळ असली, तरीही तो मनुष्य अपराजेय होईलच असं नाही, असंही सुभाषितकार सांगतायत… …"

मी,” म्हणजे काय मास्तर ?… … असं कसं होईल? ”

मास्तर,” म्हणजे असं, की ही सगळी च्या सगळी आयुधं जंवळ असूनही माणसाजवळ प्रतिपक्षाचे घांव निष्फळ करायला संपन्न निष्कलंक चारित्र्याचं अभेद्य चिलखत जर नसेल, तर जगाच्या रणांगणावर तो बघतां बघतां चितपट व्हायला वेंळ लागत नाही, असंही सुभाषितकार सांगतायत… … …चारित्र्यहीन मनुष्य रणांगणावर उतरण्यांआधीच लढाई हंरलेला असतो…हे पक्कं ध्यानांत ठेंव…

तात्पर्य, निष्कलंक संपन्न चारित्र्याचं चिलखत हे पाहिलं, आणि कुठल्याही विषयातल्या परिपूर्ण द्न्यानाची पांजळलेली तलवार हे दुसरं… …केवळ ही दोन अमोघ शस्त्रास्त्रंच माणसाला ' अपराजेय सामर्थ्य ' प्रदान करूं शकतात, हे ही तत्त्व कायम लक्ष्यांत ठेंव ॲरिस्टॉटल… …

या दोन शस्त्रांमध्येही जर तोळामासा फंरक करायचा झाला, तर विशुद्ध चारित्र्य हे निर्णायक महत्त्वाचं...सम्यक् द्न्यान हे त्यापांठोपांठ … …आणि निर्णायक महत्त्वाचं हे, की या यांतलं कुठलंतरी एकच प्राप्त असूनही भागत नाही, तर ही दोन्ही शस्त्रास्त्रं गांठीला लावलेली असतील, तरच तो मनुष्य अपराजेय होऊं शकतो… …

आणि कळीची महत्त्वाची गोष्ट अशी, की ही दोन्ही अमोघ शस्त्रास्त्रं अर्जित म्हणजे प्रयत्नपूर्वक अपार कष्ट करून कमावलेली असावी लागतात...बसल्या खाटल्यावर आयती पदरात पडत नसतात. पैकी द्न्यान हे माणसाच्या बुद्धी-चिंतनाशी निगडित असतं, तर विशुद्ध चारित्र्य माणसाच्या विवेक-आचरणावर थेट अवलंबून असतं… …इथपर्यंत समजलं ? “

मी,” होय...समजलं.”

मास्तर,” आतां ज्या माणसाजवळ निष्कलंक चारित्र्य असतं, पण जरूर त्या क्षेतरातलं द्न्यान नसतं, त्या मनुष्याचीही व्यवहारात पदोंपदीं बेदम फंसवणूक होत असते, कारण मुळात द्न्यान च जर नसेल, तर चुना- तंबाखू चोंळणारा अशिक्षित माणूसही भंल्याभंल्यांना हातोहात गंडा घालूं शकतो… … …

साधं व्यापाराचं च उदाहाराण घे… …

अगदी किराणा भुसार मालापासून ते यंत्रसामुग्रीपार्यंत कुठल्याही वस्तूच्या बाबतीत या ' व्यापार- दुकानदारी ' च्या धंद्याच्या सांखळीतल्या कड्या - म्हणजेच अगदी ठोक बाजारातल्या प्रमुख वितरकापासून ते शेंवटच्या टोंकाच्या किरकोळ दुकानदाराकडून माल घेऊन रस्त्याकडेला पथारी टांकून विकणा-या पथारीवाल्यापर्यंत - सर्व पणन व्यवस्था बाजारात आधीच प्रसथापित झालेली असते. या साखळीला प्रत्येक दुवा म्हणजे व्यापारी किंवा विक्रेता कमीतकमी तीन चारशे ते ज्यास्तीत ज्यास्त कितीही टक्के - अगदी दोन दोन हजार टक्के सुद्धां - नफा उकळत गि-हाइकांना यथेच्छ लुबाडत असतो… …

मी कपाळाला हात लावत मास्तरांना म्हटलं,” काय सांगताय मास्तर… … खंरंच असं असतं ?… विश्वासच बसत नाहीय माझा...”

मास्तर," नाही ना विश्वास बसत?...एक मासला च दांखवतो तुला म्हणजे समजेल हे सगळं कसं चालतं ते...”

मास्तर मग उठून आंतल्या खोंलीत गेले, आणि चिमटीत मावेल इतकं छोटं कसलंतरी रंगीत खोकं घेऊन बाहेर आले.

मग म्हणाले,” साध्या दाढी करायच्या रेझर ब्लेडचं च उदाहरण घे… … किरकोळ विक्रीच्या दुकानांत ह्या असल्या पांच ब्लेड च्या पाकिटाची काय किंमत पडते ? “

मला आतां हे सगळंच विलक्षण वाटायला लागलं,” मास्तर…' पनामा ‘, किंवा ' भारत ' असल्या प्रकारच्या देशी ब्लेड्स चं पाकिट पांच- सहा रुपयांना मिळतं, आणि ' विल्किन्सन ' , ‘ जिलेट ' सारखी बारा- पंधरा रुपयांना मिळतात…"

मास्तर हंसले,” म्हणजे देशी ब्लेड साधारण नगाला एक रुपया, आणि परदेशी ब्लेड अंदाजे तीन ते चार रुपये नगाला, असे दर पडतात… … बरोबर ? “

मी,” बरोबर मास्तर……"

मास्तर मग त्यांच्या हातातलं पाकिट माझ्या हातात देत म्हणाले,” आतां हे पाकिट बघ… … हे ऐंशी ब्लेड्स चं आहे… … हे मी नेहमी ठोक बाजारातनं आणतो… …किती किंमत पडत असेल याची मला ? “

मी,” मला कांही सांगतां येणार नाही मास्तर… … "

मास्तरांनी मग बॉंंम्ब टाकला,” या पाकिटाची किंमत पडते वीस रुपये… … !!! “

मी आतां मात्र कपाळाला हात च लावला,” काय म्हणताय काय मास्तर ?… … ऐंशी ब्लेड्स चं पाकिट फक्त वीस रुपयांना ?… … म्हणजे एका ब्लेडची किंमत फक्त पंचवीस पैसे ? … … विश्वास च बसत नाहीय माझा… …"

मास्तर हंसले,” तात्पर्य, ठोक बाजार ते किरकोळ बाजारापर्यंतच्या प्रवासांत साध्या हजामतीच्या ब्लेडची किंमत सुद्धां देशी ब्लेड च्या बाबतीत चौपट म्हणजे चारशे टक्कयांनी, आणि परदेशी ब्लेड ची किंमत पंधरा ते वीस पट म्हणजेच पंधराशे ते दोन हजार टक्कयांनी फुगते… …!!! … … समजलं ? “

मी हतबुद्ध होत म्हणालो ,” होय मास्तर… आतां आलं लक्ष्यांत सगळं बरोब्बर………"

मास्तर मग ते ब्लेड चं पाकिट माझ्या हातात देत म्हणाले,” ठेंव हे तुझ्याकडं ह्या वादविवादाची आंठवण म्हणून… …

आणि महत्त्वाचं हे लक्ष्यात ठेंव, की ही सगळी लुटालूट अगदी बिनबोभाट सर्रासपणे चाललेली असते...ग्राहकाला तिचा थांगपत्ताही लागत नसतो… … कारण एकच...”

मी,” तें काय मास्तर ?”

मास्तर,” ग्राहकाचा हा असा ' पढतमूर्ख ' व्हायला कारणीभूत ठंरतो त्याच्यात असलेला अंगभूत आळशीपणा, आणि ऐदू वृत्ती…दुकानदार त्याला हातोंहात टोंपी घालूं शकतो, कारण स्वतः दुकानदार तो विकत असलेला माल कुठून आणतो, काय किंमतीला आणतो, तिथनं आपल्यालाही तो आणतां येईल काय ? असा साधा विचार करायचीही तसदी ग्राहक घेंत नसतो… … म्हणूनच स्वतःच्या आळशीपणापायीं पांच- पंचवीसपट पैसा तहहयात घांलवत बसतो… …

ती त्यानं स्वतःच्या ' पढतमूर्खपणा ' ची मोजलेली किंमत असते……असा ' पढतमूर्खपणा ' कधीही करायचा नसतो, हे कायम लक्ष्यात ठेंव… …आतां समजलं काय सगळं नीट ? ”

मी,” समजलं मास्तर...आतां समजलं सगळं व्यवस्थित...”

"समृद्धो भंव" असा तोंडभंर आशीर्वाद देंऊन मास्तरांनी मग सदर विवादाचा समारोप केला… … …

माझ्या आद्य गुरूं नी शिकवलेलं हे लाखमोलाचं शहाणपण मी पुढं आयुष्यभंर लक्ष्यात तर ठेंवलंच पण, व्यवहारी जगांत त्याचे लाखमोलाचे अनुभंवही शेंकड्यानी घेतले…डझनावारी पण नव्हेत ... … तेही अगदी खंणाखंण वांजवून… … !!!

स्वच्छ चारित्र्य तर माझ्या परीनं मी जंपलेलं होतंच, पण त्याच्या जोडीला जरूर त्या त्या विषयातलं मूलभूत द्न्यानही - कमीतकमी त्या त्या व्वहारांपुरतं कां असे ना - मी अगदी कटाक्षानं मिळवलं. कारण तें जर नसेल, तर मास्तरांनी सांगितल्याप्रमाणं चुना- तंबाखू चोंळणारा अशिक्षित माणूसही भंल्याभंल्यांना कसा हातोहात गंडा घालूं शकतो, याची अगणित उदाहरणंही मी शेंकड्यांनी बघितली… … … विशेष करून ' किरकोळ विक्री ' च्या धंद्यात विक्रेते कमीतकमी तीनशे ते ज्यास्तीत ज्यास्त कितीही टक्के - अगदी दोन दोन हजार टक्के सुद्धां - नफा उकळत गि-हाइकांना किती बेदम लुबाडतात याचे तर मी अगणित दाखले च याचि देहीं याचि डोंळां प्रत्यक्ष पाहिलेले आहेत… … लघुकथाच काय, एखाद्या ग्रंथाचा तो विषय होईल, इतका त्याचा पसारा विस्तृत आहे… … !!!

विवास नाहीय ना बसत ?

तर मग नमुना म्हणून ह्या ' ग्राहक लुबाडणूक सांखळी ' चा वास्तवातला हा एक मजेशीर किस्सा………


अपराजेयसामर्थ्यम् '


रविशंकर.

१० मार्च २०२०




," अरे शशी हे घड्याळ बंद पडलंय… … काय झालंय ते बघ बरं जरा पटकन्… ...”

मी मनगटावरचं घड्याळ कांढून शशी कडं देत म्हटलं…

गेल्या जानेवारी महिन्यातला तो एक दिवस होता… वेंळ होती दुपारी चार ची.

शशी च्या कोथरूड मधल्या ' घड्याळ दुरुस्ती टपरी ' चं मी कैक वर्षांपासूनचं जुनं गि-हाईक… कारणं दोन… …पहिलं हे, की शशी एक मेहनती, सरळ स्वभावाचा, आणि न फंसवणारा कारागीर आहे, अशी माझी समजूत होती म्हणून…आणि दुसरं कारण हे, की माझा मनगटी घड्याळांचा मनस्वी षौक… …

त्यापायीं माझ्या संग्रहांत अदमासे पन्नास-साठ तरी घड्याळं - कांही मी स्वतः विकत घेतलेली, आणि बरीचशी माझ्या जगभंरातल्या स्नेह्या- सोंबत्यांनी प्रसंगोपात भेंट म्हणून पांठवलेली- जमा झालेली होती…

त्यामुळं, दरमहा कुठल्या ना कुठल्या तरी घड्याळाच्या दुरुस्तीचं काम निघायचंच, आणि शशी च्या टपरी कडं माझी चक्कर व्हायची… …

  

हातांतलं खोललेलं माझं घड्याळ समोर ठेंवत शशी म्हणाला,” नाना साहेब… सेल संपलेला आहे… बदलायला लागेल.”

मी,” मग बदलून टाक… … किती खर्च येईल त्याचा ? “

शशी," सेल चे साठ रुपये होतील साहेब… …बांकीच्या गि-हाइकांनां आपण सत्तर रुपये लावतो… … "

मी,” का ऽ ऽ ऽ य ?.. … अरे आतां आतां पर्यंत तर तूं सेल चे चाळीस रुपये घेत होतास ना?… … आतां एकदम दीडपट? “

शशी," नाना साहेब… … तुम्हांला मी कधीतरी ज्यास्त पैसे सांगीन काय?… …

मी,” अरे दोन- पांच रुपयांचा फंरक पडला म्हणून मी तरी तुला कधी कांही म्हणालोय काय?… … एकदम चाळीस चे साठ सांगितलेस म्हणून ज्यास्त वाटतायत मला… … "

शशी," नाना साहेब… … सगळंच मार्केट महागलंय त्याला मी तरी काय करणार ? सेल ची माझी खरेदीच जर पन्नास रुपये नगानं आहे, तर मी तो चाळीस रुपयांना कसा काय देऊं शकेन तुम्हाला ?

मला सांगा … …दोन चमचेभंर ' कटिंग चहा ' ची किंमत दहा रुपये असते काय ?… … पण घेतायत ना सगळीकडं वाजवून ?… ह्या आंचरट ' आय. टी. ‘ वाल्यांनीं बेदम पैसा उधळून सगळंच महाग करून ठेंवलंय बघा… … मी तर दुपारचा चहा घेणंच बंद करून टाकलंय … …काय करायचं ? … … मग बदलायचा ना सेल नाना साहेब ? “

शशी चं म्हणणं खोंडून काढणं कठीणच होतं… …विदारक वास्तव च सांगत होता तो… …

शेंवटी (कपाळाला हात लावून) मी शशी ला ' ठीकाय… …बदलून टाक सेल ' म्हणून सांगितलं… …

शशी नं सेल बदलला… …मग घड्याळाची चांवी केस च्या वेंजात संरकवून कट्कन् बंसवली …आणि ती फिरवत घड्याळ सुलटं करून कांटे फिरवायला लागला, अन् कपाळाला हात लावत म्हणाला,” नाना साहेब… …मशीन च खराब झालेलं दिसतंय… …ते पण बदलावं लागेल… काय करायचं ? “


आतां मी पण कपाळाला हात लावला,” अरे काय झालंय आतां मशीनला ? “

शशी,” साहेब, इलेक्ट्रॉनिक घड्याळांचं काय सांगतां येतंय काय ? मशीन कधीही खंराब होऊं शकतं त्यांतलं… …"

मी,” आणि मशीन बदलायचा खर्च किती येईल एकूण ? “

शशी,” साहेब बिन तारीख वाराचं साधं मशीन आहे हे… …मशिनचे दीडशे आणि सेल चे साठ असे एकूण दोनशे दहा होतील… …पण दोनशे च द्या तुम्ही… … मग तर झालं ? “

मी,” नको… …"

शशी,” कां हो?… … आतां काय झालं नाना साहेब ?”

मी,” अरे ह्या दुरुस्तीसाठी दोनशे रुपये खर्च करण्यापेक्षा, अजून पन्नास रूपये घातले, तर नवीनच घड्याळ येईल की... ही तुझी दुरुस्ती महागडी दिसतीय एकूण...”

शशी,” मग… काय करायचं नानासाहेब ?”

शशी हे बोलला, आणि एक नवीनच कल्पना माझ्या मनांत लख्खदिशी चंमकून गेली… …

गोष्ट अशी होती, की माझ्या संग्रहातल्या पन्नास- साठ घड्याळांपैकी चाळीस घड्याळं साधी म्हणजे केवळ वेळ दाखवणारी होती...आणि म्हणूनच फारशी वापरली जात नव्हती… …मग मनांत असा विचार आला, की कांहीतरी करून त्या घड्याळांत तारीख वार- गेला बाजार नुस्ती तारीख तरी- दिसायची जर सोय करतां आली, तर मग ती सगळीच वापरात येतील… ... 

 

मी,” शशी...नुस्तं मशीन बदलायला दोनशे रुपये दंवडणयाऐवजी… …मला असं सांग… "

शशी,” काय सांगूं साहेब ?”

मी,” मला सांग...नुस्ती तारीख किंवा तारीखवार असलेेल्या मशीन ची काय किंमत पडते रे ?”

शशी,” नुस्त्या तारखेचं मशीन दोनशे ला बसेल, आणि तारीखवार वाल्या मशीन ची किंमत पडते दोनशे साठ रुपये… … पण तारीखवारवाल्या मशीन चा उपयोग काय नानासाहेब ?… … ते ह्या घड्याळाला कसं काय बसवणार ? “

मी,” कां?… ...कां नाही बसवतां येणार ? “

शशी,” साहेब… … अहो तसलं मशीन बसवायला ह्या घड्याळाच्या डायल ला तारीख- वार दिसण्यासाठी भोंकं कुठं आहेत ? “

मी,” भोंकं नसली म्हणून काय झालं ?… … पाडायची...”

शशी नं आतां कपाळाला हात लावला,” नानासाहेब… … सकाळपास्नं दुसरं कुणी सापडलं नाही काय मापं काढायला माझ्याशिवाय ?… … समजा, तसला कांही उद्योग मी करायला गेलो, आणि जर डायलचंच वाटोळं होऊन बसलं, तर मग काय करायचं ?… तुम्ही परत माझीच मुण्डी धंरणार… छे छे छे… सॉरी नानासाहेब… … हे असलं कांही आपल्याला नाही जमणार… …बाकी काय सेवा असेल तर सांगा… … "

शशी मग नुस्ताच प्रशनार्थक चेंह-यानं माझाकडं बघायला लागला… …

हा सगळा संवाद सुरूं असतांना मला मनाच्या एका कोंप-यात कुठंतरी सारखं जाणवत होतं, की कुठंतरी कांहीतरी चुकतंय, आणि तें आपल्या नजरेंतनं सुटतंय… … पण तें नेमकं काय हे कांही केल्या माझ्या लक्ष्यात येई ना. “

शेंवटी कंटाळून मी शशी ला म्हटलं,” ठीकाय शशी...दे ते घड्याळ इकडं… … मी च बघतो आतां कांहीतरी खटपट करून… … आणि नाहीच कांही जमलं, तर येतो परत घड्याळ घेऊन… … "

शशी नं मग खोललेलं घड्याळ तसंच जोडून मला परत दिलं, आणि मी घराच्या दिशेनं चालत परत फिरलो… …

चालतां चालतां डोक्यात भिरभिरं गरगरत होतं…

या सगळ्यात आपल्याला चंकवा देणारं असं नेमकं काय चुकत होतं ?

………………………………………………………………..

………………………………………………………………..

इलेक्ट्रॉनिक घड्याळांची दुरुस्ती तोंपावेंतों मी जरी कधीच केलेली नसली, तरी एकतर मी स्वतःच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होतो, शिवाय ऑडिओ आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांत बरंच काम ही केलेलं असल्यामुळं, इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या किंमतींचा मला ब-यापैकी अंदाज होता... मनगटी घड्याळांची सुटी यंत्रं बनवणा-या 'तोशिबा', 'सिटिझन' . जगांत दोन-तीन च कंपन्या आहेत, ज्या तमाम घड्याळ उत्पादकांना ती यंत्रं पुरवतात, हे पण मला ठाऊक होतं. मग असं ध्यानांत आलं, की ह्या महाकाय कंपन्या जर दर दिवसागणिक लक्षावधी घड्याळयंत्रं बनवतात, तर त्या यंत्राची किंमत असून असून अशी कितीशी असणार?… … अगदी नगण्य च असायला हंवी… … फार फार तर दहा- वीस रुपये...बस… …

तेव्हां कुठं मला मास्तरांनी दिलेलं तें ऐंशी ब्लेड्स चं पाकिट आंठवलं… …

आणि दुस-या क्षणीं त्या कोंड्याचे तमाम विस्कळित तुकडे जागच्याजागीं अगदी चंपखल फिट्ट बसले…!!!

माझ्या मास्तरानी मला तें ऐंशी ब्लेड्स चं पाकिट भेंट देतांना विशद करून सांगितलेल्या ' ग्राहक लुबाडणूक सांखळी ' चा हा मामला होता… … !!!

शशी सारखा नेक टपरीवालाही अगतिकपणे त्या साखळी चा एक दुवा होऊन बसलेला असावा…

कारण त्यानं जर प्रामाणिकपणे प्रस्थापित बाजारभावापेक्षा स्वस्त दरात कामं करायला सुरुवात केली असती, तर बाकीच्या डॅंबीस दुकान- टपरीवाल्यांनी त्याला घेंरला असता, आणि त्याच्या पोंटावर टांच आणायला कमी केलं नसतं… … !!!

तात्पर्य, घड्याळ दुरुस्ती चं तंत्र आणि त्यासंबंधातल्या सुट्या भागांचे ठोक बाजारातले स्रोत आणि भाव या बाबतीतलं माझं ठार अद्न्यान, हे या सगळया लूटमारीच्या मुळाशी होतं तर… …

एकदां कोडं सफाचट् सुटल्यावर मग मी या सगळयाची पाळंमुळं खंणून काढायचं ठंरवलं…

त्याचं कारण असं होतं, की माझ्या संग्रहांत असलेल्या पन्नास- साठ घड्याळांपैकी चाळीस घड्याळं साधी - म्हणजे फक्त वेंळ दाखवणारी किंवा तारीखवार नसलेली अशी - होती. त्यांचं तारीख दर्शक घड्याळांत रूपांतर करायला शशी नं सांगितलेल्या दरानुसार प्रत्येक घड्याळामागं दोनशे सत्तर रुपयांच्या हिशेबानं एकूण दहा हजार आठशे रुपये खर्च येणार होता… …!!!

तात्पर्य, हा पाळंमुळं खंणून काढायचा विचार तसा फायदेशीरही दिसत होता… …

एकदां विचार पक्का झाल्यावर मग मी हात धुवून त्याच्या मागं च लागलो… …

त्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या घाऊक बाजारांत मी जेव्हां जेव्हां जात असे, तेव्हां तेव्हां माझ्या ओंळखीपाळखीतल्या दुकानदारांकडं क्वॉर्ट्झ घड्याळांतल्या यंत्रांच्या ठोंक स्रोतांची चंवकशी करायला लागलो…

सुरुवातीला कांही दुकानदारांनी कानांवर हात ठेंवले…

कांहीनी छताकडं बघत नुस्तेच खांदे उडवले… …

कांही महाभागांनी अंदाजपंचे कुठलेतरी भंलतेच संदर्भ देंत हात झंटकून माझी बोळवण केली… … …

ह्या ' ग्राहक लुबाडणूक सांखळी ' ले टगे एकमेकांना कसे सामील असतात, तें बघून मी धन्य झालो…!!

पण मी कांही चिकाटी सोडली नाही… …नेट सोडला नाही, तर कधी ना कधी ते मला समजणारच होतं… … …

शेंवटी मी गतकाळांत ज्यांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानदारीच्या व्यवसायात जम बसवायला मदत केली होती, त्या रमणिकभाई शहानी मला घाऊक बाजारातल्या 'क्युरेट वॉच सर्व्हिस ' नांवाच्या एका दुकानाचं नांव सांगितलं, त्याचे मालक लालजी मेहतां चा संदर्भही दिला, आणि ' माणूस भंला आहे...शक्य असेल ती मदत नक्कीच करतील ' असंही सांगितलं… …

मग एका मंगळवारीं घाऊक बाजारातली इतर कामं निघाली, तेव्हां तीं निपटल्यावर मी शेंवटी ' क्युरेट वॉच सर्व्हिस ' कडं मोर्चा वळवला… … …

आणि त्यानंतरच्या दिवसभंरांत मला वीस-पंचवीस वेळां तरी आश्चर्यानं आ वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावायला लावणारं नक्षत्र सुरूं झालं… … …


योगायोगानं दुकानांतल्या गल्ल्यावर मालक श्री. लालजीभाई मेहता स्वतः च बसलेले होते…

मी रमणिकभाईं चा संदर्भ देंत स्वतःचा परिचय त्यांना करून दिला...आणि नमस्कार- चमत्कार वगैरे झाल्यावर लालजीभाई नी अगत्यानं मागवलेला चहा पण समोर आला… …

बहुतेक रमणिकभाई नी त्यांना आधीच दूरध्वनि केलेला असावा.

चहापान होतां-होतां आधी मी त्यांना ' मी घड्याळ व्यवसायातला नाही...माझं क्षेत्र वेंगळं आहे, पण हौस म्हणून मी ही कारागिरी शिकतो आहे, आणि मला क्वॉर्ट्झ घड्याळांचे सुटे भाग - विशेषतः यंत्रं - पुरवणार-या मुख्य वितरकाचा ठांवठिकाणा हंवा आहे, वगैरे वगैरे कथन केलं, आणि तुमच्याकडं ही यंत्रं ठोंक भावात मिळतील काय? अशीही विचारणा केली… …

लालजीभाई चेंह-यावरून तरी दुस-यांना मदत करणारे गृहस्थ वांटत होते. माझा अंदाज चुकला नाही… …

लालजीभाई,” तेचा काय हाय साएब, की आपल्याकडं फक्त ब्रॅण्डेड घड्याळांचं च काम होतं… … त्यांची यंत्रं तुम्हांला हंवी असतील, तर मिळतील माझ्याकडं...”

मी,” काय किंमती पडतात या ब्रॅण्डेड यंत्रांच्या? “

लालजीभाई,” साध्या फक्त वेंळ दांखवणा-या यंत्राची किंमत एकशे सत्तर रुपये पडेल...तारीख दांखवणा-या यंत्राची किंमत पडते दोनशे तीस रुपये, आणि तारीख-वार दांखवणा-या यंत्राचा भाव पडतो दोनशे ऐंशी रुपये… … अने हे ठोंक विक्रीचे भाव सांगतोय मी तुम्हांला बरं कां… …ते गि-हाइकानुसार बदलतात… … "

मी तें ऐकून मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला…!!

मग विचारलं,” म्हणजे काय लालजीभाई…? “

लालजीभाई,” तेंचं काय हाय साएब… …तुमी रमणिकभाईकडून आलाय म्हणून सांगतो... आपल्या दुकानीं ' ब्रॅण्डेड ' घडियालं वापरणारी च गि-हाइकं येतात… …

आतां बगा… … घडियाल कॅसिओ चं हाय, कां आर्मानी मेक चं हाय, कां डिझेल मेक चं हाय, कां आजून कुठल्या मेक चं आसूं दे...मशीन दोनतीन स्टॅंडर्ड मेक पैकीच कुठल्यातरी कंपनीचं असतं. आतां गि-हाइकानं जर ते ब्रॅंडेड घड्याळ पांच- दहा हजारांना घेतलं असेल, तर त्याचं यंत्र बदलायला गि-हाइक हजार- दीड हजार खर्च करायला कांचकुच करत नाही… … तेव्हां मशीन ची किंमत दुरुस्तीला आलेलं घड्याळ आणि गि-हाईक बघून सांगितली जाते...काय ? “

मी मनांतल्या मनांत कपाळाला हात लावला……,” लालजीभाई… … मी ही यंत्रंही तुमच्याकडून घेंतली असती, पण खरी गोष्ट अशी आहे, की ज्या घड्याळांना ती बंसवायची आहेत ना, तीं घड्याळं कांही ब्रॅण्डेड नाहीत… अगदी साधी सामान्य प्रतीची म्हणा ना… … त्यांना एव्हढी महागातली यंत्रं बंसवून काय करणार ? कोंबडी चार आण्याची, आणि मसाला दहा रुपयांचा असलं कांहीतरी तें होईल… … तेव्हां… "

,” आलं ध्यानांत" लालजीभाई म्हणाले… …," तुम्हांला स्वस्तातली साधी चिनी बनावटीची यंत्रं हंवी आहेत… … बराबर नी ? “

मी,” अगदी बरोबर ओंळखलंत लालजीभाई...तंसलीच यंत्रं मी शोंधतोय… … "

लालजीभाई नी मग एका कागदावर कांहीतरी लिहिलं, आणि तों माझ्या हातात देंत म्हणाले,” तुमी ह्या दुकानीं जा साएब… … हेच्यापाशी तुमाला पायजेल तसली यंत्रं अने बाकी काय ते स्पेअर पार्ट पन भेंटतील बगा… …चंगा माणस हाय. दुकान तसं बारकंच दिसतं बाहेरनं, पर तेच्यावर काय जाऊं नकां...पुण्यातला बडा सप्लायर हाय तो…

लक्ष्मण नांव हाय तेचं… … माजा नाव सांगा तेला...काय हरकत नाय...”

मी लालजीभाई नां धन्यवाद देंत त्यांचा निरोप घेंतला, आणि गाडी लगोलग त्यांनी दिलेल्या पत्त्याकडं वळवली… … …

तो पत्ता विचारत, ठोंक बाजारातल्या आडव्या- तिडव्या गल्ल्या धुंडाळत अखेंर एक तासाभंरात मी त्या दुकानांत पोंचलो, आणि परत एकदां कपाळाला हात लावला… …!!

तेव्हां माझ्या लक्ष्यात आलं, की इलेक्ट्रॉनिक्स बाजारांत फिरतांना मी शेंकडो वेंळा तरी त्या दुकानावरनं ये- जा केलेली होती...पण तिथं घड्याळांची यंत्रंं ठोंक भावात मिळत असतील, अशी मला कधी शंका देखील आलेली नव्हती…!!!

बाहेरून एखाद्या छोट्याश्या बोळकांडीसारखं भासणारं ते दुकान आत बरंच मोठं होतं… …

भिंतींवर अनेक प्रकारची घड्याळं लंटकंवलेली दिसत होती…

गल्ला वगळतां कपाटांत आणि जमिनीवर विविध मालाची खोंकी इतस्ततः पडलेली दिसत होती… …


गल्ल्यावर एक पन्नाशी चे गृहस्थ बसलेले होते… …

मी दुकानात शिरलो,” नमस्कार… ...”

गृहस्थ,” या या...नमस्कार… … काय हवंय आपल्याला ? ”

मी,” मी नानिवडेकर… … लालजीभाईनी हा पत्ता दिला मला… ...लक्ष्मण आपणच काय ? ”

गृहस्थ,” होय… … मी च लक्ष्मण...आत्तांच लालजीभाईं चा फोन आला होता मला… … काय हवंय आपल्याला ?”

मी,” मला साधी चिनी बनावटीची नुस्ती तारीख असलेली, तारीखवारवाली, आणि नुस्ती वेंळ दांखवणारी अशी सगळ्या प्रकारची सुटी यंत्रं बघायची आहेत… …लालजीभाईनी सांगितलंय की तुमच्याकडं ती ठोंक भावात मिळतील म्हणून… … काय भाव आहेत त्यांचे ? ”

लक्ष्मण,” आपलं दुकान आहे काय साहेब ? “

मी ठोंकून दिली,” माझं दुकान असं नाही, पण ब-याच दुकानदारांची घड्याळ दुरुस्तीची कामं करतो मी घरीच… … "

लक्ष्मण,” कांही वांधा नाही साहेब… …पण किती नग हंवेत तुम्हाला ? ”

त्याचं काय आहे साहेब...एकाच प्रकारचे पन्नास नग हंवे असतील, तर ठोंक भावात पण थोडाफार फंरक पडतो ना, म्हणून विचारलं… ...”

मी,” हरकत नाही… … सगळे प्रकार मिळून वीसएक तरी नग लागतील मला...”

लक्ष्मण नं मग तिन्ही प्रकारची यंत्रं माझ्या पुढ्यात ठेंवली…

हे नुसती वेंळ दाखवणारं यंत्र तीस रुपाये नग, हे तारीख आणि वेळ वालं पन्नास रुपये नग, आणि हे तारीख-वार-वेळ वालं साठ रुपये नग… …!!!

मी,” आणि मला एक सांगा, मघांशी तुम्ही जे म्हणत होतां, तसे सगळे प्रकार मिळून जर एकूण पन्नास नग मी खंरेदी केले, तर भावात किती फंरक पडेल ? “

लक्ष्मण,” वीस टक्के कमी होतील साहेब… ...”

लक्ष्मण नं सांगितलेले भाव ऐकून आतां मात्र मी अक्षरशः आवाक् झालो…!

लक्ष्मण कडं केवळ साठ रुपयांना मिळणा-या यंत्राची किंमत शशी सारख्यांच्या टप-यांवर पोंचेपर्यंत तब्बल चारशेतेहेत्तीस टक्क्यांनी वधारून दोनशे साठ रुपये होत होती… …!!

आणि पन्नास नगांवरची वीस टक्क्यांची सवलत जर पकडली, तर भावात जंवळपास पांचशे वीस टक्क्यांचा फंरक पडत होता… … !!!

टिकेकर मास्तरांनी मला समजाऊन सांगितलेलं आश्चर्य मी प्रत्यक्ष्यात अनुभंवत होतो… … …!!!

मनांतल्या मनांत सतरावेळां कपाळाला हात लावत मी मग सगळे प्रकार मिळून तडक पन्नास यंत्रांची खरेदी केली…

मग घड्याळं दुरुस्त करतांना लागणारे अत्यावश्यक सुटे भागही खरेदी केले...आणि लक्ष्मण ला विचारलं,” घड्याळाचे सेल पण ठेंवतां तुम्ही? “

लक्ष्मण,” घड्याळांचे सर्वच सुटे भाग तुम्हाला माझ्याकडं मिळतील...”

मी,” मग ह्या मशीन नां लागणारे सेल ही दांखवा बघूं...”

लक्ष्मण,” हं...हे सेल साहेब...हा जरा महागातला सेल तीन रुपये नगानं पडतो, आणि हा किंचित कमी किंमतीचा दोन रुपये नगा नं पडतो… … तीन रुपये वाले सेल तुम्हाला जितके हंवे तितके सुटे देतां येतील, पण हे दोन रुपयेवाले मात्र पन्नास च्या पॅक मध्ये च मिळतील… … कुठले देऊं तुम्हाला ? “

आतां मात्र डोळे पांढरे होऊन मला घेरी यायचीच काय ती बाकी राहिली…!!!

ठोंक बाजारात केवळ दोन रुपयांना मिळणारा सेल शशी सारखे टप-यावाले तब्बल तीन हजार टक्के किंमत फुगवून साठ- सत्तर रुपयांना विकत होते… …!!!

मग एकगठ्ठा शंभर सेल्स पण मी लक्ष्मण ला भंरायला सांगितले……….

एकूण बिल अठ्ठावीसशे रुपये झालं… …

आणि मी ती कुरुक्षेत्रावरची लढाई हातोंहात मारून घरीं परतलो……स्वतःवर बेहद्द खूष होऊन……...

ग्राहक लुबाडणूक श्रृंखले ' चा चक्रव्यूह मी सफाचट् भेंदलेला होता… …!!

यथावकाश मग कामाला सुरुवात केली… …

क्वॉर्ट्झ घड्ळयाळांसंबंधी मला तोंपावेतों कांहीच द्न्यान नव्हतं…

मग इंटरनेट वर शोंधाशोंध करून प्रथम क्वॉर्ट्झ घड्याळांच्या यंत्रांची रचना, तीं कशी खोंलतात जोंडतात, वगैरे माहिती गोळा करून मी प्रथम नीट अभ्यासली, तेव्हां लक्ष्यांत आलं की ते कांही फारसं अवघड काम नाही...किमान इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करणा-या माझ्यासारख्या अभियंत्याला तरी ते जमायलाच हंवं… …

मग संग्रहांतल्या घड्याळांपैकी एक अगदी जुनं खराब झालेलं तारीख वार दांखवणारं - जे प्रयोग करतांना बिघडून वाया गेलं, तरी फारसं दुःख होणार नाही- असं एक घड्याळ मी निवडलं… … तें खोलून त्याची जुनी खराब झालेली डायल कांढून टांकली...

 

नंतर दुरुस्तीच्या सामानातनं एक साधा पत्र्याचा तुकडा निवडून त्यातनं साधारण पाऊण इंच व्यासाची गोल चंकती कांंपून कांढली. मग तया चंकतीला भोंकं पाडायच्या यंत्रानं मध्यबिंदूवर एक छोटंसं भोंक पाडून तें रीमर नं इतपत मोठं केलं, की त्यावर पांठीमागून नवीन आणलेलं तारीख वारा चं यंत्र चंपखल बसेल… …

मग त्या चंकतीला फंवारा मारून चंकचंकीत काळा तैलरंग दिला… …

रंग सुकल्यावर मग त्या चंकतीवर हातांनं पांढ-या तैलरंगानं वेळेचे आंकडे दर्शवणा-या रेषा रंगवल्या… … …

आतां घड्याळाची हस्तनिर्मित नवी डायल तयार झाली होती… …

डायल सुकल्यावर मग मी तीवर पांठीमागून यंत्र गोंदा नं चिकटवून नीटपणे बसंवलं, आणि तें जुगाड सुकायला ठेंवलं… …

हा सारा खेळ आठ आण्याच्या नाण्याएव्हढ्या इवल्याश्या डबीमध्ये करायचा असल्यानं सारं काम दमादमानं संयम रांखून चाललेलं होतं…

थोडंसं जरी इकडं तिकडं झालं, तरी काम वाया गेलं असतं……

यंत्र सुकल्यावर, मग पुढचं काम फारसं कठीण नव्हतं. फटाफट् तें जुळणी केलेलं साडगं मी डबीत नीट बसवलं…

मग योग्य तेंव्हढ्या लांबीची आंटेदार सुई कांपून तिला गुंडी बसवली, आणि तयार झांलेली चांवी डबीच्या वेंजातनं आंत संरकवून दाब देत कट्कन यंत्राला जोंडून टाकली… …

 

आणि पांठीमागनं डबी चं झांकण बंसवून काम फत्ते करून टाकलं…

पहिल्याच प्रयत्नात मी बाजी मारलेली होती………!!!

 

पहिला प्रयोग यशस्वीरीत्या पार पडल्यावर मग मी साध्या वेळ दांखवणा-या घड्याळांकडं मोर्चा वळवला… …

हा प्रयोग जरा ज्यास्त कठीण होता………कारणं अशी होती

पहिलं कारण म्हणजे डायलला तारीख दांखवणारं भोंक पाडावं लागणार होतं… … डायल खराब होऊं न देतां…

आणि दुसरं कारण सदर भोंकातनं तारखेचा आकडा नीट दिसेल, अश्या त-हेनं डायला पांठीमागच्या बाजूनं चपखलपणे यंत्र बसवावं लागणार होतं… …

सगळ्या उपद्व्यापात हे च काम कौशक्य आणि सबुरी ची परीक्षा बघणारं होतं.

म्हणून मग मी पहिल्या प्रयोगाप्रमाणंच एक साध्या पत्र्याची चकती कापून घेंतली, आणि तिच्यावर सदर उद्योग करून बघितला… …

तीन-चार अयशस्वी प्रयत्नांती तें काम अचूक जमलं एकदाचं… … …

एकदां तें कसब हस्तगत झाल्यावर मग मात्र मला मागं वळून बघावं लागलं नाही…

पहिल्या जुन्या घड्याळाचं परिवर्तन करतांना डायलला छिद्र पाडतेवेंळीं छिद्राच्या परिघाजंवळ डायलच्या रंगाचे टवके उडाले...ते मग मिळती-जुळती रंगछटा तैल रंगात बनवून बुजवावे लागले… ...पण चित्रकला अवगत असल्यानं तें काम सहज जमलं.

मग पुढचं सारं काम एका दिवसात हातावेगळं झालं…

आणि पहिलं-वहिलं घड्याळाचं शल्यकर्म अगदी झकास पार पडलं…

इतकं झकास, की वीसेक वर्षांचं ते जुनं घड्याळ कायापालट केलेलं असेल, अशी शंका सुद्धां येत नव्हती…!!


कदां नमुना यशस्वी झाल्यावर मग उरलीं- सुरलीं अडतीस घड्याळं बघतां बघतां पुढील पंधरवड्यातच तयार झाली… …

माझ्या परिश्रमांचं मोल जर मोजलं नाही, तर ह्या सा-या उपद्व्यापाचा एकूण खर्च आला फक्त दोन हजार आठशे रुपये… …

शिवाय घड्याळ दुरुस्तीची कला आणि द्न्यान अवगत झालं, हा फायदा अलाहिदाच...

हरेक घड्याळात कमीतकमी तारीख असल्यामुळं, एकूणएक घड्याळं आतां वापरात आली आहेत… …

मी मग थोडीशी सुतारकी करीत एक लाकडी शो केस घरच्याघरीं तयार करून हे माझं ' घड्याळ कला दालन ' मोठ्या प्रेमानं घरातल्या दिवाणखान्यात बसवलेलं आहे...

आतां मनगटावर दररोज नवं घड्याळ… …तेंही फक्त साठ रुपये खर्चात… …!!!

तर वाचकहो, आतां आलं काय लक्ष्यांत, ही प्रस्थापित ' ग्राहक लुबाडणूक श्रृंखला ' कशी बेदम असते ते ?

अगदी अलिकडं ह्या सगळ्यावर कडी झाली……

माझ्या एका चिनी मित्रानं मला एक काळ्या डायलचं देंखणं घड्याळ भेंट म्हणून पांठवलं…

घड्याळ छान च होतं, पण फक्त वेंळ दाखवणारं होतं…

आता सगळयाच सोयी हाताशी असल्यामुळं मग मी ते खोंलून नेहमीप्रमाणं डायल ला छिद्र बिद्र पाडून त्याला तारखेचं यंत्र बसवलं, आणि त्या घड्याळाचं छायाचित्र माझ्या त्या मित्राला गंमत म्हणून ई-मेलवर पाठवलं…

चार दिवसांनी त्या चिन्यामाऊ चं माझ्या ई-मेल ला जे उत्तर आलं तें असं होतं…

 

,” डिअर मि. रविशंकर,

आय वॉज एक्स्ट्रीमली ॲमेझ्ड टु सी युवर लेटेस्ट ब्यूटिफुल रिस्टवॉच…

इट सीम्स टु बी नदर व्हर्शन फ द सेम मॉडेल विच आय रिसेंटली सेंट यू ज अ प्रेझेंट…

वेल...आय हॅड अ थॉट टु बाय सिमिलर वन फॉर मायसेल्फ, सो आय इनक्वायर्ड विथ द मेन डीलर फ धिस मेक ट माय एण्ड, ॲण्ड नाऊ दे आर आफ्टर मी अबाउट इट्स सोअर्स… …

मे आय नो व्हेअर द हेल यू गॉट इट फ्रॉम ? “


 

*************************************************************************************

रविशंकर.

१० मार्च २०२१.

 


 

1 comment: