Search This Blog

Monday 1 March 2021

॥ बल्ल्या ॥

 ॥ बल्ल्या ॥

' आई ची माया आभाळाच्याही कवेत मावत नसते ' अशी संस्कृतात एक सार्थ आणि यथार्थ म्हण आहे... ... ...
पण असं प्रेम द्यायला उपरोक्त म्हणीतली ' आई ' ही जन्मदात्री च असायला हवी, असं मात्र मला वाटत नाही.
तसं असतं, तर मग महाभारतातली 'कुन्ती' कशी काय जन्मली असती?
कंचाट्यात सापडलेल्या स्वतःच्या अस्तित्त्वाचा 'सामाजिक निष्कलंकपणा' शाबूत राखण्यासाठी नवजात अर्भकं अनाथाश्रमाच्या पायर्‍यावरच काय, थेट उकिरड्यावरही फेंकून देऊन पसार होणार्‍या आधुनिक कुन्ती या कलियुगातही उजळ माथ्यानं वावरत असतातच की... ... ...
मग प्रश्न असा निर्माण होतो, की या आधुनिक कुन्ती रूढार्थानं जन्मदात्री जरी असल्या, तरी 'आई' 'माता' अथवा 'अंबा' या उपाधीला पात्र ठंरतात काय?
किंवा 'माता' या उपाधीला लायक व्हायला मुळात स्त्री ही जन्मदात्री असावीच लागते काय?
आणि आभाळमाया जिला म्हणतात, ती धारण करायला कुठलीही स्त्री ही मुळात 'जन्मदात्री' असावी लागते, की 'अंबा' ?

मला तरूण वयात बराच काळ या कोड्यांची नीटपणे उकल होत नव्हती... ...
'बाबाणी' जेव्हां माझ्या आयुष्यात आली, तेव्हां ती उकल निरपवादपणे झाली.
पुढं समृद्ध जीवनाचं तत्त्वज्ञान जेव्हां कांही अंशी अभ्यासलं, तेव्हां समजलं, की

 
                        'प्रसवेण नारी भवेन्न माता, अंबा भवेत्संगोपनेनैव'


संस्कृत भाषेत पित्याला ' हे तात' आणि मातेला 'हे अंब' म्हणून संबोधलं जातं... ... ...
तात्पर्य, नुस्ती अपत्य प्रसवून स्त्री 'माता' किंवा 'आई' या आभाळमयी उपाधीला कधीच लायक ठंरत नसते... ... ...
तर संगोपन हे मातेचं आद्य कर्तव्य जी सर्वार्थानं समर्थपणे निभावते, तीच स्त्री यथार्थपणे 'आई' किंवा 'माता' अथवा 'अंबा' या संबोधनाला पात्र ठंरते, भले ती वास्तवात जन्मदात्री नसली तरी... ...
म्हणून तर भागवत श्रीकृष्णाला घडवणार्‍या माता यशोदेची महती गातं... ...जन्मदात्री देवकी ची नव्हे...
आणि महाभारत जन्मदात्यानं आंधळं प्रेम करून लाडावून ठेंवलेल्या पोटच्या हटवादी ज्येष्ठ पुत्राला 'विजयी भंव' असा वर ठामपणे नाकारत त्याची चामडी लोळवणार्‍या कर्तव्यकठोर गांधारी ची महती विशद करतं... ...'सीदन्ति मम गात्राणि' म्हणत रणांगणावर हातपाय गाळणार्‍या अर्जुनाला जन्म देणार्‍या कुन्ती ची नव्हे... ... ...
तात्पर्य, 'वाढवणं' आणि 'घडवणं' या दोन संकल्पनांत जो विराट फरक आहे, तोंच नेमका 'जन्मदात्री' किंवा 'अंबा', आणि 'जन्मदाता' किंवा 'तात' या शब्दांमधलाही आहे.
आणि 'संगोपन' याचा तरी नेमका अर्थ काय?
केवळ खायला-प्यायला घालून वाढवणं, आणि अमाप लाड करून अपत्यांना डोंक्यावर बसवून घेणं, याला संगोपन म्हणतां येईल?
मला वाटतं, की अपत्याला टाकीचे घांव घालत घडवून समर्थपणे या जगात जगायला लायक बनवणं, म्हणजे संगोपन... ... ...
जे स्त्री-पुरुष ही अंगभूत जबाबदारी प्रसंगी अपत्यांची कठोरपणे चामडी लोळवत समर्थपणे पार पाडतात, केवळ ते च 'अंबा' आणि 'तात' या पदवीला लायक ठंरतात, बाकी केवळ 'जन्मदाते' च राहतात...
म्हणून तर 'अंबा' आणि 'तात' यांना आपल्या अपत्याचं बाहेरच्या जगात कसं होईल? असल्या चिंता कधीच छळत नाहीत... ...
'जन्मदात्री' आणि 'जन्मदाता' यांना मात्र डोंक्यावर बसलेल्या पोंटच्या 'लाडोबा' नी करून ठेवलेले 'बल्ले' कपाळांना हात लावत आयुष्यभंर निस्तरत बसावे लागतात... ... ...
सोयिस्करपणे टाळलेल्या कठोर कर्तव्याची ती मो
जावी लागणारी जबर अटळ किंमत असते... ... ...
 
जन्मदात्रीनं जितकी कर्तव्यकठोर माया माझ्यावर केली, तिच्या तोडीस माया, रूढार्थानं माझी कुणाचीच कोण न लागणार्‍या एका पारशी 'बाबाणी' नं विद्यार्थी दशेत असतांना माझ्यावर केली होती... ...

 
इतकी, की १९७६ सालीं 'बाबाणी' चं दुःखद निधन झल्याची वार्ता जेव्हां मला समजली, तेव्हां टंचकन्‌ भंरून आलेलं पाणी डोंळ्यांत सामावूं शकलं नाही... ...
ते खळ्‌दिशी दोन्ही गालांवरनं खाली ओंघळलं होतं............
संगोपन या शब्दाचा खरा अर्थ या 'बाबाणी' नं मला शिकवला होता... ...माझी च चामडी लोळवून.......!!!    
त्या 'प्रतिमाते' ची ही एक मुलुखावेगळी हृद्य आंठवण...

' बल्ल्या '


-- रविशंकर.

०१ मार्च २०२१

 

*****************************************************************************************
 

लहान मुलांच्या कुठल्याही खेळात कुणा खेळाडूकडून नियमांचं उल्लंघन झालं, आणि त्याला भुर्दण्ड पत्करावा लागला, तर त्याला ' बल्ल्या ' [इंग्रजीत डिफॉल्ट] झाला असं म्हणतात.
'बल्ल्या' हा कांही फक्त लहान मुलांच्या खेळातच होतो असं नाही, तर तो मोठ्या माणसांच्याही व्यवहारांत, आंतर व्यक्ति संबंधांत, अथवा कुठल्याही कामांत पण होऊं शकतो.
कळत्या वयापासूनच चिंतन-सृजनात हंरवून जायची संवय असल्यामुळं आजतागायत माझा अनेकविध गोष्टीमध्ये 'बल्ल्या' झालेला आहे...अगदी यथास्थित.
सुरुवाती सुरुवातीला बल्ल्या झाला, की मला स्वतःच्या भोटपणा चा विलक्षण संताप यायचा... ...
पण पुढं पुढं मी कुठल्याही बल्ल्या कडं खिलाडू वृत्तीनं बघायला, आणि त्यातली मजा चांखायला शिकून घेतलं.
त्यानंतर मग मात्र आजपावेतो मला कुठल्याही 'बल्ल्या' चा कधीच त्रास झाला नाही...उलटपक्षी त्यातनं मला लेखनासाठी उत्तम विषयही सांपडायला लागले... ... ...!!!
प्रस्तुत ब्लॉग हा पण एका अर्थीं अश्या 'बल्ल्या' झालेल्या नमुनेदार प्रसंगांवरच तर आधारित आहे की... ...वेगळे दाखले द्यायची गरज काय?
तर अश्याच अगदी गळ्याशी येऊन निस्तरल्या गेलेल्या एका 'महाबल्ल्या' ची ही गंमत... ...
 

," केम डिकरा... ... ...शूं प्रॉब्लेम् छे?"
'मोबोज्‌ कॅफे' च्या गल्ल्यावर बसलेल्या त्या गरगरीत 'पारशिणी' नं माझा ओंढलेला-चिंताग्रस्त थोबडा चष्म्याच्या भिंगांआडून डोंळे बारीक करून निरखत मोठ्या आस्थेनं मला विचारलं... ... ...
१९७२ सालातला नोव्हेंबर महिना सुरूं होता... ...वेळ होती सायंकाळची पाच ची.
आमच्या 'मेलडी मेकर्स' वाद्यवृन्दाचा पुण्यातल्या वाडिया कॉलेजच्या स्नेहसंमेलनातला कार्यक्रम उरकलेला होता...
त्यातली माझी तालवादक सहकारी कु. उषा पंडित हिला तिच्या घरीं पोंचवण्यासाठी स्कूटरवर घालून मी लॅम्ब्रेटा कॉलेज च्या फांटकातनं बाहेर काढली, आणि अचानक जाणवलं, की पोटात कावळे कोंकलायला लागलेले होते.
उषा कॉफीभक्त होती... ...तर मला चहा-कॉफी दोन्ही चालायचं...
बंड गार्डन ला जाणार्‍या रस्त्यावरच्या 'मोबोज्‌ कॅफे' मधली पारशी कॉफी आणि तर्‍हेतर्‍हेचे केक त्याकाळी पुण्यात प्रसिद्ध होते.
आतांचं 'रुबी हॉल' रुग्णालय जिथं आहे ना, तिथंच कुठंतरी हे प्रसिद्ध हॉटेल होतं त्या काळीं.
उषा चं घर जिमखान्यावर - म्हणजे ती गांववाली असल्यामुळं तिचं कॅंपात जाणंयेणं तसं नगण्यच असायचं...
पण आम्ही अभियान्त्रिकी च्या वसतिगृहात राहणारी पोरं आख्ख्या पुण्यातली हॉटेलं पालथी घालून मोकळी झालेलो असल्यामुळं, माझं कॅंप भागात, बंड गार्डनवर, बर्‍याच वेळां फिरायला जाणं व्हायचं.
विशेषतः बंड गार्डन चा परिसर हा माझा आवडता भाग. आणि शिवाजी नगर वरनं बंड गार्डन कडं जाण्या-येण्याच्या रस्त्यावर वाडिया महाविद्यालयाच्या अगदी समोरच हे पारशी बाबा चं 'मोबोज् कॅफे' होतं.
अर्देसीर आणि डॅफ्नी  मोबो ही पारशी जोडी म्हणजे ' मोबोज्‌ कॅफे ' चे मालक-मालकीणबाई... ...   

   

तिथं बर्‍याच वेळां संध्याकाळच्या वेळीं मी 'अर्देसीर बाबां' चे केक आणि घमघमणारी कॉफी रिचवायला जात असे.
हे रेस्टॉरण्ट बांधीव नव्हतंच... ...मोकळ्या बागेसारख्या जागेवर मेन्दी चं कुंपण लावलेलं होतं.
आत जागोजागीं सभोंवतीं चार-चार खुर्च्या मांडलेली, आणि रंगीबेरंगी छत्र्यांनीं आच्छादलेली मेजं अंतरां अंतरावर माण्डलेली असायची.
मधल्या पायवाटांवर मस्तपैकी वाळू पसरलेली, आणि त्यांच्या दोन्ही कडांनी सुंदर फुलांच्या कुंड्या मांडलेल्या असायच्या... ...

गल्ल्यावर हिन्दी सिनेमातल्या दिनशॉ दाजीं चा अवतार म्हणावेत असे हॉटेलचे मालक 'अर्देसीर मोबो' बसलेले असायचे... ...त्यांना आम्ही पोरंटोरं 'बाबाजी' म्हणत असूं... ... 


'बाबाजीं' चं तिथं येणार्‍या पोरांटारां वर विलक्षण प्रेम होतं... ...

तिथं मी केव्हांही गेलो, आणि जातांयेतां,"केम डिकरा... ...सब ठीक ठाक छे नी?" असं बाबाजी नी हटकलं नाही, असं कधीच व्हायचं नाही... ...
कधीतरी महिनाअखेरीच्या दिवसांत खिश्यात दमडे नसले, तर उधारी पण राहूं द्यायचे.... ....
परीक्षांचा मौसम सुरूं असेल तेव्हां,"स्टडी जमके जारी थंयो नी डिकरा?... ...केम?... ...आ टाईम मारा हॉटेलमॉं वधारे वेस्ट मत कर...यू ईडियट..." असा दम पण भंरायचे...अगदी हक्कानं.  
एकूण काय, तर 'बाबाजीं' चं मोबोज्‌ म्हणजे माझी विरंगुळ्याची एक अत्यंत आवडती जागा होती... ... ...

तर आज लोच्या असा झालेला होता, की वाडिया मधल्या कार्यक्रमाला होस्टेलच्या खोलीवरून निघतांनाच्या गडबडीत मी पाटलोणीच्या मागच्या खिश्यात पैश्याचं पाकीट घालायलाच सफाचट विसरलेलो होतो...!
भंरीला आणखी उषाला सोबत नेऊन मोबोज्‌ च्या केक-कॉफीवर आडवा हातही मारून झालेला होता... ... ...!!
आणि वेटर नं बिल आणून दिल्यावर मागच्या खिश्यात हात घालतांच साप डंसल्यासारखा मला झंटका बसलेला होता...

आतां त्या तरूण वयात हा असा ओंढवलेला प्रसंग म्हणजे मैत्रिणीदेंखत इज्जती चं 'पानिपतच' की.........
म्हणून मग उषाला 'जरा हात धुवून येतो' अशी थाप मारून मी झालेला 'बल्ल्या' निस्तरायला गल्ल्याकडं गेलो, तर गल्ल्यावर ही अनोळखी गरगरीत 'पारशीण बाई' बसलेली... ... ...!!!
'बाबाजीं' चा कुठंच ठावठिकाणा दिसत नव्हता... ...
म्हणून मग मी 'आतां काय करावं' अश्या विचारात पडून गल्ल्यावर नुस्ताच घुटमळत उभा होतो...
तसा समोर गल्ल्यावर बसलेल्या पारशीण बाई नं उपरोक्त प्रश्न मला विचारलेला होता... ... ...
थोडक्यात काय, तर माझा फर्मासपैकी 'बल्ल्या' होऊन बसलेला होता... ... ...!!!

मी गप्पच आहे हे बघितल्यावर बाबाणी परत चिरकली,"अबे बोल नी डिकरा... ...शूं प्रोब्लेम छे?"
मग जरा धीर करून मी विचारलं,"बाबाजी किधर है?"
पारशीणबाई,"यू मीन अर्देसीर...?"
मी,"हॉं...हॉं...उन्हें हम लोग बाबाजी करके पुकारते है... ...वो बाहर गये है क्या इस वखत?"
पारशीणबाई,"हॉं वो बाहर गये छे ... ...पर मे हूं नी डिकरा... ...मने बता तूं... ...शूं प्रोब्लेम छे तने?... ...
मग दूर टेबलावर मी परतायची वाट बघत एकटीच बसलेल्या उषा कडं निर्देश करून पारशीण बाई नं हंळूच विचारलं,"शूं झगडो-वगडो थयो केम लौण्डी साथे?"
नही जी... ...वैसी कोई बात नही... ...लेकिन हुआ ये है बाबाणी... ...की ये सामनेवाला कॉलेज है ना... ... ..."
पारशीणबाई नं चष्म्याआडचे डोंळे वटारले,"शूं बोल्यो तूं मने डिकरा?... ...ऍ?"
मी सटपटलो,"मॅडम... ...बात ऐसी है की 'मिसेस बाबाजी' को कैसे पुकारते है, ये मुझे पता नही है ना... ...इसलिये गलती हो गयी... ...सॉरी..."
पारशीणबाई नं आतां डोंळ्यांवरचा चष्मा काढून गल्ल्यावर आदळला...
तिच्या निरागस चेहर्‍यावर आतां आकर्णं हंसूं उमटलं... ...
आणि कांही कळायच्या आत माझ्या डाव्या गालाचा कंरकचून गालगुच्चा घेत ती चीत्कारली,"यू... ...रास्कल... ...केटलो प्यारो नाम आप्यो बे मने डिकरा तमे... ...जरा वापस बोल नी..."
मी चांचरलो,"बाबाणी..."
पारशीणबाई,"बाबाणी करके ही बोल मने डिकरा तूं... ...घणो प्यारो लागे छे ... ...अब आव्यो लफडो समझमॉं मारी... ...
परत एकदां दूर टेबलावर एकटीच माझी वाट बघत पांठमोरी बसलेल्या उषाकडं बघून डोंळे मिचकावत बाबाणी नं विचारलं,"आ तमारी 'वो' छे के डिकरा?"
मी,"नही बाबाणी... ...वैसी कुछ 'चक्कर-वक्कर' वाली बात नही है... ...वो हम लोगोंकी ऑर्केस्ट्रावाली सहेली है बस... ...उसे घर छोडने जा रहा हूं"
बाबाणी," तो फिर परेशानी शूं छे तने?"
मी,"बाबाणी...झमेला ये हो गया है, की हमारे होस्टेल से यहॉं प्रोग्राम के लिए आते वखत मै बटुआ भूल गया रूम पे ही... ..."
बाबाणी,"....आऽऽऽऽऽच्छा... ...अब आव्यो लफडो समझमॉं... ...तो बिल भरने पेसो नथी जेब मॉं... ...आ बात छे..."
मी," हॉं बाबाणी... ...तो मै उसे घर छोड के तुरंत यहॉं वापस आ जाता हूं बटुआ लेकर...और बिल भरता हूं...पक्का वादा... ...चलेगा?...प्लीज..."
बाबाणी नं मला कान जंवळ करायला सांगितलं, अन्‌ गल्ल्यातनं वीस रुपयांची एक नोट काढून माझ्या खिश्यात कोंबत खुसफुसली,"आ लफडो घणो डेंजरस होवे डिकरा... ...समझे तुम?
जेब मॉं पेसो नथी नी, तो लौण्डियों के सामने होवे इज्जत का फालुदा ... ...क्या समझे?"
मी,"मै समझ गया बाबाणी... ...आप फिकर मत..."
बाबाणी मला मध्येच तोंडत म्हणाली,"मने पेसोंनी फिकर नथी बे डिकरा... ...पर टेबल पे रख्खा बिल मारा वेटर पेसोबिनाही उठाकर वापस तो नै ला सकता नी?... ...
अब मेरी सुन...लौण्डिया के सामने सर उठ्ठा के भर दे बिल अभी... ...और बादमे लौटा देना पेसा मारा... ...ठीक छे?... ...
साले बटुआ नही सम्हाल सकता तूं... ...और लौण्डी घुमा रहा है स्कूटर पे... ... ...यू ईडियट."
मी,"थॅंक यू बाबाणी... ..."
बाबाणी,"लेकिन याद रहे डिकरा... ...कोई बदमाशी नी चलेगी आ बाबाणी साथे... ...केम?"
इतका सज्जड दम भंरून 'बाबाणी' मला पुढं घालून आमच्या मेजाजंवळ आली... ...
मी कांही झालंच नाही असं भांसवत खुर्ची ओंढून तीवर बसलो... ...आणि 'बाबाणी' नं च दिलेली नोट टेंचात बिलाच्या पाकिटात संरकवून ठेंवली... ...
वेटर ते उचलून घेऊन निघून गेला... ...आणि माझी अब्रु बचावली...
इतक्यात 'बाबाणी' नं विचारलं," आ तमारी फ्रेण्ड छे के डिकरा?"
मी,"हॉं बाबाणी... ...मग उषा कडं निर्देश करत दोघींची ओंळख करून दिली,"आप है मिस. उषा पण्डित...हमारी सहेली...और आप है 'बाबाणी'...यहॉं की मालकिन..."
बाबाणी," केम छो बिटिया ?..."
उषा नं धागा बरोबर पकडला...उत्तरली,"मैं अच्छी हूं बाबाणी... ...आप कैसी है?"
बाबाणी,"घणी अच्छी-खासी छूं... ...आ डिकरा बोल्यूं मने, के तूं आ साथे ऑर्केस्ट्रामॉं काम करे छे...?"
उषा," हॉं बाबाणी... ..."
बाबाणी,"शूं वगाडे छे तूं ऑर्केस्ट्रामॉं...?"
उषा,"क्या पूछा आपने बाबाणी?"
बाबाणी,"अरी मेने पूछा के तुम ऑर्केस्ट्रामॉं क्या बजाती हो आनी साथे?"
उषा,"मै ड्रमसेट पर इन्हे साथ करती हूं... ..."
बाबाणी,"माय गॉऽऽऽऽऽड... ...आ सारीमॉं ड्रमसेट पर बेठती तूं ?... ...अने तूं शूँ  वगाडे छे बे डिकरा?"
मी,"मैं ऍकॉर्डियन बजाता हूं बाबाणी... ..."
बाबाणी नं नुकत्याच फाटकातनं आंत शिरत असलेल्या 'बाबाजीं' ना हाकां मारल्या... ...,"अर्देसीर... ...ओ अर्देसीर... ...इधर आ जल्दी..."
बाबाजी हातातली काठी सांवरत आमच्याजवळ आले, तशी बाबाणी चीत्कारली,"आ जोडी केसी कलाकार छे... ...पता छे तने अर्देसीर?... ...
आ छोकरो छे ना... ...आ ऍकॉर्डियन वगाडे छे...अने आ छोकरी ड्रमसेट वगाडे छे आनी साथे... ...
सच अ लव्हली पेअर...!!!"
'बाबा' आणि 'बाबाणी' आमच्याकडं कौतुकानं बघायला लागले... ...
आणि आम्ही दोघांनी कपाळांना हात लावून त्यांना 'गुड नाईट' करत मोबोज् कॅफे मधनं पोबारा केला...!!!

उषाला घरीं पोंचवून मी माघारी हॉस्टेलवर परत आलो...पाकिट घेतलं...
मेसवाल्याला 'ताट वाढून ठेंव-जेवायला यायला उशीर होईल' असं सांगून तडक पुन्हां 'मोबोज्' गांठलं, आणि 'बाबाणी' ची उधारी तत्परतेनं चुकती केली.

ही 'बाबाणी' बरोबर झालेली माझी पहिली गांठभेंट... ... ...
उषाला त्या वेंळीं तरी झालेल्या 'बल्ल्या ' चा कसलाच कांही पत्ता लागला नाही... ...
अगदी टेंचात सोळा रुपयांचं बिल भंरून मग उषाला मी तिच्या घरीं पोंचवली होती... ...
माझी कुणाची कोण लागत नसलेल्या 'बाबाणी' नं मोठ्या चतुराईनं 'डिकरा' ची इज्जत अशी वांचवलेली होती... ... ...!!!

पुढची दोन वर्षं अभियांत्रिकी संपेतोंवर मी कित्येक वेळां 'बाबाजीं' चे केक-कॉफी चांखायला, नाहीतर रविवारी वाचन-लेखनाचा मूड असेल तेव्हां, 'मोबोज् कॅफेे' ला हमखास जाऊन बसत असे...
तिथलं फाटकाजवळचं एका कोंपर्‍यातलं दोनच खुर्च्यांचं टेबल माझं अगदी खास टेबल होऊन बसलेलं होतं... ...जिथनं वाडिया कॉलेज, अणि त्यापलीकडचा 'टी. एम. टी. सी.' चा सुंदर परिसर दिसायचा... ...
'बाबाजी' अन्‌ 'बाबाणी' पैकी जे कुणी त्यावेंळी हजर असेल ते अगदी अगत्यानं 'केम छो डिकरा... ...तमारी पढाई ठीक ठाक चाले छे नी?' अशी अगदी अगत्यानं माझी चौकशी करायचं... ...
विशेषतः 'बाबाणी' जर गल्ल्यावर असली, तर फेरफटका मारत कधी समोर येऊन बसायची, आणि 'पढाई ठीक चाले केम डिकरा तमारी?... ...अब केटला वखत बाकी छे पास होने माटे?
महेनतथी पढाई करियो डिकरा तूं... ...ऐसी-वेसी बदमाषी करते घूमना मत... ...क्या समझा तूं?" अशी हक्कानं तंबी पण भंरायची... ...
मी कांहीबांही लेखन करीत बसलेलो असलो तर पाठीमागनं खांद्यारनं डोंकावून बघत,'आ तूं क्यॉं लिख्खे छे बे डिकरा... ...?...इदर लव-लेटर लिखते बेठना मना छे... ...पता नथी तने ?'
असली कांहीतरी भन्नाट दमबाजी पण करायची... ...
पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो, की अगत्यानं माझा आवडता 'प्लम केक' मागवायची, आणि तो फस्त करीतोंवर पुढ्यात बसून रहायची... ... गप्पा-टप्पा करीत... ...
एकदां कधीतरी स्कूटरवर मी मेन स्ट्रीटवरच धंडपडलेलो तिला समजलं, तेव्हां 'बाबाजी' सोबत जातीनं मला जहांगीर इस्पितळांत नेऊन माझ्या औषधपाण्याची व्यवस्था तिनं च लावून दिलेली होती...
वर आणखी रस्त्यात पडलेली माझी लॅंब्रेटा आजूबाजूच्या ओंळखीच्या 'डिकरां' ना कामाला लावून जवळच्याच दिलावर खान मेकॅनिककडून दुरुस्त करून घेऊन दिलावरच्या च गॅरेज मध्ये ठेंवायची परस्पर व्यवस्था पण केलेली होती...
चालता-फिरता होऊन स्कूटर आणायला मी जेव्हां दिलावर च्या गॅरेजमध्ये गेलो, तेव्हां दिलावर कांहीच बोले ना... ...त्यानं फक्त स्कूटर ची चावी माझ्या हातात दिली... ...
आणि म्हणाला," जिसने ये काम किया, वो मेकॅनिक अभी बाहर गया है साब... ...मुझे बिल के बारेमे कुछ पता नही है...लेकिन आप स्कूटर लेकर जा सकते है... ...अगर लेन-देन में कुछ बाकी है, तो मै सेठानी को बाद मे बता दूंगा...आप बिल की फिकर मत करो साब... ..."
म्हणून मग मी तसाच 'मोबोज्' वर गेलो, आणि खुद्द बाबाणीला च बिलाबद्दल छेडलं, तेव्हां बाबाणी उलट माझ्यावरच तंडकली,"बिल पूछने चला आव्यो डिकरा तूं मारी पासे 
?... केम? ... ...पेले स्कूटर सीधी चलाना सीख ले...पछी आ जा मने बिल पूछने... ...समझा तूं?... ... ...यू ईडियट."

दिलावर च्या त्या बिलाचं नेमकं काय झालं, ते मला कधीच कळलं नाही... ... ...
 
तात्पर्य, जन्मदात्या आई नं जशी-जितकी माया मला दिली, त्याच्या तोडीस तोड माया या 'बाबाणी' नं पण माझ्यावर केली... ... ...
यथावकाश माझ्या आज्जी नं जेव्हां माझी गांठ सौ. इंदिराजीशी बांधायचं नक्की केलं, त्यानंतर मी जेव्हां चि. सौ. कां. इंदिराजीना सांगितलं, की मला दोन आया आहेत, आणि त्यापैकी एक पारशी 'बाबाणी' असून ती पुण्यातलीच आहे म्हणून, तेव्हां इंदिराजींना ती थट्टाच वाटली... ...
म्हणून मग त्यांना मी एका रविवारी सकाळच्या नाष्ट्यालाच 'मोबोज्' मध्ये बरोबर घेऊन गेलो... ...
योगायोग असा, की नेमके 'बाबाजी' आणि 'बाबाणी' दोघेही कॅफे त हजर होते... ... ...पण जरा गडबडीत दिसत होते...
सौ. इंदिराजी नीं जेव्हां विचारलं, की तुझी 'पारशी आई कुठं आहे?' म्हणून, तेव्हां मी 'दोघंही आहेत...जरा गडबड चाललेली दिसतेय त्यांची कांहीतरी...जातांना ओंळख करून देतो' असं सांगून प्लम-केक-कॉफीची ऑर्डर दिली... ...
यथावकाश सगळ्याचा पोंटभंर आस्वाद घेऊन झाल्यावर, बिल न्यायला कुणी वेटर फिरकलाच नाही, म्हणून मग मी च बिल घेऊन गल्ल्याकडं गेलो... ...
,"केम छो डिकरा?... ...केक-कॉफी नी मजा आवी के नथी? असा 'बाबाणी' नं विषय काढला... ...
," ये क्या पूछने की बात हुई बाबाणी?....हमेशा की तरह केक और कॉफी का मजा बेहतरीन ही था... ...बिल्कुल तुम्हारी तरह... ..."
असं म्हणत मी बिलाचे पैसे द्यायला पाकीट बाहेर काढलं, तशी बाबाणी नं हांक मारली,"ओ अर्देसीर... ...जल्दी आ जा... ...आपडो डिकरा आवी गयो छे... ... देख नी..." म्हणत बाबाजी ना पुकारलं.
बाबाजी कांचेचे पेले साफसूफ करायचं हातातलं काम बाजूला ठेंवून गल्ल्यावर आले.... ...,"
तसा 'बाबाणी' नं मोर्चा माझ्याकडं वळवला...आणि दूर टेबलावर बसलेल्या चि. सौ. कां. इंदिराजीकडं बघून भिवया उडवत विचारलं,"आ नयी छोकरी कोन छे तारी साथे?"
मी काय बोलावं असा विचार करायला लागलो, तशी बाबाणी पुढं वांकत खुसफुसली," आ छोकरी तमारी 'वो' छे नी?... ...केम डिकरा?"
मी होकारार्थी मान डोंलवतांच बाबाणी नं बाबाजी पुढं तिचा पहिलवानी पंजा पसरला,"ला मारी बेट... ...सो रुपिया... ...!!!"
मी कपाळाला हात लावून बाबाणी कडं बघतच राहिलो... ... ...!!!
तशी म्हणाली,"बिल्कुल ठीक बोली नी मे डिकरा... ...ऍं?... ...तमारी 'वो' ही छे नी?... ...मेने बेट लगायी थी अर्देसीर साथे... ...पॉंच मिनिट हुए...!!!"
मी हंसायला लागलो, तशी कानाजवळ तोंड करून कुजबुजली,"सुन डिकरा... ...आ सही छोरी लागे मने तारी माटे... ...एकदम असली माल छे... ...
वो वाडिया वाली मॉडर्न लौण्डियां आवे छे ना अहीं...जेनूँ टकाटक देखके बेठो हतो तूं उधर... ...शूं काम की नथी डिकरा घर गिरस्ती चलानेवास्ते... ...
ना घर सम्हालने की अकल होवे...ना रसोई पकाने की... ...आ छोरीही ठीक लागे मने तमारे जैसा बदमाष सम्हालवां माटे... ...
और तमारी वो ड्रमसेट वाली छोरी क्यॉं छे आजकाल ?...या छोडी दीधो बेचारीने ?... ...यू... रास्कल... ...
क्यूं अर्देसीर... ...घणी प्यारी लागे नी बे आ जोडी ?... ...चल चल... ...मिल तो ले आपडी बहू से... ...जल्दी चल... ..."
असं म्हणून बाबाणी माझं बखोट धंरून मला इंदिराजींकडं घेऊन गेली... ...
आणि ओंळख-देख करून दिल्यावर चि. सौ. कां. इंदिराजी ना म्हणाली,"जीती रहो बिटिया... ...बडी प्यारी लागे री तूं... ...हवें मारी आ बात कायमीं ध्यानमॉं रख ... ...
आ डिकरा छे ना आमारो... ...वेसा सीदा-सादा दिखे छे...पर बिल्कुल भरोसा मत रखना इस बदमाष पर... ...केम?
तमे पता छे के... ...आ डिकरा हमेशा अहीं आकर बेठतो हतो... ...सामनेवाली कॉलेज की रंगारंग लौण्डियॉं निहारते... ...पता छे के तने ?
अब कडी नजर मॉं रखना सालेको... ...
और कुछ भी शरारत बदमाषी की नी तेनी साथे, तो सीधा मारी पासे लाववा घसीटके... ...फिर देख लेती हूं मे डिकरा के नखरे...समझी तुम?
सदा खुष रहो बिटिया... ...तो अब शादी कब करियो रे डिकरा?"

९ डिसेंबर १९७४ ही आमच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यावर जेव्हां आम्ही कपड्या-लत्त्यांची मेन स्ट्रीट वर खरेदी करायला महिनाभंर आधी गेलो होतो, तेव्हां जातां जातां प्रथम बाबाजी-बाबाणी नां लग्नाचं आमंत्रण द्यायला त्यांच्या घरीं गेलो होतो, तेव्हां तिच्या देखण्या 'मॉरिस' गाडीत घालून माझ्या सुटापासून बुटापर्यन्त आणि सौ. इंदिराजीं च्या बुगडी पासून साडीपर्यन्त प्रत्येक गोष्टीची आमच्या बरोबर आख्खा कॅंप पालथा घालत बाबाणी नं स्वतः जातीनं मोठ्या चोखंदळपणे निवड केलेली होती... ...
नंतर मला पुण्यातला सर्वोत्कृष्ट सूट कारागीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेन स्ट्रीट वरच्या 'व्होग टेलर्स' कडं घेऊन गेलेली होती...
व्होग चा मालक फिरदौस ला तिनं सूटची मापं स्वतःच घ्यायला लावली होती... ... ...
फिरदौसनं तो सूट माझ्या चंणीला इतका चपखल बसेल असा शिवला, की तो बघून माझा लॉण्ड्रीवालाही मला म्हणाला होता की 'अगदी थेट अंगावरच शिवल्यासारखाच वाटतोय'... ... ...!!!
सूट शिलाई चं बिल फिरदौस नं फक्त शंभर रुपये च आकारलं... ...हा कदाचित  कॅंपातल्या मेन स्ट्रीटवरच्या बाबाणी च्या 'वटा' चा परिणाम असावा... ... ...
तो सूट ही बाबाणी ची एकमेव आंठवण आतां माझ्याजवळ शिल्लक उरलेली आहे... ... ...

७४ सालच्या डिसेंबर महिन्यात आमच्या लग्नाला 'बाबाजी-बाबाणी' आवर्जून उपस्थित राहिले होते... ...
आणि बाबाणी नं लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी आम्हांला मेन स्ट्रीट वरच्या त्यांच्या घरीं बोलावून तिनं स्वतःच्या हातांनी बनवलेला माझा आवडता भलामोठ्ठा प्लम-केक कापून त्यांच्या पारशी थाटात पण आमचं लग्न साजरं केलं... ...!!
मग ,"देख देख अर्देसीर... ...केटली प्यारी लागे आपडी डिकरा-बहू नी जोडी"... केम?" ...असं चीत्कारत आमच्या दोघांच्या गालांवर कडांकडां बोटं देखील मोडली...!!!


रूढार्थानं माझी कुणाचीच कोण लागत नसलेल्या या बाबाणी नं ही अशी सख्ख्या आई इतकीच माझ्यावर अपार-अथांग माया केली... ...
लग्नानंतरसुद्धां दर महिन्यातनं एखाद दुसर्‍या वेळेला तरी आम्ही आवर्जून बाबाजी-बाबाणी ना भेंटायला 'मोबोज्' मध्ये जात असूं... ...
किंबहुना त्या बाजूला कधी गेलो, तर 'मोबोज्' ला भेंट दिल्याशिवाय पुढं जायचं नाही असा आमचा जणूं कांही अलिखित शिरस्ता च होऊन बसलेला होता... ... ...
कॅंपात कधी भाजी मार्केट ला, नाहीतर इतर कुठं गेलो, तर कधी कधी ' बाबाजी-बाबाणी' ची जोडगोळी त्यांच्या मेन स्ट्रीट लगतच्या घराच्या खास पारशी स्टाईल व्हरांड्यात आरामखुर्च्या टाकून समोरच्या गंमती-जमती निरखत बसलेली दिसायची... ...
आम्ही दृष्टीला पडलो, की ,"केम छो डिकरा?... ...अरे आव नी...आव नी ...आ जा अन्दर..." अशी हांक मारून आवर्जून घरात बोलवायची... ...
आणि,"अरे ओ अर्देसीर... ...देख तो... मारा डिकरा अने बहू आवे छे घरमॉं आपनने मळवाने... ...आ जा नी... ...बाहर आ जा जल्दी..." असा कल्ला पण करायची...
मग सगळ्यांचा पुढचा एक तासभर तरी इतका सुगंधित व्हायचा, की त्याचा दरवळ पुढच्या भेंटीपर्यंत आम्हांला पुरायचा.
बाबाजी-बाबाणी च्या घरीं तिसरं कुणी माणूस मला कधीच दिसलं नाही...
मी पण कधी छेडलं नाही तिला त्याविषयीं... ...बहुतेक बाबाजी-बाबाणी नां मूल बाळ कांही नसावं कदाचित... ...
बाबाणी नं माझ्यावर जी धों धों माया ओंतली, त्याचं हें तर कारण नसेल ?
खरं काय ते तो एक झरतुष्ट्र च जाणे..............

मला शालेय वयात शिकवतांना टिकेकर मास्तर एकदां म्हणाले होते...
," हे कायम लक्ष्यांत ठेंव ऍरिस्टॉटल्....
उभ्या आयुष्यात जर कधी कुठं संकटात सापडलास, तर त्या च व्यक्ति ला सांकडं घालायला जा, जिनं कधीतरी तुझ्या अपराधापायीं तिरिमिरीला येऊन तुझी चामडी लोळवलेली असेल... ...
केवळ त्या आणि त्या च व्यक्तीला तुझ्या भल्याची खरी तळमळ असेल... ...हे कधीच विसरूं नकोस... ...समजलं?
गोडबोल्या, वा 'जाऊं दे' म्हणून सोडून देणार्‍या माणसांचं ते काम नव्हे....
असल्या माणसांजवळ कुणाचंच कसलं भलं करायची ना इच्छा असते, ना धंमक................."
मास्तरांच्या या वाक्याचाही अगदी पोंटभंर अनुभव आमच्या लग्नानंतरच्या पुढच्या वर्षभरातच या 'बाबाणी' नं मला अगदी खंणकावून दाखवलेला होता...
माझी च चामडी लोंळवून... ...!!!

आमच्या सौ. इंदिराजी आणि मी... ...दोघांनाही चित्रपट बघायची जाम हौस होती...
मला इंग्रजी चित्रपटांची आवड, तर सौ. इंदिराजीं चा संगीतसमृद्ध हिन्दी चित्रपटावर जीव.
राज कुमार हा त्यांचा सर्वात आवडता अभिनेता...
तर झालं असं, की ७५ सालच्या दिवाळीच्या आसपास एके दिवशी त्यांना कुठून तरी बातमी लागली, की त्या रविवारी राज कुमारच्या कोणत्यातरी आगामी चित्रपटाचं [ बहुधा 'लाल पत्थर' ]बण्ड गार्डन वर आणि नदीपलीकडच्या टेकडीवरच्या ठाकरसी पॅलेस मध्ये छायाचित्रण होणार आहे म्हणून... ...
झालं...सौ. इंदिराजी नी एकतर्फी आख्खा रविवारच बण्ड गार्डन ला बहाल करून टाकला... ...
आणि आम्ही रविवारी सकाळी घरांतली आंवरा आंवर उरकून नऊ च्या ठोक्यालाच बण्ड गार्डनच्या दिशेनं स्कूटर घेऊन सुटलो.
चालत्या लॅंब्रेटावर 'दिवसभंर काय काय करायचं?....राज कुमार प्रत्यक्ष्यात बघायला मिळेल काय?' असलं कांही-बांही आमचं अखंड बोलणं चाललेलं होतं... ...
जेम तेम वाडिया कॉलेजच्या चौकात आम्ही पोंचलो, अन्‌ अचानक समोरच्या बाजूनं येणारा एक भंरधांव मालट्रक त्याच्या पुढच्या गाडीला ओलांडायच्या नादात रस्त्याच्या उजव्या बाजूला इतका सरकला, की थेट आमच्या अंगावरच धांवून आला... ...
प्रसंगावधान रांखून मी स्कूटर चपळाईनं रस्ता सोडून बाजूच्या पट्टीवर घातली, आणि ब्रेक मारून थांबवली...
मालट्रक आमच्या स्कूटरपासून जेमतेम एक फूटभंर अंतरावरनं रोंरावत निघून गेला, आणि मी ट्रकवाल्याला एक शिवी हांसडत गाडी परत गीअर मध्ये घालून बंड गार्डन च्या दिशेनं पिटाळली... ...
बण्ड गार्डनवर येईतोंवर माझी टकळी अखंड चालूं च होती.... ....
उलट दिशेनं जाणारी वाहनं चालवणारे लोक माझ्याकडं जरा चमत्कारिक नजरांनी बघताहेत, याचंही भान मला नव्हतं... ... ...
सौ. इंदिराजी मात्र गप्प च होत्या... ... ...
बंड गार्डनच्या वाहनतळावर मी स्कूटर नेऊन उभी केली, आणि," हं... ...उतरा आतां" असं सौ. इंदिराजी नां सांगत पाठीमागं वळलो... ... ...
बघतो तर काय...पाठीमागची सीट ठार रिकामीच होती... ... ...
आणि सौ. इंदिराजी हवेत गायब झालेल्या होत्या.......!!!
स्कूटर स्टॅंडवर चंढवून तीवर बसकण मारत कपाळाला हात लावून 'आतां करायचं तरी काय?' असा मी विचार करायला लागलो... ... ...
काय झालं असावं सौ. इंदिराजीं चं मागच्या मागं?...आणि आपल्याला कसा काय कसलाच कांही पत्ता लागला नाही?
आतां मघांचचा, अगदी फूटभंर अंतरावरनं सुसांटत गेलेला तो भंरधांव मालट्रक मला आंठवला......
छातीत धंस्स झालं... ...आणि हातांपायांतला जीव च गेला माझ्या... ...
काय करायचं आतां? आणि सौ. इंदिराजींचं कांहीतरी भलतं-सलतं तर होऊन बसलं नसेल ना?
माझं डोंकं आतां मात्र गरगरायला लागलं, आणि ब्रह्माण्ड आंठवलं मला... ... ...
मी किती वेळ कपाळाला हात लावून तश्या सुन्न-बधिर अवस्थेत स्कूटवर बसलो होतो, कांही कळलं नाही... ...बहुधा अर्धा तास तरी उलटला असावा.

अचानक बाबाजी-बाबाणी ची मॉरिस गाडी कंरकचून ब्रेक लावत माझ्या समोरच थांबली... ...
आणि गाडी चं दार उघडून मागच्या सीटवरनं अक्षरशः लाले लाल झालेली बाबाणी संतापानं फंणफंणत खाली उतरली... ... ...!!!
पाठोपाठ चिंताग्रस्त चेहर्‍याचे बाबाजीही उतरले... ...,"डॅफ्नी... ...अरी मारी बात तो सुन पेले... ..."
गाडी चा दरवाजा लाथेेनं मागच्या मागं च धांडदिशी लोंटून बंद करून बाबाजीं च्या हातातली चालायची सागवानी काठी हिसकावून घेत बाबाणी गरजली,"तूं बीचमॉं
बिल्कुल पडतो नथी अर्देसीर... ...ूँ हवे डिकराने सीधो करवा जई रही छूँ ... ...समझे तुम?"
आणि दात ओंठ चांवत हातातली कांठी सरसांवून माझ्याच दिशेनं यायला लागली...!!
आधीच सौ. इंदिराजी चं काय झालं असेल, म्हणून जीव कासांवीस झालेला, तश्यात बाबाणी चा तो तसला रुद्रावतार बघून माझी चड्डी सुटायचीच काय ती बाकी राहिली... ...!!
तशीच कांठी नाचवत माझ्यासमोर येऊन थेट दारासिंग च्या थाटांत उभी ठांकत बाबाणी गरजली,"तो आ धंदो जारी छे तमारो... ...शरम नथी आवती तमे?... ...नालायक... ...!!! "
मी चांचरलो," अरे बाबाणी... ...क्या हुआ क्या... ... ..."
बाबाणी हातातली काठी माझ्या तोंडासमोर नाचवत कडाडली,"पेले गाडीमॉं बेठ... ...सुना तू ने?... ...पेले गाडीमॉं बेठ... ...पछी चखाऊं तने मज्जानी बराबर...एक नंबरका बदमाश निकला तूं... ...चल..."    
आतां अर्देसीर बाबाजी मधे पडायला लागले,"डिग्गी... ...दिमाग सटक गयो केम तमा्रा?... ...पेले सुन तो डिकरा शूं कहे छे ... ..."
," चूप... ..." बाबाणी आतां बाबाजींवर पण डाफरली... ...
मग माझ्याकडं वळली,"चल... ...गाडीमॉं बेठ पेले...."
मी,"लेकिन बाबाणी... ..."
बाबाणी," गा ऽऽऽ डी ऽऽऽ मॉं  बे ऽऽऽ ठ... ...सुनाई नी आवे तने ?"
बाबाणी पुढं आतां तोंड उघडण्यात कांही राम नव्हता... ...
अधिक कांही बोलायला गेलो असतो, तर कदाचित तिनं हातातल्या काठी नं मला तसल्या भंर चंव्हाट्यावर सुद्धां बेदम संडकून काढायला कमी केलं नसतं, असला कांहीतरी 'महाबल्ल्या' झालेला दिसत होता एकूण... ...
मग ते हिन्दी सिनेमात शेंवटीं गुन्हेगार खलनायकाला पोलीस लोक जसा धक्के मारून जाळीच्या गाडीत कोंबून नेतात ना, थेट तश्याच थाटात बाबाणी नं मला बखोट धंरून फंरपटत नेत 'मॉरिस' मधल्या मागच्या सीटवर आदळला... ...आणि शेजारी बसत धाडदिशी दरवाजा आपटून बंद करत बाबाजी ना म्हणली,"चलो..."

बाबाणी ला तशी संतापानं फंणफंणलेली मी तोपर्यंत कधीच बघितलेली नव्हती... ...
आधीच इंदिराजींची चिंता खात होती...तंसल्या आगीत बाबाणीच्या भंडक्याची अजून भंर नको, म्हणून मी कपाळाला हात लावत गप्प च राहून खिकीतनं बाहेर बघायला लागलो... ... ...
वाडिया कॉलेजच्या चौकातनं यू टर्न मारून बाबाजी नी गाडी 'मोबोज्' च्या पार्किंग मध्ये नेऊन उभी केली...
मग पुन्हां एकदां बाबाणी नं माझी बखोटी धंरून मला गाडीतनं खाली उतरवला, आणि फंरपटत नेत कॅफे च्या ऑफिस केबिन चा दरवाजा धांडदिशी उघडून मला आत नेऊन कोचावर आदळला... ...
बघतो तर काय?
समोरच्याच कोचावर सौ. इंदिराजी मुसमुसत-थंरथंरत बसलेल्या... ...!!!
रडून रडून डोंळे लालबुंद झालेले, आणि चेहरा रड्यानं थंबथंबलेला... ... ...
आतां बाबाणी च्या आवाजाला विलक्षण धार चंढली,"

आ मारी बिटियाने रोती-बिलखती रास्तामाँ छोडे पछी

भागी गया तूं… ...केम ? शरम नथी आवती तमने ?…

... यू रास्कल… ...!!!... ...


आणि मग माझा एक शब्दही ऐकून न घेतां बाबाणी चंवताळून अशी काय माझ्यावर तुटून पडली, की साक्षात मुरारबाजीही परवडला म्हणायची वेळ ओंढवली माझ्यावर... ...
'चामडी लोळवणं' कश्याशी खातात, ते तेव्हां मला समजलं...अगदी पोंटभंर समजलं...!!!
सौ. इंदिराजी नां आतांपावेतों काय होऊन बसलं होतं, ते समजलेलं असावं... ...
अखेरीस त्यांनी जेव्हां मध्ये पडून बाबाणी ची समजूत काढली, तेव्हां कुठं बाबाणी च्या मुलुख मैदान चा धंडाका थांबला एकदाचा... ... ...
अधिक तपलिशात शिरणं उचित नाही... ...
अब्रू ची लक्तरं वेशीवर वाळत घालायला जाऊं नये म्हणतात... ...
झांकलेली सव्वा लाखाची मूठ झांकून राहिलेलीच बरी... ... ...!!!

झालं होतं असं, की सकाळी तो रोंरावत येणारा ट्रक जसा अंगावरच धांवून आला, तेव्हां घाबरून मी स्कूटर जी रस्त्याच्या बाजूच्या पट्टीवर घातली, आणि पुढं जायला वाटच राहिलेली नसल्यामुळं ब्रेक मारून थांबवली, ती योगायोगानं नेमकी 'मोबोज् कॅफे' च्या दारातच थांबली होती...
तिथं केक-कॉफी घ्यायला मी थांबलो, असं वाटून सौ. इंदिराजी चक्क गाडीवरनं उतरलेल्या होत्या... ...!!!
आणि अचानक गीअर टाकून मी पुढं निघून गेल्यावर त्या तरूण वयात त्यांचा धीर सुटून त्यांना जागच्याजागीं रडूं कोंसळलेलं होतं... ...
'मोबोज्' मधले सगळेच वेटर आम्हांला ओंळखत असल्यामुळं सौ. इंदिराजी नां तिथं तसल्या अवस्थेत बघून कुणीतरी ही बातमी बाबाणी ला जाऊन सांगितली... ...
आणि त्यामुळंच पुढचा सगळा 'महाबल्ल्या' होऊन बसलेला होता.... ....!!!
घरीं गेल्यावर जेव्हां हे सगळं रामायण-महाभारत सौ. इंदिराजीनीं मला सविस्तर सांगितलं, तेव्हां मी तंडकलो,"अहो गाडी मी ब्रेक मारून थांबवली, म्हणून तुम्ही अश्या आंचरटासारख्या कश्या काय उतरलात गाडीवरनं...ऑ?"
सौ. इंदिराजी मख्खपणे उत्तरल्या,"मी काय करू?...तुम्ही च 'मोबोज्' च्या दारात गाडी थांबवलीत, म्हणून मला वाटलं, की तिथं केक-कॉफी घेऊन मग च पुढं जायचंय नेहमीसारखं... ...म्हणून मी उतरले... ...तुम्हांला नेमकी ती च जागा सापडली काय गाडी कंचकन् ब्रेक मारून थांबवायला...ऑं?"
कसला कचाक् दिशी कमरेला हिसका बसला माझ्या माहीताय?... ...आतां हे अमृतांजन लावा इथं मुकाट ... ... आई आई गं....."  
सौ. इंदिराजी नी अमृतांजन ची कुपी माझ्या हातात थबाक् दिशी आपटली, आणि त्यांच्याकडं आवाक् होऊन बघत मग मी च कपाळाला हात लावला...!!!

बाबाणी चा संताप निवळलायला पुढं आंठवडाभर तरी लागला ... मग पुनश्च आमच्या गांठी-भेंटी पण होत राहिल्या... ...
नंतर १९७६ ते १९७८ ही दोन वर्षं नोकरी निमित्त मी सातार्‍याला बिर्‍हाड हलवलं, आणि बाबाजी-बाबाणी ची भेंट व्हायचे योग दुर्मिळ होत गेले.......
१९७८ सालीं टाटा मोटर्स मध्ये नोकरी पत्करून मी पुण्याला परतलो, आणि कायमचा स्थायिक झालो... ...
तेव्हां दिलावर खान मेकॅनिक कडून माझी बाबाणी ७६ सालच्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीं, आणि पाठोंपाठ बाबाजीं ७७ सालच्या गुढी पाडव्याच्या दिवशीं गेल्याचं समजलं, आणि डोंळ्यांत जमा झालेलं पाणी खळ्‌कन्‌ गालांवर ओंघळलं... ... ...
मी कांही प्रमाणात कां होई ना, पोरका झालेलो होतो... ... ...!!!
पण हे ही लक्ष्यात आलं, की अत्यंत शुभ अश्या वर्षातल्या दोन पाडव्यांच्या दिवशीच देवाज्ञा प्राप्त व्हायचं भाग्य लाभलेलं हे असं मी उभ्या हयातीत बघितलेलं एकमेव सात्त्विक दांपत्य होतं... ... ...  

'कालाय तस्मै न नमः' च्या न्यायानं त्यानंतर वर्षभरातच कॅंप मधल्या मेन स्ट्रीट वरचं बाबाजी-बाबाणी चं पोरकं झालेलं बन्द घर रस्ता रुन्दीकरणांत नामशेष झालं... ...
आणि मग आमचं मेन स्ट्रीट वर जाणं-येणं ही हळूं हळूं कमी कमी होत गेलं... ... ...
कधी कधी चिंतनमग्न असतांना बाबाणी च्या आंठवणी नं मनांत कालवाकालव व्हायची... ... ...
पण कांही काळानं परत एकदां असाच कसलातरी 'महाबल्ल्या' झाल्यावर सौ. इंदिराजी जेव्हां तिरीमिरीला येऊन माझ्यावर तुटून पडल्या...
तेव्हां कुठं मला उमगलं, की बाबाणी मला पोरका सोडून मुळीच गायब झालेली नव्हती... ...
तर वर जातांना हातातला सोटा कायमचा सौ. इंदिराजींच्या हवाली करून गेलेली होती... ... ...!!!
मला वाटतं सौ. इंदिराजींचा तडाखेबन्द संसार बघून वर स्वर्गात आजही बाबाणी बाबाजी ना सांगत असेल,"ओ अर्देसीर... ...देख देख... ...बहू केसी कडी जनरमॉं सम्हाले छे आपडो डिकरानूं... ...
मग खाली बघून मला म्हणत असेल,"बदमाश... ...तने शूं लाग्यो... ...के बाबाणी छोड गयी तने अकेले... ...केम?... ...यू ईडियट्... ... ...!!! "

," तर मित्रहो, तात्पर्य हे, की बाबाणी मला पोरका करून कुठंही गायब झालेली नाही... ...
माझ्या तहहयात सडपातळ अंगकाठीचं रहस्य हे असं आहे.....!!!
केम?... ...अब आव्यो लफडो समझमॉं ? "

*****************************************************************************************
-- रविशंकर.
१ मार्च २०२१.

 




No comments:

Post a Comment