Search This Blog

Wednesday 24 February 2021

॥ स्टार्ट अप ॥

 

॥ स्टार्ट अप

 

 
सर नमस्कार करतो...आशीर्वाद द्या...परीक्षेत उत्तीर्ण झालो...हे पेढे सर..."
एम. ई. ( इलेक्ट्रॉनिक्स्‌ ) ची पदवी नुकतीच मिळवलेला पुण्यातल्या एम. आय. टी. महाविद्यालयातला माझा आवडता विद्यार्थी चि. नरेन्द्र भडकमकर माझ्या हातांत पेढ्यांचा भलामोठ्ठा पुडा देत मला नमस्कार करायला खाली वांकला... ...
मी आनंदलो," अरे वा...छान...किती टक्केवारी गांठीला लावलीस तूं?.."
नन्दू,"यश तर तुमचं आहे सर... ...प्रथम मानांकन मिळालंय्‌... ... ..."
मी," शाब्बास रे पठ्ठे... ...पण हे उज्ज्वल यश तर तूं च खेंचून आणलंय्‌स ना?... ...माझा काय संबंध त्यात?"
नन्दू,"नाही कसा सर? तुम्ही इरेला पडून घण मारत आजपावेतों जे कांही डोंक्यात ठाकून-ठोंकून बसवलंय त्याचं यश आहे हे... ..."
मी," असं नसतं नंदू... ...मी फक्त द्यायचं काम केलं... ...पण ते तर सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत केलं...खरं की नाही ?"
नन्दू,"ते खरं आहे सर...पण... ..."
मी उत्तरलो," असल्या बाबतीत पण -बीण ला कांही अर्थ नसतो नन्दू... ...मी जे कांही देत आलो, ते सगळ्या विद्यार्थ्यांना सारखंच देत आलो... ...भेंदभाव न करतां........ पण ते पंचवून त्याचं हे असं लखलखणारं सोनं करून दाखवायची कर्तबगारी तर तुझीच आहे ना ?... ...काय?"
नन्दू," आई ला तर आभाळ ठेंगणं झालंय बघा सर... ...काल निकाल हातात पडला, तेव्हां तिनंच मला हा असा पिटाळलाय... पहिले तुम्हांलाच पेढे द्यायला... ...आणि उद्यां सकाळीं 'सहकाकू 'आमच्या घरीं भोजनाला आवर्जून यायचं आमन्त्रण पण दिलंय... ...याल ना सर?"
नन्दू ला मग ," अरे ' याल ना सर? ' काय नन्दू... ...नक्की येईन अगदी... ...आतां झालं ना समाधान?... ...'समृद्धो भंव' असा थेट आमच्या टिकेकर मास्तरांच्या थाटात आशीर्वाद देत मी सौ. इंदिराजीनां त्याचं कौतुक करायला बाहेर बोलावत हांक मारली.....     
२००९ सालातल्या जून महिन्याचे ते दिवस होते...
अभियान्त्रिकीच्या परिक्षांचे निकाल नुकतेच लागलेले होते...
माझ्या या चतुरस्र बुद्धिमान कर्तबगार विद्यार्थ्याचं ते देखणं यश नकळतच अभिमानाचा एक रोमांच अंगावर उमटवून गेलं... ...

सौ. इंदिराजी स्वयंपाकघरातनं फडक्याला हात पुसत बाहेर आल्या... ...त्यांचा चेहरा कौतुकानं उजळलेला होता,"काय म्हणतोय्‌
रे नन्दू?...अरे वा...वा...वा...मीलन [ चिरंजीव ] ची गादी पुढं चालवलीस म्हणायची तर... ...यशस्वी भंव...बस हं जरा...ह्यांच्या नाष्ट्याची वे झालेलीच आहे, तेव्हां तुला नाष्टा केल्याशिवाय कशी सोडेन मी?... ...काय?"
नन्दू," काकू...आज बर्‍याच घरीं जायची गडबड आहे...अजून अंघोळही उरकलेली नाही माझी... ...आई नं हा असाच भल्या सकाळी सकाळी इकडं पिटाळलाय मला... ...तेव्हां..."
मी,"बाबा रे...बस असा इथं समोर... ...तुला माहीत आहे ना... ...की आख्ख्या भारतात आजतागायत इंदिराजींपुढं कुणाचं तरी, कांही तरी, कधी तरी चाललंय काय ?... ...ऑं?"
नन्दू," हीः हीः हीः हीः ... ... काय हे सर...? काकूं ची कळ काढताय्‌ काय?"
आमच्या पुढ्यात साबुदाणा खिचडी च्या बश्या आदळत सौ. इंदिराजी तंडकल्या," तुला माहीत नाही काय नन्दू?...ह्यां ना जे मानसन्मान मिळालेत ना आजवर...ते बायको च्या कळा काढण्याच्या विद्येत जगात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल... अभियांत्रिकी गाजवली म्हणून नव्हे...!!... ...समजलं?...ही गुरूची विद्या मात्र ह्यां च्याकडून उचलूं नकोस बरं कां... ...नाहीतर... ... ..."
नन्दू," नाहीतर...काय काकू?"
सौ. इंदिराही नी आतां नन्दू च्या 'हीः हीः हीः हीः' चं पण श्राद्ध घातलं," म्हणजे असं की पुढं जर मारकुटी बायको तुझ्या पदरात पडली, तर हाडं सैल व्हायची तुझी...!!! म्हणून म्हटलं...काय?"
मी मग विषय बदलला," हं... ...मारा ताव आतां नाष्ट्यावर नरेन्द्रजी...आज मीही तसा मोकळाच आहे...तेव्हां नाष्टा येईतोंवर गप्पा मारूं जरा...नंतर मला एका बैठकीसाठी तुझ्या घरावरनंच पुढं जायचं आहे... ...तेव्हां कांही चिंता करूं नको... ...मी च तुला गाडीतनं घरीं पोंचवतो... ...ठीक?"
सौ. इंदिराजी फिस्कारल्या," ह्यां च्या खंवचटपणाकडं अजिबात लक्ष देऊं नको नन्दू... ...कडू काकडी खाल्ली आहेस ना कधीतरी?... ...काय?"
नन्दू कपाळाला हात लावून फिसफिसत दिवाणखान्यातल्या माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला, आणि सौ. इंदिराजी चितपट झालेल्या माझ्याकडं ढुंकूनही न बघतां पुनश्च स्वयंपाकघरांत खंणकावून चालत्या झाल्या... ...!!!"

मला विलक्षण गम्मत वाटली, अन्‌ स्वतःचंच नवलही वाटलं...
गम्मत ही, की माझे आद्यगुरु श्री. टिकेकर मास्तरांच्याच भूमिकेत मी नकळत कां होई ना, आगाऊपणानं शिरल्याची... ...
आणि नवल याचं, की मास्तर मला आयुष्यभंर जो आशीर्वाद देत आले होते, नेमका तो
आशीर्वाद तश्याच शब्दांत द्यायला अंगीं असावी लागणारी मास्तरांची योग्यता माझ्यात कुठं होती?
उचलली जीभ नकळतच टाळ्याला लागलेली होती...!!!

मी,"बस नन्दू आरामांत... ...तुझे आई-बाबा खूष असतील ना अगदी?... ...बरे आहेत ना ते दोघं ? "
नन्दू,"आई ला तर आभाळ ठेंगणं झालंय सर... ..."
मी," अरे मग आश्चर्य काय त्यात?... ...तसंच असतं ते..."
इतक्यात सौ. इंदिराजी चहाचे कप घेऊन बाहेर आल्या...
मी चक्रावलो," अहो..."
सौ. इंदिराजी,"..........काय ?"
मी,"अहो तुम्ही आज इडली-चटणी चा घाट घालणार होतात ना?... ...मऽऽऽऽऽऽ ग?"
सौ. इंदिराजी नी नन्दू कडं बोंट दाखवत मघांचच्या खंवचटपणाचं उट्टं काढलं,"मैदान 'ह्या' नं मारलंय, की तुम्ही?... ...त्याला आवडते म्हणून खिचडी केलीय...समजलं?"
मी चितपट अवस्थेत मुकाट्यानं खिचडी गिळायला लागलो... ...!!.... ... ...," मग नन्दू?... ...पुढं काय करायचा विचार आहे तुझा आता?"
नन्दू,"खिचडी मस्त झालीय काकू... ...काय म्हणालांत सर तुम्ही?"
मी,"मी विचारलं, की पुढं काय करायचा विचार आहे तुझा?... ...म्हणजे...पी. एच. डी. करून मग संशोधन क्षेत्र वगैरे, की दुसरं कांही?"
नन्दू," नाही सर...एम्‌. बी. ए. करून पुढं ' बिझिनेस स्टार्ट अप ' शिकायला जावं म्हणतोय्‌..."
सौ. इंदिराजी पंचकल्या," व्वा..छान छान... ... बरं झालं...गुरू ची गादी पुढं चालवायचा विचार करत नाहीयेस ते...!!!"
मी सौ. इंदिराजीं कडं दुर्लक्ष करीत नन्दू ला विचारलं," आणि ' बिझिनेस स्टार्टप ' शिकायला कुठं जायचा विचार आहे तुझा?"
नन्दू," सर ' यू. एस.' ला जाऊन स्टार्टप शिकावा म्हणतोय्‌... ...म्हणून पासपोर्ट पण काढून ठेवलाय् गेल्या महिन्यात... ..."
मी," हात् तुझी... ...' यू. एस. ' ला? आणि स्टार्ट अप शिकायला?..."
नन्दू चंमकला," कां ?... ...त्यात काय झालं सर?"
मी," अरे हे म्हणजे शेतकी शिकायला सहारा वाळवंटात जाण्याइतकं विचित्र झालं..."
नन्दू," म्हणजे काय सर?... ... सगळेच स्टार्टप शिकायला यू. एस. लाच तर जातात हल्ली..."
मी," सगळे करतात ते बरोबर आणि हिताचं असतंच असं नाही नन्दू... ...अरे अमेरिकन माणूस हा वृत्तीनं मुळात ऐष आरामी अन्‌ मुलुखाचा ऐदू... ...त्याच्याकडून कसला काय डोंबलाचा ' बिझिनेस स्टार्ट अप ' ऊर्फ श्रीगणेशा शिकायला मिळणाराय् तुला ऑ?...भणंगपणा आणि चंगळबाजी शिकून येशील फक्त... ..."
नन्दू चा चेहरा जरा हिरमुसलाच," मग?.......कुठं जावं म्हणताय सर ' स्टार्ट अप्‌ ' शिकायला? "
मी," चीन ला जा तूं... ...तिथं तुला जसा 'बिझिनेस स्टार्ट अप ' प्रात्यक्षिकांसह शिकायला मिळेल, तसा जगात कुठंच शिकायला मिळणार नाही...चिनी लोकांइतके डोकेबाज-कल्पक लोक जगात कुठंच नसतील... ..."
नन्दू," काय सांगताय सर... ...माप काढताय काय माझं...ऑं? "   
मी उत्तरलो," अरे बाबा...माप-बीप कांही काढत नाहीय मी तुझं... ...वास्तव सांगतोय तुला... ..."
नन्दू आतां मात्र सोफ्यावर जरासा पुढं सरसावून बसला," ते कसं काय सर?"

मी," हे असं मी तुला कां सांगतोय्, त्यामागचं कारणही सांगतो तुला .. ...त्याला तत्त्वज्ञानात ' नकारात्मक खात्रीकरण ' ऊर्फ  ' निगेटीव्ह कन्फर्मेशन ' असं म्हणतात... ...

हे कायम ध्यानांत ठेंव, की आयुष्यात माणसाला कुठल्याही बाबतीत काय करायचं हे ठाऊक नसलं किंवा समजलेलं नसलं, तरी माणसाचं कांहीही बिघडत नाही...ते अनुभवांतनं पुढं कधी ना कधी समजतंच... ...पण काय करायचं नाही, हे मात्र ठामपणे समजलेलं असावंच लागतं, नाहीतर चुकीचे निर्णय घेऊन माणूस नको तें करून बसतो... ...आणि केलेल्या चुका कपाळाला हात लावून कधी कधी उर्वरित आयुष्यभंर सुद्धां निस्तरत बसायची वेळ त्याच्यावर हटकून ओंढवते... ... ...

आतां असं बघ नन्दू... स्टार्ट अप किंवा आपल्या मराठीत ज्याला ' उद्योजकतेचा श्रीगणेशा ' असं म्हणतात, तो शिकणं याचा अर्थ तुटपुंजी संसाधनं, अपुरं आर्थिक पाठबळ आणि प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर घेत स्वतःच्या कल्पकतेनं आणि अक्कलहुषारीनं शून्यातनं स्वतःचा उद्योग उभा करणं आणि तो चिवटपणानं भंरभंराटीला आणणं... ...बरोबर की नाही? "
नन्दू उत्तरला,"  बरोबर आहे सर... ..."
मग नन्दू ला थोडंसं विस्तारानं समजावलं," अरे माणसाची कल्पकता ही अश्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करतांनाच खर्‍या अर्थानं कसाला लागते आणि झंळाळूनही उठते... ...चीन, तैवान, दक्षिण कोरिया, जपान, हॉंग कॉंग... ...इकडं कुठंही जा... ...अश्या पौर्वात्य देशातच तुला असले जातिवन्त भन्नाट उद्योजक बघायला मिळतील... ...फार काय ... ...तुमच्या भाषेत च सांगायचं तर ' स्टार्ट अप्‌ गुरू  ' खुद्द इथं आपल्या भारतात सुद्धां तुला ढिगानं बघायला मिळतील, ... ...सुखासीन-खुशालचेंडू अमेरिकेत नव्हे...समजलं? "
नन्दू च्या कपाळाला किंचित आंठ्या पडल्या," पण सर...माझे सगळे मित्र तर स्टार्ट अप शिकायला ' यू. एस.' ला च जाताय्‌त... ... ते कसं काय? "
मग नन्दू ला थोडंसं विस्तारानं समजावलं," ठार वेडेपणा चाललाय सगळा तो... ...मला सांग नन्दू... ...वॉल मार्ट जो माल जगभंर विकतं, त्यातला जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्ष्यांही ज्यास्त माल मी मघांशी सांगितलेल्या देशांतनंच तर आयात करतात ना ते?...अगदी लहान मुलांच्या खेंळण्यांपासून ते तुमच्या 'लॅप्पी-मोबी' पर्यंत सगळंच आलं की त्यात... ...होय ना? खुद्द 'यू. एस.' मध्ये यातलं काय बनवलं जातं?... ... अठरा ट्रिलियन डॉलर्स चा कर्जाचा डोंगर उगीच झालाय काय डोंक्यावर त्यांच्या?"
नन्दू," पटतंय सर तुमचं मला... ..."
मी," आतां चीन-जपान ला कधी जायचं असेल तेव्हां जा खुशाल तूं... ...पण अस्सल स्टार्ट अप कसा असतो, ते इथंच तुला दाखवतो मी जमलं तर...!! ...बघायचंय?"
नन्दू उडालाच," काय सांगताय्‌ काय सर?... ...इथं म्हणजे... ...इथं पुण्यात?"
मी," होय इथं पुण्यातच दाखवतो तुला........ योग जुळलेले असतील तर... ...तेही तुला घरीं पोंचवायच्या आंत !!!... ...काय?"
नन्दू नं आतां टुण्ण् दिशी उडीच मारली," चला चला सर... ...लवकर निघूं या"

नन्दू नं मग पुन्हां निरोप द्यायला बाहेर आलेल्या ' इंदिरा काकू ' ना वांकून नमस्कार केला... ...बराय काकू...येतो मी... ...पण ते उद्याचं..."
,"अरे येईन मी अगदी नक्की... ...असं म्हणत सौ. इंदिराजी नी त्याला निरोपाचा हिसका दाखवलाच," आतां ह्यां नी डोंक्यात भंरवून दिल्याप्रमाणं उद्यां चीन-जपान नाहीतर आणखी कुठं गेलास, तर पार्श्वभागाला हात पुसून जाऊं नकोस म्हणजे झालं... ..."
नन्दू ला कांही कळलं नाही,"म्हणजे काय काकू?... ...मला नाही समजलं... ..."
सौ. इंदिराजी,"अरे, म्हणजे परदेशात गेल्यावर आपला देश-आपली संस्कृति आणि विशेषतः इथली आपली माणसं वगैरे - विसरूं नकोस असं म्हटलं मी... ..."
नन्दू,"ते कसं शक्य आहे काकू?"
सौ. इंदिराजी नी नन्दू ला चितपट लोळवला,"अरे तूं मघांशी जे अमेरिकेला स्टार्ट अप्‌ शिकायला जाणारे मित्र असलं कांहीतरी ह्यां ना सांगत होतास ना... ...त्यातल्या नव्वद टक्के महाभागांना तिकडं गेल्यानंतर एखाद्या वर्षभरात स्वतःची मातृभाषाही धडपणे बोलतां येत नाही... ...कोण जाणे...दोनचार वर्षांत कदाचित इथल्या जन्मदात्यांना सुद्धां विसरून जात असतील तीं... ...काय?...तेव्हां तूं तसला कांही आंचरटपणा करूं नयेस म्हणून बजावतेय्‌ तुला... ...कळलं?"
नन्दू तसा आमचं जाणं येणं असलेल्या परिचित कुटुंबातलाच...तो ही बेरकीच...म्हणाला," काकू...एक विचारूं ?"
सौ. इंदिराजी ची दाण्डी उडाली,"हो... ...विचार की खुश्शाल..."
नन्दू," म्हणजे त्याचं काय आहे काकू... ..."
सौ. इंदिराजी,"काय आहे त्याचं?... ...अं?"
नन्दू,"म्हणजे असं बघा काकू... ....की सर हे असे... ...आणि तुम्ही ह्या अश्या... ..."
सौ. इंदिराजी,"म्हणजे?... ...काय म्हणायचं आहे तुला?"
नन्दू साळसूद चेहरा करून म्हणाला,"मला असं म्हणायचं होतं, की सरांचा तुमच्यापुढं कसा काय टिकाव लागला आजपर्यंत? "
सौ. इंदिराजी बश्याएव्हढे डोळे वटारून कपाळाला हात लावत नन्दू कडं बघायला लागल्या... ...
मला पोंटात खंदखंदणारं 'फी: फी: फी:' कांही आंवरतां येई ना... ... ...
आणि सौ. इंदिराजी भानावर यायच्या आत मी आणि नन्दू नं सोसायटीच्या वाहनतळाकडं पळ काढला... ...!!!

गाडी गीअर मध्ये घालून मी डेक्कन जिमखान्याच्या दिशेत वळवली.
आतांपावेतों घड्याळात साडे अकरा वाजत आलेले होते... ...
डोंक्यात विचार घोळत हा होता, की या वेळीं बंड गार्डनमधल्या कट्ट्यावर 'ली-वेण्डी' ची जोडगोळी सापडेल काय?
ही ' ली आणि वेण्डी चॅंग ' ची जोडगोळी मूळची हॉंगकॉंग देशाची नागरिक... ...ली असेल अदमासे पंचविशीचा आणि वेण्डी साधारण विशीतली...
नव्वदी च्या दशकांत ही जोडी मायदेश सोडून नशीब अजमावयला मुंबईत येऊन थंडकली.... ...
मग कांही काळ मरीन ड्राईव्ह च्या समुद्र किनार्‍यावर कधी फळांची गाडी लाव, कधी खेळण्यांची पथारी टाक, कधी चहा-बिस्किटाची टपरी भाड्यानं घेऊन चालव, असले सटर फटर उद्योग केल्यावर मग मुंबईच्या हॉंगकॉंग सारख्याच गर्दी-रेंटारेंटी ला कंटाळून ह्या जोडी नं पुणं गाठलं, आणि पुण्यातल्या निवान्त वातवरणात अस्सल पुणेरी खंवचट वृत्तीला टक्कर देत, ही जोडगोळी अखेर पुण्यात स्थिरावली... ... ...
दोघे रूढार्थानं कितपत शिकली-संवरलेली होती कोण जाणे... ...पण अंगची बुद्धिमत्ता-कल्पकता-कष्टाळूपणा-आणि कुणालाही आपलंसं करण्याची जन्मजात अवगत असलेली मिठ्ठास गप्पिष्ट वृत्ती, या अंगभूत गुणांच्या जोरावर त्यांनी पुढच्या दहा पंधरा वर्षांत पुण्यात चांगला जम बसवला, आणि कॅंपातल्या मेन स्ट्रीट वर एक छोटसं इलेक्ट्रॉनिक चिनी वस्तूं आणि कृत्रिम फुलांचं दुकानही थाटलेलं होतं.
दोघांनाही कल्पकता, आणि कला-कौशल्यं अवगत असल्यामुळं ' ली-वेण्डी 'चं कॅंपातलं दुकान अगदी छान चाललेलं होतं... ... ...
तरीही शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशीं सकाळच्या वेळांत दुकान बंद ठेंवून ही जोडी बंड गार्डनच्या वाहनतळावरच्या एका रसवन्तीच्या गुर्‍हाळालगत दुकानातल्या मालाची टपरी लावून बसलेली असायची... ...
जेवणाची वेळ झाली, की तिथल्याच एखाद्या ठेल्यावर उदरभंरण करून मग जे दुकानाकडं सुटायचं, ते थेट रात्रीं दहा साडेदहापर्यंत, असा या जोडगोळीचा कार्यक्रम असे.
तात्पर्य, बंड गार्डन नं सुरुवातीच्या काळांत दिलेला आधार आणि प्रेम ' ली-वेण्डी ' विसरलेले नव्हते... ...
त्यांच्यातल्या या जगावेगळेपणामुळंच आमची ओंळख-पाळख झालेली होती... ...
ली-वेण्डी च्या बंडगार्डन वरच्या टपरीत त्यांच्या हस्तकलांचे अनेकविध सुंदर आविष्कार बघायला मिळायचे...
त्यांच्या अंगभूत पात्रतेमुळं आमच्या सौ. इंदिराजी ना या जोडीबद्दल विलक्षण आपुलकी... ...बंड गार्डन किंवा मेन स्ट्रीट वर कधी आम्ही फिरायला गेलो, आणि या ' ली-वेण्डी ' चा अगत्याचा चहा, किंवा उसा-फळां
चा रस घेतला नाही, असं क्वचितच घडलं असेल. त्यांनी बनवलेला एखादातरी रंगीबेरंघी फुलांचा गुच्छ सौ. इंदिराजीनी खरेदी केला नाही असं सहसा व्हायचं नाही.
तसं बघायला गेलं, तर ह्या ' ली-वेण्डी ' दुक्कलीची मातृभाषा हान. पण स्थलांतरणानंतर सुरुवातीची कांही वर्षं मुंबईत काढल्यामुळं दोघेही उत्तम हिन्दी भाषा बोलायचे.
पुढची सगळीच हयात पुण्यात काढून त्यांनी मराठी बोलीही यथासांग हस्तगत केलेली होती... ...अगदी घार्‍या-गोर्‍या पुणेरी भटांइतकी वरणभाताची नाही म्हणतां येणार, पण अस्खलित मराठी म्हणतां येईल इतपत नक्कीच... ...


रविवार साप्ताहिक सुट्टी चा दिवस असल्यानं हे दोघे तिथंच सापडायची बरीच शक्यता होती...इतक्यात नन्दू नं मौनभंग करीत मला विचारलं," सर कुठं चाललोय आपण?"

मी," अ?... ...काय म्हणालास तूं ?
नन्दू,"सर... ...मी विचारलं की कुठं चाललोय आपपण आत्तां?"
मी,"हे काय विचारणं झालं नन्दू?... ...अरे तुझ्या घरींच तर चाललोय ना आपण?...तुला घरीं सोडून मी पुढं कोरेगाव पार्क परिसरात एका बैठकीसठी जाणार आहे... ...विसरलास काय?"
नन्दू," तसं नाही सर... ...पण ते स्टार्ट अप् चं तुम्ही मघांशी कांहीतरी म्हणाला होतात ना?... ...मला वाटलं की... ..."
मी," बघूं या...तुझं नशीब जोरावर असेल, तर जातां जातां ते पण होऊन जाईल..."
नन्दू," म्हणजे काय सर?... ..."
मी," जरा दम काढ थोडासा... ...समजेल तुला सगळं... ..."
नन्दू खिडकीतनं
दिसणार्‍या संगम पुलाखालनं वाहणार्‍या  मुठा नदीच्या च्या पात्राकडं बघत गप्प झाला... ...
गाडी आर. टी. ओ. कार्यालयाला वळसा घालून रुबी हॉल वरनं पुढं काढीत मी बंड गार्डन च्या वाहन तळासमोर नेऊन उभी केली...
रविवार असल्यामुळं सकाळी पोराटोरांना बण्ड गार्डनवर खेळवायला घेऊन आलेल्या कुटुंबांची बागेत गर्दी उसळलेली होती.
वाहनतळ गाड्यांनी खंचाखंच भंरलेला होता...
बागेतल्या घसरगुण्ड्या-झोंपाळ्यावर बाळ-गोपाळांचा कल्ला चाललेला होता... ...
भेळ-पुरी, चाट-शहाळी, आईस्क्रीम-लुल्फी, फुगेवाले-खेळणीवाल्यांच्या गाड्या गिर्‍हाइकांच्या गराड्यात बुडून गेलेल्या होत्या
दुपारचे जेमतेम पावणे बारा वाजत आलेले होते, म्हणजे ली-वेण्डी इथंच कुठतरी असायला हवेत... ...कुठं असतील बरं? अश्या विचारात माझी नजर  सभोंवालताच्या गर्दीवर भिरभिरत होती... ...
आणि अचानक माझ्या कानांवर वेण्डी ची गोड हांक पडली,"अरे साब... ...आप?... ...गुड् मॉर्निंग सर... ...आज यहॉं कैसे आप इस वखत?... ...और मॅडम कहॉ है ? (नन्दू कडं बोंट दाखवत)...आपके छोटे साहब क्या?"
मी नन्दू कडं बोट दाखवत उत्तरलो," ऐसेही समझो वेण्डी... ...गुड् मॉर्निंग...ये साहबजादे को घर छोडने जा रहा था कोरेगाव पार्क... ...सोचा की जाते जाते तुम दोनों को भी मिल लूं... ...  लेकिन तुम अकेली कैसी आयी हो इधर?... ...और ली कहॉं गायब हो गया? " असं म्हणत नन्दू ला गाडीतनं उतरायची खूण करीत मीही खाली उतरलो... ...
समोर सूर्यफुलासारख्या टंवटंवीत प्रसन्न चेहर्‍याची वेण्डी खांद्यांवरचे दोन आख्खे ऊंस आणि पाठीला लंटकवलेली बांबूची टोपली सांवरत उभी होती... ...
मी तिच्या खांद्यावरच्या उसांकडं निर्देश करीत विचारलं,"ये आज कैसा एकदम नया नजारा बनाके रख्खी हो वेण्डी?"
वेण्डी," क्या करे साब...अभी खाना खाने का टाईम हो गया है ना?"
मी,"तो ये तुम्हारा आजका भोजन का मेनू है क्या?... ...कमाल है..."
वेण्डी,"हॉं साब... ...निकलनेसे पहले थोडे फूल भी बेचने है ना?... ...इसलिये... ...आइये चलिये ना साब... ...वो सामनेवाली रसवन्ती के नजदीक मेरी राह देखते ली खडा है...बहुत खुष होगा आपको मिलके... ...चलिये ना साब..."
मी नन्दू ला 'चला' म्हणून इशारा करीत चालायला लागलो... ...
नन्दू बुचकळ्यात पडून विचारता झाला
... ... ," सर कुठं चाललोय आपण आतां?...घरीं जायचंय ना आपल्याला?"
मी उत्तरलो," तुझं नशीब जोरावर दिसतंय आज बेट्या... ...' अस्सल स्टार्ट अप ' बघायचा होता ना तुला कसा असतो
तो ?... ...चल दाखवतो..."
इतकं बोलून मी वेण्डीसोबत रसवन्ती गृहाकडं चालायला लागलो... ...पाठीमागनं नन्दू फंरपटत निघाला..."
आम्हांला बघतांच रसवन्ती च्या मेजावर बसलेला ली उठून धांवत सामोरा आला," अरे साब...आप?... ...नमस्ते...नमस्ते...कहिए साब... ...थोडासा गन्ने का जूस इस गरीब की तरफसे?... ...चलेगा?... ...इंदिराजी मेमसाब को कहॉं छोड के आये आप?... ...और साथमे ये आपके छोटे साहब है क्या?... ...नमस्ते छोटे साहब... ...आइये आइये...बैठिये... ..."
आम्ही चौघे समोरच्या मेजाभोंवती स्तानापन्न झालो... ...आणि ली नं गुर्‍हाळवाल्याला दोन बोटं वर करीत ," ओ अब्दुलमामू... ...दो फुल्ल " म्हणत उसाच्या रसाची ऑर्डर दिली...

नन्दू माझ्याकडं बघायला लागला, आणि मी ली ला विचारलं,"ये तुम्हारा ' दो फुल्ल मामू ' का मामला क्या है ली? खुद भूखे रहो, और हमे पिलाओ गन्ने का ज्यूस... ...बहोत अच्छे..."
मग कांखोटीतल्या दोन उसांकडं निर्देश करत वेण्डी च बोलली,"अरे ऐसा कैसे हो सकता है साब? हम है ना आपको कंपनी देने के लिए... ..."
ली मग त्याच्या खांद्याला लटकवलेल्या पोतडीकडं बोंट दाखवत म्हणाला," वो क्या है ना साब... ...अभी हम दोनों को लंच निपटके, थोडाबहुत धंदा करके भागना है दुकानकी ओर... ...
और हम लोगोंको ऐसे गिलास से ज्यूस पीनेकी
आदत तो है नही... ...हम को तो गन्ना चबाके निगलने में ज्यूस का असली मजा आता है... ...आप लोग यहॉं आराम से ज्यूस लीजिये साब... ...हम लोग यही सामने बैठे है ना पथारी पर आपके साथ ...क्या?... ...ये सामान सम्हालते चारपाई पर बैठके तो ज्यूस नही पी सकते है ना?... ...इसलिये...अरे मामू.... ...ज्यूस के पैसे मेरे खाते मे है... ...साब से मत लेना..."
इतकं बोलून ली-वेण्डी
ची जोडगोळी गुर्‍हाळाच्या दारालगत पसरलेल्या पथारीवर जाऊन बसली...

मी नन्दू ला म्हटलं,"हं... ...नरेन्द्रजी... ...करा सुरूं..."
नन्दू," सर...पण तुम्ही ते स्टार्ट अप चं कांहीतरी म्हणत होतां ना... ..."
मी उत्तरलो," तुझं प्रशिक्षण कधीच सुरूं झालंय नन्दू... ...लक्ष्यात नाही आलं तुझ्या?"
नन्दू गडबडला,"तुम्ही काय सांगताय ते कांहीच कळे ना झालंय सर... ...मी..."
मी त्याला मध्येच तोंडत म्हटलं," ती समोरची जोडगोळी आतां काय काय करते
तिकडं नजर रोंखून ठेंव, आणि मी जी कॉमेण्ट्री करतोय तिकडं नीट कान दे...एक तासाभरात तुझं ' बिझिनेस स्टार्ट अप ' मधलं ' सुपर एम्. बी. ए.' चं प्रशिक्षण पूर्ण होणाराय !!... ...काय?"
आम्ही मग समोरच्या मेजावर मामू नं आणून ठेंवलेले ' गन्ने का ज्यूस ' चे पेले तोंडाला लावले, आणि ली-वेण्डी चे उद्योग न्याहाळायला लागलो... ... ...
आतांपावेतों ली नं पोतडीतल्या धांरदार सुरी नं दोन्ही उसांची सालपटं तासून जवळच्या बांबू च्या टोपलीत नीटपणे जमा करून ठेंव
लेली होती, आणि जोडी पांढरे धप्प झालेले ऊस मजेत दातांनी सोलटत ' सूं सूं ' असा मजेशीर आवाज करीत फस्त करत होती... ...
मी कॉमेण्ट्री सुरूं केली," हं...तर नन्दू... ...समोर जे कांही चाललंय ना, तो एकेकाळीं ह्या ' ली-वेण्डी ' जोडगोळी चा , ' बिझिनेस स्टार्ट अप ' होता ... ...आलं ध्यानांत?"
नन्दू अजूनही बांवचळलेलाच होता...कपाळाला हात लावत तो म्हणाला,"तुमची ही आयडिया कांही कळत नाहीय सर मला... ..."
मी," नुस्ता बघत-ऐकत रहा तूं... ...सगळं कळेल तुला... तुमच्या फॅशनेबल ' एम. बी. ए. ' च्या च भाषेत सांगतो... ... म्हणजे सोपं होईल... ...चालेल?"
नन्दू आतां खुर्चीत जरा पुढं सरसावून बसला... ...
मी," आतां समोर जे कांही चाललंय... ...त्याच्या प्रोजेक्ट रिपोर्ट चा खर्च किती?"
नन्दू,"कसला काय प्रोजेक्ट रिपोर्ट सर?...फिरकी घेताय काय?"
मी," अजिबात नाही...प्रोजेक्ट रिपोर्ट च नाही...त्यासाठी कन्सल्टण्ट ही नाही... ...म्हणजे खर्च किती आला?"
नन्दू ला आतां गम्मत वाटायला लागली,"खर्च कांहीच नाही की सर... ..."
मी," म्हणजे ' प्रोजेक्ट रिपोर्ट कॉस्ट ' शून्य रुपये शून्य पैसे...बरोबर?"
नन्दू," हीः हीः हीः हीः... ...बरोब्बर सर... ..."
मी,"बिझिनेस साठी बॅंक लोन किती घेतलंय?... ...ते ही शून्य रुपये शून्य पैसे... ...होय की नाही?"
नन्दू,"खरंच की सर... ...बॅंक लोन
ही कांहीच नाही... ...म्हणजेच शून्य रुपये शून्य पैसे..."
हळूं हळूं त्यातली गम्मत आतां नन्दू च्या ध्यानांत यायला लागली... ... ...     
आतांपावेतों ली-वेण्डी नं उसांवर पोंटभर तांव मारून ढेंकराही दिलेल्या होत्या... ...
आतां वेण्डी नं उसांचे चंघळून झालेले चोथे गोळा करून जवळच्या कचरा टोपलीत नेऊन टाकले, आणि परत येऊन तिनं पथारीवर बसत मघां
शी टोंपलीत ठेंवलेली उसांची सालपटं बाहेर काढली, आणि जवळच्या सुरी नं त्यांची पांठीकडची तपकिरी रंगाची साल तांसून ती आंतल्या बाजूसारखी पांढरी सफेद करून ते ली कडं फेंकाय्ला लागली, आणि ली त्या पट्ट्यांचे वीत-वीतभर लांबीचे एकसारखे तुकडे कापून ते पुन्हां टोपलीत भंरायला लागला...!!"
नन्दू,"हे आतां काय चाललंय सर त्यांचं?"
मी," त्याला 'प्रॉडक्शन लाईनवरचा इनिशियल कटिंग-स्केलिंग बूथ ' असं म्हणतात नन्दू... ..."
नन्दू,"हूः हूः हूः... ...धन्य आहांत सर तुम्ही... ..."
मी,"धन्य ती समोरची ' आंत्रप्रीन्युअर ' जोडगोळी आहे नन्दू... ...आतां ' शेपिंग-फॉर्मिंग बूथ ' चं ऑपरेशन सुरूं होईल... ...तूं बघत रहा फक्त ... कसं सिंक्रोनायझेशन राखून प्रॉडक्शन चालतंय ते..."
आतां ली नं जवळच्या पोतडीतनं नाना प्रकारचे धांरदार चाकू-कात्र्या-दोर्‍याची रिळं वगैरे साहित्य बाहेर काढलं...
वेण्डी आतां टोपलीतल्या पट्ट्या वेगवेगळ्या आकरांत कापून त्या ली समोर टांकत होती, आणि ली त्यांना तर्‍हेतर्‍हेचे तैलरंग लावून रंगवीत होता... ...ली च्या हातातली एक पट्टी रंगवून संपेतोंवर दुसरी कांपलेली पट्टी वेण्डी त्याच्या पुढ्यात टाकायची. एखाद्या यंत्राच्या अचूकतेनं त्यांचा हा उद्योग वीस एक मिनिटं चाललेला होता... ...
मी," याला 'पर्फेक्टली सिंक्रोनाईज्ड प्रॉडक्शन लाईन ' असं म्हणतात नन्दू..."
नन्दू नं तो वेग, ते चापल्य बघून परत कपाळाला हात लावला...!!!
मी," आतां 'फिनिशिंग आणि डिस्पॅच बूथ ' वरचं काम सुरूं होईल... ...नीट बघून ठेंव..."
आतां ली नं पोतडीतनं एकेक फूटभर लांबीच्या बांबू च्या काड्यांचा बिण्डा आणि खजुरी दोर्‍याचं रीळ बाहेर काढलं... ...
नन्दू आतां खुर्चीच्या कडेवर पुढं सरकून बसत आ वांसून तो सगळा थरार
एकटक बघत होता... ...
आणि वेण्डी नं जवळच्या पिशवीतनं पंचवीसएक थर्मोकोल चे पाणी प्यायचे पेले, आणि एक बारीक वाळू भरलेली पिशवी बाहेर काढली... ...
इतकं होतंय तोंवर कुठल्यातरी परगावाहून पुणं बघायला आलेल्या सहलीची एक प्रवासी गाडी धुरळा उडवत वाहनतळावर येऊन थांबली, तीतनं चाळीस-पन्नास प्रवासी आणि त्यांचा गाईड खाली उतरले, आणि बागेत शिरले...
 

आतां ली एकेक बांबूच्या काडीच्या टोकाला त्या रंगवलेल्या उसाच्या पट्ट्या वेगवेगळ्या आकारांत वांकवून दोर्‍या नं घट्ट आंवळून बांधत त्याची सुंदर रंगीबेरंगी फुलं बनवून वेण्डीकडं द्यायला लागला...
वेण्डी नं त्यातली चार-चार पांच-पांच फुलं फटाफट एकत्र गुंफत पुढच्या अर्ध्या तासात त्या फुलांचे थक्क होऊन बघत रहावेत असे देखणे पुष्पगुच्छ बनवले... ...मग जवळच्या थर्मोकोलच्या पेल्यात वाळू भंरून त्यात ते घट्ट रोंवून बसविले... ...


आतां ली आणि वेण्डी तो सगळा पसारा आंवरून गोळा करीत आम्ही बसलेल्या गुर्‍हाळाकडं आले...
ली नं मामू च्या परवानगीनं तिथलंच एक मेज गुर्‍हाळाच्या दारांत लावत त्यावर बरोबर आणलेला स्वच्छ पांढरा टेबल क्लॉथ पांघरला, आणि वेण्डी नं पुष्पगुच्छांच्या पेल्यांना सटासट वीस-तीस रुपये किंमतीची लेबलं चिकटवली... ...
तिच्या देखण्या पुष्पगुच्छां भोंवती आतां बाग फिरून परत आलेल्या त्या प्रवाश्यांतल्या चार-पांच जणांचं कोण्डाळं जमलेलं होतं.
मी," याला पणन कला म्हणजेच मार्केटिंग असं म्हणतात नन्दू..."
ली-वेण्डी च्या ' पुष्प भाण्डारां ' त जमलेल्या कांहीजणांनी मग बसमध्ये चंढत असलेल्या आपापल्या सग्या-सोयर्‍यांना हांका मारल्या... ...
बघतां बघतां ली-वेण्डी च्या ' फ्लोरिस्ट शॉप ' मध्ये गिर्‍हाइकांची तोबा गर्दी उसळली... ...
आणि पुढच्या पंधरा-वीस मिनिटांतच ली-वेण्डी ची दुक्कल पांच-सहाशे रुपयांचा गल्ला खिश्यांत घालून मोकळी झाली... ... ...!!!
आतां शेवटचे दोनच पुष्पगुच्छ शिल्लक उरलेले होते.
वेण्डी ते उचलून पिशवीत भंरत आंवरा आंवर करायला लागली... ...
इतक्यात तीनचार नवीन गिर्हाइकं हजर झाली.
त्यातल्या एकानं त्या उरलेल्या पुष्पगुच्छांकडं बोंट दांखवत विचारलं," क्या दाम है इनका? "
वेण्डी," माल खतम हो गया सर... ...सॉरी..."
गिर्‍हाईक,"अरे ये दो बुके है ना बाकी?... ...इनका दाम पूछ रहा हूं मैं... ..."
ली," ये बेचने के लिये नही है सर... ..."
गिर्‍हाईक,"... ...मतलब?"
वेण्डी," मतलब
ये है सर... ...की हमारे घरमे जो भगवान का मंदिर होता है ना... वहॉं चढानेके लिये ये बनाये है ... ...इन्हे हम बेच नही सकते...माफ कीजिये सर..."
," ठीक है...कोई बात नहीं " म्हणत ती गिर्‍हाइकं थोडीशी घुटमळून हिरमुसत निघून गेली... ...
मी शेजारी बसलेल्या नन्दूकडं बघत फक्त प्रश्नार्थक भिवया उंचावल्या... ...
आणि नन्दू नं छताकडं डोंळे फिरवत तिसर्‍यांदा कपाळावर हात मारून घेतला... ... ...!!!

मग ली-वेण्डी ची दुक्कल सगळी आंवराआंवर करून आमच्याजवळ आली... ... ...
वेण्डी," साब अपने मामू का ज्यूस तो एकदम फस्क्लास होता है... ...पसंद आया आपको?"
मी," देखो वेण्डी... ...ये ज्यूस से भी आप लोग हमसे जो प्यार करते है ना... ...वो बेहतरीन मीठा लगता है..."
ली," इसमे कौनसी बडी बात है साब... ...आप लोगोंने तो इससे दसगुना प्यार दिया है हमे... ...ज्यूस और मंगाऊं छोटेसाब... ...?"
नन्दू नं धन्य धन्य होत ली-वेण्डी ला दाद दिली," थॅंक यू... बस्स... ...बट यू टू आर सिंप्ली ग्रेट मिस्टर ली...!!! "
ली आतां लाजला," अरे
छोटेसाब... ...इसमे हमारा कौनसा बडप्पन है?... ...ये आपके बडे साहब है ना... ...उनसे बहुत कुछ पाया है हम लोगों ने... ...और बहुत इज्जत भी करते है हमारी... ..."
मग वेण्डी नं विक्री न करतां पिशवीत राखून ठेवलेले शेंवटचे दोन पुष्पगुच्छ बाहेर काढले... ...
त्यातला एक मामू च्या गल्ल्यावर हंळूच ठेंवून दिला... ...
दुसरा नन्दू च्या हातात दिला... ...
नन्दू दंचकून खिश्यातलं पैश्याचं पाकीट काढायला लागला, अन् ली म्हणाला," ये हमारी ओरसे आपके लिए छोटे साब... ...अं हं हं हं... ...पैसोंकी फिकर मत कीजिये आप...बडे साब से हम लोग ले लेंगे "

 

इतक्यात मामू नं हांक मारली," ओ वेण्डी... ...इधर आ जरा...ये फूलोंका गुत्था भूल गयी हो इधर काउंटरपर... ..., वो ले के जाना बेटा... ..."
वेण्डी मग काउंटरवर बसलेल्या मामूकडं बघत हंसायला लागली," अरे मामू... ...रहने दे उधर... ...अच्छा दिखता है...रेहाना को बोलना वेण्डी ने दिया है करके... ..."
मामू नं च आतां कपाळाला हात लावला,"तुम जिद्दी बिटियॉं ना, बिल्कुल मुश्किल होती हो मनाने के लिए... ..."
ली," तो हम चलें साब?... ...अब सीधे दुकानपर ही जा रहे है...आप लोगोंको कहीं छोडना है तो कहिए साब ... ... गाडी लेकर आये है आज... ..."
मी," थॅंक्यू ली... ...मै भी गाडी लेकर आया हूं... ...चलो... ...भगवान आपको ऐसाही खुष रखे."
ली," अच्छा...तो चलते है साब... ...अगली बार मॅडम को लेकर जरूर आईएगा दुकानमें...बहुत अच्छा लगता है उनको मिलके "
ली वेण्डी ची ' फोक्स वॅगन ' धुरळा उडवत क्षणार्धांत दिसेनाशी झाली... ...
मी गाडीत बसून आसनाचा पट्टा आंवळून बांधत
नन्दू ला विचारलं,"आणि सुखी-आनंदी-यशस्वी व्हायचं असेल, ' बिझिनेस स्टार्ट अप ' च्या ही पलीकडचं कांहीतरी पंचवलेलं असावं लागतं... ...हे समजलं काय तुला?"
नन्दू," समजलंय की नाही ते ठाऊक नाही सर... ...पण जाणवतंय खरं."
मी गाडी गीअर मध्ये घालून पुढं काढली," आतां या ' स्टार्ट अप ' मागचं अर्थशास्त्र समजून घे नीट... ...बॅंक लोन शून्य...इथपर्यंत आपलं गाडं आलेलं होतं... ...बरोबर?"
नन्दू," बरोबर ".
मी," व्यवसायाच्या जागेतली-इमारतीतली-सजावटीतली गुंतवणूक किती?"
नन्दू," कांहीच नाही...अगदी मोफत "
मी," मोफत कशी काय?... ...शेंवटच्या दोन पुष्पगुच्छांची विक्री कुठं झाली?... ...त्यांची बाजारभावानुसार किंमत प्रत्येकी पंचवीस म्हणजे एकूण पन्नास रुपये स्थावर मालमत्तेतली गुंतवणूक...काय?"
नन्दू," बरोबर..."
मी," उत्पादनव्यवस्थेचा खर्च किती? "
नन्दू ला त्या प्रवचनांत आतां फारच रस वाटायला लागला," सर...हत्यारांतली गुंतवणूक आपण दोनशे रुपये धंरूं... ..."
मी," दोनशे कसे होतील? ती हत्यारं सुमारे वीसएक वर्षं वापरलेली आहेत... ...म्हणजे..."
नन्दू," म्हणजे सर दोनशे रुपये भागिले वीस म्हणजे दहा रुपये झाले भागिले विकलेले तेवीस पुष्पगुच्छ... म्हणजे सर...दर गुच्छामागं चव्वेचाळीस पैसे हत्यारांचा खर्च आला... ..."
मी," तूं ' सुपर एम्. बी. ए. ' कधीकाळीं होशील काय, अशी शंका वाटायला लागलीय मला आतां..."
नन्दू गडबडला," कां?... ...काय झालं सर? "
मी," एक वर्षांत आठवडे किती येतात? "
नन्दू," बावन्न सर..."
मी," बरोबर? आतां ही मंडळी दर शनिवार-रविवारी इथं येऊन हा व्यवसाय करतात... ...प्रत्येक दिवशी पंचवीस पुष्पगुच्छांची विक्री होते असं धंरलं, तर ए
का वर्षातली एकूण विक्री किती होईल?"
नन्दू," अरे होय की सर...हे ध्यानांतच आलं नव्हतं माझ्या...थांबा हं... ...पंचवीस गुणिले बावन्न गुणिले दोन म्हणजे...बापरे...दोन हजार सहाशे झाले..."
मी," आतां दोनशे रुपये भागिले एक वर्षातले दोन हजार सहाशे पुष्पगुच्छ भागिले वीस वर्षांचा कालावधी...म्हणजे दर गुच्छापोंटी हत्यारांचा खर्च किती येतो? "
नन्दू नं आतां पुनश्च कपाळाला हात लावला," जरा थांबा हं सर...दोनशे भागिले दोन हजार सहाशे म्हणजे सात पूर्णांक सहा दशांश पैसे...भागिले वीस वर्षं... ...म्हणजे...जवळ जवळ कांहीच नाही की सर... ...आयला भन्नाटच आहे हे सगळं..."
मी," तमाम ' अस्सल बिझिनेस स्टार्ट अप ' असलेच कांहीतरी भन्नाट असतात नन्दू... ...तरी आपण दर गुच्छापोंटी हत्यारांचा खर्च एक नवा पैसा धरूं... ...ठीक? "
नन्दू," ठीकाय सर..."
मी," पणन व्यवस्थेचा म्हणजे मार्केटिंग चा खर्च किती? "
नन्दू," कांहीच नाही सर... ...शून्य रुपये शून्य पैसे...."
मी," खरं तर ली-वेण्डी हे कसबी कलाकार आहेत... ... पण ते कसबी मजूर आहेत असं समजूं या क्षणभंर...तेव्हां त्यांची रोजची मजुरी प्रत्येकी पन्नास रुपये पकडली, तर दर गुच्छामागं मजुरी चा खर्च म्हणजे ज्याला ' लेबर कॉस्ट ' म्हणतात, तो किती येतो?"
नन्दू भराभर तोण्डी आकडेमोड करीत उत्तरला ," म्हणजे बघा सर...पन्नास गुणिले दोन म्हणजे शंभर, भागिले तेवीस गुच्छ म्हणजे झाले चार रुपये पस्तीस पैसे..."
मी," आणि उत्पादन झालं तासाभरात...म्हणजे एक अष्टमांश दिवसात..."
नन्दू," म्हणजे सर...आठ नं परत भागलं तर दर गुच्छामागची मजुरी येते चोपन्न पैसे फक्त..."
मी," आतां हे जरा सोपं व्हावं म्हणून दर गुच्छामागं रंग साहित्याचा खर्च आपण पन्नास पैसे धरूं, अधिक वाळूचे दहा पैसे, अधिक थर्मोकोल पेल्याचे चाळीस पैसे... ...ठीक? "
नन्दू," ठीकाय सर..."
मी," आतां मला सांग या सगळ्यावर ह्या जोडगोळीला
किती विक्री कर भंरावा लागतो? "
नन्दू," कसला काय कर आलाय सर?... ...कांहीच नाही."
मी," कांहीच नाही कसा?...आपल्या देशांत भ्रष्टाचारांत बरबटलेल्या सरकारी बाबूं चा तुटवडा नाही... ...महापालिकेच्या गुमास्ता खात्यातले टगे ' ली-वेण्डी ' सारख्या कष्टाळू-प्रामाणिक ' आंत्रप्रीन्युअर्स ' च्या मुण्ड्या मुरगाळून स्वतःचे खिसे भंरत इथं घिरट्या घालत फिरतात. त्यांना या लोकांना
कांहीबांही चिरीमिरी द्यावीच लागते... ..."
नन्दू," किती नीचपणा आहे ना सर? "
मी," ' एम. बी. ए. '
च्या अभ्यासक्रामात संतपणा-नीचपणा असलं कांही शिकवलं जात नाही नन्दू... ...नको असलेल्या वस्तू ग्रहाकाच्या गळ्यात मारून भरमसाठ नफा कसा कमवायचा याचं प्रशिक्षण त्यात दिलं जातं... ...तेव्हां ढोबळ मानानं सरकारी बाबूं च्या खाबूगिरी चा खर्च दर गुच्छामागं आपण धरूं पन्नास पैसे... ...ठीकाय?"
नन्दू," ठीकाय सर..."
मी," आतां मला सांग... ...दर गुच्छामागं एकूण उत्पादन विक्री खर्च
वगैरे वगैरे ... ...म्हणजेच दर गुच्छाची उत्पादन किंमत, जिला आपण ' प्रॉडक्शन कॉस्ट ' म्हणतो ती किती झाली?"
नन्दू दोन मिनिटं गणित करत होता... ...मग म्हणाला," फक्त चार रुपये बावीस पैसे सर...प्रतिगुच्छ. "
मी," आणि विक्रीची किंमत वीस-तीस च्या दरम्यान म्हणजे सुमारे पंचवीस रुपये धरली, तर निव्वळ नफा किती निघतो?"
नन्दू नं क्षणभर आंकडेमोड केली, आणि कपाळाला हात लावत किंचाळला," धन्य आहे सर या सगळ्याची... ...आयला
... चारशे ब्याण्णव टक्के निव्वळ नफा...!!! "
मी," तुझा त्रिफळा उडालाय नन्दू... ..."
नन्दू," ऑं?... ...ते कसं काय सर? "
मी," पुष्पगुच्छ बनवायला जो कच्चा माल म्हणजे तुम्ही ' रॉ मटीरियल ' म्हणतां ना?...ते...म्हणजे इथं उसाच्या सालीच्या कामट्या...त्यांचा खर्च कुठं हिशेबात धंरलायस तूं? "
नन्दू," होय सर... ...कळलं मला...पण तो असा कितीसा असणाराय?... ...दोन उसांचे तीन दुणे सहा रुपये होतील फार फार तर...त्यानं ह्या गणितात असा कितीसा फरक पडणाराय? "
मी," या कच्च्या मालाचा खर्च आहे उणे चौर्‍याऐंशी रुपये... ..."
नन्दू उडालाच," ऑं?... ...ते कसं काय सर?.... ...उगीच फिरकी तांणू नकां माझी..."
मी," खरोखरीच ते तसं आहे नन्दू...असं बघ...ली-वेण्डी नं ऊस विकत घेतले नसते, तर फुलं बनवायला त्यांना बांबूच्या सालपटांच्या कामट्या विकत आणाव्या लागल्या असत्या टोपलीभर... ...बरोबर? "
नन्दू,"बरोबर... ..."
मी," बांबू च्या कामांत तो वाया गेलेला कचराच असतो...तरी आपण त्याची किंमत दहा रुपये धंरूं या... ..."
नन्दू," ठीकाय सर... ...दहा रुपये कच्च्या मालाचा खर्च..."
मी," इथंच तर ' सुपर स्टार्ट अप ' ची गोम आहे नन्दू... ..."
नन्दू,"...ती कोणती ?"
मी," आतां असं बघ, की बांबूच्या कामट्या आणल्या असत्या, तर त्यासाठी दहा रुपये खर्चावे लागले असते, उसाचा सहा रुपये खर्च वांचला असता, पण ली आणि वेण्डी ला कुठल्यातरी हॉटेलात उदरभंरण करायला जावं लागलं असतं...आणि सर्वसाधारणपणे माणशी चाळीस रुपये भोजन खर्च म्हणजे एकूण ऐंशी रुपये मोजावे लागले असते... ...तात्पर्य बांबू कामट्यांचे दहा अधिक भोजनाचे ऐंशी असे एकूण नव्वद रुपये खर्च उणे उसांचे वांचलेले सहा रुपये, अशी  नक्त चौर्‍याऐंशी रुपये कच्च्या मालाची किंमत पडली असती... ...हा न झालेला खर्च म्हणजेच कच्च्या मालाची नक्त उणे किंमत... ...आतां समजलं? "
नन्दू," खरंच की सर..."
मी,"आणि ही किंमत जर तुझ्या गणितात जमेला धंरलीस, तर नक्त नफा येतो पांचशे एकूणऐंशी टक्के... ...चारशे ब्याण्णव टक्के नव्हे... ...!!! "
नन्दू नं आतां मात्र थडांथडां कपाळावर हात मारून घेतला,"आयला... ...विश्वासच बसत नाहीय सर...असलं भन्नाट आहे हे सगळं..."

मी," आतां मला सांग...जगभर टाटा-बिर्ला-मित्सुबिशी असले उद्योगसमूह जे राक्षसी उत्पादनक्षमतेचे कारखाने अब्जावधींचं भांडवल ओंतून उभे करतात, त्यांची नक्त नफ्याची टक्केवारी किती असते?... ...कांही कल्पना आहे तुला? "
नन्दू," नाही बुवा... ...असेल चाळीस पन्नास टक्क्यांच्या आसपास तरी......."
मी," या असल्या मध्यम - म्हणजेच ' एम. बी. ए.' च्या भाषेत ज्यांना ' मिडकॅप इंडस्ट्रीज ' म्हणतात, त्या उद्योगांचा नक्त नफा आठ -दहा टक्क्यांच्या आसपास असतो...त्यापेक्षा ज्यास्त नाही.... ... आणि अजस्र क्षमतेचे जे उद्योग -म्हणजे ' लार्ज कॅप ' म्हणतात तसले-त्यांची नक्त नफ्याची टक्केवारी यापेक्षाही कमी, म्हणजे चार-सहा टक्केही असूं शकते..."
नन्दू," आयला... ...सर... मग केवळ चार-सहा टक्क्यांसाठी इतका महाउपद्व्याप ते कश्यासाठी करत बसतात? "
मी," या अजस्र उद्योगांची नक्त नफ्याची टक्केवारी जरी नगण्य असली, तरी उत्पादन राक्षसी म्हणावं असं प्रचण्ड असल्यामुळं, त्यांचा एकूण नफा पण राक्षसी असतो...तो उत्पादनाशी निगडित असतो...नफ्याच्या टक्केवारीशी नव्हे...आतां समजलं सगळं? "
नन्दू," थोडं थोडं ध्यानात यायला लागलंय सर..."
मी," तात्पर्य, अब्जावधींची गुंतवणूक करणारे टाटा-बिर्ला सारखे उद्योगपतीं जितके टक्के नक्त नफा कमावतात, त्याच्या साठ-सत्तर पटीत ' ली-वेण्डी ' सारखे छोटे उद्योजक नफा कमवत असतात... ...तो पण पोंटभर खाऊन पिऊन वरकड नफा... उदभरणाचाही त्या नफ्यात अंतर्भाव नाही... ... ...आतां नीट समजलं काय ' अस्सल बिझिनेस स्टार्ट अप ' कश्याशी खातांत ते? "
नन्दू," समजलं सर... ...आलं लक्ष्यांत सगळं आतां..."

मी," आणि तो शिकायला ' यू. एस. ' ला परागंदा व्हायाची काहीही गरज नसते... ...हे पण पटतंय काय? "
नन्दू," पटतंय सर... ...बरोबर आहे तुमचं. "
नन्दू चं घर आल्यामुळं मी गाडी थांबवीत म्हटलं," आणि बिझिनेस मध्ये पडून खर्‍या अर्थानं यशस्वी-सुखी-समाधानी-आनंदी व्हायचं असेल, तर तथाकथित ' बिझिनेस स्टार्ट अप ' च्याही पलीकडचं कांहीतरी पंचवलेलं असावं लागतं...हे पण समजलं काय तुला...? "          
नन्दू नं गाडीतनं पायउतार होतां होतां आतां मला च टांग मारली... ...," ते कांही नीटसं नाही कळलं सर, पण... ..."
मी," पण... ...काय? "
नन्दू म्हणाला," पण ली-वेण्डी तुम्ही म्हणातां ते  ' बिझिनेस स्टार्ट अप च्याही पलीकडचं कांहीतरी ' कुठून शिकले असावेत, ते मात्र बरोबर समजलं सर... ..."
इतकं बोलून नन्दू गाडी चा दरवाजा बन्द करत माझ्याकडं रोंखून बघायला लागला... ...
आणि मी च कपाळाला हात लावत गाडीचा स्टार्टर मारून ती कोरेगाव पार्क च्या दिशेत पिटाळली... ...!!!"



*****************************************************************************************
-- रविशंकर.
२३ फेब्रुवारी २०२१.

 

No comments:

Post a Comment