Search This Blog

Friday 8 May 2020

॥ श्वानप्रेमी ॥


" हे बघ नाना... ...'आपली भारतीय संस्कृति' वगैरे ह्या सगळ्या केवळ तोंडच्या गप्पा मारायच्या गोष्टी असतात...स्वतःला वगळून तमाम दुनियेला ढालगजपणानं सांगण्यासाठीच... ...
स्वतः पाळण्यासाठी नव्हेत... ...समजलास?" माझा मित्र शरद ऊर्फ शर्‍या दातार त्याच्या घरातल्या भोजन मेजावर वळलेली मूठ आंपटत तांवातांवानं म्हणाला... ... ...
गेल्या वर्षीच्या दिवाळीतले दिवस होते... ...
दरवर्षीच्या आमच्या रिवाजानुसार शर्‍या दातार च्या घरीं आम्हांला दिवाळीतल्या चहा-फराळाचं निमंत्रण होतं...आणि त्याच्या घरीं आम्ही दोघें ( म्हणजे मी अन्‌ सौ. इंदिराजी ), आमचा शाळा दोस्त डॉ. अजित ऊर्फ आज्या कर्नाटकी, त्याची बायको सौ. अलका वहिनी, आणि आमचे दुसरे एक स्नेही श्री. रमणिकलालजी ऊर्फ भाई शहा आणि त्यांच्या सौ. पद्माबेन इतके लोक जमलेलो होतो.
सौ.वृन्दावहिनीं च्या हातच्या चविष्ट फराळाचे बकाणे भंरत मग आमच्या गप्पांची मैफल भंरलेली होती... ...
आणि रमणिकलालांच्या बरबटलेल्या चपलेनं मैफलीला आयता ज्वलन्त विषय नेमका पुरवलेला होता... ... ...

                                          'श्वानप्रेमी ऊर्फ डोंकेदुखी'


झालं असं होतं की, कोथरूड भागातल्या 'वृन्दावन अपार्ट्‌मेण्ट्स्‌' मधल्या शर्‍या च्या घरीं जातांना त्याच्या अपार्ट्‌मेण्ट्स् च्या फांटकासमोरच कॉलनीतल्या कुणा नवश्रीमन्ताच्या लाडक्या श्वानानं केलेल्या प्रातर्विधीच्या घाणीत श्री. रमणिकलाल यांचं चप्पल बंरबटलेलं होतं, आणि म्हणूनच फंटकळ शर्‍या चा पारा असा चंढलेला होता... ...
श्री. रमणिकलाल,"जाऊं द्या हो शरदभाई... ...जी काय घाण गांवभंर पसरायची ती तर होऊन बसलीय ना?... ...आतां संतापून काय उपयोग?"
शर्‍या आतां उसळला,"रमणिकभाई... ...इथं त्या कुत्र्याला आमच्या दारांत घाण करायला निर्ल्लज्जपणे बसवणारा त्याचा मालक आत्तां माझ्यासमोर नाही, म्हणून नुस्ताच बोलतोय्‌ ... ...तो समोर असता ना, तर त्यालाही कुत्र्याशेंजारी उकिडवा बसवून प्रातर्विधी होईस्तंवर दणके घातले असते मी... ...!!!...काय?"
"शरूभाईंचं अगदी बरोबर आहे बरं...",सौ. पद्माबेन शरदरावांची कड घेत म्हणाल्या," हे श्वानप्रेमी नुस्ते आंचरट च नसतात, तर अगदी पट्टीचे ढालगजही असतात, असं माझं पण आजवरचं निरीक्षण आणि त्यापोंटी घट्ट झालेलं स्पष्ट मत आहे... ...
इतके ढालगज असतात, की सार्वजनिक स्वच्छतेचा विषय निघाला, की पान-तंबाखू खाऊन जागोंजागीं पिंका टांकणार्‍यांना शिव्या देणार्‍यांत नेमकी हीच मंडळी आघाडीवर असतात...!!
ती पान-तंबाखू वाली माणसं बहुतांशी अडाणी-अशिक्षित तरी असतात... ...हे तथाकथित सुशिक्षित श्वानप्रेमी म्हणजे अडाणी-अशिक्षित परवडले म्हणावं, असले बेरकी, ढालगज अन्‌ तितकेच निर्ल्लज्जही असतात. स्वतःचं घर वगळतां उर्वरित जग म्हणजे ह्यांच्या लाडक्या कुत्र्यांचं सुलभ शौचालय आहे, अशी ह्यांची आंचरट समजूत असते की काय कोण जाणे... ...
गेल्या चाळीस वर्षांत मी परदेश फिरतांना अनेक वेळां प्रत्यक्ष बघितलेलं आहे, की ही असली माणसं परदेशात गेलीं, की तिथं मात्र कनवटीला प्लॅस्टिक च्या कचरा पिशव्या खोंचून अगदी सुतासारखी सरळ वागत असतात. आणि आपल्या भारतात परत आली रे आली, की विमानतळावरनं बाहेर पडल्या पडल्याच हातातल्या फुटकळ कचर्‍याच्या पिशव्या गोंफण मारल्यागत कुठल्याही दिशेत भिर्रदिशी भिरकावून चालतीं होतात... ...ही आपली संस्कृती."
रमणिकभाई,"अहो पण ह्या पढाई-लिखाई केलेल्या लोकांना हे सांगूनही समजत नसेल, तर त्याला काय करायचं?"
,"समजत नाही असं कांही नसतं रमणिकभाई... ...तो वेड पांघरून पेडगावला जायचा कोडगा प्रकार असतो... ...दुसरं कांही नाही...असल्या कोडग्यांना कुणी कांही सांगून त्यांच्यात कांहीही फरक पडत नसतो...", मीही माझं स्पष्ट मत मांडलं... ...
"म्हणूनच", शर्‍या वंतवंतला,"असल्या पेडगांव च्या गाडीत बसलेल्या उंटावरच्या शहाण्यांना चौदावं रत्न दांखवूनच त्यांचं वांकडं शेंपूट सरळ करून ठेंवावं लागतं नाना... ...समजलं?"
 
,"शरद भावजींचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे रमणिकभाई... ...", सौ. अलका वहिनी पण आतां शर्‍याच्या बाजूनं मैदानात उतरल्या,"ह्या कुत्रीं पाळणार्‍या तथाकथित 'श्वानप्रेमी' नां त्यांची लाडकी कुत्री घाण करायला गांवभंर फिरवतांना कसलीही लाजलज्जा वाटत नाही... ...खरं की नाही गं वृन्दे?"
सौ. पद्माबेन,"अगदी ठार निर्ल्लज्ज, अन्‌ कोडगे असतात हे श्वानप्रेमी अलका... ...आपल्या कुत्रं बाळगायच्या हौशीखातर गांवभंर घाण पसरवायला आपण कारणीभूत होतोय्‌ याची कसलीही खेद-खन्त न्‌ लाजलज्जा वाटत नसते त्यांना... ...असल्या नालायक समाजकंटकांच्या माथीं चांगला भंरमसाठ दंड मारून वसूल करायला पाहिजे महापालिकेनं... ..."
सौ. इंदिराजीनी आतां त्यांचा हिटलरी रामबाण उपाय सुचवला,"नुस्ता दंड माथीं मारून असल्या आंचरटांत काडीची तरी सुधारणा झालीय्‌ काय आजतागायत?... ...ऑं?...चांगले फोंडून काढले पाहिजेत मेल्यांना पांठी फुटेंस्तोंवर... ...त्याशिवाय असले कोडगे कधी सुधारत नसतात... ...म्हणे सुशिक्षित नवश्रीमन्त...ह्यांच्यापेक्षा धारावी झोंपडपट्टीत त राहणारी तळागाळातली माणसं सुद्धां फार बरी... ..."
,"नाहीतर काय?",सौ. वृन्दा वहिनीनीं रंटरंलेल्या विषयाला आतां खरमरीत तंडका मारला,"लेकाचे स्वतः झोंपडपट्टीत नांदायच्या लायकीचेच असतात... ...वर आणखी त्यांच्या 'डॉगी' ला कुणी हाड हाड केलं, की स्वतःलाच हाड हाड केल्यासारखा राग पण काय येतो मेल्यांनां.... ...काय समजतात स्वतःला कुणास ठाऊक... ..."
अहो आज सकाळीच आमचा वॉचमन वर येऊन सांगत होता की रोज सकाळ-संध्याकाळ गल्लीतले दोन-तीन कुत्रीवाले अगदी नियमितपणे साखळीला कुत्री बांधून घाण करायला सगळ्या गल्लीभर फिरवत असतात आणि आपल्या सोसायटीच्या फाटकासमोरच कधीकधी ती घाण करतांना मखखपणे बघत उभे असतात म्हणून... ...
मेल्यांना मानगुटीला धंरून त्यांच्या कुत्र्यांनी केलेली घाण काढायला लावली पाहिजे...त्याशिवाय हे वेंचक नग सुधारणार नाहीत कधी... ..."
आतां माझी उत्सुकता जागी झाली... ...सदर वॉचमन हे सगळं श्वान रामायण शरबांनां च सांगायला वर आलेला असणार... ... ...
मी,"मग?... ...त्या वॉचमन ला काय सांगितलंस तूं शर्‍या?... ..."
शरद,"मी वॉचमन ला कांहीच सांगितलं नाही... ...!!! "
आतां सगळ्यांचीच उत्सुकता तांणली गेली... ...
मी,"कांहीच सांगितलं नाही...म्हणजे काय?... ...मग त्याची समस्या कशी काय सोंडवलीस तूं ?... ...ऑं?"
शरदराव मग सौ. वृन्दा वहिनींकडं निर्देश करीत शांतपणे म्हणाले,"मी त्याच्या हातात हि ची धुणी वाळत घालायची घणसर कांठी दिली, आणि त्याला सांगितलं, की आपल्या सोसायटीच्या फाटकासमोर कुणी कुत्रं बसवतांना दिसलं रे दिसलं, की काठीचा असा एकच सणसणीत रट्टा कुत्र्याच्या पेंकाटात हाणायचा, की कुत्रं, आणि त्याच्यापुढं त्याचा मालक-मालकीण जे कुणी असतील ते, सुसाट केंकाटत पळत सुटले पाहिजेत... ...काय?"
आतां नरम स्वभावाच्या आज्या नं प्रश्न केला,"आणि वादावादी होऊन प्रकरण चिघळायच्या थंराला गेलं, तर मग काय करणार तूं शर्‍या?"

डॉ. अजित कर्नाटकी च्या प्रश्नाचं उत्तर आम्हांला जिवन्त सादरीकरणाच्या मार्गानं मिळायचा त्या दिवशी मुहूर्त उगवला होता की काय कोण जाणे... ...
कारण त्याला उत्तर द्यायला शरदरावांनी तोंड उघडायच्या क्षणींच घरातली घंटा खंणाणली... ... ...
सौ. इंदिराजी नी उठून दरवाजा उघडला, तर दरवाज्यात वॉचमन उभा होता,"साब घरमें है क्या मॅडम?"
सौ. इंदिराजी,"हां है... ...एक मिनिट ठहरो... ...शरदभावोजी... ...वॉचमन आलाय तुम्हांला भेंटायला... ..."
शर्‍या,"चला... ...बरं झालं...वॉचमन ला बहुतेक एखादा बकरा-बकरी सापडलेली दिसतीय्‌ नाना... ...छान...उत्तम... ...
चला सगळेच या बरोबर माझ्या... ...असली श्राद्धं कशी घालतात ते बघायला... ..."
आतां शरदरावांच्या मागोमाग आम्ही सगळेच घराच्या दरवाज्यात गोळा झालो... ... ...
शर्‍या," क्या हुआ भैया?...क्यों आये हो ऊपर हमें बुलानेको?"
वॉचामन,"साब वो हररोज कुत्तेको गेट के सामने टट्टी करनेको बिठानेवाली मॅडम आयी है नीचे... ...और झगडा खडा कर रही है खामोखाम... ..."
शर्‍या,"पहले हुआ क्या ये बोलो झंटपट... ..."
वॉचमन,"ये मॅडम है ना साब... ...बिल्कुल पहुंची हुई मॅडम है... ...
वो क्या करती है ना साब.......की पहले गली मे कुत्ते का पट्टा पकडके एक चक्कर काटती है... ...कौन कहॉं खडा है, वो पहले आजमाती है... ...
और फिर कुत्तेका पट्टा खोलकर उसे खुला छोड देती है जहॉं मर्जी लगे वहॉं टट्टी करने...और खुद दूर खडी रहती है गली के मुंहपे... ...
ताकि अगर कोई कुत्तेको देख भी ले टट्टी करते, तो भी कोई झगडा मोल लेनेकी बारी न पडे... ..."
शर्‍या,"बहोत खूब भैय्या... ...और फिर?"
वॉचमन,"और फिर कुत्ता टट्टी करके आया, तो चोरनी पे मोरनी बनके उसके गलेमे पट्टा अटकाके खिसक जाती है... ..."
शर्‍या,"तो अभी तुम्हारे साथ झगडा क्यूं कर रही है?"
वॉचमन,"साब... हुआ ये, की आपने ऑर्डर दिया था ना... ...तो जैसे ही उसका कुत्ता अपने गेटके सामने बैठने लगा, तो मैने जमा दिया एक डण्डा कुत्तेको... ..."
शर्‍या,"अब आयी बात समझमें... ...तो मोहतरमॉं 'कुत्ता साहिबा' तुम्हारे साथ झगडने चली आयी है... ...और तुमको धमका रही है... ...है ना?"
वॉचमन,"बिल्कुल सही समझा आपने साब... ...मॅडम गेट पे खडी है... ...आप चालिये साब"
शर्‍या,"तुम गेटपे खडे रहो... ...जाओ...हम लोग अभी आते है मामला निपटनेके लिए..."
वॉचमन सलाम ठोंकून निघून गेला... ...

आणि सौ. वृन्दा वहिनीनीं शर्‍याला तंबी भंरत तोंड उघडलं,"तुम्ही अजिबात तोंड उघडायचं नाही खाली गेल्यावर... ...कळलं?... ...मी बघते काय करायचं ते... ..."
मग आमच्याकडं वळल्या,"सुमे-नाना...ह्यांचं तोंड कसलं फांटकं आहे, ते माहीत आहे ना तुम्हांला? उगीच गल्लीभंर तमाशा व्हायला नकोय्‌ मला... ..."
सौ. इंदिराजी,"अगं पण वॉचमन सांगत होता, तशी ही बाई डॅंबीस तोंडाळ असली, तर मग काय करणार आहेस तूं वृन्दे?... ...तंसल्या लोकांना त्यांना लख्ख समजेल अश्याच भाषेत उत्तरं द्यावी लागतात... ..."
सौ. वृन्दा वहिनी,"तशी वेळ आलीच, तर मग तूं आहेस ना सुमे... ...पण नाना......'ह्यां' ना आंवरून धंरा जरा...उगीच गल्ली गोळा व्हायला नको... ..."
सौ.इंदिराजीनी मग शर्‍या ला नजरेनंच गप्प रहायची खूण केली, आणि आम्ही वॉचमन पांठोंपाठ खाली उतरून गेटवर गेलो... ... ...

गेटवर एक पन्नाशी च्या अत्याधुनिक बाई त्यांच्या लाडक्या 'डॉगी' ची सांखळी हातात पकडून युद्धाच्या पवित्र्यात फुंसफुंसत उभ्या होत्या... ...
अंगात थ्री-फोर्थ लेगी आणि वर गंजीफ्रॉकवजा टॉप...केसांचं केशरी-सोनेरी रंग चोंपडून टोंपलं केलेलं... ...पायांत तर्जनीच्या उंची
च्या उंच टाचांचे सॅण्डल्स... ...
टोंपल्याच्या पुढच्या बाजूला मुद्दाम बाहेर काढलेल्या वीत वीत लांब झिपर्‍या तोंडावर लोंबत होत्या... ... ...
आणि प्रत्येक सेकंदला मानेला एकदां उजव्या बाजूला, अन्‌ दुसर्‍यांदा डाव्या बाजूला चमत्कारिक हिसडे देत बाई तोंडावर लोंबणार्‍या झिपर्‍या उर्मटपणे पाठीमागं भिरकावत होत्या...
बाईंच्या चेंहर्‍यावर परदेशांत नांदणार्‍य़ा पोरांटारांच्या पैश्यानं आलेला नवश्रीमन्तीचा माज ओंसण्डून वाहत होता...
ते श्वानप्रेमी ध्यान बघून मला श्रीक्षेत्र गाणगापूरला अंगात आलेलं उतरवायला जी माणसं धंरून आणतात, त्यांची आंठवण झाली... ... ...
थेट तसलाच नमुना दिसत होता तो... ...आणि लाडक्या कुत्र्याला बसलेल्या रट्ट्यानं तंसाच फंणफंणलेलाही दिसत होता...
फक्त ' हूं...हूं...हूं...हूं...' करत अंगात आल्यागत बाई घुमायला लागायचंच काय ते बाकी राहिलेलं दिसत होतं... ...!!! 

                      

बाईंची झाडाझडती घ्यायला प्रथम सौ. वृन्दा वहिनी पुढं झाल्या,"काय झालंय बाई तुम्हांला एव्हढा आरडा ओंरडा करायला ?..."
ध्यान,"दीड-दमडीचा तुमचा हा वॉचमन ... ...कोण लागून गेलाय्‌ आमच्या 'डॉली' वर हात उगारायला?... ..."
वॉचमन (सौ. वृन्दा वहिनीनां),"मैने इनके कुत्तेको हाथ नही लगाया मेमसाब... ...सिर्फ लाठी का फटका मारा था..."
ध्यान,"सिर्फ फटका मारा था?... ...किती कळवळून केंकाटली माझी 'डॉली'... ...उगी...उगी बाळ...हां...उगी...!!"
सौ. वृन्दा वहिनी,"लेकिन क्यूं चलायी लाठी तुमने इस कुत्तेपर भैय्या?"
वॉचमन,"मेमसाब...ये मेमसाब इस कुत्ते को लेकर हर रोज यहॉं आती है, और कुत्तेको कहीं भी टट्टी करने के लिये खुला छोड देती है... ..."
ध्यान,"तो तुम्हारा इसमे क्या गया मैं पूछती हूं?...हमारा कुत्ता रस्तेपर कहीं भी टट्टी करें तों तुम कौन होते हो इसपे लाठी चलानेवाले?... ...फटीचर कहीं का... ..."
सौ. वृन्दा वहिनी,"हे बघा मॅडम... ...जे काय बोलायचं असेल, ते माझ्याशी बोला... ...वॉचमन ची यात कांहीही चूक नाही... ...समजलं?"
ध्यान,"आमची डॉली रस्त्यात कुठंही बसेल नैसर्गिक विधी करायला... ...तुमच्या आवारात तर नाही ना बसत?...हा कोण तिला मारणार?..."
सौ. वृन्दा वहिनी," हे बघा बाई...तुमचं लाडकं कुत्रं असं कुठंही घाण करायला मोकाट सोडतां येत नाही... ...माहीताय ना तुम्हांला?"
ध्यान,"हे असले डोस तुमच्याकडून घ्यायची गरज नाही आम्हांला... ...आमची डॉली महापालिकेच्या रस्त्यावर काय ते करतीय्‌... ...महापालिका आणि आम्ही आपसांत काय ते बघून घेऊं... ...तुम्हांला यांत दखल द्यायचं कारणच काय?"
सौ. वृन्दा वहिनी,"हे असली बेछूट उत्तरं काय ती महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांना द्या... ...समजलं?... ...
आमच्या सोसायटीच्या फाटकासमोर घाण करायला तुम्ही बिनदिक्कतपणें रोज कुत्रं आणून बसवताय, म्हणून आज वॉचमन नं रट्टा हाणलाय त्याला... ...तेव्हां आमचा वॉचमन हांकलणारच त्याला काठी मारून... ...आमचाच काय...कुठल्याही सोसायटीचा वॉचमन हें च करील... ...नाही?"
ध्यान,"आम्ही महापालिकेच्या रस्त्यावर काय वाट्टेल ते करूं... ...तुम्ही कोण लागून गेलाय आम्हांला विचारणारे?... ...मला हे प्रकरण पोलिसांत न्यावं लागेल... ..."
आतां सौ. वृन्दा वहिनींची सोशिकता संपली... ...
शरदरावांच्या चेहर्‍यावर आतां हळूं हळूं लाली चंढायला लागली होती... ... ...
त्यानं तोंड उघडायच्या आंतच आतां सौ. इंदिराजीनी सूत्रं ताब्यात घेंतली,"अगदी खुश्शाल तक्रार करा पोलिसांत... ...काय? आणि हे तुमचं दररोज चाललेलं 'स्वच्छ भारत अभियान' पण नमूद करां तुमच्या तक्रारीत...आणि बघा मग कसलं खरपूस बक्षीस मिळतंय्‌ ते... ... काय?"
ध्यान,"व्हॉट द हेल डू यू मीन... ...?"
सौ. इंदिराजी,"मराठी समजत नाही काय तुम्हांला?... ...कां चार-दोन महिने परदेशांत राहून आल्यावर टाळकं गुळगुळीत झालंय्‌ तुमचं?
मला असं म्हणायचं आहे की, खुश्शाल तक्रार करा तुम्ही पोलिसांत... ...
ती एकदां केलीत, की पोलीस आमच्या वॉचमन ला उचलताय्‌त, की मोकाट कुत्रीवाले तुमच्या या 'डॉगी' ची गचाण्डी धंरून नेताय्‌त, ते दिसेलच तुम्हांला... ...काय?"
ध्यान,"पण तुम्ही कोण वॉचमन ला सांगणारे अशी काठीनं मारहाण करायला आमच्या कुत्र्यांना?... ...ऑं?...मेली-बिली असती आमची 'डॉली' म्हणजे?..."
"डहाणूकर कॉलनीची डोंकेदुखी कायमची संपली असती... ...!!!...", सौ. वृन्दा वहिनी पण आतां तंडकल्या... ...,"आमच्या वॉचमन नं दहा वेळां सांगितलंय ना तुम्हांला गेट समोर घाण करायला कुत्रं बसवूं नकां म्हणून?... ...सरळ सांगितलेलं तुम्हांला जर ऐकूं येत नसेल, तर मग हा जे काय करून ठेंवील तुमच्या कुत्र्याचं, त्याला तुम्ही स्वतःच जबाबदार असाल... ...समजलात?"
ते ध्यानही आतां पिसाळलं,"रस्ता कांही तुमच्या मालकीचा नाहीये... ...कुत्र्याला हात लावलेला अजिबात खपणार नाही आम्हांला...सांगून ठेंवते...!!"
सौ. इंदिराजी ह्या आक्रस्ताळ्या विधानाची वाटच बघत असाव्यात... ...
त्या आतां वॉचमन कडं वळल्या," भैय्या... ...आपने इनके कुत्तेपर लाठी क्यूं चलायी?"
वॉचमन शर्‍याकडं निर्देश करीत उत्तरला,"मुझे साब ने बोला था मेमसाब... ...ऐसे कुत्तों पे लाठी चलानेको..."
सौ. इंदिराजी,"कौनसे कुत्तों पे लाठी चलानेको बोले थे साब ?"
वॉचमन,"'जो कुत्ते अपने गेट के सामने टट्टी करनेको आते हैं, उन कुत्तोंपर लाठी चलाओ' ऐसा साब ने बोला था मेमसाब... ..."
ध्यान,"बघा... ...बघा तुम्हीच...काय चाललंय्‌ ते..."
सौ. इंदिराजी,"भैय्या... ...साब जब भी तुमको कुछ बोलते है ना, तब पहले ठीक तरहसे सुनो, और समझ लो की साब क्या बता रहे है... ..."
वॉचमन,"मुझे साब ने तो टट्टी करनेवाले कुत्तोंपर लाठी चलानेको बोला था मेमसाब... ..."
सौ. इंदिराजी तत्क्षणीं त्या 'ध्याना' कडंबोंट दाखवत कडाडल्या,"तुमको सरासर गलतफहमी हुई है भैय्या...साबने तुमको 'कुत्तोंपर लाठी चलाओ' ऐसा नही बोला था...
साबने आपको बोला था की 'खुदके सरपे चढाये-बिठाये लाडले कुत्तोंको अपने गेटपर टट्टी करवाने के लिए ऐसे जो गधे लेकर आते हैं, इनपर लाठी चलाओ'... ...!!! ...अब आयी बात समझमें?"

आतां वॉचमन सकट तो तमाशा बघायला गोळा झालेली सगळी माणसं खीः खीः करायला लागली... ...!!
त्या फॉरेन रिटर्न्ड 'ध्याना' चा चेंहरा बघतां बघतां संतापानं लालेलाल झाला... ...!!!
आणि आणखी दुर्बुद्धी सुचून ते ध्यान किंचाळलं,"कुणाला गाढव म्हणताय हो तुम्ही?... ...आणि तुमची अक्कल कुठं गेलीय्‌ केळी खायला ?... ...
महापालिकेची गोष्ट सांगताय्‌त आम्हांला... ...महापालिकेनं रस्त्याकडेला पाळीव कुत्र्यांसाठी शौचालयं आहेत काय कुठं बांधलेली?... ...नाहीत ना?
... ... मग आमची कुत्री प्रातर्विधीसाठी कुठं बसवायची आम्ही?... ...ऑं?"
आतां कुणाला कांही कळायच्या आंत शर्‍यानं च तोंड उघडलं... ...
शर्‍या,"काय पण तुम्ही तरी बाई... ...भोंट आहांत अगदी...अहो साधी सरळ सोपी गोष्ट आहे... ..."
ते ध्यान आतां शर्‍यावर फिस्कारलं,"कसली काय साधी-सरळ गोष्ट आहे ?... ...ऑं?"
आणि शर्‍या नं क्षणार्धांत चारी मुण्ड्या चितपट कुस्ती मारली,"काय करायचं बाई... ... की तुमच्या कुत्र्याला प्रातर्विधीची कळ आली ना, की त्याला स्वतःच्या डोंक्यावर बसवून घ्यायचं...आणि त्याचं काम आटपलं , की थेंट न्हाणीघरात अंघोळील शिरायचं ... ... !!!
म्हणजे तुमच्या लाडक्या 'डॉगी' ची पण आयती सोय होईल...आणि तुमची अंघोळही अनायासे होईल, आणि रस्तेही चकाचक राहतील...!!! ... ... काय?"
त्या 'इंपोर्टेड ध्याना' च्या लालबुंद तोण्डाला आतां कुलूप लागून, ते फाड्‌दिशी मुस्कटात बसल्यासारखं क्षणार्धात काळंठिक्कर पडलं... ...
त्याच्या केशरी-सोनेरी रंगवलेल्या झिपर्‍या आतां दोन्ही बाजूंनीं तोंडावर लोंबायला लागल्या... ...!!
तो तमाशा बघायला गोळा झालेल्या झोंपडपट्टीतल्या बाया-बापड्याही तोंडाला पदर लावून फिदी-फिदी हंसायला लागल्या... ...!!
मश्रूम कट केलेली उंडगी पोरं-टारं पण ख्याः ख्याः ख्याः करायला लागली...!!
आणि स्वतःच्या कपाळावर हात मारून घेत आपल्या लाडक्या 'डॉली' च्या पट्ट्याला हिसडा देऊन त्या 'इंपोर्टेड ध्याना' नं बघतां बघतां पांठ फिरवून 'यः पलायन सूं बाल्या' केला... ...!!!


*****************************************************************************************
-- रविशंकर.
८ मे २०२०.

No comments:

Post a Comment